चॅनेल्सवरील बिनडोक सिरियल्सबद्दल चॅनेलकडे निषेधात्मक मेल पाठवण्यासंबंधी

Submitted by स्वप्ना_राज on 7 December, 2011 - 04:38

मंडळी,

आपण मराठी चॅनेल्सवरून दाखवल्या जाणार्‍या बिनडोक सिरियल्सबद्दल वैतागून बोलत असतो. कधीकधी आपल्यातले काहीजण चॅनेलकडे इमेल करून ह्याबद्दल तक्रारही करतात. पण........

ह्यावेळी आपण सगळ्यांनी मिळून निषेध केला तर?
केवळ एका सिरियलबद्दल निषेध करण्याऐवजी सर्व सिरियल्सबद्दल (कुंकू, दिल्या घरी, अरुंधती, आभास हा, एकाच ह्या, पिंजरा ह्या झीमराठीवरील सिरियल्स) एकत्रित तक्रार केली तर?

ह्यातून काही निष्पन्न होईलच असं नाही. पण ह्याबद्दल बर्‍याच इमेल्स आल्या तर चॅनेलच्या एखाद्या माणसाला जाग येईल आणि दाखवला जाणारा बिनडोकपणा जरा कमी होईल. शेवटी काय 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन'. त्यामुळे आपण आपलं काम करू यात. काही नाही तरी निषेध नोंदवल्याचं आणि एक मिनी आंदोलन केल्याचं समाधान तरी मिळेलच ना?

काय म्हणताय?

वि.सू. - हा धागा फक्त ही मेल पाठवण्याबद्दल मुद्दे एकत्र करण्यासाठी आहे. प्रतिक्रिया मिळवायला किंवा माबोची जागा फुकट घालवायला नाही. त्यामुळे काही दिवसांनी हा धागा बंद करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काहींच्या बाबतीत मालिका बघणे हे व्यसन झालेले असते. आशुडींनी सुचवलेले उपाय त्यांच्यावर लागू पडणार नाहीत. आमच्या शेजारच्या आजींशी बोलताना नेहमी याचा प्रत्यय येतो. त्यांच्या दोन लहानग्या नाती परदेशातून काही दिवसांसाठी आल्या होत्या. त्या गेल्यावर त्यांच्याशी बोलताना, नाती भेटल्याचा आनंद कमी आणि नाती घरात असल्याने, त्यांना कार्टून बघायचे असल्याने आपल्या मालिकांचे काही एपिसोड कसे चुकले याबद्दलची हळहळ जास्त होती. कधी 'काल संध्याकाळी मालिकेच्या वेळेत पाहुणे, फोन आला होता, त्यामुळे आता रिपीट एपिसोड बघायचा आहे, त्याची नक्की वेळ माहीत नाही म्हणून सकाळपासून टीव्ही सुरू' असेही दिसते.

बर्‍याच मालिका सुरुवात छान करून प्रेक्षकांच्या पकड घेतात आणि मग नेहमीच्या वळणाला जातात. त्या सोडताही येत नाही. मध्यमवर्गीय मराठी माणूस आपल्या गुंतवणुकीचे बाजारमूल्य घसरले तरी सांप्रत तोटा सोडून अन्य पर्याय निवडायला घाबरतो. तसेच मालिकांबाबत होत असेल का? त्या पात्रांमध्ये भावनांची आणि वेळेची इतकी गुंतवणूक केलेली असते ती मालिका बघायचे थांबणे म्हणजे लॉस बुक करणे परवडत नाही? त्यावर पुढे काय होणार हे गाजर आहेच.

निषेध करण्याबाबत : एखादी मालिका नुसतीच रटाळ , बिनडोक आहे म्हणून निषेध नोंदवणे योग्य वाटत नाही. पण जिथे सामाजिक दृष्ट्या अयोग्य गोष्टींवरच मालिकांचा
भर असतो तिथे मात्र निषेध नोंदवायला हवा.

