'मसाला' - प्रीमियर वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by माध्यम_प्रायोजक on 21 April, 2012 - 04:10

मायबोली.कॉमने माध्यम प्रायोजकत्व स्वीकारलेल्या 'मसाला' चित्रपटाचा प्रीमियर गुरूवार दिनांक १९ एप्रिल, २०१२ रोजी मुंबईत आणि शुक्रवार दिनांक २० एप्रिल, २०१२ रोजी पुण्यात पार पडला.
या प्रीमियरचे वृत्तांत, प्रकाशचित्रे आणि प्रतिक्रिया आपल्याला इथे वाचावयास मिळतील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

परवा मायबोली कृपेने (काही विजेत्यांना येणं शक्य नव्हतं म्हणुन) मला मसाल्याच्या प्रीमियरला जायला मिळालं. एवढी छान संधी मिळूनही ट्रॅफिकमुळे आणि शोधाशोधीमुळे रेड कार्पेट इव्हेंट मीस केला. Sad
राष्ट्रगीताच्या वेळी पोचलो. त्यामुळे सिनेमाची सुरवात चुकली नाही. Happy समोरच गिरीश कुलकर्णी होता. Happy मला त्याचा सहज अभिनय आवडतो.

सिनेमा आवडला.
अमृता सुभाषने गिरीश कुलकर्णीला छान साथ दिली आहे. कुलकर्णी द्वयीचे बाकी लाडके कलाकारही आहेतच. डॉ श्रीराम लागूंचं दर्शन सखावह. ह्रुषिकेश जोशी भन्नाट.
एक खटकलेली गोष्ट म्हणजे रेवणचा मोठा उद्योजक व्हायची प्रोसेस जरा उरकुन टाकल्यासारखी वाटली. बाकी सिनेमाचे संवाद छान खुसखुशीत आहेत. हलकेफुलके प्रसंग छान दाखवलेत. रेवणला पडणारं ट्रक मधल्या स्वप्नाचं चित्रीकरण फार आवडलं. रस्त्याने चालताना रेवण आणि सारिकाला होणारा साक्षात्कार पण आवडलं. रेवणचे आधीचे धंदे, मेव्हण्यासोबत सायकल प्रवास, डब्बापार्टी, पार्टनरशीप कँसल इ. प्रसंग छान जमलेत.

थोडक्यात हा मसाल्याचा टच जरुर चाखा.

'आवडेल त्याच विषयांत मुलांना करियर करू द्या. जबरदस्ती करू नका' असा उपदेश आजकाल आपण अनेक वेळा ऐकतो. याच उपदेशाचं स्वरूप आणि संदर्भ थोडेफार बदलत जाऊन 'आवडेल त्या कामाचं व्यवसायात- धंद्यात रुपांतर करा. नक्की यश मिळेल'; 'नोकरीत दुसर्‍यासाठी काम करण्यापेक्षा धंद्यात स्वतःसाठी करा.'; 'कामातल्या, धंद्यातल्या अडचणी आणि अपयश म्हणजे पुढल्या यशासाठीच्या संधी, साधने आणि गुंतवणूक असतात.'... इ. इ. उपदेशही निरनिराळ्या भाषेत अनेक ठिकाणी आपण वाचत ऐकत असतो. कधी हे सल्ले इतक्या जड भाषेत आणि अत्त्युच्च आदर्श वगैरे घालून देण्याचा प्रयत्न केल्यागत 'सुविचारी' पद्धतीचे असतात, की ते आपल्याला फारसे भिडत नाहीत. भिडत नाहीत म्हणून लवकर विसरतोही.

थोडं याहीपुढे जाऊन विचार करू या. 'तुम्हाला आवडतं ते काम..' असं म्हणल्यानंतर अनेक चेहरे विचारमग्न होतात. जगण्याच्या धबडग्यात आपल्याला नक्की काय आवडतं, आपण नक्की कशात रमतो, आपला पिंड नक्की काय आहे- याचा नीट बैजवार विचार करण्याचं आपल्यातल्या बर्‍याच जणांचं राहूनच गेलेलं असतं. आणि 'आवडतं काम' म्हणजे नक्की कोणतं आणि काय- हेही आपल्याला धड सांगता येत नाही याची लाज वाटायची वेळ येते. आता काय करायला आवडेल, जमेल हेच कळत नसेल तर त्याचा धंदा-व्यवसाय काय करणार कपाळ. मग हे मनाजोगतं- मन रमेल अशी गोष्ट सापडल्याशिवाय काम कसं करणार, त्याचा धंदा कसा होणार आणि याहीपेक्षा- धंदा करून बघितल्याशिवाय हे रुचणारं आवडणारं काम कोणतं हे कसं कळणार- अशा अवघड चक्रव्युहात तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणूस अडकून बसतो.

