चिन्ह : 'नग्नता - चित्रातली आणि मनातली'

Submitted by चिनूक्स on 3 January, 2012 - 00:11

यंदा पंचविशीत पदार्पण करणारं 'चिन्ह' हे मराठी कलावार्षिक चित्रकला आणि तिच्याशी संबंधित दृश्यकलांना केंद्रस्थानी ठेवून निघतं. मात्र चित्रकलेचा सर्वांगानी वेध घेणे इतकाच मर्यादित हेतू 'चिन्ह'चा निश्चितच नाही.

चित्रकला म्हणजे एका अर्थाने चित्रकारांची कहाणी. त्यांची वैयक्तिक आणि चित्रनिर्मितीच्या प्रेरणेची हकीकत काही वेगळी नसते याची जाणीव 'चिन्ह'ला आहे. चित्रकलेबद्दल बोलायचे तर आधी चित्रकारांची ओळख व्हायला हवी, त्यांचं जगणं, त्यांचं वावरणं, त्यांचं असणं यातून विकसित होत गेलेल्या त्यांच्या कलाविषयक जाणिवांचाही शोध घ्यायला हवा ही जाणीव 'चिन्ह'ला अगदी पहिल्या अंकापासून होती.

१९८७ साली स्वतः चित्रकार आणि पत्रकारही असलेल्या सतीश नाईक यांनी 'चिन्ह' पहिल्यांदा प्रकाशित केला तो दिवाळी अंकाच्या स्वरुपात. तोपर्यंतच्या दिवाळी अंकांमधे चित्रकला किंवा एकंदरीतच दृश्यकलांना अंकाच्या साहित्यिक विभागात काहीही स्थानच नव्हतं. अंकाच्या सजावटीपुरताच चित्रकलेचा संबंध. चित्रकलेचा व्हावा तसा 'संवाद'च त्यामुळे वाचकांशी होत नव्हता. 'चिन्ह'मुळे हा संवाद शक्य झाला. चित्रकार हे काही फक्त आपल्या स्टुडिओच्या चार भिंतींमधे बसून चित्र काढणारे गूढ अस्तित्व नाही , तर तुमच्या आमच्यासारखेच रागा-लोभांचे, मैत्री-प्रेमाचे, इगो-जेलसीचे कपडे पांघरलेली हाडामासांची माणसे आहेत याचे एक भान 'चिन्ह'ने वाचकांना दिले.

१९८७ ते ८९ आणि त्यानंतर २०००पासून आजतागायत चित्रकार गायतोंडे, प्रभाकर बरवे, वारली आणि मधुबनी चित्रकला पहिल्यांदा जगासमोर आणणारे चित्रकार भास्कर कुलकर्णी विशेषांक, रविवर्म्याच्या चित्रकारितेचा, त्याच्या उद्ध्वस्त साम्राज्याचा शोध घेणारा विशेषांक आणि 'निवडक चिन्ह' असे चित्रकलाविषयक अत्यंत दर्जेदार आणि संग्राह्य विशेषांक 'चिन्ह'ने दिले.

‘चिन्ह'चा या वर्षी आलेला 'नग्नता - चित्रातली आणि मनातली' हा विशेषांक या सर्वांत सर्वार्थाने आगळा. 'नग्नता' या शब्दाच्या चित्रकलेतील व्याप्तीसंदर्भात सांगोपांग चर्चा, इतिहास-संस्कृती, १९व्या शतकाच्या पूर्वार्धात भारतीय कलाशिक्षणात समाविष्ट करण्यात आलेल्या न्यूड चित्रणाच्या संदर्भातली, आजवर कधीही प्रकाशात येऊ न शकलेली माहिती, अ‍ॅकेडेमिक न्यूड स्टडीमधून नंतर प्रत्यक्ष पेंटींग, शिल्प, इन्स्टॉलेशन्स, लाईव्ह आर्टपरफॉर्मन्सेसपर्यंत झालेला प्रवास यात आहे.

चित्रकार अकबर पदमसी, सुधीर पटवर्धन, प्रभाकर कोलते,सुहास बहुळकर, देवदत्त पाडेकर, साहित्यिक भालचंद्र नेमाडेंपासून, मेघना पेठे, कविता महाजन, प्रतिभा रानडे, मानसोपचारतज्ञ डॉ.आनंद नाडकर्णींपासून सेक्सॉलॉजिस्ट डॉ.प्रकाश कोठारी, शास्त्रोक्त नर्तिका पार्वती दत्ता अशी अनेक व्यक्तिमत्त्वे यात लिहिती झालेली आहेत, हिंदू कॉलनी ते अ‍ॅमस्टरडॅम असा प्रवास करणार्‍या लाईव्ह आर्टपरफॉर्मर मोनाली मेहेरचे चित्तथरारक आयुष्य यात आहे.

Monali Cover.jpg

Padekar Cover.jpg

'नग्नता - चित्रातली आणि मनातली' या विशेषांकाच्या संपादनाची जबाबदारी घेतलेल्या शर्मिला फडके यांनी या अंकात हा अंक काढण्यामागची 'चिन्ह'ची भूमिका मांडली आहे. ती अशी-

नग्नतेचा स्वीकार कठीणच असतो. पाहणार्‍याची दृष्टी विशाल नसेल तर शरीरच काय, मन उघडे करणारा माणूसही अनादरासच पात्र ठरतो. - फ्रान्सिस बेकन

’न्यूड विशेषांक’ काढण्याचं ’चिन्ह’ने का ठरवलं? समाजाची संवेदनशीलता टोकाला येऊन पोचलेली असताना हा अंक काढायचं धाडस 'चिन्ह'ला करावसं वाटलं ते नेमकं कोणत्या भूमिकेतून? आजच्या समाजात वेगवेगळ्या माध्यमांमधून नग्नता इतकी चेहर्‍यावर आदळत असताना, नग्नतेचं जरुरीपेक्षा जास्त स्तोम माजवलं जात असल्याचा, त्याला नको इतकं ग्लॅमर बहाल होत असल्याचा आरडाओरडा होत असताना ’चिन्ह’ अजून काय वेगळं आपल्या अंकामधून देणार आहे? समाजात नग्नतेविषयीची इतकी ओढ, औत्सुक्य आणि नग्नतेविरुद्ध होत असलेली ओरडही सर्वात जास्त. हा विरोधाभास का? कशामुळे?

'चिन्ह'ला हे जाणून घेण्याची गरज वाटली.

‘आर्ट न्यूड’ किंवा ‘कलेतल्या नग्नतेचा शोध’ निदान मराठीत तरी संपूर्णपणे अस्पर्शित. प्रत्येकच चित्रकार किंवा शिल्पकाराच्या कलाप्रवासात कधी ना कधीतरी न्यूड फॉर्मकडे आकर्षित होण्याचा टप्पा आलेला असतोच. चित्रकाराच्या दृष्टीने न्यूड हा एक वेगळाच विषय. निव्वळ रेषांच्या रेखाटनात माध्यमाच्या शुद्धतेचा आविष्कार असतो. नग्नतेतही तीच शुद्धता कदाचित त्याला जाणवत असावी. कलेतून साकारलेल्या नग्नतेविरुद्ध समाजाच्या रोषाला सामोरे जाणार्‍या कलाकारांची संख्या खूप मोठी आहे. नग्नतेचं आकर्षण जितकं सनातन आणि कालातीत तितकाच नग्नतेला होत असणारा विरोधही. यामागचं कारण कदाचित समाजाने नग्नतेचा संबंध कायम लैंगिकतेशी जोडला. कलाकाराला मात्र त्यामधे काहीतरी खूप पलीकडचे सापडत गेले. नक्की काय असावे ते जे चित्रकाराला कॅनव्हासवर नग्नतेला साकारताना गवसत गेले? ’चिन्ह’ ला ते जाणून घ्यावेसे वाटले.

जाहिरात, चित्रपट वा इतर नव्या माध्यमांमधून सतत सामोर्‍या येणार्‍या अर्धनग्नतेला मिटक्या मारत स्वीकारणारा हाच समाज आणि कलाप्रदर्शनांमधून कलाप्रदर्शनांमधून नग्नतेचं दर्शन झालं तर आक्रस्ताळेपणाने प्रदर्शन उतरवण्याचा आग्रह धरणाराही हाच समाज. न्यूडकडे बघण्याचा समाजाचा नेमका दृष्टिकोन काय? विचारवंतांची भूमिका काय? दृश्यकलेच्या अंगानं नग्न प्रतिमा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे दोन मुदे महत्त्वाचे आहेत. चित्र आणि प्रत्यक्ष यांत एवढी दरी अजूनही का आहे? कलेतल्या श्लील-अश्लीलतेची नक्की परिमाणे काय?
'चिन्ह'ला हे जाणून घ्यावेसे वाटले.

'समाजस्वास्थ्य' अंकाच्या मुखपृष्ठावर तुम्ही नग्न चित्रे छापता हे समाजहिताला बाधक आहे, अशी वाचकांची सातत्याने पत्रे आल्यावर र.धों.कर्व्यांनी ऑक्टो. १९२९च्या अंक ४मध्ये त्यास सडेतोड उत्तर दिले. र.धों. लिहितात- "मुखपृष्ठावर पूर्ण पोशाखातल्या बाईचे चित्र हवे होते, असे आपले मत. पूर्ण पोशाख म्हणजे हात,पाय,तोंडसुद्धा झाकायचे नां? नसल्यास का नाही? पोशाख अस्वास्थ्य उत्पन्न करतो. नग्नता रानटी नाही. ती निरागस असू शकते." कोर्टाने १९२६- २७ सालातल्या एका खटल्यात दिलेल्या निकालाचा निर्वाळा देऊन र.धों.नी पुढे एप्रिल १९३२ वर्ष ५, अंक १०मध्ये असे लिहिले आहे की, "चित्रातल्या स्त्रिया अनावृत आहेत याचा अर्थ ती चित्र अश्लील आहेत असे ठरवण्याचे काहीच कारण नाही. रुचत नसतील तर ती न बघण्याचा अधिकार (त्यांना) आहे. कोर्टाच्या निकालानुसार प्रौढांची चित्रे पाठीकडून अश्लील नाहीत व स्त्रियांचे स्तन अश्लील नाहीत. फक्त जननेंद्रिये अश्लील आहेत. ती न दिसतील अशी व्यवस्था केली आहे. कलेच्या दृष्टीने चित्राचा दर्जा उच्च असल्यास ते अश्लील होत नाही. उदा. मनुष्याचा इतर प्राण्यांशी समागम दाखवल्यास तो अश्लील होईल पण ग्रीक लोकांचा एक देव हंसाच्या रुपाने एका स्त्रीसमवेत एका प्रसिद्ध चित्रकाराने दाखवला आहे, त्यास कोणीही अश्लील म्हणणार नाही. पुस्तकावर नग्न चित्रे छापल्याबद्दल एका प्रकाशकास दंड झाला, कारण जज्जाचे मत पुस्तकांत नग्न चित्रे असल्यास हरकत नव्हती पण कव्हरावर असू नये. हा दंड अपिलात माफ झाला. अपील कोर्टाचे म्हणणे पडले की नग्न शरीर दाखवण्यात अनीती नाही. २० वर्षांपूर्वी अशा चित्रांनी लोकांचे मनास धक्का बसला असता परंतु हल्ली मन:स्थिती बदलली आहे. शिवाय पूर्ण नग्नतेपेक्षा अर्धनग्नताच अधिक उद्दीपक असते. जेथे स्त्रीपुरुष एकत्र नग्न स्नान करतात तेथे अनीती जास्त दिसत नाही. वास्तविक अनीतीचा व नग्नतेचा संबंध नाही. एकंदरीत प्रस्तुत चित्रामुळे आधुनिक मनुष्याचे मन दुखवण्याचा संभव नाही असे कोर्टाने ठरवले."

र.धों.कर्व्यांना १९३२ साली वाटत होते की आता समाजमन बदलले आहे, अधिक प्रगल्भ झाले आहे, आता लोकांच्या मनाला चित्रातल्या नग्नतेमुळे धक्का बसणार नाही. आज २०११ साली म्हणजे तब्बल ७९ वर्षांनंतरही समाजमन बदलले आहे, कलेतल्या नग्नतेला स्वीकारण्याइतके प्रगल्भ झाले आहे असे म्हणता येईल का? र.धों. आज अवतीर्ण झाले तर चित्रातल्या नग्नतेमुळे अजूनही समाजमनाला धक्का बसतो, इतकेच नव्हे तर आता कलाप्रदर्शने बंद पाडली जातात, नग्नतेच्या कारणावरुन चित्रे फ़ाडली जातात, जाळली जातात, उलटी करुन लटकवली जातात हे पाहून उलट त्यांच्याच मनाला जास्त जबर धक्का बसला असता हे नक्की.
नग्नतेचं आकर्षण ही खरं तर नैसर्गिक, सहज प्रवृत्ती. अगदी प्रागैतिहासिक काळापासून, आदिमानवाने रेखाटलेल्या भित्तीचित्रांमधेही नैसर्गिक अवस्थेतला मानवी देहाकार हा महत्त्वाचा चित्र-शिल्पविषय. नग्न कलाकृती केवळ नग्न देह साकार करत नाही, तर आपल्या कल्पनाविश्वातील सगळ्या अमूर्त आकृतींशी तिचा समन्वय साधते. 'To see you naked is to recall the Earth' यात किती सुंदर अर्थ सामावलेला आहे. 'तुला नग्नावस्थेत पाहणे म्हणजे भूमीला स्मरणे'. नग्नतेकडे वळणं म्हणजे मूलभूतपणाकडे जाणं. माणसानं संस्कृती विकासांच्या मार्गावरुन प्रवास करताना समाजनिर्मितीच्या एका टप्प्यावर सार्वजनिक जीवनात शरीरावर कपड्यांचं आवरण स्वीकारलं, नीतिमत्तेचे, सभ्यतेचे नियम त्यानुसार ठरवले. सर्वसामान्य माणसाने ते कसोशीने पाळले. पण नग्नतेचं मुलभूत आकर्षण आंतरस्तरावर आपलं अस्तित्व कायमच टिकवून राहिलं. स्वच्छंद मनाच्या कलाकाराला मात्र आपल्या कलेच्या विश्वात जेव्हा जेव्हा या बंधनांचा जाच झाला तेव्हा त्या प्रत्येकवेळी त्याने नागरी सभ्यतेची ती प्रतिकं मुक्तपणे भिरकावून दिली. कलाकाराच्या कलेमधून नग्नता या ना त्या रूपात डोकावतच राहिली. अगदी भारतीय सनातन समाजातही असे कलाकार प्रत्येक पिढीमधे जन्मत राहिले आणि त्यांच्या कलेतल्या नग्नतेला समाज कधी नाकारत, कधी झिडकारत, बरेचदा उधळून टाकत, क्वचितच स्वीकारत राहिला.

कलेवर झालेला हल्ला हा कायमच क्लेशदायक असतो. हल्ल्यामागे बहुतेकदा काहीही तार्किक संगती नसते. कलेतील श्लील-अश्लीलता वाद तर सनातनच आहे. सनातनी वृत्तीनेच तो मुळात जोपासला. सनातनी, संकुचित मनाला कलेतील अभिजाततेशी काहीच देणेघेणे नसते. कलांची अशी काही स्वतंत्र मूल्ये असतात, जीवनातील मूल्यांशी ती प्रत्येकवेळी समांतर नातं जोडू शकतीलच असं नाही याचं भान सनातनी मनात नसतं. ’नग्नते’च्या नुसत्या उच्चाराने सनातनी वृत्तीच्या लोकांचं टाळकं सतराव्या शतकात सटकलं, विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकामध्येही सटकत होतं आणि तसंच ते आज एकविसाव्या शतकाचं पहिलं दशक उलटून गेल्यावरही सटकतं.
या प्राचीन कलाविष्कारात अजूनही समाजात प्रक्षोभ उसळवण्याची ताकद टिकून आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं वॉशिंग्टन डीसी येथील 'नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट'मध्ये असलेल्या गोगॅंच्या ’टू ताहितियन वीमेन’ वर नुकत्याच झालेल्या हल्ल्यामधून. पॉल गोगॅंने चितारलेली ही एक अत्यंत सुंदर, अभिजात कलाकृती. आदिम जमातीच्या दोन अनावृत स्त्रिया अत्यंत नैसर्गिक सहजतेनं, फक्त ताहिती बेटावरच आढळू शकतो अशा सोनेरी, झळाळत्या, अनोख्या सूर्यप्रकाशाला अंगावर झेलत अत्यंत नैसर्गिक सहजतेनं बसलेल्या गोगॅंनं चितारलेल्या आहेत. या ताहिती स्त्रियांच्या ताम्रवर्णीय अनावृत त्वचेवरचा सोनेरी सूर्यकिरणांचा अनोखा आविष्कार त्या स्त्रियांनी त्वचेवर जणू सुवर्ण ल्यायलेलं आहे, असा आभास उत्पन्न करणारा. नग्नता इतकी आवश्यक सहजतेनं, इतक्या नैसर्गिकरित्या यात चितारलेली आहे की खरं तर ती वेगळी अशी जाणवतही नाही. हल्लेखोरांच्या म्हणण्यानुसार गोगॅंच्या या चित्रात दोन नग्न स्त्रिया आहेत आणि त्यातून समलैंगिकता सूचित होऊ शकते. लहान मुलांवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. अमेरिकेसारख्या प्रगत देशामधे जिथे मुक्त लैंगिकतेचा खुला आविष्कार समाज नित्य झेलत असतो तिथे एका सोळाव्या शतकात चितारल्या गेलेल्या, अभिजात पेंटिंगमधल्या कलात्मक नग्नतेसंदर्भात आज एकविसाव्या शतकातलं पहिलं दशक उलटून गेल्यावर अशी प्रक्षोभक प्रतिक्रिया उमटू शकते. या अप्रतिम चित्रामधल्या इतर कोणत्याही सौंदर्यापेक्षा त्यातली नग्नताच फक्त बघितली जावी, चित्रातल्या त्या नैसर्गिक, सहज नग्नतेवर लैंगिकतेचा आरोप व्हावा, ती आक्षेपार्ह ठरावी हे दुर्दैव.

