मन पाऊस पाऊस...

Submitted by बागेश्री on 10 April, 2012 - 05:41

मन पाऊस पाऊस
चिंब अंगण- ओसरी,
कुंद गारव्याची हवा
गंध मातीचा पसरी..

मन पाऊस पाऊस
होते गालिचा हिरवा,
टेक क्षणभर तू ही
नको होऊस पारवा!

मन पाऊस पाऊस
पाणी डोळ्यांच्या द्रोणात,
अवखळ ओघळते
मंद हवेच्या झोकात!

मन पाऊस पाऊस
थेंब थेंबाने रुजतो,
ध्यास रुजे त्याच्यासवे
कोंब आशेला फुटतो..

मन झिम्माड पाऊस
आठवांची बरसात
माझ्या काजळात ओल्या
फुले उद्याची पहाट!!

मन पाऊस मेघांचा
सुटे मळभ जीवांचे
रंग आसमानी झाले
तुझ्या माझ्या नशीबाचे!

मन इतके बरसे,
दु:खं झाली मातीमोल
सल काढले खुडून
सरे पापण्यांची ओल...!

असे चित्र पावसाचे,
जणू इवला कोलाज
सार्‍या आठवणी खुळ्या
त्यांत मावल्या सहज..!

मन पाऊस पाऊस
म्हणे कसा बरसला?
अगं मनातच होता
तुला आज गवसला..!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

व्वा!...मस्त कविता! चला, मृदगंधाची जाणीव करून दिलीस; आता पावसाची वाट बघणे सुखकारक होईल. क्रांतीताईप्रमाणे माझीशी छोटीशी भेट!
गंध मातीचा उरावा
मनी, पाउल पाउल
थेंबाथेंबाने शिरावी
तुझी माझ्यात चाहूल

सुंदर सुंदर प्रतिसादांसाठी तुम्हां सगळ्यांचे आभार मित्र मैत्रिणींनो Happy

क्रांतितै तुमच्या नुसत्या प्रतिसादाने कविता भरून पावते माझी, इथे तर निवडक १०चा मान, प्रचंड आभारी आहे!
क्रांतितै आणि कोठीकरजी, छानश्या गिफ्टसाठी मनःपूर्वक आभार तुम्हा दोघांचे Happy

विनायक Proud

अहा......... तुझी कविता वाचून इथे आमच्या वाळवंटात सुद्धा सुखद हिरवाई उतरल्याचा भास झाला.
खूप खूप आवडेश Happy

सह्ही...... कालचं पावसात भिजुन झालं... आणि आज हे वाचलं.. Wink

ज्ज्ज्जाम आवडली कविता....
सुं द र..... Happy

वाह वाह... काय बरसलेत शब्द...
>>मन पाऊस मेघांचा
सुटे मळभ जीवांचे
रंग आसमानी झाले
तुझ्या माझ्या नशीबाचे!

हे तर निव्वळ "गुलजार"......

मायबोलीकरांच्या "पाऊस" अल्बम वर काम करतोय.. ही कविता घ्यायची परवानगी हवी आहे. संपर्कातून मेल करतोच आहे.
आभारी

हे बाग्ज,
clapping smiley.gif अभिनंदन ! आणि माऊ जरा मंदच टाळ्या वाजवते आहे म्हणुन ह्या जोरदार टाळ्या पण -

clapping smiley2.gif

कधी एकदा अल्बम लवकर ऐकायला मिळणार याची उत्सुकता आहे आता. Happy

मस्त !

असे चित्र पावसाचे,
जणू इवला कोलाज
सार्‍या आठवणी खुळ्या
त्यांत मावल्या सहज..!>>>व्वा!!!!! बागे कसं जमतं गं तुला इतकं गोड लिहायला... Happy

Pages