सिनेमा सिनेमा- पाकिझा

Submitted by शर्मिला फडके on 5 May, 2012 - 15:01

पाकिझा- साहेबजानचा प्रवास.

पाकिझा म्हणजे मीना कुमारी.
पाकिझा म्हणजे ते स्वप्न जे साकार करायला कमाल अमरोही चौदा वर्ष धडपडत होता.
पाकिझा म्हणजे अस्तंगत गेलेलं ते युग ज्यात काव्यात्मकता, तरलता, रोमॅन्टिसिझम आणि काही प्रमाणात भाबडीही वाटू शकणारी सामाजिकता हा सिनमांचा मुख्य गाभा होता.
पाकिझा म्हणजे लता मंगेशकर या गानसम्राज्ञीची अवीट गोडीची गाणी आणि गुलाम महंमद या दुर्लक्षित गुणी संगीतकाराचा अप्रतिम स्वरसाज.
पाकिझा म्हणजे तवायफ़-कलावंतिणींच्या बदनाम दुनियेचं करुण-राजस रुप.
पाकिझा म्हणजे मीना कुमारीच्या अभिनय कारकिर्दीला आणि तिच्या आयुष्यालाही मिळालेला पूर्णविराम.
पाकिझा म्हणजे युंही कोई मिल गया था.. सरे राह चलते चलते.. असं व्याकूळ आवाजात म्हणणार्‍या साहेबजानच्या नजरेत उमटलेली, रात्रीचा निराश अंधार चिरत येणारी, न होणार्‍या भेटीची ग्वाही देणारी ट्रेनची शिट्टी.. त्या शिट्टीत एका मिट्ट काळोख्या रात्री ट्रेनमधल्या कंपार्टमेन्टमधे, ती गाढ झोपेत असताना तिच्या नकळत घडून गेलेल्या एका अधुर्‍या मुलाकतीची सारी दास्तान उमटलेली असते.
आपली नाजूक गोरी पावले लालजर्द पर्शियन गालिच्यावर हलकेच थिरकवत गाणं गाणारी साहेबजान.. त्या पावलांना जमिनीवर टेकवायचं नसतं तिला. न भेटलेल्या त्याने पैंजणात अडकवून ठेवलेल्या चिठ्ठीत तसं बजावलेलं असतं. आपके पांव बहोत हसीन है.. इन्हे जमीनपर मत उतारईयेगा..
पाकिझा म्हणजे हा काव्यात्म मूड.

pakeezah12.jpg

पाकिझा कथा आहे तवायफ़ परंपरेतल्या दोन पिढ्यांची. नरगिस आणि तिची मुलगी साहेबजान या दोघींच्या नशिबात कोठ्यावरची बदनाम जिंदगी लिहिलेली असते पण दोघींनाही त्यांच्या प्रियकरांच्या रुपात आयुष्य एक संधी बहाल करतं प्रतिष्ठीत समाजात जगण्याची. दोघीही ही संधी स्विकारतात खर्‍या पण नरगिसला समाज नाकारतो आपल्यात सामावून घ्यायचे, शहाबुद्दीनचे, नरगिसच्या प्रियकराचे कुटूंब तिला आपल्या खानदानाची बहू होण्याचा सन्मान नाकारते, घराबाहेर काढते आणि अपमानीत, विद्ध नरगिस आश्रय घेते कबरस्तानाचा. पोटातल्या साहेबजानला वाढवत आपल्या आयुष्याचे उर्वरित काही महिने ती तिथेच काढते आणि मुलीला जन्म देऊन मरुन जाते. मात्र मरण्याच्या आधी शहाबुद्दीनच्या नावाने एक पत्र लिहून ठेवते, निदान आपल्या मुलीला तरी सांभाळ अशी विनवणी त्यात करते. पण त्याआधीच तिची बहिण येऊन त्या तान्ह्या मुलीला आपल्यासोबत घेऊन जाते आणि तिचा प्रतिपाळ करते.

साहेबजान त्याच कोठीत, गुलाबी महलमधे वाढते, तरुण होते. इन्ही लोगोंने ले लिना दुपट्टा मेरा.. गात आपल्या कलावंत कारकिर्दीचा आरंभही करते. आपले प्राक्तन काही वेगळे असू शकेल याची सुतराम कल्पनाही तिच्या मनात नसते. पण ते वेगळे असते आणि त्याची चुणूकही मिळते.

शहाबुद्दीनला वीस वर्षांनंतर नरगिसने लिहिलेले ते पत्र अकस्मात मिळते. मिळते तेही मोठ्या अजब रितीने. नरगिस जिथे मेली त्या कब्रस्तानातले तिचे बेवारस सामान भंगारात विकले जाते आणि त्यात तिची वही असते, ज्यात तिच्या आयुष्याची दर्दभरी, उदास दास्तान सांगणारी शायरी असते आणि ते पत्र असतं. ज्याच्या हातात ते पडतं तो ते वाचल्यावर हलून जातो. आटापिटा करत शहाबुद्दीनचा शोध घेऊन ते पत्र त्याच्या हवाली करतो. शहाबुद्दीन पत्र वाचल्यावर उलट्या पावली नरगिसच्या आणि त्याच्या मुलीचा शोध घेत गुलाबी महलमधे पोचतो खरा, पण त्याआधीच नरगिसची बहिण पुन्हा एकदा साहेबजानला घेउन पसार होते.
शहाबुद्दीनच्या कुटूंबात जिथे नरगिसला स्थान नव्हते तिथे या नाजायज मुलीला कोण स्विकारणार हा तिचा सवाल तर्कशुद्ध असतो खरा. मात्र त्यातूनच नियती साहेबजानला त्या संधीची चाहूल देतो, जी पुढे तिचं आयुष्य बदलून टाकू शकणार असते.

