मायबोली - शीर्षकगीत : प्रकाशन

Submitted by Admin-team on 30 January, 2012 - 20:49
मायबोली शीर्षकगीताचे प्रकाशन ही सर्व मायबोलीकरांसाठी व विशेषत: या गीताच्या निर्मितीशी संबंधित सर्वांसाठी अत्यंत आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. या उपक्रमाच्या सुरुवातीपासून सहभागी असणार्‍या सर्व मायबोलीकरांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे हार्दिक अभिनंदन. या शीर्षकगीताची जी छोटी झलक होती, तिला जसा तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात, तसेच या संपूर्ण गीतालाही तुम्ही आपलेसे कराल, अशी आशा आहे.
-मायबोली.कॉम


मायबोली शीर्षकगीत ऐका:
या उपक्रमाचे मुख्य संयोजक योगेश जोशी यांचे मनोगत:
हे गीत खर्‍या अर्थाने मायबोलीकरांचे गीत असावे आणि त्याला जागतिक स्वरूप असावे ही संकल्पना प्रत्यक्षात साकारताना मुख्यत्वे तीन गोष्टींना प्राधान्य दिले होते. गीतकार उल्हास भिडे यांनी लिहिलेल्या अतिशय दर्जेदार गीताला व त्यातील शब्दांना न्याय देणे, या गीताला दिलेल्या संगीत साजाला न्याय देणे, आणि यात सहभागी झालेल्या मायबोलीकरांच्या प्रयत्नांना न्याय देणे. दर्जात कुठलीही तडजोड न करता या सर्वांचे संतुलन राखणे ही एक प्रकारे तिहेरी कसरतच होती. शिवाय हे गीत ऐकणार्‍याच्या ओठी सहज बसेल, मायबोलीकरांना सहज गुणगुणता येईल, खेरीज हे गीत सर्व "मायबोलीकर" वा मायबोलीकर नसलेल्या सर्वांच्या मनात रुजेल, अशा प्रकारे त्याला संगीतबद्ध करायचे हेच उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून पुढील वाटचाल करायचे ठरवले होते. या गीताशी संबंधित सर्वांचे संपूर्ण सहकार्य व सहभाग केवळ यांमुळेच ही कसरत शक्य झाली आणि एकंदरीत मायबोली शीर्षकगीत कुण्या एकाचे न राहता सर्वांचे झाले हेच या गीताचे यश म्हणावे लागेल. किंबहुना यातील सहभागी ज्येष्ठ मायबोलीकरांचे शुभाशिर्वाद, समवयस्क मायबोलीकर गायकांचे प्रोत्साहन, बालगोपाळांनी आपल्या सुरांतून गुंफलेले मोती, सर्वांच्या कुटुबियांनी दिलेला पाठींबा, आणि मायबोली संस्थापक व अ‍ॅडमिन टीम यांनी वेळोवेळी केलेली मदत व मार्गदर्शन या "पंचम" संगमातून हे गीत जणू परिपूर्ण झाले आहे. ज्यांचे संगीत ऐकून आमच्या पिढीची कर्णेंद्रिये "सूर" समजू लागली आणि नादब्रह्माचे माझे दैवत- पंचम दा (आर.डी. बर्मन) यांचा जणू अशाप्रकारे आशीर्वाद या गीताला लाभला आहे असे मी मानतो.

यातील सहभागी जवळ जवळ सर्वच मायबोलीकर (एक दोन अपवाद वगळता) हे व्यावसायिक गायक नाहीत. त्या सर्वांनी आपापले दैनंदिन व्यवसाय, घर, जबाबदार्‍या हे सर्व संभाळून या गीतासाठी केलेली मेहनत व सर्व प्रकारे केलेली मदत, या सर्वाचे मोल माझ्या लेखी अधिक आहे. जगाच्या वेगवेगळ्या भागात वा शहरात राहणार्‍या तरीही "मायबोलीकर" या एका नात्याने एकाच मायबोली कुटुंबाचे सदस्य असलेल्या अशा या गीताशी संबंधित सर्वांचे योगदान याला "मायबोली स्पिरीट" असे म्हटले तर वावगे ठरू नये.