कलाकाराना दोष देण्यात पॉइन्ट नाही. त्याना का रेग्युलर पगार, पेन्शन, ग्रच्युईटी असे लाभ आणि आर्थिक सुरक्षा असते काय? जोपर्यन्त मागणी आहे तो पर्यन्त मिळालेले काम केलेच पाहिजे. विशेष्टः व्यावसायिक कलावन्त झाल्यावर 'स्वान्त सुखाय' या कल्पनेला अर्थ नाही. आणि शेवटी कलाकाराची प्रतिभा तीच असते तुम्ही तिला कशी वापरता हे महत्वाचे. काही कलाकार मनोरंजनात्मक भूमिकातून मिळालेले पैसे विधायक कामालाही वापरतात. कलाकाराना दोष देऊ नये असे मला वाटते.

दिनेशदा.. एवढे सोपे नाही हो ते.. नाहीतर या चॅनेलवाल्यांचे एवढे फावले नसते.. त्याना पुर्ण माहिती असते की दोनचार एपिसोड बघितले की प्रेक्षक यात गुंतत जाणारच.. फक्त एवढीच अपेक्षा की जे लोक मालिका बघतात त्याना तीच तीच सासु सुनांची मारहाण, कटकारस्थाने, लफडी, बालविवाह, विवाहबाह्य संबंध असले विषय नसावेत.. सुरुवातीला प्रोमोज दाखवुन किंवा पहिल्या दोन चार एपिसोड मध्ये प्रेक्षकांची उत्कंठता वाढवुन त्याना या मालिका बघायची सवय लावली जाते आणी एकदा टीआरपी वाढला की तेच तेच दळण दळत बसायचे.. Happy

हा म्हणजे एकंदरीत "आम्हाला घर सुधारता येत नाही आणि चाललो समाज सुधारायला" अशातला प्रकार आहे. हातात रिमोट आहे त्याचा वापर केला की सगळ्या गोष्टी साध्य होतात. जोपर्यंत व्ह्यूअरशिप आहे तोपर्यंत या मालिका चालूच रहाणार. इमेल्स पाठवणे हा वेळ फुकट घालवण्याचा, आम्हीही काहीतरी समाजाकरता करतो बुवा चे फुकट पण व्यर्थ समाधान मिळवण्याचा प्रकार आहे.
ज्येष्ठ नागरिक या मालिका बघतात त्यामुळे आम्हाला बघायला लागतात हे एक कारण कायम पुढे केले जाते. ज्येष्ठ नागरिक इतक्या मोठ्या प्रमाणावर मालिकांचे पर्यायाने टीव्हीचे व्यसनी का झाले आहेत त्याची अनेक महत्वाची समाजशास्त्रीय/कौटुंबिक कारणे आहेत. घरोघरी या कारणांचा सुजाणपणे वेध घेण्यात वेळ खर्च केला, त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न केला तरी कंटाळवाण्या मालिकांचा प्रेक्षकवर्ग घटू शकतो.
लहान मुलांची 'कटकट' नको म्हणून त्यांना टीव्हीवर कार्टून नेटवर्क पासून एमटीव्हीपर्यंत चॅनेल्स लावून ठेवून गप्प बसवले जाते, मुलांना २४ तास गळत्या टीव्हीसमोर बसायची सवय लागते, त्याशिवाय ती एकही काम करत नाहीत, चॅनेल बदलू देत नाहीत असे लक्षात आले की पालक मुलांच्या व्यसनाचा ओरडा करायला लागतात, वाईट कार्टून्स बंद कराच्या चळवळी केल्या जातात, एक्झॅक्टली त्याच प्रकारात हे मोडते.
चिनूक्सने अगदी करेक्ट पॉइन्ट आउट केले आहे. चांगल्या मालीका बंद पडतात कारण त्यांचा प्रेक्षकवर्ग मोजका, त्यावर चर्चाही करण्याचे, लिहिण्याचे कष्टही कोणी घेत नाहीत त्यामुळे त्यांचा प्रसारही होत नाही. न आवडणार्‍या मालिकांवर जितक्या हिरीरीने चर्चा केल्या जातात त्याच्या एक शतांश जरी चांगल्या मालिकांवर झाल्या तरी समाजाचं भलं होईल. पर्यायाने घराचंही.

