यंदा पंचविशीत पदार्पण करणारं 'चिन्ह' हे मराठी कलावार्षिक चित्रकला आणि तिच्याशी संबंधित दृश्यकलांना केंद्रस्थानी ठेवून निघतं. मात्र चित्रकलेचा सर्वांगानी वेध घेणे इतकाच मर्यादित हेतू 'चिन्ह'चा निश्चितच नाही.
चित्रकला म्हणजे एका अर्थाने चित्रकारांची कहाणी. त्यांची वैयक्तिक आणि चित्रनिर्मितीच्या प्रेरणेची हकीकत काही वेगळी नसते याची जाणीव 'चिन्ह'ला आहे. चित्रकलेबद्दल बोलायचे तर आधी चित्रकारांची ओळख व्हायला हवी, त्यांचं जगणं, त्यांचं वावरणं, त्यांचं असणं यातून विकसित होत गेलेल्या त्यांच्या कलाविषयक जाणिवांचाही शोध घ्यायला हवा ही जाणीव 'चिन्ह'ला अगदी पहिल्या अंकापासून होती.
१९८७ साली स्वतः चित्रकार आणि पत्रकारही असलेल्या सतीश नाईक यांनी 'चिन्ह' पहिल्यांदा प्रकाशित केला तो दिवाळी अंकाच्या स्वरुपात. तोपर्यंतच्या दिवाळी अंकांमधे चित्रकला किंवा एकंदरीतच दृश्यकलांना अंकाच्या साहित्यिक विभागात काहीही स्थानच नव्हतं. अंकाच्या सजावटीपुरताच चित्रकलेचा संबंध. चित्रकलेचा व्हावा तसा 'संवाद'च त्यामुळे वाचकांशी होत नव्हता. 'चिन्ह'मुळे हा संवाद शक्य झाला. चित्रकार हे काही फक्त आपल्या स्टुडिओच्या चार भिंतींमधे बसून चित्र काढणारे गूढ अस्तित्व नाही , तर तुमच्या आमच्यासारखेच रागा-लोभांचे, मैत्री-प्रेमाचे, इगो-जेलसीचे कपडे पांघरलेली हाडामासांची माणसे आहेत याचे एक भान 'चिन्ह'ने वाचकांना दिले.
१९८७ ते ८९ आणि त्यानंतर २०००पासून आजतागायत चित्रकार गायतोंडे, प्रभाकर बरवे, वारली आणि मधुबनी चित्रकला पहिल्यांदा जगासमोर आणणारे चित्रकार भास्कर कुलकर्णी विशेषांक, रविवर्म्याच्या चित्रकारितेचा, त्याच्या उद्ध्वस्त साम्राज्याचा शोध घेणारा विशेषांक आणि 'निवडक चिन्ह' असे चित्रकलाविषयक अत्यंत दर्जेदार आणि संग्राह्य विशेषांक 'चिन्ह'ने दिले.
‘चिन्ह'चा या वर्षी आलेला 'नग्नता - चित्रातली आणि मनातली' हा विशेषांक या सर्वांत सर्वार्थाने आगळा. 'नग्नता' या शब्दाच्या चित्रकलेतील व्याप्तीसंदर्भात सांगोपांग चर्चा, इतिहास-संस्कृती, १९व्या शतकाच्या पूर्वार्धात भारतीय कलाशिक्षणात समाविष्ट करण्यात आलेल्या न्यूड चित्रणाच्या संदर्भातली, आजवर कधीही प्रकाशात येऊ न शकलेली माहिती, अॅकेडेमिक न्यूड स्टडीमधून नंतर प्रत्यक्ष पेंटींग, शिल्प, इन्स्टॉलेशन्स, लाईव्ह आर्टपरफॉर्मन्सेसपर्यंत झालेला प्रवास यात आहे.
चित्रकार अकबर पदमसी, सुधीर पटवर्धन, प्रभाकर कोलते,सुहास बहुळकर, देवदत्त पाडेकर, साहित्यिक भालचंद्र नेमाडेंपासून, मेघना पेठे, कविता महाजन, प्रतिभा रानडे, मानसोपचारतज्ञ डॉ.आनंद नाडकर्णींपासून सेक्सॉलॉजिस्ट डॉ.प्रकाश कोठारी, शास्त्रोक्त नर्तिका पार्वती दत्ता अशी अनेक व्यक्तिमत्त्वे यात लिहिती झालेली आहेत, हिंदू कॉलनी ते अॅमस्टरडॅम असा प्रवास करणार्या लाईव्ह आर्टपरफॉर्मर मोनाली मेहेरचे चित्तथरारक आयुष्य यात आहे.
'नग्नता - चित्रातली आणि मनातली' या विशेषांकाच्या संपादनाची जबाबदारी घेतलेल्या शर्मिला फडके यांनी या अंकात हा अंक काढण्यामागची 'चिन्ह'ची भूमिका मांडली आहे. ती अशी-
नग्नतेचा स्वीकार कठीणच असतो. पाहणार्याची दृष्टी विशाल नसेल तर शरीरच काय, मन उघडे करणारा माणूसही अनादरासच पात्र ठरतो. - फ्रान्सिस बेकन
’न्यूड विशेषांक’ काढण्याचं ’चिन्ह’ने का ठरवलं? समाजाची संवेदनशीलता टोकाला येऊन पोचलेली असताना हा अंक काढायचं धाडस 'चिन्ह'ला करावसं वाटलं ते नेमकं कोणत्या भूमिकेतून? आजच्या समाजात वेगवेगळ्या माध्यमांमधून नग्नता इतकी चेहर्यावर आदळत असताना, नग्नतेचं जरुरीपेक्षा जास्त स्तोम माजवलं जात असल्याचा, त्याला नको इतकं ग्लॅमर बहाल होत असल्याचा आरडाओरडा होत असताना ’चिन्ह’ अजून काय वेगळं आपल्या अंकामधून देणार आहे? समाजात नग्नतेविषयीची इतकी ओढ, औत्सुक्य आणि नग्नतेविरुद्ध होत असलेली ओरडही सर्वात जास्त. हा विरोधाभास का? कशामुळे?
'चिन्ह'ला हे जाणून घेण्याची गरज वाटली.
‘आर्ट न्यूड’ किंवा ‘कलेतल्या नग्नतेचा शोध’ निदान मराठीत तरी संपूर्णपणे अस्पर्शित. प्रत्येकच चित्रकार किंवा शिल्पकाराच्या कलाप्रवासात कधी ना कधीतरी न्यूड फॉर्मकडे आकर्षित होण्याचा टप्पा आलेला असतोच. चित्रकाराच्या दृष्टीने न्यूड हा एक वेगळाच विषय. निव्वळ रेषांच्या रेखाटनात माध्यमाच्या शुद्धतेचा आविष्कार असतो. नग्नतेतही तीच शुद्धता कदाचित त्याला जाणवत असावी. कलेतून साकारलेल्या नग्नतेविरुद्ध समाजाच्या रोषाला सामोरे जाणार्या कलाकारांची संख्या खूप मोठी आहे. नग्नतेचं आकर्षण जितकं सनातन आणि कालातीत तितकाच नग्नतेला होत असणारा विरोधही. यामागचं कारण कदाचित समाजाने नग्नतेचा संबंध कायम लैंगिकतेशी जोडला. कलाकाराला मात्र त्यामधे काहीतरी खूप पलीकडचे सापडत गेले. नक्की काय असावे ते जे चित्रकाराला कॅनव्हासवर नग्नतेला साकारताना गवसत गेले? ’चिन्ह’ ला ते जाणून घ्यावेसे वाटले.
जाहिरात, चित्रपट वा इतर नव्या माध्यमांमधून सतत सामोर्या येणार्या अर्धनग्नतेला मिटक्या मारत स्वीकारणारा हाच समाज आणि कलाप्रदर्शनांमधून कलाप्रदर्शनांमधून नग्नतेचं दर्शन झालं तर आक्रस्ताळेपणाने प्रदर्शन उतरवण्याचा आग्रह धरणाराही हाच समाज. न्यूडकडे बघण्याचा समाजाचा नेमका दृष्टिकोन काय? विचारवंतांची भूमिका काय? दृश्यकलेच्या अंगानं नग्न प्रतिमा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे दोन मुदे महत्त्वाचे आहेत. चित्र आणि प्रत्यक्ष यांत एवढी दरी अजूनही का आहे? कलेतल्या श्लील-अश्लीलतेची नक्की परिमाणे काय?
'चिन्ह'ला हे जाणून घ्यावेसे वाटले.
'समाजस्वास्थ्य' अंकाच्या मुखपृष्ठावर तुम्ही नग्न चित्रे छापता हे समाजहिताला बाधक आहे, अशी वाचकांची सातत्याने पत्रे आल्यावर र.धों.कर्व्यांनी ऑक्टो. १९२९च्या अंक ४मध्ये त्यास सडेतोड उत्तर दिले. र.धों. लिहितात- "मुखपृष्ठावर पूर्ण पोशाखातल्या बाईचे चित्र हवे होते, असे आपले मत. पूर्ण पोशाख म्हणजे हात,पाय,तोंडसुद्धा झाकायचे नां? नसल्यास का नाही? पोशाख अस्वास्थ्य उत्पन्न करतो. नग्नता रानटी नाही. ती निरागस असू शकते." कोर्टाने १९२६- २७ सालातल्या एका खटल्यात दिलेल्या निकालाचा निर्वाळा देऊन र.धों.नी पुढे एप्रिल १९३२ वर्ष ५, अंक १०मध्ये असे लिहिले आहे की, "चित्रातल्या स्त्रिया अनावृत आहेत याचा अर्थ ती चित्र अश्लील आहेत असे ठरवण्याचे काहीच कारण नाही. रुचत नसतील तर ती न बघण्याचा अधिकार (त्यांना) आहे. कोर्टाच्या निकालानुसार प्रौढांची चित्रे पाठीकडून अश्लील नाहीत व स्त्रियांचे स्तन अश्लील नाहीत. फक्त जननेंद्रिये अश्लील आहेत. ती न दिसतील अशी व्यवस्था केली आहे. कलेच्या दृष्टीने चित्राचा दर्जा उच्च असल्यास ते अश्लील होत नाही. उदा. मनुष्याचा इतर प्राण्यांशी समागम दाखवल्यास तो अश्लील होईल पण ग्रीक लोकांचा एक देव हंसाच्या रुपाने एका स्त्रीसमवेत एका प्रसिद्ध चित्रकाराने दाखवला आहे, त्यास कोणीही अश्लील म्हणणार नाही. पुस्तकावर नग्न चित्रे छापल्याबद्दल एका प्रकाशकास दंड झाला, कारण जज्जाचे मत पुस्तकांत नग्न चित्रे असल्यास हरकत नव्हती पण कव्हरावर असू नये. हा दंड अपिलात माफ झाला. अपील कोर्टाचे म्हणणे पडले की नग्न शरीर दाखवण्यात अनीती नाही. २० वर्षांपूर्वी अशा चित्रांनी लोकांचे मनास धक्का बसला असता परंतु हल्ली मन:स्थिती बदलली आहे. शिवाय पूर्ण नग्नतेपेक्षा अर्धनग्नताच अधिक उद्दीपक असते. जेथे स्त्रीपुरुष एकत्र नग्न स्नान करतात तेथे अनीती जास्त दिसत नाही. वास्तविक अनीतीचा व नग्नतेचा संबंध नाही. एकंदरीत प्रस्तुत चित्रामुळे आधुनिक मनुष्याचे मन दुखवण्याचा संभव नाही असे कोर्टाने ठरवले."
र.धों.कर्व्यांना १९३२ साली वाटत होते की आता समाजमन बदलले आहे, अधिक प्रगल्भ झाले आहे, आता लोकांच्या मनाला चित्रातल्या नग्नतेमुळे धक्का बसणार नाही. आज २०११ साली म्हणजे तब्बल ७९ वर्षांनंतरही समाजमन बदलले आहे, कलेतल्या नग्नतेला स्वीकारण्याइतके प्रगल्भ झाले आहे असे म्हणता येईल का? र.धों. आज अवतीर्ण झाले तर चित्रातल्या नग्नतेमुळे अजूनही समाजमनाला धक्का बसतो, इतकेच नव्हे तर आता कलाप्रदर्शने बंद पाडली जातात, नग्नतेच्या कारणावरुन चित्रे फ़ाडली जातात, जाळली जातात, उलटी करुन लटकवली जातात हे पाहून उलट त्यांच्याच मनाला जास्त जबर धक्का बसला असता हे नक्की.
नग्नतेचं आकर्षण ही खरं तर नैसर्गिक, सहज प्रवृत्ती. अगदी प्रागैतिहासिक काळापासून, आदिमानवाने रेखाटलेल्या भित्तीचित्रांमधेही नैसर्गिक अवस्थेतला मानवी देहाकार हा महत्त्वाचा चित्र-शिल्पविषय. नग्न कलाकृती केवळ नग्न देह साकार करत नाही, तर आपल्या कल्पनाविश्वातील सगळ्या अमूर्त आकृतींशी तिचा समन्वय साधते. 'To see you naked is to recall the Earth' यात किती सुंदर अर्थ सामावलेला आहे. 'तुला नग्नावस्थेत पाहणे म्हणजे भूमीला स्मरणे'. नग्नतेकडे वळणं म्हणजे मूलभूतपणाकडे जाणं. माणसानं संस्कृती विकासांच्या मार्गावरुन प्रवास करताना समाजनिर्मितीच्या एका टप्प्यावर सार्वजनिक जीवनात शरीरावर कपड्यांचं आवरण स्वीकारलं, नीतिमत्तेचे, सभ्यतेचे नियम त्यानुसार ठरवले. सर्वसामान्य माणसाने ते कसोशीने पाळले. पण नग्नतेचं मुलभूत आकर्षण आंतरस्तरावर आपलं अस्तित्व कायमच टिकवून राहिलं. स्वच्छंद मनाच्या कलाकाराला मात्र आपल्या कलेच्या विश्वात जेव्हा जेव्हा या बंधनांचा जाच झाला तेव्हा त्या प्रत्येकवेळी त्याने नागरी सभ्यतेची ती प्रतिकं मुक्तपणे भिरकावून दिली. कलाकाराच्या कलेमधून नग्नता या ना त्या रूपात डोकावतच राहिली. अगदी भारतीय सनातन समाजातही असे कलाकार प्रत्येक पिढीमधे जन्मत राहिले आणि त्यांच्या कलेतल्या नग्नतेला समाज कधी नाकारत, कधी झिडकारत, बरेचदा उधळून टाकत, क्वचितच स्वीकारत राहिला.