कोठ्यावरचा सारा लवाजमा आटपून ट्रेनमधून दुसर्‍या ठिकाणी सारेजण जात असतात. मिट्ट काळोख्या, घनदाट पावसाच्या वादळी रात्री त्याच ट्रेनमधे मध्यरात्रीच्या सुमारास सलीम चढतो. समोरच्या बर्थवर झोपलेल्या साहेबजानचं पडदानशीन लावण्य, तिच्या नाजूक शारिरीक सौंदर्याची ग्वाही देणारं गोरंपान, हसीन पाऊल त्याचं मन घायाळ करतं. आपल्या कवीहृदयाची साक्ष पटवणारी रोमॅन्टीक चिठ्ठी तिच्या पैंजणांमधे अडकवून तो मधल्याच कोणत्यातरी स्टेशनावर उतरूनही जातो.
साहेबजान जागी झाल्यावर ती चिठ्ठी वाचते आणि तिच्या शायराना, हळव्या मनाला तो अनामिक आशिक भुरळ घालतो.
पुढे अनेक अकल्पित प्रसंगांच्या मालिका घडून येतात, सलिम आणि साहेबजान पुन्हा पुन्हा भेटतात, दुरावतात. साहेबजाऩचा कमकुवतपणा, तिचा गमावलेला आत्मविश्वास, आपण तवायफ़ असण्याचा न्यूनगंड तिला सलिमच्या प्रेमाचा स्वीकार करु देत नाही आणि त्याच्यापासून तिला दामन सोडवूनही घेता येत नाही.
वास्तवापासून पळण्याचा एक मार्ग म्हणून ती सलिमसमोर आपला स्मृतीभ्रंश झाल्याचेही नाटक करते. सलिम तिला स्वत:च्या घरी घेऊन जातो. कसाबसा धीर गोळा करुन साहेबजान नियतीच्या खेळाचं पुढचं दान स्वीकारते.

योगायोग म्हणजे सलिम शहाबुद्दीनचा पुतण्या असतो. साहेबजान आणि शहाबुद्दीन दोघांनाही परस्परांची ओळख नसतेच.
पिढी बदललेली असली तरी घराचा कर्मठपणा तितकाच कडवा असतो. साहेबजान तवायफ़ घराण्यातली आहे हे कळल्यावर तिला त्यांनी स्विकारण्याचा प्रश्नच येत नाही, पण यावेळी सलिम ठाम असतो. साहेबजानचा हात घट्ट पकडून तोही घराबाहेर पडतो. पण सलिमच्या प्रेमावरच्या विश्वासापेक्षा मनातली असुरक्षितता, भिती साहेबजानला ग्रासून टाकते आणि ती त्याचा हात सोडून पळून जाते.
तिच्या आईचं आणि तिचं प्राक्तन त्या दुर्दैवी कडीमधे असं नकळत गुंफ़लं जातंच.

भरकटलेल्या अवस्थेतल्या सैरभैर साहेबजानला पुन्हा एकदा गुलाबी महलात आणलं जातं, तिची अशी करुण अवस्था पाहून मावशीच्या मनाला यातना होतात, पण त्यावर तिच्याकडे काही उपायही नसतो. आपले प्राक्तन स्वीकार, मुजरा हेच आयुष्य म्हणून मान्य कर इतकाच सल्ला ती देऊ शकते.

इकडे आपल्या प्रेमाचा अव्हेर साहेबजान पुन्हा पुन्हा का करतेय हे न कळू शकलेला दुखावलेला सलिम नाईलाजाने शादीला मान्यता देतो, आणि स्वत:च्या लग्नाच्या रात्री मुजरा करायला साहेबजानच्या कोठ्यावर आमंत्रण धाडतो. ती ते स्विकारते. ही परिक्षा आहे स्वत:ची आणि स्वत:च्या प्रेमाची असं समजत ती शादीच्या शुभ्र तक्तपोशीवर नृत्य करते, घायाळ होते पण तरीही नाचतच रहाते.
असह्य होऊन तिची मावशी शहाबुद्दीनला पुकारते, त्याच्या तथाकथीत शरिफ़ कुटुंबाचे वाभाडे काढते आणि सांगते की बघ हे तुझ्या पोटच्या पोरीचं, तुझ्या दारात, तुझ्या कुटुंबाच्या प्रतिष्ठीत अंगणात सांडलेलं रक्त.
हादरलेला शहाबुद्दीन आपल्या मुलीला कवटाळायला पुढे होतो आणि बापाच्या गोळीला बळी पडतो. साहेबजानची बारात आणि दुर्दैवी शहाबुद्दीनचा जनाजा गुलाबी महालातून एकाचवेळी उठतो. साहेबजानला तिचा मृत बाप बिदा करतो आणि अखेर एक तवायफ़ कोठ्यावरुन स्वत:च्या घरी जाते.

साहेबजानचा हा मुक्ती, प्रेम, सन्मानाच्या आयुष्याकडे चाललेला हा प्रवास गुलाबी महाल कोठ्यातली एक लहान मुलगी बघत असते, साहेबजान तर चालली स्वत:च्या पतीच्या घरी, आपल्या घरी.. पण ती मुलगी अजूनही त्याच जगात अडकून पडलेली आहे, आपल्यासाठीही कधीतरी अशी बारात घेऊन एखादा सलीम येईल, आपल्याकरताही एखादा शहाबुद्दीन स्वत;चे प्राण पणाला लावेल अशी आस त्या लहान मुलीच्या नजरेत उमटलेली आहे.
कमाल अमरोहीची पाकिझा आहे ही मुलगी.
अमरोहीचा हा खास टच ज्यामुळे पाकिझाला अजून एक तवायफ़च्या आयुष्यावरील सिनेमा अशा बिरुदामधे न अडकवता तो एका वेगळ्याच उंचीचा सिनेमा बनतो.