>>शैलू न पाहून प्रश्न आपल्या पुरता मिटतो गं पण जे चुकीचं दाखवताय त त्याचं काय?? >> नीलू, चुकीचं दाखवतायत आणि दाखवतच रहात आहेत कारण त्याला प्रेक्षकवर्ग आहे. मुळातच व्ह्यूअरशिप कमी झाली किंवा राहिली नाही, तर ह्या मालिकां चालतील का?

आणि टीव्हीच पहायचा झाला, तर टीव्हीवर पहायला अजून बरेच काही उपलब्ध असतेच की. Happy

शर्मिलाने वर ज्येना आणि मुलांविषयी जे लिहिले आहे त्यालाही अनुमोदन.

हा म्हणजे एकंदरीत "आम्हाला घर सुधारता येत नाही आणि चाललो समाज सुधारायला" अशातला प्रकार आहे. हातात रिमोट आहे त्याचा वापर केला की सगळ्या गोष्टी साध्य होतात. जोपर्यंत व्ह्यूअरशिप आहे तोपर्यंत या मालिका चालूच रहाणार. इमेल्स पाठवणे हा वेळ फुकट घालवण्याचा, आम्हीही काहीतरी समाजाकरता करतो बुवा चे फुकट पण व्यर्थ समाधान मिळवण्याचा प्रकार आहे.
>>>>>

बापरे शर्मिला!! Sad

प्रत्यक्ष भेटू तेव्हा वेळ मिळाला तर या विषयावर तुझ्याशी बोलायला मला आवडेल, पण प्रत्यक्ष भेटीतच.

'नक्षत्रांचे देणे', '४०५ आनंदवन' या मालिका का बंद झाल्या? या दोन्ही मालिकांना प्रेक्षक आणि जाहिराती दोन्ही नव्हते. आता याबाबत तक्रार कुठे करावी? Happy

राम, मी तर उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. आईला सांगायचो, जर आज ती मालिका बघितलीस तर मी जेवणार नाही, असा.
अर्थात मी घरी नसताना, ती बघत असेलच.

आणि मी कलाकारांना कुठे बोल लावलाय ? मला तरी प्रेक्षकांचाच दोष दिसतोय.

अगदी सुरवातीला मालिका केवळ १३ भागात संपायच्या. त्यामूळे त्या रंजक असायच्या. (गुलजार, हेमामालिनीच्या मालिकेचे नावच १३ पन्ने असे होते) दिल्लीहून हमलोग, मग बुनियाद वगैरे मालिकांनी ती मर्यादा ओलांडली.
प्रदिर्घ चालूनही, दर्जा राखलेली मालिका म्हणजे भारत एक खोज.

आपल्याकडे सिडी लायब्ररीज नाहीत का ? आज अनेक दर्जेदार सिडीज उपलब्ध आहेत. त्या आणूनदेखील एक पर्याय देता येईल.

१. मुळात मालिका जर मर्यादित एपिसोडसच्या कराव्यात.
यामुळे जो विषय असेल त्यावर फोकस राहिल. भाराभर चिंध्या आणि मुख्य पात्र उपलब्ध नाहीत म्हणून येणार्‍या पूरक कथा आणि अचानक वळणं हे फाजिल प्रकार बंद होतील.

२. निर्मात्यांवर विषयाच्या आवाक्यातच मालिका ठेवण्याचे बंधन घालता येईल.
याकरता सिनेमाच्या सेन्सॉरबोर्डासारखी एखादी संस्था निर्माण करता येईल.

