सिनेमा सिनेमा- पाकिझा

Submitted by शर्मिला फडके on 5 May, 2012 - 15:01

पाकिझा- साहेबजानचा प्रवास.

पाकिझा म्हणजे मीना कुमारी.
पाकिझा म्हणजे ते स्वप्न जे साकार करायला कमाल अमरोही चौदा वर्ष धडपडत होता.
पाकिझा म्हणजे अस्तंगत गेलेलं ते युग ज्यात काव्यात्मकता, तरलता, रोमॅन्टिसिझम आणि काही प्रमाणात भाबडीही वाटू शकणारी सामाजिकता हा सिनमांचा मुख्य गाभा होता.
पाकिझा म्हणजे लता मंगेशकर या गानसम्राज्ञीची अवीट गोडीची गाणी आणि गुलाम महंमद या दुर्लक्षित गुणी संगीतकाराचा अप्रतिम स्वरसाज.
पाकिझा म्हणजे तवायफ़-कलावंतिणींच्या बदनाम दुनियेचं करुण-राजस रुप.
पाकिझा म्हणजे मीना कुमारीच्या अभिनय कारकिर्दीला आणि तिच्या आयुष्यालाही मिळालेला पूर्णविराम.
पाकिझा म्हणजे युंही कोई मिल गया था.. सरे राह चलते चलते.. असं व्याकूळ आवाजात म्हणणार्‍या साहेबजानच्या नजरेत उमटलेली, रात्रीचा निराश अंधार चिरत येणारी, न होणार्‍या भेटीची ग्वाही देणारी ट्रेनची शिट्टी.. त्या शिट्टीत एका मिट्ट काळोख्या रात्री ट्रेनमधल्या कंपार्टमेन्टमधे, ती गाढ झोपेत असताना तिच्या नकळत घडून गेलेल्या एका अधुर्‍या मुलाकतीची सारी दास्तान उमटलेली असते.
आपली नाजूक गोरी पावले लालजर्द पर्शियन गालिच्यावर हलकेच थिरकवत गाणं गाणारी साहेबजान.. त्या पावलांना जमिनीवर टेकवायचं नसतं तिला. न भेटलेल्या त्याने पैंजणात अडकवून ठेवलेल्या चिठ्ठीत तसं बजावलेलं असतं. आपके पांव बहोत हसीन है.. इन्हे जमीनपर मत उतारईयेगा..
पाकिझा म्हणजे हा काव्यात्म मूड.

pakeezah12.jpg

पाकिझा कथा आहे तवायफ़ परंपरेतल्या दोन पिढ्यांची. नरगिस आणि तिची मुलगी साहेबजान या दोघींच्या नशिबात कोठ्यावरची बदनाम जिंदगी लिहिलेली असते पण दोघींनाही त्यांच्या प्रियकरांच्या रुपात आयुष्य एक संधी बहाल करतं प्रतिष्ठीत समाजात जगण्याची. दोघीही ही संधी स्विकारतात खर्‍या पण नरगिसला समाज नाकारतो आपल्यात सामावून घ्यायचे, शहाबुद्दीनचे, नरगिसच्या प्रियकराचे कुटूंब तिला आपल्या खानदानाची बहू होण्याचा सन्मान नाकारते, घराबाहेर काढते आणि अपमानीत, विद्ध नरगिस आश्रय घेते कबरस्तानाचा. पोटातल्या साहेबजानला वाढवत आपल्या आयुष्याचे उर्वरित काही महिने ती तिथेच काढते आणि मुलीला जन्म देऊन मरुन जाते. मात्र मरण्याच्या आधी शहाबुद्दीनच्या नावाने एक पत्र लिहून ठेवते, निदान आपल्या मुलीला तरी सांभाळ अशी विनवणी त्यात करते. पण त्याआधीच तिची बहिण येऊन त्या तान्ह्या मुलीला आपल्यासोबत घेऊन जाते आणि तिचा प्रतिपाळ करते.

साहेबजान त्याच कोठीत, गुलाबी महलमधे वाढते, तरुण होते. इन्ही लोगोंने ले लिना दुपट्टा मेरा.. गात आपल्या कलावंत कारकिर्दीचा आरंभही करते. आपले प्राक्तन काही वेगळे असू शकेल याची सुतराम कल्पनाही तिच्या मनात नसते. पण ते वेगळे असते आणि त्याची चुणूकही मिळते.

शहाबुद्दीनला वीस वर्षांनंतर नरगिसने लिहिलेले ते पत्र अकस्मात मिळते. मिळते तेही मोठ्या अजब रितीने. नरगिस जिथे मेली त्या कब्रस्तानातले तिचे बेवारस सामान भंगारात विकले जाते आणि त्यात तिची वही असते, ज्यात तिच्या आयुष्याची दर्दभरी, उदास दास्तान सांगणारी शायरी असते आणि ते पत्र असतं. ज्याच्या हातात ते पडतं तो ते वाचल्यावर हलून जातो. आटापिटा करत शहाबुद्दीनचा शोध घेऊन ते पत्र त्याच्या हवाली करतो. शहाबुद्दीन पत्र वाचल्यावर उलट्या पावली नरगिसच्या आणि त्याच्या मुलीचा शोध घेत गुलाबी महलमधे पोचतो खरा, पण त्याआधीच नरगिसची बहिण पुन्हा एकदा साहेबजानला घेउन पसार होते.
शहाबुद्दीनच्या कुटूंबात जिथे नरगिसला स्थान नव्हते तिथे या नाजायज मुलीला कोण स्विकारणार हा तिचा सवाल तर्कशुद्ध असतो खरा. मात्र त्यातूनच नियती साहेबजानला त्या संधीची चाहूल देतो, जी पुढे तिचं आयुष्य बदलून टाकू शकणार असते.

कोठ्यावरचा सारा लवाजमा आटपून ट्रेनमधून दुसर्‍या ठिकाणी सारेजण जात असतात. मिट्ट काळोख्या, घनदाट पावसाच्या वादळी रात्री त्याच ट्रेनमधे मध्यरात्रीच्या सुमारास सलीम चढतो. समोरच्या बर्थवर झोपलेल्या साहेबजानचं पडदानशीन लावण्य, तिच्या नाजूक शारिरीक सौंदर्याची ग्वाही देणारं गोरंपान, हसीन पाऊल त्याचं मन घायाळ करतं. आपल्या कवीहृदयाची साक्ष पटवणारी रोमॅन्टीक चिठ्ठी तिच्या पैंजणांमधे अडकवून तो मधल्याच कोणत्यातरी स्टेशनावर उतरूनही जातो.
साहेबजान जागी झाल्यावर ती चिठ्ठी वाचते आणि तिच्या शायराना, हळव्या मनाला तो अनामिक आशिक भुरळ घालतो.
पुढे अनेक अकल्पित प्रसंगांच्या मालिका घडून येतात, सलिम आणि साहेबजान पुन्हा पुन्हा भेटतात, दुरावतात. साहेबजाऩचा कमकुवतपणा, तिचा गमावलेला आत्मविश्वास, आपण तवायफ़ असण्याचा न्यूनगंड तिला सलिमच्या प्रेमाचा स्वीकार करु देत नाही आणि त्याच्यापासून तिला दामन सोडवूनही घेता येत नाही.
वास्तवापासून पळण्याचा एक मार्ग म्हणून ती सलिमसमोर आपला स्मृतीभ्रंश झाल्याचेही नाटक करते. सलिम तिला स्वत:च्या घरी घेऊन जातो. कसाबसा धीर गोळा करुन साहेबजान नियतीच्या खेळाचं पुढचं दान स्वीकारते.

