मायबोली - शीर्षकगीत : प्रकाशन

Submitted by Admin-team on 30 January, 2012 - 20:49
मायबोली शीर्षकगीताचे प्रकाशन ही सर्व मायबोलीकरांसाठी व विशेषत: या गीताच्या निर्मितीशी संबंधित सर्वांसाठी अत्यंत आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. या उपक्रमाच्या सुरुवातीपासून सहभागी असणार्‍या सर्व मायबोलीकरांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे हार्दिक अभिनंदन. या शीर्षकगीताची जी छोटी झलक होती, तिला जसा तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात, तसेच या संपूर्ण गीतालाही तुम्ही आपलेसे कराल, अशी आशा आहे.
-मायबोली.कॉम


मायबोली शीर्षकगीत ऐका:




या उपक्रमाचे मुख्य संयोजक योगेश जोशी यांचे मनोगत:
हे गीत खर्‍या अर्थाने मायबोलीकरांचे गीत असावे आणि त्याला जागतिक स्वरूप असावे ही संकल्पना प्रत्यक्षात साकारताना मुख्यत्वे तीन गोष्टींना प्राधान्य दिले होते. गीतकार उल्हास भिडे यांनी लिहिलेल्या अतिशय दर्जेदार गीताला व त्यातील शब्दांना न्याय देणे, या गीताला दिलेल्या संगीत साजाला न्याय देणे, आणि यात सहभागी झालेल्या मायबोलीकरांच्या प्रयत्नांना न्याय देणे. दर्जात कुठलीही तडजोड न करता या सर्वांचे संतुलन राखणे ही एक प्रकारे तिहेरी कसरतच होती. शिवाय हे गीत ऐकणार्‍याच्या ओठी सहज बसेल, मायबोलीकरांना सहज गुणगुणता येईल, खेरीज हे गीत सर्व "मायबोलीकर" वा मायबोलीकर नसलेल्या सर्वांच्या मनात रुजेल, अशा प्रकारे त्याला संगीतबद्ध करायचे हेच उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून पुढील वाटचाल करायचे ठरवले होते. या गीताशी संबंधित सर्वांचे संपूर्ण सहकार्य व सहभाग केवळ यांमुळेच ही कसरत शक्य झाली आणि एकंदरीत मायबोली शीर्षकगीत कुण्या एकाचे न राहता सर्वांचे झाले हेच या गीताचे यश म्हणावे लागेल. किंबहुना यातील सहभागी ज्येष्ठ मायबोलीकरांचे शुभाशिर्वाद, समवयस्क मायबोलीकर गायकांचे प्रोत्साहन, बालगोपाळांनी आपल्या सुरांतून गुंफलेले मोती, सर्वांच्या कुटुबियांनी दिलेला पाठींबा, आणि मायबोली संस्थापक व अ‍ॅडमिन टीम यांनी वेळोवेळी केलेली मदत व मार्गदर्शन या "पंचम" संगमातून हे गीत जणू परिपूर्ण झाले आहे. ज्यांचे संगीत ऐकून आमच्या पिढीची कर्णेंद्रिये "सूर" समजू लागली आणि नादब्रह्माचे माझे दैवत- पंचम दा (आर.डी. बर्मन) यांचा जणू अशाप्रकारे आशीर्वाद या गीताला लाभला आहे असे मी मानतो.

यातील सहभागी जवळ जवळ सर्वच मायबोलीकर (एक दोन अपवाद वगळता) हे व्यावसायिक गायक नाहीत. त्या सर्वांनी आपापले दैनंदिन व्यवसाय, घर, जबाबदार्‍या हे सर्व संभाळून या गीतासाठी केलेली मेहनत व सर्व प्रकारे केलेली मदत, या सर्वाचे मोल माझ्या लेखी अधिक आहे. जगाच्या वेगवेगळ्या भागात वा शहरात राहणार्‍या तरीही "मायबोलीकर" या एका नात्याने एकाच मायबोली कुटुंबाचे सदस्य असलेल्या अशा या गीताशी संबंधित सर्वांचे योगदान याला "मायबोली स्पिरीट" असे म्हटले तर वावगे ठरू नये.