सगळी चर्चा वाचली नंदिनीच्या मागच्या पानावरच्या प्रतिक्रियेशी मी सहमत आहे. की अयोग्य गोष्टींबद्दल तक्रार करायला हरकत नाही. मालिका संपुर्णपणे बंदच व्हायला हव्यात हा धोशा नाहिये. शिवाय माधव यांनी त्यांच्या पोस्टित नोंदवलेल्या गोष्टी ही अत्यंत खर्‍या आहेत.
पण घरात रिकामे बसलेले ज्येष्ठ्, प्रसंगी काही स्त्रिया.. शिवाय आपल्यासारखे लोक किंवा असा वर्ग ज्यांना मुळात हेच ज्ञात नाही की अशा अयोग्य गोष्टींची तक्रार सुद्धा करता येते. बरं माहीत आहे पण त्यासाठी आपल्या पैकी खरंच वेळ काढून या गोष्टी कोण करतो? उलट जाऊ दे, माझ्या एकट्याच्या तक्रारीने हा नॉन्सेन्स थोडाच बंद होणार आहे? असा विचार करून आपण तो तक्रार करण्याचा विचार ही काढून टाकतो. त्याउप्पर मी असा वर्ग ही पाहिला आहे, ज्यांना मालिकांमधली जीवनशैली ही स्वप्नवत वाटते.. त्यामुळे ते लोक ती पाहतात.
मी स्वतः अशा सिरियल्स (१-२) पाहते. (हिंदी) तेव्हा मला बरेच प्रश्न पडतात. इथे आम्हाला एक साधी टू व्हिलर पार्क करायला जागा मिळवताना प्रचंड संघर्ष करावा लागतो.. शिवाय घरच्या स्त्रिया कायम छानछोक... डायनिंग टेबलवार कायम.. सुंदर फळं/पदार्थ मांडलेले. शहाणे आणि कधीही काम न चुकवणारे नोकर.. आणि इतर अनेकानेक गोष्टी ज्या सिरियल मध्ये दाखवतात त्यात निव्वळ अतिशयोक्ती असते.. Sad झी वरची एक मिसेस कौशिक की ५ बहुए नावाची सिरियल पाहत होते त्यात १२ अ‍ॅडल्ट आणि ४ लहान मुलं. घरात एक नोकर नाही. मोठ्ठा बंगला.. घर चकाचक. सगळ्या बहुए नुसत्या सुंदर साड्यांनी लडलेल्या... फरश्या कोण पुसतं? घरचे पुरूष विविध पदार्थांची मागणी ( ती पण ब्रेफाला) करताना दिसतात.. ते इतक्या पटकन बनतात सिरियलीत, किती अतिशयोक्ती? Sad
हे सगळं टळलं पाहिजे. सिरियली लांबवणे पेक्षा काहीतरी दर्जेदार लोकांना पहायला देणे हे ध्येय असले पाहिजे Sad

सगळ्यात पहिल्यांदा ते... काही झालं की प्रत्येक डोळे विस्फारलेल्या चेहर्‍यावर मारला जाणारा कॅमेरा बंद झाला पाहिजे, सिरियलचा एक अख्खा भाग त्यातच खर्ची पडतो. Angry

मालिका बघु नका असे वर काही जणांनी म्हटलय. पण मुद्दा तोच तर आहे ना? कारण वर ज्यांनी निषेध नोंदवला आहे त्या कोणीच मुद्दाम टिव्हीपुढे बसुन या मालिका बघत नाहीत.
माझेच उदाहरण देते. मी ८-८.३० वाजता घरी पोचते. त्यापुढे स्वयंपाक , जेवणे, आवरणे होते. यावेळात मी ५ मिनीटे सुद्धा टिव्हीपुढे बसलेली नसते. काम करता करता तो नको असतानाही डोळ्यांपुढे दिसत राहतो. कारण घरातील जेष्ठ नागरिकांना तो लावायचा असतो. आणि त्यांना ईतर कोणताही पर्याय पसंत नाही. मी कामात असताना कोणाला समजवत बसायला किंवा चॅनेल सर्फ करत बसायलाही वेळ नसतो. एकच चॅनेल चालु असते आमच्याकडे. त्यावर काहीही दाखवले तरी आमच्याकडे ते चॅनेल बघितले जाणार याची खात्री.
८-८.३० वाजता घरी पोचल्यावर आपली सगळी एनर्जी नको तिथे घालवण्यापेक्षा मला योग्य तिथे निषेध नोंदवणे अत्यंत गरजेचे वाटतय. कारण मालिका तर मला कायमच बघायला लागणार आहेत. तर त्या किमान थोड्या तरी सहन करणेबल असाव्यात ना?
१०० जणींचे ईमेल बघुन मालिकावाल्यांना थोडी अक्क्ल आली आणि किमान त्या थोड्यातरी सेन्सिबल झाल्या अशी आशा करायला काय हरकत आहे ? शेवटी काय माणूस आशेवरच जगतो ना.
ज्यांना घरात समजावता येते किंवा ईतर ऑप्शन्स आहेत अथवा ज्यांच्या हातात टिव्हीचा रिमोट आहे (या कॅटेगिरीतील सगळ्याचा मला जाम हेवा वाटतोय Happy )त्यांच्यासाठी मुळात हा धागा नाहीच आहे. ज्यांना मनाविरुध्द या मालिका बघाव्या लागतात त्यांच्या वैतागाला वाट करुन देण्यासाठीचा उपाय आहे.
बापरे ! जरा जास्तच लांबली पोस्ट. पण समजुन घ्या प्लिज.
मी टाईप करेपर्यंत बर्याच पोस्टी आल्या. पण राहु दे मी नाही डिलीट करत आता.

