दाल तडका

Submitted by योकु on 20 December, 2011 - 05:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धी वाटी तूर + अर्धी वाटी मूग डाळ
एखादी हीरवी मिरची
कोथिंबीर
कडिपत्ता
२ सुक्या लाल मिरच्या
हळद
लाल तिखट
४ पाकळ्या लसूण
२ मध्यम टोमॅटो
हवा असल्यास १ कांदा
जीरं
तेल
मीठ

क्रमवार पाककृती: 

तूर + मूग जरा कमी पाण्यात शिजवून घ्यावी. हळद घालावी वा राहू द्यावी. शिजलेली डाळ घोटू नये.
हीरवी मिरची, कोथिंबीर, टमाटो, घेतला असेल तर कांदा; बारीक चिरून घ्यावा.
सुक्या लाल मिरचीचे तुकडे करावेत.
लसूण सोलून ठेचावा. जरासं आलं सुद्धा किसावं चव आवडत असल्यास...

आता अगदी १ चमचा तेल तापवावं.
त्यात, फक्त २ जिर्‍याचे दाणे घालावेत.
आता क्रमानी हिरवी मीरची, लसूण, आलं घालावं. जरा परतून घ्यावं.
घेतला असेल तर आता कांदा घालून परतावं (जरा ब्राउन होवू द्यावा). शिजतांना हळद घातली नसेल तर ती आता घालावी.
टोमॅटो घालावेत. परतावं. हे सगळं नीट शिजलं की शिजलेली डाळ घालावी. पाणी घालावं. पळीवाढं असू द्यावं. मीठ घालून चांगली उकळी येऊ द्यावी. ही डाळ तयार आहे. ही हवी असल्यास सर्विग बाउलमध्ये काढावी. नाहीतर लगेच वाढायची असेल तर अगदी सिमर वर ठेवावी.

आता तडका करावा-
छोट्या कढईमध्ये ७/८ चमचे तेल तापत ठेवावं. गरम तेलात आता भरपूर जिरं घालावं. जिरं तडतडल्या बरोब्बर लाल मिरच्या घालाव्यात. तिखटपणा जसा हवा असेल तसं लाल तिखट घालावं. फोडणी जरासुद्धा जळता कामा नये!!! हा तडका तयार डाळीवर ओतावा.
दाल तडका तयार आहे. कोथीबीर घालून सजवावं.

वाढणी/प्रमाण: 
हवं तस!
अधिक टिपा: 

अगदी हॉटेल च्या चवीचा होतो पण घरच्या तेलामुळे त्रास होत नाही.
गरम फुलका, जिरा राईस बरोबर छान लागतो. भाताबरोबर खायचा असेल तर जरा पाणी जास्त असू द्यावं.
आज केला होता पण ऑफिस मध्ये आल्याबरोबर लोकांनी फडशा पाडलाय; त्यामुळे फोटो नाही काढता आला... Sad

माहितीचा स्रोत: 
एका ढाब्यावरचा आचारी!
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त कृती. मी केलेली, एकदम ढाब्यावरची चव! टोमॅटो नव्हता घरात म्हणून विकतची टोमॅटो पेस्ट घातली. त्यामुळे मस्त रंग आलेला.

छान व उपयुक्त रेसिपी .
आम्ही बव्हंशी अशीच करतों फक्त तडक्यासाठी तिखटाऐवजी किंचित गरम मसाला वापरतो.

तेलापेक्षा साजुक तुपात अगदी २-३ चमचे ...करून पहा

साजुक तुपात जसा दाल तडका होतो तसा कशातच नाही होत !!!!! तशातही जिरं जरा सैल हातानं घालावं अतीशय सही होतो मग तर दाल तडका

आज या रेसिपीने तडकलेली डाळ केली होती. जर्रा झणझणीत पण मस्त होती चव. दिल खुश हो गया! थँक्स योकु.

आजच दुपारच्या जेवणात बनवला होता दाल तडका. सेम धाब्यावरील दाल ची चव होती. घरी सगळ्यांना आवडला..!
धन्यवाद योकू.. सोपी आणि चविष्ट रेसिपी!!

आज केली होती . छान झाली होती चविला. कोथिंबीर संपल्याच् ऐन्वेळी आठवल . पण खाली जाऊन आणायचा कंटाळा केला . Wink

Dal tadaka.jpg

Pages