या जागतिक मायबोली गीताचा गेले जवळ­जवळ पाच महिने सुरू असलेला अद्भुत प्रवास आज अंतिम मुक्कामी पोहोचला आहे. या संपूर्ण प्रवासात या गीतातील प्रत्येक शब्द या गीताशी संबंधीत सर्वांनीच अक्षरशः जगला आहे हे सर्वांच्या अनुभव लेखनातून स्पष्ट होते.

या शीर्षकगीताच्या विस्मयजनक वाटचालीचे व्यापक स्वरूपः
जगभरातील पाच देशातील विविध शहरांमध्ये स्थायिक असलेले आणि वय वर्षे चार ते साठ या वयोगटातील असे २१ मायबोलीकर गायक, संगीतकार, संगीत संयोजक व वाद्यवृंद. मुंबई, पुणे, दुबई या शहरांतील स्टुडियोंमध्ये व ईंग्लंड, अमेरिका, कुवेतयेथिल मायबोलीकरांनी घरीच केलेले ध्वनिमुद्रण, अनेकविध वाद्यांचा वापर, तसेच आंतरजालावरील इमेल, वेबचॅट, स्काइप, सारख्या तत्सम तंत्रांच्या सहाय्याने या गीताच्या शब्द, सूर यांची झालेली देवाणघेवाण, सरावसत्रे, आणि शेवटी आंतरजालावरच (मायबोली.कॉम) या गीताचे होणारे प्रकाशन.

जवळ जवळ पंधरा वर्षांचा इतिहास व दर्जेदार साहित्यिक परंपरा असलेल्या "मायबोली.कॉम" या संकेतस्थळाची आजवरची ओळख ही "मायबोलीशी नातं सांगणार्‍या जगभरच्या पाऊलखुणा" अशी असली तरी या मायबोली शीर्षकगीतामुळे आजपासून "आंतरजालाच्या जागतिक नकाशावर मायबोलीच्या पाऊलखुणा" आता कायमस्वरूपी कोरल्या गेल्या आहेत, असेच एक मायबोलीकर म्हणून म्हणावेसे वाटते.

मायबोलीच्या इतिहासात या शीर्षकगीताच्या रूपाने फूल ना फुलाची पाकळी म्हणून एक कायमस्वरूपी ठेव या गीताशी संबंधीत सर्वांच्या नावाने कायम राहील या भावनेने नतमस्तक व्हायला होते आणि मायबोलीचा अभिमान वाटतो.

वर म्हटले तसे मुळात गीताचा आत्मा श्रीमंत आहे. त्याला सुरात साकारणारे कलाकार यांचे प्रयत्न व कार्यासक्ती तितकीच उल्लेखनीय आहे. त्यामुळे जर काही दोष, उणीव असेल तर या गीताचा संगीतकार व या टीमचा एक प्रतिनिधी या नात्याने त्या जबाबदारीची मला संपूर्ण जाणीव आहे. खरे तर कुठलीही कलाकृती (गीत, संगीत, चित्र, इ.) ही जास्ती जास्त वाचक, श्रोत्यांपर्यंत पोहचावी हेच कुठल्याही कलाकारासाठी सर्वात महत्वाचे असते. कलाकाराचा आणि त्याचबरोबर कलेचाही विकास होण्यात ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे यात दुमत नसावे. मायबोलीने असे जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याने आज हे गीत शब्दशः सातासमुद्रापार पोहोचले आहे. एखाद्या कलाकाराला अधिक काय हवे?
बाकी रसिक श्रोता हाच मायबाप सरकार असल्याने त्याचे मत, अभिप्राय, आवड, निवड सर्वच शिरसावंद्य!

मायबोली शीर्षकगीत हे निव्वळ गीत नसून एक विचार आहे, संकल्पना आहे, अनुभव आहे, अभिव्यक्तीचे प्रकटीकरण आहे. म्हणूनच निव्वळ शब्द, सूर, ताल, लय या चौकटीत न अडकता हे गीत रसिक श्रोत्यांच्या मनाच्या संवेदनातून हृदयाच्या गाभार्‍यात वसेल अशी प्रामाणिक सदिच्छा व्यक्त करतो.