कलेवर झालेला हल्ला हा कायमच क्लेशदायक असतो. हल्ल्यामागे बहुतेकदा काहीही तार्किक संगती नसते. कलेतील श्लील-अश्लीलता वाद तर सनातनच आहे. सनातनी वृत्तीनेच तो मुळात जोपासला. सनातनी, संकुचित मनाला कलेतील अभिजाततेशी काहीच देणेघेणे नसते. कलांची अशी काही स्वतंत्र मूल्ये असतात, जीवनातील मूल्यांशी ती प्रत्येकवेळी समांतर नातं जोडू शकतीलच असं नाही याचं भान सनातनी मनात नसतं. ’नग्नते’च्या नुसत्या उच्चाराने सनातनी वृत्तीच्या लोकांचं टाळकं सतराव्या शतकात सटकलं, विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकामध्येही सटकत होतं आणि तसंच ते आज एकविसाव्या शतकाचं पहिलं दशक उलटून गेल्यावरही सटकतं.
या प्राचीन कलाविष्कारात अजूनही समाजात प्रक्षोभ उसळवण्याची ताकद टिकून आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं वॉशिंग्टन डीसी येथील 'नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट'मध्ये असलेल्या गोगॅंच्या ’टू ताहितियन वीमेन’ वर नुकत्याच झालेल्या हल्ल्यामधून. पॉल गोगॅंने चितारलेली ही एक अत्यंत सुंदर, अभिजात कलाकृती. आदिम जमातीच्या दोन अनावृत स्त्रिया अत्यंत नैसर्गिक सहजतेनं, फक्त ताहिती बेटावरच आढळू शकतो अशा सोनेरी, झळाळत्या, अनोख्या सूर्यप्रकाशाला अंगावर झेलत अत्यंत नैसर्गिक सहजतेनं बसलेल्या गोगॅंनं चितारलेल्या आहेत. या ताहिती स्त्रियांच्या ताम्रवर्णीय अनावृत त्वचेवरचा सोनेरी सूर्यकिरणांचा अनोखा आविष्कार त्या स्त्रियांनी त्वचेवर जणू सुवर्ण ल्यायलेलं आहे, असा आभास उत्पन्न करणारा. नग्नता इतकी आवश्यक सहजतेनं, इतक्या नैसर्गिकरित्या यात चितारलेली आहे की खरं तर ती वेगळी अशी जाणवतही नाही. हल्लेखोरांच्या म्हणण्यानुसार गोगॅंच्या या चित्रात दोन नग्न स्त्रिया आहेत आणि त्यातून समलैंगिकता सूचित होऊ शकते. लहान मुलांवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. अमेरिकेसारख्या प्रगत देशामधे जिथे मुक्त लैंगिकतेचा खुला आविष्कार समाज नित्य झेलत असतो तिथे एका सोळाव्या शतकात चितारल्या गेलेल्या, अभिजात पेंटिंगमधल्या कलात्मक नग्नतेसंदर्भात आज एकविसाव्या शतकातलं पहिलं दशक उलटून गेल्यावर अशी प्रक्षोभक प्रतिक्रिया उमटू शकते. या अप्रतिम चित्रामधल्या इतर कोणत्याही सौंदर्यापेक्षा त्यातली नग्नताच फक्त बघितली जावी, चित्रातल्या त्या नैसर्गिक, सहज नग्नतेवर लैंगिकतेचा आरोप व्हावा, ती आक्षेपार्ह ठरावी हे दुर्दैव.
अर्थातच ही काही पहिली आणि एकमेव घटना नाही. शतकानुशतकं कलेवर हे असे हल्ले होतच राहिलेले आहेत. १९१४ मधे लंडनच्या नॅशनल गॅलरीमधल्या पाठमोर्या नग्न व्हिनसचं चित्र, जिच्यासमोर चित्रातल्या क्यूपिडने आरसा धरलेला आहे आणि त्या आरशातून ती स्वत:कडे व आपल्याकडे रोखून पहात आहे, ते संस्कृतीच्या अशाच अंधरक्षकांनी चाकूने फाडले, रेम्ब्रांच्या 'डॅने इन द हर्मिटेज’वर १९८०मध्ये अॅसिड फेकून ते विद्रुप केलं गेलं. अभिजात चित्रांवर नग्नतेच्या विरोधात असे हल्ले होतच आहेत.
आधुनिक माध्यमांद्वारे नग्नतेच्या सतत भडिमाराला समाजाच्या सरावलेल्या नजरांनाही पेंटिंगसारख्या तुलनेनं जुन्या, अतिरुळलेल्या कलामाध्यमामधून जर मानवी देहाचं नग्न दर्शन झालं तर इतका सांस्कृतिक धक्का का बसावा? चित्र-शिल्पकलेतून आविष्कृत होणारी नग्नता विलक्षण जिवंत भासू शकते. या माध्यमांची ही ताकद आहे. टीव्ही-सिनेमामाधून दिसणारी प्रत्यक्ष नग्नतेपेक्षा पेंटिंगमधून चित्रकाराने रेखाटलेल्या रेषांमधून, रंगांमधून जिवंत होणारी नग्नता जास्त परिणामकारक ठरावी हे अजब आहे, अभिजात कलेमधली ताकद सिद्ध करणारं काहीतरी त्यात आहे हे निश्चित.
कलाकाराला आपल्या कलेमध्ये अपेक्षित असणारं स्वातंत्र्य आणि समाजातल्या नीतिमत्तेच्या संकल्पना यांमध्ये एक खूप मोठी दरी कायमच राहिली. लोककलेमधून जीवनाला बेधडकपणे भिडणारे लैंगिक संकेत नागरी कलेमधून व्यक्त होताना मात्र नीतिमत्तेच्या पोलादी अंकुशांचा सामना करत राहीले. कलासाहित्यामधील नग्नतेविषयीचे किंवा लैंगिकतेविषयीचे संदर्भ हे सूचक किंवा प्रतिकात्मक पातळीवरच असावेत असा एक तथाकथीत सभ्य समाजाचा आग्रह असतो. पण मग उघड्पणे व्यक्त होणारा शृंगार किंवा लैंगिकता ही कायम असुंदर किंवा बीभत्स या पातळीवरच रहाते असं असतं का? चित्रकारितेमधे हा झगडा सातत्याने सुरु राहिलेला आहे.
गोयांने आपल्या चित्रातल्या नग्नतेला झाकण्याचं नाकारलं. रोमन कॅथॉलिक चर्चने मायकेलअॅजेलोने चर्चच्या भिंतीवर चितारलेल्या पेंटिंग्जमधली नग्नता अंजिरांच्या पानांनी झाकण्याकरता स्वतंत्र चित्रकार नेमले. कालांतराने स्वत:ची चूक उमजून पुन्हा त्या मूळ चित्रांचे पुनरुज्जीवनही केलं. अर्धनग्न, अभिजात चित्रं समाजाने उदारपणे स्वीकारली पण संपूर्ण नग्नतेला स्वीकारायला सभ्य समाज अजूनही बिचकतो आहे.
विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातल्या व्हिएन्नाच्या ‘शीले’ची चित्रातली नग्नता आणि लैंगिकता ही युद्ध आणि धर्माइतक्या अपरिहार्यतेनेच समाजाने स्वीकारायला हवी असा आग्रह धरला आणि तो तुरुंगात खितपत राहिला. शीलेची नग्न चित्रं जीवनावर भाष्य करत नाहीत. जीवनाचा एक भाग होऊ पहातात. समाजाला कलेतल्या नग्नतेचा हा इतका जिवंतपणे आणि थेटपणे जीवनावर पडणारा प्रभाव कधीच मान्य होणारा नव्हता. कुठलीही कला ही खर्या जीवनाचं प्रतिबिंब असते. आर्ट इमिटेट्स लाईफ, हे मान्य केले व जीवनात जे जे शक्य आहे ते ते कलेत उतरवणे असेही, तर मग चित्रपटसृष्टीने केलं तसं कलेच्याही सगळ्याच प्रकारांचं वर्गीकरण का करु नये असाही एक मतप्रवाह यातूनच निर्माण होतो.
भारतीय कलाविश्वातही ठाकुरसिंगांची १९३० सालातली ‘ओलेती’ असो किंवा त्याही आधीचं रविवर्म्याचं ‘प्रणयिनीचा मनोभंग’ चित्र असो, वादविवादांचा धुरळा त्या त्या काळात त्या चित्राकृतींना टाळता आलाच नाही. ही चित्रं छापल्याबद्दल मासिकांवर खटले भरले गेले तेव्हा अशा चित्रांना बघून ’विपरित जाणिवा’ फक्त दुबळ्या मनातच निर्माण होऊ शकतात, असा स्पष्ट निर्वाळा दिला गेला. ही ’दुबळी मनं’ त्यानंतरही प्रत्येक पिढीत आजतागायत जन्मत आलेली आहेत हे कलासंस्कृतीचं दुर्दैव.
भारतीय रक्तात ’कला आणि नग्नता’ या दोन गोष्टींची परस्परांशी सांगड घालण्यासंदर्भातले नकारात्मक संस्कार इतके खोलवर रुजलेले का असावे? कलेतली नग्नता भारतीय समाजात गेली कित्येक शतकं जवळपास निषिद्ध. अध्यात्मिक दृष्टिकोनातून, तत्त्वज्ञानाच्या आवरणाखाली असेल तरच नग्नता निदान थोडीफार स्वीकारली जाऊ शकते. पण बाकी खजुराहो, गीतगोविंद किंवा भर्तृहरीच्या शृंगारशतकाच्या वारशापासून भारतीय समाज आता संपूर्णपणे तुटलेला. युरोपियन चित्रशिल्पकलेतून सार्वजनिक उघडपणे मिरवणार्या प्रमाणबद्ध, देखण्या आणि कलात्मक नग्नतेला स्वीकारण्यापासून आपण असंख्य योजने मागे राहिलो ते राहिलोच. एकेकाळी शिल्पांमधून किंवा इरॉटिक आर्टमधून कलात्मकतेनं समाजातल्या अनेक स्तरांमध्ये सहज वावरणारा शृंगार आणि नग्नता आता विकृत पॉर्नोग्राफीच्या स्वरुपात आपल्या समाजातल्या अंधार्या कानाकोपर्यांमध्येच फक्त शिल्लक राहिला. सिनेमा, गाण्यांमधून आपलं केविलवाणं, अप्रत्यक्ष अस्तित्व दाखवत राहिला.
समाजाला, मानवी मनाला नग्नता अनेक पातळीवरुन अस्वस्थ करते. जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणाला होता- आपण शरमेच्याच वातावरणात राहतो. आपलं जे काही वास्तव आहे त्याची आपल्याला शरमच वाटते. आपली स्वत:ची शरम, आपल्या नातेवाइकांची, मिळकतीची, भाषेची, मतांची, अनुभवांची शरम.. आपल्याच अनावृत त्वचेची शरम!
आपल्या भारतीय समाजात नग्नतेविषयी, लैंगिकतेविषयी एक खूप औत्स्युक्य जनसामान्यांमधे आढळते, समाजाची नग्नतेविषयीची ओढ प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे विविध माध्यमांच्या आविष्किरीकरणातून व्यक्त होत असते आणि तरीही कलेतली नग्नता स्वीकारताना आरडाओरड होते. हा विरोधाभास का? झाकलेपणाच्या अवडंबरातूनच विकृतीचा जन्म होतो. काहींना नग्नतेचं इतकं वावडे असते की त्यांना एखादे नागवे सत्यदेखील असभ्य वाटत असावे. आधुनिक समाजाने चढवलेल्या मोकळेपणाच्या बुरख्याआड अजूनही कलेतल्या नग्नतेला स्वीकारण्यात कुठेतरी संकोचलेपणा, संकुचितपणाही आहे. ते भेदून एका मोकळ्या स्तरावर पोचायचं तर वैचारिक मंथन सतत व्हायला हवे. कलादालनांच्या विश्वात तरी कोणती आवरणे नकोत. बुरखे नकोत. स्वत:च्या स्वतंत्र, मुक्त अवकाशाचा आणि निर्मितीचा अधिकार कलाकारांना मिळायलाच हवा.
नग्नतेकडे बघण्याचा आजच्या समाजाचा दृष्टिकोन नेमका आहे तरी कसा? त्याबाबत आजच्या विचारवंतांची भूमिका काय आहे हे जाणून घेणं ’चिन्ह’ कलावार्षिकाला महत्त्वाचं वाटतं. साहित्य, सिनेमा, संवादाची नवी सामाजिक माध्यमं, मालिका यांमधून अश्लीलतेच्या, लैंगिकतेच्या बाह्य संकल्पना, दृष्टिकोन यांत खूप बदल झाला आहे, असं वरकरणी जाणवतं. पण त्याच बरोबर धार्मिक जाणिवांबाबतची संवेदनशीलता जास्त वाढली आहे, खुलेपणा ऐवजी कलेतल्या, साहित्यातल्या स्वीकारांसंदर्भात संकुचितपणा जास्त आला आहे, असंही दृश्य दिसतं. श्लील-अश्लीलतेच्या संकल्पनांमधला ढोबळपणाही अजिबात कमी झालेला नाही उलट जास्त वाढला आहे.
