चॅनेल्सवरील बिनडोक सिरियल्सबद्दल चॅनेलकडे निषेधात्मक मेल पाठवण्यासंबंधी

Submitted by स्वप्ना_राज on 7 December, 2011 - 04:38

मंडळी,

आपण मराठी चॅनेल्सवरून दाखवल्या जाणार्‍या बिनडोक सिरियल्सबद्दल वैतागून बोलत असतो. कधीकधी आपल्यातले काहीजण चॅनेलकडे इमेल करून ह्याबद्दल तक्रारही करतात. पण........

ह्यावेळी आपण सगळ्यांनी मिळून निषेध केला तर?
केवळ एका सिरियलबद्दल निषेध करण्याऐवजी सर्व सिरियल्सबद्दल (कुंकू, दिल्या घरी, अरुंधती, आभास हा, एकाच ह्या, पिंजरा ह्या झीमराठीवरील सिरियल्स) एकत्रित तक्रार केली तर?

ह्यातून काही निष्पन्न होईलच असं नाही. पण ह्याबद्दल बर्‍याच इमेल्स आल्या तर चॅनेलच्या एखाद्या माणसाला जाग येईल आणि दाखवला जाणारा बिनडोकपणा जरा कमी होईल. शेवटी काय 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन'. त्यामुळे आपण आपलं काम करू यात. काही नाही तरी निषेध नोंदवल्याचं आणि एक मिनी आंदोलन केल्याचं समाधान तरी मिळेलच ना?

काय म्हणताय?

वि.सू. - हा धागा फक्त ही मेल पाठवण्याबद्दल मुद्दे एकत्र करण्यासाठी आहे. प्रतिक्रिया मिळवायला किंवा माबोची जागा फुकट घालवायला नाही. त्यामुळे काही दिवसांनी हा धागा बंद करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुळात हा बीबी चॅनलकडे निषेध नोंदवण्यासाठी का चालू झाला ते आधी समजून घ्या. मालिका बघू नयेत म्हणून काय करावे? असा विषय नाहिये!

बालविवाह, हुंडा, सुनेचा छळ, मुलीचे शिक्षण, मुलगाच हवा, हे काही मालिकांचे मध्यवर्ती विषय आहेत. इथल्या काही लोकाना हे विषय खटकतात, समाजावर याचे दुष्परिणाम होतील असे त्यांचे मत आहे. त्यासाठी चॅनलला आपले मत नोंदवून निषेध व्यक्त करण्याचा मार्ग आहे. चॅनलच्या वेबसाईटवर प्रत्येक कार्यक्रमाला फीडबॅकची सोय आहे म्हणजे त्याना प्रतिक्रिया दिल्या तर चालेल. या प्रतिक्रियांवर आधारित ते त्यांच्या कार्यक्रमाचे स्वरूप बदलू शकतात, अशी प्रतिक्रिया देणार्‍याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर चांगले कार्यक्रम इतरानी पाहावेत म्हणून त्याना सांगणे हेदेखील गरजेचे आहे.

"अमुक एक मालिका बंदच करा" किंवा "अमुक एक विषय दाखवूच नका" असे इथे कुणाचेही म्हणणे नाही, त्यामुळे डिक्टेटरशिप कशी होते?? आम्हाला हे चुकीचे वाटत आहे असे सांगणे म्हणजे डिक्टेटरशिप आहे का? विरोध चुकीची गोष्टी दाखवण्याचा नाही, चुकीच्या गोष्टीच बरोबर असण्याचे बिंबवण्याचा आहे.

