गवारीची भाजी- बेसनाचे कोफ्ते घालून - फोटोसह

Submitted by maitreyee on 1 June, 2012 - 16:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गवार निवडून तुकडे केलेली (त्याला लागणारा वेळ धरलेला नाही)
फोडणीचे साहित्य
गार्लिक पावडर किंवा लसूण
काळा मसाला
कोथिम्बीर

गोळ्यांसाठी
बेसन
ओवा
तिखट
मीठ
हळद

क्रमवार पाककृती: 

फार काही कॉम्प्लिकेटेड रेसिपी नाहिये Happy
गवार शिरा काढून तुकडे करून धुवून तयार करावी. साधारण ३ वाट्या. (आपण भाजी करणार असल्यास हे कंटाळवाणे काम इतरांना द्यावे! - यातल्या लिंगनिरपेक्षतेची नोंद घ्यावी :डोमा:)
नेहमीप्रमाणे हळद, हिंग, कढिपत्ता घालून फोडणी करा, त्यात गवार घालून परता.थोडी रोस्टेड गार्लिक पावडर किंवा दोन तीन पाकळ्या लसूण ठेचून घाला. मला स्वतःला कच्च्या लसणापेक्षा त्या गार्लिक पावडर चा स्वाद जास्त आवडतो या भाजीत. तिखट, काळा मसाला , मीठ, गूळ किंवा साखर आणि थोडे पाणी घालून उकळी येऊ द्या. पाणी अगदी गवारी पोहण्याइतके नव्हे तर अंगाबरोबर रस होईल इतकेच घाला, ते गोळे वाफवण्यासाठी लागणार आहे.
गोळ्यांसाठी - एक वाटी (जास्त गोळे हवे असल्यास दीड वाटी) बेसन, तिखट , मीठ, थोडा ओवा च्रुरून असे एकत्र करा. अगदी थोडे पाणी अन तेलाचा हात लावून साधारण पोळीच्या कणकेच्या कन्सिस्टन्सीप्रमाणे मळून घ्या. याचे तेलाच्या हाताने लहान लहान गोळे बनवा (साधारण शेंगदाण्यापेक्षा थोडा मोठा आकार) आणि शिजणार्‍या भाजीत सोडा. हलक्या हाताने थोडे हलवा. झाकण ठेवून भाजी अन गोळे एकत्र शिजू द्या.साधारण ५-१० मिनिटात भाजी तय्यार! वरून कोथिंबीर घाला. एक वाफ जाईपर्यन्त झाकून ठेवा आणि मग वाढा - त्यामुळे मसाला / रस्सा जरा जास्त मुरतो गोळ्यात.
मस्त लागते ही भाजी! माझी पोरे एरवी भाज्या खाताना का-कू करतात पण गोळयांमुळे गवार पण खातात Happy उरलेल्या शेवटच्या गोळ्यांसाठी मारामारी होते Lol
** फोटो :
gawar2.jpg

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांसाठी
माहितीचा स्रोत: 
माझे प्रयोग.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी तिसरी Proud

गोळ्यांची आमटी + गवार असे काँबो आहे. गवार अती आवडती असल्याने नक्की करुन बघणार.

छान आहे रेसिपी .. सोपी आहे ..

तळले तरच कोफ्ते म्हणता येइल का त्या गोळ्यांनां? तसंच रस मिळून येण्यासाठी काही घालावं लागत नाही का? की बेसनाचे गोळेच ते काम करतात?

सशल , मी काहीच एक्स्ट्रा घालत नाही रस मिळून यायला. बहुधा गोळ्यांमुळे मिळून येत असेल. तसेही रस फार ठेवायचा नसतो याला.

जामच वेगळी रेसिपी. करेन की नाही माहीत नाही Happy

<< तळले तरच कोफ्ते म्हणता येइल का त्या गोळ्यांनां

खरंय सशल , तळले तरच कोफ्ते म्हणता येईल Proud Happy

मैत्रेयी धन्यवाद!

गवार-भोपळा हे काँबिनेशन सही लागतं .. मग त्या बेसनाच्या गोळ्यात भोपळा किसून घातला तर? :p (मी मृ चा मूड (की मोड?) कंटिन्यु करतेय ..)

मी गवारीच्या रसदार भाजीला खोबर्‍याचे वाटण लावुन त्यात मेथीचे मुठीये -कणीक+१/२बेसन+मोहनासाठी तेल्-ओवा-तीळ+मेथी भाजी -घालुन करते.वन डिश मील तयार होते.वरुन तूप घालुन खायची .चवदार लागते.

माझी अत्यंत आवडती भाजी (साहित्यात गुळ नाही ते जरा खटकले होते, पण नंतर कृतीत आहे. गूळ आणि काळा मसाला याशिवाय गवार होणे नाही.) शिवाय गोळ्याच्या आतमधे शेंगदाणा असतो, आमच्याकडे. मस्त लागतो.

स्वस्ति, नाही गोळे अजिबात विरघळत नाहीत. तसे पातळ नसतातच ते. पोळीच्या कणकेच्या इतपत घट्ट असतात, अन भाजीत शिजताना अजून थोडे घट्ट होतात नंतर.
दिनेशदा Happy हो साहित्यात राहिल्याच काही काही गोष्टी लिहायच्या .

छान आहे रेसिपी Happy

गवारीच्या रसदार भाजीला खोबर्‍याचे वाटण लावुन त्यात मेथीचे मुठीये -<< सुलेखाताई, माझी अहमदाबादची आत्या अशी भाजी नेहमी करायची. थोडी गोडसर गुजराथी चव आणि ओव्याचा स्वाद... मस्त मस्त!!!

मैत्रेयी छान आहे रेसिपी.

मी साधारण याच पध्द्तिने करते, थोडे बदल..

गवार निवडुन ई ई आणि ते गोळे बनवुन सगळे एकत्र कुकरच्या डब्यात वाफवुन घेते एकत्र आणि मग फोडणी घालते.

मी काल केली. जरा घोळ झाला. बेसन भयानक चिकट निघाले. गोळा करताच येईना, मग भाजणी अ‍ॅड करून कसेतरी केले गोळे. या सगळ्या प्रकारात जास्तच पीठूळ झाले की काय. भाजी फर्मास झाली होती, पण गोळे दाढेने फोडावे लागत होते इतके वरून घट्ट/ कडक झाले. आत चांगले होते. Sad (जास्त वेळ ठेवले का मी शिजवत?)
परत एकदा करून पाहायला पाहीजे..

बस्के, बेसन चिकट असतंच. तेल टाकयचं थोडं, अन पाणी अगदी जप्पून हळू हळू घालायचं. तुझी कन्सिस्ट्न्सी कशी झाली होती? फार घट्ट झाले का पीठ? पोळीच्या कणकेइतपतच घट्ट असावा गोळा. कमी जास्त शिजवल्याने कडक नाही होत गं. जमेल पुढच्या वेळी Happy

अवनी, नाही विरघळत अजिबात.परिणीता, मी तरी नाही घातला सोडा, तुम्ही प्रयोग केलात तर इथे अपडेट करा कसे वाटातेय ते.

Pages