अर्थातच ही काही पहिली आणि एकमेव घटना नाही. शतकानुशतकं कलेवर हे असे हल्ले होतच राहिलेले आहेत. १९१४ मधे लंडनच्या नॅशनल गॅलरीमधल्या पाठमोर्‍या नग्न व्हिनसचं चित्र, जिच्यासमोर चित्रातल्या क्यूपिडने आरसा धरलेला आहे आणि त्या आरशातून ती स्वत:कडे व आपल्याकडे रोखून पहात आहे, ते संस्कृतीच्या अशाच अंधरक्षकांनी चाकूने फाडले, रेम्ब्रांच्या 'डॅने इन द हर्मिटेज’वर १९८०मध्ये अ‍ॅसिड फेकून ते विद्रुप केलं गेलं. अभिजात चित्रांवर नग्नतेच्या विरोधात असे हल्ले होतच आहेत.

आधुनिक माध्यमांद्वारे नग्नतेच्या सतत भडिमाराला समाजाच्या सरावलेल्या नजरांनाही पेंटिंगसारख्या तुलनेनं जुन्या, अतिरुळलेल्या कलामाध्यमामधून जर मानवी देहाचं नग्न दर्शन झालं तर इतका सांस्कृतिक धक्का का बसावा? चित्र-शिल्पकलेतून आविष्कृत होणारी नग्नता विलक्षण जिवंत भासू शकते. या माध्यमांची ही ताकद आहे. टीव्ही-सिनेमामाधून दिसणारी प्रत्यक्ष नग्नतेपेक्षा पेंटिंगमधून चित्रकाराने रेखाटलेल्या रेषांमधून, रंगांमधून जिवंत होणारी नग्नता जास्त परिणामकारक ठरावी हे अजब आहे, अभिजात कलेमधली ताकद सिद्ध करणारं काहीतरी त्यात आहे हे निश्चित.

कलाकाराला आपल्या कलेमध्ये अपेक्षित असणारं स्वातंत्र्य आणि समाजातल्या नीतिमत्तेच्या संकल्पना यांमध्ये एक खूप मोठी दरी कायमच राहिली. लोककलेमधून जीवनाला बेधडकपणे भिडणारे लैंगिक संकेत नागरी कलेमधून व्यक्त होताना मात्र नीतिमत्तेच्या पोलादी अंकुशांचा सामना करत राहीले. कलासाहित्यामधील नग्नतेविषयीचे किंवा लैंगिकतेविषयीचे संदर्भ हे सूचक किंवा प्रतिकात्मक पातळीवरच असावेत असा एक तथाकथीत सभ्य समाजाचा आग्रह असतो. पण मग उघड्पणे व्यक्त होणारा शृंगार किंवा लैंगिकता ही कायम असुंदर किंवा बीभत्स या पातळीवरच रहाते असं असतं का? चित्रकारितेमधे हा झगडा सातत्याने सुरु राहिलेला आहे.

गोयांने आपल्या चित्रातल्या नग्नतेला झाकण्याचं नाकारलं. रोमन कॅथॉलिक चर्चने मायकेलअ‍ॅजेलोने चर्चच्या भिंतीवर चितारलेल्या पेंटिंग्जमधली नग्नता अंजिरांच्या पानांनी झाकण्याकरता स्वतंत्र चित्रकार नेमले. कालांतराने स्वत:ची चूक उमजून पुन्हा त्या मूळ चित्रांचे पुनरुज्जीवनही केलं. अर्धनग्न, अभिजात चित्रं समाजाने उदारपणे स्वीकारली पण संपूर्ण नग्नतेला स्वीकारायला सभ्य समाज अजूनही बिचकतो आहे.
विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातल्या व्हिएन्नाच्या ‘शीले’ची चित्रातली नग्नता आणि लैंगिकता ही युद्ध आणि धर्माइतक्या अपरिहार्यतेनेच समाजाने स्वीकारायला हवी असा आग्रह धरला आणि तो तुरुंगात खितपत राहिला. शीलेची नग्न चित्रं जीवनावर भाष्य करत नाहीत. जीवनाचा एक भाग होऊ पहातात. समाजाला कलेतल्या नग्नतेचा हा इतका जिवंतपणे आणि थेटपणे जीवनावर पडणारा प्रभाव कधीच मान्य होणारा नव्हता. कुठलीही कला ही खर्‍या जीवनाचं प्रतिबिंब असते. आर्ट इमिटेट्स लाईफ, हे मान्य केले व जीवनात जे जे शक्य आहे ते ते कलेत उतरवणे असेही, तर मग चित्रपटसृष्टीने केलं तसं कलेच्याही सगळ्याच प्रकारांचं वर्गीकरण का करु नये असाही एक मतप्रवाह यातूनच निर्माण होतो.

भारतीय कलाविश्वातही ठाकुरसिंगांची १९३० सालातली ‘ओलेती’ असो किंवा त्याही आधीचं रविवर्म्याचं ‘प्रणयिनीचा मनोभंग’ चित्र असो, वादविवादांचा धुरळा त्या त्या काळात त्या चित्राकृतींना टाळता आलाच नाही. ही चित्रं छापल्याबद्दल मासिकांवर खटले भरले गेले तेव्हा अशा चित्रांना बघून ’विपरित जाणिवा’ फक्त दुबळ्या मनातच निर्माण होऊ शकतात, असा स्पष्ट निर्वाळा दिला गेला. ही ’दुबळी मनं’ त्यानंतरही प्रत्येक पिढीत आजतागायत जन्मत आलेली आहेत हे कलासंस्कृतीचं दुर्दैव.

भारतीय रक्तात ’कला आणि नग्नता’ या दोन गोष्टींची परस्परांशी सांगड घालण्यासंदर्भातले नकारात्मक संस्कार इतके खोलवर रुजलेले का असावे? कलेतली नग्नता भारतीय समाजात गेली कित्येक शतकं जवळपास निषिद्ध. अध्यात्मिक दृष्टिकोनातून, तत्त्वज्ञानाच्या आवरणाखाली असेल तरच नग्नता निदान थोडीफार स्वीकारली जाऊ शकते. पण बाकी खजुराहो, गीतगोविंद किंवा भर्तृहरीच्या शृंगारशतकाच्या वारशापासून भारतीय समाज आता संपूर्णपणे तुटलेला. युरोपियन चित्रशिल्पकलेतून सार्वजनिक उघडपणे मिरवणार्‍या प्रमाणबद्ध, देखण्या आणि कलात्मक नग्नतेला स्वीकारण्यापासून आपण असंख्य योजने मागे राहिलो ते राहिलोच. एकेकाळी शिल्पांमधून किंवा इरॉटिक आर्टमधून कलात्मकतेनं समाजातल्या अनेक स्तरांमध्ये सहज वावरणारा शृंगार आणि नग्नता आता विकृत पॉर्नोग्राफीच्या स्वरुपात आपल्या समाजातल्या अंधार्‍या कानाकोपर्‍यांमध्येच फक्त शिल्लक राहिला. सिनेमा, गाण्यांमधून आपलं केविलवाणं, अप्रत्यक्ष अस्तित्व दाखवत राहिला.

समाजाला, मानवी मनाला नग्नता अनेक पातळीवरुन अस्वस्थ करते. जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणाला होता- आपण शरमेच्याच वातावरणात राहतो. आपलं जे काही वास्तव आहे त्याची आपल्याला शरमच वाटते. आपली स्वत:ची शरम, आपल्या नातेवाइकांची, मिळकतीची, भाषेची, मतांची, अनुभवांची शरम.. आपल्याच अनावृत त्वचेची शरम!

आपल्या भारतीय समाजात नग्नतेविषयी, लैंगिकतेविषयी एक खूप औत्स्युक्य जनसामान्यांमधे आढळते, समाजाची नग्नतेविषयीची ओढ प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे विविध माध्यमांच्या आविष्किरीकरणातून व्यक्त होत असते आणि तरीही कलेतली नग्नता स्वीकारताना आरडाओरड होते. हा विरोधाभास का? झाकलेपणाच्या अवडंबरातूनच विकृतीचा जन्म होतो. काहींना नग्नतेचं इतकं वावडे असते की त्यांना एखादे नागवे सत्यदेखील असभ्य वाटत असावे. आधुनिक समाजाने चढवलेल्या मोकळेपणाच्या बुरख्याआड अजूनही कलेतल्या नग्नतेला स्वीकारण्यात कुठेतरी संकोचलेपणा, संकुचितपणाही आहे. ते भेदून एका मोकळ्या स्तरावर पोचायचं तर वैचारिक मंथन सतत व्हायला हवे. कलादालनांच्या विश्वात तरी कोणती आवरणे नकोत. बुरखे नकोत. स्वत:च्या स्वतंत्र, मुक्त अवकाशाचा आणि निर्मितीचा अधिकार कलाकारांना मिळायलाच हवा.

नग्नतेकडे बघण्याचा आजच्या समाजाचा दृष्टिकोन नेमका आहे तरी कसा? त्याबाबत आजच्या विचारवंतांची भूमिका काय आहे हे जाणून घेणं ’चिन्ह’ कलावार्षिकाला महत्त्वाचं वाटतं. साहित्य, सिनेमा, संवादाची नवी सामाजिक माध्यमं, मालिका यांमधून अश्लीलतेच्या, लैंगिकतेच्या बाह्य संकल्पना, दृष्टिकोन यांत खूप बदल झाला आहे, असं वरकरणी जाणवतं. पण त्याच बरोबर धार्मिक जाणिवांबाबतची संवेदनशीलता जास्त वाढली आहे, खुलेपणा ऐवजी कलेतल्या, साहित्यातल्या स्वीकारांसंदर्भात संकुचितपणा जास्त आला आहे, असंही दृश्य दिसतं. श्लील-अश्लीलतेच्या संकल्पनांमधला ढोबळपणाही अजिबात कमी झालेला नाही उलट जास्त वाढला आहे.
मुळात कलेतली श्लील-अश्लीलता ठरवण्याचे निकष काय? अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत कलाकाराची आणि समाजाची नेमकी भूमिका काय असावी? नग्न चित्र-शिल्प, शृंगारिक कलानिर्मितीबाबत कलाकार आणि समाजामध्ये इतका विसंवाद का असावा? आजच्या जागतिकीकरणच्या पार्श्वभूमीवर कलाकाराच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे बदललेले निकष, कलानिर्मितीच्या बदललेल्या संकल्पना समाजाने आपल्यात रुजवून घ्याव्यात का? कशा? कलेतली नग्नता बहुतांशी स्त्रीदेहापाशीच का घोटाळत राहीली? टीव्ही चॅनल्स, वेबसाईट्स, यूट्यूब, ब्लूटूथ यांसारख्या आधुनिक संवादमाध्यमांद्वारा शारीर नग्नतेचा भडीमार सातत्याने अंगावर घेणार्‍या नव्या, पौगंडावस्थेत असलेल्या पिढीच्या कलासंवेदनांचं काय? नग्नतेतली कलात्मकता संवेदनशीलतेनं त्यांच्या मनापर्यंत पोचणार आहे का? कशी? हे आणि असे अनेक प्रश्न सातत्याने गेल्या काही वर्षांमध्ये समोर येत गेले आणि म्हणून मग ’चिन्ह’ने ’नग्नता-चित्रातली आणि मनातली’ विषयाद्वारे या प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्याचं ठरवलं. झाकलेपणाच्या अवडंबरामधून समाजात नग्नतेचं अप्रत्यक्षरित्या जे स्तोम माजवलं जातं त्याला ’चिन्ह’ने थेट भिडून छेद द्यायचं ठरवलं.

नग्नतेचा संबंध आपल्याकडे कायम लैंगिकतेशी जोडला गेला. पण ’चिन्ह’चा हा अंक संपादित करत असताना कलेच्या संदर्भातून जेव्हा नग्नतेकडे पाहिलं तेव्हा खूप वेगळे कंगोरे सापडत गेले. कलाकाराच्या मनात नग्नतेची ओढ का? आर्टस्कूलमध्ये चित्रकलेच्या शिक्षणासाठी प्रवेश घेणार्‍या मुलांचं वय पौगंडावस्थेच्या आसपासचं असतं. कलाशिक्षणाची सुरुवात कलेच्या इतिहासापासून करताना त्या मुलांचा परिचय प्राचीन-पौराणिक नग्न चित्र-शिल्पकृतींशी होतो. त्या शिल्पकृतींमधून नग्नतेतली कला समजावून घेत असताना एक दिवस त्यांना प्रत्यक्ष समोर बसलेल्या नग्न मॉडेलवरुन मानवी देहाकृतीची वळणं रंगवायला शिकण्याचा अभ्यास करायचा असतो. न्यूडक्लासमधे बसलेले विद्यार्थी, त्यांच्या समोर एका स्त्री अंगावरचे कपडे काढून नग्न होते आणि मग ती मुलं तिच्या देहाची वळणं कागदावर रेखाटतात. या दरम्यान त्या विद्यार्थ्यांचा मानसिक प्रवास कसा असू शकेल? त्यांचे कलाशिक्षक त्यांच्याशी कसा संवाद साधतात, कसं मार्गदर्शन करतात? चार पैसे मिळतात म्हणून ३०-४० तरुण विद्यार्थ्यांसमोर विवस्त्रावस्थेत तासन तास बसताना मॉडेलची मानसिक अवस्था काय असू शकते? आजवर असंख्य कलाकारांनी न्यूड रंगवली पण त्यांच्या कला आयुष्यात येऊन गेलेल्या या महत्त्वाच्या टप्प्याबद्दल कधीच कोणी लिहिलं नाही, बोललं नाही. अनेक वर्षांपूर्वी 'मौज' दिवाळी अंकात उर्मिला सिरुर यांची न्यूडक्लासमधल्या एका विद्यार्थिनीची मनोवस्था अत्यंत तरलतेनं रंगवणारी एक कथा येऊन गेली होती. या विषयाला थोडाफार स्पर्श करु शकणारं ते बहुधा एकमेव साहित्यिक उदाहरण. बाकी निदान मराठीमध्ये तरी या विषयाचा कधी विचारच केला गेला नव्हता.

श्लील-अश्लीलतेच्या मर्यादा ठरवणे हे दुधारी तलवारीसारखे आहे व ते हाताळणे सोपे नाही. श्लील-अश्लीलतेच्या प्रत्येकाच्या जाणिवा वेगवेगळ्या असू शकतात, पण स्वत:च्या वैयक्तिक परिघाबाहेर जेव्हा आपण समाजात वावरतो तेव्हा एका विशिष्ट, सर्वसाधारणपणे मान्य असलेल्या चौकटीत राहून वावरणे अपेक्षित असते. ही चौकट धूसर किंवा लवचिक असू शकते, पण ती मान्य असायलाच लागते. इतरांच्या जाणिवा, संवेदना यांचा त्यात आदर असतो. सार्वजनिक ठिकाणी सर्वांच्या जाणिवा-नेणिवा, मानसिकता, उद्देश, श्लील-अश्लीलतेच्या व्याख्या, त्यांचा स्वीकार हे सारखे असणे शक्य नाही, पण मग कलाकाराच्या मुक्त कलाविष्काराचे काय? त्यानं आपल्या कलेचा मुक्त आविष्कार करताना प्रत्येकवेळी या बंधनांचा विचार केला तर त्याच्या अभिव्यक्तीवर प्रचंड प्रमाणात मर्यादा येऊ शकतात. अशा वेळी कलावंताच्या, आणि कलाविषयक जाणिवा प्रगल्भ असणा-या, प्रशिक्षित नजरेच्या आस्वदकांसाठी एका स्वतंत्र अवकाशाची निर्मिती असावी हा एक विचार. पण मग सर्वसामान्य जनतेपासून कला अधिकाधिक दूरच जाण्याची यात संपूर्ण शक्यता दिसून येते त्याचं काय?

हुसेनसारख्या उदाहरणात वाद फक्त ’कला आणि नग्नता’ इतपतच मर्यादित नाही. त्याला धर्म, राजकारण असे अनेक स्तर जोडले गेले आहेत. कलाकाराने या सर्वाचे उत्तरदायित्व मानावे का? किती मर्यादेपर्यंत मानावे असा एक मूलभूत प्रश्नही या उदाहरणातून अपरिहार्यपणे जन्म घेतो. या प्रश्नाची उत्तरे समाजातील अनेकांनी आपापल्या परीने शोधायचा प्रयत्न केला. अनेक मतांतरे, वैचारिक मतभेद यांतून एक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. समाजातील विचारवंतांची, हुसेनच्या समकालीन कलावंतांची, पुढच्या पिढीतल्या कलावंतांची, साहित्यिकांची यासंदर्भात नक्की भूमिका काय हे एकत्रितपणे जाणून घेणे ’चिन्ह’ला अत्यावश्यक वाटले.

नग्नतेचं समर्थन, हुसेनवादामध्ये कोणतीही एक बाजू उचलून धरण्याचा ’चिन्ह’चा हेतू अर्थातच नाही. नग्नता ही चित्र-शिल्पमाध्यमामधून शतकानुशतकं आविष्कृत होतच आहे, कलाकाराला मोहात पाडतच आहे, कधी ती स्वीकारली गेली, बहुतेकदा तिला कडाडून विरोधच झाला. कलेतल्या नग्नतेमध्ये प्राचीन कालापासून जे आदीम भावना, मग ती आकर्षणाची असो वा संतापाची, ती चेतवून तिचा उद्रेक करण्याची जी ताकद आहे तिचं कुतूहल वाटलं, त्या ताकदीचा वेध घ्यावासा वाटलं इतकंच. बदलत्या पिढीनुसार बदलत्या सभ्यतेच्या संकेतांचा वेध घ्यावा, त्या अनुषंगानं समाजातल्या सर्व क्षेत्रातल्या विचारवंतांशी संवाद साधावा हा हेतू. समाजातील विचारवंत, बुद्धिवंत समाजाला दिशा देण्याचे काम करतात. वैचारिक गोंधळात समाज भिरभिरत असताना या विचारवंतांनी दाखवलेली एक ठाम दिशा सुकाणूचे काम करु शकते. हुसेनच्या वादग्रस्त चित्रांसंद्र्भातून झालेला वाद आणि त्यानिमित्ताने ’कला आणि नग्नता’ या विषयासंदर्भात पुन्हा पुन्हा उद्भवणार्‍या मुलभूत प्रश्नांची उत्तरं शोधणारा एक सशक्त परिसंवाद ’चिन्ह’च्या या अंकाचा मध्यवर्ती गाभा ठरला.