जस्सी जैसी कोइ नही, ही मालिका चालू झाली तेव्हा तुफान लोकप्रिय झाली होती. सासबहू सीरीयलला वेगळ्या विषयामुळे या मालिकेने चांगलीच टक्कर दिली. या लोकप्रियतेच्या आधारावर चॅनलवाल्यानी ही सीरीयल दोन वर्षाहून जास्त ताणली. प्रेक्षक कंटाळले, ही गोष्ट चॅनलच्या लक्षात येइपर्यंत सीरीयलचे सुतरफेणी झाली होती. Happy हे झालं मालिका लांबवण्याबद्दल. जे काय म्हणायचे आहे ते म्हणा, गोष्ट सांगा आणी मालिका संपवा. हे जर बहुसंख्य प्रेक्षकाचे मत असेल तर त्यामधे चूक काय आहे? जेव्हा माझे जाहिरातदार संपतील तेव्हाच मी मालिका संपवेन असा सर्व चॅनलवाल्याचा सूर असतो. तेव्हा "आता आम्ही हे बघत नाही," असे सांगणे योग्य ठरत नाही का?

दुसरे उदाहरण, बलिका वधू. ही सीरीयल (नविन चॅनलवर) चालू झाली तेव्हादेखील टीआरपीचे सर्व रेकॉर्डस मोडले. मुळात ज्या प्रथेला कायदेशीररीत्या बंदी आहे, त्याच प्रथेबद्दल या सीरीयलमधे कुणाला शिक्षा झालेले दाखवलेले नाही. याउलट आता वेगळाच ड्रामा चालू आहे. आता ग्रामीण भागात राहणार्‍या एखाद्या आईने आपल्या पंधरा वर्षाच्या मुलीच लग्न ठरवले आणी त्या मुलीने विरोध केला तर "त्या सीरीयलीत बघ, नऊधा वर्षाच्या मुलीच पण लग्न करतात" असा युक्तिवाद तिच्या आईवडलांनी केला तर ते समाजासाठी योग्य होइल का? यात चूक कुणाची असेल? त्या मुलीची? मालिका बघणार्‍याची की मालिका बनवणार्‍याची? कधीतरी असापण विचार करून बघा.

मी टीव्ही माझ्यापुरता बंद केला तर विषय संपणार आहे का? ग्रामीण भागामधे जर या सीरीयल्स चालत असतील तर त्याचं कारण कित्येकदा "दुसरं काहीच नाही आहे बघायला" असं असतं. (प्र्त्येकाने १०चा सॅम्पल साईझ घेऊन सर्वे करून बघा) आणि प्रेक्षक मालिका बघतात म्हणजे त्यांची अभिरूचीच अशी आहे असं मालिकावाल्यांचा सर्वे सांगतो. एकंदरीत हे चक्र चालूच राहतं. त्यामधे जाहिरातदाराचे व्हेस्टेट इन्टरेस्ट असतातच. तो पूर्ण विषय खूप खोलात जाऊन समजावून घ्यावा लागेल.

दुर्दैवाने ज्या प्रमाणात प्रसारमाध्यमामधे वाढ झाली त्याप्रमाणात मीडीया लिटरसी वाढलेली नाही. टीव्हीवर दाखवतात म्हणजे ते पाहायलाच हवं, ते कुणाचं सांगून ऐकतात? असा विचार सर्वसामान्याच्या मनात कायम असतो. इथल्या एक दोन प्रतिक्रियामधे ते दिसले आहे.

यासाठी आपण मुळात सजग रहायला हवं. "हे मला चुकीचं वाटतं" हे सांगता यायला हवं. कदाचित जे तुम्हाला चुकीचं वाटतं ते इतराना वाटत नसेल पण म्हणून मत व्यक्तच करायचे नाही, असे करू नये. प्रत्येकाला आपले मत व्यक्त करता येणे, ते मत सशक्तपणे व्यवस्थेमधे पोचवता येणे हे एका प्रगल्भ समाजव्यवस्थेचे लक्षण आहे.

