वासोटा ते नागेश्वर:अंतिम भागः रोमांचक थरार !

Submitted by Yo.Rocks on 30 November, 2011 - 12:43

वासोटा ते नागेश्वरः भाग१- प्रवास बोटीचा !
http://www.maayboli.com/node/30718

वासोटा ते नागेश्वरः भाग२: दर्शन वासोटा
http://www.maayboli.com/node/30767

- - - - - - -- - - - - -- - - -- - - -- - - - -

वासोटयाहून नागेश्वरला जायचे तर वासोटा पुन्हा अर्धा उतरावा लागतो... वासोटयाकडे जाणार्‍या वाटेलाच एक नागेश्वरकडे जाणारा फाटा फुटतो.. इथे दिशादर्शक बाणाचा फलक आहे जो एका घनदाट जंगलातून वाट दाखवतो ! इकडून जाताना ठरले की ग्रुपमध्येच रहावे.. एकटे पडू नये.. ! नि वाटचाल सुरु झाली..

प्रचि १:

ही वाट मात्र वासोटयाच्या वाटेपेक्षा गंभीर वाटली... ह्याच वाटेवरती जनावरे आढळल्याचे ऐकून होतो.. नि खरच या जंगलातून जाताना ते जाणवत राहते.. जितके लवकर अंतर कापता येइल तितके कापायचे होते.. अर्थात आमच्यात सामील असलेल्या थकल्या भागल्या जीवांचे पाय थरथरायला लागले... या जंगलातून शक्य तितक्या लवकर बाहेर पडले तर बरे असे म्हणत सम्या, प्रदीप, विपुल यांना चालते केले... मार्गाक्रमण करण्याची वाट ही डोंगराच्या एका बाजून जाते जी नेमकी पश्चिमेच्या विरुद्ध बाजूस.. साहाजिकच इथून सूर्यदर्शन अवघडच होते त्यामुळे चालताना सूर्यास्त झाल्याचे भासत होते.. जंगलाचा प्रभाव वाढत जात होता..

प्रचि २:

इथली वाट वासोटयाच्या तुलनेने छोटी.. अधुनमधून झाडाझुडूपांतून जाणारी.. फारसे चढ-उतार नसलेली.. अखेरीस आम्ही जंगल मागे टाकले.. नि डोळ्यांसमोर अचानक लख्ख तांबडा सूर्यप्रकाश पडला.. बघतो तर आम्ही कडयावर येउन पोहोचलो होतो.. मागे वळून पाहिले तर तुळस वृंदावन आणि मागे दिसणारा वासोटा.. !! ह्याच वासोटयावरून आम्ही आता जिथे उभे होतो ती जागा काही तासांपूर्वी पाहिली होती.. आणि आता इथून वासोटयाला बघत होतो... आतापर्यंतच्या वाटचालीबद्दल अभिमान वाटत होता..

प्रचि ३:

प्रचि४:

पण हुरळून जाण्यात पॉईंट नव्हता.. खरी कसोटी पुढे होती...!! तिथूनच आम्ही नागेश्वरच्या दिशेने कूच केले.. आता ही वाट कडेकडेनेच जाते.. एका बाजूला जंगलाचा विस्तीर्ण परिसर नि एका बाजूला हिरवी दरी !! नि पलिकडे कोकणात उतरणार्‍या डोंगररांगा...! सूर्यदेखील आता ह्या डोंगररांगाच्या कुशीत निजायला उत्सुक झालेला..

प्रचि ५:

प्रचि ६: हिरव्या दरीत सूर्यप्रकाशामुळे चमकणारा जलाशयरुपी तेजस्वी हिरा..

प्रचि ७:

या वाटेने चालत असतानाच सम्या, प्रदीप, विपुल या त्रिकुटाने शक्य तिथे आपले बुड टेकवून मार्गाक्रमण केले.. Proud पुरे हतबल झाले होते.. सुक्याही आता शक्ती गमावून बसल्यासारखे वाटत होते.. नागेश्वरच्या दिशेने जाताना नागेश्वरहून चोरवणे मार्गे उतरण्याचा मार्ग दिसला.. त्या पायर्‍या बघून 'आयला !' असे उद्गार निघाले नाही तर नवलच... म्हटले नंतर गाठ आहेच.. पण मला नंतर पसरणार्‍या अंधाराची धास्ती होती !