हे असं अडकणं हे खरं तर माणूसपणाचं लक्षण. त्यात लाज वाटण्यासारखं काहीच नाही. पण मग ही कोंडी फोडायची कशी?

***

तर एका साध्याभोळ्या, सामान्य माणसाचा काम शोधण्याचा हा प्रवास म्हणजे नुकताच प्रदर्शित झालेला 'मसाला'. नुसतंच 'काम' शोधणं हे त्याचं ध्येय नाही. तर आवडेल, रुचेल असं काम त्याला हवंय. हा 'रेवण शिद्राम पाटील' नावाचा फाटका माणूस आहे आणि बायकोही आयुष्याकडून फार अपेक्षा नसलेली साधीभोळी आणि समोर येईल ते गोड मानून घेण्यातली आहे. पोटाची भ्रांत असलेल्या या माणसासाठी 'आवडेल तेच काम' मिळवणं ही खरं तर मोठीच अपेक्षा म्हणायला पाहिजे. पण पोटाने आ-वासलेला असला तरी या माणसाचं डोकं जागं आहे. डोळेही उघडे आहेत. अवतीभवती नेहमीच भेटत असणार्‍या माणसांच्या वागण्यातून बोलण्यातून तो खास स्वतःसाठी असं स्वतःचं तत्वज्ञान तयार करतो. 'आनंदासाठी काम करायचं' हे तर आहेच आहे, पण ही कल्पना पुढे नेऊन खरं तर 'आनंदाने काम करायचं' अशी असायला पाहिजे हे त्याला कळतं.

या प्रवासात तो भरपूर फिरतो. प्रवासात सार्‍यांनाच भेटतात तशी त्यालाही बरीवाईट माणसं भेटतात. म्हणजे बरी आणि वाईट अशी वेगवेगळी नव्हे तर तर बरे-वाईट असे दोन्ही स्वभावात असलेले लोक. जितीजागती माणसं अशी थेट काळी किंवा पांढरी कधीच नसतात, तर ती दोन्ही असतात हे त्याला कळतं. उधार्‍या-उसनवार्‍यांपासून, अडचणींपासून दूर पळणं हे चांगलंही नाही आणि वाईटही नाही- हे त्याला कळतं. अडचणी सोडवण्यासाठी तात्पुरतं दूर पळणं आणि अडचणी टाळण्यासाठी त्यांपासून कायमचं दूर जात राहणं- यातला फरक त्याला या प्रवासात भेटलेल्या छोट्यामोठ्या अनेक लोकांमुळेच कळतो.

रेवणचं शेवटी काय होतं, त्याला यश मिळतं का, आणि त्याला रुचेल असं 'आवडतं' काम त्याला सापडतं का, या कामाचं तो 'धंद्यात' रुपांतर करू शकतो का- या प्रश्नांच्या उत्तरापेक्षा रेवणचा हा प्रवास जास्त महत्वाचा. म्हटला तर अवघड- जागोजागी डोळ्यांत अंजन घालणारा, ठेचकाळवणारा, आशानिराशांची जीवघेणी आंदोलनं घेणारा. म्हटला तर किती सोपा- कुणाही फाटक्या किंवा अतिसामान्य माणसालाही 'आपला' वाटेल असा.