या जागतिक मायबोली गीताचा गेले जवळ­जवळ पाच महिने सुरू असलेला अद्भुत प्रवास आज अंतिम मुक्कामी पोहोचला आहे. या संपूर्ण प्रवासात या गीतातील प्रत्येक शब्द या गीताशी संबंधीत सर्वांनीच अक्षरशः जगला आहे हे सर्वांच्या अनुभव लेखनातून स्पष्ट होते.

या शीर्षकगीताच्या विस्मयजनक वाटचालीचे व्यापक स्वरूपः
जगभरातील पाच देशातील विविध शहरांमध्ये स्थायिक असलेले आणि वय वर्षे चार ते साठ या वयोगटातील असे २१ मायबोलीकर गायक, संगीतकार, संगीत संयोजक व वाद्यवृंद. मुंबई, पुणे, दुबई या शहरांतील स्टुडियोंमध्ये व ईंग्लंड, अमेरिका, कुवेतयेथिल मायबोलीकरांनी घरीच केलेले ध्वनिमुद्रण, अनेकविध वाद्यांचा वापर, तसेच आंतरजालावरील इमेल, वेबचॅट, स्काइप, सारख्या तत्सम तंत्रांच्या सहाय्याने या गीताच्या शब्द, सूर यांची झालेली देवाणघेवाण, सरावसत्रे, आणि शेवटी आंतरजालावरच (मायबोली.कॉम) या गीताचे होणारे प्रकाशन.

जवळ जवळ पंधरा वर्षांचा इतिहास व दर्जेदार साहित्यिक परंपरा असलेल्या "मायबोली.कॉम" या संकेतस्थळाची आजवरची ओळख ही "मायबोलीशी नातं सांगणार्‍या जगभरच्या पाऊलखुणा" अशी असली तरी या मायबोली शीर्षकगीतामुळे आजपासून "आंतरजालाच्या जागतिक नकाशावर मायबोलीच्या पाऊलखुणा" आता कायमस्वरूपी कोरल्या गेल्या आहेत, असेच एक मायबोलीकर म्हणून म्हणावेसे वाटते.

मायबोलीच्या इतिहासात या शीर्षकगीताच्या रूपाने फूल ना फुलाची पाकळी म्हणून एक कायमस्वरूपी ठेव या गीताशी संबंधीत सर्वांच्या नावाने कायम राहील या भावनेने नतमस्तक व्हायला होते आणि मायबोलीचा अभिमान वाटतो.

वर म्हटले तसे मुळात गीताचा आत्मा श्रीमंत आहे. त्याला सुरात साकारणारे कलाकार यांचे प्रयत्न व कार्यासक्ती तितकीच उल्लेखनीय आहे. त्यामुळे जर काही दोष, उणीव असेल तर या गीताचा संगीतकार व या टीमचा एक प्रतिनिधी या नात्याने त्या जबाबदारीची मला संपूर्ण जाणीव आहे. खरे तर कुठलीही कलाकृती (गीत, संगीत, चित्र, इ.) ही जास्ती जास्त वाचक, श्रोत्यांपर्यंत पोहचावी हेच कुठल्याही कलाकारासाठी सर्वात महत्वाचे असते. कलाकाराचा आणि त्याचबरोबर कलेचाही विकास होण्यात ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे यात दुमत नसावे. मायबोलीने असे जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याने आज हे गीत शब्दशः सातासमुद्रापार पोहोचले आहे. एखाद्या कलाकाराला अधिक काय हवे?
बाकी रसिक श्रोता हाच मायबाप सरकार असल्याने त्याचे मत, अभिप्राय, आवड, निवड सर्वच शिरसावंद्य!

मायबोली शीर्षकगीत हे निव्वळ गीत नसून एक विचार आहे, संकल्पना आहे, अनुभव आहे, अभिव्यक्तीचे प्रकटीकरण आहे. म्हणूनच निव्वळ शब्द, सूर, ताल, लय या चौकटीत न अडकता हे गीत रसिक श्रोत्यांच्या मनाच्या संवेदनातून हृदयाच्या गाभार्‍यात वसेल अशी प्रामाणिक सदिच्छा व्यक्त करतो.