योगायोग म्हणजे सलिम शहाबुद्दीनचा पुतण्या असतो. साहेबजान आणि शहाबुद्दीन दोघांनाही परस्परांची ओळख नसतेच.
पिढी बदललेली असली तरी घराचा कर्मठपणा तितकाच कडवा असतो. साहेबजान तवायफ़ घराण्यातली आहे हे कळल्यावर तिला त्यांनी स्विकारण्याचा प्रश्नच येत नाही, पण यावेळी सलिम ठाम असतो. साहेबजानचा हात घट्ट पकडून तोही घराबाहेर पडतो. पण सलिमच्या प्रेमावरच्या विश्वासापेक्षा मनातली असुरक्षितता, भिती साहेबजानला ग्रासून टाकते आणि ती त्याचा हात सोडून पळून जाते.
तिच्या आईचं आणि तिचं प्राक्तन त्या दुर्दैवी कडीमधे असं नकळत गुंफ़लं जातंच.

भरकटलेल्या अवस्थेतल्या सैरभैर साहेबजानला पुन्हा एकदा गुलाबी महलात आणलं जातं, तिची अशी करुण अवस्था पाहून मावशीच्या मनाला यातना होतात, पण त्यावर तिच्याकडे काही उपायही नसतो. आपले प्राक्तन स्वीकार, मुजरा हेच आयुष्य म्हणून मान्य कर इतकाच सल्ला ती देऊ शकते.

इकडे आपल्या प्रेमाचा अव्हेर साहेबजान पुन्हा पुन्हा का करतेय हे न कळू शकलेला दुखावलेला सलिम नाईलाजाने शादीला मान्यता देतो, आणि स्वत:च्या लग्नाच्या रात्री मुजरा करायला साहेबजानच्या कोठ्यावर आमंत्रण धाडतो. ती ते स्विकारते. ही परिक्षा आहे स्वत:ची आणि स्वत:च्या प्रेमाची असं समजत ती शादीच्या शुभ्र तक्तपोशीवर नृत्य करते, घायाळ होते पण तरीही नाचतच रहाते.
असह्य होऊन तिची मावशी शहाबुद्दीनला पुकारते, त्याच्या तथाकथीत शरिफ़ कुटुंबाचे वाभाडे काढते आणि सांगते की बघ हे तुझ्या पोटच्या पोरीचं, तुझ्या दारात, तुझ्या कुटुंबाच्या प्रतिष्ठीत अंगणात सांडलेलं रक्त.
हादरलेला शहाबुद्दीन आपल्या मुलीला कवटाळायला पुढे होतो आणि बापाच्या गोळीला बळी पडतो. साहेबजानची बारात आणि दुर्दैवी शहाबुद्दीनचा जनाजा गुलाबी महालातून एकाचवेळी उठतो. साहेबजानला तिचा मृत बाप बिदा करतो आणि अखेर एक तवायफ़ कोठ्यावरुन स्वत:च्या घरी जाते.

साहेबजानचा हा मुक्ती, प्रेम, सन्मानाच्या आयुष्याकडे चाललेला हा प्रवास गुलाबी महाल कोठ्यातली एक लहान मुलगी बघत असते, साहेबजान तर चालली स्वत:च्या पतीच्या घरी, आपल्या घरी.. पण ती मुलगी अजूनही त्याच जगात अडकून पडलेली आहे, आपल्यासाठीही कधीतरी अशी बारात घेऊन एखादा सलीम येईल, आपल्याकरताही एखादा शहाबुद्दीन स्वत;चे प्राण पणाला लावेल अशी आस त्या लहान मुलीच्या नजरेत उमटलेली आहे.
कमाल अमरोहीची पाकिझा आहे ही मुलगी.
अमरोहीचा हा खास टच ज्यामुळे पाकिझाला अजून एक तवायफ़च्या आयुष्यावरील सिनेमा अशा बिरुदामधे न अडकवता तो एका वेगळ्याच उंचीचा सिनेमा बनतो.

पाकिझाची कथा, पटकथा कमाल अमरोहीचीच होती. अमरोही स्वत: शायर होता आणि त्याच्या तरल, कल्पनारम्य, रोमॅन्टिक कवीमनाची झलक पाकिझाच्या पटकथेत, त्यानेच केलेल्या दिग्दर्शनात ठायी ठायी दिसली. एखाद्या गूढ परिकथेसारखी पाकिझाची कथा उलगडत जाते. अगदी सुरुवातीलाच सोनेरी केसांची नरगिस शहाबुद्दीनच्या वडिलांच्या हवेलीतून अपमानीत होऊन बाहेर पडते आणि कबरस्तानाचा रस्ता गाठते तेव्हापासूनच गूढ, अकल्पनीय प्रसंगांचा वेढा जणू आपल्या मनावर पडायला लागतो. नरगिसला वाटेत भेटणारे भोई तिला काही न विचारता अचूक कब्रस्तानात पोचवतात.
कबरस्तान हे प्रतिक आहे नरगिसच्या मेलेल्या भावनांचं, समाजाने टोचून, घायाळ करुन मारुन टाकलेल्या तिच्या हळव्या मनाचं. तिच्या भग्न आयुष्याचं.

कमाल अमरोहीने प्रतिकांचा वापर पाकिझा सिनेमात अनेकदा केला.
गुलाबीमहाल कोठीत सापाचे घुसणे साहेबजानच्या आयुष्यातले धोके सूचित करतात, तिचं झिरझिरीत पडद्यांमधे गुरफ़टून जाणं, कोलमडून पडण्यातून तिचा स्वत:शी चाललेला अयशस्वी झगडा, तिचा गोंधळ दिसतो. साहेबजान कोठ्यावर परतते तेव्हा समोर फ़ाटका, दोर तुटलेला पतंग लटकलेला तिला दिसणं अशा अनेक प्रतिकांमधून अमरोही कधी तरलपणे, कधी ढोबळपणे पाकिझाची कथा सांगत जातो.

पाकिझा सिनेमाचा मूड व्याकूळ अभिनयातून, सुरेल गाण्यांमधून, पार्श्वसंगीतामधून, उर्दू, नजाकतदार संवादांमधून, देखण्या पोषाखांमधून, भव्य, नेत्रदीपक, आलिशान सेट्समधून ज्या प्रकारे तयार होत जातो ते बघताना कौतुक वाटते ते कमाल अमरोहीचे आणि आश्चर्यही.