मी स्वत: मला चुकीच्या वाटलेल्या गोष्टीची तक्रार अशा माध्यमातून करत आलेली आहे. यापुढेही करत राहीन. कारण मी एक मीडीया प्रोफेशनल आहे. प्रसारमाध्यमाच्या दुष्परिणामाचा, समाजावर झालेल्या परिणामाचा अभ्यास केलेला आहे. (अजून करतेच आहे. विषय संपेल कसा?) त्यामुळे "मी मालिका बघत नाही, माझा संबंध नाही" असा अ‍ॅप्रोच मला घेता येत नाही. क्या करे आदतसे मजबूर. Sad

चुकीच्या वाटलेल्या जाहीराती, मालिका, बातम्या, सिनेमे अशा सर्वाच्या बाबतीत माझे चांगले/वाईट मत नोंदवलेले आहे. त्यात आपले मत मांडून काय उपयोग? असा विचार माझ्या मनात आजवर आलेला नाही. कारण सकारात्मक प्रसिद्धी आणी नकारात्मक प्रसिद्धी यांचे आर्थिक समीकरण मांडून त्यावर कित्येक ब्रॅन्डचे भविष्य बदललेले आहे, अशी उदाहरणे मला ठाऊक आहेत. त्यामुळे मी तरी यातून काय फायदा होइल असा विचार करत नाही. ज्या वेळेला अशा मतांची संख्या वाढीला लागते तेव्हा त्याचे परिणाम लगेच नाही, पण थोड्या कालावधीनंतर दिसून येतातच. पण जर मत व्यक्त केलेच नाही तर त्याचे परिणाम कसे दिसतील?

सध्याची प्रसारमाध्यमे दिवसेंदिवस बदलत आहेत. मुळात मास मीडीयाच्या व्याख्येलाच प्रश्न करणारे अशा माध्यमांची संख्या विकसित होत आहे. सोशल मीडीया हे त्याचे उत्तम उदाहरण. एकेकाळी वर्ड ऑफ माऊथ हे वन टूवन मीडीया मानले जात होते. आज फेसबूक, ट्विटरने मास मीडीयाचे रूप धारण केलेले आहे. थोड्याच दिवसामधे इंटरॅक्टिव्ह टीव्ही देखील कॉमन होइल. (थोड्याफार प्रमाणात याची सुरूवात झाली आहे,) तेव्हा एक प्रेक्षक म्हणून आपल्या जबाबदार्‍या निश्चितपणे वाढतील. ते जेव्हा होइल तेव्हा होईल तोवर आपण जे मार्ग उपलब्ध आहेत तिथे आपले मत जरूर व्यक्त करूया. Happy

प्रत्येकाने असे करावेच असा बिल्कुल आग्रह नाही, ज्याला करण्याची इच्छा आहे त्याना काही मदत हवी असल्यास जरूर विचारा.

वरच्या एका प्रतिक्रियेमधे सीआयडी, क्राईम पेट्रोल या दोन कार्यक्रमाची तुलना मालिकासोबत केलेले वाचले. गंमत वाटली. Happy सीआयडी ही क्राईम फिक्शन मालिका आहे. क्राईम पेट्रोल हा फॅक्ट बेस्ड प्रोग्राम आहे. वर उल्लेख होत असलेल्या मालिका "फिक्शन ड्रामा" या सदरातील आहेत. त्यामुळे तुलना करताना योग्य त्या प्रकारे करावी ही इच्छा. Proud

मघाशी पोस्ट लिहिताना अर्धवट सेव्ह केली होती, आता पूर्ण लिहिली आहे.
या बीबीवरचे हेमाशेपो. आता इथे वाचनमात्र!!

मी टीव्ही माझ्यापुरता बंद केला तर विषय संपणार आहे का? >> का नाही? जसं इथे अनेकांनी कितीकशे टक्के अनुमोदने देऊन निषेधाच्या इमेल करायला पाठींबा दिला तसे अनेकांनी मालिका बघणे बंद केले तर व्ह्यूअरशिप नक्कीच हिट होईल. आणि निषेधाच्या ईमेलपेक्षा रैना म्हणते तसं हे अधिक परिणामकारक असेल. कारण <<प्रेक्षक मालिका बघतात म्हणजे त्यांची अभिरूचीच अशी आहे असं मालिकावाल्यांचा सर्वे सांगतो.>> हेच आहे. इमेल करु नका असं इथेही कुणीच म्हणत नाहीये, पण त्यानं फार काही साध्य होणार नाही 'असं वाटतं.' असंच असेल असं नाही. उद्या काही सकारात्मक बदल घडला तर आनंदच आहे. पण रामबाण उपाय म्हणजे मालिका न बघणे. आणि त्यासाठी निषेध आधी घरात नोंदवा. तो वरपर्यंत आपोआप पोचेलच. नाहीतर काय, इकडे इमेल करायच्या आणि तिकडे जानकी नरसिंहाचे पाय चेपीत बसलेली पाहून वैतागायचं. काय अर्थ आहे?