-योग (योगेश जोशी)


वरील गीतातील गायक क्रमः (मूळ गीत ईथे आहे.)
[मायबोली.....] (भुंगा)
भाषा मराठमोळी, हर अंतरी फुलावी
घेऊन ध्यास आली उदयास मायबोली (अनिताताई, योग)
भाषा मराठमोळी, हर अंतरी फुलावी
घेउन ध्यास आली उदयास मायबोली ║धृ║ (समूह- मुंबई, पुणे, दुबई)

मिटवून अंतराला, जोडून अंतरांना
ही स्नेहजाल विणते, विश्वात मायबोली (अगो व पेशवा)
[विश्वात मायबोली] (भुंगा) ||१||

सदरांच्या पदरांनी, प्रत्यंगी नटलेली (अनिलभाई)
सदरांच्या पदरांनी, प्रत्यंगी नटलेली (अंबर व जयवी)
साहित्य वाङ्मयाची, ही खाण मायबोली (सई) ||२||

[युडलिंग (योग) आणि कोरस (अनिताताई, रैना)]

सार्‍या कलागुणांना, दे वाव मायबोली (प्रमोद देव व रैना)
सार्‍या नवोदितांची, ही माय मायबोली (प्रमोद देव, व रैना)
सार्‍या नवोदितांची, ही माय मायबोली (देविका, कौशल, सृजन व समूह- विवेक देसाई, भुंगा, प्रमोद देव)
ही माय मायबोली (सृजन)
भाषा मराठमोळी, हर अंतरी फुलावी (दिया व समूह)
घेउन ध्यास आली उदयास मायबोली (दिया व समूह) ||३||

चर्चा, मतांतरांची, अन् वादविवादांची (वर्षा व अनिताताई)
[मधले संवाद- भुंगा, रैना व योग]
चर्चा, मतांतरांची, अन् वादविवादांची (मिहीर)
परिणती सुसंवादी, घडविते मायबोली (मिहीर व समूह- विवेक देसाई, भुंगा, प्रमोद देव)
परिणती सुसंवादी, घडविते मायबोली (अनिताताई, सई, स्मिता, पद्मजा) ||४||

सहजीच जीवनाचा, अविभाज्य भाग झाली (योग व सारिका)
[हार्मनी समूह-भुंगा, प्रमोद देव, विवेक देसाई, पद्मजा, सई, स्मिता]
अमुच्या मनी विराजे, अभिजात मायबोली (योग, सारिका व सर्व गायक)
अमुच्या मनी विराजे, अभिजात मायबोली (पुरूष व स्त्री गायक)
अभिजात मायबोली (सर्व) ║५║

मायबोली.. (सर्व गायक)


संपूर्ण श्रेयनामावली:
गीतकारः ऊल्हास भिडे
संगीतकारः योग (योगेश जोशी)
गायकः
मुंबई: रैना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई(अनिता आठवले), प्रमोद देव, भुंगा (मिलींद पाध्ये), सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)
पुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)
दुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका टेंबे (सौ. योग), दिया जोशी (योग व सारिका ची मुलगी), योग (योगेश जोशी), वर्षा नायर
कुवेतः जयवी-जयश्री अंबासकर
इंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)
अमेरिका: पेशवा (जयवंत काकडे), अनिलभाई (अनिल सांगोडकर)
वाद्यवृंदः प्रशांत लळीत, विजू तांबे, ऊमाशंकर शुक्ल, जगदीश मयेकर, योग
संगीत संयोजकः प्रशांत लळीत
ध्वनिमुद्रण तंत्रज्ञः
  • नदीम- ईंम्पॅक्ट स्टुडीयो, सांताक्रुझ, मुंबई.

  • जयदेव- साऊंड आइयडीयाझ, एरंडवणे, पुणे.

  • संजय- नेहा ऑडीयो ईफेक्टस, दत्तवाडी, पुणे.

  • मेरशाद- अल शिबाक मुझिक सेंटर, दुबई.