एका चित्रकाराच्या विरोधात देशभर वावटळ उठली. धार्मिक कट्टरवाद्यांची बाजू ठामपणे लोकांसमोर आली पण यासंदर्भातल्या कलावंतांच्या, विचारवंतांच्या भूमिका एकत्रित ठळकपणे कधी समोर आल्याच नाहीत. दैनंदिन जीवनाच्या लढ्यात अभिव्यक्तीस्वातंत्र्यासारख्या प्रश्नांकडे गंभीरपणे लक्ष द्यायला सामान्य जनतेला फुरसत नाही आणि कलाकारांना, विचारवंतांना वेळ नाही किंवा गरज वाटत नाही, आपल्यावर बेतल्याशिवाय यासंदर्भात मत व्यक्त करावं असं त्यांना वाटत नाही बहुधा. त्यामुळे यासंदर्भात ठाम भूमिकाच कधी मांडली गेली नाही. हुसेनला देशातून परागंदा व्हायला लागल्यावर ठोसपणे कलाकार आपली भूमिका व्यक्त करतील असं वाटलं होतं, पण तसंही झालं नाही. पेज थ्री, टीव्ही चॅनल्स, ग्लॉसी इंग्रजी कलामासिकांमधून हुसेननं देशात परत यावं, त्यांच्यावर अन्याय झाला अशा काही सुट्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्याही, पण त्यात ना कलेच्या स्वातंत्र्याबद्दलचे विचार ना कलाकाराची चाड ना त्यांच्या चित्रातल्या वादग्रस्तततेबद्दलची ठाम भूमिका. या सर्व प्रतिक्रिया बहुतेककरुन सावध किंवा स्वत:ला त्यातून प्रसिद्धी कशी मिळेल, सनसनाटी कशी निर्माण होईल अशा विचारातूनच जन्मलेल्या. ’चिन्ह’ने आजच्या काळातल्या विचारवंतांचे, साहित्यिकांचे, कलाकारांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य, कलाकाराचं समाजाप्रती उत्तरदायीत्व यासंदर्भातले विचार जाणून घेणं महत्वाचं मानलं.
सगळ्याच प्रश्नांची उत्तरं त्यातून आम्हांला मिळाली का? तर त्याचं उत्तर नि:संदिग्धपणे ’हो’ असं आम्हाला निश्चितच देता येणार नाही. प्रश्नांच्या उत्तरातूनही काही नवे प्रश्न आमच्या मनासमोर आले. पण निदान एक विचारमंथन निश्चित झालं. अनेक नवे पैलू समोर आले. विचारांना नव्या दिशा मिळाल्या. अकबर पदमसीसारख्या ज्येष्ठ आणि सुधीर पटवर्धनांसारख्या विचारी चित्रकारांनी कलेमधल्या नग्नतेसंदर्भात कलावंतांचा अधिकार, स्वातंत्र्याबद्दल एक ठाम, निश्चित, समाजाला मार्गदर्शनपर भूमिका मांडली. मात्र काही भ्रमनिरासही झाले. समाजातल्या काही मान्यवर विचारवंतांनी, कलाकारांनी नग्नता किंवा एकंदरीतच कलास्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्यासंदर्भात मत व्यक्त करताना जी बोटचेपी, सावध भूमिका घेतली ती धक्कादायक आणि समाजाची नग्नतेसंदर्भातली दुटप्पी, दांभिक भूमिकाच अधोरेखित करणारी ठरली. परिसंवादासाठी संपर्क साधल्यावर काहींनी विषयाचा आवाका पाहून सहभागी होण्याचे टाळले, काहींनी स्पष्टपणे नकार देता आला नाही तेव्हा शेवटपर्यंत तंगवलं, पण ज्यांनी भाग घेतला त्यांनी मात्र संपूर्ण सहकार्य दिलं. अत्यंत मोकळेपणाने, परखडपणाने, अभ्यासू वृत्तीने ते परिसंवादात सहभागी झाले. काही तरुण, समकालीन कलाकारांनीही अनपेक्षित धक्का पोचवला. परदेशात न्यूडिटी इन आर्ट संदर्भात किती खुलं वातावरण आहे आणि आपल्या इथे किती संकुचित दृष्टीकोन म्हणून एरव्ही नाराजी व्यक्त करणारे हे तरुण कलाकार कलेतल्या नग्नतेसंदर्भातल्या वादामध्ये आपली भूमिका स्पष्टपणे मांडताना कचरले. ज्या हुसेनसंदर्भातून हे विचारमंथन झालं, त्याच्यावर मात्र परिसंवादात भाग घेतलेल्या प्रत्येकाकडून काही ना काही टीकाच झाली, नि:संदिग्धपणे कोणीच त्याची बाजू घेतली नाही जी थोड्याफार प्रमाणात आम्हाला अनपेक्षित अशीच अशी होती.

व्होल्टेअरसारखा विचारवंत आविष्कारस्वातंत्र्याबाबत जी भूमिका घेतो ( I do not agree with what you have to say, but I will defend to the death your right to say it ) तिचा पुरस्कार एकाहीकडून तितक्या ठामपणे एकविसाव्या शतकातलं दुसर्‍या दशकात केला जाऊ नये, ही गोष्ट आविष्कारस्वातंत्र्याच्या मुद्द्यापेक्षा धर्म, जाती, प्रादेशिकता यांचं पारडं जड होत जाणं हतबलतेनं स्वीकारणं हेच कुठेतरी दिसतं. कलेचा प्रवाह यातून पुन्हा वळचणीला तर जाणार नाही ना असाही एक प्रश्न मनात डोकावून जातो. धर्म, राजकारण, नग्नता यांबाबतीत पहिल्या दोन गोष्टी तिसर्‍यापेक्षा जास्त अनैतिक, अश्लिल, बीभत्स असू शकतात आणि तिसरी जास्त पवित्र असू शकते. हे पुन्हा एकदा पटलं.

नग्नता आणि अश्लीलता यांच्यातल्या धूसर सीमारेषेचे भान 'चिन्ह'ला पुरेपूर आहेच. 'चिन्ह'चा हा अंक संपादित होत असताना 'चिन्ह'च्या संपूर्ण टीमने अत्यंत संवेदनशीलतेनं, काळजीपूर्वक, विषयाला कोठेही सवंगपणा येऊ न देण्याची काळजी घेतली. पुन्हा पुन्हा प्रत्येक लेख वाचून बघितला, प्रत्येक चित्र तपासून कलात्मकतेचा सर्वोच्च दर्जा लावत तपासून पाहिलं. आर्टस्कूलला प्रवेश घेऊ पाहणार्‍या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हातातही हा अंक सोपवायला पालकांना काही अडचण वाटू नये इतका संयमितपणा अंकाचं संपादन करताना पाळण्याचा आटोकाट प्रयत्न 'चिन्ह’च्या टीमनं केला आहे. कलेतल्या नग्नतेबद्दल, हुसेनच्या वादाबद्दल, श्लील-अश्लीलतेची कलेसंदर्भातली कसोटी ठरवण्यासंदर्भात चिन्हने या अंकातून जे काही सदार केलं आहे ते अत्यंत प्रामाणिक प्रयत्नांमधून. या सर्वांतून कोणता एक निष्कर्ष निघाला का? कदाचित नाही. तसा तो निघावा अशी अपेक्षाही नव्हती. पण या आत्तापर्यंत उगीचच टाळल्या गेलेल्या, झाकून ठेवलेल्या विषयावर त्यानिमित्ताने एक सखोल, थेट विचारमंथन झाले ते महत्वाचे. समाजमन प्रगल्भ व्हायला या अंकाची मदत होईल का? माहीत नाही. पण अजून वीस वर्षांनी कदाचित पुन्हा कोणावर तरी चित्रांमधल्या नग्नतेविरोधात झालेल्या आरड्याओरड्यामुळे प्रदर्शन उतरवण्याची वेळ येईल, मुखपृष्ठावरील एखाद्या नग्न चित्रामुळे वादाचा धुरळा उठेल तेव्हा चिन्हच्या ’नग्नता-चित्रातली, मनातली’ या विशेषांकात मांडल्या गेलेल्या या विषयावरील कलावंत, विचारवंत, साहित्यिकांच्या भूमिकांचा विचार निश्चित केला जाईल.

या दरम्यान माझा स्वत:चाही एक प्रवास झाला. कलेतली नग्नता आता मला सहज स्वीकारता येते या आत्मविश्वासातून मी ’चिन्ह’च्या ’नग्नता-चित्रातली, मनातली’ विशेषांकाच्या संपादनाची जबाबदारी स्वीकारली खरी, पण मनावरचे सांकेतिक संकोचांचे पापुद्रे मला वाटले होते त्यापेक्षा चिवट निघाले. मुखपृष्ठकथा करताना मोनाली मेहेर या परफ़ॉर्मन्स आर्टिस्टने परदेशात केलेल्या न्यूड परफॉर्मन्सचे व्हिडिओ किंवा फोटोग्राफ बघताना जरी कुठेही त्यात अश्लीलता किंवा सवंगपणा जाणवला नव्हता, तरी अंकामध्ये छापण्यासाठी फोटो निवडण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा किंवा देवदत्त पाडेकरांनी अत्यंत कलात्मकतेनं चितारलेलं न्यूड अंकाच्या मुखपृष्ठासाठी निवडताना मनात जी चलबिचल झाली, त्यामुळे अस्वस्थता आली. नग्नतेतली कला वाचकांना सनसनाटीही वाटू शकेल का, अशी शंका आली. कारण कलेतली नग्नता बघणारी नजर ही जर प्रशिक्षित नसेल तर त्या कलेवर फार पटकन सवंगतेचा, अश्लीलतेचा शिक्का मारला जाऊ शकतो, हेही अनुभवानं माहीत झालं होतं. श्लील-अश्लीलतेच्या मर्यादा ठरवता न येणं यात ’वैचारिक गोंधळ’ आहे असं मुळीच नाही. ते तर माणूसपणाच्या गुंतागुंतीचं द्योतक आहे, हे कळून घेण्यापर्यंत झालेला माझ्या मनाचा प्रवास पुन्हा कदाचित उलट दिशेनं पण एका ठाम, समतोलापर्यंत येऊन पोचणारा झाला याचंही एक समाधान.

शर्मिला फडके
कार्यकारी संपादक, 'चिन्ह'

****

आर्ट स्कूलमधल्या त्या भव्य स्टुडिओत न्यूडस्टडीच्या वेळी विशीतसुद्धा प्रवेश न केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसमोर मॉडेल म्हणून एखादी स्त्री जेव्हा विवस्त्र होऊन उभी ठाकते, तेव्हा तिथं खूप काही घडत असतं, घडलेलं असतं. यातलं दृष्टीस मात्र काहीच पडत नाही. त्या वर्गात असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या मनात भावभावनांची विलक्षण घालमेल सुरू असते. बोलायचं खूप असतं, पण बेंचवरच्या शेजारच्याशी काही बोलता येत नाही. पाहायचं खूप असतं, पण जिवलग मित्रमैत्रिणींकडेसुद्धा थेट नजरेनं पाहता येत नाही. एका विचित्र अशा कानकोंड्या अवस्थेनं संपूर्ण न्यूडक्लासला झाकोळून टाकलेलं असतं.

कुणाही प्रतिभावंत लेखकाला आव्हान देणारा हा विषय. पण निदान मराठीत तरी या विषयाला आतापर्यंत कुणीच स्पर्श केलेला नाही. अपवाद ऊर्मिला सिरूर यांच्या १९७५ साली ’सत्यकथेत’ प्रसिद्ध झालेल्या लघुकथेचा. म्हणूनच हा विषय ‘चिन्ह’ला विशेष आव्हानात्मक वाटला. किंबहुना ‘नग्नता : चित्रातली आणि मनातली’ या विशेष पुरवणीच्या केंद्रस्थानीच तो ठेवावासा वाटला. चित्रकार/विद्यार्थी, मॉडेल आणि शिक्षक यांच्या त्रिकोणी संबंधांचे विविध पदर चित्रकार सुहास बहुळकर यांच्या यातल्या सहभागामुळेच उलगडले गेले आहेत.

'न्यूड'ल्स- (लेखांश)

आम्ही विद्यार्थी असताना मॉडेल्सना काम देण्याची जबाबदारी आमच्या सीता कपूर नावाच्या वयस्कर पण एक सुस्वरूप, गोर्‍या व तांबूस वर्णाच्या देखण्या शिक्षिकेकडे होती. दर शुक्रवारी त्या मॉडेल्सना काम देत. त्या वेळी पोर्चमध्ये सर्व मॉडेल्स जमा होत. त्यात सावळ्या वर्णाच्या म्हातार्‍या, मध्यमवयीन व गरिबीनं गांजलेल्या मॉडेल्समध्ये उभं राहून गोर्‍यापान, देखण्या व किमती कपडे घातलेल्या कपूर बाई काम देत असत. त्या विसंगत दृश्याचा ठसा माझ्या मनावर आजही कायम आहे. कपूर बाईंनी कोणाला काम दिलंय, पुढच्या आठवड्यात आपल्याला कुठलं मॉडेल मिळणार, याची उत्सुकता विद्यार्थ्यांना असे. कारण त्यातल्या त्यात एखादं बरं मॉडेल आलं तर साहजिकच बरं वाटत असे. एकदा मात्र असं झालं की, लागोपाठ दोन वेळा कपूर बाईंनी जी मॉडेल्स दिली ती बघून आम्हां सर्वांचाच विरस झाला. माझ्या वर्गातला ओरसकर नावाचा मालवणी विद्यार्थी तर एवढा वैतागला की, तो भर वर्गात मोठ्यानं म्हणाला, ‘‘छ्याऽऽ! कपूर बाईनं ह्यां मॉडेल कित्याक दिलां, तिकाच मॉडेल म्हणून बसवला तर बरां होतला!’’ नशीब ओरसकरचं की कपूर बाईंनी ते ऐकलं नाही.

01.jpgवर्षानुवर्षे दर शुक्रवारी सकाळी १० वाजता मॉडेल्सना काम दिलं जाई. ही वेळ मॉडेल्ससाठी अत्यंत महत्त्वाची असे. काम मिळणार की नाही, याची हुरहूर त्यांना वाटत असे. ज्यांना काम मिळे ती आनंदात असत, तर काम न मिळालेली निराश मनःस्थितीत घराकडे परतत किंवा विमनस्कपणे पोर्चमध्ये किंवा आवारात झाडाखाली बसून राहत. हे सर्व मला अनुभवता आलं, कारण १९७५मध्ये माझं शिक्षण संपलं, मी जेजेतच शिकवू लागलो आणि मला स्वतःलाच मॉडेल्सना काम द्यायची कामगिरी नंतर अनेक वर्षं पार पाडावी लागली. सुमारे १४/१५ वर्षं मी हे काम करत होतो. त्यातून या मॉडेल्सचं एक वेगळंच जग माझ्यासमोर उलगडू लागलं. जेजेत येणार्‍या मॉडेल्सपैकी एक जण साधू होता तर दुसरा फकीर. तिसरा होता अब्दुलचाचा नावाचा अत्यंत काटकुळा मुसलमान. तो भेंडीबाजारात एका जिन्याखालीच आयुष्यभर राहिला. तरुणपणापासून तो जेजेत येत होता. दारूवाला नावाची एक अत्यंत जाडी पारशीणही खूप वर्षांपासून येत असे. आल्याबरोबर ती जमशेटजींच्या चित्राला नमस्कार करून मगच वर्गावर जाई. याशिवाय शंकर साळुंखे नावाचा एक हमाल, त्याचे हात थरथरू लागल्यामुळे, १९८२ पासून मॉडेल म्हणून बसत असे. शिवाय पार्वती नावाची एक तलाक दिलेली मुसलमान स्त्री होती, तर दुसरी एक विधवा होती. मथुरा नावाची वृद्ध पण घारी, गोरी, देखणी स्त्री नेहमीच टोपपदरी लुगडं नेसून यायची. जेजेत येण्यापूर्वी सकाळीच भुलेश्वरच्या फूलबाजारातून ती मोगरा, जाई, जुई, चमेली, अबोली अशी फुलं घेऊन यायची. काम नसेल तर पोर्चमध्ये गजरे गुंफत बसायची. काम असेल तर विश्रांतीच्या वेळात तिचा हा उद्योग सुरू होई. अधूनमधून कॉलेजातल्या मुली किंवा प्रेमात पडलेले प्रेमवीरही तिच्याकडून गजरे घेत. संध्याकाळी गजरे विकूनच ती घरी जाई. पण या सर्वांत एक मध्यमवर्गीय घरातली सुशिक्षित स्त्री इतर सर्व मॉडेल्समध्ये सोज्ज्वळ, शांत व देखणी असल्यामुळे उठून दिसत असे. घरखर्चाला व मुलांच्या शिक्षणाला हातभार लागावा म्हणून घरच्या मंडळींना सत्य न सांगता ती हे काम करीत असे. या मध्यमवयीन स्त्रीचं रूप व डौलदार बांधा बघून एकदा एका शिक्षकानं माझ्याशी किंवा इतर कोणाशीही चर्चा न करता तिला परस्पर ‘न्यूडसाठी’ बसशील का असं अविचारानं विचारताच ती कावरीबावरी झाली आणि त्यानंतर काही काळ जेजेकडे फिरकलीच नाही.