आशू, संपूर्ण पोस्ट +३

ती वेळ महत्त्वाची असते, ती टळली की जिंकली.>>> अगदी बरोबर!

हे काहीच करणे शक्य नसेल, तर >> हे दिलंस बरोबर झालं. तू जे लिहिलंस ते काहीच शक्य नाही. उठून दुसर्‍या खोलीत जाणे, खाली फिरायला जाणे, उद्याची तयारी करणे, >>हे शक्य आहे!

बाकी ह्या धाग्याच्या मूळ विषयाबद्द्ल
निषेधात्मक मेल पाठवण्यासंबंधी>>> निषेध करण्याऐवजी बहिष्कार करता आला तर पहावं. उपक्रम स्तुत्य आहे पण उपद्रवमुल्य किती? असो. Happy

वर नमुद केलेली कुठलीही मालिका पाहिलेलीच नाही. आणि ऐकले तेही फक्त इथेच. >>> +१
पण << इथे मालिकांबद्दल लिहिणाऱ्‍या कोणाचाच त्या त्या मालिका बघणं हा फुल टाईम अजेंडा नाही. घरातील सगळ्यांपासून लांब दुसऱ्‍या खोलीत बसून पुस्तक वाचणं किंवा इतर काही करणं रोजच जमतं असं नाही.>> हे ही १००% पटलं. घरात ज्येना येतात तेव्हाचा अनुभव आहे. बाकी मात्र उरलेले वर्षभर कधीच अश्या मालिकांचा एकही सेकंद पाहीलेला नाही.

स्वप्ना, नंदिनी आणि राम >> अनुमोदन
मुळात मी मालिका बघणं बंद करून मालिका बंद पडणार असत्या, तर आत्तापर्यंत सगळ्या मालिका बंद नसत्या का पडल्या!
माझ्या घरात घडलेला संवादः
(६ वर्षाची भाची, तिच्या आजीला) "आज्जी, तू माझ्या आईची सासू ना?" (आज्जी "हो")
"म्हणजे माझी आई तुझी सून ना" (आज्जी पुन्हा "हो")
"मग तुम्ही भांडत कशा नाही?"
भाचीची आई सिरियल्स बघत नाही तरीही ही अवस्था.
समाजापुढे आपण नक्की कसले आदर्श ठेवतोय ते क्लीअर होतय ह्या प्रसंगातनं असं मला वाटतं.
-------
मुळात रिकाम्या वेळात फक्त 'स्वस्त एंटरटेन्मेंट हवी' असं का - हे मला न उलगडलेलं कोडं आहे (स्वस्त म्हणजे पैशानं नव्हे - मेंदुला त्रास न देणारी - चित्र आणि आवाज आदळत रहाणार - विचारही करू नका अशा अर्थानं) - ह्यापेक्षा अगदी पत्ते खेळले तरी जास्त हलतील जरा मेंदुतल्या पेशी.
असो, तो ह्या बाफचा विषय नाहीये.
पण ह्या टीवी-रिमोट-चॅनल्स-सिरियल्स असल्या सोयीमुळे, दिसेल ते (चिडचिड करत का होईना) बघण्याची सवय बर्‍याच जणांना लागलेली असते. ते त्यांना आवडत असतं असही नाही, पण बर्‍याचदा फक्त मराठी चॅनल्स बघायची म्हटल्यावर दुसरा तुलनेनं चांगला पर्याय उपलब्ध नसतो.
हळूहळू सवय आहे म्हणून चांगलं काही दिसलं तरी ते न ओळखता येण्याची, न आवडण्याची शक्यता आहे.
बटबटीत आवडणं एखाद्यासाठी नॅचरल असू शकतं तसंच सतत तेच पहात राहिल्यानं आवड कल्टिवेट होत गेली असही असू शकतं. त्यामुळे पर्याय तर असावा.
---------------
निषेध नोंदवू नये, असं म्हणणार्‍यांचं मत काही पटलं नाही.
मिडियाचे हक्क ते ऑल्रेडी बंडल सिरियल्स दाखवून ते बजावतायतच - ग्राहक म्हणून माझे काही हक्क आहेत आणि मी ते नोंदवू नयेत असं म्हणणं मला तरी पटत नाही.
आणि फरक पडणारच नाही असं वाटून प्रत्येक वेळी सोडून द्यायचं ही आपली बहुतेक फार जुनी परंपरा आहे
("ये सारी कन्ट्री ही कॉम्प्रमाईज पे चल रही है जी" - साभार खोसला का घोसला)
+ मिडियाला असलेल्या हक्कांबरोबर्/अधिकारांबरोबर असलेली जबाबदारी त्यांना कळत नसेल तर ते दाखवून देणं ही माझी जबाबदारी आहे. ती मी पार पाडणार नसेन तर मी ही तितकीचे दोषी आहे.. (अशा वेळेस रैनाचं 'पीपल गेट वॉट दे डिझर्व" आठवतं मला कायम)
गो स्वप्ना - मीही नोंदवेन निषेध.