***

कुठेही तत्वज्ञानाची जड भाषा न वापरता, उपदेशाचा प्रयत्न न करता अत्यंत हलक्याफुलक्या आणि नर्मविनोदी ढंगाने रेवणचा प्रवास पडद्यावर चितारला गेला आहे. रंगभूमीवर दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून आपला वेगळा ठसा उमटवणार्‍या संदेश कुलकर्णीचा दिग्दर्शक म्हणून आणि उमेश-गिरीशचा 'निर्माता' म्हणून हा पहिलाच चित्रपट. बर्‍याच ठिकाणी नाटकाच्या ट्रीटमेंटचा भास होत असला तरी रेवणचा प्रवास दाखवण्यातला हा 'दोष ' वाटत नाही. उलट काही ठिकाणी ही अशी रंगमंचीय ट्रीटमेंट जास्त परिणामकारक वाटली. काहीही असलं तरी उमेशच्या दिग्दर्शनाची छाप चित्रपटावर दिसणार नाही, याची पुरेपूर काळजी संदेशने घेतली आहे, असं म्हणायला हरकत नाही. एका साध्या सामान्य माणसाचा प्रवास दाखवताना चकचकाट, अनावश्यक गाणी-संगीत आणि खटकेबाज संवाद यांचा मोह टाळला आहे- हे ठळकपणे जाणवतं. क्वचित काही ठिकाणी कथा रेंगाळल्यागत वाटते, पण रेवणचा प्रवासही असाच आहे खरंतर. कुठे दिशाहीन होऊन थांबल्यागत, कुठे साचून राहिल्यागत आणि कुठे कोंडी फुटल्यागत.

'देऊळ'मधल्यासारखाच पुन्हा एकदा भोळाभाबडा नायक साकारणार्‍या गिरीशने कथा पटकथा आणि संवादलेखनाचंही काम अतिशय प्रभावीपणे केलं आहे. पण इथं या भोळेपणाला काम करून दाखवण्याच्या वृत्तीची जोड आहे. काही करून 'पुढे' जाण्याची आस आहे.

सुनिल सुकथनकरांनी लिहिलेली 'कान कुडती..' 'मस्साल्याचा टच्च..' ही दोन्ही गाणी श्रवणीय आणि लक्षात राहतील अशी आहेत. अमृता सुभाषला हाताळणं याआधी क्वचितच कुणाला जमलं असेल. तिच्यातलं बर्‍याच वेळा दिसणारं 'ओव्हरअ‍ॅक्टिंग' आणि 'ओव्हररिअ‍ॅक्टिंग' इथं हद्दपार! लक्षात राहील असं काम तिनं केलं आहे. बाकी दिग्गज कलाकारांच्या कामाबद्दल काय बोलावं? पण ऋषीकेश जोशीचं आवर्जून नाव घ्यावंसं वाटतं. या माणसाची देहबोली, संवादफेक, लहेजा, ढंग सारंच भारी आहे.

साध्यासुध्या रेवणच्या या हलक्याफुलक्या गोष्टीशी मी ठायीटायी रिलेट करू शकलो. त्याच्या साध्यासोप्या तत्वज्ञानाने मला माझ्या कामाबद्दल विचार करायला भाग पाडलं. त्याचा प्रवास मला स्फुर्ती देऊन गेला.
मला आवडला हा सिनेमा.. तुम्हीही जरूर बघा. Happy

***

अपयश ही यशाची पहिली पायरी... धंद्यातील हे तंत्र रेवण अगदी कोळून पियालेला असतो. साध्याभोळ्या रेवणला धंद्यातील फसवेगिरी समजते पण उमजत नाही... अयशस्वीतेचा कलंक मिरवत गावोगाव भटकणारा रेवण जवळजवळ संपुर्ण महाराष्ट्र पालथा घालतो. एके दिवशी अपघाताने पोलिसांच्या तावडीत सापडतो आणि नशिबाने शेठजीच्या छत्रछायेत येतो. तेथून रेवणचे नशिब कूस बदलून योग्य मार्गला लागते. पोलिस स्टेशन ते उद्योजक आणि उद्योजक ते पोलिस स्टेशन असा मसालेदार प्रवास मध्यांतरा नंतर थोडा रेंगाळतो खरा.

गिरीश कुलकर्णीचा आणि अमृता सुभाषचा अभिनय उत्तम आहे. त्यांना सहकलाकारांची सुंदर साथ लाभलेली आहे. हृषिकेशने साकरलेला 'कल्याण' धम्माल आणतो...

