घराची किंमत

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

'घरापासून दूर राहिल्यावर घराची किंमत कळते', म्हणतात.

आता, म्हणताना जरी 'घराची किंमत' असं म्हणायची पद्धत असली, तरी इथे 'घर' म्हणजे काय, तर आई-बाबा, भाऊ-बहिणी, काही आवडीचे मित्र-मैत्रिणी वगैरे सगळं आलंच. ते तर महत्त्वाचेच, पण घर म्हटलं की तितकंच महत्त्वाचं म्हणजे रोज न चुकता तिनतिनदा मिळणारा आयता पौष्टीक आहार. इष्टसमयी प्रगट होणारे चहापोहे निराळे, आणि ही कामं 'न सांगता' करून देणार्‍या 'आई' या व्यक्तीकडून आपली आवडनिवड जपली जाणं हे सगळं म्हणजेच ते 'घराची किंमत' असावं बहुधा.

'हल्ली फॉरेनला काय, कोणीही जातं' म्हणतात त्याप्रमाणे आम्हालाही काही वर्षांपूर्वी असा एक चानस गावला आणि आम्ही जपानला जाऊन पोचलो. हल्ली फॉरेनला सगळे जात असतीलही, पण आमचा 'जपानचा फॉरेन' म्हणजे काही 'खायची' गोष्ट नाही, हे प्रत्यक्षात तिथे पोहोचल्यावरच समजलं.
कारण सरळ आहे, यत्र तत्र सर्वत्र 'सामिष' जेवण. 'भारतीय जेवण मिळणारी हॉटेलं' जवळपास असतील तर ठिक नाहीतर स्वतःच्या पोटावर प्रयोग करण्याचा 'हाराकिरीचा' जिवघेणा खेळ खेळावा लागणार होता. तसं तेव्हा मला 'मांसाहारी' अगदीच काही वर्ज्य बिर्ज्य नसलं तरी तिन्ही त्रिकाळ मांसाहारी म्हणजे अगदी कल्पनेच्या पलिकडच्याही पलिकडे होतं.

तर एकदाचा जपानात पोचलो. पहिल्याच दिवशी बाका प्रसंग वगैरे नाही आला, त्याचं कारण आमची 'रोकुगोदोते गँग'. मागच्या दोन वर्षांपासून टोकियो जवळच्या रोकुगोदोते परिसरात आमचे 'सिनिअर्स' रहात होते. ते सगळेही ह्याच मार्गावरून गेले असल्याने त्यातल्या सगळ्या खाचाखोचा त्यांना माहिती होत्या. रात्रीच पोहोचलो घरी, आणि जोशी साहेबांनी मस्त उकडलेल्या बटाट्याची भाजी आणि ब्रेड भाजुन असा दोन कोर्सचा मेन्यु बनवला. तिसरा कोर्स ट्रॉपिकाना ऑरेंज ज्युसचा होता.

"आपण रोज घरीच जेवण बनवतो. इथे पिल्सबरीच्या फ्रोजन पोळ्या मिळतात. त्या आणतो आणि गरम करुन खातो. पिल्सबरीच्या पोळ्यांचं शॉर्टेज असतं. मग 'एम टी आर' च्या पोळ्या उर्फ पापड आणतो. आज खूप काम असल्यानं ब्रेड आणलाय. तसा आपण अधुनमधुन ब्रेडही आणतो. पण ब्रेड फार खाल्ला की आपलं पोट बिघडतं. म्हणून मग आणलाच कधी ब्रेड तर आपण तो भाजुनच खातो. " जेवता जेवता जोश्याचं 'इण्डक्शन' चालू होतं. जोश्या 'हार्डकोर इण्डक्टर' असल्याचं ऐकून असल्यानं मी त्याच्या हो ला हो करत गेलो.
मी उतरलो ते घर माझं 'टेम्परवरी' घर होतं आणि लवकरच मी 'आपल्या रोकुगोदोतेच्या घरी' जाईन असंही त्यानं सांगितलं.

महिनाभरानंतर शेवटी तो दिनु आला, जेव्हा मला रोकुगोदोतेला शिफ्ट व्हायचं होतं. ह्या घराबद्दल भारतात असल्यापासुन ऐकत आलो होतो. ते म्हणजे काय तिथं गेल्यावरच समजलं.