पाकिझाची कथा, पटकथा कमाल अमरोहीचीच होती. अमरोही स्वत: शायर होता आणि त्याच्या तरल, कल्पनारम्य, रोमॅन्टिक कवीमनाची झलक पाकिझाच्या पटकथेत, त्यानेच केलेल्या दिग्दर्शनात ठायी ठायी दिसली. एखाद्या गूढ परिकथेसारखी पाकिझाची कथा उलगडत जाते. अगदी सुरुवातीलाच सोनेरी केसांची नरगिस शहाबुद्दीनच्या वडिलांच्या हवेलीतून अपमानीत होऊन बाहेर पडते आणि कबरस्तानाचा रस्ता गाठते तेव्हापासूनच गूढ, अकल्पनीय प्रसंगांचा वेढा जणू आपल्या मनावर पडायला लागतो. नरगिसला वाटेत भेटणारे भोई तिला काही न विचारता अचूक कब्रस्तानात पोचवतात.
कबरस्तान हे प्रतिक आहे नरगिसच्या मेलेल्या भावनांचं, समाजाने टोचून, घायाळ करुन मारुन टाकलेल्या तिच्या हळव्या मनाचं. तिच्या भग्न आयुष्याचं.

कमाल अमरोहीने प्रतिकांचा वापर पाकिझा सिनेमात अनेकदा केला.
गुलाबीमहाल कोठीत सापाचे घुसणे साहेबजानच्या आयुष्यातले धोके सूचित करतात, तिचं झिरझिरीत पडद्यांमधे गुरफ़टून जाणं, कोलमडून पडण्यातून तिचा स्वत:शी चाललेला अयशस्वी झगडा, तिचा गोंधळ दिसतो. साहेबजान कोठ्यावर परतते तेव्हा समोर फ़ाटका, दोर तुटलेला पतंग लटकलेला तिला दिसणं अशा अनेक प्रतिकांमधून अमरोही कधी तरलपणे, कधी ढोबळपणे पाकिझाची कथा सांगत जातो.

पाकिझा सिनेमाचा मूड व्याकूळ अभिनयातून, सुरेल गाण्यांमधून, पार्श्वसंगीतामधून, उर्दू, नजाकतदार संवादांमधून, देखण्या पोषाखांमधून, भव्य, नेत्रदीपक, आलिशान सेट्समधून ज्या प्रकारे तयार होत जातो ते बघताना कौतुक वाटते ते कमाल अमरोहीचे आणि आश्चर्यही.

१९५८ मधे त्याने बनवायला घेतलेला पाकिझा अखेर १९७२ मधे रजतपडद्यावर झळकला आणि या दरम्यानच्या काळात अमरोहीला सिनेक्षेत्रातल्या अनेकांची कुचेष्टा सहन करायला लागली. मीना कुमारी आजारी पडून अंथरुणाला टेकली, संगीत दिग्दर्शक गुलाम महंमद आणि सिनेमॅटोग्राफ़र जोसेफ हिरशिंग तर जग सोडून गेले. तरी अमरोहीचा पाकिझा बनतोच आहे अशी हेटाळणी सहन करायला लागली.
लोकांचं सगळंच चूक होतं असंही नाही. खरोखरच कमाल अमरोही नादीष्टासारखा वागत होता. कृष्णधवल जमान्यात त्याने पाकिझा बनवायला घेतला, मीना कुमारीसारखी अभिनयसम्राज्ञी घरातच होती, सोबतीला त्याच्या आधीच्या गाजलेल्या महल सिनेमातला अशोक कुमार होता; अमरोहीला असा सिनेमा बनवायचा होता जो पाहून लोकं चकित होतील, असं काव्यमय सौंदर्य पडद्यावर आधी कधीही झळकलं नव्हतं असे उद्गार काढतील.

सिनेमाचं शूटींग जोरात सुरु झालं. इन्ही लोगोंने.. गाण्याकरता भव्य, खर्चिक सेट उभारला होता, वातावरणनिर्मितीकरता हजारो मेणबत्त्या लावल्या होत्या, कृष्णधवल पडद्यावर इतक्या नजाकतीने कोणतं गाणं सादर झालं नसेल अशी अमरोहीच्या मनात खात्री होती.
पाकिझाचे पुढचेही काही सीन्स घेतले गेले.
दरम्यानच्या काळात लोकांना रंगीत सिनेमा लोकप्रिय व्हायला लागला होता, ’जंगली’ सिनेमाच्या प्रदर्शनानंतर लोकांना इस्टमन कलर्सची जणू भुरळ पडली. पाकिझा रंगीतच बनवायचा असं अमरोहीने ठरवलं आणि आत्तापर्यंतची शूट केलेली सगळी रिळं फ़ेकून देत त्याने रंगीत सिनेमाला साजेसा माहोल सेटवर तयार करवून घेतला आणि शूटींगला पुन्हा नव्याने सुरुवात केली.

त्यानंतर सिनेमास्कोपचं नवं तंत्रज्ञान आलं, कमाल अमरोहीने पाकिझाही आडव्या, सिनेमास्कोप तंत्रातच जास्त खुलून दिसेल असं ठरवलं, आणि मग पुन्हा आधीच शूटींग रद्द करून नव्याने शूटींग.
असा खेळ अनेकदा चालू राहीला. मीना कुमारी आधी भांडली, मग थकली, अल्कोहोलिझमने तिचा कब्जा घेतला, ती आजारी पडली, हिरो अशोककुमारचं पोक्त झाला, त्याच्या जागी राजकुमार आला. कमाल अमरोहीने नायकाची व्यक्तिरेखा राजकुमारच्या रांगड्या व्यक्तिमत्वाला साजेल अशी नव्याने लिहिली. पाकिझाचा हिरो बिझिनेसमन होता, आता फ़ॉरेस्ट रेन्जर झाला.
पाकिझा संपूर्णपणे नायिकाप्रधान असूनही, त्यात मीनाकुमारीसारख्या समर्थ अभिनेत्रीची डबलरोलची सशक्त, ऑथरबॅक्ड व्यक्तिरेखा असूनही त्यातला नायक नामधारी किंवा मिळमिळीत वाटत नाही. हे श्रेय संपूर्णपणे कमाल अमरोहीचे.