'मसला टच' एकदा तरी अनुभव घ्याच :p

'प्रिमियर शो'ची संधी दिल्या बद्दल माध्यम प्रायोजकांचे धन्यवाद Happy

सर्वात पहिल्यांदा 'प्रिमियर शो'ची संधी दिल्या बद्दल माध्यम प्रायोजकांचे धन्यवाद !!!
मायबोलीवर एक दिवस 'मसाला' ह्या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या चारोळी स्पर्धे विषयी वाचले. वेगवेगळ्या तीन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. नेहमीप्रमाणे मायबोलीकारांचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि ध्यानीमनी नसताना विजेत्यांच्या लिस्ट मध्ये मला माझा आयडी दिसला. सामी, सानी, मामी असे जवळपास सारखे दिसणारे आयडी असल्यामुळे क्षणभर चुकून तर माझे नाव नाही ना अशी शंका ही मनात आली.

मेल चेक केल्यावर या बातमीला दुजोरा मिळाला आणि आश्चर्या चा सुखद धक्का बसला. मंजूडीशी बोलून चित्रपटाची वेळ, ठिकाण सगळं नक्की केले. पहिल्यांदा मायबोलीकरांना भेटायला मिळणार म्हणून आंनंद झाला.

माझ्या आयुष्यातला पहिला प्रीमिअर शो. ऑफिस मधून परस्पर जायचे असे आम्ही ठरवले होते पण वाशी वरून लोअर परेल ला पोहोचेपर्यंत ट्रॅफिकमुळे वेळ झाला आणि रेड कार्पेट इवेन्ट चुकले.
सिनेमा सुरु होण्या आधी सोनाली कुलकर्णी ने सगळ्या कलाकारांची ओळख करून दिली. देऊळ बघितल्या पासून गिरीश कुलकर्णी च्या सहज अभिनयाचे आम्ही फैन झालो होतो त्यामुळे त्याला बघून खूप छान वाटले. चित्रपटाची सुरवात होते आणि रेवण साडी विक्रेता म्हणून समोर येतो. तेव्हाच लक्षात येते कि हा विक्रेता जेवढा मेहेनती आहे तेवढाच प्रामाणिक आहे. पण याच चांगुलपणामुळे उधाऱ्या वाढत जातात आणि त्याला बायको बरोबर एका गावातून दुसऱ्या गावात देणेकरयाना चुकवत फिरावे लागते. धंद्यात नशिबाची साथ मिळाली नसली तरी बायको हसतमुख आणि धीराने साथ देणारी असते .....एकमेकांना साथ देत एक यशस्वी उद्योगपती बनेपर्यंत चा प्रवास म्हणजेच मसाला सिनेमा....

नेहमी प्रमाणे उमेश कुलकर्णी ने एक एक कैरेक्टर छान उभी केली आहेत. विक्षिप्त शास्त्रज्ञ, रेवण चा मेहुणा, मदतीचा हाथ पुढे करणारा उद्योगपती, नवरयाला मुठीत ठेवणारी सारीकाची मैत्रीण या सगळ्यांना पडद्यावर बघायला नक्कीच मजा येते. सुरवातीच्या काही प्रसंगात तोच तोच पणा वाटला.
देऊळ सारखाच भाबडा नायक गिरीश कुलकर्णीने छान रंगवलाय. अमृता सुभाष चा वावर सहज. ज्या सहजतेने रेवण सारिका ला लग्नाची मागणी घालतो ते बेस्टच. बऱ्याच वर्षांनी डॉ. श्रीराम लागूंचे दर्शन घडले. दोन मिनिटाच्या रोल मध्ये ही आपल्या सहज सुंदर अभिनयाने दाद घेऊन गेले. हलके फुलके प्रसंग छान. "आनंदासाठी नाही तर आनंदाने काम करावे " हे तत्वज्ञान खूप सोप्या पद्धतीने दाखवण्यात चित्रपट नक्कीच यशस्वी झाला आहे .
एकंदर मसाल्याचा टच चटकदार आहे...

आजच ' मसाला' चाखला. चित्रपटाची गती छान ठेवलीय. एक इंचही फिल्म अकारण नाही वापरलीय. कसलेल्या, नामवंत कलाकारांचाही अचूकपणे, नेमका व परिणामकारक वापर केला आहे. वास्तवही उगीचच भडक करून न मांडल्यामुळे मनाला अधिक भिडतं. सर्वांचाच अभिनय सहजसुंदर . क्वचितच इतकं समाधान घेऊन थिएटर बाहेर हल्लीं पडतां येतं. सर्व टिमचं मनःपूर्वक अभिनंदन व त्याना धन्यवाद.