मायबोली विभाग समन्वयकः दक्षिणा (पुणे), प्रमोद देव (मुंबई), अनिलभाई (अमेरिका)
झलक ऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR) निर्मिती: maayboli.inc

*****

डाऊनलोड / Download:

मायबोलीचे शीर्षकगीत तुम्ही या दुव्यावरून तुमच्या संगणकावर/MP3 प्लेयरवर उतरवून घेऊ शकता.

रिंगटोनः
खास लोकाग्रहास्तव योगेश जोशी यांनी आपल्या शीर्षकगीताचे २ रींगटोन बनवले आहेत. ते तुम्ही खालील दुव्यांवर right click करून आपल्या संगणकांवर्/फोनवर साठवू शकता.
रींगटोन १ - आलाप
रींगटोन २ - ध्रुवपद


कायदेशीर सूचना:

१) संपूर्ण गाणं मायबोलीवरून डाऊनलोड करता येईल. गाण्याचे सगळे हक्क मायबोलिकडे असले तरी गाणं डाऊनलोड करणे, गाण्याची हवी तितकी वेळा कॉपी करणे, दुसर्‍याला देणे, कुठल्याहि माध्यमात (radio, TV etc), सार्वजनिक रित्या वाजवणे हे सगळे करण्याचा पूर्ण कायदेशीर परवाना असेल. कुणाचीही परवानगी लागणार नाही.

२) इतकेच नाहि तर कुणिही आपल्या ब्लॉगवरूनही त्याची प्रत Download साठी ठेवू शकतो. फक्त यासाठी काम केलेल्या सगळ्यांचा आदर म्हणून आणि त्यांना त्याचे श्रेय मिळावे म्हणून maayboli.com/sheershakgeet ही लिंक द्यावी लागेल.

३) गाण्याचे काहीच तुकडे दुसर्‍या कामात वापरणे, गाण्यात बदल करणे, वाजवण्याव्यतिरिक्त इतर कुठलाही आर्थिक फायदा मिळवणे (उदा. फक्त याच एकट्या गाण्याची सीडी करून विकणे), गाणे किंवा गाण्याचा भाग मायबोलीच्या कारणाव्यतिरिक्त इतर कुठेही जाहिरातीसाठी (किंवा इतर कुठल्याही कारणासाठी) वापरणे असे करता येणार नाही.

४) एखाद्या सीडी अल्बममधे इतर गाण्यांबरोबर जर मायबोली गीत समाविष्ट करायचे असेल तर खालील अटींनुसार परवानगी असेल. गाणे संपूर्ण असावे, आणि maayboli.com/sheershakgeet ही लिंक असावी आणि या गाण्याचे सर्व हक्क मायबोलीकडे आहेत याचा उल्लेख पॅकेजिंगवर असावा. पण वर २ मधे लिहल्याप्रमाणे फक्त या एका गाण्याचा (किंवा टीझरचा) अल्बम करता येणार नाही.


कदाचित मराठी गाण्यांच्या इतिहासात हे पहिलंच गाणं असेल की गाण्याचे मालकी हक्क असूनही रितसर हव्या तितक्या वेळा कॉपी करण्याची, वाजवण्याची कायदेशीर परवानगी दिली जाते आहे. त्यामुळे प्रत्येक प्रत आपोआप कायदेशीर असेल.
विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेताळा, जीमेल वर मिळाले रे भो, आता उतरवुन कॉपी करुन घेतो. पण Attachments may be unavailable असा एरर मेसेज येतोय Sad असो, धन्यवाद, मी प्रयत्न करतोय.
(पण साईझ किती आहे फाईलचा? मला समजत नाहीये :भययुक्त चेहरा: )

लिंबुटींबू,

या धाग्याच्या मूळ लेखात शेवटी "डाऊनलोड / Download:" विभाग आहे. त्यातल्या दुव्यावर right click केलेत तर तुम्ही स्वतःच गाण्याची mp3 तुमच्या कॉम्प्युटरवर साठवू शकता.