02.jpgपण बाकी कशाचंही सोंग आणता आलं तरी पैशाचं सोंग आणता येत नाही हेच खरं! काही काळानंतर मॉडेल्सना काम देतात त्या दिवशी ती पुन्हा एका बाजूला शांतपणे एका कोपर्‍यात उभी असलेली दिसली. समोर इतर सर्व मॉडेल्स, ’‘सर, मला काम, मेरेकू भी देना, दो हप्तेसे काम नहीं मिला, हमेशा दुसरेलाच घेता मग आम्ही जगायचं कसं? न्यूडसाठी तरण्याच हव्या? अभ्यास काय म्हातार्‍यांवरून होत नाही?", असा कल्ला करत होती. ज्यांना काही काळ काम मिळालं होतं अशांची यादी माझ्याजवळ होतीच. ती बघत मी पुढील आठवड्याच्या कामाचं वाटप उरकलं. पण त्याच वेळी मी एक काम बाकी ठेवलं. इतरांना काम देऊन कोपर्‍यात शांतपणे उभ्या असलेल्या त्या स्त्रीकडे वळलो व म्हणालो, "दिसला नाहीत... आजारी होता का?" यावर ती काहीच बोलली नाही. पण तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं व मान वळवून तिनं ते पदरानं पुसलं. तिची काहीच बोलायची इच्छा नाही, हे जाणवून मीदेखील इतर काहीही न बोलता तिला पुढील आठवड्याचं काम दिलं. त्याच वेळी माझ्या हे लक्षात आलं की, रागावलेली म्हातारी पार्वती, बाजूलाच पोर्चमध्ये बसून हे सर्व पाहत होती. वर्गात परतलो व कामाला लागलो. थोड्याच वेळानं बागवे शिपाई आला व म्हणाला, "सर, पार्वती तुम्हांला बोलवतीय." वर्गाबाहेर गेलो तर पार्वती बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये वाट पाहत उभी होती. तिच्याजवळ जाताच ती म्हणाली, "तुला विद्यार्थी व्हता तवापासून बगती. म्हणून तर सपष्ट सांगाया आलीय", असं म्हणून तिनं सर्व हकिकत सांगितली व दुःखानं कळवळत म्हणाली... "ती का आमच्यासारखी रंडकी हाये? चांगल्या घरातली बाई ती! तुमच्यासारख्यांच्या सभ्य घरची लक्षुमी हाये ती. परिस्थितीनं घरच्यांना नकळत बसतीय इथं. पण त्या मेल्याxxx नं तिचं रूप बघून न्यूडला बसशील का इच्यारलं... अब्रूदार बाई ती, रड रड रडली माझ्याकडं, जरा समजवा त्या मेल्याxxx". असं काही घडलं की नको ते मॉडेल्सना द्यायचं काम, असं होऊन जाई.

04.jpg

एकंदरीतच जेजेत येणारी ही मॉडेल्स जगण्याबाबतचा तीव्र संघर्ष करीत जगत. पण त्यांच्यात माणुसकीचा ओलावा आणि सहवासातून आपुलकीचे संबंध निर्माण होत. एखाद्या मॉडेलला सलग काम मिळालं आणि एखाद्याला बराच काळ काम मिळालं नसलं, तर काम मिळालेलं मॉडेल स्वतःहून 'माझ्याऐवजी या काम न मिळालेल्या मॉडेलला काम द्या', असं सांगत असे. अशा वेळी व्यवहार, राजकारण हेवेदावे, द्वेष, मत्सर यांनी भरलेल्या या जगात त्यांच्यातली ही माणुसकी अंतर्मुख करून टाकत असे. कधी कुणी नवीन मॉडेल येऊ लागलं तर सुरुवातीला किरकोळ कुरबुरी होत. पण नंतर ते एकमेकांशी प्रेमानं वागत. एकमेकांच्या सुखदुःखांत सहभागी होत.

१९८०च्या दरम्यान चाळिशीच्या तीन नवीन दाक्षिणात्य स्त्रिया मॉडेल म्हणून अचानक येऊ लागल्या. एकीला तर जेजेबद्दल माहिती मिळाल्यावर तिच्याच नवर्‍यानं आणलं होतं. त्या तामिळनाडूमधल्या होत्या. लागोपाठ पाऊस न झाल्यामुळे गावात काम नव्हतं आणि उपाशीपोटी राहायची पाळी आल्यावर नाइलाज होऊन गाव सोडून त्या मुंबईत आल्या होत्या. त्यांतली आराई नावाची स्त्री चकणी होती व तिचा नवरा दारुडा होता, तर राजम्मा व ललिता या दोघीही आपल्या आयुष्याशी झगडत होत्या. राजम्मा व्ही. टी.मागच्या झोपडपट्टीत राही. तिची मुलं आजीजवळ खेड्यात होती. ती नवर्‍यासोबत मुंबईत पैसे मिळवायची व मुलांना पाठवायची. पण तीन वर्षांत या मायलेकरांची भेट झाली नव्हती. अराई व ललिता माटुंगा-माहीमजवळच्या झोपडपट्टीत राहत. पुढं त्यांतल्या एकीला नवर्‍यानं सोडलं व तो मुंबईतल्याच एका मुलीसोबत राहू लागला. कधीतरी ती म्हणे, "मुझे उसने छोडा क्यों की मै सारी पहनती हूँ। वो चुडेल फ्रॉक पहनती है...बुढ्ढा है लेकिन बहुत चालू है... मैं क्या कर सकती थी? फ्रॉक पहनूंगी बोला, फिर भी मुझे छोडके गया।" अराईवर तिच्या मृत बहिणीच्या, वयात येऊ घातलेल्या, मुलीची जबाबदारी होती. ललिताला आपल्या तारुण्यात पदार्पण करणार्‍या अमूल या मुलीला झोपडपट्टीत एकटं ठेवायची भीती वाटे... मग अराईची भाची व ललिताची मुलगी यादेखील मॉडेलचं काम करू लागल्या. कारण आम्हीही नेहमी तीच मॉडेल रंगवून कंटाळलो होतो. थोड्याच काळात त्यांना कळलं की, कपडे घालून मॉडेल म्हणून बसलं, तर दिवसाला तीस रुपयेच मिळतात; पण कपडे काढून बसलं, तर दुप्पट म्हणजे साठ रुपये मिळतात. हे कळल्यावर त्यांच्या मनात खळबळ माजली असणार. राजम्मा तर टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगते, "बहुत शरम आती है, मुझे गुस्सा आता है... लेकिन क्या करूँ? घरमें काम करूंगी तो तीन-चारसों मिलेगा। यहा हमेशा काम न होते हुए भी थोडा ज्यादा मिलता।"

05.jpgअशा या अनेक मॉडेल्सना मी १९७८ ते १९९२ असं सुमारे १४ वर्षं काम देत असे. त्यातून काही ऋणानुबंध आपसूकच निर्माण झाले. यात नवल ते काय? त्यांतील काही तर मला मी विद्यार्थी म्हणून आलो तेव्हापासून बघत होते. काही जण तर माझे शिक्षक विद्यार्थी होते त्या पूर्वीपासून जेजेत मॉडेल म्हणून येत होते. साहजिकच अडीअडचणीच्या वेळी ते हक्कानं पैसे मागत. पण अशा वेळा कमीच येत. संक्रांतीच्या दिवशी प्रेमानं तिळगूळ म्हणून तिळाची स्वस्तातली चिक्की देत. पण त्या सर्वांमधली पार्वती मात्र माझ्या कायमच लक्षात राहिली. ती अनेक वर्षं ईदच्या दोन दिवस आधी येऊन मला सांगे, "उद्या डबा आनीन, त्यातलं दोन घास खा बाबा.. मला लय बरं वाटंल. लाल कट्ट्यावर वाट पाहतीय", असं सांगून ती निघून जाई. मी लाल कट्ट्यावर पोचताच ती मला आडोशाच्या जागी घेऊन जाई. वनदेवी छाप हिंगाच्या कळकट पिशवीतून लख्ख घासलेले डबे काढी. मी त्या लाल कट्ट्यावर बसलेला असे. माझ्यासमोर जमिनीवर ती फतकल मारून बसे. डबे उघडी एका डब्यात मटण, दुसर्यागत खीर व तिसर्‍यात पोळ्या असत. मी मटणाच्या तुकड्यांना वगळून मसाल्याला पोळी लावून खाई. खीर मात्र दोन घास जास्त जाई. ती आग्रह करी. म्हणे, "अरे मटण घ्ये की, मस्त शिजलंय"... शेवटी तिला सांगितलं, "मी ब्राह्मण. मला मटणाची सवय नाही."

मला आठवतं, पहिल्यांदा ती जेव्हा डबा घेऊन आली व मी लाल कट्ट्यावर बसलो, तेव्हा म्हणाली, "आरं उद्या ईद, सुट्टी हाय. म्हणून आजच ज्येवन घेऊन आलीय." मला काहीच कळेना... ही पार्वती आणि ईदचा काय संबंध, असं प्रश्नचिन्ह तिला माझ्या डोळ्यांत दिसलं असावं. ती बोलू लागली, "माजं नाव सकिना... पण काम मिळावं म्हणून मी पार्वती झाली. आता मी म्हातारी हाय, पन जेव्हा मी ह्ये काम सुरू क्येलं तवा मला दिवसाला ८ रुपये मिळत. आज म्या ६० रुपयं घ्येते, येका दिवसाचं... खा बाबा खा... तुज्यासाठीच आनलंय", आणि तिनं माझ्या डोक्यावर हात फिरवला, पाठीवर थोपटलं... मला आठवतं की हीच पार्वती प्रसंगी माझ्याशी भांडत होती, "न्यूडसाठी तरण्याच हव्या का? अभ्यास काय म्हातार्‍यांवरून होत न्हायी..." पण तिनं जेव्हा जेव्हा ईदेचा डबा आणला, तेव्हा तेव्हा तिच्या मनात आपल्याला काम मिळावं ही अपेक्षा निश्चित नव्हती.

13_0.jpg१९७५ ते १९९५ अशी वीस वर्षं मी जेजे स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करीत होतो. या काळात शिकवत असतानाच मी अनेक गोष्टी शिकलो. शिकवताना मी माझ्या बुद्धीप्रमाणे काही प्रयोग करीत असे. पूर्वीपासून अनेकांकडून जे ऐकलं, वाचलं त्याची सरमिसळ करून काही वेगळं करण्याचा तो प्रयत्न असे. एकदा तिसर्‍या वर्षाला शिकवत असताना माझ्या मनात विचार आला की, आपण दोन मॉडेल्स एकत्र बसवू. त्यानुसार स्त्री व पुरुष अशी दोन मॉडेल्स एकत्र बसवली. तो प्रयोग यशस्वी झाला. चित्रं नेहमीपेक्षा काहीशी वेगळी व प्रयोगशील वाटली. मग चौथ्या वर्षाला न्यूड क्लास होता. माझ्या डोक्यात किडा वळवळला की न्यूडसाठीही असंच करू या. या विचारानं मला झपाटलं. उत्साहाच्या भरात ही कल्पना मी माझे शिक्षक व ज्येष्ठ सहकारी असलेल्या मृगांक जोशींना सांगताच, ते आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे बघतच राहिले. मी आपल्याच कल्पनेच्या धुंदीत मग्न होतो. मग काही वेळानंतर ते म्हणाले, "चलो कॉफी पीते है।" समोरच्या शांती भुवनमध्ये जाऊन कडक मद्रासी फिल्टर कॉफी मागवली. ते त्यांच्या विचारात तर मी माझ्याच धुंदीत. दोघेही गप्प होतो. अचानक मृगांक जोशी सरांनी दाढी खाजवली आणि ते बोलू लागले, "बहुलकरजी, दो मॉडेल साथमें बिठाओगे। क्या बातऽऽ लेकिन इसके लिये दो महिलाएँ चल सकती है। एक महिला और एक पुरुष... गडबड होगी भैय्या।" तरीही माझ्या डोक्यात प्रकाश पडला नाही. थर्ड इयरप्रमाणेच कपडे घालून स्त्री-पुरुष मॉडेल एकत्र बसवली तसा प्रयोग करून, नग्न मॉडेल बसवून आपण काय घोटाळा करणार होतो ते अचानक लक्षात येताच मी दचकलो आणि ओशाळलो. समोरची कॉफी थंडगार होत होती. जोशी सर म्हणाले, "चलो कॉफी पी लो" आणि त्यांनी माझ्या पाठीवर थोपटलं.

एकदा असाच काहीसा घोटाळा माझ्या हातून अनवधानानं झाला. चौथ्या वर्षाला न्यूड क्लाससाठी मी दोन मॉडेल्स सांगितली होती. सोमवारचा दिवस उजाडला. सकाळी वेळेवर वर्गात पोचलो. एक मॉडेल आलं होतं. त्याला पोझ दिली व दुसर्‍या मॉडेलची वाट पाहत बसलो. वेळेवर आलेल्या मुलांनी बसवलेल्या मॉडेलभोवतीच्या जागा पकडल्या व कामाला सुरुवात केली. बराच वेळ झाला तरी दुसरं मॉडेल आलंच नव्हतं. उशिरा पोचलेली मुलंही जागा नसल्यामुळे मॉडेलचीच वाट पाहत होती. शेवटी खाली कुणी मॉडेल आहे का, हे पाहण्यासाठी मी स्वत: गेलो. बघतो तो पोर्चमध्ये म्हातारा नरसिंग व एक तरुण मुलगी दिसली. काही काळापूर्वीपासून तीदेखील मॉडेल म्हणून बसू लागली होती. तिला काही काम आहे का, विचारताच तिनं नाही म्हटलं. यावर मी म्हणालो, "चलो उपर" आणि वर्गात नेऊन तिला पोझ दिली व म्हणालो, "उतारो कपडे और बैठो।" उरलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी घाईघाईनं जागा पकडल्या. आयत्या वेळी घोटाळा होऊनही सर्व काही मार्गी लागलं, या समाधानात मी चहा प्यायला रामय्याच्या कँटीनमध्ये गेलो. चहा पिऊन परतलो व वर्गात येऊन बसलो.

काही वेळानंतर मात्र माझ्या लक्षात आलं की, एकाच वेळी माय-लेकींना एकमेकींसमोर नग्न बसावं लागलं होत. दोघीही अवघडल्या होत्या. दोघींनाही समोर बघायला सांगितलं असूनही दोघींनीही माना व नजर खाली वळवली होती. विश्रांती झाल्यावरही त्या एकमेकींना टाळून वर्गाबाहेर पडत होत्या. दिवसभर हा प्रकार सुरू होता. शेवटी संध्याकाळी कॉलेज सुटलं, त्यातली आई कपडे करून निघताच तिला थांबवलं व म्हणालो, "माफ करो, मेरे ध्यानमेंही नही आया, ये तुम्हारी लडकी है।" मान खाली घालून ती काहीतरी पुटपुटली. कदाचित तिनं तिची नाराजी व्यक्त केली असेल. पण नंतर मात्र यावर उपाय म्हणून प्यूनला बोलावून दुसर्‍या वर्गातून स्क्रीन आणले व दोघीही एकमेकींना दिसू नयेत अशा प्रकारे उभं केलं. पण त्यातून एक नवीनच अडचण निर्माण झाली. आदल्या दिवशी या मायलेकींनी एकमेकाकडे बघायचं टाळण्यासाठी माना खाली घातल्या होत्या व विद्यार्थ्यांनी सांगूनही त्या आपोआप खाली जात होत्या. मधोमध स्क्रीन येताच त्यांच्या माना व नजर आपोआप वर झाली व त्या समोर बघू लागल्या. पण एकंदरीत आठवडाभर त्या अवघडलेल्याच होत्या.

college_work_1.jpg

तारुण्यात पदार्पण करणार्‍या दुसर्‍या एका मुलीबाबतचा प्रकार तर मनात विलक्षण कालवाकालव करतो. ही दुसरी मुलगी लहानपणापासूनच जेजेत येत होती व तिला लहानपणापासूनच मॉडेल म्हणून बसायची सवयही होती. एकदा या मुलीला न्यूड क्लासमध्ये काम दिलं. दोन दिवस उलटले. विद्यार्थ्याचं 'लाइफ पेंटिंग फ्रॉम न्यूड' जोरात सुरू होतं. तिसर्‍या दिवशी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मी एका बाजूला प्रात्यक्षिक करून दाखवत होतो. अचानक दुसर्‍या बाजूला जिथं ही मुलगी बसली होती, त्या भागात हलचल झाली... मागे वळून बघितलं तर कुणीतरी टेबलावर चढलं, मागे स्क्रीनवर टाकलेली ड्रेपरी खसकन ओढून काढली, त्या भागात असणार्‍या मुलींनी तिथं असणार्‍या मुलांना बाजूला पिटाळलं व मॉडेल म्हणून बसलेल्या मुलीभोवती ड्रेपरी धरली. काय गडबड आहे हे बघण्यासाठी मी हातातले ब्रश ठेवून तिकडे निघालो. एवढ्यात जयश्री नावाची एक चुणचुणीत मुलगी म्हणाली, "सर, तिथंच थांबा. मग सांगते," आणि तिनं मला दूरवर थांबवलं. एवढ्यात त्या भागात असणारी मुलंही आली. ती हळहळत होती... गरीब बिचारी, असं काही बोलत होती. काही वेळानंतर त्या मुलीला ड्रेपरीत गुंडाळून वर्गाबाहेर नेल्याचं जाणवलं. एवढ्यात जयश्री आली व म्हणाली, "xxx न्यूड बसली होती, तिला पाळी आलीय. लहान आहे. पहिलीच वेळ आहे. बिचारीच्या लक्षातच आलं नाही.’’ त्या आठवड्यात त्या बाजूच्या मुलांचं पेंटिंग अपुरंच राहिलं.