१९५८ मधे त्याने बनवायला घेतलेला पाकिझा अखेर १९७२ मधे रजतपडद्यावर झळकला आणि या दरम्यानच्या काळात अमरोहीला सिनेक्षेत्रातल्या अनेकांची कुचेष्टा सहन करायला लागली. मीना कुमारी आजारी पडून अंथरुणाला टेकली, संगीत दिग्दर्शक गुलाम महंमद आणि सिनेमॅटोग्राफ़र जोसेफ हिरशिंग तर जग सोडून गेले. तरी अमरोहीचा पाकिझा बनतोच आहे अशी हेटाळणी सहन करायला लागली.
लोकांचं सगळंच चूक होतं असंही नाही. खरोखरच कमाल अमरोही नादीष्टासारखा वागत होता. कृष्णधवल जमान्यात त्याने पाकिझा बनवायला घेतला, मीना कुमारीसारखी अभिनयसम्राज्ञी घरातच होती, सोबतीला त्याच्या आधीच्या गाजलेल्या महल सिनेमातला अशोक कुमार होता; अमरोहीला असा सिनेमा बनवायचा होता जो पाहून लोकं चकित होतील, असं काव्यमय सौंदर्य पडद्यावर आधी कधीही झळकलं नव्हतं असे उद्गार काढतील.

सिनेमाचं शूटींग जोरात सुरु झालं. इन्ही लोगोंने.. गाण्याकरता भव्य, खर्चिक सेट उभारला होता, वातावरणनिर्मितीकरता हजारो मेणबत्त्या लावल्या होत्या, कृष्णधवल पडद्यावर इतक्या नजाकतीने कोणतं गाणं सादर झालं नसेल अशी अमरोहीच्या मनात खात्री होती.
पाकिझाचे पुढचेही काही सीन्स घेतले गेले.
दरम्यानच्या काळात लोकांना रंगीत सिनेमा लोकप्रिय व्हायला लागला होता, ’जंगली’ सिनेमाच्या प्रदर्शनानंतर लोकांना इस्टमन कलर्सची जणू भुरळ पडली. पाकिझा रंगीतच बनवायचा असं अमरोहीने ठरवलं आणि आत्तापर्यंतची शूट केलेली सगळी रिळं फ़ेकून देत त्याने रंगीत सिनेमाला साजेसा माहोल सेटवर तयार करवून घेतला आणि शूटींगला पुन्हा नव्याने सुरुवात केली.

त्यानंतर सिनेमास्कोपचं नवं तंत्रज्ञान आलं, कमाल अमरोहीने पाकिझाही आडव्या, सिनेमास्कोप तंत्रातच जास्त खुलून दिसेल असं ठरवलं, आणि मग पुन्हा आधीच शूटींग रद्द करून नव्याने शूटींग.
असा खेळ अनेकदा चालू राहीला. मीना कुमारी आधी भांडली, मग थकली, अल्कोहोलिझमने तिचा कब्जा घेतला, ती आजारी पडली, हिरो अशोककुमारचं पोक्त झाला, त्याच्या जागी राजकुमार आला. कमाल अमरोहीने नायकाची व्यक्तिरेखा राजकुमारच्या रांगड्या व्यक्तिमत्वाला साजेल अशी नव्याने लिहिली. पाकिझाचा हिरो बिझिनेसमन होता, आता फ़ॉरेस्ट रेन्जर झाला.
पाकिझा संपूर्णपणे नायिकाप्रधान असूनही, त्यात मीनाकुमारीसारख्या समर्थ अभिनेत्रीची डबलरोलची सशक्त, ऑथरबॅक्ड व्यक्तिरेखा असूनही त्यातला नायक नामधारी किंवा मिळमिळीत वाटत नाही. हे श्रेय संपूर्णपणे कमाल अमरोहीचे.

पाकिझा मधली काही वर्षं अक्षरश: डब्यात गेला. मीनाकुमारी आणि कमाल अमरोहीमधे वैयक्तिक ताण-तणाव होतेच. व्यावसायिकदृष्ट्याही त्यांचे संबंध आता दुरावले. पण सुनील दत्त-नरगिस या जोडप्याने पाकिझाची काही रिळं पाहिली होती, हा किती अप्रतिम सिनेमा बनू शकतो हे त्यांना माहित होते. अखेर त्यांनी मनावर घेतले, मीनाकुमारीला राजी केले, अमरोही तयार होताच, आणि पाकिझा पुन्हा सेटवर गेला.

या सगळ्यात मीनाकुमारीचं पाकिझा पहिल्यांदा सुरु होतानाचं उत्फ़ुल्ल, पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे टवटवीत सौंदर्य मात्र उताराला लागलं होतं. कमाल अमरोहीने हेही आव्हान स्विकारलं. जमेल तसे लॉन्ग शॉट्स घेत, काही ठिकाणी, विशेषत: नृत्याच्या प्रसंगात पद्मा खन्नाच्या डमीचा वापर करत त्याने शूटींग पुढे रेटलं. आपली कल्पनाशक्ती पणाला लावत गाण्यांचे शूटींग केले.
उदा. चलो दिलदार चलो.. या गाण्याच्या चित्रिकरणाच्या वेळी मीनाकुमारीला उभं रहाणंही मुश्किल होतं. चेहर्‍यावर सूज आली होती, क्लोज-अप्स तर अशक्यच होते. अमरोहीने तिचा चेहरा दिसणारच नाही अशा तर्‍हेने डमी वापरत, व्यक्तिरेखांवर कमीतकमी भर देत, समुद्राचं पाणी, आकाशातला चंद्र, चांदण्या आणि शीडाच्या बोटींचा वापर करत गाण्याचे शूटींग केलं आणि गाण्यातला रोमॅन्टिक मुड कायम ठेवत उलट त्याला एक वेगळीच फ़िलॉसॉफ़िकल डूब मिळाली.

कमाल अमरोहिच्या दिग्दर्शनाचे, मीनाकुमारीच्या अभिनयाचे काही मास्टरपीसेस पाकिझामधून दिसतात ते केवळ अप्रतिम आहेत. मीनाकुमारीच्या आजारपणामुळे असेल, किंवा व्यक्तिरेखाच तशी लिहिली गेल्यानेही असेल, पण तिच्या दोन्ही व्यक्तिरेखांवर एक कमालीच्या औदासिन्याची झाक आहे. दु:ख, उदासी ती गरज नसताना स्वत:वर ओढवून घेते आहे, मनातला गोंधळ अनेकदा स्वत:च्या निर्णय न घेऊ शकण्याच्या कमकुवतपणामुळे मुद्दाम निर्माण करत आहे असं वारंवार जाणवतं.

काहीवेळा तर आपल्याला कळतच नाही ही नक्की अशी का वागते आहे, चीडही येते इतकं तिचं कॅरेक्टर कधी कधी कन्फ़्युजिंग वागतं. तिची व्यक्तिरेखा स्वप्नाळू आहे मात्र आपली स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची ताकदच तिच्यात नाही असं वाटतं. मीनाकुमारीला आनंदी व्हायचंच नाहीये का असा प्रश्न पडतो.