शुक्रवार संध्याकाळचे ११ वाजले होते. रात्र नाही म्हणणार, कारण जपानमधे संध्याकाळी घरी जात नसतात, रात्री उशीरापर्यंत काम चालतं. कंटाळुन गेलो होतो, पण दुपारीच जोशी साहेबांचा फोनवा आलेला असल्यानं रोकुगोदोतेला जायचं होतं. तिसर्‍या मजल्यावर घर. बेल दाबून दार उघडायची वाट बघत उभा होतो.

बाहेरच भारतीय मसाल्याचा घमघमाट सुटला होता. आत गेलो, तेव्हा मुदपाकखान्यामधे गॅस बारिक करून कांदाबटाट्याचा रस्सा शिजवला जात होता. भाजी होतच आली होती आणि म्हणूनच दुसर्‍या शेगडीवर मिल्या फ्रोजन पोळ्या शेकत होता. एका प्लेटमधे त्याची थप्पी बनवत होता. संकेत ओरकूटवर बसलेला होता. घर घर म्हणतात त्यातल्या काही गोष्टी, आज दूरदेशी जपानमधे मला मिळाल्या होत्या...

तेव्हा युट्युबवर का कुठेतरी प्रशांत दामले गात होता, 'मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं?'
त्याचं उत्तर आज माझ्यापुरतं तरी 'गरमागरम कां-ब रस्सा, आणि पिल्सबरीच्या पोळया!' हेच होतं.

दपारचे चार वाजले तसा कर्ता परत उठला. "मित्रांनो, चला. आता आपण सगळ्यांनी चहा करायचा आहे."
त्यानं एक भांडं उचललं, त्यात तीन कप दूध आणि थोडंसं पाणी घालून गॅसवर ठेवलं. "हं..." संकेतकडं बघत.
संकेत उठला आणि त्यात साखर आणि थोडा उकळल्यावर चहापूड घातली. "हं..." माझ्याकडं बघत.
मग मी उठून चहा गाळून सर्वांना दिला. "हं" कर्त्यानं मिल्याकडं बघितलं.
मिल्यानं "बर.." म्हटलं.

पण जेवणा-खाण्यानंतर सगळे प्रश्न संपत नसतात हा अजुन एक बोध, अजुन होयाचा होता. "साग्रसंगित जेवणानंतर पडणारी साग्रसंगित भांडी". ती सोच्छ कोण करणार? उत्तर सरळ होतं, "जेवण न बनवू शकणारे!"
म्हणून मग 'जेवण बनवणं' टूडू लिस्टीवर आलं.

आमच्या मिल्याला खरं तर जेवण बनवता येत असे, पण कर्त्या धर्त्या जोश्याच्या धतिंगमुळे त्याला भांडी घासायला लागत. "मला कुठलंही काम करायला घाण वाटत नाही." मिल्या म्हणे, "हे बेसिन. किती घाण झालंय? कोणी हात घालतंय का ह्यात? मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण नेहेमी मीच का? " मिलवा हातात रबरी मोजे घालून घाण काढत म्हणे.. काही गोष्टींना इलाज नसतो.

* * * * * * * * *

पण नव्याची नवलाई संपणारच होती. सगळ्यांना अतिकाम लागणारच होतं. घरी येणं उशीरा उशीरा होत जाणार होतं आणि काही महिन्यातच आमचा सुगरण 'जोश्या' देशात परत जाणार होता.
त्याप्रमाणं सगळं झालं. कंपनी बदलली, घरही बदललं. नवीन घरात आम्ही तिघे असू, भाऊसाहेब मी आणि बज्या. अजुन एक पडिक मेंबर म्हणजे योग्या. नवीन घरात शेवटी तो दिनु आला, ज्या दिनुला आमचा मुदपाकखाना माझ्या आगमनानं पावन होणार होता.

माझी आई एकदम सुगरण.
म्हणजे, तीनं केलेलं गुलाबजाम हसत नाहीत. बेसनाचे लाडु बसत नाहीत.
करंज्यांचा खुळखुळा होत नाही, की तीनं बनवलेल्या चकल्या गार झाल्या की लांबलचक वायर होत नाहीत.
अशा आईचा सुपुत्र म्हटल्यावर खुद्द त्या 'किचनाला' माझ्याकडून फारा अपेक्षा होत्या.
पण पहिल्या खेपेला मात्र मी पार अभिषेक बच्चन परफॉर्मन्स दिला.

