मायबोली - शीर्षकगीत : प्रकाशन

Submitted by Admin-team on 30 January, 2012 - 20:49
मायबोली शीर्षकगीताचे प्रकाशन ही सर्व मायबोलीकरांसाठी व विशेषत: या गीताच्या निर्मितीशी संबंधित सर्वांसाठी अत्यंत आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. या उपक्रमाच्या सुरुवातीपासून सहभागी असणार्‍या सर्व मायबोलीकरांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे हार्दिक अभिनंदन. या शीर्षकगीताची जी छोटी झलक होती, तिला जसा तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात, तसेच या संपूर्ण गीतालाही तुम्ही आपलेसे कराल, अशी आशा आहे.
-मायबोली.कॉम


मायबोली शीर्षकगीत ऐका:
या उपक्रमाचे मुख्य संयोजक योगेश जोशी यांचे मनोगत:
हे गीत खर्‍या अर्थाने मायबोलीकरांचे गीत असावे आणि त्याला जागतिक स्वरूप असावे ही संकल्पना प्रत्यक्षात साकारताना मुख्यत्वे तीन गोष्टींना प्राधान्य दिले होते. गीतकार उल्हास भिडे यांनी लिहिलेल्या अतिशय दर्जेदार गीताला व त्यातील शब्दांना न्याय देणे, या गीताला दिलेल्या संगीत साजाला न्याय देणे, आणि यात सहभागी झालेल्या मायबोलीकरांच्या प्रयत्नांना न्याय देणे. दर्जात कुठलीही तडजोड न करता या सर्वांचे संतुलन राखणे ही एक प्रकारे तिहेरी कसरतच होती. शिवाय हे गीत ऐकणार्‍याच्या ओठी सहज बसेल, मायबोलीकरांना सहज गुणगुणता येईल, खेरीज हे गीत सर्व "मायबोलीकर" वा मायबोलीकर नसलेल्या सर्वांच्या मनात रुजेल, अशा प्रकारे त्याला संगीतबद्ध करायचे हेच उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून पुढील वाटचाल करायचे ठरवले होते. या गीताशी संबंधित सर्वांचे संपूर्ण सहकार्य व सहभाग केवळ यांमुळेच ही कसरत शक्य झाली आणि एकंदरीत मायबोली शीर्षकगीत कुण्या एकाचे न राहता सर्वांचे झाले हेच या गीताचे यश म्हणावे लागेल. किंबहुना यातील सहभागी ज्येष्ठ मायबोलीकरांचे शुभाशिर्वाद, समवयस्क मायबोलीकर गायकांचे प्रोत्साहन, बालगोपाळांनी आपल्या सुरांतून गुंफलेले मोती, सर्वांच्या कुटुबियांनी दिलेला पाठींबा, आणि मायबोली संस्थापक व अ‍ॅडमिन टीम यांनी वेळोवेळी केलेली मदत व मार्गदर्शन या "पंचम" संगमातून हे गीत जणू परिपूर्ण झाले आहे. ज्यांचे संगीत ऐकून आमच्या पिढीची कर्णेंद्रिये "सूर" समजू लागली आणि नादब्रह्माचे माझे दैवत- पंचम दा (आर.डी. बर्मन) यांचा जणू अशाप्रकारे आशीर्वाद या गीताला लाभला आहे असे मी मानतो.

यातील सहभागी जवळ जवळ सर्वच मायबोलीकर (एक दोन अपवाद वगळता) हे व्यावसायिक गायक नाहीत. त्या सर्वांनी आपापले दैनंदिन व्यवसाय, घर, जबाबदार्‍या हे सर्व संभाळून या गीतासाठी केलेली मेहनत व सर्व प्रकारे केलेली मदत, या सर्वाचे मोल माझ्या लेखी अधिक आहे. जगाच्या वेगवेगळ्या भागात वा शहरात राहणार्‍या तरीही "मायबोलीकर" या एका नात्याने एकाच मायबोली कुटुंबाचे सदस्य असलेल्या अशा या गीताशी संबंधित सर्वांचे योगदान याला "मायबोली स्पिरीट" असे म्हटले तर वावगे ठरू नये.

या जागतिक मायबोली गीताचा गेले जवळ­जवळ पाच महिने सुरू असलेला अद्भुत प्रवास आज अंतिम मुक्कामी पोहोचला आहे. या संपूर्ण प्रवासात या गीतातील प्रत्येक शब्द या गीताशी संबंधीत सर्वांनीच अक्षरशः जगला आहे हे सर्वांच्या अनुभव लेखनातून स्पष्ट होते.