चर्चा वाचली. मी स्वतः आधी म्हणाल्याप्रमाणे कधीच या मालिका एकही मिनीट बघत नाही, त्यामुळे घरात कधीच त्या लावल्या जात नाहीत. मात्र ज्ये ना घरी आलेले असताना जर या मालिकांविरुद्ध एक शब्द जरी उच्चारला तरी 'आधी वडीलांचे ऐकले, मग नवर्‍याचे , आता मुलाचे (म्हणजे खरेतर सुनेचे) ऐकू का' वगैरे असे इमोशनल ब्लॅकमेलिंग टाईप प्रकार, टोमणेबाजी वगैरे सुरु होतात. शिवाय मुलालाही वाटते आई ३-४ महीनेच येते तर होऊदे तिच्या मनासारखे. असे असल्यावर कितीही इच्छा नसेल मालिका पहायची तरी काहीच करु शकत नाही कारण घरात लहान मुलांसमोर टीव्ही वगैरे सारख्या कारणांवरुन भांडत बसायची इच्छा नसते. खूपच मनस्ताप होतो त्या मालिका बघून.
पण हे खरे आहे की व्ह्यूअरशिप कमी झाली तर हे बिनडोक प्रकार दाखवणे कमी होईल.

आस,
मला वाटतं बहुतेक नोकरी करणार्‍या मुलींचा हाच अनुभव आहे. घरी असणार्‍या सासुबाई वगैरे मंडळींची विचारधारा कलुषित करण्याचे कामच या मालिका करत असतात.
हा या बीबीचा थेट विषय नाही, पण घरातील माणसे या मालिकांची का शिकार होताहेत याचा विचार व्हायला हवा.

आमच्या घरातली परिस्थिती बघता याला आपसूकच आळा बसला आहे. वहीनी सरकारी अधिकारी असल्याने तिच्या घरी येण्याच्या वेळा अनियमित असतात. त्यामूळे संध्याकाळचे जेवण आईच करते. आणि मी आयती जेवते, असे वहीनी अगदी जाहिरपणे सांगते. त्यामूळे आईला आनंद तर होतोच, शिवाय तिचे मनही गुंतून राहते. सकाळचे जेवण, वहिनी करून जाते.
आईच्या हातचे जेवण आम्हाला सगळ्यांनाच आवडते. आम्ही मुद्दाम तिला आग्रह करुन, एखादा पदार्थ करायला लावतो.
आईच्या मैत्रिणी भरपूर आणि तिचे गाण्याचे कार्यक्रम चालूच असतात. त्याचा हिशेब तिच ठेवते. घरातलेही सगळे व्यवहार तिच्याच हातात असतात. शिवाय तिला प्रवासाची आवड आणि एकटीने प्रवास करायची धमक असल्याने, त्यातही तिचा वेळ जातो. घरात पुस्तके / मासिके नियमित येतच असतात. (तिचे वय ७७)

आणि मी तर स्वप्नालाही विनंती करेन, कि इथे लिहावे कि या मालिका, इतक्या नियमितपणे आणि इतक्या लक्ष देऊन, त्यांच्याकडे का बघितल्या जातात ?

निषेध नोंदवण्याबद्दल ना नाही, पण मी परत लिहितो कि समस्या आपल्या घरातच आहे. उपाय तर दोन्ही बाजूंनी व्हायला हवेत ना ?

आस, नंदिनी - एकदम सहमत.

माझ्यापुरतं मी हे करायचं ठरवलं आहे.