पाकिझा मधली काही वर्षं अक्षरश: डब्यात गेला. मीनाकुमारी आणि कमाल अमरोहीमधे वैयक्तिक ताण-तणाव होतेच. व्यावसायिकदृष्ट्याही त्यांचे संबंध आता दुरावले. पण सुनील दत्त-नरगिस या जोडप्याने पाकिझाची काही रिळं पाहिली होती, हा किती अप्रतिम सिनेमा बनू शकतो हे त्यांना माहित होते. अखेर त्यांनी मनावर घेतले, मीनाकुमारीला राजी केले, अमरोही तयार होताच, आणि पाकिझा पुन्हा सेटवर गेला.

या सगळ्यात मीनाकुमारीचं पाकिझा पहिल्यांदा सुरु होतानाचं उत्फ़ुल्ल, पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे टवटवीत सौंदर्य मात्र उताराला लागलं होतं. कमाल अमरोहीने हेही आव्हान स्विकारलं. जमेल तसे लॉन्ग शॉट्स घेत, काही ठिकाणी, विशेषत: नृत्याच्या प्रसंगात पद्मा खन्नाच्या डमीचा वापर करत त्याने शूटींग पुढे रेटलं. आपली कल्पनाशक्ती पणाला लावत गाण्यांचे शूटींग केले.
उदा. चलो दिलदार चलो.. या गाण्याच्या चित्रिकरणाच्या वेळी मीनाकुमारीला उभं रहाणंही मुश्किल होतं. चेहर्‍यावर सूज आली होती, क्लोज-अप्स तर अशक्यच होते. अमरोहीने तिचा चेहरा दिसणारच नाही अशा तर्‍हेने डमी वापरत, व्यक्तिरेखांवर कमीतकमी भर देत, समुद्राचं पाणी, आकाशातला चंद्र, चांदण्या आणि शीडाच्या बोटींचा वापर करत गाण्याचे शूटींग केलं आणि गाण्यातला रोमॅन्टिक मुड कायम ठेवत उलट त्याला एक वेगळीच फ़िलॉसॉफ़िकल डूब मिळाली.

कमाल अमरोहिच्या दिग्दर्शनाचे, मीनाकुमारीच्या अभिनयाचे काही मास्टरपीसेस पाकिझामधून दिसतात ते केवळ अप्रतिम आहेत. मीनाकुमारीच्या आजारपणामुळे असेल, किंवा व्यक्तिरेखाच तशी लिहिली गेल्यानेही असेल, पण तिच्या दोन्ही व्यक्तिरेखांवर एक कमालीच्या औदासिन्याची झाक आहे. दु:ख, उदासी ती गरज नसताना स्वत:वर ओढवून घेते आहे, मनातला गोंधळ अनेकदा स्वत:च्या निर्णय न घेऊ शकण्याच्या कमकुवतपणामुळे मुद्दाम निर्माण करत आहे असं वारंवार जाणवतं.

काहीवेळा तर आपल्याला कळतच नाही ही नक्की अशी का वागते आहे, चीडही येते इतकं तिचं कॅरेक्टर कधी कधी कन्फ़्युजिंग वागतं. तिची व्यक्तिरेखा स्वप्नाळू आहे मात्र आपली स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची ताकदच तिच्यात नाही असं वाटतं. मीनाकुमारीला आनंदी व्हायचंच नाहीये का असा प्रश्न पडतो.

मात्र एका प्रसंगात मीनाकुमारीच्या अभिनयाला, तिच्या संवाद उच्चारण्याच्या एरवी सदोष वाटणार्‍या धाटणीलाही सलाम करावासा वाटतो. माझ्या मते सिनेमाचा हा हायलाईट सीन.
मीनाकुमारी म्हणजेच साहेबजान, राजकुमारपासून म्हणजेच सलीमपासून पळून पुन्हा कोठ्यावर परतलेली असते, सैरभैर, उदास अवस्थेत वावरत असते. तिची कोठ्यावरची सखी त्याबद्दल तिला वारंवार छेडते, तिचा मूड सुधारण्याचा प्रयत्न करते. अशाच एका प्रसंगी साहेबजान म्हणते- "हर तवायफ़ एक लाश हैं, मैं एक लाश हूं, तुम एक लाश हो, आपले हे गुलाबी कोठे म्हणजे कब्रस्तान."

मीनाकुमारीने आपल्या व्यक्तिमत्वाला सारा दर्द या संवादामधे ज्या पद्धतीने ओतला आहे, तो ऐकताना अंगावर काटा येतो. आपल्याला ट्रॅजेडीक्वीन हा किताब उगाच नाही मिळाला याची जणू साक्ष या प्रसंगातून ती देते. साहेबजानच्या व्यक्तिरेखेचा संपूर्ण औदासिन्याचा मूडच या प्रसंगातून व्यक्त होतो. ती आतून खरंच मरुन गेलीय, काही स्ट्रगल करावा, झगडावं परिस्थितीशी असं आतूनच तिला वाटत नाहीये, फ़क्त दु:ख आणि दु:खच आपल्या पदरी येणार अशी तिची जणू खात्री झाली आहे.

इतकं खोलवर डीप्रेस्ड कॅरेक्टर आजवर हिंदी सिनेमांमधे कधीही इतक्या समर्थपणे रंगवलं गेलं नाहीय. नायिकेच्या प्रमुख भूमिकेतून तर नाहीच नाही.
साहेबजान जेव्हा नरगिसच्या पोटात वाढत असते तेव्हा नरगिसने कब्रस्तानात आसरा घेतलेला असतो, समाजाच्या धिक्कारण्यामुळे ती त्यावेळी संपूर्णपणे कोलमडून पडलेली असते. जिवंतपणीच कफ़न पांघरुन बसलेली, जिंदा लाश नरगिस. नऊ महिने तिच्या पोटात वाढलेल्या साहेबजानवर सगळे संस्कार झाले असणार ते अशा नकारात्मक, उदास प्रवृत्तिचेच.

व्यक्तिरेखेचा असा सखोलपणा ही पाकिझामधली अचानक गवसलेली, व्यावसायिक सिनेमांमधे मला तरी अद्वितीय वाटलेली गोष्ट.