काहीतरी सण होता त्या दिवशी. सणाला गोडधोड म्हणून जवळच्या भारतीय दुकानातुन शेवया आणल्या.
दुध भरपूर आटवलं, साखर घातली. चव छान आली होती, मग मी त्यात शेवया टाकल्या. न भाजता.

'होतं अरे पहिल्यांदाच करताना' आई फोनवर सांगत होती.
अर्धा लिटर शेवयाचा खीर गोळा मग मी एकट्यानंच संपवला होता. पोट बिघडल्याचं तिला अजून सांगितलेलं नाही. पण त्या निमित्ताने एका शेवईत दोन पक्षी मारले होते, 'मॅगी आणि शेवया दिसायला सारख्या असल्या तरी कृती वेगळी' हा धडाही मिळाला होता आणि लगे हाथ कानाला खडाही लागला होता.

आमचा हक्काचा सुगरण जोश्या देशात गेल्यावर एखादा धोपट प्रयोग करणं भाग होतं. आम्हाला लवकरच उत्तर मिळालं होतं, शा.खि. च्या रुपात!

"अरे नुसत्या डाळ-तांदुळ खिचडीमधे काही नसतं, त्यात बीन्स घालत जा. -- नाहीतर मश्रुम्स घालावेत. -- गाजर चांगलं. -- कॉर्न घाल -- अरे त्यापेक्षा व्हेज चिकन घालत जा नाऽ" सोयाबिनला पुढे करत कोणीतरी म्हटलं होतं. हे सगळं घालून एका रविवारी शाही खिचडी केली, ज्यात जोशी इष्टाईल बचकाभर बिर्याणी मसाला घातला. असा काही घमघमाट सुटला त्याचा, की 'गरम-बीरम' सगळं सोडून, चमचा टाकून डायरेट हातानं जेवायला सुरु! त्या रात्री तृप्त पोटानं झोपलो होतो तिघंही... ठरलं होतं, 'आता आपलं राष्ट्रीय खाद्य-शाही खिचडी!'

गणित कसं, ठराविक पद्धतीनं केलं की बरोब्बर सुटतं. आमच्या शा.खि.चं मात्र तसं होईना. म्हणजे रंग तोच असे, 'फिका फिका'. आता खरं तर बचकाभर मसाल्यामुळं रंग यायला हवा खरा, पण भाऊसाहेबांच्या 'अति-मसाला टाळा, पोट सांभाळा! 'या एककलमी धोरणापुढे आमचा जोर फिका पडला होता. शा.खि. ही चवही तशी थोडी उन्नीस बीस. कधी मीठ कमी तर कधी जास्त कमी. हां, मीठ जास्त मात्र कधी होत नसे. अधुनमधुन असं चालू होतं.

मग परत एक सण आला,"रक्षाबंधन"! कानाच्या खड्याला आणि बिघडलेल्या पोटाला स्मरून गोडधोड करायचा बेत आधी रद्द केला. त्या दिवशी मात्र अचानकच ढग दाटून आले होते. थोड्याच वेळापूर्वी बाहेर शांत निवांत आसमंत होतं आणि आता पाहतो तर काय? धो धो पाऊस.. "पाउस असा, रुणझुणता. पैंजणे सखीची स्मरती... " -संदिप-सलिल. 'सखी' कुठे स्मरता, रक्षाबंधनाचा दिवस होता. पण इथे जपानात नारळी भात कुठे मिळायला?? म्हणून म्हटलं, चला! आपण आपलं " भजं न " करावं?!

आईन दिलेलं डाळिचं पीठ काढलं. बरोबर होता:- ओवा आणि खाण्याचा सोडा. मग काय? चिरला कांदा, भिजवलं पीठ. तापवलं तेल आणि झालं भजं! उत्साहाच्या भरात तिखटच घालायचं विसरलो होतो, ते घातलं. खेकडा भजी करायचा पिलान होता. पण या खेकडयाने आधीच का नांगी टाकली होती, कारण मी पीठ भिजवताना त्याच्याशी ज़रा जास्तीच कुस्ती केली होती. म्हणून दुसऱ्या lot ला मग जास्ती न छळता, प्रेमाने भिजवलं गेलं.. मधेमधे काही चुका कळत होत्याच, भांडं ज़रा मोठं घ्यायला हवं होतं. - ह्या छोट्या पातेल्यात एका वेळी तीनच भज्या. - पाणी जरा जास्ती झालंय, पीठ वाढवा. कोरडं झालंय, कांदा वाढवा, असं करत करत, दीड तासाने सगळ्या पिठाचं एकदाचं भजं झालं! महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त एकदाच चटका बसला..ते म्हटलं आहे ना? आधी हाताला चटके, मं गं ? मं गं मिळतं रे भ जंऽऽ