साजिरा, सुंदर लिहीले आहेस. तंतोतंत!

परवा 'मसाला'च्या प्रीमियरच्या तिकीटाची अचानक लॉटरी लागली आणि एक हलकाफुलका साधासुधा चित्रपट बघितल्याचा आनंद मिळाला. अवखळ झर्‍याचा ओघ बघताना त्यातले दगडधोंडे, साप, बेडूक दचकवतात तसाच त्या पाण्याचा सच्छ, तळदर्शी, ओढत नेणारा खळखळाट मन मोहून टाकतो. रेवणचा कष्टाळू सच्चेपणा असाच जागोजागी अधोरेखित होत राहतो.घराण्याचं धंद्यातलं हटकून असलेलं अपयश, जुजबी शिक्षण आणि देणी एवढ्या भांडवलावर रेवण स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी जिवाचं रान करत असतो. आणि त्याचं हे विंचवाचं बिर्‍हाड पाठीवर घेऊन धावणारी हुशार, चटपटीत आणि समाधानी बायको सारिका.एका भांबावलेल्या, धडपडणार्‍या जिद्दी जोडप्याची ही कहाणी.
गिरीश कुलकर्णी, अमृता सुभाष, ह्रषिकेश जोशी, डॉ. मोहन आगाशे, प्रभावळकर यांचा सहजसुंदर अभिनय, कथेला आणखी उंचीवर नेणारं पार्श्वसंगीत, उत्कृष्ट संवाद, धावती चपखल गाणी ही या चित्रपटाची बलस्थानं.अमृताबद्दल साजिर्‍याशी सहमत. "शांत, मितभाषी अमृता" हा ही या चित्रपटाद्वारे केलेला नवा प्रयोग असेल जो कल्पनेपलीकडे यशस्वी झाला आहे. आगाशे, प्रभावळकर आणि श्रीराम लागू या महान लोकांबद्दल बोलण्याची आपलीच पात्रता नाही. ही माणसं थोर आहेत. कुठलीही भूमिका जणू त्यांच्यासाठीच लिहीली आहे अशी साकारतात. अगदी खात्री आहे, या तिन्ही भूमिकांची त्यांच्यात अदलाबदल जरी केली असती तरी कौतुकाने असेच शब्द सुचले नसते. ही मंडळी खरोखरीच मराठी नाट्यचित्रसृष्टीला नटराजाचा आशीर्वाद म्हणूनच मिळाली आहेत. Happy

तांत्रिक बाबीत फारसे काही सांगता येणार नाही. परंतु काही प्रसंग रुपकात्मक दाखवले असते तरीही चालले असते असे वाटते. पुण्यातलंच बरंचसं शूटींग असल्याने डेक्कन,भारती विद्यापीठ, पौड रोड पडद्यावर ओळखायला मजा आली. एकूणात हा चटपटीत मसाला एकदा बघून तरी घ्या!

प्रत्यक्ष चित्रपटाबद्दल लिहिलं गेलंच आहे. मी 'प्रिमियर'बद्दल लिहिते...
(माप्रा, माझी पोस्ट अस्थानी वाटल्यास सांगा. मी काढून टाकेन.)

