भेळेच्या चटण्या

Submitted by मंजूडी on 15 September, 2008 - 05:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

खजुराची चटणी :
१ वाटी खजुर
१ वाटी गूळ
पाऊण वाटी चिंच
३ चमचे धने-जिर्‍याची पावडर
चवीला मीठ, आवश्यकतेनुसार साखर, लाल तिखट

पुदिन्याची चटणी
१ वाटी पुदिन्याची पाने
अर्धी वाटी कोथिंबीर
२ हिरव्या मिरच्या
अर्ध्या लिंबाचा रस
चवीला मीठ

तिखट चटणी
अर्धी वाटी सोललेली लसूण
१ वाटी सुक्या मिरच्यांचे तुकडे
चवीला मीठ

क्रमवार पाककृती: 

खजुराची चटणी :
खजुर आणि चिंच १ तास पाण्यात भिजत ठेवावे. भिजत घातल्यामुळे खजुराच्या बिया सहज निघतील. त्यात गूळ मिसळून हातानेच एकत्र कुस्करावे. मग मिक्सरमध्ये थोडे थोडे मिश्रण घालून त्याची पेस्ट करून घ्यावी. ही पेस्ट एका गाळण्यातून गाळून घ्यावी लागेल. कारण मिक्सरमधून वाटून घेतलं तरी चिंचेचे दोरे आणि खजुराची सालं राहतातच. मग गाळलेल्या पेस्टमध्ये धने-जिर्‍याची पावडर व मीठ घालावे. चवीनुसार हवे असल्यास साखर आणि लाल तिखट घालावे. आवश्यकतेनुसार पाणी घालून पातळ करावे.

पुदिन्याची चटणी
पुदिन्याची पाने, कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावीत. हिरव्या मिरच्या चिरून घ्याव्यात. मिक्सरच्या भांड्यात हे जिन्नस घालून त्यावर लिंबाचा रस घालावा, ह्यात आवडत असल्यास एक आल्याचा तुकडाही घालता येईल. मीठ घालून बारीक पेस्ट करावी. आवश्यकतेनुसार पाणी घालून पातळ करावे.

तिखट चटणी
सुक्या मिरच्यांचे तुकडे साधारण एक तासभर पाण्यात भिजत घालावेत. मग ह्या भिजवलेल्या सुक्या मिरच्या, लसूण आणि मीठ एकत्र करून मिक्सरमधून पेस्ट करून घ्यावी. आवश्यकतेनुसार पाणी घालून पातळ करावे.

अधिक टिपा: 

हे प्रमाण वापरल्यास, खजुराची चटणी - २०० ग्रॅम बोर्नव्हिटाची बाटली भरून, पुदिन्याची चटणी - अडिच वाट्या आणि लाल चटणी - अडिच वाट्या भरून होते.

खजुराच्या चटणीला जास्त खटपट लागते, त्यामुळे ही चटणी एकदमच जास्त प्रमाणात करून मंद गॅसवर ठेवून एक उकळी काढून फ्रिजमध्ये ठेवल्यास साधारण महिनाभर टिकते.

ह्या चटण्या बर्‍याच प्रकारच्या चाटसाठी वापरता येतात, जसं की भेळ, शेव-पुरी, दहि-बटाटा पुरी, समोसा चाट, गाबीटो भेळ, रगडा पॅटीस इत्यादी इत्यादी Proud

माहितीचा स्रोत: 
पारंपारीक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खजुराची चटणि वाचुनच तोंडाला पाणि सुटले...

धन्यवाद मंजु....

मंजूडी, चटण्या ह्याच पण जरा वेगळी पद्धत सुचवू कां?
गोड चटणीत चिंच-खजुर, गुळ कुकरला शिजवून घ्यायचं ३ शिट्या होईपर्यंत. आणि गार झाल्यावर मिक्सरला वाटायचं.
पुदिन्याच्या चटणीत जर शिजवलेली कैरी घातली तर खूपच छान चव येते.
पहा करुन.

