पालक कबाब

Submitted by लोला on 25 May, 2012 - 14:38
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पालकाची एक जुडी
४ मोठे बटाटे
पुदिना
कोथिम्बीर
हिरव्या मिरच्या
एक वाटी मूग डाळ, भिजवून
आले लसूण पेस्ट
धणे जीरे पावडर
गरम मसाला
मीठ
चवीपुरती साखर
काजू

क्रमवार पाककृती: 

-बटाटे उकडून किसून घ्यावेत.
-पालक धुवून मिक्सर मधे २ चमचे पाणी घालून बारीक वाटून घ्यावा.
- पुदिना, कोथिम्बीर, मिरच्या बारीक चिरावे.
- भिजवलेली डाळ वाटावी व सगळे मिक्स करावे.

- या मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करावेत व थोडे चपटे करावेत.
- प्रत्येक काजूचे उभे २ तुकडे करावेत. एक तुकडा प्रत्येक कबाबच्या मधे बसवावा म्हणजे शोभा येते.

हे तयार करुन अर्धा तास फ़्रीज मधे ठेवावे . नंतर आयत्या वेळी तळावेत. (शॅलो फ्राय केले तरी चालतात, वरुन रवा - ब्रेडकम्स असे काही लावावे लागत नाही.) पालकाचा हिरवा रंग आणि वरुन लावलेले काजू यामुळे हे कबाब छान दिसतात आणि लागतात पण. कांदा व लिंबू याबरोबर सर्व्ह करावे व वरुन थोडा गरम मसाला भुरभुरावा.

पालक चिरुन, किंवा चॉपरमधून कापून-
pk1.jpg
मुगाची वाटलेली डाळ, याहून जास्त पातळ नको.
pk2.jpg
बटाटा, पालक, इतर जिन्नस मिक्स केलेले-
pk3.jpg
गोळा करुन फ्रीजमध्ये ठेवले (कबाब बनवूनच फ्रीजमध्ये ठेवू शकता)
pk5.jpg
मग कबाब बनवून ग्रिडलवर शॅलो फ्राय केले. पॅनवरही तेल टाकून करता येतील. प्रत्येक कबाब पॅनच्या बाजूला टेकवून किंवा उभा फिरवून बाजूला थोडी आच लागू द्यावी.
pk8.jpgpk10.jpg

वाढणी/प्रमाण: 
५-६ लोक
अधिक टिपा: 

पालक पाणी न घालता chopper मधे बारीक करुन घेता येतो. मुगाची डाळ पटकन भिजते. गरम पाण्यात टाकली तर अगदी १५ मिनिटात. ती पण फार बारीक वाटू नये. पुदिना ऐवजी मी चाट मसाला घातला २ लहान चमचे. मग वरुन गरम मसाला टाकला नाही. खरपूस शॅलो फ्राय करावेत. कान्दा, लिम्बू तसंच आंबटगोड चटणीबरोबरही छान लागले.

माहितीचा स्रोत: 
रंगी (Rangy). मूळ रेसिपी इथे आहे- http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/126213.html?1155310405
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो. ताजा मका, बटाटे, मूग, पालक. यात वाटेल त्या भाज्या ढकलता येतील. मी पीटा पॉकेटसमधे हिरवी/लाल चटणी, लेट्यूस, काकडी, टोमॅटो असं भरून सँडविच बनवलं. पोटभरीचा प्रकार.

आज केले कबाब. कालच मिश्रण बनवून फ्रिजमध्ये ठेवले होते.
पालक चॉपरमधून काढून घातला होता. सगळी काळजी घेऊनही मिश्रण जरा सैलसर झाले. मग अजून तीन लहान बटाटे उकडून घातले. ब्रेडचे दोन स्लाइसेस घातले. तरीही जरा सैलच आहे मिश्रण. सकाळी फ्रिजमधून काढले तर पाणी सुटलेले होते.
मा का चु? Uhoh

अगदीच वाईट परिस्थिती नाहीये. कबाब केले. लेकीला आवडले. Happy

तु का चु ना प्राची, इथल्या बटाट्यांचा दोष Happy

मिश्रण खूपच सैल असेल, कबाब वळायला येतच नसतील तर मावेप्रूफ पसरट भांड्यात ते मिश्रण हाय पॉवरला अर्धा-अर्धा-अर्धा मिनीटासाठी ठेव आणि पूर्ण गार कर, म्हणजे ते आळेल.

इथल्या बटाट्यांचा दोष >>>> हा विषय निघालाच आहे. तर नवा बटाटा/जुना बटाटा कसा ओळखावा हे सांगेल का कोणी? युसांयुसु बाफवर लिहीले तरी चालेल. Happy कारण, बटाट्यांचा हाच त्रास पराठे करतानाही होतो.

मावे कृती करून बघते मंजू. धन्स. Happy

प्राची, बटाटा चर्चा बटाटेवड्यावर आहे.<< हो का? बघते.
संध्याकाळी मंजूचा सल्ला मानून मावेतून काढले मिश्रण. मग केले कबाब. मस्त झाले होते. Happy

व्वा! लोला मस्त आहेत कबाब. आमच्या क्लबात हा पदार्थ हराभरा कबाब या नावाने मिळतो. पण त्यात हिरवा रंग घालून वाट लावतात.

मी पालक मिक्सर्मधून काढला, त्यामुळे मिश्रण सैल झाले. पण कोर्नफ्लोअर घालून त्या सैलसर मिश्रणाचेच कबाब केले, एकदम hit, पुढच्यावेळी बारीक चिरून घेईन पालक

माबोवर 'गजाली'त [ कोकणी फकाणे] आतांच पोस्ट केलेलं हें व्यं.चि. सहज गंमत म्हणून इथंही टाकतोय.
[टीप : 'शेवरं' ही पावसाच्या सुरवातीला येणारी एक रानभाजी. बर्‍याच जणांची - माझीही - खूप आवडती . ]
kabaab.JPG

june_2  2012 006_rev 3.gif
अखेर जमले ! हुश्श !
मी फ्रीज मधे आजिबात ठेवले नाही. बटाटे २ दिवसांपूर्वी उकडलेले होते, त्यामुळे बर्‍यापैकी कोरडे होते.
पालक पाणी न घालता मॅ. बु. मधून चॉप केला. पुदीना, थोडा गरम मसाला आणि थोडा चाट मसाला असं सगळं घातलं. टोमॅटो सॉस बरोबर खाल्ले.
लोला, खूप खूप धन्यवाद.

लोला,

हे कबाब बेक केले तर चालतिल का? मला एका लंच साठी करुन न्यायचे आहेत. आदल्यादिवशी कच्चे करुन सकाळी थोडे ऑईल स्प्रे करुन ओव्हन मधे बेक केले तर?

साधारण २५ माणसांसाठी काय प्रमाण घ्यावे? बाकी इतर भरपूर प्रकार आहेत खाण्या-पिण्याचे.

Pages