मुळात कलेतली श्लील-अश्लीलता ठरवण्याचे निकष काय? अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत कलाकाराची आणि समाजाची नेमकी भूमिका काय असावी? नग्न चित्र-शिल्प, शृंगारिक कलानिर्मितीबाबत कलाकार आणि समाजामध्ये इतका विसंवाद का असावा? आजच्या जागतिकीकरणच्या पार्श्वभूमीवर कलाकाराच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे बदललेले निकष, कलानिर्मितीच्या बदललेल्या संकल्पना समाजाने आपल्यात रुजवून घ्याव्यात का? कशा? कलेतली नग्नता बहुतांशी स्त्रीदेहापाशीच का घोटाळत राहीली? टीव्ही चॅनल्स, वेबसाईट्स, यूट्यूब, ब्लूटूथ यांसारख्या आधुनिक संवादमाध्यमांद्वारा शारीर नग्नतेचा भडीमार सातत्याने अंगावर घेणार्या नव्या, पौगंडावस्थेत असलेल्या पिढीच्या कलासंवेदनांचं काय? नग्नतेतली कलात्मकता संवेदनशीलतेनं त्यांच्या मनापर्यंत पोचणार आहे का? कशी? हे आणि असे अनेक प्रश्न सातत्याने गेल्या काही वर्षांमध्ये समोर येत गेले आणि म्हणून मग ’चिन्ह’ने ’नग्नता-चित्रातली आणि मनातली’ विषयाद्वारे या प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्याचं ठरवलं. झाकलेपणाच्या अवडंबरामधून समाजात नग्नतेचं अप्रत्यक्षरित्या जे स्तोम माजवलं जातं त्याला ’चिन्ह’ने थेट भिडून छेद द्यायचं ठरवलं.
नग्नतेचा संबंध आपल्याकडे कायम लैंगिकतेशी जोडला गेला. पण ’चिन्ह’चा हा अंक संपादित करत असताना कलेच्या संदर्भातून जेव्हा नग्नतेकडे पाहिलं तेव्हा खूप वेगळे कंगोरे सापडत गेले. कलाकाराच्या मनात नग्नतेची ओढ का? आर्टस्कूलमध्ये चित्रकलेच्या शिक्षणासाठी प्रवेश घेणार्या मुलांचं वय पौगंडावस्थेच्या आसपासचं असतं. कलाशिक्षणाची सुरुवात कलेच्या इतिहासापासून करताना त्या मुलांचा परिचय प्राचीन-पौराणिक नग्न चित्र-शिल्पकृतींशी होतो. त्या शिल्पकृतींमधून नग्नतेतली कला समजावून घेत असताना एक दिवस त्यांना प्रत्यक्ष समोर बसलेल्या नग्न मॉडेलवरुन मानवी देहाकृतीची वळणं रंगवायला शिकण्याचा अभ्यास करायचा असतो. न्यूडक्लासमधे बसलेले विद्यार्थी, त्यांच्या समोर एका स्त्री अंगावरचे कपडे काढून नग्न होते आणि मग ती मुलं तिच्या देहाची वळणं कागदावर रेखाटतात. या दरम्यान त्या विद्यार्थ्यांचा मानसिक प्रवास कसा असू शकेल? त्यांचे कलाशिक्षक त्यांच्याशी कसा संवाद साधतात, कसं मार्गदर्शन करतात? चार पैसे मिळतात म्हणून ३०-४० तरुण विद्यार्थ्यांसमोर विवस्त्रावस्थेत तासन तास बसताना मॉडेलची मानसिक अवस्था काय असू शकते? आजवर असंख्य कलाकारांनी न्यूड रंगवली पण त्यांच्या कला आयुष्यात येऊन गेलेल्या या महत्त्वाच्या टप्प्याबद्दल कधीच कोणी लिहिलं नाही, बोललं नाही. अनेक वर्षांपूर्वी 'मौज' दिवाळी अंकात उर्मिला सिरुर यांची न्यूडक्लासमधल्या एका विद्यार्थिनीची मनोवस्था अत्यंत तरलतेनं रंगवणारी एक कथा येऊन गेली होती. या विषयाला थोडाफार स्पर्श करु शकणारं ते बहुधा एकमेव साहित्यिक उदाहरण. बाकी निदान मराठीमध्ये तरी या विषयाचा कधी विचारच केला गेला नव्हता.
श्लील-अश्लीलतेच्या मर्यादा ठरवणे हे दुधारी तलवारीसारखे आहे व ते हाताळणे सोपे नाही. श्लील-अश्लीलतेच्या प्रत्येकाच्या जाणिवा वेगवेगळ्या असू शकतात, पण स्वत:च्या वैयक्तिक परिघाबाहेर जेव्हा आपण समाजात वावरतो तेव्हा एका विशिष्ट, सर्वसाधारणपणे मान्य असलेल्या चौकटीत राहून वावरणे अपेक्षित असते. ही चौकट धूसर किंवा लवचिक असू शकते, पण ती मान्य असायलाच लागते. इतरांच्या जाणिवा, संवेदना यांचा त्यात आदर असतो. सार्वजनिक ठिकाणी सर्वांच्या जाणिवा-नेणिवा, मानसिकता, उद्देश, श्लील-अश्लीलतेच्या व्याख्या, त्यांचा स्वीकार हे सारखे असणे शक्य नाही, पण मग कलाकाराच्या मुक्त कलाविष्काराचे काय? त्यानं आपल्या कलेचा मुक्त आविष्कार करताना प्रत्येकवेळी या बंधनांचा विचार केला तर त्याच्या अभिव्यक्तीवर प्रचंड प्रमाणात मर्यादा येऊ शकतात. अशा वेळी कलावंताच्या, आणि कलाविषयक जाणिवा प्रगल्भ असणा-या, प्रशिक्षित नजरेच्या आस्वदकांसाठी एका स्वतंत्र अवकाशाची निर्मिती असावी हा एक विचार. पण मग सर्वसामान्य जनतेपासून कला अधिकाधिक दूरच जाण्याची यात संपूर्ण शक्यता दिसून येते त्याचं काय?
हुसेनसारख्या उदाहरणात वाद फक्त ’कला आणि नग्नता’ इतपतच मर्यादित नाही. त्याला धर्म, राजकारण असे अनेक स्तर जोडले गेले आहेत. कलाकाराने या सर्वाचे उत्तरदायित्व मानावे का? किती मर्यादेपर्यंत मानावे असा एक मूलभूत प्रश्नही या उदाहरणातून अपरिहार्यपणे जन्म घेतो. या प्रश्नाची उत्तरे समाजातील अनेकांनी आपापल्या परीने शोधायचा प्रयत्न केला. अनेक मतांतरे, वैचारिक मतभेद यांतून एक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. समाजातील विचारवंतांची, हुसेनच्या समकालीन कलावंतांची, पुढच्या पिढीतल्या कलावंतांची, साहित्यिकांची यासंदर्भात नक्की भूमिका काय हे एकत्रितपणे जाणून घेणे ’चिन्ह’ला अत्यावश्यक वाटले.
नग्नतेचं समर्थन, हुसेनवादामध्ये कोणतीही एक बाजू उचलून धरण्याचा ’चिन्ह’चा हेतू अर्थातच नाही. नग्नता ही चित्र-शिल्पमाध्यमामधून शतकानुशतकं आविष्कृत होतच आहे, कलाकाराला मोहात पाडतच आहे, कधी ती स्वीकारली गेली, बहुतेकदा तिला कडाडून विरोधच झाला. कलेतल्या नग्नतेमध्ये प्राचीन कालापासून जे आदीम भावना, मग ती आकर्षणाची असो वा संतापाची, ती चेतवून तिचा उद्रेक करण्याची जी ताकद आहे तिचं कुतूहल वाटलं, त्या ताकदीचा वेध घ्यावासा वाटलं इतकंच. बदलत्या पिढीनुसार बदलत्या सभ्यतेच्या संकेतांचा वेध घ्यावा, त्या अनुषंगानं समाजातल्या सर्व क्षेत्रातल्या विचारवंतांशी संवाद साधावा हा हेतू. समाजातील विचारवंत, बुद्धिवंत समाजाला दिशा देण्याचे काम करतात. वैचारिक गोंधळात समाज भिरभिरत असताना या विचारवंतांनी दाखवलेली एक ठाम दिशा सुकाणूचे काम करु शकते. हुसेनच्या वादग्रस्त चित्रांसंद्र्भातून झालेला वाद आणि त्यानिमित्ताने ’कला आणि नग्नता’ या विषयासंदर्भात पुन्हा पुन्हा उद्भवणार्या मुलभूत प्रश्नांची उत्तरं शोधणारा एक सशक्त परिसंवाद ’चिन्ह’च्या या अंकाचा मध्यवर्ती गाभा ठरला.
एका चित्रकाराच्या विरोधात देशभर वावटळ उठली. धार्मिक कट्टरवाद्यांची बाजू ठामपणे लोकांसमोर आली पण यासंदर्भातल्या कलावंतांच्या, विचारवंतांच्या भूमिका एकत्रित ठळकपणे कधी समोर आल्याच नाहीत. दैनंदिन जीवनाच्या लढ्यात अभिव्यक्तीस्वातंत्र्यासारख्या प्रश्नांकडे गंभीरपणे लक्ष द्यायला सामान्य जनतेला फुरसत नाही आणि कलाकारांना, विचारवंतांना वेळ नाही किंवा गरज वाटत नाही, आपल्यावर बेतल्याशिवाय यासंदर्भात मत व्यक्त करावं असं त्यांना वाटत नाही बहुधा. त्यामुळे यासंदर्भात ठाम भूमिकाच कधी मांडली गेली नाही. हुसेनला देशातून परागंदा व्हायला लागल्यावर ठोसपणे कलाकार आपली भूमिका व्यक्त करतील असं वाटलं होतं, पण तसंही झालं नाही. पेज थ्री, टीव्ही चॅनल्स, ग्लॉसी इंग्रजी कलामासिकांमधून हुसेननं देशात परत यावं, त्यांच्यावर अन्याय झाला अशा काही सुट्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्याही, पण त्यात ना कलेच्या स्वातंत्र्याबद्दलचे विचार ना कलाकाराची चाड ना त्यांच्या चित्रातल्या वादग्रस्तततेबद्दलची ठाम भूमिका. या सर्व प्रतिक्रिया बहुतेककरुन सावध किंवा स्वत:ला त्यातून प्रसिद्धी कशी मिळेल, सनसनाटी कशी निर्माण होईल अशा विचारातूनच जन्मलेल्या. ’चिन्ह’ने आजच्या काळातल्या विचारवंतांचे, साहित्यिकांचे, कलाकारांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य, कलाकाराचं समाजाप्रती उत्तरदायीत्व यासंदर्भातले विचार जाणून घेणं महत्वाचं मानलं.
सगळ्याच प्रश्नांची उत्तरं त्यातून आम्हांला मिळाली का? तर त्याचं उत्तर नि:संदिग्धपणे ’हो’ असं आम्हाला निश्चितच देता येणार नाही. प्रश्नांच्या उत्तरातूनही काही नवे प्रश्न आमच्या मनासमोर आले. पण निदान एक विचारमंथन निश्चित झालं. अनेक नवे पैलू समोर आले. विचारांना नव्या दिशा मिळाल्या. अकबर पदमसीसारख्या ज्येष्ठ आणि सुधीर पटवर्धनांसारख्या विचारी चित्रकारांनी कलेमधल्या नग्नतेसंदर्भात कलावंतांचा अधिकार, स्वातंत्र्याबद्दल एक ठाम, निश्चित, समाजाला मार्गदर्शनपर भूमिका मांडली. मात्र काही भ्रमनिरासही झाले. समाजातल्या काही मान्यवर विचारवंतांनी, कलाकारांनी नग्नता किंवा एकंदरीतच कलास्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्यासंदर्भात मत व्यक्त करताना जी बोटचेपी, सावध भूमिका घेतली ती धक्कादायक आणि समाजाची नग्नतेसंदर्भातली दुटप्पी, दांभिक भूमिकाच अधोरेखित करणारी ठरली. परिसंवादासाठी संपर्क साधल्यावर काहींनी विषयाचा आवाका पाहून सहभागी होण्याचे टाळले, काहींनी स्पष्टपणे नकार देता आला नाही तेव्हा शेवटपर्यंत तंगवलं, पण ज्यांनी भाग घेतला त्यांनी मात्र संपूर्ण सहकार्य दिलं. अत्यंत मोकळेपणाने, परखडपणाने, अभ्यासू वृत्तीने ते परिसंवादात सहभागी झाले. काही तरुण, समकालीन कलाकारांनीही अनपेक्षित धक्का पोचवला. परदेशात न्यूडिटी इन आर्ट संदर्भात किती खुलं वातावरण आहे आणि आपल्या इथे किती संकुचित दृष्टीकोन म्हणून एरव्ही नाराजी व्यक्त करणारे हे तरुण कलाकार कलेतल्या नग्नतेसंदर्भातल्या वादामध्ये आपली भूमिका स्पष्टपणे मांडताना कचरले. ज्या हुसेनसंदर्भातून हे विचारमंथन झालं, त्याच्यावर मात्र परिसंवादात भाग घेतलेल्या प्रत्येकाकडून काही ना काही टीकाच झाली, नि:संदिग्धपणे कोणीच त्याची बाजू घेतली नाही जी थोड्याफार प्रमाणात आम्हाला अनपेक्षित अशीच अशी होती.
व्होल्टेअरसारखा विचारवंत आविष्कारस्वातंत्र्याबाबत जी भूमिका घेतो ( I do not agree with what you have to say, but I will defend to the death your right to say it ) तिचा पुरस्कार एकाहीकडून तितक्या ठामपणे एकविसाव्या शतकातलं दुसर्या दशकात केला जाऊ नये, ही गोष्ट आविष्कारस्वातंत्र्याच्या मुद्द्यापेक्षा धर्म, जाती, प्रादेशिकता यांचं पारडं जड होत जाणं हतबलतेनं स्वीकारणं हेच कुठेतरी दिसतं. कलेचा प्रवाह यातून पुन्हा वळचणीला तर जाणार नाही ना असाही एक प्रश्न मनात डोकावून जातो. धर्म, राजकारण, नग्नता यांबाबतीत पहिल्या दोन गोष्टी तिसर्यापेक्षा जास्त अनैतिक, अश्लिल, बीभत्स असू शकतात आणि तिसरी जास्त पवित्र असू शकते. हे पुन्हा एकदा पटलं.