पाकिझाच्या कथेला एक विशिष्ट काळ आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा हा काळ आहे. सरंजामशाही अजून पुरती लयाला गेलेली नाही. इंग्रजी अंमल ऐन भरात आहे. अमरोहीने हा काळ दिसेल असे वातावरण सेटवर निर्माण करण्याचा असोशीने प्रयत्न केलेला दिसतो.
नरगिस आणि शहाबुद्दीन लग्नानंतर चौकच्या बाजारातून ज्या बग्गीत बसून जातात तिच्यावरचा चांदीचा पत्रा आणि त्यावरचा बकिंगहॅम पॅलेसचा ठसा कोरलेला स्पष्ट दिसतो. शहाबुद्दीनच्या घरातले कर्मठ मुस्लिम वातावरण दाखवणे हा तर कमाल अमरोहीच्या डाव्या हाताचा मळ. एकंदरीतच मुस्लिम कौटुंबिक समाजातली ट्रेडमार्क असणारी आदब, तेहजिब, चालिरिती पाकिझामधून वैशिष्ट्यपूर्ण रितीने दिसले.
मुस्लिम सोशल सिनेमांचा अस्त हळू हळू होतच होता, पाकिझा हा त्यातला शेवटचा महत्वाचा सिनेमा ठरला.

पाकिझा हे कमाल अमरोहीचे जिवंतपणी पाहिलेले स्वप्न होते आणि ते साकार करण्याकरता त्याने आपली सारी पुंजी, सारी प्रतिभा पणाला लावली.

सुंदर, आत्म्याला स्पर्श करणारे संगीत पाकिझाचा प्राण होता आणि अत्यंत उच्च दर्जाची सौंदर्यपूर्ण दृष्यात्मकता हा पाकिझाचा कणा होता.
गुलाबी महालातली झुंबरं, रुजामे, शमादाने, कारंजी, नक्षीदार कमानी, खांब.. सिनेमास्कोप पडद्यावरची प्रत्येक फ़्रेम नेत्रदीपक आणि तरीही कुठेही भडक, अभिरुचीहीन दिसली नाही. याचे श्रेय सेटडिझायनर एन.बी.कुलकर्णींना अर्थातच जाते.
कारंज्याच्या पाण्यात आपले केस बुडवून पहुडलेली मीनाकुमारी भन्नाट होती, अनेक दशकांनी संजय लिला भन्साळीने जेव्हा देवदासमधून तवायफ़ साकारली तेव्हा चंद्रमुखीच्या प्रत्येक अदेमधून साहेबजान डोकावली. अगदी कारंज्याच्या पाण्यात केस बुडवून बसलेल्या माधुरीच्या सीनसकट.

समृद्ध रंगांचा वापर, विशेषत: लाल रंगाच्या विविध छटा, त्याही कुठेही भडकपणा येऊ न देता वापरणं हे पाकिझाचे वैशिष्ट्य.
पाकिझाचा काव्यात्म मूड अगदी सिनेमाच्या टायटल म्युझिकपासून दिसतो. त्यातला वाद्यांचा एकत्रित वापर, लताच्या आवाजातला आलाप सिनेमाचा क्लासिक म्युझिकल मूड सेट करतो.
गुलाम महंमद पाकिझाच्या निर्मितीकाळातच खुदाला प्यारे झाल्यावर पार्श्वसंगिताची जबाबदारी नौशाद यांनी उचलली आणि मास्टर्स स्ट्रोक काय असतो त्याची चुणूक या बुजूर्ग संगीतकाराने अगदी सहजपणे रसिकांना दिली. पक्षांच्या किलबिलाटाचा, आगगाडीच्या शिटीचा, धडधडत येणार्‍या ट्रेनचा, बांगड्यांच्या किणकिणाटाचा आवाज ज्यांनी पाकिझामधे ठायी ठायी महत्वाच्या व्यक्तिरेखेसारखी भूमिका बजावली तो जिनियस टच मात्र कमाल अमरोहींचा स्वत:चा.
कोठ्यावर मुजरा नृत्य चालू असताना, आजूबाजूच्या कोठ्यांवरुन उमटणारे स्वरांचे नाद, ज्यात ठुमरीची तान आहे, गझलांचे सूर आहेत, तबल्याचे बोल आहेत, मधुनच शास्त्रोक्त चीजांचा वापर.. हे सारं तवायफ़ कोठ्यांच्या आसपासचा माहोल अचूक उभा करणारं.

गुलाम महंमद हे नौशादांचे सहायक संगीतकार होते. स्वतंत्रपणे संगीत दिलेला त्यांचा हा पहिलाच सिनेमा. इतक्या बेहतरीन, हॉन्टींग चाली त्यांनी दिल्या आणि त्यांचे रसिकांनी केलेले कौतुक पहायला हा बिचारा संगीतकार जिवंत राहू शकला नाही हे किती दुर्दैवाचे.
सिनेमा पूर्ण झाल्यावर वितरकांनी कमाल अमरोहींना सुचवून पाहीले की या अनोळखी संगीतकाराच्या नावावर सिनेमा खपणार नाही, कोणी नावाजलेला, नव्या दमाचा संगीतकार श्रेयनामावलीत येईल असे पहा. पण अमरोहीने ही सूचना साफ़ धुडकावून लावली. गुलाम महंमद हयात नसताना त्यांचा असा अपमान करणे माझ्याच्याने शक्य नाही, ते जिवंत असते तर कदाचित त्यांना विनंती केली असती, पण आता नाही. त्यांनी जी मेहनत करुन सुंदर संगीत दिले त्याचा मान मला राखलाच पाहीजे, असे कमाल अमरोहींचे विधान काळजाला स्पर्श करुन जाणारे आहे.

चलते चलते यूंही कोई मिल गया था, थाडे रहियो, इन्ही लोगोंने, चलो दिलदार चलो, आज हम अपनी मुहोब्बत का असर देखेंगे, मौसम है आशिकाना.. अशी एक से एक गाणी पाकिझाची शान ठरली. कमाल अमरोहींचा विश्वास सार्थ ठरला.
एकुण बारा सुरेल गाणी सिनेमाकरता बनवली होती, सगळीच काही वापरता आली नाहीत. पण एचएमव्हीने काही वर्षांनंतर या गाण्यांची डबल एलपी काढली जी रसिकांकरता खजाना ठरली.