मायबोलीमुळे प्रथमच एका प्रिमियरला उपस्थित राहण्याचा योग आला. आपल्यासारख्यांना प्रिमियरची दृष्यं, तिथलं रेड कार्पेट इ. सिनेमाच्या पडद्यावरच पाहून माहित असतं. आम्ही पोहोचलो तेव्हा कलाकार आणि सेलेब्रिटी मंडळी तिथे येऊन जुनी झाली होती. रेड-कार्पेटवर शुकशुकाट होता.
सिनेमाहॉलच्या बाहेरच्या जागेत एक छोटंसं स्टेज उभं केलेलं होतं, तिथे मसाल्याचे पदार्थ मांडून ठेवलेले होते. त्या स्टेजवर काहीतरी प्राथमिक कार्यक्रम झाला असावा. (कारण नंतर आत सोनाली कुलकर्णीनं त्याचा उल्लेख केला.) लिफ्टमधून बाहेर पडून आम्ही तिथल्या माफक गर्दीत मिसळलो आणि अनेक ओळखीचे चेहरे एक-एक करून दिसायला लागले. उमेश-गिरीश कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, हृषिकेश जोशी (मला हा कलाकार अत्यंत आवडतो), पण स्त्री-कलाकार अधिक लक्ष वेधून घेत होत्या. एखाद्या लग्नाला निघालेली असावी अशी नटलेली अमृता सुभाष, मेक-अपचे थर चढवलेली मृणाल कुलकर्णी, झगझगीत पंजाबी (की अनारकली) वेषातली सोनाली कुलकर्णी (तिच्या कडेवर तिचं बाळ अंगठा चोखत पेंगत होतं). त्यामानाने उंची, पण अ-चकचकीत साडी नेसून आलेली रेवती अधिक लक्षात राहिली. (भाषेचा प्रश्न असल्यामुळेही कदाचित ती जरा निराळी आणि एकटी बसलेली होती.)
सर्वजण सिनेमाहॉलमधे शिरलो. चित्रपट सुरू होण्यापूर्वी सोनालीनं सर्व कास्ट आणि क्रूची ओळख करून दिली. गिरीश कुलकर्णी अतिशय साधा आणि लो-प्रोफाईल राखणारा मनुष्य वाटला. स्टेजवर गर्दी झाल्यावर तो कुणाच्याही नकळत एकदम मागच्या रांगेत जाऊन उभा राहिलेला होता. सोनालीनं त्याचं नाव पुकारल्यावर (माझ्या) लक्षात आलं, की तो तिथे उभा आहे. अमृता सुभाषच्या हालचालींत जबरदस्त आत्मविश्वास जाणवत होता. (कदाचित तिनं जाणलं असावं, की तिची भूमिका सर्वात ताकदीची झालेली आहे. आणि ते खरंच आहे. तिचा या सिनेमातला अभिनय आणि तिनं त्यासाठी घेतलेलं बेअरिंग म्हणजे एक मोठा सुखद धक्का ठरला.)
इण्टरव्हलमधे अजून काही ओळखीचे चेहरे दिसले. (श्रीरंग महाजन, केतकी थत्ते, स्नेहा आजगावकर, मीना नाईक)
किरण करमरकर आणि एक उंच गृहस्थ (बर्‍यापैकी तरूण, पण बहुतेक केस पिकलेले, त्याचा चेहरा अगदी ओळखीचा आहे, पण अजूनही मला त्याचं नाव आठवत नाहीये) अचानक आमनेसामने आले. तो दुसरा गृहस्थ कि.क.ला म्हणाला - "अरे, काय म्हणतोस, किती दिवसांनी, आपण दुबईत भेटलो होतो, नाही?" कि.क.नं त्याला अर्ध्या "हो,ना"नं प्रत्युत्तर दिलं. मी त्यांच्या शेजारून जात असल्याने हा संवाद ऐकला. मनात म्हटलं, आपण फारफारतर एखाद्याला/एखादीला "आपण तुळशीबागेत भेटलो होतो, नाही?" असं म्हणू!
पण, प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर इण्टरव्हलमधे किंवा सिनेमा संपल्यावरही यांपैकी कुणालाही जाऊन आमोरासमोर भेटावं, त्यांच्याशी बोलावं असं निदान मला तरी वाटलं नाही. खरंतर, अमृता सुभाषला सांगता आलं असतं, की ‘ही भूमिका पाहून मी तुमची फॅन झाले आहे. यापुढे असंच काम करत रहा.’ पण त्या नखशिखांत नटलेल्या अ.सु.पेक्षा मला पडद्यावरची साधीसुधी अ.सु. ऊर्फ सारिका जास्त जवळची आणि परिचयाची वाटली.
अजून एक (वैयक्‍तिक) निरिक्षण म्हणजे, जुन्या पिढीतले सेलेब्रिटी कलाकार अगदी शांत आणि साधेपणाने वावरत असतात, मात्र नव्या पिढीतले सगळे तरूण कलाकार उगीचच मटकत असतात, विनाकारण आपांपसांत इंग्रजी बोलतात. हा विरोधाभास मला तिथे फार प्रकर्षानं जाणवला.