मी आणि भाऊसाहेब असे अधुनमधुन विविध प्रयोग करु लागलो असताना आमचा बज्या मात्र थंड असायचा. पण मग तोही पेटला एकदा. "मी करतो आज"! म्हणत त्यानं ट्रंकेतून का कुठून 'अन्नपूर्णा'च काढलं एकदम! शा.खि. साठी अन्नपूर्णा काढणार्‍या बज्याला आम्ही दोघांनी उभ्याउभ्या शि.सा.न.वि.वि. केला.
'फोडणीत हळद आधी का मोहरी??' तो म्हटल्यावर मी आणि भाऊसाहेब एकमेकांकडं बघतच बसलो, "की फरक पेंद्या??" त्यानं गॅस मोठा करून फोडणी घातल्यामुळे त्या दिवशीची 'जिरा' शा. खि. कारळं घातल्यासारखी दिसली. आम्ही ती गोड मानून खाल्ली.

ते पाण्यात पडलं की माणूस हातपाय मारतो, मग पोहता येतं म्हणतात. तसंच झालं. ७-८ वेळा उन्नीस बीस झालेली शा. खि. नंतर मात्र हमखास जमू लागली. भाताचा अंदाजही चुकेना, एकमेकांना आग्रह न करता शा.खि. संपू लागली. एकदा घरी आलो, तर बज्यानं चक्क साबुदाणा भिजवून ठेवला होता आणि अन्नपूर्णा बघत पडला होता. जीममधुन परत आलो तोवर ह्या खिचडी सम्राटानं झकास सा.खि. बनवली होती. कुठून तरी कोथिंबीर पैदा केली होती. मग काय, मंडळाचा उस्साह दुणावला आणि आम्ही नवनवे प्रयोग करण्याला प्रेरित होऊ लागलो.

नोव्हेंबर महिना होता बहुतेक, जेव्हा भाऊसाहेबांना फिटनेसचं वेड लागलं.
"भूक व्यवस्थित आहे ना रे?" या आमच्या नेहेमीच्या प्रश्नाचं उत्तर तो "हं हं हं. माझी भूक आता व्यवस्थित आहे. आणि म्हणूनच मी आज रात्री जेवणार नाहीये." देऊ लागला होता. आपल्या मराठीत सांगायचं तर "उगाच माजला होता."

पण साथीच्या रोगाप्रमाणं मलाही फिटनेसचं वेड लागलंच आणि जीमबरोबर मी जपानी लो-कॅलरी पदार्थ बघू लागलो. कूकरी शो बघू लागलो. त्यात पाहून तोफू - उदोन - ब्रोकोली - तेनकोन उकडून खाऊ लागलो. तोंडाचं पार भजं झालं.

त्या दिवशी दुपारी जेवता जेवता डी डी एल जे बघत होतो. त्यात अमरीश पुरी, आपली बायको फरीदा जलाल हिला पंजाबहून आलेलं आपल्या मित्राचं पत्र दाखवत, त्याला कसा "पंजाबी मिटटी का वास है" वगैरे सांगत असतो.
मला कालच घरुन आलेल्या पार्सलची आठवण झाली. जेवलो आणि मग त्यातला सगळ्यात वरचा बॉक्स काढला. काय असेल? बघून काही कळत नव्हतं, समजेल असा काही वासही नाही..

"डिन्काचे लाडु?"
नेहेमीप्रमाणे आईनं "अरे, थोडंच देते." म्हणून केवढं पार्सल दिलं होतं. पोस्टमनकाकांचे परत एकदा (मनोमन) आभार मानले. तेवढ्यात बाजूला एक गोळयांचं पाकिट दिसलं. "बी कॉम्लेक्स च्या १० गोळयांचं" पाकीट होतं.

"डिन्काचे लाडु फार उष्ण असतात, हाय कॅलरीज! तस्मात. फार तर ५-६ लाडु पाठव." असा काहीतरी हुशारीचा सल्ला मी आईला दिला होता. आई शप्पथ! पण आमचे डॅड ग्रेट आहेत! जास्ती लाडु आणि उष्णतेवरच्या गोळ्या. "खा लेकाच्या." याला म्हणतात, एका गोळीत दोन पक्षी. मी लाडवाचा एक घास घेतला आणि सगळा माज उतरला.