या शीर्षकगीताच्या विस्मयजनक वाटचालीचे व्यापक स्वरूपः
जगभरातील पाच देशातील विविध शहरांमध्ये स्थायिक असलेले आणि वय वर्षे चार ते साठ या वयोगटातील असे २१ मायबोलीकर गायक, संगीतकार, संगीत संयोजक व वाद्यवृंद. मुंबई, पुणे, दुबई या शहरांतील स्टुडियोंमध्ये व ईंग्लंड, अमेरिका, कुवेतयेथिल मायबोलीकरांनी घरीच केलेले ध्वनिमुद्रण, अनेकविध वाद्यांचा वापर, तसेच आंतरजालावरील इमेल, वेबचॅट, स्काइप, सारख्या तत्सम तंत्रांच्या सहाय्याने या गीताच्या शब्द, सूर यांची झालेली देवाणघेवाण, सरावसत्रे, आणि शेवटी आंतरजालावरच (मायबोली.कॉम) या गीताचे होणारे प्रकाशन.

जवळ जवळ पंधरा वर्षांचा इतिहास व दर्जेदार साहित्यिक परंपरा असलेल्या "मायबोली.कॉम" या संकेतस्थळाची आजवरची ओळख ही "मायबोलीशी नातं सांगणार्‍या जगभरच्या पाऊलखुणा" अशी असली तरी या मायबोली शीर्षकगीतामुळे आजपासून "आंतरजालाच्या जागतिक नकाशावर मायबोलीच्या पाऊलखुणा" आता कायमस्वरूपी कोरल्या गेल्या आहेत, असेच एक मायबोलीकर म्हणून म्हणावेसे वाटते.

मायबोलीच्या इतिहासात या शीर्षकगीताच्या रूपाने फूल ना फुलाची पाकळी म्हणून एक कायमस्वरूपी ठेव या गीताशी संबंधीत सर्वांच्या नावाने कायम राहील या भावनेने नतमस्तक व्हायला होते आणि मायबोलीचा अभिमान वाटतो.

वर म्हटले तसे मुळात गीताचा आत्मा श्रीमंत आहे. त्याला सुरात साकारणारे कलाकार यांचे प्रयत्न व कार्यासक्ती तितकीच उल्लेखनीय आहे. त्यामुळे जर काही दोष, उणीव असेल तर या गीताचा संगीतकार व या टीमचा एक प्रतिनिधी या नात्याने त्या जबाबदारीची मला संपूर्ण जाणीव आहे. खरे तर कुठलीही कलाकृती (गीत, संगीत, चित्र, इ.) ही जास्ती जास्त वाचक, श्रोत्यांपर्यंत पोहचावी हेच कुठल्याही कलाकारासाठी सर्वात महत्वाचे असते. कलाकाराचा आणि त्याचबरोबर कलेचाही विकास होण्यात ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे यात दुमत नसावे. मायबोलीने असे जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याने आज हे गीत शब्दशः सातासमुद्रापार पोहोचले आहे. एखाद्या कलाकाराला अधिक काय हवे?
बाकी रसिक श्रोता हाच मायबाप सरकार असल्याने त्याचे मत, अभिप्राय, आवड, निवड सर्वच शिरसावंद्य!

मायबोली शीर्षकगीत हे निव्वळ गीत नसून एक विचार आहे, संकल्पना आहे, अनुभव आहे, अभिव्यक्तीचे प्रकटीकरण आहे. म्हणूनच निव्वळ शब्द, सूर, ताल, लय या चौकटीत न अडकता हे गीत रसिक श्रोत्यांच्या मनाच्या संवेदनातून हृदयाच्या गाभार्‍यात वसेल अशी प्रामाणिक सदिच्छा व्यक्त करतो.

-योग (योगेश जोशी)


वरील गीतातील गायक क्रमः (मूळ गीत ईथे आहे.)
[मायबोली.....] (भुंगा)
भाषा मराठमोळी, हर अंतरी फुलावी
घेऊन ध्यास आली उदयास मायबोली (अनिताताई, योग)
भाषा मराठमोळी, हर अंतरी फुलावी
घेउन ध्यास आली उदयास मायबोली ║धृ║ (समूह- मुंबई, पुणे, दुबई)

मिटवून अंतराला, जोडून अंतरांना
ही स्नेहजाल विणते, विश्वात मायबोली (अगो व पेशवा)
[विश्वात मायबोली] (भुंगा) ||१||

सदरांच्या पदरांनी, प्रत्यंगी नटलेली (अनिलभाई)
सदरांच्या पदरांनी, प्रत्यंगी नटलेली (अंबर व जयवी)
साहित्य वाङ्मयाची, ही खाण मायबोली (सई) ||२||

[युडलिंग (योग) आणि कोरस (अनिताताई, रैना)]