अमृता सुभाषला सांगता आलं असतं, की ‘ही भूमिका पाहून मी तुमची फॅन झाले आहे. यापुढे असंच काम करत रहा.’ पण त्या नखशिखांत नटलेल्या अ.सु.पेक्षा मला पडद्यावरची साधीसुधी अ.सु. ऊर्फ सारिका जास्त जवळची आणि परिचयाची वाटली.>>>>>>>>लले, +१

"मसाला" मायबोली माप्रामुळे अजुन एका प्रिमियरला जाण्याचा योग आला. यापूर्वी मसाल्याच्याच टिमचा सुरेख चित्रपट "देऊळ"चा प्रिमियर बघितला होता. त्यामुळे मसालाबद्दल उत्कंठा वाढली होतीच. वर बर्‍याच जणांनी चित्रपटाबद्दल लिहिलं आहे, त्यामुळे जास्त काहि लिहित नाही. रेवण, सारीका, कल्याण पासुन अगदी बभ्रुवाहनपर्यंत सगळ्यांचाच अभिनय उत्तम आहे. अप्रतिम अभिनय, उत्तम लोकेशन, सुरेख गाणी असं सगळं असुनही का कोण जाणे "मसाल्याचा" तडका मलातरी जरा कमीच जाणवला. वळु, विहिर, देऊळ पाहिल्यानंतर या चित्रपटाबद्दल कदाचित अपेक्षा वाढल्या असतील. Happy

पहिले "देऊळ" आणि आता "मसाला" या दोन चित्रपटाचे प्रिमियर पाहावयाची संधी दिल्याबद्दल मायबोली आणि चिनूक्सचे आभार. Happy

या प्रिमियरचे काहि प्रचि:

"मसाला प्रिमियर" आमंत्रण पत्रिका

मसाला पोस्टर्सः
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४
गिरीश कुलकर्णी
प्रचि ०५
उमेश कुलकर्णी
प्रचि ०६
अमृता सुभाष
प्रचि ०७

प्रचि ०८
संदेश कुलकर्णी आणि अमृता सुभाष
प्रचि ०९
मृणाल देव
प्रचि १०
कादंबरी कदम
प्रचि ११

प्रचि १२
सोनाली कुलकर्णी
प्रचि १३
सोनाली कुलकर्णीची लेक
प्रचि १४
आनंद मोडक, अवधूत गुप्ते
प्रचि १५
अवधूत गुप्ते
प्रचि १६

प्रचि १७
आनंद मोडक, अवधूत गुप्ते
प्रचि १८
बभ्रुवाहन Happy Happy
प्रचि १९
हृषिकेश जोशी
प्रचि २०

प्रचि २१
बेला शेंडे आणि ?
प्रचि २२
ज्योती सुभाष
प्रचि २३
श्रीरंग गोडबोले
प्रचि २४
किरण करमरकर
प्रचि २५
जितेन्द्र जोशी
प्रचि २६
संतोष जुवेकर आणि गिरीश कुलकर्णी
प्रचि २७
रेवती
प्रचि २८
रत्ना पाठक
प्रचि २९
रविकिशन आणि प्रविण मसालेवाले
प्रचि ३०

प्रचि ३१
एकदा तरी या मसाल्याची जरूर चव घ्या Happy

साजिर्‍या, सुंदर लिहिलं आहेस आवडलं.

जिप्सी, फोटो फारच मस्तं काढलेत. रेवती, रत्ना पाठक, मृणाल देव किती ग्रेसफुल दिस्तात!

मृ +१

जिप्सी फोटो आवडले. वेळोवेळी तू जातीने स्वतः जावून मायबोलीच्या कार्यक्रमाचे फोटो काढून आम्हाला दाखवतोस ह्यासाठी दरवेळी तुझे (आणि यो रॉक्सचे पण, तो पण बर्‍याच ठिकाणी जातो) आभार मानायला हवेत.
मा_प्रा नेटफ्लिक्सशी टायअपचे काही करता आले तर बघा ना.. आम्हालाही सिनेमे बघायला मिळतील.

जिप्सी फोटोज दिसत नाहीयेत...>>>>मल्ली, पिकासा प्रॉब्लेम असेल तुझ्याकडे बहुतेक. Happy

जिप्सी फोटोज दिसत नाहीयेत...>>>>मल्ली, पिकासा प्रॉब्लेम असेल तुझ्याकडे बहुतेक.
आत्ता दिसले... Happy
मगाशी तर शेवटी टाकलेला अमृताचाच दिसत होता.

Pages