गझलची तोंडओळख

Submitted by kaaryashaaLaa on 15 September, 2008 - 18:35

मित्रांनो,

कार्यशाळेबाबतीत तुम्ही दाखवलेल्या उत्साहामुळे आम्हालाही हुरूप आला आहे. गुरुवारपर्यंत आणखी 'दर्दी' आपल्यासोबत येतीलच.
तोवर नवीन मित्रमैत्रिणींना गझलची तोंडओळख करून द्यायला सुरुवात करू या का?
त्यानिमित्ताने आपलीही उजळणी होवून जाईल.

किंवा असं करू. अगदी सुरुवातीपासून सुरुवात करू.
काय आहे, काही गोष्टींची आपल्या मनात उगाच भीती बसलेली असते. एकतर कविता म्हणजे उत्स्फूर्त अभिव्यक्ती. तिला मात्रा / छंद / लघु / गुरू असल्या कोष्टकात कोंबून बसवायला नको वाटतं! प्रेम असेल, वंचना असेल, राग असेल, मनात आलं - म्हणून मोकळं झालं..

पहाटे पहाटे मला जाग आली.. तुझी रेशमाची मिठी सैल झाली..#

अजूनही आठवून मी मोहरून जातो.. किती किती लाघवी तुझा तो नकार होता!!#

बोलणे माझे जरा ऐकून घे तू.. मी खुळा नाही, तर्‍हेवाईक नाही!!#

अर्थ लागेलही पुढेमागे - चल प्रतिज्ञा तरी त्रिवार करू!*

मग आता जर मी तुम्हाला सांगितलं, की पहिली ओळ भुजंगप्रयातात आहे, दुसरी हिरण्यकेशी, तिसरी मंजुघोषा आणि चौथी स्त्रग्विणी वृत्तात आहे, तर त्यामुळे त्यांची मजा कमी होते का? उलट लयीत वाचलेल्या सुंदर सुंदर ओळी आपोआप लक्षातही राहतात ना?

सोपं असतं हो!
र्‍हस्व अक्षर हे लघु किंवा १ मात्रा. दीर्घ अक्षर गुरू किंवा २ मात्रा.
म्हणजे अ/इ/उ स्वर असणारी अक्षरं लघु तर आ/ई/ऊ/ए/ऐ/ओ/औ हे स्वर असणारी अक्षरं गुरू असतात.
वृत्त पाहताना लघु 'ल' असा तर गुरू 'गा' असा लिहीतात.

म्हणजे 'पहाटे' शब्दात प हा लघु आहे, तर हा आणि टे गुरू आहेत. म्हणून हा शब्द झाला 'ल गा गा'.
'बोलणे' झाला 'गा ल गा'

आता 'अर्थ' शब्द उच्चारून पहा. दोन्ही अक्षरं लघु खरी, पण उच्चार 'ल ल' च्या जवळचा आहे की 'गा ल' च्या?
नियम असं सांगतो की शब्दात लघु अक्षरानंतर जोडाक्षर आलं, तर त्या लघुचा गुरू होतो.
म्हणून 'अर्थ' हा 'गा ल' शब्द आहे.
तसंच अनुस्वार असलेलं अक्षर गुरू असतं. म्हणून वंदना हा शब्द 'गा ल गा' असा ऐकू येतो पहा.

खरं सांगू का? आपण कवी मंडळी शब्दांवर प्रेम करतोच. त्यांचा अर्थ जसा भावतो, तसाच त्यांच्या 'नादा'कडे जरा कान दिला ना, की अगदी सहज लक्षात येतं हे.
ही पायरी जितकी सोपी, तितकीच महत्त्वाची आहे. एकदा लघु गुरू समजले, म्हणजे वृत्त समजणं अगदी सोपं आहे!

पुढच्या पोस्ट मधे वृत्ताबद्दल बोलूच.
पण त्या आधी एक छोटीशी परीक्षा देऊ या?
आपलं पूर्ण नाव लिहून त्यातली लघु आणि गुरू अक्षरं ओळखायची.
कुठे अडलं तर आम्ही आहोतच मदतीला.

(टीपः
# या ओळी सुरेश भटांच्या आहेत.
* ही ओळ वैभव जोशींची आहे.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बदललेला मतला पाठवला आहे. अजून धाकधूक आहेच....

समीर,

तुमचे नाव नोंदवून घेत आहोत.

~ संयोजक समिती
==
जन्मत: मृत्यूस मी पत्ता दिलेला
आजही मी लावलेले दार नाही
shama1_0.jpgkaaryashaalaa08@maayboli.com

कार्यशाळा. खरं तर वेळ सम्पल्ये.
पण मी एक कविता लिहिल्ये, ती पोष्ट करण्या अगोदर एकदा दाखवुन घ्यावी म्हणतो. कसं जमलय ते हि कळेल. मी लिहाव की नाहि हे पण जाणुन घ्यायचय.
मला हे विचारायचय की पोष्ट करण्या आधी मी लिहिलेलें कुठे दाखवावं?

अगं बाई, मला भलताच उशीर झाला.
लल गागा, लगा ललगाल लगाल गागा
----------------------------
पल्ली
लगा
---
पल्लवी देशपांडे
लगागा गालगागा
-------------
बरोबर आहे का हो? ???

गि ळ ल्या पा व सा ळी गा रा मी अ सं ख्य
ल ल गा गा ल गा गा गा गा गा ल ल ल

च व गा र व्या ची ना जि भे स रु च ली
ल ल गा ल गा गा गा ल गा ल ल ल गा

बरोबर आहे का? कोणीतरी सांगेल का

गि ळ ल्या पा व सा ळी गा रा मी अ सं ख्य
ल ल गा गा ल गा गा गा गा गा ल गा ल - २१ मात्रा

च व गा र व्या ची ना जि भे स रु च ली
ल ल गा ल गा गा गा ल गा ल ल ल गा - १९ मात्रा

पण दोन्ही ओळींतल्या मात्रा समानच हव्यात ना ?
मग मी खालची ओळ ही २१ मात्रा वालीच बनवायला हवी ना ?
@भरत खरच मनापासून धन्यावाद तुम्ही प्रत्येक वेळी मार्गदर्शन करता !
टायपिं मिस्टॅक झाली आई शप्प्थ ! :((

Pages