लता मंगेशकरांचा मधाळ आवाज पाकिझामधे अलौकिक पातळीवर पोचला आहे असं म्हटलं तर यत्किंचितही अतिशयोक्ती ठरणार नाही. स्वरांवरची हुकूमत काय असते ते चलो दिलदार चलो.. या एकाच गाण्याच्या उदाहरणावरुनही सहज पटते. पुरुष गायकाचा म्हणजे रफ़ीचा आवाज या गाण्यातल्या फ़क्त ध्रूवपदात वापरला आहे. रफीच्या चलो दिलदार चलो.. या व्याकूळ सादेला प्रतिसाद देणारा लताचा हम है तैय्यार चलो.. म्हणणारा डीव्हाईन आवाज, हे दोन्ही आपल्याला क्षितिजापल्याडच्या दुनियेत तरंगत घेऊन जातात त्यांच्यासोबत.

या गाण्याचा पुन्हा पुन्हा उल्लेख करावासा वाटतो कारण हे गाणं नुसत्या रोमॅन्टिकपणात अडकत नाही, यात काहीतरी सुटत चालल्याचा, सगळ्यांना सोडून क्षितिजापार, चंद्रालाही मागे टाकून जाण्याचा जो हळवा मूड आहे तो मनाला कातर करुन सोडतो, गाण्यातल्या एको इफ़ेक्टमुळे स्वर मनात घुमत रहातात.
हळूवारपणे, संथ वेग पकडत पाण्यावर तरंगणारी शिडाची नौका.. आओ खो जाये सितारोंमे कही.. आओ भूल जाये दुनियाको कही.. असे स्वर उमटवत हळू हळू चांदण्यांमधे लहरत जात असते, तो मूड केवळ अविस्मरणीय. लताचा आर्त स्वर अंधारात हलकेच विरत जाणारा.
शेवटच्या श्वासाची लय सांधणारी ही साद आहे.

पाकिझा हा प्रवास आहे साहेबजानचा.
गुलाबी महालातल्या लालजर्द गालिच्यावर थिरकणार्‍या तिच्या नाजूक गोर्‍या पावलांचा,
सलिमला मोहात पाडलेल्या तिच्या पैंजण घातलेल्या उघड्या पावलांचा,
पांढर्‍याशुभ्र तक्तपोशीवर लाल रक्ताचे ठसे उमटवणार्‍या तिच्या रक्तबंबाळ जखमी पावलांचा.
अखेर तिची पावलं गुलाबांच्या पाकळ्यांवरुन सलिमच्या दुनियेत प्रवेशतात.
तिचा प्रवास संपतो.
पाकिझाचा प्रवास मात्र सुरु व्हायचा असतो.

* संदर्भ-
विनोद मेहता (इंडियन सिनेमा),
अभिजीत देसाई (शिणुमामागची गोष्ट)

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप्रे पाकिझा मी दोन वेळा बघितला... गाणी अप्रतिमच....

तुमच्या लेखनशैलीमुळे..परत एकदा बघावाच असे वाटते Happy

I write, I recite मीनाकुमारीने लिहिलेल्या गझला - नझ्म तिच्याच आवाजात.
काही नझ्म वाचून दाखवल्यात. गझला गुणगुणल्यात. संगीत खय्याम.

आभार भरत,
दादने पाकिझा मधे वाजलेल्या वेगवेगळ्या ठेक्यांबद्दल लिहायला हवे होते.
मस्त दमदार ठेके आहेत ते.

आणि पायल ---- निगोडी मधला तो ठहराव आणि मग तो तुकडा ! आह !

धन्यवाद लोकहो.

ही लेखमाला भारतीय सिनेमांच्या शताब्दी वर्षाला साजरे करण्याच्या उद्देशाने लिहित आहे. सगळ्यांनी एकत्रित हे साजरे करायचे आहे, त्यामुळेच प्रतिसादांमधे जास्तीत जास्त आठवणी, प्रत्येकाचा नॉस्टेल्जिया, वैयक्तिकरित्या आवडलेले प्रसंग, गाणी, संबंधित प्रसंग शेअर केले जावेत अशी मनापासून अपेक्षा आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने ती पुरी होते आहे याचा मनापासून आनंद. त्याबद्दल आभार.

पाकिझा सारख्या काव्यात्म सिनेमावर लिहिणे माझ्या दृष्टीने थोडे कठीणच होते. पण लिहिले ते तुमच्यापर्यंत पोचले याचा मनापासून आनंद झाला.

सिनेमाबद्दल लिहित असताना काही महत्वाचे संदर्भ अनवधानाने सुटून जातात, व्यक्तींचे नामनिर्देश राहून जातात, हे अक्षम्य असते कारण सिनेमा हा त्या सार्‍यांसकट बनलेला असतो. पाकिझा लेखामधे वीणा या बुलंद अभिनेत्रिचा विशेष उल्लेख करायचा राहून गेला. दिनेशदांनी ते दाखवून दिले याबद्दल त्यांचे विशेष आभार.

शर्मिला फडके,

आपला लेख वाचून सप्ताहांतास पाकिजा बघितला. लेख वाचून जी अपेक्षा ठेवली होती तिचा भंग झाला.

साहेबजानचे दु:ख काळजाला भिडले नाही. स्वर्गातल्या परीला वास्तवाची ठोकर बसते. मात्र त्यानंतर लगेच ती स्वगृही परत जाते, असं काहीसं वाटलं. नुकताच उमरावजान बघितला होता. माझ्यावर त्याचा प्रभाव पडलेला असू शकतो. तो चित्रपट वस्तुस्थितीला धरून वाटतो.