अ‍ॅडमिन, दुर्दैवाने मला तिथुन घेता येत नाहीये, साईट ब्यान्/ब्लॉक्ड असे काहीसे आहे Sad पण बघतो, आजच क्याफे मधे जाऊन घेतो उतरवुन Happy थॅन्क्स.
येवढच नाही, तर वेताळाची मेल ऑफिस अ‍ॅड्रेसवर पाठवुन घेतली, तर ऑफिसचा मेलबॉक्स बोम्बललाय. कोटागार्ड अन्गात आल्याप्रमाणे वॉर्निन्ग मेसेजेस पाठवतोय (कारण बहुधा, आमच्यात २० एम्बी पर्यन्तचीच फाईल मेल वरुन पाठवता/उतरवता येते - आता आख्खा मेल सर्व्हर पेटला नाही म्हणजे मिळवली Proud म्हणजे मग इडीपी वाले दोन हातान्नी शन्ख करत येतिल माझ्या इथे --- पळा पळा डोन्गराला आग लागलीये... )
असो.

खूप सुंदर.
आनिताताई, भुंगा, रैना, प्रमोद, अगो, सई, दिया, योग अगदी सगळ्यांचेच गाणे लाजवाब ! सतार आणि बासरी अप्रतिम !
ते मधले संवाद पण मस्तच !
ह्या गाण्याच्या निर्मितीत सहभाग घेतलेल्या सर्वांचं कौतुक वाटतं.
अभिनंदन आणि आभार !

अप्रतिम... भरुन आलं.... प्रचंड सुंदर.... शब्दांना रुप आलं....

उल्हासकाका आणि योग.. तुमच्या पायाचे फोटो टाका रे...!!!

सर्वांचे अभिनंदन !
मला वाटते हे गीत जेव्हा आपण ही साईट लॉगीन करण्यापुर्वी ओपन केल्याबरोबर त्यातील अ‍ॅनिमिशनसह दिसायला हवी मगच आतील पानावर प्रवेश होईल असे काही केल्यास गीताला खरी ओळख येईल. अन्यथा भविष्यात त्याचा विसरही पडेल.

धन्यवाद !
मुकु

परत एकदा सगळ्यांचेच अभिनंदन. सही झालेय पूर्ण गीत.
अनिताताई लै बेष्ट Happy अगो आणि सई सुंदर आवाज आहे तुमचा.
रैनातै खास. अन योगराव हटकेश्वर नसले असते तर? चेरी म्हणले गेले ते योग्यच. :० अन भुंग्याचे ते मायबोली अहाहा.

>>जेव्हा आपण ही साईट लॉगीन करण्यापुर्वी ओपन केल्याबरोबर त्यातील अ‍ॅनिमिशनसह दिसायला हवी मगच आतील पानावर प्रवेश होईल असे काही केल्यास गीताला खरी ओळख येईल

आयडीया ची कप्लना भारी आहे!

अरे फक्त १३ एम्बीचे गाणे आहे, तरी आमच्यात मेल पोचली नाही, सर्व्हर लटकला हे.
पण सरतेशेवटी वेताळच्या मेलमधुन जमल डाऊनलोड करुन घ्यायला
मेल मधिल डाऊनलोड ऑप्शन चालतच नव्हता, तर सहज प्ले ऑप्शन वापरला, अन काय, तिथुन सेव्ह करुन घेता आली फाईल
आता पेन ड्राईव वर घेतली आहे, सन्ध्याकाळी निवान्तपणे घरी ऐकेन / ऐकवेन.
वेताळास धन्यवाद, बाकीच्यान्नाही धन्यवाद.

>>आनिताताई, भुंगा, रैना, प्रमोद, सई, दिया, योग अगदी सगळ्यांचेच गाणे लाजवाब ! सतार आणि बासरी अप्रतिम ! ते मधले संवाद पण मस्तच

अवल,
धन्यवाद! असा नेमका प्रतीसाद खूपच उपयुक्त ठरतो. विशेषतः मधले संवाद हे मूळ गाण्यात नसल्याने तो आयत्या वेळचा प्रयोग होता. तसे संवाद ठेवायचे गाण्यात, त्या कडव्यात हे डोक्यात पहिल्यापासून होतच. गीतकार ऊल्हास भिडे देखिल त्याबद्दलच्या चर्चाप्रक्रीयेत सामिल होतेच (तेही मह्त्वाचे!), पण शेवटच्या ध्वनीमुद्रणापर्यंत गाण्याची एकंदर संपूर्ण रूपरेषा व रचना तयार झाल्यावर या संवादाचा नेमकी वापर/परिणाम कसा साधता येईल हे अधिक स्पष्ट झालं.