नग्नता आणि अश्लीलता यांच्यातल्या धूसर सीमारेषेचे भान 'चिन्ह'ला पुरेपूर आहेच. 'चिन्ह'चा हा अंक संपादित होत असताना 'चिन्ह'च्या संपूर्ण टीमने अत्यंत संवेदनशीलतेनं, काळजीपूर्वक, विषयाला कोठेही सवंगपणा येऊ न देण्याची काळजी घेतली. पुन्हा पुन्हा प्रत्येक लेख वाचून बघितला, प्रत्येक चित्र तपासून कलात्मकतेचा सर्वोच्च दर्जा लावत तपासून पाहिलं. आर्टस्कूलला प्रवेश घेऊ पाहणार्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हातातही हा अंक सोपवायला पालकांना काही अडचण वाटू नये इतका संयमितपणा अंकाचं संपादन करताना पाळण्याचा आटोकाट प्रयत्न 'चिन्ह’च्या टीमनं केला आहे. कलेतल्या नग्नतेबद्दल, हुसेनच्या वादाबद्दल, श्लील-अश्लीलतेची कलेसंदर्भातली कसोटी ठरवण्यासंदर्भात चिन्हने या अंकातून जे काही सदार केलं आहे ते अत्यंत प्रामाणिक प्रयत्नांमधून. या सर्वांतून कोणता एक निष्कर्ष निघाला का? कदाचित नाही. तसा तो निघावा अशी अपेक्षाही नव्हती. पण या आत्तापर्यंत उगीचच टाळल्या गेलेल्या, झाकून ठेवलेल्या विषयावर त्यानिमित्ताने एक सखोल, थेट विचारमंथन झाले ते महत्वाचे. समाजमन प्रगल्भ व्हायला या अंकाची मदत होईल का? माहीत नाही. पण अजून वीस वर्षांनी कदाचित पुन्हा कोणावर तरी चित्रांमधल्या नग्नतेविरोधात झालेल्या आरड्याओरड्यामुळे प्रदर्शन उतरवण्याची वेळ येईल, मुखपृष्ठावरील एखाद्या नग्न चित्रामुळे वादाचा धुरळा उठेल तेव्हा चिन्हच्या ’नग्नता-चित्रातली, मनातली’ या विशेषांकात मांडल्या गेलेल्या या विषयावरील कलावंत, विचारवंत, साहित्यिकांच्या भूमिकांचा विचार निश्चित केला जाईल.
या दरम्यान माझा स्वत:चाही एक प्रवास झाला. कलेतली नग्नता आता मला सहज स्वीकारता येते या आत्मविश्वासातून मी ’चिन्ह’च्या ’नग्नता-चित्रातली, मनातली’ विशेषांकाच्या संपादनाची जबाबदारी स्वीकारली खरी, पण मनावरचे सांकेतिक संकोचांचे पापुद्रे मला वाटले होते त्यापेक्षा चिवट निघाले. मुखपृष्ठकथा करताना मोनाली मेहेर या परफ़ॉर्मन्स आर्टिस्टने परदेशात केलेल्या न्यूड परफॉर्मन्सचे व्हिडिओ किंवा फोटोग्राफ बघताना जरी कुठेही त्यात अश्लीलता किंवा सवंगपणा जाणवला नव्हता, तरी अंकामध्ये छापण्यासाठी फोटो निवडण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा किंवा देवदत्त पाडेकरांनी अत्यंत कलात्मकतेनं चितारलेलं न्यूड अंकाच्या मुखपृष्ठासाठी निवडताना मनात जी चलबिचल झाली, त्यामुळे अस्वस्थता आली. नग्नतेतली कला वाचकांना सनसनाटीही वाटू शकेल का, अशी शंका आली. कारण कलेतली नग्नता बघणारी नजर ही जर प्रशिक्षित नसेल तर त्या कलेवर फार पटकन सवंगतेचा, अश्लीलतेचा शिक्का मारला जाऊ शकतो, हेही अनुभवानं माहीत झालं होतं. श्लील-अश्लीलतेच्या मर्यादा ठरवता न येणं यात ’वैचारिक गोंधळ’ आहे असं मुळीच नाही. ते तर माणूसपणाच्या गुंतागुंतीचं द्योतक आहे, हे कळून घेण्यापर्यंत झालेला माझ्या मनाचा प्रवास पुन्हा कदाचित उलट दिशेनं पण एका ठाम, समतोलापर्यंत येऊन पोचणारा झाला याचंही एक समाधान.
शर्मिला फडके
कार्यकारी संपादक, 'चिन्ह'
आर्ट स्कूलमधल्या त्या भव्य स्टुडिओत न्यूडस्टडीच्या वेळी विशीतसुद्धा प्रवेश न केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसमोर मॉडेल म्हणून एखादी स्त्री जेव्हा विवस्त्र होऊन उभी ठाकते, तेव्हा तिथं खूप काही घडत असतं, घडलेलं असतं. यातलं दृष्टीस मात्र काहीच पडत नाही. त्या वर्गात असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या मनात भावभावनांची विलक्षण घालमेल सुरू असते. बोलायचं खूप असतं, पण बेंचवरच्या शेजारच्याशी काही बोलता येत नाही. पाहायचं खूप असतं, पण जिवलग मित्रमैत्रिणींकडेसुद्धा थेट नजरेनं पाहता येत नाही. एका विचित्र अशा कानकोंड्या अवस्थेनं संपूर्ण न्यूडक्लासला झाकोळून टाकलेलं असतं.
कुणाही प्रतिभावंत लेखकाला आव्हान देणारा हा विषय. पण निदान मराठीत तरी या विषयाला आतापर्यंत कुणीच स्पर्श केलेला नाही. अपवाद ऊर्मिला सिरूर यांच्या १९७५ साली ’सत्यकथेत’ प्रसिद्ध झालेल्या लघुकथेचा. म्हणूनच हा विषय ‘चिन्ह’ला विशेष आव्हानात्मक वाटला. किंबहुना ‘नग्नता : चित्रातली आणि मनातली’ या विशेष पुरवणीच्या केंद्रस्थानीच तो ठेवावासा वाटला. चित्रकार/विद्यार्थी, मॉडेल आणि शिक्षक यांच्या त्रिकोणी संबंधांचे विविध पदर चित्रकार सुहास बहुळकर यांच्या यातल्या सहभागामुळेच उलगडले गेले आहेत.
आम्ही विद्यार्थी असताना मॉडेल्सना काम देण्याची जबाबदारी आमच्या सीता कपूर नावाच्या वयस्कर पण एक सुस्वरूप, गोर्या व तांबूस वर्णाच्या देखण्या शिक्षिकेकडे होती. दर शुक्रवारी त्या मॉडेल्सना काम देत. त्या वेळी पोर्चमध्ये सर्व मॉडेल्स जमा होत. त्यात सावळ्या वर्णाच्या म्हातार्या, मध्यमवयीन व गरिबीनं गांजलेल्या मॉडेल्समध्ये उभं राहून गोर्यापान, देखण्या व किमती कपडे घातलेल्या कपूर बाई काम देत असत. त्या विसंगत दृश्याचा ठसा माझ्या मनावर आजही कायम आहे. कपूर बाईंनी कोणाला काम दिलंय, पुढच्या आठवड्यात आपल्याला कुठलं मॉडेल मिळणार, याची उत्सुकता विद्यार्थ्यांना असे. कारण त्यातल्या त्यात एखादं बरं मॉडेल आलं तर साहजिकच बरं वाटत असे. एकदा मात्र असं झालं की, लागोपाठ दोन वेळा कपूर बाईंनी जी मॉडेल्स दिली ती बघून आम्हां सर्वांचाच विरस झाला. माझ्या वर्गातला ओरसकर नावाचा मालवणी विद्यार्थी तर एवढा वैतागला की, तो भर वर्गात मोठ्यानं म्हणाला, ‘‘छ्याऽऽ! कपूर बाईनं ह्यां मॉडेल कित्याक दिलां, तिकाच मॉडेल म्हणून बसवला तर बरां होतला!’’ नशीब ओरसकरचं की कपूर बाईंनी ते ऐकलं नाही.
वर्षानुवर्षे दर शुक्रवारी सकाळी १० वाजता मॉडेल्सना काम दिलं जाई. ही वेळ मॉडेल्ससाठी अत्यंत महत्त्वाची असे. काम मिळणार की नाही, याची हुरहूर त्यांना वाटत असे. ज्यांना काम मिळे ती आनंदात असत, तर काम न मिळालेली निराश मनःस्थितीत घराकडे परतत किंवा विमनस्कपणे पोर्चमध्ये किंवा आवारात झाडाखाली बसून राहत. हे सर्व मला अनुभवता आलं, कारण १९७५मध्ये माझं शिक्षण संपलं, मी जेजेतच शिकवू लागलो आणि मला स्वतःलाच मॉडेल्सना काम द्यायची कामगिरी नंतर अनेक वर्षं पार पाडावी लागली. सुमारे १४/१५ वर्षं मी हे काम करत होतो. त्यातून या मॉडेल्सचं एक वेगळंच जग माझ्यासमोर उलगडू लागलं. जेजेत येणार्या मॉडेल्सपैकी एक जण साधू होता तर दुसरा फकीर. तिसरा होता अब्दुलचाचा नावाचा अत्यंत काटकुळा मुसलमान. तो भेंडीबाजारात एका जिन्याखालीच आयुष्यभर राहिला. तरुणपणापासून तो जेजेत येत होता. दारूवाला नावाची एक अत्यंत जाडी पारशीणही खूप वर्षांपासून येत असे. आल्याबरोबर ती जमशेटजींच्या चित्राला नमस्कार करून मगच वर्गावर जाई. याशिवाय शंकर साळुंखे नावाचा एक हमाल, त्याचे हात थरथरू लागल्यामुळे, १९८२ पासून मॉडेल म्हणून बसत असे. शिवाय पार्वती नावाची एक तलाक दिलेली मुसलमान स्त्री होती, तर दुसरी एक विधवा होती. मथुरा नावाची वृद्ध पण घारी, गोरी, देखणी स्त्री नेहमीच टोपपदरी लुगडं नेसून यायची. जेजेत येण्यापूर्वी सकाळीच भुलेश्वरच्या फूलबाजारातून ती मोगरा, जाई, जुई, चमेली, अबोली अशी फुलं घेऊन यायची. काम नसेल तर पोर्चमध्ये गजरे गुंफत बसायची. काम असेल तर विश्रांतीच्या वेळात तिचा हा उद्योग सुरू होई. अधूनमधून कॉलेजातल्या मुली किंवा प्रेमात पडलेले प्रेमवीरही तिच्याकडून गजरे घेत. संध्याकाळी गजरे विकूनच ती घरी जाई. पण या सर्वांत एक मध्यमवर्गीय घरातली सुशिक्षित स्त्री इतर सर्व मॉडेल्समध्ये सोज्ज्वळ, शांत व देखणी असल्यामुळे उठून दिसत असे. घरखर्चाला व मुलांच्या शिक्षणाला हातभार लागावा म्हणून घरच्या मंडळींना सत्य न सांगता ती हे काम करीत असे. या मध्यमवयीन स्त्रीचं रूप व डौलदार बांधा बघून एकदा एका शिक्षकानं माझ्याशी किंवा इतर कोणाशीही चर्चा न करता तिला परस्पर ‘न्यूडसाठी’ बसशील का असं अविचारानं विचारताच ती कावरीबावरी झाली आणि त्यानंतर काही काळ जेजेकडे फिरकलीच नाही.
पण बाकी कशाचंही सोंग आणता आलं तरी पैशाचं सोंग आणता येत नाही हेच खरं! काही काळानंतर मॉडेल्सना काम देतात त्या दिवशी ती पुन्हा एका बाजूला शांतपणे एका कोपर्यात उभी असलेली दिसली. समोर इतर सर्व मॉडेल्स, ’‘सर, मला काम, मेरेकू भी देना, दो हप्तेसे काम नहीं मिला, हमेशा दुसरेलाच घेता मग आम्ही जगायचं कसं? न्यूडसाठी तरण्याच हव्या? अभ्यास काय म्हातार्यांवरून होत नाही?", असा कल्ला करत होती. ज्यांना काही काळ काम मिळालं होतं अशांची यादी माझ्याजवळ होतीच. ती बघत मी पुढील आठवड्याच्या कामाचं वाटप उरकलं. पण त्याच वेळी मी एक काम बाकी ठेवलं. इतरांना काम देऊन कोपर्यात शांतपणे उभ्या असलेल्या त्या स्त्रीकडे वळलो व म्हणालो, "दिसला नाहीत... आजारी होता का?" यावर ती काहीच बोलली नाही. पण तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं व मान वळवून तिनं ते पदरानं पुसलं. तिची काहीच बोलायची इच्छा नाही, हे जाणवून मीदेखील इतर काहीही न बोलता तिला पुढील आठवड्याचं काम दिलं. त्याच वेळी माझ्या हे लक्षात आलं की, रागावलेली म्हातारी पार्वती, बाजूलाच पोर्चमध्ये बसून हे सर्व पाहत होती. वर्गात परतलो व कामाला लागलो. थोड्याच वेळानं बागवे शिपाई आला व म्हणाला, "सर, पार्वती तुम्हांला बोलवतीय." वर्गाबाहेर गेलो तर पार्वती बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये वाट पाहत उभी होती. तिच्याजवळ जाताच ती म्हणाली, "तुला विद्यार्थी व्हता तवापासून बगती. म्हणून तर सपष्ट सांगाया आलीय", असं म्हणून तिनं सर्व हकिकत सांगितली व दुःखानं कळवळत म्हणाली... "ती का आमच्यासारखी रंडकी हाये? चांगल्या घरातली बाई ती! तुमच्यासारख्यांच्या सभ्य घरची लक्षुमी हाये ती. परिस्थितीनं घरच्यांना नकळत बसतीय इथं. पण त्या मेल्याxxx नं तिचं रूप बघून न्यूडला बसशील का इच्यारलं... अब्रूदार बाई ती, रड रड रडली माझ्याकडं, जरा समजवा त्या मेल्याxxx". असं काही घडलं की नको ते मॉडेल्सना द्यायचं काम, असं होऊन जाई.
एकंदरीतच जेजेत येणारी ही मॉडेल्स जगण्याबाबतचा तीव्र संघर्ष करीत जगत. पण त्यांच्यात माणुसकीचा ओलावा आणि सहवासातून आपुलकीचे संबंध निर्माण होत. एखाद्या मॉडेलला सलग काम मिळालं आणि एखाद्याला बराच काळ काम मिळालं नसलं, तर काम मिळालेलं मॉडेल स्वतःहून 'माझ्याऐवजी या काम न मिळालेल्या मॉडेलला काम द्या', असं सांगत असे. अशा वेळी व्यवहार, राजकारण हेवेदावे, द्वेष, मत्सर यांनी भरलेल्या या जगात त्यांच्यातली ही माणुसकी अंतर्मुख करून टाकत असे. कधी कुणी नवीन मॉडेल येऊ लागलं तर सुरुवातीला किरकोळ कुरबुरी होत. पण नंतर ते एकमेकांशी प्रेमानं वागत. एकमेकांच्या सुखदुःखांत सहभागी होत.