मात्र एका प्रसंगात मीनाकुमारीच्या अभिनयाला, तिच्या संवाद उच्चारण्याच्या एरवी सदोष वाटणार्‍या धाटणीलाही सलाम करावासा वाटतो. माझ्या मते सिनेमाचा हा हायलाईट सीन.
मीनाकुमारी म्हणजेच साहेबजान, राजकुमारपासून म्हणजेच सलीमपासून पळून पुन्हा कोठ्यावर परतलेली असते, सैरभैर, उदास अवस्थेत वावरत असते. तिची कोठ्यावरची सखी त्याबद्दल तिला वारंवार छेडते, तिचा मूड सुधारण्याचा प्रयत्न करते. अशाच एका प्रसंगी साहेबजान म्हणते- "हर तवायफ़ एक लाश हैं, मैं एक लाश हूं, तुम एक लाश हो, आपले हे गुलाबी कोठे म्हणजे कब्रस्तान."

मीनाकुमारीने आपल्या व्यक्तिमत्वाला सारा दर्द या संवादामधे ज्या पद्धतीने ओतला आहे, तो ऐकताना अंगावर काटा येतो. आपल्याला ट्रॅजेडीक्वीन हा किताब उगाच नाही मिळाला याची जणू साक्ष या प्रसंगातून ती देते. साहेबजानच्या व्यक्तिरेखेचा संपूर्ण औदासिन्याचा मूडच या प्रसंगातून व्यक्त होतो. ती आतून खरंच मरुन गेलीय, काही स्ट्रगल करावा, झगडावं परिस्थितीशी असं आतूनच तिला वाटत नाहीये, फ़क्त दु:ख आणि दु:खच आपल्या पदरी येणार अशी तिची जणू खात्री झाली आहे.

इतकं खोलवर डीप्रेस्ड कॅरेक्टर आजवर हिंदी सिनेमांमधे कधीही इतक्या समर्थपणे रंगवलं गेलं नाहीय. नायिकेच्या प्रमुख भूमिकेतून तर नाहीच नाही.
साहेबजान जेव्हा नरगिसच्या पोटात वाढत असते तेव्हा नरगिसने कब्रस्तानात आसरा घेतलेला असतो, समाजाच्या धिक्कारण्यामुळे ती त्यावेळी संपूर्णपणे कोलमडून पडलेली असते. जिवंतपणीच कफ़न पांघरुन बसलेली, जिंदा लाश नरगिस. नऊ महिने तिच्या पोटात वाढलेल्या साहेबजानवर सगळे संस्कार झाले असणार ते अशा नकारात्मक, उदास प्रवृत्तिचेच.

व्यक्तिरेखेचा असा सखोलपणा ही पाकिझामधली अचानक गवसलेली, व्यावसायिक सिनेमांमधे मला तरी अद्वितीय वाटलेली गोष्ट.

पाकिझाच्या कथेला एक विशिष्ट काळ आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा हा काळ आहे. सरंजामशाही अजून पुरती लयाला गेलेली नाही. इंग्रजी अंमल ऐन भरात आहे. अमरोहीने हा काळ दिसेल असे वातावरण सेटवर निर्माण करण्याचा असोशीने प्रयत्न केलेला दिसतो.
नरगिस आणि शहाबुद्दीन लग्नानंतर चौकच्या बाजारातून ज्या बग्गीत बसून जातात तिच्यावरचा चांदीचा पत्रा आणि त्यावरचा बकिंगहॅम पॅलेसचा ठसा कोरलेला स्पष्ट दिसतो. शहाबुद्दीनच्या घरातले कर्मठ मुस्लिम वातावरण दाखवणे हा तर कमाल अमरोहीच्या डाव्या हाताचा मळ. एकंदरीतच मुस्लिम कौटुंबिक समाजातली ट्रेडमार्क असणारी आदब, तेहजिब, चालिरिती पाकिझामधून वैशिष्ट्यपूर्ण रितीने दिसले.
मुस्लिम सोशल सिनेमांचा अस्त हळू हळू होतच होता, पाकिझा हा त्यातला शेवटचा महत्वाचा सिनेमा ठरला.

पाकिझा हे कमाल अमरोहीचे जिवंतपणी पाहिलेले स्वप्न होते आणि ते साकार करण्याकरता त्याने आपली सारी पुंजी, सारी प्रतिभा पणाला लावली.

सुंदर, आत्म्याला स्पर्श करणारे संगीत पाकिझाचा प्राण होता आणि अत्यंत उच्च दर्जाची सौंदर्यपूर्ण दृष्यात्मकता हा पाकिझाचा कणा होता.
गुलाबी महालातली झुंबरं, रुजामे, शमादाने, कारंजी, नक्षीदार कमानी, खांब.. सिनेमास्कोप पडद्यावरची प्रत्येक फ़्रेम नेत्रदीपक आणि तरीही कुठेही भडक, अभिरुचीहीन दिसली नाही. याचे श्रेय सेटडिझायनर एन.बी.कुलकर्णींना अर्थातच जाते.
कारंज्याच्या पाण्यात आपले केस बुडवून पहुडलेली मीनाकुमारी भन्नाट होती, अनेक दशकांनी संजय लिला भन्साळीने जेव्हा देवदासमधून तवायफ़ साकारली तेव्हा चंद्रमुखीच्या प्रत्येक अदेमधून साहेबजान डोकावली. अगदी कारंज्याच्या पाण्यात केस बुडवून बसलेल्या माधुरीच्या सीनसकट.

समृद्ध रंगांचा वापर, विशेषत: लाल रंगाच्या विविध छटा, त्याही कुठेही भडकपणा येऊ न देता वापरणं हे पाकिझाचे वैशिष्ट्य.
पाकिझाचा काव्यात्म मूड अगदी सिनेमाच्या टायटल म्युझिकपासून दिसतो. त्यातला वाद्यांचा एकत्रित वापर, लताच्या आवाजातला आलाप सिनेमाचा क्लासिक म्युझिकल मूड सेट करतो.
गुलाम महंमद पाकिझाच्या निर्मितीकाळातच खुदाला प्यारे झाल्यावर पार्श्वसंगिताची जबाबदारी नौशाद यांनी उचलली आणि मास्टर्स स्ट्रोक काय असतो त्याची चुणूक या बुजूर्ग संगीतकाराने अगदी सहजपणे रसिकांना दिली. पक्षांच्या किलबिलाटाचा, आगगाडीच्या शिटीचा, धडधडत येणार्‍या ट्रेनचा, बांगड्यांच्या किणकिणाटाचा आवाज ज्यांनी पाकिझामधे ठायी ठायी महत्वाच्या व्यक्तिरेखेसारखी भूमिका बजावली तो जिनियस टच मात्र कमाल अमरोहींचा स्वत:चा.
कोठ्यावर मुजरा नृत्य चालू असताना, आजूबाजूच्या कोठ्यांवरुन उमटणारे स्वरांचे नाद, ज्यात ठुमरीची तान आहे, गझलांचे सूर आहेत, तबल्याचे बोल आहेत, मधुनच शास्त्रोक्त चीजांचा वापर.. हे सारं तवायफ़ कोठ्यांच्या आसपासचा माहोल अचूक उभा करणारं.