मॉडेल्सबाबतचे असे अनेक अनुभव आहेत. काही वेळेला हीच मॉडेल्स चिडत, संतापत. कोणी एखादा शिपाई, दुसर्‍या वर्गातला एखादा विद्यार्थी किंवा परक्या माणसानं अनवधानानं वर्गात प्रवेश केला; तर नाराज होत. त्यांतले काही आंबटशौकीन असले आणि असे आत आले, तर त्यांच्या रागाचा पारा जरा जास्तच वर चढे. त्यात अगतिकतेसोबत आपल्या परिस्थितीबद्दलची नाराजी आणि स्त्रीसुलभ भावनेचाही उद्रेक असे. अनवधानानं आत शिरलो, असं ढोंग करणारे कार्यभाग उरकताच (मॉडेलच्या नग्न शरीराचं दर्शन घडताच) लगेच पळ काढीत, पण चुकून आत शिरलेला स्तंभित होत असे किंवा गोंधळून जात असे. त्याला स्वतःचीच लाज वाटे आणि त्याची मान आपोआप खाली जाई.

तारुण्यात प्रवेश केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची प्रतिक्रिया सुरुवातीच्या काळात मात्र गोंधळलेली असे, बावचळलेली असे. त्यांच्यापेक्षा खूपच ज्येष्ठ, किंबहुना त्यांच्या आईच्या-आजीच्या वयाच्या स्त्रियांना आपल्यासमोर असं कपडे काढून बसावं लागतं, याबद्दल त्यांच्या मनात करुणा दाटून येई... किंबहुना एक प्रकारची कुचंबणाच ते अनुभवत. पण हळूहळू त्यातली अपरिहार्यता समजून घेत घेत त्या अनुभवांतून ते अधिक परिपक्वही होत.

कित्येक विद्यार्थ्यांना वर्षअखेरीला आपला पोर्टफोलियो, ही न्यूड ड्रॉइग्ज घरी नेताना भीतीही वाटत असे. कारण तोपर्यंत त्यांनी आपल्याला ‘न्यूड स्टडी’ नावाचा विषय असतो आणि त्या वेळी नग्न स्त्रिया समोर बसतात, ही गोष्ट लपवून ठेवलेली असे. विद्यार्थिनी मात्र घरी सांगून टाकत असत. पण त्यामुळे अनेकदा पालक चिडत आणि वर्गात भेटायलाही येत. अशा वेळी त्यांना समजावून सांगावं लागे. हा अभ्यासाचा भाग आहे, आम्हीही असंच शिकलो. इतकंच नाही तर आमच्या शिक्षकांनाही असाच अभ्यास केला आहे, हे सांगितल्यानं त्याची समजूत पटत असे. पटलं नाही असं वाटल्यास ’‘डॉक्टरांनाही नग्न शरीराची चिरफाड करूनच अभ्यास करावा लागतो’’ हे उदाहरण द्यावं लागे आणि मग त्यांची समजूत पटे.

- सुहास बहुळकर

(या लेखातली सर्व चित्रे सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट यांच्या सौजन्याने)

****

चिन्ह
'नग्नता - चित्रातली आणि मनातली' विशेषांक

चिन्ह प्रकाशन
पृष्ठसंख्या - २५६
किंमत - रुपये सहाशे

****
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफिकीर वर लेखातच म्हातारे कोतारेही न्यूडला बसवतात असं लिहिलंय.
एका पुरूषाचं न्यूड तर छापलेलं आहेच की.

लोकांना दिसलंच नाही कि काय बायकांची चित्र बघता बघता.

शर्मिला, 'चिन्ह' बद्दल आणि अत्यंत संयत पोस्ट्सबद्दल अभिनंदन Happy
साती, वरची पोस्ट आवडली Happy

चित्रकला शिकवताना मानवी किंवा प्राणी/पक्षी देहाचे अचूक रेखाटन हा खूप महत्वाचा टॉपिक असतो. केवळ मानवी देहाचं रेखाटन कसं करावं यावर पुस्तकंही आहेत. देहाचं रेखाटन नीट जमलं नाही तर अख्खं चित्र फसू शकतं. वस्तूचित्र किंवा मेमरी ड्रॉइंग असं काहिही असलं तरी जसंच्या तसं रेखाटणं आणि पेंट करणं यात चित्रकाराचा कस लागतो. कुठल्याही कलेमध्ये प्रॅक्टीस, अभ्यास नसेल तर ती कला उच्चपातळीला पोहोचू शकत नाही. त्यासाठीच न्यूड पेंटिंग्जचा समावेश अभ्यासक्रमात असावा आणि इतर पेंटिंग्जप्रमाणे याचाही सराव केला जात असावा.

राहता राहिली एक्स्प्लॉयटेशनची गोष्ट. जर कुणी एखाद्या व्यक्तीला अशुद्ध हेतूने मॉडेल बनवायला बघत असेल तर ते चूक आहे. पण एखादी व्यक्ती (पुरुष/स्त्री/तरुण्/वृद्ध) आपणहून तयार असेल तर काय हरकत आहे? फक्त विद्यार्थी किंवा शिक्षकांनी त्यांना एक माणूस आणि मॉडेल म्हणूनच वागवावे एवढे मात्र अपेक्षित आहे. त्यातून त्या व्यक्तीच्या आत्मसन्मानाला ठेच लागेल असं काही घडता कामा नये. असा हेतू कुणाचा असेल तर तो घृणास्पद नक्कीच आहे (माझ्या मते). निसर्गचित्र काढायला जसं लोकेशनला जातात तसंच ही मॉडेल्स एक लोकेशनचं काम करतात. न्यूड पोर्ट्रेट्स हा इतर चित्रकलेच्या विषयांसारखाच एक विषय आहे आणि तो फक्त त्याच भावनेने बघावा.

ज्या विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना स्वतः मॉडेल बनण्यात काही विचित्र वाटत नसेल ते बनतच असतील. ज्यांना ऑकवर्ड वाटत असेल (हे बहुसंख्य असावेत) त्यांनी हे रेखाटन शिकण्यासाठी अशा मॉडेल्सचाच आधार घेणे योग्य आहे (एरव्ही समाजात वावरतानाही कपड्यांमध्ये किती एक्स्पोजर कंफर्टेबल फील करु शकतो ते व्यक्तीनुसार वेगवेगळं असतं). जसं अ‍ॅनाटॉमी प्रत्यक्ष मानवी मृतदेह हाताळल्याशिवाय नीट शिकता येणार नाही (यात आपण त्या मृतदेहाची विटंबना झाली असं म्हणत नाही) तसंच मानवी देहाचं रेखाटन मानवी देह प्रत्यक्ष समोर असल्याशिवाय नीट शिकता येणार नाही. कल्पनेच्या आधारे हे रेखाटन होऊ शकतं पण तरीही त्यात परफेक्शन येण्यासाठी मुळात काही सराव, अभ्यास असावा लागतो. फक्त इथे मॉडेल जिवंत असल्याने एखाद्या व्यक्तीला असं मॉडेल बनणे मान्य नसेल तर त्या निर्णयाचा आदर करावा. माझ्या माहितीप्रमाणे काही व्यक्ती रेग्युलरली न्यूड मॉडेल्सचे काम करतात. जेव्हा न्यूड पोर्ट्रेटचा सेशन असेल तेव्हा या मॉडेल्सना बोलावलं जातं. अंगाला रग लागेपर्यंत कपड्यांशिवाय स्तब्ध बसावं लागतं. ही मॉडेल्स म्हणजे वेश्या नव्हेत. त्यांच्याजवळ कुणी आगळीक करु इच्छित असेल तर ते नक्कीच विरोध करु शकतात (संदर्भ : टिव्हीवर पाहिलेली एका मॉडेल महिलेची मुलाखत). या दृक्श्राव्य मुलाखतीत त्या महिलेचा चेहरा ब्लर्र केलेला होता. त्यांच्या सेशनचंही चित्रिकरण दाखवलं होतं तेव्हा ही मॉडेल कॅमेरामनने नग्न दिसणार नाही एवढी काळजी घेतली होती. पेंटिंग करणार्‍यांच्या चेहर्‍यावरचे भाव अगदी नॉर्मल होते, त्यांच्यासाठी समोर एक ऑब्जेक्ट होता. त्या महिलेने पैशासाठी हे काम स्विकारलं होतं पण तिने हे ही सांगितलं की सगळे तिच्याशी खूप आदराने वागतात. प्रामाणिकपणे सांगते की तेव्हा मलाही वाईट वाटलं होतं. पण तिचं पुढचं वाक्य ऐकून त्यात रिलिफ मिळाला.

मी एक सेमीन्यूड (कमरेला एक चिंधी असलेलं) जख्ख म्हातार्‍याचं पेंटिंग पाहिलं होतं. त्यातली सुरकुती अन् सुरकुती जिवंत वाटत होती.

हुसेनांच्या हिंदू देवतांच्या नग्न चित्रांच्या बाबतीत मात्र एवढा शुद्ध हेतू जाणवला नाही.

वरदाची शिवलिंगावरची पोस्ट सुंदर आहे.

>>>> लिंबूटिंबू, डॉक्टरला अभ्यासायला मिळणारा जिवंत देह सुस्वरुप तरुणीचाच असेल असे काही नाही. असो! अवांतर प्रतिसाद माझ्यामुळे तरी वाढू नयेत अशी इच्छा! <<<<
बाबारे, भावभावना/वासना यामधे "तिरस्कार/संताप/किळस/भिती" इत्यादिक अनेक बाबी येत नाहीत काय? केवळ सुस्वरुपतेच्या आकर्षणावरच मात करायची असते इतकेच गृहितक नाहीये ते, भावभावना/वासना, यात यच्चयावत प्रकार येतात.
असो, अवान्तर प्रतिसादास अवान्तर उत्तरामुळे विनाकारण सन्ख्या वाढू नये.

लोकांना दिसलंच नाही कि काय बायकांची चित्र बघता बघता.
>>>>> Lol

लिंबू - काबू ठेवण्यालायक त्यातील भावना कोणती? किळस आली तर वैद्य उपचार टाळणार ? की भीती वाटली म्हणून पळून जाणार? आता मुद्दा बदलू नका Proud

लोकांना दिसलंच नाही कि काय बायकांची चित्र बघता बघता.

हो क्का? मग चार पुरुष, तीन म्हातारे आणि पाच ,एक वर्षाची पोरे असा चित्र लवाजमा का नाही माम्डला? आठ दहा बायका आणि एक टोणगा हा रेशो का निवडला ?

जामोप्या, तुमच्या पोष्टी ज्याम पौष्टिक औषधांसारख्या आहेत. तुम्हाला (चक्क) अनुमोदन! Happy

बेफिकीरांचे प्रश्न आणि त्यावरची सातींची उत्तरं आवडली.

शर्मिला फडकेंचं भूमिकेचं स्पष्टीकरण आवडलं. वाचल्यावर ते वस्तुस्थितीला धरून लिहिलंय असं वाटलं.

वरदा आणि शर्मिला, वरदांचा इथला संदेश वाचला. त्यातले पौराणिक संदर्भ पाहून नग्नता प्रत्येक वेळी अश्लील/उद्दीपक असेलच असं समीकरण त्यांना अमान्य आहेसं दिसतं. असं असेल तर नग्नता रसविचारांशी सुसंगत आहे का? नवरसांपैकी कुठला रस नग्नतेत अभिप्रेत आहे? तुम्हाला याचं उत्तर माहिती आहे का? मला चित्रकलेतलं काही कळत नाही म्हणून हा प्रश्न विचारतोय. प्राचीन नग्नतेची रसाविष्काराशी सांगड घातली जाऊ शकते का? नवरस येणेप्रमाणे :

१. वीर
२. शृंगार
३. अद्भूत
४. हास्य
५. कारुण्य
६. रौद्र
७. भयं
८. बीभत्स
९. शांत

कदाचित एक रस जास्तीचा धरता येईल.

१०. वात्सल्य

आपल्या उत्तराने नग्नचित्रकलेचा एक पैलू प्रकाशित होईल असं वाटतं म्हणून तुम्हा दोघींसाठी हा प्रश्नप्रपंच.

आपला नम्र,
-गामा पैलवान

शर्मिला फडके यांची यांची पोस्ट आवडली. Happy सविस्तर चर्चा वाचतोच आहे. काही अवांतर पोस्टी सोडल्या तर हि चर्चा बरंच काही सांगून जाते आहे.

शर्मिला आणि साती. पोस्ट आवडल्या. धन्यवाद.
शर्मिला शेवटच्या पानावरची ती चेतावनी वाचून उगाचच नाईक बाऊ करतात, काही गरज नव्हती हे लिहायची असे वाटले होते. पण इथल्या पोस्टी पाहुन नाईकांना माझ्यापेक्षा जास्त अक्कल आहे हे पटले. Sad

इथल्या पोस्टी पाहुन नाईकांना माझ्यापेक्षा जास्त अक्कल आहे हे पटले

सहमत.
इथे लेख टाकण्यापूर्वी पण अशीच सूचना द्यायला हवी होती नै.

माझ्या 'आयक्यू' वाल्या पोस्टवर अपेक्षित धुरळा उडालेला दिसतो आहे.

कसं आहे, मानवी आकलनक्षमतेला काही मर्यादा असू शकतात. प्रत्येकालाच सगळ्या विषयातले सगळे काही कळतेच असे नाही. पण आपल्याला एखाद्या विषयातले ओ की ठोसुद्धा कळत नाही, एवढे तरी किमान प्रत्येकाला कळले पाहिजे. हे मागणे 'लई' नाही.

पुस्तक परिचयात पुस्तकाच्या हेतूबद्दल स्पष्टच लिहिले आहे-

कलेतल्या नग्नतेमध्ये प्राचीन कालापासून जे आदीम भावना, मग ती आकर्षणाची असो वा संतापाची, ती चेतवून तिचा उद्रेक करण्याची जी ताकद आहे तिचं कुतूहल वाटलं, त्या ताकदीचा वेध घ्यावासा वाटलं इतकंच. बदलत्या पिढीनुसार बदलत्या सभ्यतेच्या संकेतांचा वेध घ्यावा, त्या अनुषंगानं समाजातल्या सर्व क्षेत्रातल्या विचारवंतांशी संवाद साधावा हा हेतू.

'चिन्ह' वाल्यांना कुठल्यातरी विषयाचे कुतूहल वाटले. त्यावर त्यांनी मंथन घडवले, चार विद्वानांची मतं मागवली, त्याचे विश्लेषण केले, मेहनत घेतली आणि त्यातून जे काही सापडले ते (संभाव्य आक्षेप टाळण्याची पुरेशी खबरदारी घेऊन) तुमच्या-आमच्यासमोर ठेवले. यातले एक शतांश टक्काही श्रम न घेता, प्रस्तुत विषयाचा गंधही नसतांना केवळ मायबोलीने सुविधा दिली आहे म्हणून वाट्टेल ते लिहून त्यांची हेटाळणी, टवाळी करणार्‍यांची काय म्हणून पत्रास बाळगावी? स्त्रीची विटंबना काय, पोर्नोग्राफी काय, दलाल-भडवेगिरी काय... आणि हे असे लिहिणार्‍यांनीच संस्कृतीचा आणि सभ्यतेचा कैवार घेतला आहे असे चित्र निर्माण होणे आणि बाकी 'कुंपणावरच्यांनी' त्यांना मूक संमती देणे, ढीगभर शब्दांचा पो टाकणार्‍या वाचाळवीरांच्या बरळीला 'चर्चा' म्हणणे, त्यांच्या पिंकांना 'मुद्दे' म्हणणे, आणि त्यावर कलेची बाजू सावरणार्‍यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून त्यांच्याकडून स्पष्टीकरणाची मागणी करणे- हे सगळेच अनाकलनीय आणि दुर्दैवी आहे ! केवळ काही लोक सार्वजनिक सभ्यतेच्या संकेतांना जुमानतात आणि तुमच्यासारखे विखारी लिहू शकत नाहीत याचा किती गैरफायदा घेणार? अशा संस्कृतीरक्षकांचा आयक्यू काढला तर अनेकांना 'लागले.' ते लागण्यासाठीच लिहिले होते. यांच्या अस्थानी आणि बेजबाबदार लिखाणाने किती संवेदनशील लोकांना 'लागत' असेल, याची मोजदाद कुणी करणार आहे की नाही?

यांचे आक्षेप तरी काय महान?
म्हणे चित्रकार स्वतः का बसत नाहीत कपडे काढून?
का बसावे त्यांनी? ते चित्रकार आहेत, मॉडेल नाहीत. मॉडेल्सना त्यांच्या कामाचा रितसर मोबदला मिळतो. ते स्वेच्छेने येतात. तो त्यांचा व्यवसाय आहे. ठीक आहे, हा समाजासाठी फार काही सन्माननीय व्यवसाय नाही. असे अनेक व्यवसाय असतात. आपण प्यून किंवा मुडदेफरास व्हावे अशी कोणाची महत्त्वाकांक्षा नसते. तो फक्त एक पर्याय असतो. आता पोट जाळण्यासाठी असा पर्याय स्वीकारावा लागणे- यातले कारुण्य तुम्हाला दिसते आणि खटकते आहे का हो? असे कुतूहल असेल तर खरोखर 'चिन्ह'वाल्यांसारखा त्याचा 'अभ्यास' करा. म्हणजे असा व्यवसाय का करावा लागतो, महाराष्ट्रात किंवा देशात किती न्यूड मॉडेल आहेत, त्यांच्या समस्या काय, त्यांना मोबदला पुरेसा मिळतो की नाही, त्यांच्या अपेक्षा काय आहेत वगैरे वगैरे. आणि काढा एखादे पुस्तक. पुस्तक सोडा, किमान एखादा धागा काढा मायबोलीवर आणि मांडा तुमचे मुद्दे तुमच्या चर्चाप्रस्तावात ! पण एवढे कष्ट कोण घेतो? त्यापेक्षा इथे आयत्या पिठावर रेघोट्या ओढणे कितीतरी सोपे, नाही का?

