वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[८ वा आणि अंतिम भाग ]
नेहमी वाचण्या बोलण्यात येणारी संस्कृत वचने ज्यात आहेत अशा सुभाषितांच्या मालिकेचा हा आठवा आणि अंतीम भाग. ज्या रसिकांनी या मालिकेचा रसास्वाद घेतला त्या सर्वांना हार्दिक धन्यवाद! ज्यांनी आवर्जून प्रतिसाद दिला त्या रसिकांमुळेच येथपर्यंत मजल मारली. त्या सर्वांना पुनश्च धन्यवाद! दैनंदिन जीवनातही मार्गदर्शक ठरणारी ही वचने आणि सुभाषिते हा एक सहज मुखोद्गत होईल असा अनमोल ठेवा आहे. तो पुढील पिढीला देण्याची जबाबदारी आपली आहे याची जाणीव करून देऊन मूळ विषयाकडे वळतो.
[*]दुर्जन: प्रियवादीच नैतद विश्वासकारणम |
मधुतिष्ठति जिव्हाग्रे ह्रदये तु हलाहलम ||
दुष्ट स्वभावाची आणि (तोंडदेखले अवाजवी ) गोड बोलणारी माणसे (मुळीच) विश्वासार्ह नसतात. या लोकांची वाणी मधाळलेली (गोड बोलणे) असली तरी त्यांच्या अंत:करणात विष (दुष्ट हेतू) दाटलेले असते.
खरं तर दुष्ट स्वभावाची माणसेच काय पण (कारण नसतांना ) वाजवीपेक्षा अधिक (स्तुती करून नि गोड बोलून )जवळीक साधणार्या लोकांपासूनही सावध राहायला हवे. माहीत असलेल्या दुष्ट माणसांपासून आपण सहसा सावध राहातोच पण या अशा सज्जनांच्या जाळ्यात सापडण्याचा धोकाही खूप भयानक असू शकतो. ,A known devil is better than an unknown angel.प्रवासातील सहप्रवासी, विक्रेते आणि आकर्षक गुंतवणुकीच्या योजना मांडणारे लोक यांच्यापासून म्हणूनच सावध राहावे लागते. या सर्व लोकांना गोड बोलावेच लागते. प्रत्येकजण लबाड असेलच असे नाही पण मधुतिष्ठति जिव्हाग्रे ह्रदये तु हलाहलम ही शक्यता ध्यानात ठेवावी हाच याचा अर्थ!
[*] ' शरीरमाद्यम खलु धर्मसाधनम ' हे वचन आपल्याला सातत्याने भेटत असले तरी जोवर आपल्याला कांही शारीरिक त्रास होत नाही तोवर आपल्याला शरीराचा पूर्णपणे विसर पडलेला असतो. त्रास व्हायला लागला की बरे होईपर्यंत आपण त्याची जरा काळजी करतो. नंतर 'येरे माझ्या मागल्या'.
खर तर आपली कर्तव्ये (धर्म) पार पाडण्यास शरीरस्वास्थ्याची केवढी गरज असते! बरे नसेल तर ठरवलेल्या सर्व गोष्टी बिघडतात. प्रवास, महत्वाची कामे रद्द करावी लागतात वा पुढे ढकलावी लागतात. खूप नुकसान होऊ शकते. स्पर्धेच्या ऐन मोक्याला आजारपण आल्याने संधी हुकल्याची शेकडो उदाहरणे आहेत. अशा रीतीने कर्तव्याचरणात शरीरस्वास्थ्याची फार आवश्यकता आहे हे ठसविण्यासाठी हे वचन फार महत्वाचे होय. पण ते आले आहे 'कुमारसंभवा'त एका नाट्यमय प्रसंगात!
शंकराला प्रसन्न करून घेऊन त्यांच्याशी विवाह करू इच्छिणार्या पार्वतीने घोर तपश्चर्या सुरु केली. तेव्हा तिची परीक्षा घ्यायला ब्रम्हचार्याच्या रूपाने आलेले शंकर पार्वतीला म्हणतात
अपि क्रियार्थम सुलभं समित्कुशं
जलान्यपि स्नान विधिक्श्यमाणि ते |
अपि स्वशक्त्या तपसि प्रवर्तसे
शरीरमाद्यम खलु धर्मसाधनम ||
" तुला धर्मकृत्यासाठी लागणार्या समिधा व दर्भ मिळत असतीलच. स्नानाला योग्य जलाशयही असतीलच. घोर तप करण्यासाठी लागणारे (शरीर) सामर्थ्यही तुझ्याजवळ असेलच. (कारण लक्षात ठेव की) शरीर हेच धर्माचरण करण्यासाठीचे खरोखरीचे मुख्य साधन आहे.
[*] 'कशाला त्या मूर्खाला उपदेश करून शक्ति वाया घालवता? त्याला उपदेश म्हणजे दगडावर डोके आपटणे आणि आणखी वाईटपणा घेणे होय!पयःपानं भुजंगानां केवलं विषवर्धनम'! असे कोणीतरी कोणाला तरी सांगतांना आपण अनेकदा पाहातो. हे शहाणपण शिकविणारे सुभाषित आहे -
उपदेशोहि मूर्खाणां प्रकोपाय न शान्तये|
पयःपानं भुजंगानां केवलं विषवर्धनम||
जसे सापाला दूध पाजले तर केवळ विषच वाढते तसे मूर्खांना उपदेश केला तर ते (उलट) रागावतात, शांत होत नाहीत.
इति अलम् ! इति अलम् ! इति अलम् !
****************************
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[१] http://www.maayboli.com/node/32396
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[२] http://www.maayboli.com/node/32495
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[३] http://www.maayboli.com/node/32548
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[४] http://www.maayboli.com/node/32602
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[५] http://www.maayboli.com/node/32686
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[६] http://www.maayboli.com/node/32754
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[७] http://www.maayboli.com/node/32766
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[८] http://www.maayboli.com/node/33075
शरीरमाद्यम खलु धर्मसाधनम -
शरीरमाद्यम खलु धर्मसाधनम - याचा संदर्भ विसरलो होतो. तो दिल्याबद्दल धन्यवाद.
पुन्हा एकदा सर्व शुभाषितासाठी धन्यवाद.
साधु साधु ...
साधु साधु
...
एका स्तुत्य उपक्रमाबद्दल
एका स्तुत्य उपक्रमाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
खूप छान मालिका होती. सर्व भाग
खूप छान मालिका होती. सर्व भाग आवडले.
दर्जेदार
दर्जेदार
दर्जेदार उपक्रम, कष्ट
दर्जेदार उपक्रम, कष्ट दिसतायत.K I U
सर्व भाग आवडले.... संग्रही
सर्व भाग आवडले.... संग्रही ठेवण्याजोगे....
मालिकेसाठी धन्यवाद....
सर्व भाग मस्त होते. मालिका
सर्व भाग मस्त होते. मालिका आवडली. धन्यवाद.