गुलाम महंमद हे नौशादांचे सहायक संगीतकार होते. स्वतंत्रपणे संगीत दिलेला त्यांचा हा पहिलाच सिनेमा. इतक्या बेहतरीन, हॉन्टींग चाली त्यांनी दिल्या आणि त्यांचे रसिकांनी केलेले कौतुक पहायला हा बिचारा संगीतकार जिवंत राहू शकला नाही हे किती दुर्दैवाचे.
सिनेमा पूर्ण झाल्यावर वितरकांनी कमाल अमरोहींना सुचवून पाहीले की या अनोळखी संगीतकाराच्या नावावर सिनेमा खपणार नाही, कोणी नावाजलेला, नव्या दमाचा संगीतकार श्रेयनामावलीत येईल असे पहा. पण अमरोहीने ही सूचना साफ़ धुडकावून लावली. गुलाम महंमद हयात नसताना त्यांचा असा अपमान करणे माझ्याच्याने शक्य नाही, ते जिवंत असते तर कदाचित त्यांना विनंती केली असती, पण आता नाही. त्यांनी जी मेहनत करुन सुंदर संगीत दिले त्याचा मान मला राखलाच पाहीजे, असे कमाल अमरोहींचे विधान काळजाला स्पर्श करुन जाणारे आहे.

चलते चलते यूंही कोई मिल गया था, थाडे रहियो, इन्ही लोगोंने, चलो दिलदार चलो, आज हम अपनी मुहोब्बत का असर देखेंगे, मौसम है आशिकाना.. अशी एक से एक गाणी पाकिझाची शान ठरली. कमाल अमरोहींचा विश्वास सार्थ ठरला.
एकुण बारा सुरेल गाणी सिनेमाकरता बनवली होती, सगळीच काही वापरता आली नाहीत. पण एचएमव्हीने काही वर्षांनंतर या गाण्यांची डबल एलपी काढली जी रसिकांकरता खजाना ठरली.

लता मंगेशकरांचा मधाळ आवाज पाकिझामधे अलौकिक पातळीवर पोचला आहे असं म्हटलं तर यत्किंचितही अतिशयोक्ती ठरणार नाही. स्वरांवरची हुकूमत काय असते ते चलो दिलदार चलो.. या एकाच गाण्याच्या उदाहरणावरुनही सहज पटते. पुरुष गायकाचा म्हणजे रफ़ीचा आवाज या गाण्यातल्या फ़क्त ध्रूवपदात वापरला आहे. रफीच्या चलो दिलदार चलो.. या व्याकूळ सादेला प्रतिसाद देणारा लताचा हम है तैय्यार चलो.. म्हणणारा डीव्हाईन आवाज, हे दोन्ही आपल्याला क्षितिजापल्याडच्या दुनियेत तरंगत घेऊन जातात त्यांच्यासोबत.

या गाण्याचा पुन्हा पुन्हा उल्लेख करावासा वाटतो कारण हे गाणं नुसत्या रोमॅन्टिकपणात अडकत नाही, यात काहीतरी सुटत चालल्याचा, सगळ्यांना सोडून क्षितिजापार, चंद्रालाही मागे टाकून जाण्याचा जो हळवा मूड आहे तो मनाला कातर करुन सोडतो, गाण्यातल्या एको इफ़ेक्टमुळे स्वर मनात घुमत रहातात.
हळूवारपणे, संथ वेग पकडत पाण्यावर तरंगणारी शिडाची नौका.. आओ खो जाये सितारोंमे कही.. आओ भूल जाये दुनियाको कही.. असे स्वर उमटवत हळू हळू चांदण्यांमधे लहरत जात असते, तो मूड केवळ अविस्मरणीय. लताचा आर्त स्वर अंधारात हलकेच विरत जाणारा.
शेवटच्या श्वासाची लय सांधणारी ही साद आहे.

पाकिझा हा प्रवास आहे साहेबजानचा.
गुलाबी महालातल्या लालजर्द गालिच्यावर थिरकणार्‍या तिच्या नाजूक गोर्‍या पावलांचा,
सलिमला मोहात पाडलेल्या तिच्या पैंजण घातलेल्या उघड्या पावलांचा,
पांढर्‍याशुभ्र तक्तपोशीवर लाल रक्ताचे ठसे उमटवणार्‍या तिच्या रक्तबंबाळ जखमी पावलांचा.
अखेर तिची पावलं गुलाबांच्या पाकळ्यांवरुन सलिमच्या दुनियेत प्रवेशतात.
तिचा प्रवास संपतो.
पाकिझाचा प्रवास मात्र सुरु व्हायचा असतो.

* संदर्भ-
विनोद मेहता (इंडियन सिनेमा),
अभिजीत देसाई (शिणुमामागची गोष्ट)

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा किती सुंदर लिहिलंय - या चित्रपटातील बारकाव्यासकट, तसेच पडद्यामागील गोष्टीही......
पुन्हा एकदा "या" दृष्टीने पाकिझा पहायला पाहिजे....
नितांतसुंदर सेट्स, अप्रतिम गाणी व जबरदस्त कथाबीज यामुळे त्याकाळी खूपच आवडला होता.
पण या लेखामुळे अजून किती तरी गोष्टी समोर आल्या.
शर्मिला - लेखणीला सलाम व मनापासून धन्यवाद.

अवांतर - स्वतः मीनाकुमारी मुस्लिम असूनही तिच्या नोकरवर्गासाठी (जो बहुतांशी हिंदू होता) एक सत्यनारायणाची पूजा दरवर्षी आयोजित करत असे व विशेष म्हणजे त्यादिवशी कोणा मोठ्या गायक-वादकाचा एक कार्यक्रमही ठेवत असे - (कै. गजाननराव वाटव्यांकडून ही गोष्ट मला समजली - एके वर्षी त्यांच्या गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता अशा पूजेनंतर.....)

अप्रतिम लिहीले आहे. खूपच आवडले. Happy मी अन बहिणीने आमच्या आजोबांबरोबर पाहिला होता ७७ साली. तेव्हा आम्हाला उर्दु च काय हिंदी पण कमी कळायच.. आजोबा मधे बसलेले अन आम्ही दोघी संवाद संपला की त्यांना विचारायचो. Happy

शर्मिला, फक्त एक बारीक सुधारणा, राजकुमार ती चिठ्ठी पैंजणात नाही तर तिच्या पायाच्या बोटात अडकवतो.

आप के पाँव बहुत नाजूक है, इन्हे जमीनपर मत उतारीयेगा, मैले हो जायेंगे..

हेच शब्द वापरुन, साधना खोटेच्या आवाजात, दाऊद के जूते, यांनी जाहीरात केली होती.

दूरदर्शनवर सादर झालेल्या, नया अंदाज या कार्यक्रमात, इन्ही लोगोने वर रेखाने नाच केला होता. त्यावेळी
सेट न उभारता, एका मेल्यात चित्रीकरण केले होते. नृत्य दिग्दर्शक कमल मास्तर ने हा कार्यक्रम सादर केला
होता.

त्यात कमल हसन, अमिताभ, किमी काटकर असे बरेच कलाकार होते.

सुंदरच आहे लेख.