-योग (योगेश जोशी)


वरील गीतातील गायक क्रमः (मूळ गीत ईथे आहे.)
[मायबोली.....] (भुंगा)
भाषा मराठमोळी, हर अंतरी फुलावी
घेऊन ध्यास आली उदयास मायबोली (अनिताताई, योग)
भाषा मराठमोळी, हर अंतरी फुलावी
घेउन ध्यास आली उदयास मायबोली ║धृ║ (समूह- मुंबई, पुणे, दुबई)

मिटवून अंतराला, जोडून अंतरांना
ही स्नेहजाल विणते, विश्वात मायबोली (अगो व पेशवा)
[विश्वात मायबोली] (भुंगा) ||१||

सदरांच्या पदरांनी, प्रत्यंगी नटलेली (अनिलभाई)
सदरांच्या पदरांनी, प्रत्यंगी नटलेली (अंबर व जयवी)
साहित्य वाङ्मयाची, ही खाण मायबोली (सई) ||२||

[युडलिंग (योग) आणि कोरस (अनिताताई, रैना)]

सार्‍या कलागुणांना, दे वाव मायबोली (प्रमोद देव व रैना)
सार्‍या नवोदितांची, ही माय मायबोली (प्रमोद देव, व रैना)
सार्‍या नवोदितांची, ही माय मायबोली (देविका, कौशल, सृजन व समूह- विवेक देसाई, भुंगा, प्रमोद देव)
ही माय मायबोली (सृजन)
भाषा मराठमोळी, हर अंतरी फुलावी (दिया व समूह)
घेउन ध्यास आली उदयास मायबोली (दिया व समूह) ||३||

चर्चा, मतांतरांची, अन् वादविवादांची (वर्षा व अनिताताई)
[मधले संवाद- भुंगा, रैना व योग]
चर्चा, मतांतरांची, अन् वादविवादांची (मिहीर)
परिणती सुसंवादी, घडविते मायबोली (मिहीर व समूह- विवेक देसाई, भुंगा, प्रमोद देव)
परिणती सुसंवादी, घडविते मायबोली (अनिताताई, सई, स्मिता, पद्मजा) ||४||

सहजीच जीवनाचा, अविभाज्य भाग झाली (योग व सारिका)
[हार्मनी समूह-भुंगा, प्रमोद देव, विवेक देसाई, पद्मजा, सई, स्मिता]
अमुच्या मनी विराजे, अभिजात मायबोली (योग, सारिका व सर्व गायक)
अमुच्या मनी विराजे, अभिजात मायबोली (पुरूष व स्त्री गायक)
अभिजात मायबोली (सर्व) ║५║

मायबोली.. (सर्व गायक)


संपूर्ण श्रेयनामावली:
गीतकारः ऊल्हास भिडे
संगीतकारः योग (योगेश जोशी)
गायकः
मुंबई: रैना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई(अनिता आठवले), प्रमोद देव, भुंगा (मिलींद पाध्ये), सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)
पुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)
दुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका टेंबे (सौ. योग), दिया जोशी (योग व सारिका ची मुलगी), योग (योगेश जोशी), वर्षा नायर
कुवेतः जयवी-जयश्री अंबासकर
इंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)
अमेरिका: पेशवा (जयवंत काकडे), अनिलभाई (अनिल सांगोडकर)
वाद्यवृंदः प्रशांत लळीत, विजू तांबे, ऊमाशंकर शुक्ल, जगदीश मयेकर, योग
संगीत संयोजकः प्रशांत लळीत
ध्वनिमुद्रण तंत्रज्ञः
  • नदीम- ईंम्पॅक्ट स्टुडीयो, सांताक्रुझ, मुंबई.

  • जयदेव- साऊंड आइयडीयाझ, एरंडवणे, पुणे.

  • संजय- नेहा ऑडीयो ईफेक्टस, दत्तवाडी, पुणे.

  • मेरशाद- अल शिबाक मुझिक सेंटर, दुबई.

मायबोली विभाग समन्वयकः दक्षिणा (पुणे), प्रमोद देव (मुंबई), अनिलभाई (अमेरिका)
झलक ऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR) निर्मिती: maayboli.inc

*****

डाऊनलोड / Download:

मायबोलीचे शीर्षकगीत तुम्ही या दुव्यावरून तुमच्या संगणकावर/MP3 प्लेयरवर उतरवून घेऊ शकता.