१. घरी ह्या मालिका पाहिल्या जातात तेव्हा मी शक्यतो मोबाईलवर गाणी ऐकणे किंवा पुस्तक वाचणे हेच करत असते. आईला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे, करते आहे आणि करत रहाणार.

२. चॅनेलला (आमच्याकडे झी मराठी पाहिलं जातं तेव्हा झी मराठीला) मेल पाठवून जोरदार निषेध करणे आणि करत राहाणे.

३. आमच्या घरी लोकसत्ता येतो त्यात १-२ दिव्सांपूर्वी ५-६ महिलांनी आणि एका पुरुषाने 'दिल्या घरी' विरुध्द पत्र लिहिलं होतं. मीसुध्दा असं पत्र लिहिणार आहे. लोकसत्ताने छापलं नाही तरी चालेल. पण पाठवायचं काम मी करणार.

४. मी ऑर्कूट, फेसबुक किंवा ट्विटरवर नाही. पण माझे जे मित्र-मैत्रिणी आहेत त्यांना ह्याविरोधात तिथे लिहायला सांगणार आहे.

ह्या बीबीवर ज्यांनी आपले विचार मांडले आणि ज्यांनी रोमात का होईना पण हा बीबी नुस्ता वाचला असेल त्या सगळ्यांचे आभार!

निषेध नोंदवण्याबद्दल ना नाही, पण मी परत लिहितो कि समस्या आपल्या घरातच आहे. उपाय तर दोन्ही बाजूंनी व्हायला हवेत ना ?>>> दिनेशदा..मान्य पण, एका बाजुचे उपाय थकलेत हो आमचे.. Proud

>>आणि मी तर स्वप्नालाही विनंती करेन, कि इथे लिहावे कि या मालिका, इतक्या नियमितपणे आणि इतक्या लक्ष देऊन, त्यांच्याकडे का बघितल्या जातात ?

दिनेशदा, प्रत्येकाच्या घरातली परिस्थिती वेगळी, ह्या मालिका पहाणार्‍या लोकांची मनोभूमिका वेगळी. एकाच्या घरातले उपाय दुसर्‍याला लागू होतीलच असं नाही.

अगदी बरोबर, स्वप्ना.
मालिकांच्या बाजूने प्रेक्षकांची संख्या, मागणी, कलाकारांना पैसा मिळतोय असे मुद्दे जर पुढे येत असतील.
तर आपल्या घरातली नेमकी काय मजबूरी आहे ते पण बघायला पाहिजे. मी फक्त उदाहरण दिले, प्रत्येक घरात वेगवेगळे उपाय योजावे लागतील.

थोडेसेच रिलेटेड असले तरी मला इथे एक उदाहरण द्यावेसे वाटतेय. काही वर्षांपूर्वी मराठीमधे चावट (सेक्सी, द्वर्थी,हॉट ) नाटकांची लाट आली होती. त्यातल्या वर्तमानपत्रातल्या जाहिराती अत्यंत हिणकस असायच्या. पुढे वर्तमानपत्रांनीच या जाहिराती छापायचे बंद केले. त्या नाटकांना दर्जा नव्हताच त्यामूळे प्रेक्षकही कमी झाले. त्याने हि नाटके आपोआप मागे पडली आणि बंद झाली.

>>स्वप्ना, मग तू सिरियल्सचे अपडेट्स कसे देणार?

सिरियलचे अपडेटस द्यायला सिरियल सुरुवातीपासून शेवटपर्यत पाहिली पाहिजे असं तुम्हाला कोणी बरं सांगितलं? Proud ५ मिनिटं पुरेशी असतात. आमचं घर काही राजवाडा नाही. त्यामुळे अधून्मधून हॉलमधे जाताना टीव्ही दृष्टीस पडतो. डोळे बंद करून चालता येत नाही त्यामुळे सिरियलमध्ये काय चाललं आहे ते दिसतं. आणि कानात बोळे घातले नाहीत तर ऐकायला पण येतं.