१९८०च्या दरम्यान चाळिशीच्या तीन नवीन दाक्षिणात्य स्त्रिया मॉडेल म्हणून अचानक येऊ लागल्या. एकीला तर जेजेबद्दल माहिती मिळाल्यावर तिच्याच नवर्यानं आणलं होतं. त्या तामिळनाडूमधल्या होत्या. लागोपाठ पाऊस न झाल्यामुळे गावात काम नव्हतं आणि उपाशीपोटी राहायची पाळी आल्यावर नाइलाज होऊन गाव सोडून त्या मुंबईत आल्या होत्या. त्यांतली आराई नावाची स्त्री चकणी होती व तिचा नवरा दारुडा होता, तर राजम्मा व ललिता या दोघीही आपल्या आयुष्याशी झगडत होत्या. राजम्मा व्ही. टी.मागच्या झोपडपट्टीत राही. तिची मुलं आजीजवळ खेड्यात होती. ती नवर्यासोबत मुंबईत पैसे मिळवायची व मुलांना पाठवायची. पण तीन वर्षांत या मायलेकरांची भेट झाली नव्हती. अराई व ललिता माटुंगा-माहीमजवळच्या झोपडपट्टीत राहत. पुढं त्यांतल्या एकीला नवर्यानं सोडलं व तो मुंबईतल्याच एका मुलीसोबत राहू लागला. कधीतरी ती म्हणे, "मुझे उसने छोडा क्यों की मै सारी पहनती हूँ। वो चुडेल फ्रॉक पहनती है...बुढ्ढा है लेकिन बहुत चालू है... मैं क्या कर सकती थी? फ्रॉक पहनूंगी बोला, फिर भी मुझे छोडके गया।" अराईवर तिच्या मृत बहिणीच्या, वयात येऊ घातलेल्या, मुलीची जबाबदारी होती. ललिताला आपल्या तारुण्यात पदार्पण करणार्या अमूल या मुलीला झोपडपट्टीत एकटं ठेवायची भीती वाटे... मग अराईची भाची व ललिताची मुलगी यादेखील मॉडेलचं काम करू लागल्या. कारण आम्हीही नेहमी तीच मॉडेल रंगवून कंटाळलो होतो. थोड्याच काळात त्यांना कळलं की, कपडे घालून मॉडेल म्हणून बसलं, तर दिवसाला तीस रुपयेच मिळतात; पण कपडे काढून बसलं, तर दुप्पट म्हणजे साठ रुपये मिळतात. हे कळल्यावर त्यांच्या मनात खळबळ माजली असणार. राजम्मा तर टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगते, "बहुत शरम आती है, मुझे गुस्सा आता है... लेकिन क्या करूँ? घरमें काम करूंगी तो तीन-चारसों मिलेगा। यहा हमेशा काम न होते हुए भी थोडा ज्यादा मिलता।"
अशा या अनेक मॉडेल्सना मी १९७८ ते १९९२ असं सुमारे १४ वर्षं काम देत असे. त्यातून काही ऋणानुबंध आपसूकच निर्माण झाले. यात नवल ते काय? त्यांतील काही तर मला मी विद्यार्थी म्हणून आलो तेव्हापासून बघत होते. काही जण तर माझे शिक्षक विद्यार्थी होते त्या पूर्वीपासून जेजेत मॉडेल म्हणून येत होते. साहजिकच अडीअडचणीच्या वेळी ते हक्कानं पैसे मागत. पण अशा वेळा कमीच येत. संक्रांतीच्या दिवशी प्रेमानं तिळगूळ म्हणून तिळाची स्वस्तातली चिक्की देत. पण त्या सर्वांमधली पार्वती मात्र माझ्या कायमच लक्षात राहिली. ती अनेक वर्षं ईदच्या दोन दिवस आधी येऊन मला सांगे, "उद्या डबा आनीन, त्यातलं दोन घास खा बाबा.. मला लय बरं वाटंल. लाल कट्ट्यावर वाट पाहतीय", असं सांगून ती निघून जाई. मी लाल कट्ट्यावर पोचताच ती मला आडोशाच्या जागी घेऊन जाई. वनदेवी छाप हिंगाच्या कळकट पिशवीतून लख्ख घासलेले डबे काढी. मी त्या लाल कट्ट्यावर बसलेला असे. माझ्यासमोर जमिनीवर ती फतकल मारून बसे. डबे उघडी एका डब्यात मटण, दुसर्यागत खीर व तिसर्यात पोळ्या असत. मी मटणाच्या तुकड्यांना वगळून मसाल्याला पोळी लावून खाई. खीर मात्र दोन घास जास्त जाई. ती आग्रह करी. म्हणे, "अरे मटण घ्ये की, मस्त शिजलंय"... शेवटी तिला सांगितलं, "मी ब्राह्मण. मला मटणाची सवय नाही."
मला आठवतं, पहिल्यांदा ती जेव्हा डबा घेऊन आली व मी लाल कट्ट्यावर बसलो, तेव्हा म्हणाली, "आरं उद्या ईद, सुट्टी हाय. म्हणून आजच ज्येवन घेऊन आलीय." मला काहीच कळेना... ही पार्वती आणि ईदचा काय संबंध, असं प्रश्नचिन्ह तिला माझ्या डोळ्यांत दिसलं असावं. ती बोलू लागली, "माजं नाव सकिना... पण काम मिळावं म्हणून मी पार्वती झाली. आता मी म्हातारी हाय, पन जेव्हा मी ह्ये काम सुरू क्येलं तवा मला दिवसाला ८ रुपये मिळत. आज म्या ६० रुपयं घ्येते, येका दिवसाचं... खा बाबा खा... तुज्यासाठीच आनलंय", आणि तिनं माझ्या डोक्यावर हात फिरवला, पाठीवर थोपटलं... मला आठवतं की हीच पार्वती प्रसंगी माझ्याशी भांडत होती, "न्यूडसाठी तरण्याच हव्या का? अभ्यास काय म्हातार्यांवरून होत न्हायी..." पण तिनं जेव्हा जेव्हा ईदेचा डबा आणला, तेव्हा तेव्हा तिच्या मनात आपल्याला काम मिळावं ही अपेक्षा निश्चित नव्हती.
१९७५ ते १९९५ अशी वीस वर्षं मी जेजे स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करीत होतो. या काळात शिकवत असतानाच मी अनेक गोष्टी शिकलो. शिकवताना मी माझ्या बुद्धीप्रमाणे काही प्रयोग करीत असे. पूर्वीपासून अनेकांकडून जे ऐकलं, वाचलं त्याची सरमिसळ करून काही वेगळं करण्याचा तो प्रयत्न असे. एकदा तिसर्या वर्षाला शिकवत असताना माझ्या मनात विचार आला की, आपण दोन मॉडेल्स एकत्र बसवू. त्यानुसार स्त्री व पुरुष अशी दोन मॉडेल्स एकत्र बसवली. तो प्रयोग यशस्वी झाला. चित्रं नेहमीपेक्षा काहीशी वेगळी व प्रयोगशील वाटली. मग चौथ्या वर्षाला न्यूड क्लास होता. माझ्या डोक्यात किडा वळवळला की न्यूडसाठीही असंच करू या. या विचारानं मला झपाटलं. उत्साहाच्या भरात ही कल्पना मी माझे शिक्षक व ज्येष्ठ सहकारी असलेल्या मृगांक जोशींना सांगताच, ते आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे बघतच राहिले. मी आपल्याच कल्पनेच्या धुंदीत मग्न होतो. मग काही वेळानंतर ते म्हणाले, "चलो कॉफी पीते है।" समोरच्या शांती भुवनमध्ये जाऊन कडक मद्रासी फिल्टर कॉफी मागवली. ते त्यांच्या विचारात तर मी माझ्याच धुंदीत. दोघेही गप्प होतो. अचानक मृगांक जोशी सरांनी दाढी खाजवली आणि ते बोलू लागले, "बहुलकरजी, दो मॉडेल साथमें बिठाओगे। क्या बातऽऽ लेकिन इसके लिये दो महिलाएँ चल सकती है। एक महिला और एक पुरुष... गडबड होगी भैय्या।" तरीही माझ्या डोक्यात प्रकाश पडला नाही. थर्ड इयरप्रमाणेच कपडे घालून स्त्री-पुरुष मॉडेल एकत्र बसवली तसा प्रयोग करून, नग्न मॉडेल बसवून आपण काय घोटाळा करणार होतो ते अचानक लक्षात येताच मी दचकलो आणि ओशाळलो. समोरची कॉफी थंडगार होत होती. जोशी सर म्हणाले, "चलो कॉफी पी लो" आणि त्यांनी माझ्या पाठीवर थोपटलं.
एकदा असाच काहीसा घोटाळा माझ्या हातून अनवधानानं झाला. चौथ्या वर्षाला न्यूड क्लाससाठी मी दोन मॉडेल्स सांगितली होती. सोमवारचा दिवस उजाडला. सकाळी वेळेवर वर्गात पोचलो. एक मॉडेल आलं होतं. त्याला पोझ दिली व दुसर्या मॉडेलची वाट पाहत बसलो. वेळेवर आलेल्या मुलांनी बसवलेल्या मॉडेलभोवतीच्या जागा पकडल्या व कामाला सुरुवात केली. बराच वेळ झाला तरी दुसरं मॉडेल आलंच नव्हतं. उशिरा पोचलेली मुलंही जागा नसल्यामुळे मॉडेलचीच वाट पाहत होती. शेवटी खाली कुणी मॉडेल आहे का, हे पाहण्यासाठी मी स्वत: गेलो. बघतो तो पोर्चमध्ये म्हातारा नरसिंग व एक तरुण मुलगी दिसली. काही काळापूर्वीपासून तीदेखील मॉडेल म्हणून बसू लागली होती. तिला काही काम आहे का, विचारताच तिनं नाही म्हटलं. यावर मी म्हणालो, "चलो उपर" आणि वर्गात नेऊन तिला पोझ दिली व म्हणालो, "उतारो कपडे और बैठो।" उरलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी घाईघाईनं जागा पकडल्या. आयत्या वेळी घोटाळा होऊनही सर्व काही मार्गी लागलं, या समाधानात मी चहा प्यायला रामय्याच्या कँटीनमध्ये गेलो. चहा पिऊन परतलो व वर्गात येऊन बसलो.
काही वेळानंतर मात्र माझ्या लक्षात आलं की, एकाच वेळी माय-लेकींना एकमेकींसमोर नग्न बसावं लागलं होत. दोघीही अवघडल्या होत्या. दोघींनाही समोर बघायला सांगितलं असूनही दोघींनीही माना व नजर खाली वळवली होती. विश्रांती झाल्यावरही त्या एकमेकींना टाळून वर्गाबाहेर पडत होत्या. दिवसभर हा प्रकार सुरू होता. शेवटी संध्याकाळी कॉलेज सुटलं, त्यातली आई कपडे करून निघताच तिला थांबवलं व म्हणालो, "माफ करो, मेरे ध्यानमेंही नही आया, ये तुम्हारी लडकी है।" मान खाली घालून ती काहीतरी पुटपुटली. कदाचित तिनं तिची नाराजी व्यक्त केली असेल. पण नंतर मात्र यावर उपाय म्हणून प्यूनला बोलावून दुसर्या वर्गातून स्क्रीन आणले व दोघीही एकमेकींना दिसू नयेत अशा प्रकारे उभं केलं. पण त्यातून एक नवीनच अडचण निर्माण झाली. आदल्या दिवशी या मायलेकींनी एकमेकाकडे बघायचं टाळण्यासाठी माना खाली घातल्या होत्या व विद्यार्थ्यांनी सांगूनही त्या आपोआप खाली जात होत्या. मधोमध स्क्रीन येताच त्यांच्या माना व नजर आपोआप वर झाली व त्या समोर बघू लागल्या. पण एकंदरीत आठवडाभर त्या अवघडलेल्याच होत्या.
तारुण्यात पदार्पण करणार्या दुसर्या एका मुलीबाबतचा प्रकार तर मनात विलक्षण कालवाकालव करतो. ही दुसरी मुलगी लहानपणापासूनच जेजेत येत होती व तिला लहानपणापासूनच मॉडेल म्हणून बसायची सवयही होती. एकदा या मुलीला न्यूड क्लासमध्ये काम दिलं. दोन दिवस उलटले. विद्यार्थ्याचं 'लाइफ पेंटिंग फ्रॉम न्यूड' जोरात सुरू होतं. तिसर्या दिवशी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मी एका बाजूला प्रात्यक्षिक करून दाखवत होतो. अचानक दुसर्या बाजूला जिथं ही मुलगी बसली होती, त्या भागात हलचल झाली... मागे वळून बघितलं तर कुणीतरी टेबलावर चढलं, मागे स्क्रीनवर टाकलेली ड्रेपरी खसकन ओढून काढली, त्या भागात असणार्या मुलींनी तिथं असणार्या मुलांना बाजूला पिटाळलं व मॉडेल म्हणून बसलेल्या मुलीभोवती ड्रेपरी धरली. काय गडबड आहे हे बघण्यासाठी मी हातातले ब्रश ठेवून तिकडे निघालो. एवढ्यात जयश्री नावाची एक चुणचुणीत मुलगी म्हणाली, "सर, तिथंच थांबा. मग सांगते," आणि तिनं मला दूरवर थांबवलं. एवढ्यात त्या भागात असणारी मुलंही आली. ती हळहळत होती... गरीब बिचारी, असं काही बोलत होती. काही वेळानंतर त्या मुलीला ड्रेपरीत गुंडाळून वर्गाबाहेर नेल्याचं जाणवलं. एवढ्यात जयश्री आली व म्हणाली, "xxx न्यूड बसली होती, तिला पाळी आलीय. लहान आहे. पहिलीच वेळ आहे. बिचारीच्या लक्षातच आलं नाही.’’ त्या आठवड्यात त्या बाजूच्या मुलांचं पेंटिंग अपुरंच राहिलं.