रिंगटोनः
खास लोकाग्रहास्तव योगेश जोशी यांनी आपल्या शीर्षकगीताचे २ रींगटोन बनवले आहेत. ते तुम्ही खालील दुव्यांवर right click करून आपल्या संगणकांवर्/फोनवर साठवू शकता.
रींगटोन १ - आलाप
रींगटोन २ - ध्रुवपद


कायदेशीर सूचना:

१) संपूर्ण गाणं मायबोलीवरून डाऊनलोड करता येईल. गाण्याचे सगळे हक्क मायबोलिकडे असले तरी गाणं डाऊनलोड करणे, गाण्याची हवी तितकी वेळा कॉपी करणे, दुसर्‍याला देणे, कुठल्याहि माध्यमात (radio, TV etc), सार्वजनिक रित्या वाजवणे हे सगळे करण्याचा पूर्ण कायदेशीर परवाना असेल. कुणाचीही परवानगी लागणार नाही.

२) इतकेच नाहि तर कुणिही आपल्या ब्लॉगवरूनही त्याची प्रत Download साठी ठेवू शकतो. फक्त यासाठी काम केलेल्या सगळ्यांचा आदर म्हणून आणि त्यांना त्याचे श्रेय मिळावे म्हणून maayboli.com/sheershakgeet ही लिंक द्यावी लागेल.

३) गाण्याचे काहीच तुकडे दुसर्‍या कामात वापरणे, गाण्यात बदल करणे, वाजवण्याव्यतिरिक्त इतर कुठलाही आर्थिक फायदा मिळवणे (उदा. फक्त याच एकट्या गाण्याची सीडी करून विकणे), गाणे किंवा गाण्याचा भाग मायबोलीच्या कारणाव्यतिरिक्त इतर कुठेही जाहिरातीसाठी (किंवा इतर कुठल्याही कारणासाठी) वापरणे असे करता येणार नाही.

४) एखाद्या सीडी अल्बममधे इतर गाण्यांबरोबर जर मायबोली गीत समाविष्ट करायचे असेल तर खालील अटींनुसार परवानगी असेल. गाणे संपूर्ण असावे, आणि maayboli.com/sheershakgeet ही लिंक असावी आणि या गाण्याचे सर्व हक्क मायबोलीकडे आहेत याचा उल्लेख पॅकेजिंगवर असावा. पण वर २ मधे लिहल्याप्रमाणे फक्त या एका गाण्याचा (किंवा टीझरचा) अल्बम करता येणार नाही.


कदाचित मराठी गाण्यांच्या इतिहासात हे पहिलंच गाणं असेल की गाण्याचे मालकी हक्क असूनही रितसर हव्या तितक्या वेळा कॉपी करण्याची, वाजवण्याची कायदेशीर परवानगी दिली जाते आहे. त्यामुळे प्रत्येक प्रत आपोआप कायदेशीर असेल.
विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूर्ण गाणं ऐकून काय वाटतंय ते सांगता येणं अवघड आहे. >>>> अगदी अगदी मंजूडी !
निव्वळ अप्रतिम आहे हे गाणं ! संपूर्ण टीमचे अभिनंदन.

परफेक्ट टडोपा सिच्युएशन Happy
अप्रतिम झालंय गाणं.
सगळ्यांचेच आवाजाचे पोत इतके वेगवेगळे असुनही एकसंधपणा जाणवतोय. जबरदस्त टीमवर्क.
टीमचे अभिनंदन आणि शुभेच्छा!!
योग- हॅट्स ऑफ! कसलं कठीण प्रोजेक्ट यशस्वी केलंय.
छोटे गायक फारच गोड Happy
सई आणि भुंगा- तुम्ही खरंच प्रोफेशनली गाण्याचा विचार केला नव्हता अजून? कमाल आहे. आता करा. Happy

>>>आई (अनिताताई) आणि त्यांच्या दोन मुली (अगो आणि जयवी) हे असं गायिकांचं काँबिनेशनही दुर्मिळच आहे......... तेही या मायबोलीगीतामुळे साध्य झालय. एक आगळावेगळा रेकॉर्डच आहे हा. स्मित

भुंग्या, अनिताताई आणि अगो ह्या मायलेकी आहेत...जयवी त्यांच्यापैकी नाही...जयवी म्हणजे जयश्री कुलकर्णी-अंबासकर...
तुला अभिप्रेत असलेली अनिताताईंची दुसरी मुलगी म्हणजे जयंती...तीही चांगली गायिका आहे आणि मायबोलीकरीणही आहे...फक्त ह्या गाण्यात ती नाहीये...इतकंच.