"त्यात घातलेले खजूर, काजू, बदाम, खोबरं, गुळ (आमचा कोल्हापुरी!), जायफळ, इलायची आणि डिंक! सारं समोर ताटात घेऊन बसलेली आई, आणि शेजारी मी." एकदम असंच दिसलं. अजुन एक लाडू लगेच आईला फोन!
"लाडु लय भारी झालेत! " ४१९३ मैल, ६७८४किलोमीटर, ३६४३ नोटीकल मैल अंतरावरून येणार्‍या लाडवांचा एक घास खाऊन एक गोष्ट लक्षात आली, की हीट, कॅलरीज वगैरे सगळं या प्रेमापूढे शून्य आहे. त्यातल्या कॅलरीज मोजायच्या नसतात, नव्हे मोजताच येत नाहित!

पण असं पार्सल रोज थोडीच येणारे? तेव्हा आम्हाला वाचवायला यायचे ते आमचे लगिन झालेले मित्र आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या बायका. त्या खरेच सुगरण होत्या. कामावरून परत येऊन आठाठ-दहादहा लोकांचं जेवण बनवणं आणि तेही हसतमुख राहून! वर आग्रह. वाढदिवसादिवशी आमंत्रण आणि पार्टी! कर्तव्य आमंत्रण आणि मनापासुनचं यातला फरक लगेच समजतो. त्यामुळेच या लोकांचं मनापासुनचं आमंत्रण मिळालं की छान वाटत असे.

घरापासून ७०००किलोमिटरवर राहिल्यावर स्वतःच्या घराची 'किंमत' समजली तर होतीच, पण आपली अशी काही नवी किमती घरंही मिळाली होती. लांब राहिल्यानं थोडंफार जेवण बनवायला शिकलो खरे, पण जेवणामागची आणि जेवणानंतरच्या आवराआवरीची ही किंमत घरी राहून बहुतेक समजली नसतीच कधी.
शेवटी जेवण काय हॉटेलातही मिळेल, पण 'किंमत किंमत' म्हणतात, ती म्हणजे जेवणापेक्षा त्यामागच्या भावनेची असावी. म्हणूनच त्या किमतीबद्दल म्हणावसं वाटतं, "दाने दाने पे लिखा है, देने वाले का नाम!"

- ऑगस्ट २०११ च्या "माहेर" मासिकात पूर्वप्रकाशित.

प्रकार: 
शब्दखुणा: 

हे ही र्‍हायलच वाचायच.

बर्याच दिवसांच्या गैरहजेरीचा परीणाम.

मस्त लिहिलायस मित्रा. पण ते घर वगैरे 'आई' च्या बाबतीतच शक्य असतं बर्का. Proud

(घे. आता लाईन लागेल ह्या पानावर)

|| खिचडी ||

>> मला अगदी या लेखाचा दुसरा भाग लिहावासा वाटतोय.
लिहून टाक नताशा Happy नेकी और पुछ पुछ...

>> मी पण डब्बा उघडतो.. काय आहे बघतो एकदा नजर टाकून.. मुगाचे नाहीतर रव्याचे लाडू असतील...
सेनापती, डब्यात काय होतं ? Proud

(एकच वाक्य सोडून- अभिषेक बच्चन परफॉरमन्स! त्या वाक्याचा निषेध! )
>> बरं बाबा फरदीन खान परफॉर्मन्स.. किंवा बॉबी देओल.. किंवा तो लव स्टोरी वाला कोण तो.. जावद्या.. Proud

@सर्वजण,
आभार्स!
-ऋयाम. Happy

खुपच छान लिहिलं आहे..
शा.खि अन भजं हे प्रसंग अन.. <<जास्ती लाडु आणि उष्णतेवरच्या गोळ्या. "खा लेकाच्या." याला म्हणतात, एका गोळीत दोन पक्षी.>> मनाला स्पर्श करुन गेले.. खरच आहे दुर गेलं कि कळते सगळ्याचिच किंमत.