सार्‍या कलागुणांना, दे वाव मायबोली (प्रमोद देव व रैना)
सार्‍या नवोदितांची, ही माय मायबोली (प्रमोद देव, व रैना)
सार्‍या नवोदितांची, ही माय मायबोली (देविका, कौशल, सृजन व समूह- विवेक देसाई, भुंगा, प्रमोद देव)
ही माय मायबोली (सृजन)
भाषा मराठमोळी, हर अंतरी फुलावी (दिया व समूह)
घेउन ध्यास आली उदयास मायबोली (दिया व समूह) ||३||

चर्चा, मतांतरांची, अन् वादविवादांची (वर्षा व अनिताताई)
[मधले संवाद- भुंगा, रैना व योग]
चर्चा, मतांतरांची, अन् वादविवादांची (मिहीर)
परिणती सुसंवादी, घडविते मायबोली (मिहीर व समूह- विवेक देसाई, भुंगा, प्रमोद देव)
परिणती सुसंवादी, घडविते मायबोली (अनिताताई, सई, स्मिता, पद्मजा) ||४||

सहजीच जीवनाचा, अविभाज्य भाग झाली (योग व सारिका)
[हार्मनी समूह-भुंगा, प्रमोद देव, विवेक देसाई, पद्मजा, सई, स्मिता]
अमुच्या मनी विराजे, अभिजात मायबोली (योग, सारिका व सर्व गायक)
अमुच्या मनी विराजे, अभिजात मायबोली (पुरूष व स्त्री गायक)
अभिजात मायबोली (सर्व) ║५║

मायबोली.. (सर्व गायक)


संपूर्ण श्रेयनामावली:
गीतकारः ऊल्हास भिडे
संगीतकारः योग (योगेश जोशी)
गायकः
मुंबई: रैना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई(अनिता आठवले), प्रमोद देव, भुंगा (मिलींद पाध्ये), सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)
पुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)
दुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका टेंबे (सौ. योग), दिया जोशी (योग व सारिका ची मुलगी), योग (योगेश जोशी), वर्षा नायर
कुवेतः जयवी-जयश्री अंबासकर
इंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)
अमेरिका: पेशवा (जयवंत काकडे), अनिलभाई (अनिल सांगोडकर)
वाद्यवृंदः प्रशांत लळीत, विजू तांबे, ऊमाशंकर शुक्ल, जगदीश मयेकर, योग
संगीत संयोजकः प्रशांत लळीत
ध्वनिमुद्रण तंत्रज्ञः
  • नदीम- ईंम्पॅक्ट स्टुडीयो, सांताक्रुझ, मुंबई.

  • जयदेव- साऊंड आइयडीयाझ, एरंडवणे, पुणे.

  • संजय- नेहा ऑडीयो ईफेक्टस, दत्तवाडी, पुणे.

  • मेरशाद- अल शिबाक मुझिक सेंटर, दुबई.

मायबोली विभाग समन्वयकः दक्षिणा (पुणे), प्रमोद देव (मुंबई), अनिलभाई (अमेरिका)
झलक ऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR) निर्मिती: maayboli.inc

*****

डाऊनलोड / Download:

मायबोलीचे शीर्षकगीत तुम्ही या दुव्यावरून तुमच्या संगणकावर/MP3 प्लेयरवर उतरवून घेऊ शकता.

रिंगटोनः
खास लोकाग्रहास्तव योगेश जोशी यांनी आपल्या शीर्षकगीताचे २ रींगटोन बनवले आहेत. ते तुम्ही खालील दुव्यांवर right click करून आपल्या संगणकांवर्/फोनवर साठवू शकता.
रींगटोन १ - आलाप
रींगटोन २ - ध्रुवपद


कायदेशीर सूचना:

१) संपूर्ण गाणं मायबोलीवरून डाऊनलोड करता येईल. गाण्याचे सगळे हक्क मायबोलिकडे असले तरी गाणं डाऊनलोड करणे, गाण्याची हवी तितकी वेळा कॉपी करणे, दुसर्‍याला देणे, कुठल्याहि माध्यमात (radio, TV etc), सार्वजनिक रित्या वाजवणे हे सगळे करण्याचा पूर्ण कायदेशीर परवाना असेल. कुणाचीही परवानगी लागणार नाही.

२) इतकेच नाहि तर कुणिही आपल्या ब्लॉगवरूनही त्याची प्रत Download साठी ठेवू शकतो. फक्त यासाठी काम केलेल्या सगळ्यांचा आदर म्हणून आणि त्यांना त्याचे श्रेय मिळावे म्हणून maayboli.com/sheershakgeet ही लिंक द्यावी लागेल.