अभिनंदन! Happy

>>हे निव्वळ गीत नसून एक विचार आहे, संकल्पना आहे, अनुभव आहे, अभिव्यक्तीचे प्रकटीकरण आहे
अनुमोदन.

छोटे गायक मस्तच!
गो सई, अगो!

मला फक्त यॉडलिंग आणि मधले संवाद नाही आवडले.

सा-या कलागुणांना दे वाव मायबोली.....
सहजिच जीवनाचा अविभाज्य भाग झाली.....>>> मायबोली जिंदाबाद.... जियो....

खरच खुप अभिमान वाटतोय की मला ह्या प्रोजेक्टमधे सहभागी होता आलं.

संपुर्ण गाणं ऐकतांना खरंच डोळ्यात पाणी आलं

योग, उल्हास भिडे आणि समस्त टिम.... जियो...

गाणे पुन्हा पुन्हा ऐकतेय............ प्रत्येक वेळी अंगावर रोमांच उभे रहातायत.

अप्रतिम झालय गाणं ! सर्व सहभागी कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन ! Happy

अभिनंदन! फार आवडलं. इतकं सुरेल शीर्षक गीत आम्हा मायबोलीकरांपर्यंत पोचवल्याबद्दल सगळ्या कलाकारांचे मनःपूर्वक धन्यवाद!

खूप खूप आवडलं !
<<मायबोलीच्या इतिहासात या शीर्षकगीताच्या रूपाने फूल ना फुलाची पाकळी म्हणून एक कायमस्वरूपी ठेव या गीताशी संबंधीत सर्वांच्या नावाने कायम राहील या भावनेने नतमस्तक व्हायला होते आणि मायबोलीचा अभिमान वाटतो>> आणि त्या मायबोलीचे एक घटक असल्याचा मलाही!
अभिनंदन !!!!

ऑस्सम शब्द पुरे नाहीत. आज दिवस भर मुंबईत भाषा मराठ मोळी गात गात फिरले. आणि घरी आल्यावर पूर्ण गाणे ऐकायला मिळाले. जीवन सफल. एका वैश्विक कुटुंबाचा भाग असणे किती ग्रेट.
मस्त झाले आहे सर्व गाणे. सर्व गायक, कंपोजर व टेक सपोर्ट चे अभिनंदन. हे प्रत्येक गटग मध्ये म्हटले जावे. Happy टू हॅपी फॉर वर्डस.

तुला अभिप्रेत असलेली अनिताताईंची दुसरी मुलगी म्हणजे जयंती...तीही चांगली गायिका आहे आणि मायबोलीकरीणही आहे...फक्त ह्या गाण्यात ती नाहीये...इतकंच>>>>
भुंग्या, अरे जयंतीला पण या गाण्यात सहभागी होण्याची फार इच्छा होती. पण तो पर्यंत फिमेल व्हॉइसचं पारडं इतकं जड झालं होतं. आणि मेल व्हॉईस कमी सहभागी झाले होते!! मग अजून नव्या गायिका घेणं अवघड झालं होतं!!
आता ती गाण्याचा आनंद घेतेय हळहळत.

मायबोली शीर्षकगीतामधे सहभागी गीतकार, संगीतकार, गायक, वादक, तंत्रज्ञ, पडद्यावरील तसेच पडद्यामागील सर्व संबंधित आणि ह्या 'लष्करच्या भाक-या' भाजण्याकरता पाठिंबा, प्रोत्साहन देणा-या सर्वांच्या कुटुंबियांचे आणि मायबोली सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन Happy

अतिशय सुंदर गाणं!!!!! कोरसचा इफेक्ट फारच छान साधलाय. सतार, बासरी अप्रतिम. सगळ्या गायकांचं आणि मुख्य म्हणजे योगचं त्रिवार अभिनंदन!! Happy

अनिताताई तुमच्याबद्दल खरच आदर वाटतो.किती अ‍ॅक्टिव आहात तुम्हि>>>>
भान, भुंगा ,
अरे गाणं म्हणजे टॉनिक आहे आमचं. काठी टेकत टेकत चालण्याचं वय झालं तरी येईन गायला! बोलावलं तर. Biggrin सुरांना लय असते, वय नसतं!!