आशूडी,
अगदी पटलं,
निषेध घरापासूनच झाला पाहिजे. आमच्या घरात अजूनही पत्ते खेळणे,
भाज्या निवडणे, सगळ्यांनी मिळून एखादा पदार्थ करणे, खास चित्रपट
बघणे असे करतो आम्ही. लहर आली तर फिरायला जातो. आईस्क्रीम
खायला बाहेर पडतो.
बैठ्या खेळात अगदी व्यापारसुद्धा खेळतो. लहान मुलांचे प्रोजेक्ट्स पुर्ण
करायला मदत करतो.मुद्दाम जुने चित्रपट सीडीवर किंवा नेटवर बघतो.
आईलाच तेवढे समजवावे लागते, बाकी कुणाला रसच नाही मालिकांत.
योग्य तो पर्याय मिळाला, तर तिच्याही लक्षात रहात नाही मालिकांचे.
मी तिला १२७ अवर्स दाखवला, तर एका जागी खिळून राहिली.

निषेधच करायचा तर मालिकेंच्या निर्मात्यांना जाहीर कार्यक्रमात बोलावून
प्रश्नांचा भडीमार करणे, हा पण उपाय आहे. (पण ते निर्ढावलेलेच असतात.)
बघणारे बघताहेत तोपर्यंत मालिका चालणारच, त्यामूळे पहिला वार
तिथेच करायला हवा.
माध्यमातून टिका केली तर उलट त्यांना प्रसिद्धीच मिळते.
नुकत्याच दिवंगत झालेल्या देव आनंद यांच्या अलिकडच्या एका चित्रपटावर
सर्व समीक्षकांनीच बहिष्कार घातला होता, नकारात्मकसुद्धा प्रसिद्धी देण्याच्या
लायकीचा नव्हता तो. तसेच या मालिकांचे आहे.

स्वप्ना,मंजू, नंदिनी, राम...... अनुमोदन.
माझ्या घरापुरतं बोलायचं तर यातली किंवा इतरही कोणतीच मालिका घरात बघितली जात नाही. टीव्ही दिवसातून जास्तित जास्त अर्धा-पाउण तासच लागतो. त्यातही शक्यतो स्पोर्ट चॅनल, डिस्कव्हरी-अ‍ॅनिमल प्लॅनेट, बातम्या (नवर्‍याची आणि दिराची पसंती), कार्टून चॅनल (दिवसाला १०-१५ मिनिट) आणि एक -दोन आठवड्यातून एखादा चित्रपट (माझी पसंती) हेच बघितलं जातं. जर टीव्ही बघायचा वेळ वाढतोय असं लक्षात आलं तर आम्ही चक्क महिना पंधरा दिवसांसाठी टिव्ही बासनात बांधून ठेवून देतो.