३) गाण्याचे काहीच तुकडे दुसर्‍या कामात वापरणे, गाण्यात बदल करणे, वाजवण्याव्यतिरिक्त इतर कुठलाही आर्थिक फायदा मिळवणे (उदा. फक्त याच एकट्या गाण्याची सीडी करून विकणे), गाणे किंवा गाण्याचा भाग मायबोलीच्या कारणाव्यतिरिक्त इतर कुठेही जाहिरातीसाठी (किंवा इतर कुठल्याही कारणासाठी) वापरणे असे करता येणार नाही.

४) एखाद्या सीडी अल्बममधे इतर गाण्यांबरोबर जर मायबोली गीत समाविष्ट करायचे असेल तर खालील अटींनुसार परवानगी असेल. गाणे संपूर्ण असावे, आणि maayboli.com/sheershakgeet ही लिंक असावी आणि या गाण्याचे सर्व हक्क मायबोलीकडे आहेत याचा उल्लेख पॅकेजिंगवर असावा. पण वर २ मधे लिहल्याप्रमाणे फक्त या एका गाण्याचा (किंवा टीझरचा) अल्बम करता येणार नाही.


कदाचित मराठी गाण्यांच्या इतिहासात हे पहिलंच गाणं असेल की गाण्याचे मालकी हक्क असूनही रितसर हव्या तितक्या वेळा कॉपी करण्याची, वाजवण्याची कायदेशीर परवानगी दिली जाते आहे. त्यामुळे प्रत्येक प्रत आपोआप कायदेशीर असेल.
विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उकाका... "जानी" म्हणायला विसरलात Wink राजकुमार मोड आणि "जानी" नाही >>>>

भुंग्या,
राजकुमारने कुठल्याही सिनेमात "जानी" शब्द वापरल्याचं मला तरी आठवत नाही.
इतर वेळी बोलताना मात्र, "जानी" हे प्रत्येक वाक्यातलं कॅपिटल लेटर असायचं असं ऐकून आहे.

या गीताची तयारी करत असताना घरातल्या मंडळींवर असर झालाच.
दिया रोज नवीन व्हर्शन ऐकवते!! गायिका आणि संगीतकार होण्याची लक्षणं.
प्रणया मधल्या म्युझिक सकट गाणं म्हणते!
आमच्या 'अहोंचा' आंघोळ करताना 'सदरांच्या पदरांनी' गातानाचा आवाज यायचा!!
बहुतेक दांडीवरचा सदरा पाहून ही ओळ आठवायची! Biggrin

अनिताताई......... Biggrin

सदरा आणि पदर एकत्र...... उकाका Light 1 Biggrin उगाच कोणी रागवायला नको म्हणून दोघांना समान संधी दिलिये. Proud

मनात एक उब होती या गीताची गेले काही महिने. आणि आता सगळ्यांचा मिळून जो रत्नमाणकांचा गोफ विणला आहे तो झळाळतो आहे. कित्येकांचा आवाज कानामनात साठला आहे.छान वाटले. Happy

पुन्हा एकदा संगीतकार,गीतकार,मायबोली प्रशासन,तंत्रज्ञ,टीममेंबर्स,अभिप्रायदाते श्रोते,सगळ्यांचेच मनःपूर्वक आभार. सर्व लहानमोठ्या कलाकारांना असाच आशिर्वाद असू द्या.
सर्व बालकलाकारांचे अगदी मनापासून कौतुक. त्यांच्या पालकांचेही. (दिया अगदी सुपरगोड.) Happy

ईच्छुकांसाठी,
अ‍ॅडमिन ना दोन रिंगटोन फाईलस पाठवल्या आहेत व ईथेच डाऊनलोड ऊपलब्ध करून द्यायची विनंती केली आहे.

अ‍ॅडमिन ना दोन रिंगटोन फाईलस पाठवल्या आहेत व ईथेच डाऊनलोड ऊपलब्ध करून द्यायची विनंती केली आहे. >>>>>

हे फारच मस्त ...... Happy

अ‍ॅडमिन ना दोन रिंगटोन फाईलस पाठवल्या आहेत व ईथेच डाऊनलोड ऊपलब्ध करून द्यायची विनंती केली आहे. >>>

ग्रेट. तसंही आत्ता माझ्या मोबाईलवर माबोकरांसाठी मी एक निराळा रिंगटोन ठेवलेलाच आहे, तो काढून हा ठेवणार आता, नक्कीच Happy

वा गाणे ऐकुन झाले (कितीदा नका विचारु). अप्रतिम
प्रतिक्रियाही वाचुन झाल्या. एकुणातच आजचा वेळ सार्थकी लागला Happy
दिया क्युट. सर्वांचे अभिनंदन.