आतापर्यंत कितीजणानी इमेल पाठवलेत इथे अनुमोदन करणार्‍यां पैकी ?
का फक्त बोलाचा भात आणि बोलाची खिचडी !
Biggrin

मध्यंतरी एकदा मुंबई पुणे प्रवासात, मला एक सहशेजारी भेटला होता. त्याने सांगितल्या प्रमाणे तो मुंबईमध्ये ज्या फर्म मध्ये काम करतो, त्या फर्म मध्ये भारतभर पसरलेल्या असंख्य केबल चालकांकडून २४ * ७ कोणत्या वेळात कोणता चॅनल जास्त पाहिला जातो हा डेटा येत असतो. ही फर्म हा डेटा अ‍ॅनलाईझ करून त्या त्या चॅनल्स ना वेळोवेळी पुरवत असते. कदाचित यालाच TRP म्हणत असावेत.
नंदिनी, नीधप्तै किंवा या विषयातील इतर अधिकारी मंडळी योग्य तो खुलासा करतील.

त्यामुळे आपल्याला ज्या मालिकेविरुद्ध आवाज उठवायचा असेल, त्या मालिकेच्या प्रसारणाच्या वेळेस तो चॅनल बंद ठेवण्याचा एक उपाय आहे. अर्थात आपल्या हातात रिमोट असेल तरच.

बाकी आशुडी ने सांगितलेले उपाय पटले ............ Happy

आणखी एक करु या. खरेच चांगले कार्यक्रम कुठल्याही चॅनेलवर सादर होत असतील, तर त्याबद्दल माहिती देणारा एक धागा इथे काढू या.
आगामी कार्यक्रमांच्या वेळा पण लिहा. तसेच त्या कार्यक्रमांना पसतीची पावती पण पाठवा.
मी नेटवरच्या कार्यक्रमांबद्दलच लिहू शकेन, कारण मी टिव्ही बघत नाही.

स्वप्ना, पाच मिनिटांत जाता येता एवढे अपडेट्स कळतात? पटत नाहीये, पण ठीके. Happy अशी कित्येक पाच मिनिटं घालवून शेवटी मालिका बिनडोक आहेत हा निष्कर्ष निघाला म्हणायचा. आता चॅनेल्स बदलता येतील. Happy

आमच्याकडे ज्ये ना आल्यावर त्याना आम्ही सापावाघांचे च्यानेल लावून देतो. आणि ते ते आवडीने पाहतात Proud

<<< खरेच चांगले कार्यक्रम कुठल्याही चॅनेलवर सादर होत असतील, तर त्याबद्दल माहिती देणारा एक धागा इथे काढू या>>>
अनुमोदन

आमच्याकडे ज्ये ना आल्यावर त्याना आम्ही सापावाघांचे च्यानेल लावून देतो. आणि ते ते आवडीने पाहतात >>>> नशीबवान आहात. Proud

चांगल्या सिरियल्सबद्दल सांगणे, त्यांचा प्रसार करणे, त्या पहायला लागणे- ह्या कल्पनेला अनुमोदन.

स्वप्ना, पाच मिनिटांत जाता येता एवढे अपडेट्स कळतात? >>> हो ऽऽऽ अगदी सहज. पाच मिनिटं कशाला? बातम्या चालू असताना खालच्या कॅप्शन्स वाचल्या तरी अपडेट्स मिळतील Proud

सर्व प्रतिक्रिया वाचल्या. नंदिनीची ती मोठीच्या मोठी पोस्ट एकदम पटली. जे.ना. आले की आशू_डीनं सांगितलेले सर्व उपाय मी न थकता घरात अमलात आणत असते. सक्सेस रेट - ५० टक्के Proud
इतर वेळेस डिस्कवरी आणि स्पोर्टस शिवाय काहीही लावलं जात नाही.

पण निषेध नोंदवण्यास माझं त्रिवार अनुमोदन. (कारण, उदाहरणार्थ, विविध विषयांवर दिलखुलास गप्पा मारू शकणारे माझे सासरे किंवा माझी आजी सलग ३-४ तास कुठलीही प्रतिक्रिया न नोंदवता या मालिका पाहत बसतात तेव्हा खरंच सांगते, मला अगदी मनापासून वाईट वाटतं. असं वाटतं की - they deserve something better.)

लले, मी म्हणते बातम्या ऐकताना, त्याच लक्ष देऊन ऐकाव्यात ना Proud त्याही हल्ली ऐकण्यासारख्या नसतात ही बाब अलाहिदा.

Pages