रेखाचं दु:ख मूक अभिनयातून पाझरत राहतं. मीनाकुमारीला ते मुद्दामून दाखवावं लागतं. गुलाबीमहल आणि जुनीकोठी उर्वरित जगापासून तुटलेले वाटतात. पतंग अडकलेली दाखवतात ते कृत्रिम वाटतं. उंचउंच भिंतींना पार करून एक पतंग केवळ झाडावर अडकण्यासाठी गुलाबीमहालात येतो, हे अशक्यप्राय वाटतं. ठेकेदाराची बळजोरी आणि नागाचं संरक्षण हा प्रसंग निरर्थक वाटतो. चित्रपटात पुष्कळ योगायोग आलेत. गाणी मात्र बेफाट आहेत.

आपण उमरावजानवर लिहावत ही विनंती. वाचायला आवडेल! Happy

आ.न.,
-गा.पै.

उत्तम लेख. चलो दिलदार चलो चे चित्रण उत्तम, आणि संपूर्ण लेख तर अप्रतिम लिहिला आहे. दायरा १९५२ नेट वर उपलब्ध आहे, तो तर सुंदर चित्रपट आहे, गुलाम मोहोम्मद यांनी परदेस, मिर्झा गालिब यांसारखे मुझीकल हिट्स दिलेले आहेत, पाकिझा पूर्वी,

मस्त लिहीलं आहे शर्मिला.

पाकिझा किती वेळा पाहिला त्याची मोजदाद केलीच नाही. जरूर वाटली नाही. प्रत्येक वेळी नव्याने पाहिला चित्रपट आणि प्रत्येक वेळी त्या पाकिझा बद्दल तितकेच वाईट वाटले.

सगळीच गाणी अप्रतिम आहेत. मौसम है आशिकाना च्या आधीचा संगीत तुकडा केवळ महान आहे.

सुंदर लेख.

साहेबजान सोबतच, तिला उघड्या टांग्यातुन फिरायला नेणारि तसेच मैफिलीत एकदा साहेबजान गाणं सुरु करत नाहि तेव्हा हळुहळु अस्वस्थ होत जाणारी नादिरापण लक्षात राहते.

सुंदर लेख.खूप आवडला. पाकी़ज़ाचा मूड अगदी बरोबर पकडला आहे.
पाकी़ज़ा म्हणजे एक प्रवाही काव्य आहे. संथ,वळणांवळणांनी वहाणार्‍या एखाद्या झर्‍यासारखं. दगडधोंडे, काठावरच्या विषवल्ली, सगळं आहे पण तो तरल शांत मूड सुटलेला नाही कुठेच.
ये चिराग बुझ रहे हैं, मेरे साथ जलते जलते ही ओळ आणि चित्रीकरण मनावर कोरले गेले आहे. मीनाकुमारीचे नृत्य अगदी साधे, माफक हालचालीचे. मीनाकुमारी नृत्यांगना म्हणून कधीच प्रसिद्ध नव्हती. त्यात तो तिचा आपले तुटके बोट पदराच्या गुंडाळीमध्ये वगैरे लपवण्याचा हट्ट. त्यामुळे तिची नृत्ये कायम एकसाची असत. वेगवान हालचाली तिला कधी जमल्याच नाहीत. वहीदा रेहमान आपल्या बोटांच्या आणि मनगटाच्या जादूई मुद्रांनी भुरळ पाडीत असताना (आठवा : कहींपे निगाहें आणि पान खाये सैयां हमारो ) मीनाकुमारीचे जडत्व अधिकच डोळ्यांत खुपे. पण तिची ही कमतरता 'चलते चलते' मध्ये मात्र एक अ‍ॅसेट ठरली आहे. सर्व जगाकडे पाठ करून रंगमंचावरून ती हळूहळू माघारी जाते. ठेक्याची लय तीच पण आवाज मंद होत जातो आणि दिवे विझत जाताना प्रकाशही. कमरेच्या हळुवार हेलकाव्यांनिशी घागरा गोल गिरक्या घेत रहातो. तिचं ते चालणं म्हणजे ठुमकणंही नाही आणि भरटनाट्यम मधला दणदणाटी पदन्यासही नाही. तेल संपल्यावर फडफडून विझणार्‍या मंद ज्योतीसारखी ती विझत जाते. फार सुंदर.
आणि हो, प्रकाशयोजनाही अगदी पूरक आहे. गडद आणि फिकट लाल-नारिंगी रंगांचा (nepathyaat aaNi kapaDyaaMtahee) प्रसंगोपात्त केलेला वापर बटबटीत न होता शांत, सुखद झाला आहे हे विशेष.

या गाण्याचा पुन्हा पुन्हा उल्लेख करावासा वाटतो कारण हे गाणं नुसत्या रोमॅन्टिकपणात अडकत नाही, यात काहीतरी सुटत चालल्याचा, सगळ्यांना सोडून क्षितिजापार, चंद्रालाही मागे टाकून जाण्याचा जो हळवा मूड आहे तो मनाला कातर करुन सोडतो, गाण्यातल्या एको इफ़ेक्टमुळे स्वर मनात घुमत रहातात.>>>>>>>>>> +१

शर्मिला , अतिशय सुरेख लिहिलंस ग! खरेतर हा सिनेमा मी पाहिलाच नव्हता.एकतर त्यावेळी तिकिट्स मिळत नव्ह्ती आणि मुख्या म्हणजे त्यात नावडता राजकुमार होता.
पण नंतर गाणी बघताना ,अरे, का हुकवला हा सिनेमा असं वाटत राहिले.
दूरदर्शनवर पाहिला.ट्रेनची शिट्टी लाजवाब आणि वीणा ,शहाबुद्दीन म्हाणून हाक मारते तो सीन अंगावर काटा आणतो.

आज हा लेख पुन्हा वाचला..
मस्त लिहिलं आहेस.
पण नुकतंच अबरार अल्वी यांनी सांगितलेल्या गुरुदत्तच्या आयुष्यातील अखेरच्या दहा वर्षांमधल्या आठवणी वाचल्या. (हे पुस्तक लवकरच मायबोलीच्या खरेदीविभागात इत्यादी.. :P). या आठवणींमध्ये 'साहब, बिबी और गुलाम' आणि मीनाकुमारी यांच्याबद्दल अर्थातच सविस्तर लिहिलं आहे. अमरोहींनी मीनाकुमारीला मारहाण करणं, रात्री 'मला भूक लागली' असं म्हणत मीनाकुमारीनं अबरार अल्वींचं दार ठोठावणं आणि चहाब्रेड खाणं अशा अनेक गोष्टी वाचून खूप वाईट वाटलं. त्या पार्श्वभूमीवर 'पाकीझा'तली मीनाकुमारी मला अधिकच करुण वाटते.