(रिंगटोनची वाट पहाणारी बाहुली :))

खरंतर माझा मायबोली समवेतचा प्रवास खुपच छोटासा आहे. अजुन नीटशी ओळख नाही झाली ह्या आईसोबत Happy
पण गाणं ऐकताना खरंच डोळ्यात पाणी आलं. >>>>>>+१ हेच लिहायचं होतं. अगदि कन्ठही दाटुन आलाय..हळवं करुन जातय हे गीत..
मायबोली ही गोकुळातल्या श्रीकृष्णासारखी आहे. माता-पिता कोणीही असले तरी प्रत्येक गोकुळवासीयाला कृष्ण माझा आहे असं वाटायचं. तसंच प्रेम, आत्मीयता मायबोलीकरांना वाटते; आपल्या मायबोलीबद्दल.>>>>१००००००००००००+ अनुमोदन

उल्हासकाका आणि योग.. तुमच्या पायाचे फोटो टाका रे...!!!>>>>> +१ केवळ तुमचेच नाही सार्‍या टीमचे टाका...अगदि छोटुल्यांचेही...
दिया.. मार डाला !!! (मधुमेह...... चपखल उपमा.. )

बकुळीची फुलं गुंफुन हार बनवतात तसे सगळ्या गाणा-या माबोकरांचे आवाज या गाण्याच्या धाग्यात गुंफलेत योग यांनी! आता त्याचा सुगंधी दरवळ सर्वदूर पसरलाय!! ही फुलं आपल्याचं बागेतली असल्याने त्याचं अप्रुप झालंय सर्वांना.>>>>>> अगदि मनातलं बोललात अनिताताई..जियो अनिताताई.. अजुनि हि बकुळीची फुलं मला अज्ञात आहेत पण त्याचा परिमळ इतका भरुन राहिलाय कि अनोळखी वाटतचं नाहियं...कधीच आपलंस करुन गेलीत..

किती लिहु असं झालय मला खरंतर... सार्‍यांचे परिश्रम सुस्पष्ट जाणवताहेत...ह्रदयाला खोलवर भिडताहेत:)
मायबोलीने खर्‍या अर्थाने ठळकपणे जाणवून दिलं कि...
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
बोलतो मराठी, ऐकतो मराठी
जाणतो मराठी, मानतो मराठी....

भिडेकाका, मी ते 'लष्करच्या भाक-या' हे 'volunteer Activity' ह्या (आणि इतक्याच अर्थाने) वापरलं होतं Happy आपण झपटल्यासारखे, काळ्-वेळ विसरून हे काम करू शकतो त्यामागे काही लोकांचा भक्कम पाठिंबा असतो, त्यांचेही अभिनंदन इतकंच म्हणायचं होतं मला Happy
आणि परत एकदा ऑडियो-व्हिज्युअल टीमकडून सगळ्यांना धन्यवाद Happy

खरंतर "मायबोली गणेशोत्सव २०११" दरम्यान "मायबोली शिर्षकगीत स्पर्धा, ज्योतीने तेजाची आरती" हि आगळी वेगळी स्पर्धा ठेवणार्‍या गणेशोत्सव२०११ संयोजकांचेही मनापासुन आभार!!!!! Happy

मायबोलीचा सदस्य असूनही फक्त कधी कधी डोकावतो. आज गाणं ऐकलं आणि प्रतिक्रिया द्याविशी वाटली. गाणं बनवण्याचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. एवढ्या विविध व जगभरात विखुरलेल्या कलाकारांना घेऊन बनवलेल्या या गाण्याने प्रोफेशनल लेव्हल टच केली आहे. गीतकार व संगीतकार यांचे विशेष अभिनंदन.
गायकांमध्ये सई व रैना अगदी प्रोफेशनल! समूहा मध्ये मिहिर व समूह मस्त. इतर सर्वांचे गाणेही चांगले होते. प्रत्येकाला गाण्याचे शिक्षण मिळतेच असे नाही त्यातूनही इतक्या जणांना हाताशी घेऊन इतके चांगले गाणे बनवणे सोपे नाही. पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन.

इथून डालो करता येत नव्हते... योग यांनी खास मेल केले.. धन्यवाद.. मगापासून ३ वेळा ऐकले.. Happy सकाळी पुन्हा ऐकतो आणि मग पुन्हा प्रतिक्रिया द्यायला येतो.. Happy

रिंगटोनः

खास लोकाग्रहास्तव योगेश जोशी यांनी आपल्या शीर्षकगीताचे २ रींगटोन बनवले आहेत. ते तुम्ही खालील दुव्यांवर right click करून आपल्या संगणकांवर्/फोनवर साठवू शकता.