बाकी शर्मिलाताई फडके, साती यांच्या प्रतिसादानंतर आमच्यासारख्यांनी फार काही लिहावे असे नाही. आणि कितीही लिहिले तरी उपयोग होणार नाही- याची कल्पना आहेच. एका बाबतीत मात्र मी 'लिंबुटिंबू' या आयडीशी सहमत आहे. पुस्तकात दिली, तशी सूचना किंवा डिस्क्लेमर या लेखातसुद्धा द्यायला हवा होता. म्हणजे निदान इथले बनचुके ट्रोल्स इकडे फिरकले नसते. (असे वाटते.) माझ्या आधीच्या पोस्टमधले वाक्य- 'परि तू जागा चुकलासि' हे (कदाचित आयक्यूवाल्या टिप्पणीपेक्षा) जास्तच उचित होते, हे नंतरच्या प्रतिसादांनंतर सिद्धच होते आहे.

आता या पोस्टवरही अनेकांना बरेच काही म्हणायचे असेल. ईट का जवाब पथ्थरसे वगैरे द्यायचा असेल. अनेकांना आपल्या अनेक 'मुद्द्यांना' उत्तरे मिळाली नाहीत, म्हणजे आपला चर्चेत (!) विजय झाला आहे असे वाटते आहे. अशांना माझे इतकेच सांगणे आहे की तुमचा विजय होणारच होता. इतिहासात कायम तुमचाच तर विजय होत आला आहे !!

'चिन्ह' टीमच्या पुढील उपक्रमांना शुभेच्छा ! तुम्हाला इतकेच सांगणे आहे-

"Any fool can criticize, condemn and complain and most fools do it."

------------------------< * >---------------------------

>>दुसरी गोष्ट ज्यांना खरोखरच जेन्युईनली आपल्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत त्यांनी 'चिन्ह'चा 'नग्नता-चित्रातली आणि मनातली' हा अंक विकत घेऊन वाचावा

शर्मिला फडकेंची पोस्ट छान असली तरी फारशी पटली नाही, नसतील झाले चित्रसंस्कार तर नसोत बापडे माझ्यावरतरी. ज्यांच्यावर सो कॉल्ड असे संस्कार झालेत त्यांनीच वाचावा, किंवा जे वाचतील त्यांनी त्यांच्यावर तसे चित्रसंस्कार झालेत असा समज करुन घ्यावा. पण मी तरी हा अंक विकत घेऊन निश्चितच वाचणार नाही.

पुन्हा स्पष्ट करतो. मला या विषयात अश्लील, अनैतिक, लैंगिकतेकडे निर्देश करणारा असं काहीही वाटत नाही.

फॉर्मच्या अभ्यास वगैरे जरूर करावा हवा तसा. पण मग तेच शिक्षण आणि अभ्यास इतर चित्रे काढण्यासाठी वापरा करणे आणि या base म्हणून या शिक्षणाचे ऋणी असणे वेगळे......
.........आणि चक्क असे विशेषांक काढणे आणि नग्नतेचे हिरीरीने समर्थन करणे हे मला तरी झेपत नाही. त्यासाठी माझा आय.क्यु. कमी आहे असे समजलात तरी चालेल.

आणि हो, विकत तर नव्हेच, फुकट दिला तरी नाही वाचणार.

ज्ञानेश, जबरी पोस्ट. Happy
<< अनेकांना आपल्या अनेक 'मुद्द्यांना' उत्तरे मिळाली नाहीत, म्हणजे आपला चर्चेत (!) विजय झाला आहे असे वाटते आहे. अशांना माझे इतकेच सांगणे आहे की तुमचा विजय होणारच होता. इतिहासात कायम तुमचाच तर विजय होत आला आहे !! <<

तेच तर. सनातन काळापासून उपखंडात मठ्ठंभारतींचीच सद्दी आहे. Sad

dnyanesh,
tee IQ chi post tumchi hoti ka?? Mala itarancha IQ vagaire kadhane, te vakya, vaiyaktikritya patat nahi. (karan mee maanat asalele samajik sanket asatil kadachit). PaN ya postmadhe mandaleli tumchi tyamagachi bhavana pochali ani patali paN.
Arthat sanskruti-rakshakanchya bhoomiket kadhi kahi farak padel asa vatat nahi. hee ek amar pravrutti ahe apalya samajatali.

MuLatach ekhadya vishayacha chikitsak abhyas/ adhava mhanaje tyacha samarthan athava prativad nawhe hech bahusankhya jaN samajavun ghyayala tayar nahiyet.... tewha ya peksha vegali 'charcha' hou shakali asati ka?

मायबोलीने पुस्तक विकत घ्यायचा ऑप्शन सर्वाना दिलेला आहे. ज्याला हवे तो घेईल... ज्याचा आय क्यु चांगला आहे तो नक्कीच घेईल.. Proud . उरलेल्या कमी आय क्यु वाल्या आमच्यासारख्याना ढीगभर बाकीचे साहित्य वाचायला उपलब्ध आहेच.. उगाच कशाला भांडत बसायचे? कलाकारानी कलाकारांसाठी काढलेले कलाकारांचे पुस्तक, असे या पुस्तकाबद्दल म्हणता येईल. सर्वानाच हे पुस्तक पचणार नाही. आज नग्न चित्र वाले आले. उद्या कुणीतरी नग्न काव्य घेऊन येईल... परवा आणखी कुणीतरी नग्न फोटोग्राफी घेऊन येईल... येणार्‍यांचे मायबोलीवर स्वागतच आहे.

माझा प्रश्न :
लेखात अंडरएज मुलीचा उल्लेख आहे. न्युड मॉडेलचे काम अंडरएज मुलीने करणे या बाबत भारतात कायदे काय आहेत? सज्ञान व्यक्तीने न्युड मॉडेल म्हणून काम करणे ठीक पण अंडरएज मुला-मुलींनी असे काम करणे खटकले. पालकांची संमती घेतली जात असली तरीही. कारण मुळात अल्पवयीन व्यक्ती म्हणून तिला प्रोटेक्ट करणे हे पालकांचे काम आहे. तेच जर जास्त पैसे मिळावेत म्हणून तिला न्युड मॉडेल म्हणून पाठवणार असतील तर.. .. .....
येथे नग्नतेचा संबंध मेडिकल व्यवसायाशी लाऊ नये. एकतर पेशंटला गाऊन दिलेला असतो. डॉक आणि नर्सेस खूप संवेदनाशीलता दाखवतात. गरज पडल्यास धीर द्यायला पालक हजर असतात. आणि योग्य निदानासाठी आवश्यक म्हणून हे केले जाते.

हा अंक निघण्यापूर्वी / निघत असताना देखील जालावर, मटा आणि इतर ठिकाणी आलेले लेख / मुलाखती वाचनात आल्याच होत्या.. अंकाबद्दल अभिनंदन आणि आगामी प्रकल्पाला हार्दीक शुभेच्छा !

ज्ञानेश,

काल तुम्ही इतरांच्या आयक्यू बद्दल एक 'पिंक' टाकून गेलात (मला खरं तर 'पिंक' न म्हणता 'वाक्य' असे म्हणायचे होते, पण नंतर तुम्ही इतरांच्या वाक्यांचा 'पिंक' असा उल्लेख केलात, म्हणून तुमच्या त्या संदर्भहीन बरळण्याचा 'तुम्ही टाकलेली पिंक' असाच मी उल्लेख करतो. बादवे, 'पिंक'प्रमाणे 'बरळणे' हा शब्द देखील या धाग्यावर तुम्हीच पहिल्यांदा आणला हे लक्षात घ्या. हे दोन्ही शब्द न वापरता देखील तुम्हाला लिहिता आले असते. पण आता ही परतफेड. तेव्हा जरा हलकेच घ्या.) आणि पुढील काही क्षणातच काही जणांनी लगेच तुमची 'पिंक' तत्पर झेलून टाळ्या पिटल्या.

आणि आता एकदम अनेक तासांनी उगवून बर्‍याच पिंका टाकून गेलात. ते आता बघूया.

>>> कसं आहे, मानवी आकलनक्षमतेला काही मर्यादा असू शकतात. प्रत्येकालाच सगळ्या विषयातले सगळे काही कळतेच असे नाही. पण आपल्याला एखाद्या विषयातले ओ की ठोसुद्धा कळत नाही, एवढे तरी किमान प्रत्येकाला कळले पाहिजे. हे मागणे 'लई' नाही.

इथे कोणीही (कोणीही म्हणजे तुमच्या भाषेत बिलो अ‍ॅव्हरेज आयक्यू असणार्‍यांनी) या चित्रकारांच्या कौशल्याबद्दल अनुद्गार काढलेले नाहीत. त्यांचा आक्षेप एका वेगळ्या गोष्टीवर आहे. तो तुमच्या लक्षात यावा अशी अपेक्षा आहे. हे मागणे 'लई' नाही.

>>>> 'चिन्ह' वाल्यांना कुठल्यातरी विषयाचे कुतूहल वाटले. त्यावर त्यांनी मंथन घडवले, चार विद्वानांची मतं मागवली, त्याचे विश्लेषण केले, मेहनत घेतली आणि त्यातून जे काही सापडले ते (संभाव्य आक्षेप टाळण्याची पुरेशी खबरदारी घेऊन) तुमच्या-आमच्यासमोर ठेवले. यातले एक शतांश टक्काही श्रम न घेता, प्रस्तुत विषयाचा गंधही नसतांना केवळ मायबोलीने सुविधा दिली आहे म्हणून वाट्टेल ते लिहून त्यांची हेटाळणी, टवाळी करणार्‍यांची काय म्हणून पत्रास बाळगावी?

मायबोलीने सुविधा दिली म्हणूनच इथे त्या अंकाचा त्यातल्या काही चित्रांसहीत परिचय करता आला ना? मग त्यावर इतरांनी आपली मते व्यक्त करायची नाही का? जेव्हा एखादी गोष्ट सार्वजनिक केली जाते, तेव्हा त्यावर वेगवेगळी मते येणारच. त्याचा राग का यावा? आणि आपल्याला फक्त अनुकूल मतेच यावी असे वाटत असेल तर ती गोष्ट सार्वजनिक करूच नये. आपली मते जुळणार्‍या एखाद्या ठराविक वर्तुळात ती प्रसिद्ध करावी जेणेकरून त्यावर टीका होणारच नाही. आणि तुम्हाला इतरांच्या प्रतिक्रियेची पत्रास बाळगायची नसेल तर नका बाळगू. सक्ती नाही. इथे येऊन हा प्रतिसाद तरी कशाला दिला?

>>>> स्त्रीची विटंबना काय, पोर्नोग्राफी काय, दलाल-भडवेगिरी काय...

मायलेकीं समोरासमोर अवघडलेल्या अवस्थेत नग्नावस्थेत बसल्या आहेत व आजूबाजूचे अनेक जण त्यांच्या नग्न देहाचे निरीक्षण करून त्यांची चित्रे रेखाटत आहेत, यात मला तरी स्त्रीत्वाची विटंबना वाटली. तुम्हाला वाटली नसेल कदाचित (तुमचा अबोव्ह अ‍ॅव्हरेज आयक्यू असल्यामुळे).

एक १३-१४ वर्षांची निरागस मुलगी, जी वयात येण्याच्या सीमारेषेवर आहे, चित्रकारांच्या घोळक्यात नग्नावस्थेत बसली आहे, सर्वजण तिच्या नग्न देहाचे निरीक्षण करून चित्र रंगवत आहेत आणि अचानक सर्वांदेखत तिला पहिली पाळी येऊन तिची लाजिरवाणी अवस्था होते, यात मला तरी स्त्रीत्वाची विटंबना वाटली. तुम्हाला वाटली नसेल कदाचित (तुमचा अबोव्ह अ‍ॅव्हरेज आयक्यू असल्यामुळे).

बादवे, एका अज्ञान मुलीला अशा अवस्थेत बसविणे हा कायद्याने 'चाईल्ड पोर्नोग्राफी'चाच प्रकार आहे. वाटल्यास कोणत्याही वकीलाला विचारा. तुम्हाला तसे वाटले नसेल कदाचित (तुमचा अबोव्ह अ‍ॅव्हरेज आयक्यू असल्यामुळे), पण हा चाईल्ड पोर्नोग्राफीचाच प्रकार आहे.

>>> आणि हे असे लिहिणार्‍यांनीच संस्कृतीचा आणि सभ्यतेचा कैवार घेतला आहे असे चित्र निर्माण होणे आणि बाकी 'कुंपणावरच्यांनी' त्यांना मूक संमती देणे,

तुम्ही काल अत्यंत संदर्भहीन आयक्यूबद्दल 'पो' टाकला ('पो' हा तुम्हीच पुढे वापरलेला अजून एक शब्द तुम्हाला साभार परत) आणि पुढील काही क्षणातच काही जणांनी लगेच टाळ्या पिटल्या त्याचे काय? त्यांची तुम्हाला जाहीर संमती नव्हती का?

इथे नग्न चित्रे काढणार्‍यांना पाठिंबा देणार्‍यांनीच कलेचा, अबोव्ह अ‍ॅव्हरेज आयक्यूचा, रसिकतेचा कैवार घेतला आहे असे चित्र कोण निर्माण करत आहे?

>>> ढीगभर शब्दांचा पो टाकणार्‍या वाचाळवीरांच्या बरळीला 'चर्चा' म्हणणे, त्यांच्या पिंकांना 'मुद्दे' म्हणणे, आणि त्यावर कलेची बाजू सावरणार्‍यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून त्यांच्याकडून स्पष्टीकरणाची मागणी करणे- हे सगळेच अनाकलनीय आणि दुर्दैवी आहे !

हे सर्व तुम्हालाही तितकेच किंबहुना जास्तच प्रमाणात लागू आहे.

>>> केवळ काही लोक सार्वजनिक सभ्यतेच्या संकेतांना जुमानतात आणि तुमच्यासारखे विखारी लिहू शकत नाहीत याचा किती गैरफायदा घेणार?

इतरांच्या लिखाणाचा 'पो', 'पिंक', 'बरळणे', 'वाचाळवीर' अशा शब्दात उल्लेख करणे हे सभ्यतेच्या कोणत्या संकेतात मोडते ते जरा स्पष्ट करा.

>>> अशा संस्कृतीरक्षकांचा आयक्यू काढला तर अनेकांना 'लागले.' ते लागण्यासाठीच लिहिले होते.

तुम्ही आपल्याविरूद्ध विचार व्यक्त करणार्‍यांचा विचारांनी प्रतिवाद करण्याऐवजी, 'त्यांचा आयक्यू बिलो अ‍ॅव्हेरज आहे' अशी एक पिचकारी टाकून पळ काढला. तुमच्यापाशी कुठलेच वैचारिक मुद्दे नव्हते आणि पुढेही नसतील. अनेक असभ्य शब्दांनी भरलेल्या तुमच्या वरच्या प्रतिसादात एकही वैचारिक मुद्दा नाही. निव्वळ इतरांची हेटाळणी आहे.

नग्न चित्रकलेचे योग्य शब्दात समर्थन करणार्‍यांनीसुद्धा तुमच्या संदर्भहीन 'पिंके'बद्दल असहमती दर्शविली आहे, हे तुमच्या लक्षात आले नसावे (तुमच्या अबोव्ह अ‍ॅव्हरेज आयक्यूमुळे असेल कदाचित). नग्न चित्रकलेचे समर्थन करणार्‍यांनी योग्य व सभ्य शब्दात त्यामागची भूमिका समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अपवाद फक्त तुमचा एकट्याचाच.

>>> यांच्या अस्थानी आणि बेजबाबदार लिखाणाने किती संवेदनशील लोकांना 'लागत' असेल, याची मोजदाद कुणी करणार आहे की नाही?

तुमच्या असभ्य आणि संदर्भहीन लिखाणाने इतरांना काय वाटत असेल याची याची मोजदाद तुम्ही करणार आहात की नाही?

>>> मॉडेल्सना त्यांच्या कामाचा रितसर मोबदला मिळतो. ते स्वेच्छेने येतात. तो त्यांचा व्यवसाय आहे.

१२-१३ वर्षांची नहाण न आलेली मुलगी स्वतःच्या स्वेच्छेने येणे अशक्य आहे. हा तिचा व्यवसाय असणे अशक्य आहे.

>>> असे कुतूहल असेल तर खरोखर 'चिन्ह'वाल्यांसारखा त्याचा 'अभ्यास' करा. म्हणजे असा व्यवसाय का करावा लागतो, महाराष्ट्रात किंवा देशात किती न्यूड मॉडेल आहेत, त्यांच्या समस्या काय, त्यांना मोबदला पुरेसा मिळतो की नाही, त्यांच्या अपेक्षा काय आहेत वगैरे वगैरे. आणि काढा एखादे पुस्तक. पुस्तक सोडा, किमान एखादा धागा काढा मायबोलीवर आणि मांडा तुमचे मुद्दे तुमच्या चर्चाप्रस्तावात ! पण एवढे कष्ट कोण घेतो? त्यापेक्षा इथे आयत्या पिठावर रेघोट्या ओढणे कितीतरी सोपे, नाही का?

मला हे कळत नाही की हा लेख व या अंकाची ओळख सार्वजनिक व्यासपीठावर करून देण्यामागे नक्की काय उद्देश आहे? एखादी गोष्ट सार्वजनिक झाली की त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे, परस्परविरोधी अभिप्राय येणारच. ते ऐकून घ्यायची व सभ्य व वैचारिक मुद्दे मांडून प्रतिवाद करायची तयारी असली पाहिजे. अशी तयारी नसेल तर अशा गोष्टी सार्वजनिक करूच नयेत. अशा गोष्टी समाजासमोर मांडायच्या, मात्र त्यावर कोणी टीका करता कामा नये अशी अपेक्षा का आणि कशी ठेवायची? 'मायबोली'सारख्या मोफत सार्वजनिक स्थळावर आपल्या कामाची प्रसिद्धी करणे म्हणजेच इथे आयत्या पिठावर रेघोट्या ओढणे कितीतरी सोपे, नाही का?