पण घरात ज्यावेळी सिनिअर सिटीझन्स येतात त्यावेळी हे असं शक्य होईलच याची खात्री नाही. आणि माझ्या घरात जरी हे नेहेमीसाठी बंद झालं तरी अश्या मालिकांमूळे समाजातल्या इतरांवर परिणाम होतंच रहाणार. मालिकांचा दर्जा व्यक्तीसापेक्ष असतो त्यामूळे मी दर्जाबद्दल काही बोलू शकत नाही, पण मालिकांमधून चुकीचे संदेश एकंदर समाजात पोचू नयेत यासाठी मात्र माझा आग्रह नेहेमीच असेल (भले मी किंवा माझ्या घरचे त्या मालिका बघत नसतिल).

माझा प्रत्येक मालिकेच्या प्रोमोलाच विरोध आहे. कारण मी कधी कधीच आणि फक्त प्रोमोच पहाते, म्हणजे ते दिसतात.
स्वप्ना, मीही तुझ्या बरोबर आहे. निषेध नोंदवायला.

धन्य आहे. या सिरिअल्स पाहिल्याच पाहिजेत असे का बंधन आहे.? त्यापेक्षा बीबीसी पहा, डिस्कव्हरी पहा. मी स्वतः मराठी चॅनल बातम्या वगळता कधीही पहात नाही कारण त्यांची 'औकात ' समजल्यावर तिकडे फिरकायचे काय कारण आहे. ? केबल नसणारे कोट्यवधी लोक आहेत त्याना कुठेया मालिकांचा त्रास होतो. वाचन ,फिरायला जाणे, घरातल्यांचीच जरा अधिक आपुलकीने चुकशी क्रणे हे पर्याय उपलब्ध आहेत ना. निदान आपली मुले कितव्या वर्गात शिकतात याची चौकशी केली तरी पुष्कळ ज्ञानात भर पडेल. ज्याला घरात/बाहेर भरपूर काम आहे तो/ती चुकूनही या सिरियल्सच्या वाटेला जात नाही. त्यापेक्षा रस्त्यावरच्या डोम्बार्‍यांचे खेळ लाईव व मनोरंजक असतात.

राम 'दिल दोस्ती डान्स' ला D3 म्हणतात. आमच्या घरात तो शाळकरी वयातल्या मानवांकरता 'जगण्याच्या मुलभूत गरजा' या वर्गात गणला जातो. त्यापुढे 'चल मॉलला जाऊया' हे आमिषही फिके पडते. Sad

सर्वत्र धिंगानाच आहे.
कोठलेही मराठी अगर हिंदी चॅनेल लावा, एकतर भांडणे, सदैव रडके चेहरे, किंवा रागीट स्वभाव दर्शन, अगदी वीट आला. सिरीयल नावे विचाराल तर काही धार्मिक सोडल्या तर झाडुन सार्‍या सिरीयलचा कंटाळा आला आहे. अगदी नाच गाण्याच्या सुध्दा.

बाजो,
इथे आत्तापर्यंत बहूतेकांनी हेच लिहिलंय की ते स्वतः या किंवा इतर कोणत्याही मालिका बघत नाहीत. पण आपण या मालिका बघत नाही म्हणजे त्या अस्तित्वातच नाहीत असं होत नाही ना. जर माझ्या मुलाच्या मित्रांच्या घरी यातली एखादी मालिका किंवा इतर कोणतीही मालिका बघितली जात असेल तर त्याचा थोडाफार तरी इनडायरेक्ट परिणाम माझ्या मुलावर होवू शकतो, म्हणून हा प्रपंच.