सतार, बासरी तर "जान" आहेच या रचनेची. आणि विजू तांबे (बासरी) व शुक्लाजी (सतार) सारख्या जादूगारांनी मी रचलेल्या अगदी कच्च्या (दगड) म्युझिक तुकड्याच त्यांच्या परिसस्पर्शाने अक्षरशः सोनं केलं. वय, अनुभव, समज यात माझ्यापेक्षा जवळ जवळ एक पिढीच्या अंतराने मोठे असलेल्या या कलाकारांनी माझ्या सूचना, अपेक्षा, प्रसंगी सुचवलेले बदल याचा मान ठेवून त्यातही स्वताची जी खासियत गोंदली आहे ते पाहिल्यावर "हाडाचा कलाकार आणि प्रोफेशनल अ‍ॅटीट्यूड" म्हणजे काय याचं जिवंत प्रशीक्षण मिळतं. "स्वतःचे कलागुण, निर्मीती, अनुभव्, ई." बद्दल कसलाही डांगोरा न पिटता संगीतकाराच्या कल्पेनला व दृष्टीकोनाला समजून घेवून, त्याला छेद न देता, ऊलट त्याला आपलेसे करून त्यात रंग भरणारे हे कलाकार पाहिले की नतमस्तक व्हायला होते. एव्हडे करूनही "तुमच्या मनासारखे झालय ना"..? असे विचारणारे हे अस्सल कलावंत यांच्याकडून शिकण्या सारखे बरेच काही आहे असे नेहेमी वाटते. फक्त याही आधी याच वादक मंडळींबरोबर मी काम केले असल्याने आमच्यातले "ट्युनिंग" आधीच झालेले होते हा फायदा होता. असो. भावनेच्या ओघात हा अनुभव ईथे शेयर करावासा वाटला.
आभारी.

बकुळीची फुलं गुंफुन हार बनवतात तसे सगळ्या गाणा-या माबोकरांचे आवाज या गाण्याच्या धाग्यात गुंफलेत योग यांनी! आता त्याचा सुगंधी दरवळ सर्वदूर पसरलाय!! ही फुलं आपल्याचं बागेतली असल्याने त्याचं अप्रुप झालंय सर्वांना. Happy
गीतकार उल्हासजी आणि संगीतकार योग, तुम्हाला अनेक धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन!
सर्व रसिक मायबोलीकरांची खूप आभारी!

जेव्हा आपण ही साईट लॉगीन करण्यापुर्वी ओपन केल्याबरोबर त्यातील अ‍ॅनिमिशनसह दिसायला हवी मगच आतील पानावर प्रवेश होईल असे काही केल्यास गीताला खरी ओळख येईल

आयडीया ची कप्लना भारी आहे!

>>>

मी ही अगदी हेच लिहायला आले होते इथे. दिवाळी अंकाच्या संपादकीयासोबत ऑडियो क्लिप टाकून असा प्रयोग केला गेला होता. तसंच काहीतरी इथे करावं असं काल माझ्याही डोक्यात आलं होतं.
ते सरस्वतीचं अ‍ॅनिमेशन आणि कोरसमधली 'भाषा मराठमोळी' ही ओळ असं लॉग-इनला पहायला आणि ऐकायला मस्त वाटेल. Happy

योग तुझे असे अधून मधून आलेले अनुभव वाचायला मजा येते आहे Happy और भी आने दो Happy
बा़की ........ साईट उघडल्याबरोबर हे गाणं ऐकायला मिळालं तर सही........कल्पना लाजवाब आहे Happy
गाण्याची पारायणं सुरु आहेतच Happy
प्रत्येक वेळी काहीतरी नवीन जाणवतं..... !!
दियाचा गोडवा मात्र प्रत्येक वेळी वाढतोच आहे.
अगो....... मी तुझी फॅन झालेय यार ........ !!
अनिताताईंची तर आधीच झाले होते Happy
सई....... तुझा मधाळ आवाज....... एकदम कातिल !!!!!!!!