मॉडेल्सबाबतचे असे अनेक अनुभव आहेत. काही वेळेला हीच मॉडेल्स चिडत, संतापत. कोणी एखादा शिपाई, दुसर्या वर्गातला एखादा विद्यार्थी किंवा परक्या माणसानं अनवधानानं वर्गात प्रवेश केला; तर नाराज होत. त्यांतले काही आंबटशौकीन असले आणि असे आत आले, तर त्यांच्या रागाचा पारा जरा जास्तच वर चढे. त्यात अगतिकतेसोबत आपल्या परिस्थितीबद्दलची नाराजी आणि स्त्रीसुलभ भावनेचाही उद्रेक असे. अनवधानानं आत शिरलो, असं ढोंग करणारे कार्यभाग उरकताच (मॉडेलच्या नग्न शरीराचं दर्शन घडताच) लगेच पळ काढीत, पण चुकून आत शिरलेला स्तंभित होत असे किंवा गोंधळून जात असे. त्याला स्वतःचीच लाज वाटे आणि त्याची मान आपोआप खाली जाई.
तारुण्यात प्रवेश केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची प्रतिक्रिया सुरुवातीच्या काळात मात्र गोंधळलेली असे, बावचळलेली असे. त्यांच्यापेक्षा खूपच ज्येष्ठ, किंबहुना त्यांच्या आईच्या-आजीच्या वयाच्या स्त्रियांना आपल्यासमोर असं कपडे काढून बसावं लागतं, याबद्दल त्यांच्या मनात करुणा दाटून येई... किंबहुना एक प्रकारची कुचंबणाच ते अनुभवत. पण हळूहळू त्यातली अपरिहार्यता समजून घेत घेत त्या अनुभवांतून ते अधिक परिपक्वही होत.
कित्येक विद्यार्थ्यांना वर्षअखेरीला आपला पोर्टफोलियो, ही न्यूड ड्रॉइग्ज घरी नेताना भीतीही वाटत असे. कारण तोपर्यंत त्यांनी आपल्याला ‘न्यूड स्टडी’ नावाचा विषय असतो आणि त्या वेळी नग्न स्त्रिया समोर बसतात, ही गोष्ट लपवून ठेवलेली असे. विद्यार्थिनी मात्र घरी सांगून टाकत असत. पण त्यामुळे अनेकदा पालक चिडत आणि वर्गात भेटायलाही येत. अशा वेळी त्यांना समजावून सांगावं लागे. हा अभ्यासाचा भाग आहे, आम्हीही असंच शिकलो. इतकंच नाही तर आमच्या शिक्षकांनाही असाच अभ्यास केला आहे, हे सांगितल्यानं त्याची समजूत पटत असे. पटलं नाही असं वाटल्यास ’‘डॉक्टरांनाही नग्न शरीराची चिरफाड करूनच अभ्यास करावा लागतो’’ हे उदाहरण द्यावं लागे आणि मग त्यांची समजूत पटे.
- सुहास बहुळकर
(या लेखातली सर्व चित्रे सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट यांच्या सौजन्याने)
चिन्ह
'नग्नता - चित्रातली आणि मनातली' विशेषांक
चिन्ह प्रकाशन
पृष्ठसंख्या - २५६
किंमत - रुपये सहाशे
चिनूक्स, धन्यवाद. 'चिन्ह'
चिनूक्स, धन्यवाद. 'चिन्ह' च्या ब्लॉगवर या विशेषांकाबद्दल वाचलंच होतं आता सविस्तर वाचतो. बहुदा त्यावेळेस तो अंक फक्त 'चिन्ह' कडेच उपलब्ध होता. आता तो मायबोलीवर उपलब्ध आहे हे बरं झालं.
व्वा फोटो तर मस्त आहेत.
व्वा फोटो तर मस्त आहेत. आवडले.
लेख वाचतो, वेळ मिळाल्यावर...धन्यवाद चिनूक्स माहीती इथे दिल्याबद्दल.
अंक संग्रही ठेवावा असा
अंक संग्रही ठेवावा असा अप्रतिम आहे.
पेंटींग्ज, फोटोग्राफ्स इत्यादींची छपाई ही मूळ गोष्टीच्या जास्तीतजास्त जवळ जाणारी असावी ह्यासाठी घेतलेले कष्ट अगदी जाणवतात. त्याबद्दल खरोखर स्टॅण्डिंग ओव्हेशन.. .:)
परीचयाबद्दल धन्यवाद चिनूक्स.
परीचयाबद्दल धन्यवाद चिनूक्स.
कधीपासून हा अंक घ्यायचा आहे. चिन्हचा ब्लॉग पण चांगला आहे.
खुपच छान लिहीलय. सुहास सरांचा
खुपच छान लिहीलय. सुहास सरांचा लेखही आयओपनर आहे. मी सुद्धा जे जे ची विद्यार्थिनी आहे. अर्थात पेंटिग हे स्पेशलायझेशन नसल्याने न्युड पेंटिंग्सशी संबंध आला नाही. पण बरोबरीच्या काही मुलांमधे फार उत्सुकता होती ह्या बद्दल. तेव्हा काही एवढा विचार करायची पोच नव्हती. पण हा लेख वाचून आज खरच खुप समधान वाटतय की तशा विचारांच्या लोकांसमोर यायची वेळ ह्या स्त्रियांवर आली नाही. हि बाजू कधी लक्शातच आली नव्हती. अंकाची ओळखही खुप छान आणि संयमीत करुन दिलीत. खुप आभार!
'चिन्ह'च्या मुखपृष्ठापासूनच
'चिन्ह'च्या मुखपृष्ठापासूनच घेतलेले कष्ट जाणवतात. इतर अंकांपेक्षा थोडा वेगळा आकार, आंतरराष्ट्रीय दर्जाची छपाई, उत्कृष्ठ कागद, स्वतंत्र वितरण व्यवस्था या गोष्टी तर ठळकपणे नजरेत भरतातच, पण अंक नुसता चाळल्यावरही हा संग्राह्य अंक असल्याचं मनोमन पटतं. यावेळच्या लेखकांनी सामान्यरीत्या धाडसी म्हणता येईल अशा विषयावर भरपूर कष्ट घेऊन, संदर्भ चाळून, अभ्यास करून वगैरे लिखाण केलं आहे. यातला एकेक लेख खरोखर समरसून वाचावा, आणि रसग्रहण करण्याचा मोह व्हावा इतपत सुंदर झाला आहे.
हे सारं कंटेंट महान आहे. धाडस म्हटलं पाहिजे खरं तर, पण यातल्या लेखांवर सवडीने लिहायची इच्छा आहे. इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद चिन्मय.
इतका जबरदस्त अंक दिल्याबद्दल संपादक मंडळाचं मी या लेखाच्या निमिताने हार्दिक अभिनंदन करतो. पुढल्या अंकासाठी शुभेच्छाही देतो.
परिचय आवडला. धन्यवाद चिन्मय!
परिचय आवडला. धन्यवाद चिन्मय!
परिचयाबद्दल धन्यवाद.
परिचयाबद्दल धन्यवाद.
एवढ्या छान परिचयाबद्दल
एवढ्या छान परिचयाबद्दल धन्यवाद.
परिचय आवडला. धन्यवाद.
परिचय आवडला. धन्यवाद.
समहाऊ, संपादिका व बहुलकर
समहाऊ, संपादिका व बहुलकर दोघान्चेही लेख वाचूनही, मला कलाप्रकारातील "नग्नता" या विषयावर वाहिलेल्या या अंकाचे प्रयोजन, व त्या लेखांचा संबन्ध उलगडला नाही.
बहुलकरांचा लेख वाचून तर (लेख चांगलाच आहे पण...) अधीकच कोडे पडले की "निव्वळ कला" (वा कलेतील गरज म्हणून नग्नता दाखविणे वगैरे) अन या "न्युड" म्हणून बसणार्यान्च्या भावभावन्नान्चे वर्णन यान्ची सान्गड कशी अन का घालावी?
धन्यवाद चिन्मय. अंक खरोखर
धन्यवाद चिन्मय.
अंक खरोखर उत्कृष्ट आहे. घ्याच लोकहो. अगदी संग्रही ठेवण्यालायक.
मला कोलतेंचा हुसेनवरील लेख, बहुलकरांचा वरचा लेख, शर्मिलाचा 'मोनालॉग', शर्मिलाचे वरील संपादकीय हे सर्व आवडले. परिसंवादातील काही भाग फार आवडला.
शर्मिला आणि टीमचे मनःपूवर्क अभिनंदन. मायबोलीने विक्रीसाठी ठेवला म्हणून मायबोलीचेही.
रच्याकने स्वातीआंबोळेचेही नाव आहे. शर्मिला आणि स्वाती यांचे नाव पाहून खूप छान वाटले.
ह्म्म्म, पेंटींग शिकणार्या
ह्म्म्म, पेंटींग शिकणार्या लोकांना या असल्या विषयाची खरच काही गरज आहे का ?
युरोपमधे असतात तसे न्यूड पुतळे वापरून काही करता येऊ शकत नाही का ?
मेडिकल सायन्स मधे अशा प्रकाराची अनिवार्यता समजु शकतो, पण पेंटींगमधे...
असो ज्या अर्थी भले भले तज्ज्ञ लोकांनी सुद्धा हा विषय चालू ठेवला तिथे आम्ही काय बोलणार ?
nude साठी बसणाऱ्या मोडेल्स्ची
nude साठी बसणाऱ्या मोडेल्स्ची अशी अगतिकता असते हे पहिल्यांदाच समजल. बहुल्कारांचा लेख छान आहे.
असो ज्या अर्थी भले भले तज्ज्ञ
असो ज्या अर्थी भले भले तज्ज्ञ लोकांनी सुद्धा हा विषय चालू ठेवला तिथे आम्ही काय बोलणार ?<<<
यातला उपरोध दूर करून हे सगळे प्रश्न खरंच जर स्वतःला विचारलेत तर. चित्रकला, दृश्यकला या विषयांमधे आयुष्याची तपश्चर्या असलेले तज्ञ, कलाकार लोक जेव्हा फिगर स्टडीला महत्वाचं मानतात तेव्हा एकतर त्यांच्याइतका अभ्यास करून ते मत खोडून काढावं कींवा आपल्यापेक्षा बरंच ज्ञान असलेल्यांचं मत म्हणून ते समजून घ्यायचा प्रयत्न तरी करावा. नाही का?
अशक्य आहे हा विषय. मला एक कळत
अशक्य आहे हा विषय. मला एक कळत नाही कलेच्या नावाखाली कसली ही निंदनीय कामे. अंगावरिल सर्व कपडे (नग्न) काढून मॉडेल म्हणून उभे राहल्यावर चार पैसे मिळतील असे सांगून एकाद्या महीलेला काम देणारा वरिल लेखाचा लेखक व वेश्येला बाजारात उतरवणारा दलाल यात फरक तो काय?
आणि ही अशी पेंटींग शिकणार्या लोकांपैकीच काही मुली किंव्हा मुले का नाही मॉडेल म्हणून उभे राहत! एकाद्या गरजवंताच्या गरजेचा फायदा उचलणे कितपत योग्य आहे?
अशी चाळीस पंन्नास लोकांसमोर उभी केलेली नग्न स्त्री आणि पूर्वी बाजारात उभी केलेली नग्न स्त्री यात फरक तो काय.? हा स्त्री जातीचा अपमान नाही का.? कलेच्या नावावर सगळा स्वैराचार चालू आहे.
आपल्या आईच्या, बहीणीच्या अथवा मुलीच्या वयाच्या स्त्रीला समोर नग्न बसवून त्यांची चित्र काढण्याची कसली ती कला, विकृती आहे ती एक प्रकारची.
'हुसेन' या विषयावर काही
'हुसेन' या विषयावर काही महिन्यांपूर्वी वादळी चर्चा झाली होती. त्यामुळे इथे वादाकरता म्हणून नाही, पण खालील काही वाक्ये/परिच्छेदांवर विचार मांडावेसे मांडले.
>>> हुसेनसारख्या उदाहरणात वाद फक्त ’कला आणि नग्नता’ इतपतच मर्यादित नाही. त्याला धर्म, राजकारण असे अनेक स्तर जोडले गेले आहेत.
हे स्तर जोडले गेले कारण हुसेनने फक्त एका धर्मातील देव/देवतांची नग्न चित्रे काढली. स्वतःच्या धर्माच्या किंवा हिंदू धर्म सोडून इतर धर्मांच्या देवांची नग्न चित्रे त्यांनी काढली नव्हती. जर त्यांनी हिंदू देवतांच्या नग्न चित्रांच्या बरोबरीने स्वत:च्या व इतर धर्मातल्या देवांची नग्न चित्रे काढली असती तर ते केवळ 'कलेसाठी' अशी चित्रे काढत आहेत ही त्यांची भूमिका भक्कम झाली असती. पण केवळ एकाच धर्मातल्या देवतांची नग्न चित्रे काढल्यामुळे आपोआपच 'धर्म' हा स्तर या वादाला जोडला गेला. त्यांच्या विरूद्ध काही हिंदूधर्मियांनी निषेध नोंदवून न्यायालयात दाद मागितल्यावर आपोआपच धर्माचे राजकारण करणार राजकारणी त्यात घुसले व 'राजकारण' हा स्तर वादाला जोडला गेला.
>>> कलाकाराने या सर्वाचे उत्तरदायित्व मानावे का? किती मर्यादेपर्यंत मानावे असा एक मूलभूत प्रश्नही या उदाहरणातून अपरिहार्यपणे जन्म घेतो. या प्रश्नाची उत्तरे समाजातील अनेकांनी आपापल्या परीने शोधायचा प्रयत्न केला. अनेक मतांतरे, वैचारिक मतभेद यांतून एक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. समाजातील विचारवंतांची, हुसेनच्या समकालीन कलावंतांची, पुढच्या पिढीतल्या कलावंतांची, साहित्यिकांची यासंदर्भात नक्की भूमिका काय हे एकत्रितपणे जाणून घेणे ’चिन्ह’ला अत्यावश्यक वाटले.
कलाकारांनी या सर्वांचे उत्तरदायित्व मानावे की नाही हा कलाकारांचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु समाजातल्या एका विशिष्ट गटाची श्रद्धास्थाने असलेल्या देवतांची नग्न चित्रे काढून ती सार्वजनिक केली जातात तेव्हा मात्र निषेध हा होणारच. त्यामुळे त्यांच्या अशा चित्रांना विरोध होणे हे योग्यच होते. त्यांनी सर्व धर्मियांच्या श्रद्धास्थानांची अशी चित्रे काढली असती तर निदान ते स्वतःशी तरी प्रामाणिक आहेत असे म्हणता आले असते.