हं...छानच लिहिलंय! बर्र झालंय हल्ली मुलांना शिक्षणाच्या/नोकरीच्या निमित्ताने दूर जावं लागतंय!!
त्यामुळे घरात राबणा-या अन्नपूर्णेची किंमत कळतेय!! नाहीतर वर्षानुवर्षे करतायत आपल्या रांधा वाढा उष्टी काढा! Happy

क्या बात है रे ऋयाम. मस्त. मस्त.
साधे जेवण ते काय, पण 'उदरभरण नोहे' ते तिथेच राहुन कळते.

बागुलबुवा,
नाईस ट्राय.

ऋयाम, नताशा मलापण मागेच || खिचडी || साठि लिहावेसे वाटत होते.
|| खिचडी || साठी एक नाव मी कधीच विसरु शकत नाहि ते म्ह्णजे रत्नागिरितील योजक कंपनीच ready to eat मूगाच्या खिचडीच पाकिट आणि गोड लिंबू लोणचे.

माझ्या भावाच्या रत्नागिरितील मेत्रिणिने पहिल्यांदा आम्हाला बंगळूरला मूगाच्या खिचडीच पाकिट आणि गोड लिंबू लोणचे courier kela hota.

मूगाच्या खिचडीच्या पाकिटात मूग, तांदूळ, मीठ, तेल, कढिपत्ता, हिरवी मिरची, मसाला, सर्व मिक्स असत. त्यामूळे खिचडि बिघड्ण्याची अजिबात शक्यता नाहि. Happy

१ वाटि हे मिश्रण घ्यायच आणि २ वाटि पाणी मिक्स करुन कुकरला तिन शिट्या द्यायच्या.
गर्मा गरम खिचडिवर साजूक तूप घालून, तोंडि लावायला गोड लिंबू लोणचे सोबत नंदिनी किंवा अरुणच आईस्किम असा आमचा वि़कांत असायचा. Happy

अजून एक प्रकार जो आईकडे असताना खायची गरज पड्ली नाही, वेळ आली नाहि आणि मला कधी आवडला पण नाहि तो म्ह्णजे २ मिनट च maggie. पण नोकरीसाठि घ्ररापासून दूर गेल्यावर आजारपणात रात्री दोन वाजता माझ्या भावाने मला maggie बनवून दिली होती.

त्या नंतर imergency food म्ह्णून फूड्ल्स, आणि हल्ली सनफिस्ट मसाला नूड्ल्स आणून ठेवते. Sad

ऋयामा, प्रत्येक वाक्याला अगदी अगदी म्हणून झाले रे! लाडवांनी तर टडोपा वगेरे..
ते शा.खि. अजूनही आमचं राष्ट्रीय खाद्य आहे नी राहीलही Wink

> त्या नंतर imergency food म्ह्णून फूड्ल्स, आणि हल्ली सनफिस्ट मसाला नूड्ल्स आणून ठेवते.
सेम!

>> (पण आता अगदी एक्स्पर्ट झाला असशील नै !)
स्वतःवरून भूताची परी़क्षा Uhoh Light 1 Proud

>> त्यामुळे घरात राबणा-या अन्नपूर्णेची किंमत कळतेय!! नाहीतर वर्षानुवर्षे करतायत आपल्या रांधा वाढा उष्टी काढा! >>
खरं आहे!!!

@सर्वजण,
आभार्स!
-ऋयाम. Happy

छान लिहिले आहेस. मी कॉलेज संपेपर्यंत किचनमधे पाय ठेवला नव्हता. बेलापूरमधे एकटीच राहत असताना रूमी चांगलं जेवण बनवायची. त्यामुळे लग्नानंतर किचन माझ्या ताब्यात आल्यावर माझी पूर्ण वाट.

आता कुठे जरा जरा शिकतेय. Happy इथे मंगळूरमधे आल्यावर ताजे गव्हाचे पीठ ही किती आवश्यक बाब असू शकते हेसमजलं. तुमची परदेशात तर त्याहून वाईट हालत होत असेल ना?

लय भारी..

पण ऋयामा, मला यात वेगळाच वास येतोय. Happy कसला बेत शिजतोय नक्की ? Wink हे वरचं सगळं म्हणजे सुतोवाच आहे ना लब्बाडा ?

१ वाटि हे मिश्रण घ्यायच आणि २ वाटि पाणी मिक्स करुन कुकरला तिन शिट्या द्यायच्या.
गर्मा गरम खिचडिवर साजूक तूप घालून, तोंडि लावायला गोड लिंबू लोणचे सोबत

>>> वाचता वाचता एकदम तोंडात पाणी जमा झाले... Lol

Pages