रींगटोन १ - आलाप
रींगटोन २ - ध्रुवपद

खूप मेहनतीने, गाणे उतरवुन घेतले, अन तितक्याच मेहनतीने तो पेनड्राईव टीव्हीला जोडून, रिमोटवरची बरीच बटणे उलटसुलट दाबुन शेवटी एकदाचे गाणे ऐकायला घेतले तोवर पाहुणे आलेले! सबब एकदाच घाईगडबडित गाणे ऐकले, छान झालय Happy सर्व मायबोलीकर गायकांचे हार्दिक अभिनन्दन Happy
मला तितक्या एकाग्रतेने चिकित्सापूर्वक ऐकता आले नसले तरी जाणवलेली वैशिष्ट्ये:
१) एकुण गाण्याचा परिणाम असा जाणवतो की सुरवातीला एखाददोन जण मायबोलीची आळवणी करतात, मग एकेक वेगवेगळा आवाज त्यात येऊन मिळू लागतो, अन दर कडव्या गणीक कोरसमधे वाढ होत जाते. मायबोली साईटच्या गेल्या पन्धरा वर्षातील वाटचाल अन वाढीशी सुसन्गत अशी ठेवण गाण्यात देखिल उतरवली आहे की काय असे वाटले (खरे खोटे कम्पोजर जाणे Proud )
२) एकुण गाण्यात शब्दांइतकेच वेटेज म्युझिक पिसेस ना देखिल दिले आहे, सबब गाण्याची लाम्बी मोठी (जवळपास दहा मिनिटे) आहे. याच गाण्याचे तिन साडेतिन मिनिटान्चे शॉर्ट व्हर्जन करता आले तर जरुर करावे. ते करताना पुढील बाबी लक्षात घेता येतिल.
२.१) मायबोलीशी परिचितान्ना मधिल संवाद कळण्यास अवघड जाणार नाही, मात्र मायबोली साईटवर दुरान्वयानेही संबंध नसलेल्या मराठी व्यक्तिस मधिल संवाद अनाकलनिय वाटतो, खास करुन हेमाशेपो इत्यादिक. शॉर्ट व्हर्जनमधे हे टाळले तर बरे.
२.२) ८.२० ते ८.५० या वेळेदरम्यान आगेमागे, वाद्यमेळाचा आवाज, गायकी पेक्षा "लाऊड" वाटतो आहे, तसे खरेच असेल तर ते दुरुस्त व्हावे.
२.३) शॉर्ट व्हर्जनचा आग्रह अशासाठी की, हेच गाणे, यच्चयावत मराठी भाषिकांस "मायबोली साईटाचा" वा "मायबोली मराठीचा" असा कोणताही संदर्भ घेऊन आपलेसे वाटावे. Happy अपेक्षा अशि की मायबोली साईटचे हे शीर्षकगीत/ओळखगीत, मराठी साहित्य/नाट्य वगैरे सम्मेलनान्चे उद्घाटनाचे पद्य असावे/व्हावे. Happy योग व टीमला हे अशक्य नाही.

[एरवी गणपतीमधिल आरती कशीबशी वेडेवाकडे टाळ कुटत म्हणणे या पलिकडे माझा गाण्याशी संबंध नाही, तरीही (नेहेमीच्या प्रथेप्रमाणेच) या गाण्यावरही भाष्य करायचे धाडस केले आहे. Proud सबब, "लिम्ब्या, तुला काय कळतय त्यातल, स्वतःला काही करायला नको अन उगाच टीका करायला तेवढी हवी: अशी बोम्बाबोम्ब सुरु करु नका.
सविस्तर चिकित्सा, Wink गाणे लक्षपूर्वक ऐकल्यावरच करु शकेन.
ही पोस्ट योग यांचेकरता लिहीली असे. बाकिच्यान्नी पटली नाही तर सोडून द्यावी. ]

मी आलापाचा रिंगटोन ठेवणार माझ्या फोनवर Happy

ध्रुवपदाचा कोरसही चालला असता हो, योग... rather, तोच हवा होता. (आधी रिंगटोन हवा, मग २ मिळाले तर त्याऐवजी तिसराच हवा....हे म्हणजे - कपडेखरेदीतल्या संवादांसारखं झालं - यात दुसरा रंग आहे का? तो दाखवला की या रंगात ते डिझाईन आहे का? ते डिझाईन मिळालं की अजून काही... :फिदी:)

फारच गोड आहे गाणं..सुरेख चाल,अप्रतिम शब्द..कितीदा ऐकले तरी समाधान होत नाहीये.. म्हणून प्रतिसाद द्यायला उशीर झाला...