पण कलेच्या नावाखाली फक्त हिंदू देवतांची नग्न चित्रे काढणे, स्वत:च्या धर्माच्या व हिंदू सोडून इतर कोणत्याही धर्माच्या देवतांची अशी चित्रे अजिबात न काढणे आणि स्वतः काढलेल्या "मीनाक्षी' चित्रपटातल्या एका गीतावर मुस्लिमांनी आक्षेप घेतल्यावर अजिबात विरोध न करता ताबडतोब ते गीत चित्रपटातून काढून टाकणे पण हिंदू धर्मियांनी नग्न चित्रांचा निषेध केल्यावर कलाकाराच्या अभिव्यक्तीचा मुद्दा पुढे करणे व अशा चित्रांचे समर्थन करणे इ. मुळे त्यांची भूमिका प्रामाणिक नसून ती दुटप्पी व दांभिक होती हे सहज लक्षात येते.
>>> नग्नतेचं समर्थन, हुसेनवादामध्ये कोणतीही एक बाजू उचलून धरण्याचा ’चिन्ह’चा हेतू अर्थातच नाही. नग्नता ही चित्र-शिल्पमाध्यमामधून शतकानुशतकं आविष्कृत होतच आहे, कलाकाराला मोहात पाडतच आहे, कधी ती स्वीकारली गेली, बहुतेकदा तिला कडाडून विरोधच झाला. कलेतल्या नग्नतेमध्ये प्राचीन कालापासून जे आदीम भावना, मग ती आकर्षणाची असो वा संतापाची, ती चेतवून तिचा उद्रेक करण्याची जी ताकद आहे तिचं कुतूहल वाटलं, त्या ताकदीचा वेध घ्यावासा वाटलं इतकंच. बदलत्या पिढीनुसार बदलत्या सभ्यतेच्या संकेतांचा वेध घ्यावा, त्या अनुषंगानं समाजातल्या सर्व क्षेत्रातल्या विचारवंतांशी संवाद साधावा हा हेतू. समाजातील विचारवंत, बुद्धिवंत समाजाला दिशा देण्याचे काम करतात. वैचारिक गोंधळात समाज भिरभिरत असताना या विचारवंतांनी दाखवलेली एक ठाम दिशा सुकाणूचे काम करु शकते. हुसेनच्या वादग्रस्त चित्रांसंद्र्भातून झालेला वाद आणि त्यानिमित्ताने ’कला आणि नग्नता’ या विषयासंदर्भात पुन्हा पुन्हा उद्भवणार्या मुलभूत प्रश्नांची उत्तरं शोधणारा एक सशक्त परिसंवाद ’चिन्ह’च्या या अंकाचा मध्यवर्ती गाभा ठरला.
एखाद्या व्यावसायिक मॉडेलचे नग्न चित्र काढणे व कोट्यावधींचे श्रद्धास्थान असलेल्या एखाद्या श्रद्धास्थानाचे नग्न चित्र काढणे यातला फरक लक्षात घेतला पाहिजे.
>>> एका चित्रकाराच्या विरोधात देशभर वावटळ उठली. धार्मिक कट्टरवाद्यांची बाजू ठामपणे लोकांसमोर आली पण यासंदर्भातल्या कलावंतांच्या, विचारवंतांच्या भूमिका एकत्रित ठळकपणे कधी समोर आल्याच नाहीत.
त्याचे कारण म्हणजे कलावंत व विचारवंत यांना हुसेनांनी काढलेल्या हिंदू देवतांच्या नग्न चित्रांचे लंगडे समर्थन सुद्धा करता आले नाही. आणि ते करणे शक्यही नव्हते.
तुम्ही फक्त एकाच धर्माच्या देवतांची नग्न चित्रे का काढली, तुमच्या स्वत:च्या किंवा इतर धर्माच्या देवतांची तशी चित्रे का नाही काढली? मुस्लिमांनी निषेध केल्यावर तुम्ही मीनाक्षी चित्रपटातले गीत काढून टाकले, पण हिंदूंनी तुमच्या चित्रांचा निषेनध केल्यावर तुम्ही आपल्या चित्रांचे का समर्थन करत होताता? या प्रश्नांना कोणत्याही कलाकाराकडे, विचारवंताकडे किंवा हुसेनांकडेही समर्पक उत्तर नव्हते.
हुसेनना आपली आविष्कार स्वातंत्र्याची भूमिका समाजाला समजावून सांगायची संधी न्यायालयीन खटल्याच्या निमित्ताने आली होती. पण तसे करण्याऐवजी ते देश सोडून गेले. किंबहुना यामुळे अशी चित्रे काढण्यामागचा त्यांचा हेतू प्रामाणिक नव्हता हे स्पष्ट झाले.
>>> दैनंदिन जीवनाच्या लढ्यात अभिव्यक्तीस्वातंत्र्यासारख्या प्रश्नांकडे गंभीरपणे लक्ष द्यायला सामान्य जनतेला फुरसत नाही आणि कलाकारांना, विचारवंतांना वेळ नाही किंवा गरज वाटत नाही, आपल्यावर बेतल्याशिवाय यासंदर्भात मत व्यक्त करावं असं त्यांना वाटत नाही बहुधा. त्यामुळे यासंदर्भात ठाम भूमिकाच कधी मांडली गेली नाही.
अभिव्यक्ती आणि श्रद्धास्थाने यात फरक केला पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली फक्त एका विशिष्ट समाजाच्या भावना पायदळी तुडविणे हे अयोग्य आहे. आधी लिहिल्याप्रमाणे कोणत्याही कलाकाराला, खुद्द हुसेनांनासुद्धा आपल्या नग्न चित्रांचे समर्थन करणे शक्य झाले नव्हते.
>>> समाजातल्या काही मान्यवर विचारवंतांनी, कलाकारांनी नग्नता किंवा एकंदरीतच कलास्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्यासंदर्भात मत व्यक्त करताना जी बोटचेपी, सावध भूमिका घेतली ती धक्कादायक आणि समाजाची नग्नतेसंदर्भातली दुटप्पी, दांभिक भूमिकाच अधोरेखित करणारी ठरली.
स्वतः हुसेनांची भूमिका या चित्रांसंदर्भात दुटप्पी, दांभिक अशा स्वरूपाचीच होती. मग इतरांनी तशीच भूमिका घेतली यात नवल ते काय?
>>> ज्या हुसेनसंदर्भातून हे विचारमंथन झालं, त्याच्यावर मात्र परिसंवादात भाग घेतलेल्या प्रत्येकाकडून काही ना काही टीकाच झाली, नि:संदिग्धपणे कोणीच त्याची बाजू घेतली नाही जी थोड्याफार प्रमाणात आम्हाला अनपेक्षित अशीच अशी होती.
यात अनपेक्षित असे काहीच नव्हते. हुसेनांच्या स्वत:च्या दुटप्पी, दांभिक भूमिकेमुळे त्यांच्यावर टीका होणारच आणि नि:संदिग्धपणे त्यांची बाजू कोणीच घेऊ शकणार नाही.
>>> व्होल्टेअरसारखा विचारवंत आविष्कारस्वातंत्र्याबाबत जी भूमिका घेतो ( I do not agree with what you have to say, but I will defend to the death your right to say it ) तिचा पुरस्कार एकाहीकडून तितक्या ठामपणे एकविसाव्या शतकातलं दुसर्या दशकात केला जाऊ नये, ही गोष्ट आविष्कारस्वातंत्र्याच्या मुद्द्यापेक्षा धर्म, जाती, प्रादेशिकता यांचं पारडं जड होत जाणं हतबलतेनं स्वीकारणं हेच कुठेतरी दिसतं. कलेचा प्रवाह यातून पुन्हा वळचणीला तर जाणार नाही ना असाही एक प्रश्न मनात डोकावून जातो.
आविष्कारस्वातंत्र्य व श्रद्धा यांनी आपापल्या सीमारेषा सांभाळल्या तर असे वाद होणारच नाहीत.
>>> धर्म, राजकारण, नग्नता यांबाबतीत पहिल्या दोन गोष्टी तिसर्यापेक्षा जास्त अनैतिक, अश्लिल, बीभत्स असू शकतात आणि तिसरी जास्त पवित्र असू शकते. हे पुन्हा एकदा पटलं.
या सर्व गोष्टी एकमेकांइतक्याच अनैतिक, अश्लील, बीभत्स असू शकतात. परिस्थितीनुरूप कोणी कमी तर कोणी जास्त. तसेच या सर्व गोष्टी एकमेकांइतक्याच पवित्रही असू शकतात. परिस्थितीनुरूप कोणी कमी पवित्र तर कोणी जास्त पवित्र.
>>> आणि ही अशी पेंटींग
>>> आणि ही अशी पेंटींग शिकणार्या लोकांपैकीच काही मुली किंव्हा मुले का नाही मॉडेल म्हणून उभे राहत! एकाद्या गरजवंताच्या गरजेचा फायदा उचलणे कितपत योग्य आहे?
+१
-- अशी पेंटींग शिकणार्या
-- अशी पेंटींग शिकणार्या लोकांपैकीच काही मुली किंव्हा मुले का नाही मॉडेल म्हणून उभे राहत! एकाद्या गरजवंताच्या गरजेचा फायदा उचलणे कितपत योग्य आहे?--
ह्या मुद्द्यातही तथ्य वाटतेय. अता आम्हाला कला या विषयात गती नाही हे मान्य. आणि कलेसाठी न्यूड पेंटींन्ग हा प्रकार खूप उच्च दर्जाचा ई असेलही. पण असे असूनही किती कलाकार स्वतःची किन्वा जवळच्या नात्यातील व्यक्तिंची (मुलगी आई ई) न्युड चित्रे काढून घेतात/ काढतात? जर न्युड्ला असलेला सामाजिक विरोध खरोखरच कमी व्हावा असे वाटत असेल तर कलाकारांनी स्वतःपासूनच ते धाडस दाखवायला पाहिजे.
कलाकाराला त्याचे प्राविण्य दाखवता यावे, अभ्यास करता यावा म्हणुन या मॉडेल्सच्या अगतिकतेचा असा उपयोग करून घेतलेला फारसा पटत नाही. परदेशातल्या प्रमाणे मॉडेल्स जर बिनधास्त पणे स्वतःहून काम करत असतील तर वेगळी गोष्ट आहे पण आपल्याकडे मात्र वाईट नजरेनेच याव्यवसायाकडे बघितलजाणर्णार.
सर आणि मी या ज्योत्स्ना कदम
सर आणि मी या ज्योत्स्ना कदम यांनी संभाजी कदम यांच्याबद्दल लिहिलेल्या पुस्तकात संभाजी कदमांनी ज्योत्स्ना कदम यांची न्यूड पोर्ट्रेट्स केल्याचे उल्लेख आहेत.
<< अशी पेंटींग शिकणार्या
<< अशी पेंटींग शिकणार्या लोकांपैकीच काही मुली किंव्हा मुले का नाही मॉडेल म्हणून उभे राहत! एकाद्या गरजवंताच्या गरजेचा फायदा उचलणे कितपत योग्य आहे?-- >> याचा अर्थ असाही होतो कीं विरोध 'नग्नते'ला नसून गरजवंताना 'न्यूड मॉडेल ' म्हणून बसवण्यापुरताच आहे !
<< एकाद्या महीलेला काम देणारा वरिल लेखाचा लेखक व वेश्येला बाजारात उतरवणारा दलाल यात फरक तो काय? >> 'त्या' लेखात प्रतिबिंबीत होणार्या अत्यंत सुसंस्कृत, संवेदनशील लेखकाच्या व्यक्तीमत्वांतूनच हा फरक स्पष्ट नाही होत ?
मी कधीही 'आर्ट स्टुडंट' नव्हतो व चित्रकारही नाही पण चित्रकेलेच्या आवडीमुळे अगणित प्रदर्शनं मी पाहिलीं आहेत ; अनेक चित्रकारांशी चर्चा व चित्रकलेवरील पुस्तकं यातून एक गोष्ट मला पक्की उमजली आहे कीं सराव हा चित्रकलेचा मूलभूत पाया आहे. निसर्ग, वेगवेगळ्या इमारती, घरं, होड्या इ. चीं हजारो स्केचेस यशस्वी चित्रकार करतच असतात. "न्यूड मॉडेल"कडेही बघण्याची त्यांची दृष्टी हीच असते. मानवी शरीर हे चित्रकाराना एक सौंदर्य व एक आव्हान म्हणून फार पूर्वीपासून आकर्षित करत आलं आहे. त्यामुळे, "न्यूड चित्रं काढायचीच कां ? " हा प्रश्न चित्रकारांना " तुम्हाला चित्रं काढायचीच गरज काय ?" असं विचारण्यासारखाच आहे. आणि नैतिकतेच्या कल्पना आतां इतक्या वेगाने बदलताहेत कीं
आणखी आठ-दहा वर्षात ह्या विषयावर एवढी चर्चा होत होती, हेंच कदाचित हास्यास्पद ठरेल !!
आणि हो, "चिन्ह" ही चित्रकार व चित्ररसिक ह्यांच्यासाठी एक अनमोल, अत्यंत दर्जेदार ठेंवच असते; त्यात चर्चेसाठी निवडलेला विषय हा कलेच्या गाभ्याशीच निगडीत असतो याबद्दल शंकाच नसावी.
छान लिहीलंय.
छान लिहीलंय.
मास्तुरे, तुमच्या
मास्तुरे, तुमच्या विश्लेषणामुळे एक प्रकारे बरे वाटले कारण "कलेकरता कला वा जीवनाकरता कला" असे म्हणत म्हणत, व कलेतील "मानवी नग्नतेच्या" अपरिहार्य अविष्काराचे दाखले देत देत, मागिलबाजुने वा चोरपावलांने म्हणा, पण "हुसेन" याने काढलेल्या हिन्दू देवदेवतान्चे विकृत नग्न चित्रान्चे समर्थन यदाकदाचित, "कळत वा नकळ"", वरील अन्काचे विशेष विषयाचे निमित्ताने होत असेल, तर ते खोडून काढणे अत्यावश्यक होते. तुमची पोस्ट ते काम करुन जाते. त्याबद्दल धन्यवाद.