आज परत ऐकले आणि परत तितकेच आवडले,
मधले संवाद एकदम खास आणि ते 'ऑन द स्पॉट' केले आहेत हे ग्रेटच!
मधले सतारीचे पीसेस अप्रतिम झाले आहेत.
योग, तुझ्यावरचा आरडीचा प्रभाव स्पष्ट आहे- प्रत्येक इंटरल्यूड वेगळा! आणि शेवट्ची हार्मनी व एंडींग भन्नाट!

>>वाचनात आलं कि सगळ्या गायकांकडुन संपुर्ण गाणं ध्वनीमुद्रित केलं आणि नंतर तुकडे जोडले. शक्य झाल्यास सई, पेशवा आणि दिया यांच्या स्वतंत्र आवाजातलं गाणं ऐकायला आवडेल.
डायरेक्टर्स कट, डिलिटेड सीन्स (मेकिंग ऑफ मायबोली शीर्षकगीत) या धर्तीवर...

राज,
सर्वांच्या स्वतंत्र आवाजात अख्ख गाणं ऐकायला मलाही आवडेल.. Happy एक दुरूस्ती अशी आहे की सर्वांकडून संपूर्ण गाणं "सराव" करून घेतलं. सरावा दरम्यान व अखेरीस कुणाचे आवाज कुठल्या ओळीस घेता येतील, कुणाच्या आवाजाने कुठे अधिक ऊठाव येतोय हे स्पष्ट झाले. त्यामूळे अगदी दोघा चौघांचेच बहुदा (शक्यता कमीच!) संपूर्ण गाणे रेकॉर्ड झालेले आहे.

अर्थात पहिल्या ध्वनीमुद्रणापासून ते अंतीम धव्नीमुद्रणापर्यंत प्रत्त्येकाच्या त्याच ओळीची जवळ जवळ २०-३० व्हर्शनस तरी असतीलच. काही जणांचे व्हिडीयो रेकॉर्डींग केलेले आहे स्टूडीयो मध्ये. पण ते त्यांच्या परवानगी शिवाय टाकणे ऊचित होणार नाही.. शिवाय एक एक टाकण्यापेक्षा तुम्ही सुचवले तसे एक छोटे "मेकींग ऑफ साँग" धरतीवर व्हिडीयो संकलन करून टाकता येईल.. वेळ हवा हे सर्व करायला. तूर्तास अ‍ॅडमिन ने उपलब्ध करून दिलेली mp3 फाईल गोड मानून घ्या!

(दिया रोज एक नविन व्हर्शन घरात ऐकवते.. त्यामूळे कुठले ऐकायचे हा आम्हालाच प्रश्ण पडतो!) Happy

सतार, बासरी तर "जान" आहेच या रचनेची. आणि विजू तांबे (बासरी) व शुक्लाजी (सतार) सारख्या जादूगारांनी मी रचलेल्या अगदी कच्च्या (दगड) म्युझिक तुकड्याच त्यांच्या परिसस्पर्शाने अक्षरशः सोनं केलं.>>>>>>>
योग, वादकांबद्दल लिहिलंत हे फार छान झालं. विजु तांबे अप्रतिम वाजवतात आणि शुक्लाजींचं वादन मी प्रथमच ऐकलं.त्यांनी सुद्धा अप्रतिम वाजवलंय.
पूर्वी तर वादक कलाकार पडद्यामागेच राहात. त्यांना क्रेडिट मिळत नसे! आज ब-याचदा सी.डी. वर साथीदार वादक कलाकारांची नावं असतात.