काही चित्रपट आपल्याला ठराविक वयात आवडतात पण मग काही काळाने पुन्हा पाहिल्यावर आपल्यालाच वाटते 'अरे का आवडला होता हा चित्रपट आपल्याला?' पण काही मोजकेच चित्रपट असे असतात की ते वाईनप्रमाणे मुरत जातात आणि प्रत्येक वेळी एक वेगळीच कीक बसते ते पहाताना. अशा मोजक्या चित्रपटांपैकी एक - पाकिजा. वाईनचा सुंदर रंग आधी डोळ्यांनी प्यायचा असतो, मग तिचा गंध छातीत भरून घ्यायचा असतो, मग जिभेवर घेऊन ती तोंडात घोळवायची असते मग अलगद प्यायची असते अगदी तशाच चार प्रमुख अंगांनी पाकिजा अनुभवायचा असतो - मिनाकुमारी, लता, गुलाम मुहम्मद आणि अमरोही साहेब. यातील एकालाही वगळले तर पाकिजाचा खरा अनुभव येत नाही.

रोमँटीसिझम म्हणजे गुलाबी प्रेम असेच मला अनेक वर्ष वाटायचे. मग खूप उशीरा एका मित्राने तो चुकीचा समज खोडून काढताना तीन शब्दात समजावून दिले होते - 'रोमँटीसिझम म्हणजे पाकिजा'. चित्रपट खर्‍या अर्थाने सुरू होतो तो 'आपके पांव देखे ...' या संवादाने. आधी येते ती पार्श्वभूमी (ती पण सुंदरच आहे). सहवास तर सोडाच साधा चेहराही न बघता नायक नायिकेच्या प्रेमात पडतो तो या पावलांमुळेच. ही कल्पनाच इतकी भन्नाट आहे. प्रेमातली तरलता, भाबडी स्वप्नमयता त्यात पुरेपुर उतरली आहे. आळत्यात रंगवलेली ती पावले मग सिनेमातले एक पात्रच बनून जातात. नायकाला झालेले त्यांचे पहिले दर्शन ते त्या पावलांवर होणारी दौलतजादा ते नायकासमोर त्याच पावलांचे रक्तबंबाळ होणे हाच अमरोही साहेबांनी चितारलेल्या चित्रातला prime stroke. हीच नियतीची अटळता. (मला यात शर्मिलाने म्हटल्याप्रमाणे नायिका द्विधा मनस्थीतीत नाही वाटत. तिच्या हातात काही नसतेच).

इ.टी. चित्रपटातले ते चंद्राच्या पार्श्वभूमीवर सायकल उडतानाचा प्रसंग मला प्रचंड आवडला होता. त्याला दाद देताना मनोमन म्हटले 'स्टीफन साहेब तुमच्या कल्पनाशक्तीला मानले. पण अशीच कमाल आमच्या अमरोही साहेबांनी करून ठेवलीये - चलो दिलदार चलो गाण्यात.' नदीच्या पात्रात वितळलेला तो चंद्र विसरणे निव्वळ अशक्य आहे.

सिनेमाच्या संगिताबद्दल काय लिहावे? चित्रपटात असलेली आणि नसलेली सगळीच गाणी अप्रतिम, सिनेमात दाखवलेल्या नवाबी थाटाच्या कोठ्याच्या वातावरणनिर्मितीत तर ती आवश्यकच ठरतात. पण प्रत्येक गाणे म्हणजे मास्टर्पीस आहे. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे पडद्यावर तितक्याच समर्थपणे साकारली गेली आहेत. सिनेसंगिताच्या त्या सुवर्णकाळात अनेक उत्तमोत्तम गाणी घडली पण त्यातली अनेक गाणी पडद्यावर बघवत नाहीत. सिनेसंगित म्हटले की ती गाणी अप्रतिम संगिताबरोबर तेवढ्याच ताकदीने पडद्यावर पण दिसली पाहिजेत. पाकिजाची गाणी १००% सिनेसंगीत आहेत.

मिनाकुमारी - पाकीजा बघायच्या आधी मी तिला आशा काळेची आई म्हणायचो. पण पाकिजा बघितल्या नंतर मी तिच्या प्रेमातच पडलो. या ट्रॅजेडी-क्वीनबद्दल लेखात लिहीलेच आहे. पण अभिनय म्हणजे काय हे तिने पुरेपूर दाखवले आहे या सिनेमात. चौदा वर्षांच्या खूणा सहज जाणवू देत नाही तो अभिनय. ज्या नृत्यांच्या दृष्यात तिचा क्लोज-अप आहे त्यात तिच्या स्टेप्स खूप सोप्याच आहेत पण एखादी गिरकी, 'तिरे-नज़र' हे शब्दशः दाखवणारे दृष्टीक्षेप, आणि कमालीच्या लयबद्ध हालचाली इतक्या मोजक्याच भांडवलावर तिने ते शॉट्स जिवंत केले आहेत. आणि आवाज? डोळे बंद करून नुसता चित्रपट ऐकला तरी साहेबजानची फरफट, तिचे दु:ख काळजाला भिडते. करून बघा हा प्रयोग कधी.

अप्रतिम झालाय लेख ! पण मीनाकुमारीच्या बाबतीत टवाळशी सहमत, अगदी स्वतः मीनाकुमारीचा पंखा असुनही ...
पण या लेखामुळे पडद्याआडच्या बर्‍याच गोष्टी माहीत झाल्या. त्याबद्दल धन्यवाद Happy

मस्त लिहीले आहे!
हा काही माझा फार आवडीचा सिनेमा नाही, पण लेखात असलेल्या <<<व्यक्तिरेखेचा असा सखोलपणा ही पाकिझामधली अचानक गवसलेली, व्यावसायिक सिनेमांमधे मला तरी अद्वितीय वाटलेली गोष्ट.>>> ह्या आणि अशा अनेक गोष्टी वाचून तुझ्या नजरेतून परत एकदा नक्कीच पहाणार.

फार छान लेख. माझ्या आवडत्या सिनेमां पैकी एक. माझ्या कडे सी.डी आहे आणि मी तो अनंत वेळेला पाहिला आहे. त्यातल्या तरल जागा तुम्ही छानच टीपल्या आहेत. माझा आवडता प्रसंग म्हणजे मीना कुमारी त्याच्या टेंट मध्ये त्याला पहिल्यांदा बघते तो. अप्रतिम आहे तिचं स्वगत. गाणी तर लाजवाब.

त्या मध्ये बॅकग्राउंड ला वाजवलेली गाणी पण सुरेख आहेत. एक गाणं मला वाटतं की बेगम अख्तर च्या आवाजात आहे " एक धुंवा सा कहाँ से उठता है". कारण हीच गझल नंतर सई परांजपेंच्या "चश्मेबद्दुर" मध्ये गुलाम अली च्या आवाजात बॅकग्राउंडला वाजवली आहे. ( त्यानेच सीनेमा सुरु होतो. त्याचा संदर्भ फार विनोदी करुन त्या गझल मधला चार्म घालवला आहे. पण सईला ते माफ आहे.)