सुरेख लिहिलं आहेस शर्मिला. हीरा म्हणतात तसा अचूक मूड पकडला आहेस. फार आवडला लेख !

मी 'पाकिजा' कळत्या वयापासून पाहिलेला नाही. गाणी अर्थातच शेकडो वेळा ऐकली आहेत पण कथा नीट माहीत नव्हती ती आज तुझ्या लेखामुळे सविस्तर कळली. तरीही चित्रपटाचा मूड तू अचूक पकडला आहेस हे लिहू शकते ह्याचे कारण सांगते.
आठ-नऊ वर्षांची असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत दूरदर्शनवर हा चित्रपट लागला होता. आजी, आई, मावश्या ह्या चित्रपट बघायला बसल्या होत्या. तो टिव्ही ब्लॅक अँड व्हाईट होता त्यामुळे मला कायम हा कृष्णधवल चित्रपटच वाटतो Happy संवाद नीट कळत नव्हते पण तरी ती धडधडत येणारी ट्रेन, पक्ष्यांचे आवाज, कारंज्याच्या पाण्यात केस पसरुन पहुडलेली नायिका, ढगांमागे लपलेला चंद्र आणि त्यामुळे रुपेरी कडा असलेले ढग अशा प्रतिमा आणि संपूर्ण चित्रपटाचा तो संथ, करुण सूर मनात खोलवर उतरला आहे.
पांढर्‍याशुभ्र वस्त्रात एखादा लाल धागा कौशल्याने गुंफलेला असावा तसा ह्या चित्रपटाच्या प्रत्येक गाण्यात अगदी एकसंधरीत्या करुणरस हलकेच मिसळलेला आहे. अर्थातच लतादीदींच्या पवित्र, आरस्पानी सुरांमधून ती किंचितशी उदासी, अगतिकता अगदी लख्ख पोचते.

काहीही कळत नसताना ह्या चित्रपटाचा एवढा प्रभाव पडला होता मनावर हे लिहिता-लिहिता जाणवले. आता बघायला हवाय चित्रपट परत !

@शर्मिला फडके, आपल्या लिखाणावर मी अक्षरशः मोहित झालोय. आपल्या लेखणीत जादू आहे. आपण फारच सुंदर लिहिता.

राजकुमार साहेबजानची ओळख (बहुधा एका काजीला) पाकीजा म्हणून करून देतो त्या क्षणीची साहेबजानची वर्मी बाण लागलेल्या शुभ्र पक्षिणीची तडफड मीनाकुमारीने जी व्यक्त केलीय ती अंगावर येते.>>>पाकिझा अगदी नकळत्या वयात पहिला होता . तुम्ही लिहिलेला प्रसंग पाहिलेला आठवतोय पण त्याचा अर्थ आता लक्षात आला.

खूपच सुंदर लेख आहे तुमचा शर्मिला...
पाकिजाबद्दल खूप ऐकलंय,पण चित्रपट पहायचा योग आला नाहीये अजून, पण हा लेख वाचून तो लौकरच पाहिला पाहिजे असं वाटतंय!
Btw पाकिजा चा नेमका अर्थ कोणी सांगू शकेल का ? चित्रपट पाहिलेला नाही, त्यामुळे संदर्भ वा अर्थ काहीच माहीत नाहीये मला।

पाकीजा म्हणजे पवित्र.

चित्रपट आणि लेख सुंदर! राजकुमार सहसा अजिबात आवडत नाही पण या चित्रपटात अतिशय आवडला.

गुलाम महंमद हे नौशादांचे सहायक संगीतकार होते. स्वतंत्रपणे संगीत दिलेला त्यांचा हा पहिलाच सिनेमा
हा त्यांचा तिसरा चित्रप ट... पहिला मिर्झ गालिब १९५४ त्यात सुरैय्या रफीची गाणी होती. भारत भूषण चा. दुसरा शमा १९६१. यातही सुरैयाची गाणी होती. आप से प्यार हुआ जाता है या सुरैय्याच्या गाण्यावर नौशादची जबर छाप आहे. तिसरा १९७१ चा पाकी जा....

नौशादच्या यशात गुलाम मोहम्मद्चा मोठावाटा आहे. इतका की गुलाम मोहम्मद्चे निधन व्हायला आणि नौशादचा पडता काळ सुरू व्हायला एकच गाठ पडली. १९७५ नन्तर नौशादचा एकही चित्रपट इतकेच काय सिंगल गाणे देखील हिट झाले नाही. त्यासंदर्भात गॉसिप मॅगेझिन्स मध्ये क्या गुलाम मोहम्मद सब कुछ लेके गये असा नौशादला उद्देशून लेखही आला होता. त्यावरून नौशादच्या यशात गुलाम मोहम्मद चा वाटा कसा होता हे लक्षात येईल. जयदेव जसा सचिन देव्बर्मन च्या सावलीत खुरटून गेला तसेच गुलाम मोहम्मदचे झाले म्हणायचे......

वाह काय सुरेख लेख आहे. सर्व तरल क्षण टिपले आहेत. प्रतिसादही अत्युच्च. हीरा यांचा प्रतिसाद फार आवडला.
>>>>>>>> आणि दिवे विझत जाताना प्रकाशही. कमरेच्या हळुवार हेलकाव्यांनिशी घागरा गोल गिरक्या घेत रहातो. तिचं ते चालणं म्हणजे ठुमकणंही नाही आणि भरटनाट्यम मधला दणदणाटी पदन्यासही नाही. तेल संपल्यावर फडफडून विझणार्‍या मंद ज्योतीसारखी ती विझत जाते. फार सुंदर.>>>>>>>>>>>> जिओ!!

Pages