वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[६]

Submitted by दामोदरसुत on 17 February, 2012 - 06:40

वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[६]
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[१] http://www.maayboli.com/node/32396
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[२] http://www.maayboli.com/node/32495
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[३] http://www.maayboli.com/node/32548
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[४] http://www.maayboli.com/node/32602
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[५] http://www.maayboli.com/node/32686
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[७] http://www.maayboli.com/node/32766

[*] 'अति सर्वत्र वर्जयेत' हे आपण वारंवार ऐकतो, वाचतो आणि दुसर्‍याला सांगतो देखील! मराठीतील 'अति तिथे माती' ही म्हण याच वचनाचा भावार्थ सांगते. पूर्ण सुभाषितात मुद्दा ठसविण्यासाठी ज्यांनी निरनिराळ्या बाबतीत टोकाचा अतिरेक केला त्यांची उदाहरणे दिली आहेत.

अतिदानात बलिर्बद्धो , अतिमानात सुयोधन:|
विनष्टो रावणो लौल्यात , अति सर्वत्र वर्जयेत ||

अतिरेकी दानशूरते पायी (वचनात) बंदिस्त झाल्याने बळीराजा, अतिगर्विष्टपणाने दुर्योधन आणि अति स्त्रीलोभाने रावण नष्ट झाला. कोणत्याच गोष्टीमध्ये अतिरेक करू नये.

यात सुप्रसिद्ध उदाहरणे दिली गेली आहेत. पण आपल्या आसपास नीट पाहिले तर कोणत्या ना कोणत्या अतिरेकापायी अनर्थ ओढवून घेणारी शेकडो माणसे दिसतील. व्यसनांचा अतिरेक, छंदांचा अतिरेक, षोकाचा अतिरेक, अशा किती बाबी सांगाव्यात? मागे एकजण प्रसिद्धीच्या हव्यासापोटी काचा, खिळे अशा वस्तू खाऊन दाखवायचा. अशा निधड्या वृत्तीच्या माणसाने खरे तर सैन्यात जायला हवे. तिथे जिवावर उदार होऊन कामगिरी करायला सतत वाव असतो. पण नाही.
काम, क्रोध आदि षड्रिपूंचा अतिरेक तर पदोपदी आढळतो. जे असला अतिरेक टाळतात, विवेकशील असतात तेच खर्‍या अर्थाने समाजाचे आधार असतात. असे संस्कार मनावर करण्याचे काम 'अति सर्वत्र वर्जयेत' सारखी वचने करीत असतात.

[*]'अति सर्वत्र वर्जयेत' हा शहाणपणाचा उपदेश असूनही 'येनकेन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत' असे प्रसिद्धीला अतिरेकी महत्व देणारे लोकही आहेत. नेते, नटनट्या यांना असलेली प्रसिद्धीची अतिरेकी हाव आपण प्रत्यही पाहातो. 'येनकेन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत' हे सुप्रसिद्ध वचन आहे या सुभाषितात :

घटं भिंद्यात पटं छिंद्यात, कुर्यात रासभरोहणं|
'येनकेन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत'

म्हणजे मडकी फोडावीत, कपडे फाडावेत व (प्रसंगी लोकांचं लक्ष वेधण्यासाठी खुशाल) गाढवावर बसावे.
पण कोठल्या ना कोठल्या पद्धतीने माणसाने प्रसिद्ध व्हावे.

यातील उपदेशाप्रमाणे प्रसिद्धीसाठी किरकोळ कारणांसाठी कार्यालयांमध्ये घुसुन फोडफोडी करण्याच्या घटना आपण नेहमीच पाहातो.

[*] मौनं सर्वार्थसाधनम हे वचन तर आपल्या नेहमीच्याच ऐकण्याबोलण्यातील.
मूळ सुभाषित असे-

आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिका:|
बकास्तत्र न बध्यन्ते , मौनं सर्वार्थसाधनम||

याचा अर्थ असा : (मंजूळ आवाजात) बोलण्याच्या स्वतःच्याच दोषामुळे(?) राघू आणि मैना बंदिवासात पडतात. बगळे मात्र चुपचाप राहिल्यामुळे बंदिवासात पडत नाहीत. चुपचाप बसण्याने हवे ते मिळवता येते.

पोपट बोलतो आणि मैना मंजूळ आवाज काढू शकते. ही ईश्वरदत्त देणगीच त्यांचा दोष ठरतो. कारण शौकीन लोक त्यांचा आवाज ऐकण्यासाठी त्यांना पकडून कौतुकाने पिंजऱ्यात कोंडून आपली हौस भागवतात. याउलट बगळा बडबड न करता पाण्यात एका जागी उभा राहातो जणू ध्यानस्थ ऋषीच! यालाच बकध्यान म्हणतात. त्याच्या बडबड न करता स्थिर राहाण्याने मासे फसतात आणि त्याचे पायांना काठी समजून आसपास फिरतात. बगळ्याला त्यामुळे विनासायास त्यांना पकडता येते. चुप बसण्यानेच त्याला हवे ते मिळवता येते.
म्हणजे मौन बाळगणेच व्यवहारात अनेकदा उपयोगी पडते. ते केव्हा बाळगायचे त्याचे तारतम्य बाळगणे वैयक्तिक व सार्वजनिक जीवनात फार महत्वाचे ठरते. अकारण बडबड करून कार्यनाश होतो.

गुलमोहर: