पावभाजी

Submitted by बिल्वा on 15 March, 2012 - 12:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१. ४-५ मध्यम आकाराचे कांदे
२. १ चमचा आलं पेस्ट
३. २ चमचे लसूण पेस्ट
४. १ मध्यम आकाराचा फ्लॉवरचा गड्डा
४. दीड- दोन कप मटार (फ्रोझन चालतील)
४. ४-५ मध्यम आकाराचे बटाटे
५. ३ हिरव्या ढब्बू मिरच्या ( अमेरिकन साईज)
६. ४-५ टोमॅटो किंवा कॅन्ड प्युरे
६. तिखट, मीठ चवीनुसार
६. पाभा मसाला चवीनुसार. ( बादशाह ब्रँड चांगला आहे. पण तो नसल्यास एव्हरेस्ट चालेल. शक्यतो ह्या दोन पैकीच घ्यावा.)
७. बटर (प्रमाण सांगत नाही) जितकं जास्त घ्याल तितकी चांगली चव मिळवाल Happy

क्रमवार पाककृती: 

१. सर्वप्रथम मटार, फ्लॉवर, ढब्बू मिरच्या धुवून घ्याव्यात. भाज्या फार बारीक नाही चिरल्या तरी चालतील. चिरलेल्या भाज्या कुकरमध्ये उकडून घेणे. अगदी गाळ नाही पण मऊ शिजल्या पाहिजेत.
२. भाज्या शिजल्या की त्यातले पाणी काढून टाकून एका पसरट भांड्यात त्या मॅश करून घेणे.
३. बटाटे उकडून घेणे. ते झाल्यावर भाज्यांमध्ये एकत्रच मॅश करून घालणे. आता ह्या बटाटे+ भाज्या मिश्रणात जेवढा अख्ख्या भाजीसाठी घालणार त्याच्या निम्मा पाभा मसाला घालून झाकून ठेवणे. मसाला मुरला पाहिजे.
४. कॅन्ड प्युरे वापरायची नसल्यास टोमॅटो उकडून ब्लेंडर मधून त्याची प्युरे करून घेणे. गाळून घेणे.
५. आता ज्या भांड्यात भाजी करायची असेल त्यात बटर घालावे. किती? त्याबद्दल वरचा थंबरूल लक्षात ठेवावा Happy तुमच्या कंफर्टलेव्हलप्रमाणे घाला.
६. ह्यात आता बारीक चिरलेले कांदे घालून परतणे. कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत आणि त्याचा कच्चा वास जाईपर्यंत न कंटाळता परतणे.
७. आलं , लसूण पेस्ट घालून पुन्हा चांगलं परतून घेणे.
८. आता ह्यात टोमॅटो प्युरे घालणे.
९. तिखट , मीठ, पाभा मसाला चवीनुसार घालणे.
१०. बटाटे+ भाजी मिश्रण यात घालून चांगलं एकत्र करून झाकण घालून ठेवणे.
११. भाजी तशी फार घट्ट होत नाही. पण तुम्हाला जास्त पातळ आवडत असेल तर त्याप्रमाणे पाणी घालायचे असल्यास घालणे. भाजी शिजू द्यावी. तश्या भाज्या शिजलेल्या असतात पण सगळे फ्लेवर्स एकत्र व्हावे यासाठी १०-१५ मि. झाकण घालून ठेवावी.
१२. आता पुन्हा थोडे बटर घालून (:)) ५ मिनीटे झाकण घालून ठेवावी.
१३. त्यानंतर गॅस बंद करून भाजी बाजूला काढून ठेवावी. व पाव भाजण्याची तयारी सुरू करावी Happy

गरमागरम पावभाजी, त्यावर बारीक चिरलेला कांदा, लिंबाची फोड आणि सोबत बटर लावून भाजलेले पाव. बेत तयार Happy

वाढणी/प्रमाण: 
साधारण वरील प्रमाणात ८-१० लोकांसाठी होते. पण किती खाणार यावर खरतर अवलंबून आहे :)
अधिक टिपा: 

*** सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे ही भाजी बटर मध्येच करावी. तेला/ तुपात करू नये. अगदीच बाहेरचे बटर नको असेल तर घरगुती लोण्यात करावी पण शक्यतो बटरच वापरावे. Happy

दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे भाज्या मऊ शिजवून घेणे. बटाटा +भाज्या मॅश करून त्यात पाभा मसाला घालून तो मुरू देणे. याने नक्कीच चवीच छान फरक पडतो Happy

अजून टीपा हव्या असतील तर मायबोलीवरचाच फक्त पावभाजीबद्द्लच्या टीपांचा धागा "चविष्ट पावभाजी कशी जमवावी?" पहायला विसरू नका.

माहितीचा स्रोत: 
मिष्टर :)
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बटाटा +भाज्या मॅश करून त्यात पाभा मसाला घालून तो मुरू देणे. >>> अरे व्वा ही टिप खरचं छान आहे.. पुढच्या वेळेस असच करेल...