>>> बाकी शर्मिलाताई फडके, साती यांच्या प्रतिसादानंतर आमच्यासारख्यांनी फार काही लिहावे असे नाही. आणि कितीही लिहिले तरी उपयोग होणार नाही- याची कल्पना आहेच. एका बाबतीत मात्र मी 'लिंबुटिंबू' या आयडीशी सहमत आहे. पुस्तकात दिली, तशी सूचना किंवा डिस्क्लेमर या लेखातसुद्धा द्यायला हवा होता. म्हणजे निदान इथले बनचुके ट्रोल्स इकडे फिरकले नसते. (असे वाटते.)

हा धागा एका विशिष्ट ग्रुपसाठी (म्हणजे नग्न चित्रकलेच्या समर्थकांसाठीच) नियंत्रित ठेवायला पाहिजे होता. तसे केले असते तर इथले बनचुके ट्रोल्स तिकडे फिरकले नसते. पण आता काय करणार? धागा सार्वजनिक झाला आणि इथले बिलो अ‍ॅव्हरेज आयक्यू असलेले बनचुके ट्रोल्स इथे रतीब घालायला लागले. धागा सार्वजनिक झाला ही मोठी चूकच झाली म्हणायची.

>>> माझ्या आधीच्या पोस्टमधले वाक्य- 'परि तू जागा चुकलासि' हे (कदाचित आयक्यूवाल्या टिप्पणीपेक्षा) जास्तच उचित होते, हे नंतरच्या प्रतिसादांनंतर सिद्धच होते आहे.

खरं सांगू का, तुमचा संपूर्ण प्रतिसादच अनुचित आहे.

>>>> आता या पोस्टवरही अनेकांना बरेच काही म्हणायचे असेल. ईट का जवाब पथ्थरसे वगैरे द्यायचा असेल. अनेकांना आपल्या अनेक 'मुद्द्यांना' उत्तरे मिळाली नाहीत, म्हणजे आपला चर्चेत (!) विजय झाला आहे असे वाटते आहे. अशांना माझे इतकेच सांगणे आहे की तुमचा विजय होणारच होता. इतिहासात कायम तुमचाच तर विजय होत आला आहे !!

काल तुमच्याकडे कोणतेही मुद्दे नव्हते व त्यामुळे नग्न चित्रकलेचे समर्थन करता येत नव्हते, म्हणून बाकी काहिही न लिहिता, विरोध करणार्‍यांना 'तुमचा आयक्यू बिलो अ‍ॅव्हरेज आहे' असा एक 'पो' टाकून तुम्ही पसार झालात. आजही तुमच्याकडे सांगण्यासारखे वैचारिक असे काहीही नाही आणि हे ओळखूनच संभाविताचा आव आणून तुम्ही आधीच पांढरे निशाण दाखवून पसार होत आहात. 'चीत भी मेरी, पट भी मेरी'!

>>> "Any fool can criticize, condemn and complain and most fools do it."

अगदी बरोबर. पण हे कोणाला अचूक लागू पडतंय हे तुमच्या लक्षात आलं असेलच.

मास्तुरे,

वरचा संदेश अगदी मुद्देसूद! शंभर टक्के अनुमोदन. माझ्याही थेट प्रश्नाला उत्तर मिळालेलं नाहीये.

माझा प्रश्न असा आहे : नग्नतेतून नवरसांपैकी कुठल्या रसाची निष्पत्ती अपेक्षित आहे?

मला चित्रकलेतलं काहीच कळंत नाही म्हणून बाळबोध प्रश्न विचारतोय. प्रश्न अगदी सरळधोप आहे पण समर्थकांपैकी कोणालाही त्याचं उत्तर द्यायची तसदी घ्यावीशी वाटत नाहीये. नग्नता अगदी सहज, नैसर्गिक वगैरे असते तर मग नग्न चित्रातून रसाविष्कार नको का व्हायला? उद्या जर मी नग्न चित्रांचं रसग्रहण करायचं ठरवलं, तर त्यांचं मूल्यमापन कोणत्या फूटपट्टीने करू? का फक्त मान डोलावून स्तुतीयुक्त केवलप्रयोगी अव्ययाची लकेर मारून विसरून जाऊ?

आपले अनुत्तरीत प्रश्न एकत्र बांधावेत हा सदर प्रश्न तुमच्यापुढे ठेवण्यामागील हेतू आहे.

कळावे लोभ असावा.

आ.न.,
-गा.पै.

मास्तुरे अनुमोदन..... मॉडेलला चार पैसे मिळतात म्हणून एखादी कला (?) अभिजात ठरत नाही.. अन्यथा डान्स बार , बार गर्ल यांचे नृत्य हीही एक मोठी कला ठरेल आणि ज्याला ही कला आवडत नाही, त्याला बिलो आय क्यु म्हणावे लागेल. ...

सर्वप्रथम, मी गदिमांच्या गाण्यातली एक ओळ या धाग्यावर प्रतिसादात लिहिली व अवांतर चर्चेत भर पडली हे खरे आहे पण जामोप्यांनी त्या गाण्याचे एक अतिशय उत्कृष्ट असे विनोदी विडंबन केले हा लाभ बघता धागाकर्ते व गंभीर चर्चेत रस असलेले सदस्य ही मला माफ करतील अशी मी आशा बाळगतो. त्याच बरोबर वेगळ्या शैलीत व्यक्त झालेले एक विरोधी मत ( विषयाशी ते विडंबन अर्थातच अवांतर नाही ) म्हणून व्हॉल्टेअर ला मानायचे असेल तर ते विडंबन या धाग्यावर रहायला हवे असे मत मी आवर्जून मांडतो.
खरे सांगायचे तर चित्रकले शी माझा संबंध एलीमेण्ट्री परिक्षा बी ग्रेड मधे व इंटर्मिजिएट सी ग्रेड मधे एवढाच. बी कडून सी कडे माझी प्रगती होतांनाच चित्रकला हा काही आपला प्रांत नाही हे मला कळून चुकले व मी तो नाद सोडला हे लिहिण्याचे कारण असे की मी हाती फक्त दाढी करण्याचा च ब्रश हाती धरलेल्या लोकांमधे नाही हे नमूद करणे.
नग्न कले शी माझा परिचय झाला तो फक्त जे जे कलादालनात काही चित्रे कधीकाळी पाहिली तेवढाच. पण अलिबाग जवळील सासवणे गावी असलेले विख्यात शिल्पकार स्व. नानासाहेब करमरकर यांचे शिल्प संग्रहालय घरी आलेल्या पाहुण्यांना दाखवण्याच्या निमित्ताने अनेकदा पाहिले. तिथे असलेली "शंखध्वनी" ( ज्या शिल्पामुळे कलकत्ता येथे पुरस्कार मिळून नानासाहेब कला जगात प्रसिद्धीच्या झोतात आले) व केवळ एक पंचा नेसून पालथी मांडी घालून बसलेले कृश शरीराचे गांधीजी ही दोन शिल्पेही मला नग्न कलेचे सौंदर्य काय असते ते कळण्यास पुरेशी होती.
मुद्दा हा आहे की आज नग्नता समाजात स्वीकार्य नाही हे आलेल्या विरोधी प्रतिसादांवरून उघड आहे. , ज्या देशात खजुराहो सारखी शिल्पकला भरभराटीस येते, कामसूत्रा सारखा ग्रंथ लिहिला जातो त्या देशातील शिवलिंग पूजा करणार्‍या समाजात नग्नता अस्वीकार्य का झाली या लिम्बूदांच्या बोचर्‍या प्रश्नाच उत्तर माहीत असुन ही आम्ही देणार नसू तर एक विचारवंत म्हणून आम्ही कमी पडतोय की सत्य सांगणं आम्हाला पोलिटिकली इन करेक्ट वाटतय याचा विचार करायला हवा. मी विचारवंत नसल्याने न ब्रुयात पोलिटिकली इन करेक्ट सत्यम !! हे सुधारित सुभाषित बाजुला ठेउन सांगू इच्छितो की हो, शेकडो वर्षांच्या अत्याचारी इस्लामी राजवटी ( आठवा रजपूत रमणींचे जोहार इ.) नंतर दीडशे वर्ष इंग्रजांचा अंमल ( नो सेक्स प्लीज!! वी आर ब्रिटिश!! ) याचा अपरिहार्य परिणाम म्हणून आज नग्नता समाजात अस्वीकार्य आहे हे वास्तव आहे.
मग अशा परिस्थीती मधे जर विरोधी मत व्यक्त करणारे प्रतिसाद आले तर मायबोली करांचा सरासरी आय क्यू च कमी ( साध्या मराठीत गाढवाला गुळाची चव काय? ) असे म्हणायच की चित्रकलेचा व त्यात ही नग्न कलेचा आस्वाद कसा घ्यावा हे सांगणारे लेख/प्रतिसाद लिहायचे हे चांगला आयक्यू असणारांना(कोणी एकच व्यक्ती अस नाही ) तरी कळायला हव. कदाचित बुद्ध्यांक (आय क्यू ) ही संकल्पना मनुष्याची कुवत जोखण्यास कमी पडते म्हणूनच की काय आजकाल मनुष्यबळ विकास क्षेत्रात भावनीक गुणांक ( इमोशनल कोशण्ट) ही संकल्पना आली आहे. मी इथे कुणाचा ही इ क्यू काढत नाहीये याची कृपया नोंद घ्यावी.
विरोधी मते व्यक्त करणारांचे शब्द अयोग्य असतील ही पण त्यांचे प्रश्न अयोग्य नाहीत अस मला वाटत.मास्तुरे यांनी उपस्थित केलेले मुद्देही चिंतनीय आहेत.
चिन्ह च्या या अंका बद्द्ल मी पूर्वीच आंतरजालावर वाचल होत.उशीरा का होईना शर्मिला फडके व साती यांचे आलेले प्रतिसाद माझ्या सारख्या अनेकां च्या कलाविषयक जाणीवा अधिक प्रगल्भ करुन गेले असतील यासाठी त्यांचे आभार. मी प्रतिसादात लिहिलेल्या गदिमांच्या गाण्यातल्या ओळी मुळे कोणी दुखावले असेल तर माफी असावी.

बाफ वाचला. दर वेळेला पुढच्या पानावर जाताना सगळी चित्रं पुन्हा दिसतात अन ते टाळण्यासाठी मी खालून वर स्क्रॉल करतेय. मला कलेतलं काही कळत नाही (चित्रकलेत त्यातल्या त्यात जरातरी कळतं). त्यामुळेच कदाचित, चित्रं आवडली नाहीत. (i think i have the right to say this, even though it sounds like a troll to some) न्युड मॉडेल म्हणून कुणालाही अन त्यातल्या त्यात लहान पोरांना बसवणे अतिशयच खटकले. आजुबाजुच्या चित्रकारांनी (समजा) अगदी क्लिनिकल नजरेनी बघितले तरी त्या लहान मुलांनासुध्धा ते आवडणे अशक्य आहे (it could be disastrous to their emotional health and self image) आणि ते जर त्यांना पैशासाठी (केवळ ६० रु) करावे लागत असेल तर कुठल्याही सुसंस्कृत्/उच्च अभिरुचीपुर्ण्/संवेदनशील (कलाकार) व्यक्तीला त्यात काहीच वाईट वाटू नये? व्हेरी सॅड!!! मी त्याऐवजी त्या बाळाला ६०रु दिले असते अन घरी पाठवले असते. (याहून जास्त काही करणे मला शक्य नाही).
चित्रात न्युडीटी असणे याला माझा आक्षेप नाही तरी त्यासाठी काही पैसे देऊन इतरांच्या सेल्फ एस्टीमला धक्का लावणे मला आक्षेपार्ह वाटले. हेही मान्य की अशा प्रकारचे हेच एकुलते एक उदा. नाही. पण सध्या या बाफवर हाच विषय असल्याने फक्त तेवढ्याचाच उल्लेख करतेय.
बीचवर स्वेच्छेने उघडे बसलेले लोक अन इतर पर्याय नसल्याने ६० किंवा ६०००रु मिळवण्यासाठी न्युड मॉडेलिंग करणारे यांच्या मनस्थितीत कसलाच फरक नसावा, असं गॄहीत धरणं फारच धाडसाचं आहे.
जाताजाता: माझा आयक्यु अ‍ॅव्हरेजच्या काही मजले वर आहे, असं आयक्यु टेस्टमध्ये दिसून आलंय. त्यामुळे त्याविषयी शंका घेऊ नये. Wink

साती,
>>वरच्या उदाहरणात अल्प वयातील मुलगी मॉडेल म्हणून वापरली आहे,ती आर्ट स्टुडंट नाह>><<

एक तुमची वाचण्यात झालेली चूक... मी त्या लहान मॉडेल्स विषयीच विचारलेले(पुन्हा वाक्य वाचून पहा).

ज्ञानेश,अरे हा धागा जर सार्वजनिक आहे तर मग ह्या बड्या बड्या बिनबुडाच्या बाता कशाला?आमच्या एकाही पोस्टला अनुसरून तुमची पोस्ट दिसलीच नाहीये आणि तुमच्या आयक्यु पोस्टने धुराळा उडाला म्हणजे तुमचा विजय झाला असं वाटतं का? मला जे वाटलं ते मी लिहिलं आणि त्यावर चर्चा करत गेलो. त्यात नकारात्मक सुर असेलही पण ते माझं मत आहे आणि ते मी लादत नाहीये मांडतोय फक्त. पण हे मायबोलीवर लिहिलंय म्हणून ते चांगलच आहे आणि ते पॉझिटिव्हच आहे असं तर होत नाही ना? कि 'मायबोली' आणि 'चिन्ह' यामधे काही विशिष्ट करार झालाय म्हणून हे चांगलच आहे असा सुर व्हायला हवा असं काही आहे काय? मला तरी ते शर्मिला फडके यांच्या पोस्ट वरून वाटलं नाही कारण तेवढ्यापुरता मी माझा आयक्यु शिल्लकीत ठेवला होता आणि तसा काही करार असेलच तर मग हे सगळं चाललंय ते योग्यच आहे असं म्हणावं लागेल कारण तुम्ही चर्चा करणे, मतं मांडणे एवढंच अपेक्षित आहे असं वरती कुठेतरी वाचलं होतं मी. बाकी, मास्तुरे यांनी लिहिलंच आहे त्याला +१. असोत, माझे जे काही मत असेल 'चिन्ह' आणि या 'नग्न' चित्रांविषयी ते मी नोंदवलंय आणि त्यावर योग्य ती चर्चा केलीये आणि सहभागही घेतलाय. यातच मायबोलीसारख्या सार्वजनिक संकेतस्थळांचा मुळ उद्देश असावा. आता तुम्ही हे ही म्हणाल कि तुम्ही नीट बोललात हो मग तुम्ही कशाला उगाच मनावर घेताय? त्याचं उत्तर हेच असेल कि वरती लेखात सुद्धा सगळं चांगलं लिहिलंय ना मग तुम्ही आणखी येऊन सांगायची गरजच काय? बाकी आणखी चर्चा यावर काय अपेक्षित आहे. पुन्हा एकदा मी माझं मत मांडलंय.

असे कुतूहल असेल तर खरोखर 'चिन्ह'वाल्यांसारखा त्याचा 'अभ्यास' करा. म्हणजे असा व्यवसाय का करावा लागतो, महाराष्ट्रात किंवा देशात किती न्यूड मॉडेल आहेत, त्यांच्या समस्या काय, त्यांना मोबदला पुरेसा मिळतो की नाही, त्यांच्या अपेक्षा काय आहेत वगैरे वगैरे. आणि काढा एखादे पुस्तक. पुस्तक सोडा, किमान एखादा धागा काढा मायबोलीवर आणि मांडा तुमचे मुद्दे तुमच्या चर्चाप्रस्तावात ! पण एवढे कष्ट कोण घेतो? त्यापेक्षा इथे आयत्या पिठावर रेघोट्या ओढणे कितीतरी सोपे, नाही का?

आहो, 'चिन्ह' वाल्यांसारखाच का? पुन्हा एकदा चिन्हचीच बाजू. यापेक्षा तुम्ही हे म्हणू शकला असता की एक चर्चासत्र आयोजित करा. यापुर्वीही इथे बर्‍याच विषयांवर चर्चा झाल्या आहेत. त्या चर्चेमधे काही 'चिन्ह'चे सभासद ( विशेषांक त्यांचा म्हणून), एखादा प्रसिद्ध चित्रकार वा मुर्तिकार ( मायबोली सध्या माध्यम प्रायोजक मधे आहेच तर ) हे शक्य असावं आणि काही पझेसिव्हली पॉझिटीव्ह प्रतिसाद देणारे इथले मायबोलीकर, निगेटिव्ह प्रतिसाद ( जे तुम्हाला वाटतात ) देणारे मायबोलीकर आणि काही सर्वसामान्य कॅटॅगिरीतले लोक. जमल्यास चिन्हच्या पुढाकाराने एखाद्या न्युड मॉडेलचा पेशा स्विकारणार्‍या मॉडेलसचीही ह्यावरची मते नोंदवायला हवीत ना? ( पुरूष, स्त्री कोणीही चालेल ). चिन्हच्या दृष्टीने असं काही भविष्यात घडलं तर ते स्वागतार्हच असायला हवं? आणखी थेट पोहचता येईल त्यांना लोकांपर्यंत.

ज्ञानेश यांची ६ जानेवारीची २०.०३ ची पोस्ट दुर्लक्षित करत आहे. शर्मिला फडकेंच्या पोस्टपुढेच पुन्हा हा प्रतिसाद द्यावासा वाटत आहे.