मी पण लिंब्याच्या मताशी सहमत आहे. खरं म्हणजे हे बरेच दिवसांपासुन सांगायचे होते. पण राहुन गेले. कारण मायबोलीवरचे अस्तित्व अतिशय कमी असणार्‍यांपैकी मी एक असल्यामुळे, हेमाशेपो सारखे मायबोली-स्पेसिफिक शब्द समजत नाहीत. तसेच, हटकेश्वर वगैरे शब्दांची मागची ब्याकग्राऊंड माहित नसल्याने त्याचा पुर्ण आनंद घेता येत नाही.
@योगेश, खरच असं एखादे शॉर्ट व्हर्जन करता येईल का ? आणि मुख्य म्हणजे करायचे का ? अर्थात लिंब्या म्हणतो त्याप्रमाणे तीन साडेतीन म्हणजे फारच छोटे होईल. गीताला पुर्ण न्याय दिला जाणार नाही .... त्यापेक्षा साधारण ५-६ मिनीटांचे करता आले तर उत्तम असे मला वाटते.
[डिमांड वाढत चालल्यात :-)]

सायबरमिहीर, किती आकार, काय कस, वगैरे तज्ञ लोकान्कडून ठरले जाऊदे, पण असे छोटे वर्जन कराच राव! Happy अखिल मराठी विश्वाकरताचे ते गाणे बनुदे. या गाण्याचे शब्द चपखल आहेतच. मायबोली साईट असा विचार न करता, "मराठी मायबोली" म्हणूनही ते गाणे सुट होते.

>>ही पोस्ट योग यांचेकरता लिहीली असे. बाकिच्यान्नी पटली नाही तर सोडून द्यावी.

लिंबू भाऊ,
असे काही नाही. खरे तर असाच डीटेल अभिप्राय हवा असतो. मायबोली व्यासपिठाचा हा एक मोठ्ठा फायदा आहे. तेव्हा आवर्जून ऐकून शिवाय काही चांगल्या सूचना केल्याबद्दल आभारी.

थोडेसे टेक्निकल [कृ. ही गाण्याची भलामण वा मुद्दे खोडणे आहे असे समजू नये]: या प्रकाराची गाणी [Genre] त्याचा एकंदरीत संगीत साज आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यावरील केले अंतीम ध्वनीमुद्रणाचे संस्कार [final mixing and mastering]हे बरेच वेळा कुठल्या ऊपकरणावर गाणे कसे वाजते हे ठरवात. ऊ.दा. हेच गाणे ट्रांझिस्टर, छोटी, वा मोठी साऊंड सिस्टीम, होम थियेटर, कार मध्ये, मोबाईल मध्ये, आयपॉड मध्ये असे थोडे वेगवेगळे ऐकू येईल- वाद्यमेळा, व्होकलस चे स्पष्ट स्वरूप, बारकावे या अर्थी! जास्ती टेक्निकली बोर करत नाही पण ऊपकरणाची ध्वनी लहरी प्रोसेस करण्याची क्षमता जितकी जास्त तितके हे गाणे अधिक सुंदर ऐकू येईल. अमेरिका, ईंग्लंड येथे "कुठल्याही ऊपकरणावर वाजवा गाणे तितकेच चांगले ऐकू येईल, त्यातील सर्व बारकाव्यांसकट" असे रिझल्ट्स देणारे तंत्रज्ञान असते, नव्हे तर तिथले या बाबतीतले अगदी प्राथमिक प्रशीक्षण देखिल हाच दृष्टीकोन ठेवून [Grammy Qualit] दिले जाते. आणि quality does not come cheap या न्यायाने मग असे तंत्रज्ञान वापरून केलेले एक गाणे अक्षरशः लाखाच्या घरात जाते! आपल्याकडे ए आर रेहमान चा स्वताचा स्टूडीयो, यश राज स्टूडीयोज, विशाल शेखर चा स्टूडीयो, अशा अगदी मोजक्याच ठिकाणी यासाठी लागणारी प्रचंड महागडी ऊपकरणे, व अनुभवी तंत्रज्ञ ऊपलब्ध आहेत.
थोडक्यात हे अंतीम मिक्सींग व मास्टरींग चे काम म्हणजे: मोदकाची कितीही छान ऊकड बनवली, चविष्ट सारण बनवले, मस्त कळ्या पाडल्या, तरी जर प्रेशर कुकर मधली वाफच कमी जास्त झाली तर त्या मोदकांचीच शिट्टी वाजते! असे काहिसे आहे हे प्रकरण.
आजकल मात्र बरीचशी गाणी ही मुळात केबल चॅनल, डीस्कोस, पब्स, मोठे ऊत्सव ईथे आणि आयपॉड, मोबाईल यावर वाजवायच्या दॄष्टीकोनातून त्यांचे अंतीम मिक्सींग व मास्टरींग तंत्र वापरले जाते. "ध्वनीफीतीवरील" गाणे हे सर्वात ऊच्च प्रतीचे (तंत्र, ध्वनी लहिरी, सुस्पष्ट, सर्व ईफेक्ट्स, या अर्थी) असे मानले जाते. याच आपल्या गाण्याची अगदी mp3 फाईल ही wav format (16 bit) मध्ये रुपांतरीत करून त्याची ध्वनीफीत बनवली तर अजून किमान २०% अधिक सुंदर ऐकू येईल. अगदी या गाण्यातील मंडळींनी सुध्धा हेच गाणे स्टूडीयो मध्ये ऐकले तरी त्यांना जास्त सुंदर वाटले होते. म्हणजे सूर वा ताल बदलणार नाही (बेताले वे बेसूर हे बदलणार नाही! ):) पण अधिक सुस्पष्ट व अधिक एकजिनसी असे ऐ़कू येईल. आता तर तंत्रज्ञान ईतके पुढे गेले आहे की अक्षरशः प्रत्त्येक चूकीचा सूर वा ताल हे मागाहून सुधारता येते, गायकाला ते पुनः गावे लागत नाही. म्हणूनच आजच्या पिढीतील काही रातोरात हीट झालेल्या गायकांना "लाईव्ह" ऐकले की सगळे "दूध का दूध" होते...असो.
[या गाण्याचे अंतीम संस्करण चे काम जवळ जवळ ३ आठवडे सुरू होते. दर वेळी गाणे ऐकून, नोट्स काढून, मुंबईतील साऊंड ईंजीनीयर्स ना पुन्हा सूचना, सुधारणा सुचवणे यात खरे तर माझा सर्वात जास्ती वेळ गेला. माझा मित्र असून देखिल, ३ पानी- ५० मुद्दे पाहून त्याने मला शिव्या घातल्या होत्या! पण ते करावेच लागते. एव्हडे झाल्यावरही तेच गाणे स्टूडीयो, मग घरात, मग लॅपटॉप वर (एक्स्टरनल स्पिकर्स जोडलेले), मग गाडीत असे सर्वत्र वाजवून नेमकी ९०% तोच "दर्जात्मक" ईफेक्ट येत आहे का हेही तपासून पाहिले. आणि हे सर्व कमी म्हणून की काय, हे गाणे नेट वरूनच प्रकाशित होत असल्याने त्याचीही पुन्हा वेगळी टेस्ट केली. थोडक्यात, गाणे सर्वांपर्यंत प्रकाशीत करण्या आधी जमेल ते सर्व व शक्य तितक्या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले होते.. पण अर्थात तरिही काही गोष्टी राहून गेल्याच असतील. पुढील खेपेस "भुंगा" असिस्टंट म्हणून काम पाहणार आहे तेव्हा त्याला या बाबतीत घाम गाळायला लावुया काय? Happy