सायो, हो गं, तो चिंच खजुर कूकरला लावून शिट्ट्या काढायचा प्रयोग मी एकदा केला होता पण नेमकी त्याच वेळी ती चटणी भयानक आंबट झाली, इतकी की मी साखर आणि गूळ वाढवून वाढवून अक्षरशः दमले, तेव्हापासून माझ्या मनाने पक्कं घेतलं कूकरमधून शिजवून काढल्यावर चिंचेचा आंबटपणा वाढतो Lol

पुदिन्याच्या चटणीत जर शिजवलेली कैरी घातली तर खूपच छान चव येते.

मी कैरीचा उल्लेख मुद्दाम टाळला, कारण मग अगदी डोहाळे लागल्यासारखी ती चटणी खावीशी वाटते. Wink
ज.मे.ल. तुझं, आठवण करून दिलीस, आता काय करू??
btw, मी कैरी कच्चीच वापरते.

जुन्या हितगुजवर ह्या चटण्यांची कृती आहे इथे लिहिलेली .. मी आत्ता पाहिलं..

कदाचित तुझं चिंचेचं प्रमाण जास्त झालं असेल खजुरापेक्षा. मी नेहमी कुकरला शिट्ट्या करुन घेऊन मग करते. अजिबात होत नाही आंबट.

माझ्या नॉर्थच्या मैत्रिणीकडे मी पुदिन्याची कैरी घातलेली चटणी अक्षरशः बाऊल भरुन प्यायले होते. फार तिखट नव्हती आणि कैरीचा आंबटपणा मस्त लागत होता. वरुन बुंदीही घातली होती तिने. तू पण पी बरं माझी आठवण काढून. Wink

मंजु,
एक भा.प्र. ती तिखट चटणी आहे त्यात वाळलेल्या मिर्च्या असे दिलय त्या म्हणजे वाळलेल्या हिरव्या मिर्च्या की लाल? (गाडीवर भेळ खावुन खूप वर्ष/महिने झालेत, ही चटणी कशी दिसते हे पण आठवत नाहीये).

रुनी, लाल असते रंगाला. आणि लाल सुक्या मिरच्या घालतात किंवा लाल काश्मिरी मिरच्याही चालतात. (संजीव कपूरच्या प्रोग्रॅममध्ये पाहिलेलं होतं)

सॉरी मंजूडी. तुझ्या वाटचं उत्तर दिलं.

मी पुदिन्याच्या चटणीत थोडी आमचूर पावडर किंवा चाट मसाला नाहितर ती ज़लज़ीरा पावडर मिळते ना ती १-२ चमचे घालते, छान चव येते.
आजचं हा धागा पुर्ण वाचला, सगळ्यांच्या tips खूप मस्त आज काहितरी chat special करणारचं.

रश्मी .. कालच लिहायचं ना .. Wink
मी शेजवान नुडल्स केले सोया सॉस नि रेड चिली सॉस वापरुन , त्यावत दिनेशदांच्या कृतीने तिखट सॉस केला होता..

रश्मी.., पाककृतीच्या नवीन धाग्यात ही कृती लिहा ना... योग्य त्या शब्दखुणा टाकल्या की सर्चमध्येही येईल. इकडे त्या कृतीची लिंक द्या.

मन्जूडी नवीन धागा चायनीज सदरात काढु की वेगळा लिहु? कारण मी प्रादेशीक मध्ये चायनीजचा धागा बघीतला.

पाककृती आणि आहारशास्त्रात नवीन पाककृती>> पाककृती प्रकार - चटणी कोशिंबीर लोणचे.
प्रादेशिक नाही निवडलं तरी चालेल.

मंजूडी, या धाग्याच्या शब्दखुणांमधे भेळ असा शब्द दे ना. चटण्या कोशिंबीर लोणचे विभागात भेळेच्या चटण्या मिळतील हे लवकर लक्षात येत नाही.
वाटल्यास पाणीपुरी, शेवबटाटादहिपुरी इ. शब्दखुणासुद्धा देऊ शकतेस Wink

धन्यवाद Happy
हा बीबी वाचून जरा उत्साह आलाय. या वीकेण्डला कामातून वेळ मिळाला तर चिंचखजुराची चटणी करून ठेवेन म्हणते. कृती माहित नव्हती असं नाही पण नक्की प्रमाण माहित नव्हतं