१. चर्चा उत्तम

२. अंकासाठी घेतले गेलेले प्रचंड परिश्रम, अंकाचा हेतू ( चित्रकलेतील नग्नतेवर सांगोपांग चर्चा) व साहसी व नावीन्यपूर्ण विषयावर घेतलेला स्टॅन्ड या सर्वांसाठी मनापासून अभिनंदन!

३.अंकाचा चिनूक्स यांनी दिलेला परिचय उत्तमच!

४. कदाचित जे सर्व प्रश्न येथे काही जण विचारत आहेत त्याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा अंकाचा प्रयत्न आहे हे प्रतिपादनही पटण्यासारखेच!

=============

तरीही:

१. चित्रकारांना वाटणार्‍या नग्नतेच्या आकर्षणाला मुळात महत्व का दिले जावे

२. जिवंत मॉडेल्सना असे नग्न बसवून जी कलानिर्मीती होते ती जर इतक्या लज्जास्पद मार्गावर अवलंबून असेल आणि तरीही ती कलानिर्मीती करणे आवश्यकच असेल तर तिचा मुळात उपयोग काय आणि असे विचारण्यात गैर काय आणि अंक न वाचताही त्याचे उत्तर याच फोरमवर येथेच अपेक्षित असण्यात गैर काय

३. केवळ एखाद्या विषयाचा गंध, अभ्यास हे असल्याशिवाय त्यात बोलूच नये अशी अपेक्षा असल्यास मायबोलीवरील किती टक्के प्रतिसाद रद्द होतील

४. चित्रपट परिक्षण, राजकारणी नेत्यांवरच्या टिपण्ण्या, क्रिकेटपटूंवरील मतप्रदर्शन, कोणत्याही सामाजिक, साहित्यीक , कलाविषयक टिपण्ण्या करताना ही अपेक्षा (की त्यातील अभ्यास / कर्तृत्व असायला हवा/ हवे व ते सिद्ध व्हायला हवे) का व्यक्त होत नाही आणि स्वतः अभ्यासाशिवाय तसे मतप्रदर्शन करताना मायबोलीला पैसे देऊन मतप्रदर्शनाचे हक्क घेतले जातात का

५. अभ्यास असणे, गंध असणे / नसणे या अपेक्षा केवळ चित्रकला या एकाच क्षेत्राला का लागू होतात

हे प्रश्न (माझ्यामते तरी) अनुत्तरीत आहेत.

-'बेफिकीर'!

>>> माझा प्रश्न असा आहे : नग्नतेतून नवरसांपैकी कुठल्या रसाची निष्पत्ती अपेक्षित आहे?

माझे मत - सभ्य शब्दात सांगायचं झालं तर बालकांच्या नग्नतेतून निरागसतेची/वात्सल्यरसाची (वात्सल्य हा नवरस समजला जात असेल तर) व तरूणींच्या नग्नतेतून श्रुंगाररसाची निष्पत्ती अपेक्षित असावी. असभ्य शब्दात सांगायचं झालं तर तरूणींच्या नग्नतेतून कामवासनेची/आंबटशौकीन वृत्तीची निष्पत्ती अपेक्षित असावी.

>>> नग्नता अगदी सहज, नैसर्गिक वगैरे असते तर मग नग्न चित्रातून रसाविष्कार नको का व्हायला?

सार्वजनिक ठिकाणी, स्वतःच्या कुटंबात इतर कुटुंबियांबरोबर वावरताना, जवळच्या मित्रमंडळींच्या सहवासात किंवा घरात पूर्णपणे एकटे असताना सुद्धा माणूस पूर्ण कपड्यातच वावरतो. नग्नता ही सहज, नैसर्गिक, पवित्र, निरागस, श्लील असती तर माणूस स्वतःच्या कुटंबात वावरत असताना किंवा निदान घरात पूर्णपणे एकटे असताना तरी वस्त्रे परिधान न करताच वावरला असता. पण तसे होत नाही. याचा अर्थ नग्नता ही वाटते तशी सहज, नैसर्गिक, पवित्र, निरागस, श्लील इ. अजिबात नाही आणि नग्नतेचा नक्कीच कोणत्यातरी अयोग्य/चुकीच्या/असभ्य रसाशी संबंध असणार.

'नग्नता' , 'चिन्ह' आणि 'मायबोली' यांच्या निमित्ताने ह्या विषयावर आणखी काही मुद्दे उपस्थित करतो आहे. बघुयात कशी आणि काय उत्तरे मिळतायेत ती.

१. स्पेन्सर ट्युनिक बद्दल आपले काय मत आहे? ह्या माणसाची फोटोग्राफी आणि तीच्यासाठी 'नग्न' होण्यासाठीचा तमाम पाश्चात्य फॅन्सचा वेडेपणा याला काय म्हणावं?

२. हे सुद्धा वाचा.

यावर काही विशेष प्रतिक्रिया? 'चिन्ह' हे गेल्या २ दशकांपासून कलेशी निगडीत असल्याने हे विचारतो आहे.

हे मजेशीर असलं तरीही आपल्याला विचार करायला लावणारं नक्कीच आहे.

मनुष्य आणि इतर प्राण्यांमधे बुद्धीव्यतिरिक्त कपड्यांचाही फरक आहे. नग्नता नैसर्गिक आहे तर श्लील अश्लील ही कल्पना मानवी बुद्धीची उपज आहे. कल्पना जशी कालबाह्य होत जातात तशी संस्कृती बदलत जाते. त्यासाठी विचारात परिवर्तन घडावं लागतं जी सातत्याने चालणारी प्रोसेस आहे. कदाचित काही वर्षांनी हा बाफ वाचताना वेगळे विचार मनात येण्याची शक्यता आहे.

१९९१ मध्ये प्रख्यात अभिनेत्री डेमी मूरने गर्भारपणाच्या ८ व्या की ९ व्या महिन्यात 'व्हॅनिटी फेअर' नावाच्या एका मासिकाच्या मुखपृष्ठावर स्वतःचे तसे चित्र (अवयव हाताने झाकलेले) दिले होते. पण नग्नतेकडे पूर्णपणे वेगळ्या दृष्टीने पाहणार्‍या अनेक अमेरिकनांनी त्या चित्रावर व अशा अवस्थेत पोझ देणार्‍या डेमी मूरवर प्रखर टीका केली होती. त्याच्या पुढची पायरी म्हणजे तिची आई. आपल्या मुलीने अशी चित्रे दिल्याचा संताप आल्याने त्या माउलीने एका दुसर्‍या मासिकाला स्वतःची तशी चित्रे दिली. आपल्या जवळच्या व्यक्तींची तशी चित्रे बघितल्यावर किती त्रास होतो हे माझ्या मुलीला कळावे म्हणून मी अशी चित्रे दिली असे तिच्या आईचे म्हणणे होते.

हे लिहिण्याचा उद्देश एवढाच की अमेरिकेसारख्या अगदी पूर्ण ओपन समाजात सुद्धा नग्नतेबद्दल समाजाची भूमिका वेगळी असू शकते आणि ती वाटते तितकी ओपन नाही.

या अंकाची मला एक इमेल आली होती, त्यात अनेक लेखांची ओळख होती, मी एकदा नजर टाकली होती, पण त्यात फार काही लक्ष देण्यासारखे मला वाटले नाही.
इथली चर्चा पण वाचतच होतो, पण इथेही काही लिहिण्यासारखे वाटले नाही,

पण आय क्यू चा उल्लेख झाला म्हणून आणि म्हणूनच लिहितोय.

आपली मते न पटणारी व्यक्ती हि बुद्धीमान नाही, असे मत व्यक्त करणे आणि त्याचे
समर्थन करणे, हे मला निषेधार्य वाटते. मायबोलीकरांपैकी अनेकजण सुबिद्य आहेत,
या ना त्या निमित्ताने त्यांनी आय क्यू टेस्ट्स दिल्याही असतील आणि मला खात्री आहे कि कुठल्याही आय क्यू टेस्ट मधे, न्युड्स आवडतात का, किंवा एखादे न्यूड चित्र दाखवून अनेक पर्यायांपैकी एक निवडा, असा प्रश्न असत नाही. त्यामूळे न्यूड चित्रांसंबधी नापसंती, व्यक्त केल्यास त्या व्यक्तीचा आय क्यू कमी आहे असा आरोप करणे, याचे कधीही समर्थन होऊ शकत नाही.

आता बाकिचे मुद्दे.

१) जाहीरात
मायबोलीवर हा अंक विकायला ठेवला आहे आणि मूळ लेख हा त्याची जाहिरात आहे. हि जाहिरात वाचून लोकांनी अंक विकत घ्यावा, अशी अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टीने निवडलेली चित्रे आणि लेख उत्तम आहेत. जामोप्यांनी सुचवल्याप्रमाणे इथे जर चित्रांच्या निवडीत, विविधता असती, तर अर्थातच हा हेतू साध्य झाला नसता.

२) अल्पवयीन मॉडेल

हा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे. आणि समजा जरी तो घडला असला, तरी त्याचा इथे उल्लेख करणे, हे देखील मला आवडलेले नाही. (वास्तवात असे घडत नाही काय, असला युक्तीवाद इथे केला जाणारच नाही, असे म्हणवत नाही. बघा आम्ही प्रामाणिकपणे जे घडले ते लिहिलेय, असाही युक्तीवाद केला जाईल.)
भारतात अल्पवयीन मुलींना कायदेशीर संमती देता येत नाही, आणि तिच्या पालकांनीही अशी संमती देणे, मग ते कलेच्या नावाखाली का असेना, अत्यंत निषेधार्य आहे.
आजही जर असे होत असेल तर त्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी माझी इच्छा आहे. याबाबत शिकाऊ वा शिकलेले चित्रकारही नापसंती व्यक्त करत नाहीत, हेही निषेधार्यच आहे. आईच्या कुशीत खेळणारे तान्हे बाळ, मग ते विवस्त्र असले तरी, मनात वात्सल्यभावच निर्माण करते, पण या वयातील मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन असा निर्मळ असेल असे मला वाटत नाही.

३) रसनिर्मिती

रायबाने विचारलेल्या प्रश्नाला कुणी उत्तर दिलेले दिसत नाही. निदान या चित्रांकडे बघून तरी मला केवळ करुणा आणि करुणाच वाटते. यापैकी कुठल्याही मॉडेलच्या चेहर्‍यावर बनचुकेपणा नाही. किंवा बिपाशा बासूच्या चेहर्‍यावर तिच्या अभिनयाचा एक भाग म्हणून असणारे आव्हानही नाही.

ते ज्या अवस्थेत बसले वा उभे आहेत (किंवा त्यांना जसे बसवले वा उभे केले आहे ) ते नैसर्गिक वाटत नाही, आणि अश्या अवस्थेत काहि काळ स्तब्ध (नेमका किती काळ ?) राहणे, निश्चितच अवघड आहे. काही पैश्यांसाठी आणि निव्वळ पोटाची भूक भागवण्यासाठी ते असे करताहेत, हे लपत नाही.

मिलिंद सोमण, जॉन अब्राहम, अनु अगरवाल, मधु सप्रे यांनी असे केलेले फोटोसेशन
मला माहीत आहे आणि त्यानंतरचे फोटो मी बघितले आहेत. त्या फोटोत त्यांच्या चेहर्‍यावर व्यावसायिक बेदरकारी आणि आपल्या शरीराचा सार्थ अभिमान दिसतो आणि अर्थातच त्यासाठी त्यांना भरपुर मोबदला मिळाला असणार, हे निश्चितच.

४) या अंकाचा हेतू

कलासंस्कार वगैरे शब्द वापरले तरी हा अंक काढायचा नेमका हेतू मला कळलेला नाही.
हा अंक वाचून नेमके काय करायचे ? अशी पेंटीग्ज विकत घ्यायची, सार्वजनिक ठिकाणी आपली शरीरे उघडी टाकायची, आणखी कुणी करत असतील तर त्याकडे डोळेझाक करायची, निव्वळ दारिद्र्यामूळे जे लोक पुरेसे कपडे घालू शकत नाहीत, किंवा ज्यांच्या काही धार्मिक समजुतींमूळे जे आपले पूर्ण शरीर झाकत नाहीत, त्यांच्याकडे रसिकतेने बघत बसायचे ? नेमके काय अपेक्षित आहे ?

शर्मिलांनी उल्लेख केल्याप्रमाणे मूळे लेख खुपच अभ्यासपूर्ण आहे, मग तो भाग वगळून
नेमका हाच भाग का दिलाय इथे ? मग हि जाहिरात आहे, असे का मान्य केले जात
नाही ?

५) प्राचीन संस्कृती

या बाबतीत वरदांबद्दल मला नितांत आदर आहे, त्यांनी दिलेल्या माहितीला पूरक
असे काही लिहावेसे वाटतेय.
अपत्य निर्मितीमधे पुरुषांचा काही सहभाग असतो, हे बराच काळ मानवाला माहीत
नव्हते.त्याकाळात स्त्रीलाच हे सामर्थ्य आहे असे मानण्यात येत होते, आणि योनिपूजन
केले जात असे, पुढे अन्नासाठी भटकंती करताना दोन वेगवेगळ्या टोळ्यातील, भिन्न
रुपांच्या स्त्री पुरुषांच्या संकरातून जी नवी पिढी जन्माला आली, त्यांच्या रुपाकडे
बघून या सहभागाची कल्पना आली, आणि मग पुढे लिंगपूजा सुरु झाली.
कोकणात पुर्वी जोकमार नावाची देवता असे, तिची मुर्ती लिंगाचीच प्रतिकृती असे,
त्या देवतेचे पुढे देवकुमार असे नामकरण करण्यात आले आणि स्वरुपही मानवी झाले.
शिवलिंग काय किंवा पानसुपारी काय हि प्रतीकेच आहेत पण त्यांच्या रुपात खुपच
बदल झाला आहे. ( हे सर्व वाचलेले, नेमका संदर्भ आठवत नाही, कुणाला माहित
असल्यास जरुर लिहा.)

६) शिल्पकला

भारतातील अनेक मंदिरांवर कोरीव मुर्ती आहेत. (नुसत्या खजुराहो मधल्याच नाहीत.)
त्यावरच्या मुर्ती बघता, त्यासाठी प्रत्यक्ष स्त्री पुरुष ऊभे केले असतील असे मला
वाटत नाही. कारण एकतर तश्या अवस्थेत मुर्ती घडेपर्यंत (त्याला चित्र काढण्यापेक्षा
नक्कीच जास्त वेळ लागत असेल. ) राहणे, सर्वस्वी अशक्य आहे, आणि दुसरे म्हणजे
त्याची कोरीव शरीरे, हि वास्तव वाटण्यापेक्षा, काव्यात्मक (केळीच्या गाभ्यासारखे
पाय आणि कुंभासारखे ऊरोज ) जास्त वाटतात.
पण तरीही त्या प्रमाणबद्ध, आकर्षक आणि जिवंत वाटतातच ना ?

७) वस्त्र

नेमकी कधी आपल्याला अनावृत्त शरीराची लाज वाटायला लागली, याचा संबंध परकीय आक्रमणाशी जोडला आहे. पण याची दुसरी एक शक्यता असू शकते, असे मला वाटते.

आपल्याला वस्त्र विणण्याची आणि शिवण्याची कला जरा नंतर आली. रुंद हातमाग आणि वस्त्रांचे रंग आपल्याकडे नव्हते. कापसाचे उत्पादनही तेवढे नव्हते आणि वस्त्रांची किंमत कदाचित सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेरची होती. (अंगात कंचुकी घालणे, हा सोळा शृंगारांपैकी एक होता ) कपड्याच्या मानाने दागिने घडवण्याची कला कदाचित जास्त प्रचलित होती. हातमागाचा शोध व कापसाचे उत्पादन वाढले व त्यानंतरच कदाचित अंग झाकण्याची पद्धत पडली असावी.

८) वैद्यकीय अभ्यास

वैद्यकीय अभ्यासासाठी रुगणाचे शरीर उघडे टाकताना, त्याला बरे करण्याची भावना
जास्त प्रबळ असते (सन्माननीय अपवाद असतीलच) शिवाय शस्त्र्क्रियेच्या वेळी
केवळा दुखरा अवयवच चादरीच्या बाहेर ठेवलेला असतो. त्यामुळे तशी तुलना मला
गैर वाटली.

९) चित्रकलेच्या विद्यार्थ्यांची मानसिकता

वरच्या उतार्‍यातच काही उल्लेख असे आहेत, कि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेबद्दल शंका
घेण्यास वाव आहे.
तूम्हाला चित्रच आणि तेही हुबेहुब काढायचे असेल, तर समोर बसणारी व्यक्ती हि रुढार्थाने सुंदर, तरुण असावी अशी अपेक्षा ठेवलेली दिसते. अर्थात कलासंस्कार त्यानंतर होत असावेत.

१० ) माझे मत

नग्न चित्रांचे मला वावडे नाही, पण त्याचे अगदी जोरदार समर्थन करावे, असेही मला वाटत नाही. चिन्हने आधी कुठल्या विषयावर अंक काढले होते ते मला माहित नाही, निदान त्याची जाहीरात माझ्यापर्यंत पोहोचली नाही. हा अंकही विकत घ्यावासा वाटला नाही.

११) अपेक्षित उत्तर

असे चित्र काढण्यासाठी स्वत: वा सहकार्‍याचा, मॉडेल म्हणून का ऊभे केले जात नाही (नातेवाईकांना वगळा रे प्लीजच ) याचे उत्तर नाही असेच असणार, पण तसे ते का दिले जात नाही हे मला कळले नाही. कदाचित का ? असा पुढचा प्रश्न असेल म्हणून..

एवढे बोलून मी आता रजा घेतो, म्हणजे आता खरेच रजा. या प्रतिक्रियेवर वाद होतील, याची शक्यता कमी आहे, आणि झालेच तर मी बघेपर्यंत बरेच दिवस जातील.

Pages