विशेष सूचना: मी इथे लिहीतो ते तथाकथित "प्रथितयश" व आयुष्य वगैरे वेचलेला कलावन्त म्हणून नाहीच नाही, पण तरी लिहीतो कारण मी "मूर्तिकार" आहे, कलेकरता कला जगलो/शिकलो आहे तसेच जीवनाकरताही कला वापरली आहे. अन एका "मूर्तिकाराच्या" नजरेला "नग्नता" मग ती मानवी असो वा पशून्ची, झाकलेली वा उघडलेली असो, फारसा फरक पडत नाही. फक्त हे शिकताना, माझ्या आयुष्यात मला "प्रत्यक्ष" नग्न स्त्री वा पुरुष समोर बसवुन अभ्यास करायची गरज पडली नाही. किम्बहुना, तशी ती पडते असे माझे मत नाही. ह्युमन अॅनॅटॉमीवरील आधीपासुनच उपलब्ध रेखाचित्रे अभ्यासा करता पुरेशी होतात, पण मागल्यान्नी केले म्हणून वा केवळ आन्धळेपणाने एक प्रथा/शिक्षणक्रमाचा भाग म्हणून सरसकट प्रत्येक विद्यार्थीविद्यार्थीनीस कोणा नागड्यान्चे प्रत्यक्ष चित्रण हा आवश्यक भाग मानत असेल, तर ते मला तरी मान्य नाही. हा एक मुद्दा.
दुसरे असे की, यच्चयावत सद्यसंस्कृतीत (केवळ हिन्दु नाही) लहानपणापासून बालकास कपडे घालण्याचे शिक्षण देताना तुम्हीच त्याच्या मनात "नग्नते" बद्दल अपराधीपणाची/लज्जेची भावना निर्माण करता, अन नन्तर तथाकथित "कलाअभ्यासाकरता" मात्र समाज "नग्नतेला" वा त्याच्या "चित्रिकरणाला" सपोर्ट करत नाही असे म्हणून कसले ढोन्गी गळे काढता?
हीच लोक, वस्त्रान्सहित "सर्वसन्गपरित्यागित" नन्गे हिन्दू साधू दिसले तर मात्र "नाके" मुरडतात हे विशेष.
नग्नता आम्हाला नविन नाही, अन आम्ही ती पराकोटीच्या संयमित वर्णनातुन शिकलोय ती म्हणजे, सावरकरान्ना अन्दमानला नेताना आधी नग्न केले होते तिथुन. पण मग काल-आज-उद्या उत्कट वगैरे कलाविष्काराच्या नावाखाली "सावरकर" चित्रपटात दिग्दर्शकाने व कलाकाराने "नग्न सावरकर" साकारायला हवे होते का? नग्नतेच्या अविष्काराचे समर्थन ज्याप्रकारे होतय त्यानुसार तरी याचे उत्तर "हो" असेच असायला हवे, नाही का?
विशेष धकादायक बाब म्हणजे, कोणे एकेकाळी व उपलब्ध पुराव्यान्वरून, हिन्दू धर्मातील देवदेवतान्ची शिल्पे "आजच्या 'पाश्चात्य' कसोटीवर" खरे तर अर्धनग्नच मानली पाहिजेत अन अर्थातच हिन्दू धर्माला त्या काळी नग्नता नवी नव्हतीच, गेल्या शतकापर्यन्त केवळ लन्गोटीचे चिन्धुक लावणारी पुरुष/नर प्रजा जैतरेजैत मधे देखिल चित्रित केली होतीच, पण मग असे असताना, ज्या कोणत्या विशिष्ट कारणाने हिन्दू धर्मियान्मधे (खासकरुन स्त्रीयान्ना) "पडदानशीन" बनविण्याची वेळ येऊन ठेपली, त्या कारणान्च्या मूळापर्यन्त न जाताच, हा समाज नग्नतेचे चित्रिकरण करण्याच्या "चित्रकारान्च्या" अभिव्यक्ति स्वातन्त्र्यावर गदा आणतो असा गळा काढायचा असेल तर त्याला कोण काय करणार?
खरे तर, अस्सल जातीवन्त जन्मजात कलाकाराला कपड्यात झाकलेली मानवी नग्नता शोधण्यास समोरच्याचे कपडे उतरविण्याची गरज नसते. दु:खाची गोष्ट अशि की अस्सल वासनान्धाला देखिल वासना उद्दीपित होण्यास मानवी नग्नता शोधत समोरच्याचे/चीचे कपडे उतरविण्याची गरज नसते. अधिक गम्भिर बाब म्हणजे या अस्सल कलाकार वा अस्सल वासनान्ध या दोहोतील फरक सामान्यजन कसा ओळखणार? की अमक्या स्कुल ऑफ आर्टला अॅडमिशन घेतलीये म्हणून तो वासनान्ध नाही, वा अमकी वर्षे चित्रे काढून उपजिविका करतोय म्हणुन तो सज्जनतेचा पुतळा असे मानणार? वैद्यकीय क्षेत्रात नग्न प्रेतान्च्या चिरफाडीपासून मानवी जन्मापर्यन्त जिथेतिथे "नग्नताच" तर असते. पण त्याच्यावर समाज कधी बोटे दाखवित नाही, तर मग "दुसर्याची नग्नता" वापरुन केलेल्या "वैयक्तिक कलाविष्काराचेच" बाबतीत का दाखवितो? यावर गम्भिर विचार होणे गरजेचे आहे.
उठसुठ "नग्नाविष्कारच" नजरेस पडल्याने जर "बहुसन्ख्यान्ची" नजरच मेली तर त्याचा मानवी पुनरुत्पत्तीवर काय अन किती परिणाम होऊ शकेल, हा देखिल खर तर अभ्यासाचाच विषय. यास स्पर्षही न करता नग्नतेच्या चित्रणाचे एकतर्फी समर्थन होऊच कसे शकते?
सगळ्यात महत्वाचे म्हणजे, या शिक्षणक्रमात असे का नाही? बालवाडीपासून प्रोजेक्ट वगैरे बनविण्यामधे पक्षी विद्यार्थ्यान्च्या शिक्षणामधे "पालकान्चा" प्रत्यक्ष सहभाग हवा असे शिक्षणखाते फर्मावते, तर "नग्नतेचे चित्रण" करण्याकरता पालक/आईवडील/भाऊ/बहिण/सुना/नातवन्डे वगैरे यच्चयावत नातेवाईकान्पैकी कुणाला तरी नागडे करुन त्याच्या सक्रिय सहभागाने हे शिक्षण का दिले जात नाही? नग्नतेच्या शिक्षणाचे कोणतेही समर्थन करण्याआधी समर्थन करणार्याने स्वतःस या वर दिलेल्या विद्यार्थी वा त्याच्या नग्न नातेवाईकाच्या भुमिकेत जाऊन विचार करावा असे वाटते.
पुढल्या पिढ्यान्च्या नशिबी काय काय आहे या कलियुगात काय की!
कुत्र्यामान्जरान्च्या अन्गाखान्द्यावर कापडं चढवुन त्यान्च्या गळ्यात पट्टे अडकवुन त्यान्चेसोबत स्वतः मात्र रस्त्याने नागडे फिरू शकतील हे दिव्य मानव. काहीऽऽहीऽऽ होऊ शक्ते या जगात.
असो. हे माझे मत आहे.
(No subject)
कला म्हणून एकाद्या स्त्री
कला म्हणून एकाद्या स्त्री कींव्हा पुरषाचे नग्न चित्र काढणे व नंतर ते सार्वजनिक प्रदर्शनात मांडणे व कलेच्या नावावर कला रसिकाने ते पहाणे यात कलेचा काय भाग असू शकतो.? मुळात स्त्री-पुरुषांची उघड्या नागड्या चित्रात प्रदर्शनात मांडून चविने बघण्याइतकी कला काय असू शकते.
आणि अशी चित्रे पहाणारा तो कला रसिक व एकाद्या ब्लुफ्लिम ची पोस्टर पहाणारा तो आंबटशौकी हे कसे.
बाकी काही नाही, वर लिहल्याप्रमाणे, 'कलेच्या नावावर सगळा स्वैराचार चालू आहे'.
>>पुढल्या पिढ्यान्च्या नशिबी
>>पुढल्या पिढ्यान्च्या नशिबी काय काय आहे या कलियुगात काय की!
कुत्र्यामान्जरान्च्या अन्गाखान्द्यावर कापडं चढवुन त्यान्च्या गळ्यात पट्टे अडकवुन त्यान्चेसोबत स्वतः मात्र रस्त्याने नागडे फिरू शकतील हे दिव्य मानव. फिदीफिदी काहीऽऽहीऽऽ होऊ शक्ते या जगात.<<
लिंबूभौ मस्त प्रतिक्रीया !
अशक्य आहे. चित्रकारी की
अशक्य आहे. चित्रकारी की कलाविष्कार !
@
विजय_आंग्रे
चांगल्या पोष्टी
लिंबूभौ...
>>पुढल्या पिढ्यान्च्या नशिबी काय काय आहे या कलियुगात काय की!
कुत्र्यामान्जरान्च्या अन्गाखान्द्यावर कापडं चढवुन त्यान्च्या गळ्यात पट्टे अडकवुन त्यान्चेसोबत स्वतः मात्र रस्त्याने नागडे फिरू शकतील हे दिव्य मानव.<<
अगदि अगदि खरे आहे.
‘डॉक्टरांनाही नग्न शरीराची
‘डॉक्टरांनाही नग्न शरीराची चिरफाड करूनच अभ्यास करावा लागतो’’
डॉक्टर मेलेल्या मढ्यांची चीरफाड करतात... तुम्ही काढणार काय मढी समोर बसवून चित्रे? मृत्युतही सौंदर्य असते म्हणे.
विजय, तुमच्या त्या 'चविने'
विजय, तुमच्या त्या 'चविने' मधे सगळे काही आले.
मागे एक कॉमीक स्ट्रीप (pun unintended) पाहिल्याचे आठवते. बहुदा मट आणि जेफ.
त्यांच्यापैकी एक जण न्युड पेंटीग बद्दल बोलत असतो:
You should look at the nude model just as if she were a bowl of fruits
(कारण still life मधे अनेकदा bowl of fruits वापरतात)
मग पुढे तोच म्हणतो:
Boy, what a pair of Oranges she had!
कोणीही पाहणार कसे हे त्यांच्यावरच अवलंबुन असते.
limbutimbu नमस्कार.
limbutimbu नमस्कार. प्रतिसादाची शेपटी किती लांबवत राहणार. मी इथे दिलेल्या चित्रे बघायला इतक्यावेळा आलो नसेल तितकं तुमच्या बदललेला प्रतिसादाला वाचण्यास येतो तो आहे. आपला आणि मास्तुरे यांचा सविस्तर प्रतिसाद आवडला. चिन्ह च्या या दिवाळी विशेषांकाचा हा वेगळाच प्रयत्न जास्त भावला. नग्नता आणि नग्न चित्रकारीता याबद्दल उत्कृष्ठ लिहिलं आहे. पण आज मला हा विशेषांक खाजगीतच वाचावा लागतोय, जरी मी कलेशी निगडीत व्यवसायात असलो तरी. यानिमित्ताने, मला टायटॅनिक सिनेमा आठवला आणि त्यातली तो नग्न स्केच करतानाचा तो सीन आठवला. अर्थात तो मी माझ्या तरूण वयात पाहील्याने कदाचित त्यावेळेसची भावना वेगळी असेल.(कदाचित चटकनची वासना सुद्धा असू शकेल) पण ते चित्र आणि त्या चित्रातली केट विन्स्लेट हि सुंदरच दिसते. हे जेव्हा मी माझ्या चित्रकार मित्राकडून ऐकलं तेव्हा समजलं. त्याने बर्याच गोष्टी सांगितल्या न्युड चित्रकारीतेबद्दल. बेसिक चित्रकारीतेचा अभ्यास करताना ऑब्जेक्ट ड्रॉईंग, बॉडी फिजीक्स विथ अब्सॉल्यूट कर्व्हस & अॅब्स्ट्रॅक्ट थॉट्स वगेरे यासारखे काही मुद्दे सांगितले. हे मुद्दे समजावून सांगताना त्याने अजंठा-वेरूळ येथील शिल्प, ग्रीस, रोम या सारख्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणातली प्रसिद्ध शिल्प, कामसुत्र पेंटींग्स वगेरे हे सगळं समजावून सांगितलं. ती चित्रे बर्याचदा त्यावेळेसच्या संस्कृतीचा, संस्कृतीतल्या विविधतेचा पुरावा देत असतात हे ही समजावून सांगितलं. या सगळ्या गोष्टी सविस्तर कळाल्यावर 'नजरीया नही नजर बदलो' हे देखिल कळालं. पण एम. एफ हुसेन यांच्या हिंदू देवतेंच्या अर्धनग्न चित्रांविषयींच्या बद्दल बोलायचं झालं तर ती एक महान चित्रकाराची विकृतीच होती असंच म्हणावं लागेल. कारण प्रश्न येतो तो कला आणि ती जोपासणार्या वृत्तीचा आणि ती मानणार्या संस्कृतीचा. या सगळ्याचा कुठेतरी मेळ बसायला हवा असं मला वाटतं. लोकांचा एका कलेकडे बघण्याचा दृष्टीकोन भावनिक असु शकतो आणि तो दुखवून एखादी कला प्रसिद्दीसाठी हे सगळं करत असेल तर रे कदापिही स्विकारलं जाणार नाही.
लिंबूटिंबू यांनी सुचवलेल्या 'नग्नता आणि बालवयीन वा किशोरवयीन' वर्गाचा मुद्दा थोडासा न पटणारा असला तरी तो गंभीर दखल घेण्यासारखा आहे. कारण घरात या सगळ्या विषयावर चर्चा करायचं म्हटलं तरीही अवघड आहे. पण यावर काही वेगेळेही पर्याय असू शकतात. पण 'नग्नतेला' वासनांध नजरेनं पाहणं किंवा लहान वयात 'नग्नते' विषयाचा बदलत जाणारी ऑफ दि ट्रॅक गाडी रोखण्यापेक्षा योग्य त्या रस्त्यानेच पोहचवली पाहिजे.
Pages