असो फार मोठा विषय आहे रे.. अमेरीकेत, मुंबईत व दुबईत जे तुटपुंजे ध्वनीमुद्रणाचे ज्ञान, शिक्षण, व अनुभव घेतला त्याच्या बळावर मला हे थोडेफार जमले आहे, एव्हडेच!]

[आपल्याकडे हे तंत्रज्ञान पंचम दा यांनी ईतके सही आत्मसात करून घेतले होते की त्यांची बहुतांशी गाणी कुठल्याही ऊपकरणार वाजवा, खणखणीत!!! त्यांच्या कुठल्याही गाण्यात कुठलेच वाद्य कधीच खटकत नाही वा अंगावर येत नाही की गायकावर भारी होत नाही. त्याही दृष्टीने ते जमान्याच्या "य" काळ पुढे होते. ]
"टीव्ही" वर मात्र या गाण्याची mp3 फाईल अजीबातच वाजवू नये रे भो... Sad ते म्हणजे उकडीचे ताजे मोदक मायक्रोवेव्ह मधून गरम करून खायल्या दिल्या सारखे आहे!

रच्याकने: तू व ईतर म्हणतील मी किती बोलतोय... खरे तर पाजळण्याएव्हडे ज्ञान मला नाहीच पण विषयच जिव्हाळ्याचा आहे ना राव, काय करायचे? Happy

"टीव्ही" वर मात्र या गाण्याची mp3 फाईल अजीबातच वाजवू नये रे भो... अरेरे ते म्हणजे उकडीचे ताजे मोदक माय्क्रोवेव्ह मधून गरम करून खायल्या दिल्या सारखे आहे!
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

Rofl अगदीच चपखल उदाहरण...... Biggrin

मस्तच Happy मायबोली शीर्षकगीताचा आलापाचा रिंगटोन भारी आहे, म्हणजे आता ववि ला वगैरे जाताना टि-शर्ट टोप्या हा व्याप करायलाच नको, माबो रिंगटोनच ऐकवायचा नोंदणीच्या वेळी Proud

Pages