ती जेंव्हा तिच्या मैत्रिणीला गाडीतला प्रसंग सांगत असते त्या वेळी मीना कुमारीचा चेहेरा खुप नीरागस वाटला आहे. खास करुन " नही नही ये चिठ्ठी मुझेही लिखी थी. मेरे ही पाँओ मे मिली थी. " हे ती म्हणते तेंव्हा ती स्वतःलाच काहीतरी ठासुन सांगत असते.

नंतर तुटक्या पतंगाला बघताना मागे लताची जी लकीर वापरली आहे, ती खुपच कातर आहे.

तुम्ही खुपच आत्मियतेने लिहिले आहे. अशाच लिहित रहा.

महान सुंदर लेख! अतिशय आवडला. पाकीजा नक्कीच बघणार आता.

गुलाम मोहम्मद ची जी काही थोडीफार गाणी माहीत आहेत त्यांची जादू काही वेगळीच आहे. मला पाकीजा मधल्या इतर काही गाण्यांवर नौशाद चा प्रभाव जाणवतो पण "मौसम है आशिकाना" हे नेहमीच वेगळे वाटत आलेले आहे. तीच संगीतकाराची सिग्नेचर "मिलते ही आँखे दिल हुआ दीवाना किसीका..." ला जाणवते (जरी संगीत नौशादचे असले तरी). मौसम है आशिकाना तर कितीही वेळा ऐकले तरी कंटाळा येत नाही.

शर्मिला, मस्त विषय, मस्त सिनेमा आणि मस्त लेख ... बहुत मजा आया पढके Happy
काही काही सिनेमा असे असतात की वेगवेगळ्या वयात ते तुम्हाला त्या सिनेमातली वेगळी वेगळी बाजू दाखवतात. पाकिझा हा असाच एक चित्रपट.
माझ्या आयुष्यात मीनाकुमारी हे प्रकरण समजायला, उमजायला कदाचित थोडा उशीर झाला...कदाचित खूप लहानपणी तिचे सिनेमे पाहिलेच गेले नाहीत.
पण कॉलेजजीवनात आणि नंतरही आवर्जुन तिचे सिनेमे बघितले.. त्यातुन ती जशी जशी समजत गेली, तशी तशी तिची, तिच्या अभिनयाची, सादगीची नशा माझ्यावर चढत गेली. आता या जन्मात तरी हे वेड कमी होणं अशक्य !
माझ्यामते, जन्मानं मुस्लीम असून त्या काळात पडद्यावर इतकी अस्सल हिंदू वाटणारी स्त्री म्हणजे मीनाकुमारी.

" उपरवाला जानकर अंजान है" >> माझ्यासाठी हिंदी सिनेमातलं हे पहिल्या क्रमांकावर असलेलं 'फ्लर्टींग साँग' (हे वाक्य लिहितानाही दोन हार्टबीटस चुकल्या माझ्या) Happy

वेड... वेड लिहिलाय लेख. चित्रपट मलाही चित्रिकरण, आणि अगदी काही(च) ठिकाणी मीनाकुमारीच्या अदाकारीसाठी पुन्हा पुन्हा बघावा वाटला.
गाणी मॅड आहेतच आहेत.
लेख प्रच्चंडच्या प्रच्चंड आवडला.

पाकिजा रिलीज झाला , तेव्हा मी मराठा मन्दिर मधे बघितला होता , त्याचे तिकीट सुद्धा खूप सुन्दर होते..त्यावर मीनाकुमारीच्या शेवटच्या नाचाचे चित्र होते.....मी बरेच वर्षे ते जपून ठेवले होते...मीनाकुमारी माझी अत्यन्त आवडती नटी आणि अशोक कुमार आवडता नट..... खूप सुन्दर लेख.....धन्यवाद

उपरवाला जानकर अंजान है" >> माझ्यासाठी हिंदी सिनेमातलं हे पहिल्या क्रमांकावर असलेलं 'फ्लर्टींग साँग' (हे वाक्य लिहितानाही दोन हार्टबीटस चुकल्या माझ्या)>>> या गाण्यात काय तूफान शब्द वापरले आहेत. सिच्युएशन तर एकदम सही. वहिदा मधेच नमस्कार करते ते कसलं कॉमेडी वाटतं.

सॉरी... पाकिझाबद्दल लिहिते. माझा अत्यंत आवडता सिनेमा. ज्या सिनेमाच्या शेवटाने मनात एक हुरहुर येते त्या मोजक्या सिनेमापैकी हा एक. मीना कुमारी उत्तम अभिनेत्री होती. तिची दारूने लावलेली वाट खरंच बघवत नाही, हेही खरे. मीना कुमारी मला स्वतःला सर्वात गोड दिसली होती ती तू गंगा की मौज मे जमना की धार गाण्यात.

तू गंगा की मौज मे जमना की धार गाण्यात.>>> हो तेथे चांगली दिसली होती, तसेच आझाद मधल्या त्या कितना हसीं है मौसम मधे ही. नंतर काय झाले माहीत नाही.

गंमत म्हणजे दिलीप कुमार व मीनाकुमारी हे ट्रॅजिडी किंग व क्वीन एकत्र आले त्यापैकी किमान दोन चित्रपट 'आजाद' आणि 'कोहिनूर' हे हलकेफुलके आहेत असे ऐकले. पाहिलेले नाहीत. दोन निगेटिव्ह संख्यांचा गुणाकार पॉझिटिव्ह येतो तसे काहीसे Happy

मात्र काल हा लेख वाचल्यापासून 'मौसम है आशिकाना' काही डोक्यातून जात नाही.­

परवाच्या रविवारी दुपारी दूरदर्शनवर आजाद - कोहिनूर यांतलाच एक होता. दिलीपकुमार मीनाकुमारीवर लाईन मारताना बघण्याची पर्वणी साधली.
दिलीपकुमारला मानसोपचारतज्ञाने असे चित्रपट करायला सांगितले होते (म्हणे). त्याने तो सल्ला मीनाकुमारीलाही पास ऑन केला असेल.

लोकहो मीनाकुमारीचा परिणीता बघा. मग वि.बा. वि मी.कु. अशी वादस्पर्धा ठेवूया.

मयेकर म्हणिंग राईट. फारेंड- निगेटीव्ह Lol

किती गोड दिसते मीनाकुमारी त्या 'कोई प्यार की देखें जादुगरी, गुलफाम मिल गयी सब्जपरि' मध्ये. ते दोघही तरुण आणि सुरेख दिसतात आणि सहज.
पिच्कर मात्र लई बंडल.
परिणीता मध्येही. काय दिसते. आणि गाणी. 'चली राधे रानी '.. अहाहा..

शिरीष कणेकरांच्या 'यादो की बारात' मध्ये मीनाकुमारीचे एक अप्रतिम कृष्णधवल छायाचित्र आहे (चु.भू). ती इतकी सुंदर दिसते. कोरलेल्या धनुष्याकृती जाड भुवयाविरहीत, बटबटीत मेकपविरहित काय सुं द र दिसते.