अतिशय सुंदर झालं आहे मायबोली गीत. सगळ्या सहभागी कलाकारांचे हार्दिक अभिनंदन. Happy
दियाचा आवाज काय गोड आहे! खडीसाखरच जशी! Happy

(दिया रोज एक नविन व्हर्शन घरात ऐकवते.. त्यामूळे कुठले ऐकायचे हा आम्हालाच प्रश्ण पडतो!)
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

योग, आता माझ्या घरात "प्रणया" पण हे गाणं म्हणत फिरते... आणि तिला सगळी गाणी मधल्या म्युझिक पिससकट म्हणायची सवय आहे....... मायबोली गाणं पण मधल्या म्युझिक पिसेस सकट ती म्हणतेय.... : स्मित: ऐकताना फूल धमाल येतेय...... Wink

पूर्वी तर वादक कलाकार पडद्यामागेच राहात. त्यांना क्रेडिट मिळत नसे! आज ब-याचदा सी.डी. वर साथीदार वादक कलाकारांची नावं असतात.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

ही परंपरा सुरू करणारा "ए.आर. रेहमान" .... त्याने खर्‍या अर्थाने पडद्यामागच्या म्युझिशिअन्सना सीडीवर आणलं नावासकट.

सत्यजित,
हे यश संपूर्ण मायबोलीचं आहे. आपल्या मायबोलीकरांचं आहे.
आणि ….मित्रांनी पाया नाही पडायचं, हस्तांदोलन करायचं.
"दिल में बसनेवाले कदमों में जगह नहीं ढूंढा करते"
हा राजकुमारच्या ’शरारत’ मधला डायलॉग मारू का ?

खूप धन्यवाद

रार,
धन्यवाद.
तुझं आणि टीझर व्हिडिओ टीम मेंबर्सचं, या उपक्रमातला एक घटक म्हणून अभिनंदन.
ऑडियो टीझर लॉंच करणं हा वातावरण निर्मितीतला एक भाग होता आणि व्हिडिओमुळे गीताबद्दलची उत्सुकता निर्माण होण्यास हातभार लागला.

ह्या 'लष्करच्या भाक-या' भाजण्याकरता पाठिंबा, प्रोत्साहन देणा-या सर्वांच्या कुटुंबियांचे आणि मायबोली सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन >>>>
खरं तर लष्करच्या भाकर्‍या हा फील आलाच नसावा. ना शीर्षकगीत उपक्रमातल्या सभासदांना ना त्यांच्या कुटुंबियांना ना बाकीच्या मायबोलीकरांना. कारण या तर घरच्याच भाकर्‍या. आज इतक्या चवीनं चाखतायत सगळे की त्या भाजताना जरी हाताला (परिश्रमांचे) चटके/डाग पडले असतील तरीही ते चटके सुखद वाटतील आणि डाग तर, 'सर्फ एक्सेल' च्या जाहिरातीसारखे ---- "दाग अच्छे हैं !"

"दिल में बसनेवाले कदमों में जगह नहीं ढूंढा करते"
>>>>>>>>>>>

उकाका... "जानी" म्हणायला विसरलात Wink राजकुमार मोड आणि "जानी" नाही Proud

ह्या 'लष्करच्या भाक-या' भाजण्याकरता पाठिंबा, प्रोत्साहन देणा-या सर्वांच्या कुटुंबियांचे आणि मायबोली सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन >>>>
खरं तर लष्करच्या भाकर्‍या हा फील आलाच नसावा.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>

ऊकाका, परफेक्ट मलाही तसेच वाटले होते.....

सर्वांनी इतकी भरभरून दाद दिलेय की ऊर भरून आला.
प्रत्येकाला वैयक्तिक प्रतिसाद देणं शक्य होणार नाही त्यामुळे इथेच सर्वांना धन्यवाद देतो.

शीर्षकगीतासाठी योगेश(योग) यांनी घेतलेले कल्पनातीत अपार परिश्रम आणि त्यांना गायक माबोकरांनी आत्मीयतेने दिलेली साथ, या प्रोजेक्टचाच एक भाग असलेल्या टीझर व्हिडिओ टीम लीडर आरती रानडे (रार) आणि टीमचं योगदान, मायबोली प्रशासनाचा भक्कम पाठिंबा आणि तमाम मायबोलीकरांचं प्रेम; या सार्‍यातून
घडलेल्या या संगीतमय सृजन सोहळ्याचा मी एक छोटासा अंश आहे हे माझं परमभाग्य.

धन्यवाद.

Pages