सुरांना लय असते, वय नसतं!!
>>>>>>>>>>>>>>>>

आईशप्पथ..... काय बोल्ललात......!!!!!!! माझ्या आवडत्या वाक्यात....!!!!

(माझ्या आवडीच्या वाक्यात खरंच बदल केलाय आताच)

...... आपला पंखा Wink

रार , आता व्हिजुअलमधे तुझे आणि अवल,हिमकुल्स वगैरे तुमच्या टीममधल्या मंडळींचे फोटोज आणि क्लिप्स हव्यात हं आम्हाला. असं पडद्यामागे नाही राहायचं. मस्त काम केलं तुम्ही खपून!

अहाहा!!! किती वेळा ऐकतेय हे गाणं, तरीही मन भरत नाहीये. सर्वांचेच आवाज छान पण त्या दियाबाळाचा आवाज काहीच्या काहीच गोड आहे. Happy इतरही दोन लहान मुले अगदीच प्रोफेशनल असल्यासारखी गायलीत. मधले म्युझिक पीसेस प्रचंड गोड आहेत.

उकाका, तुमच्या शब्दांचं कौतुक करावं तेवढं थोडंच. Happy तुमच्या निर्मळ मनातून उमटलेले हे निर्मळ शब्द गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर पोहोचवत आहेत.
सहजीच जीवनाचा, अविभाज्य भाग झाली
अमुच्या मनी विराजे, अभिजात मायबोली
हे शब्द ऐकतांना मायबोलीविषयी प्रचंड आपलेपणाचे फीलिंग मनात येते.

ललिता-प्रिती, "ये दिल और उनके" चे सुरुवातीचे संगीत मायबोलीच्या सुरुवातीशी मिळतेजुळते आहे, असे वाटणारी मी ही एक बरं का! हे मी एका वाहत्या पानावर म्हणाले पण आहे. Happy

अनिताताई, तुमच्या लेखात मला म्हणालात ना? ४थ्या कडव्यात सरप्राईज आहे? मिळालं बरं का Happy सुखद धक्का आहे तो अगदी... Happy

सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि हा निखळ आनंद आम्हाला दिल्याबद्दल हार्दिक धन्यवाद!
जियो मायबोली Happy

ऐकले ऐकले मायबोली शीर्षक गीत पूर्ण ऐकले
डोळे मिटून अगदी पूर्ण लक्ष देऊन ऐकले .अगदी भरून आले.
सगळ्यांचे आवाज मस्त आहेत.बच्चे कंपनीची गायकी झकास Happy
चर्चा, मतांतरांची, अन् वादविवादांची
अनुलेख/हेमाशेपो/ हजार मोदक /अनुमोदन / विषयाला धरून बोला / कंपूशाही आहे Happy
परिणती सुसंवादी, घडविते ‘मायबोली’
सहजी जीवनाचा अविभाज्य भाग झाली अमुच्या मनी विराजे अभिजात मायबोली (अगदी खर आहे )
शेवटी परत फिरून याच घरट्यात यायला, हक्काने, आनंदाने!>>> अगदी अगदी Happy

जबरदस्त...!! जबरदस्त......!!!!

आणि

जबरदस्त.......!!!!!!!!

.... संगीत साज-संयोजन सुद्धा अत्यंत प्रभावी.

वा. खरचं ऐकताना काय वाटले ते शब्दात नाही सांगता येणार. मी ओळी कुणी गायल्या आहेत त्याकडे लक्षच दिलं नाही अजुन. संपुर्ण गाण एकसंध ऐकताना पटतच नाही कि वेगवेगळ्या ठिकाणी रेकॉर्डिंग झालय असं.
योग ग्रेट जॉब. Happy

Pages