केसांची हलकी महिरप, मोहक का काय म्हणतात तसली जीवणी, बोलके पाणीदार डोळे, तरतरीत नाक, निमुळती मान.. आणि चेहरा इतका उत्फुल्ल प्रसन्न की वाकड्या ओठांचे ते मधुबालाचे रस्त्याकाठचे फ्येमस पोस्टर असते ना पदपथांवर, त्यातल्यापेक्षा सहापटींने तरी जिवंत, रसरशीत आणि खरी.
ही बाई का सुंदर मानली जायची हे तेव्हा पहिल्यांदा कळले मला.

अप्रतिम लेख!
'चलते चलते' तर ऑल टाईम फेव्हरिट गाणं. त्यात मीनाकुमारी गाता गाता मध्येच आठ्वणीत दंगते आणि गायची थांबते, तेव्हा पार्श्वेसंगीतातला तो प्रसिद्ध ठेका चालुच. कमाल अमरोही आणि गुलाम मोहंमद अ‍ॅट देअर बेस्ट!
कमाल अमरोही ह्या माणसाने गाण्यांच्या दर्जाबाबत कधीच तडजोड केली नाही. त्याच्या प्रत्येक सिनेमातली गाणी कायम उत्कॄष्टच असायची.

सुंदर लिहिला आहेस लेख.

अवांतर- 'कोहिनूर' हा अत्यंत टाइमपास चित्रपट आहे. नक्की बघावा. त्यात ते गाणे आहे, दि कु आणि मी कु (दोन वेगवेगळ्या) घोड्यांवर बसलेले असतात आणि 'कोइ प्यार की देखे जादुगरी...'. आणखी बरीच छान गाणी आहेत त्यात.

शर्मिला, सुंदर लिहिलंयस. मला स्वतःला पाकिजा फारसा आवडला नाहीये. पण ती कहाणी, मीनाकुमारीचं एकूणच शोकात्म व्यक्तिमत्व डोक्यात ठाण मांडणारं आहे. मौसम है आशिकाना बद्दल फारेण्ड +१

अवांतर -
१. कोहिनूर आणी आजाद मी किमान ३-४ वेळा पाहिलेत. मस्त टाईमपास आहेत. गाणी छान आहेत. शिवाय दिलिपकुमारही तरुण दिसतो. एरवीसारखा जून, निबर दिसत नाही. मीनाकुमारी गोडच दिसते Happy
परिणिता मधे अगदी लहान मीनाकुमारी आणि बर्‍यपैकी प्रौढ वयाचा अशोककुमार त्या कथानकात एकदम फिट्ट बसलेत. हाही सिनेमा २-३ वेळा बघितलाय. (याचाच नंतर एक जितेन्द्र-सुलक्षणा पंडित असलेला रीमेक आला होता. केवळ भयंकर. अर्ध्या तासात टीव्हीसमोरून उठले)

२. मीनाकुमारीने लिहिलेल्या कविता जरूर वाचा. खूप आत काळजाला भिडणार्‍या, अस्सल शोकात्म.. भारतीय स्त्रीवादी साहित्य परंपरेत तिला (आणि हंसा वाडकरनाही) मानाचं स्थान आहे.

३. नंदिनी, 'अपनी तो हर आह..' या गाण्याबद्दल अगदी अगदी. लिहितानाही एक ठोका चुकलाच. पण माझं सगळ्यात लाडकं गाणं 'ये रात ये चांदनी फिर कहाँ..' आहे. लिहिताना निदान चार ठोके चुकले Proud

@दिनेशदा , नजरकी मारी मरी मेरीं गुईंया हे गाणे रामकुमारी नसून राज कुमारीचे आहे. तुमचा बहुधा टायपो असावा.....
@मो.की मी. ये धुआं कहांसे उठता है हे चश्मेबद्दूरमधली गझल गुलाम अलीच्या आवाजात नसून मेहदी हसनच्या आवाजात आहे.....

@दिनेशदा , नजरकी मारी मरी मेरीं गुईंया हे गाणे रामकुमारी नसून राज कुमारीचे आहे. तुमचा बहुधा टायपो असावा.....
@मो.की मी. ये धुआं कहांसे उठता है हे चश्मेबद्दूरमधली गझल गुलाम अलीच्या आवाजात नसून मेहदी हसनच्या आवाजात आहे.....

पाकिझाची गाणी म्हणजे अविस्मरणीयच! लताबाईंच्या कारकीर्दीतले एक शिखर म्हणता येईल. गुलाम महंमद एक जबरदस्त संगीतकार होता याचा प्रत्यय यायला हा एकच सिनेमा पुरेसा आहे.

मी अगदी लहान असताना प्रथम ही गाणी ऐकली. तेव्हा हिंदी काय, उर्दू काय काहीही कळत नसतानाही ही गाणी अफाट आवडली केवळ संगीत, आवाज आणि वाद्ये यामुळेच. (मी माझ्या शेजारी एक ग्रामोफोन बाळगणारे काका होते त्यांच्या मागे लागून लागून ही गाणी लावायला लावायचो. )

अर्थात ह्या सिनेमाच्या वाट्याला गेलो नाही. मीनाकुमारीचा सिनेमा म्हणजे रडका, ती शेवटी मरणार वगैरे वर्णने ऐकून त्यापासून दूरच राहिलेले बरे वाटायचे.

आजही राजकुमार, मीनाकुमारी हे लोक फारसे आवडीचे नाहीत. पण हा लेख वाचून मात्र हा सिनेमा एकदा तरी पहावाच असे वाटते.
एखादा सिनेमा अफाट खर्च करुन, त्यात स्वतः कंगाल झालो तरी पर्वा नाही पण जिद्दीने पुरा करायचा अशी ईर्षा बाळगणारे लोक ह्या इंडस्ट्रीत होऊन गेले. कमाल अमरोहीप्रमाणेच के असिफही असाच.

जाता जाता: मीनाकुमारी मुसलमान होती पण तिच्या आईवडलांपैकी एक (बहुधा आई) हिंदू होते. आणि तिचे रवींद्रनाथ टागोरांशी दूरचे नाते आहे.

आशुतोष, काल इथली चर्चा वाचून चलते चलते गाणं ऐकत होते तेव्हा हेच आठवलेलं मलापण.

कोहिनूरमधे दिलीपकुमारचे आरश्याचा एक अप्रतिम विनोदी सीन केलाय, तो बघितल्यानंतर दिलीपकुमारला लोक अभिनयाचा बापमाणूस का मानतात ते समजतं. (नंतर तो स्वतःच्याच इमेजच्या प्रेमात पडल्यावर बघायला नकोसा होतो)

अप्रतिम लिहिलंयस, शर्मिला Happy

काही सिनेमे हे बालपणी किंवा कॉलेजमधे असताना पाहिले, तर ते योग्य प्रकारे न समजल्याने त्यांच्याबद्दल विनाकारण चुकीचे मत बनू शकते. हा सिनेमा अशातलाच एक आहे.

मी.कु. आणि रा.कु. हे दोघंही मला आवडत नाहीत, पण सिनेमा अतिशय आवडला होता.

आभार बा.जो. टायपोच होता ! सुधारला आता.

घबराके जो हम सरको टकराए तो अच्छा हो... वाली राजकुमारी !

Pages