तुमच्या मिष्टरांची नं. ३ ची टिप नवीनच आहे माझ्याकरता. लवकरच करुन बघणेत येईल.

>>बादशाह ब्रँड चांगला आहे. पण तो नसल्यास एव्हरेस्ट चालेल>> आपल्या आवडीनुसार हा क्रम उलट केला तरी चालेल Wink पण एम्टीआर वगैरे ब्रँड अजिबात नकोत. त्याने सांबार, रस्समची चव येण्याची शक्यताच जास्त Proud

मसाला मुरु द्यायची टिप भारी. लवकरच करुन बघणार.

पावभाजी मॅरेथॉन घोषित करुया का एक वीक एन्ड >>> आयाम इन Happy

मसाला मुरवण्याची टीप पहिल्यांदाच ऐकली. छान वाटते आहे.

एवरेस्ट सोडुन दुसरा चांगला ब्रँड कोणता?

>>>पावभाजी मॅरेथॉन घोषित करुया का एक वीक एन्ड >>> आयाम इन >> मी टू. Happy
त्या निमित्ताने पावभाजी केली जाईल. लोकांकडे गटगला इतक्या वेळा पाभा करतात ना की मला घरी तेच खायचा कंटाळा येतो. Happy पण अलिकडे बर्‍याच दिवसांत नाही झाली सो या विकांताचा बेत पक्का.

बाहेर मिळणार्‍या कुठल्याहे पाव भाजीत कांदा घालत नाहीत हि एका रेस्टॉरंट (पुण्यात) चालवण्यार्या फेमस पाभा च्या मालकाने सांगितलेलं.
कांदा हा वरूनच चिरून देतात. जसा ब.व. कांदा टाकत नाहीत तसेच हे. Happy

हो झंपी, मी पण हे बर्‍याचवेळा ऐकलयं. पण आमचे मिष्टर ह्या कुठल्या टीपा ऐकतील की नाही काय म्हाइत Happy
जर कधी मी केलीच चुकून तर मात्र बिन कांद्याची नक्की करून बघणार आहे Happy

मी कधीच कांदा घालत नाही पण मस्त होतेच. आणी कांदा घालयचाच नसतो. बाहेरच्या सारखी. Happy

कांदा घातल्याने पाभ गुळचट होते.
माझ्या एका मुंबईच्या मैत्रीणीने सांगितले की पाव भाजी म्हणे आधी मुंबईतच सुरु झाली. व तिथल्या खाउ गल्लीमध्ये असेच करतात.

माझ्याकडे एक तिची रेसीपी आहे, देवु का, देवु का?

(आधी पुंगी वाजवा). Proud

बिल्वा, तुझी मसाला मुरु द्यायची युक्ती भारी आहे. आजच केलीय पाभा. इथली आणि त्या युक्त्यांच्या बाफावर वाचून कांदा अजिबात घातला नाही, भाज्या कुकरमध्येच शिजवल्या मात्र. मी एरवी फक्त बटाटे आणि फ्लॉवर कुकरला लावायचे. ह्या पद्धतीने सोपी वाटली. पूर्वी चव मुरावी म्हणून पार्टीच्या किमान आठ तास आधी भाजी करुन ठेवायचे पण आज ताजी पण मस्त लागली मसाला मुरवल्यामुळे Happy

झंपी द ग्रेट ! कधी हार्टफर्डला तर कधी सिंगापूरला तर कधी पुण्यात असतात. कधी हिडिंबा तर कधी ध्वनी तर कधी मीरा१० असतात. इतके ठिकाणी इतक्या आयडींनी तळ ठोकल्यामुळे त्यांना सगळी माहिती अर्धवट असते. जी माहिती असते तिचे विस्मरण पण होते. एकीकडे म्हणायचं स्वयंपाक करायला जमत नाही, आवडत नाही आणि एकीकडे रेसिपी देऊ का म्हणून लाडिकपणा. जित्याची खोड जात नाही ती अशी.

हल्ली हल्लीच हे ट्राय केलंय.

भाज्या वगैरे नेहमीप्रमाणेच कुकरला शिजवून घ्यायच्या. तेलात्/बटरमध्ये कांदा, आलं, लसूण पेस्ट, टोमॅटो प्युरे परतून घ्यायची आणि मग त्यावर 'संजीव कपूरचं पावभाजी मिक्सचं' एक पॅकेट पाण्यात डायल्यूट करुन घालायचं. त्यावर नेहमीप्रमाणे पावभाजी मसाला घालून झाकण घालून शिजू द्यायचं. ह्या पावभाजी मिक्समुळे पावभाजीला मस्त लाल रंग येतो पण मसाला नसल्याने चव येत नाही त्यामुळे तो वरुन घालावाच लागतो.

Pages