बरोब्बर जेवायच्या वेळेलाच बिफोर/आफ्टर इफेक्ट्स दाखवणारी "हार्पिक" ची अ‍ॅड दाखवतात. त्याबद्दल कुठे तक्रार करायची?

बित्तु, उत्तरादाखल जेवताना टिव्ही पाहूच नये, आरोग्याला हानीकारक असते अशी एखादी पोस्ट पडेल हां इकडे Proud

माधव.. सेम पिंच.. Proud
नंदिनी.. उत्तम पोस्ट..:)
यासाठी आपण मुळात सजग रहायला हवं. "हे मला चुकीचं वाटतं" हे सांगता यायला हवं. कदाचित जे तुम्हाला चुकीचं वाटतं ते इतराना वाटत नसेल पण म्हणून मत व्यक्तच करायचे नाही, असे करू नये. प्रत्येकाला आपले मत व्यक्त करता येणे, ते मत सशक्तपणे व्यवस्थेमधे पोचवता येणे हे एका प्रगल्भ समाजव्यवस्थेचे लक्षण आहे. >>> याच्यासाठी हजार मोदक तुला..:)

आशुडी/दिनेशदा.. नाही पटले.. प्रयत्न करायला पाहीजेत हे मान्य पण हे व्यसन सोडवणे किंवा सोडणे एवढे सोप्पे नाही.. आमच्या घरी तर त्या गुंतता ने कहर मांडला आहे.. मोबाईलवर तासतासभर चर्च्या चालु असतात..:(

बरोब्बर जेवायच्या वेळेलाच बिफोर/आफ्टर इफेक्ट्स दाखवणारी "हार्पिक" ची अ‍ॅड दाखवतात. त्याबद्दल कुठे तक्रार करायची?

जेवणाची वेळ बदला. Proud

उत्तम कल्पना आहे ही. जितके जास्त मेल्स जातील तितका पॉझिटिव बदल करतील हे चॅनलवाले. ती चार दिवस सासूचे ही मालिका आणखी किती दिवस चालणारे देव जाणे Uhoh
स्टार प्रवाह वर नुकतीच सुरू झालेली मालिका सुवासिनी : त्यामध्ये बालविधवापुनर्वसनाच्या नावाखाली काहीबाही दाखवले जाते. मुख्य म्हणजे नामवंत कलाकार यात काम कसे करतात हेच नवल आहे!

अहो जोशी किती वेळा 'वेळ' बदलली तरी नेमकी त्याच वेळेला दाखवतात त्यांना कसं काय कळतं की आम्ही जेवायला बसलोय हेच कळत नाही. Proud

शैलू न पाहून प्रश्न आपल्या पुरता मिटतो गं पण जे चुकीचं दाखवताय त त्याचं काय?? उदा. जी नवीन सिरिअल आहे दिल्या घरी तू सुखी रहा च्या प्रोमोचेच संवाद ईतके जहरी आहेत. 'ती' नायिका अभ्यास करतेय आणि तिची आई तिला काहीतरी जेवणाची पाक कृती सांगतेय. नायिकेचे तिथे लक्ष नाही ती अभ्यासात गढलीय तेव्हा आईचा डायलॉग असा काहीतरी कितीही शिकलीस तरी शेवटी जेवणच करायचं आहे ह्या टाईप. आजच्या युगात मुली जिथे सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे तिथे असले डायलॉग ऐकून तिडीक नाही का जाणार? जे लोकं जाणते आहेत ते कान बंद करतील, दुर्लक्ष करतील, अनुल्लेख पण करतील पण जे तितके जाणते नाहीत त्यापेकी ही सिरीअल बघणार्या एखाद्या बाईच्या कानावर सतत हेच आदळत राहिले तर ती आपल्या मुलीच्या बाबतीत हाच विचार करेल ना.

