लज्जतदार-मसालेदार कैरीची कोशिंबीर

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 26 March, 2012 - 06:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१) छोट्या कैर्‍या ५-६ मोठ्या असतील तर १-२
नुसती कैरी पाहूनच तोंपासु की नाही!:स्मित:

२) १ मोठा चमचा मिठ
३) १ मोठा चमचा साखर
४) पाऊण चमचा लाल मसाला किंवा लाल तिखट
५) १ चमचा गोडे तेल

क्रमवार पाककृती: 

१) प्रथम कैर्‍यांचा सुगंध घेत घेत कैर्‍यांची साले सुरीने काढा. छोट्या कैर्‍या असल्यास त्याचे दोन भाग करून कोय काढून टाका. बाठेवाल्या असल्यास तशाच किसण्यासाठी ठेवा, किसुन झाल्यावर बाठे टाकता येतात.

२) आता कापलेल्या कैर्‍या किसून घ्या. ही प्रक्रिया करताना तोंडाला पाणी सुटणे, लहान मुलांनी मध्येच कैर्‍या पळवणे असे प्रकार होऊ शकतात. अगदीच अनावर झाल्यास एखादा तुकडा तोंडात टाका. Happy

३) किसामध्ये मिठ, मसाला, साखर टाकुन एक चमचा कच्च्या तेलाची धार सोडा (कच्च्या तेलाची म्हणजे न तापवता वगैरे). हा किस हाताने एकजीव करा म्हणजे तुमच्या हाताची चवही त्याला येईल. पण न राहवून बोटे तोंडात जाणार नाहीत याची काळजी घ्या Lol धिर असेल तर थोडा वेळ मुरवत ठेवा म्हणजे पाणी सुटेल आणि रसाळ लज्जतदार, मसालेदार कोशिंबीर तयार होईल.

हा मी अधीरपणाने न मुरवाता काढलेला तयार कोशिंबीरीचा फोटो.

अधीरपणाने काढण्याचे कारण ह्या फोटोवरून समजेलच Happy आमची बच्चेकंपनी मुरायच्या अधीच तुटून पडली होती कोशिंबीरीवर.

वाढणी/प्रमाण: 
कितीही केली तरी कमीच.
अधिक टिपा: 

विशेष टिप म्हणजे मुलांना आधी सांगूच नका हा प्रकार करणार आहात नाहीतर तुमच्या पाककृतीत मध्ये मध्ये अडथळे येतील Lol मुलेच काय काही मोठी माणसेही अडथळा आणतात घाई करुन.

जर साखर मिठाचे प्रमाण कमी वाटले तर नंतर थोडे टाकावे.

मसाला असला तरी हा प्रकार मुले आवडीने खातात.

तेल आवडत नसल्यास नाही टाकले तरी चालेल.

लाल तिखट असल्यास पाव चमचा पुरे.

माहितीचा स्रोत: 
लहानपणीचे उद्योग.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता आमच्याकडचा आंब्याचा पण सिझन संपला >>>>> अस कसे दिनेशदा, इथे तर वेगवेगळ्या देशातले आंबे १२ महिने मिळ्तात. केनिया, अफ्रिका, अगदि हापुस पण. अर्थात पिकते तिथे विकत नाहि असच असेल.

जागुतै , आप महान हो.

अगदीच तोंपासु Happy

याला आम्ही तक्कु म्हणतो. फक्त साखरेऐवजी गुळ घालायचा आणि नंतर मोहरी, हिंग, हळद आणि थोड्याश्या मेथ्या फोडणीत टाकून गार करुन घातल्यास एक मस्त स्वाद येतो.!

निवेदिता धन्स.

अंजली तू गुळ घालून करतेस तस आम्ही कैरीला फोडणी देउन कैरी थोडी शिजवतो. त्याला आम्ही रायत म्हणतो.

जागुतै . फोटो काढायचा पेशन्स नसतो ग. केल्या केल्या जेवुन मोकळी होते मी Happy

पण आता फोटुसाठी अंमळ जास्ती बनवावी लागेल...

प्रथम कैर्‍यांचा सुगंध घेत घेत कैर्‍यांची साले सुरीने काढा.>>>>>>>:)
उन्हाळ्यात आम्ही गावी जायचो तेव्हा आज्जी आजोबा झोपले की मी आणि माझे कझिन्स एकाच डिश मधे कैर्‍यांच्या फोडी करुन त्यात चमाचा भर कच्चं तेल, मुठभर चिरलेला कांदा, सुपारी एवढा गुळ, चिमुट भर मीठ आणि बचक भर लाल तिखट टाकुन हाताने कालवायचो..आणि बाहेर ओट्याच्या पायरीवर टळटळीत उन्हामधे बसुन त्या एकाच डिश मधुन ते संपवायचो.....त्याला खरबुस म्हणायचो...आम्हीच हा शब्द पैदा केला होता की तो आधिपासुन होता हे माहित नाही......

लहानपणीं आम्ही भावंडं खिशात चाकू व मीठ-तिखटाची पुडी घेऊनच डोंगरात भटकायचो. कैर्‍या, काजूचे बोंडू कापून त्याला तिखट-मीठ लावून झाडाखाली बसून खाणं हें स्वर्गसुख अनुभवलंय. [मालवण भागात या रांगड्या कोशिंबीरीला 'करमट' म्हणतात ].
अर्थात, आतां मात्र....... वयम मोठ्ठं खोट्टंम ! Sad

Pages