<उत्तम कल्पना आहे ही. जितके जास्त मेल्स जातील तितका पॉझिटिव बदल करतील हे चॅनलवाले. ती चार दिवस सासूचे ही मालिका आणखी किती दिवस चालणारे देव जाणे अ ओ, आता काय करायचं
स्टार प्रवाह वर नुकतीच सुरू झालेली मालिका सुवासिनी : त्यामध्ये बालविधवापुनर्वसनाच्या नावाखाली काहीबाही दाखवले जाते. मुख्य म्हणजे नामवंत कलाकार यात काम कसे करतात हेच नवल आहे!>

किती इमेली जातील? या इमेलींच्या संख्येपेक्षा या मालिकांचा प्रेक्षकवर्ग भरपूर जास्त आहे. या मालिका सुरू आहेत कारण प्रेक्षक त्या बघतात.

नामवंत कलाकार त्यात काम करतात कारण त्यांना पैसे मिळतात.

जेवणाची वेळ ही 'प्राइम' वेळ असते. त्यासाठी उत्पादकाने भरपूर पैसे मोजलेले असतात. कोणती जाहिरात कधी दाखवावी, व कधी दाखवू नये, यावर काही बंधन नाही.

जैन बांधवांसारखे सूर्यास्तापूर्वीच जेवणे उरका आणि त्यांना फसवा... Happy

नीलूतै, त्याना माहीत आहे या वेळी घरातली सगळी माणसे या एकाच वेळी टुळू टुळू टीव्ही पहात असणारच .मग जास्तीत जास्त लोक पाहतील.

स्वप्ना,मंजूडी, नंदिनी, नानबा अनुमोदन.
मीही सिरियल्स बघत नाही. (इतक्यांमधे अजुन एक) पण घरातले त्याचे परीणाम दिसताहेत. काही जे. ना. तर अगदी वेड लागल्यासारखे ठराविक वेळात टिव्ही लावुन बसतात. त्या 'बालिका वधू' चा एक एपिसोड जे.नां. नी मला आवर्जुन बघायला लावल्यावर खरच यांना वेड लागले आहे का असा प्रश्न पडला मला.
म्हणजे मी स्वतः बघत नसुनही काहीही फरक पडत नाहीये.

राम, माधव, नानबा तुम्ही सांगितलेले वाचुन अतिशय वाईट वाटले.

राम, कुठलेही व्यसन सोडणे सोपे नसतेच. कठोर उपाय योजावेच लागतात.
या मालिकात काम करणारे कलाकारही निव्वळ पैश्याच्या गरजेपोटी या मालिका करत असतात.
रोहिणी हट्टंगडी, सुहास जोशी, उत्तरा बावकर, सुहासिनी मुळ्ये या सर्व प्रशिक्षित कलाकार आहे. त्यांनी वेळोवेळी (मालिकांबाहेर) आपली अफाट क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळे त्यांना बोल लावण्यात अर्थच नाही. निर्माते / वाहिन्या / लेखक - प्रेक्षकांवरच जबाबदारी टाकून मोकळे होतील. मागणी तसे लिहितो / सादर करतो असे सांगतील.

विरोध करायचा तो प्रेक्षकांनाच. निदान आपल्या घरातल्या तरी.

खर्डेघाशीवाली नोकरी कुणीही आपल्या आनंदासाठी आणि समाधानासाठी करत नसतो. त्यातून मिळणार्‍या पगाराने पोट भरते म्हणूनच केवळ करत असतो माणूस ती नोकरी.
मालिकांच्यात काम करणार्‍या कलाकारांना, तंत्रज्ञांनाही पोट असतं, गरजा असतात, जगायचं असतं त्यामुळे पगार मिळावा लागतो. त्यामुळे ते करतात.
कलाकार म्हणला की त्याने कलेशी इमान राखण्यापायी उपाशीच राह्यलं पाहिजे ही अपेक्षाच विनोदी आहे.

हार्पिक जाऊद्या हो. आंघोळीचे साबण, पॅड, स्प्रे, सगळ्याच उघड्यानागड्या जाहीराती.
सेंसारच कश्या होतात काय माहीत.
त्यापेक्षा दादा बरा कोडंकेचा

Pages