प्रचि८:

दुरुन पाहिलेल्या नागेश्वरच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो.. इथे वरती चढण्यासाठी सुस्थितीत असलेल्या छोटया पायर्‍या आहेत.. या पायर्‍यांच्या अगोदरच उजवीकडे 'कुंडाकडे' चा फलक दिसतो.. हा फलक सुद्धा जंगलात नाहीशी झालेलीच वाट दाखवतो.. !! नि हो तिथेच बाजूला झाडीत पडलेल्या वाघाचे मोठे चित्र असलेला फलक दिसतो.. म्हणजे एक फलक सांगतो जा.. तर एक फलक सांगतो.. खबरदार !! Proud

प्रचि ९:

प्रचि१०: त्या पायर्‍यांवरुन आतापर्यंतच्या वाटचालीचा घेतलेला फोटो -

येताना पाणी भरून घेऊ म्हणत आम्ही गुहा गाठली.. बर्‍यापैंकी मोठी.. फरशी घालून कठडा बांधलेला.. तिथेच मध्यभागी महादेवाचे मंदीर.. वरतून कातळाच्या छतातून झिरपणार्‍या पाण्याचे नेमके पिंडीवर अभिषेक करणारे थेंब.. बाजूलाच त्रिशूळ.. नि समोरच असलेल्या नंदीच्या पाषाणातील तुटलेल्या अवस्थेतील दोन तीन मुर्त्या.. !

प्रचि ११:

इथे पोहोचेस्तोवर पाच वाजून गेले.. नि साडेपाचला निघायचे ठरले.. यावेळेत सगळ्यांनी तिथे लोळून घेतले.. नि लोळूनच फलाहार केला.. थकलेभागलेले जीव सुखावले.. पण कुणाला उठवेना.. ! अगदी इथे मुक्कामालाच आलोय असा आवेश होता... शेवटी संध्याकाळचे साडेपाच लोटून गेले नि सगळयांनी सॅक पाठीवर घेतली.. शुज घातले.. नि टॉर्च बाहेर काढल्या.. ! कारण पश्चिमेला झुकत जाणार्‍या तेजस्वी तांबडया रंगाचा सुर्य आता सौम्य तांबूस रंगाच्या वेषात समाधानी दिसत होता..

प्रचि१२:

गुहेतच एक ग्रुप फोटो झाला.. ग्रुप म्हणाल तर लिडरशीप घेतलेल्या सुन्यासकट आम्ही सहा मायबोलीकर, झीनत (लीडरच्या भूमिकेत), पहिलाच ट्रेक तोपण टाईट जीन्स घालून करणारा सम्याचा मित्र प्रदीप, दोघांची आवड एकच ट्रेकच असलेले मिस्टर एन्ड मिसेस जाधव, मोबाईलशिवाय बिनधास्त असणारा व स्वतःच्या तंद्रीत राहणारा मिस्टर गोपालन, कॉलेजबॉय विपुल देशपांडे आणि आमच्या ग्रुपमध्ये सिनीयरमोस्ट असणारे व आपले रिटायर्डलाईफ ट्रेकींगमध्ये व्यतित करू पाहणारे मिस्टर नारायण चौधरी !! आहे की नाही इंटरेस्टींग ग्रुप ? Happy तसे म्हणा जिथे मायबोलीकर तिथे सगळेच इंटरेस्टींग नि धमाल असतेच.. Wink १,२,३.. म्हणत ग्रुप फोटो क्लिक झाला नि लेटस गो केले !

आता आम्ही चोरवणेमार्गे थेट चिपळूणात दाखल होणार होतो.. ही वाट सुरवातीलाच आपला रंग दाखवते.. रेलिंग्ज आहेत पण गंजलेल्या नि केवळ ओळख दाखवण्याकरता.. त्यांच्यावर भरवसा ठेवायला नकोच.. हा पहीलाच पॅच जिथे काळजीपूर्वक उतरले तर बरे....

प्रचि१३

सुर्य मावळतीला गेला तरीदेखील असणार्‍या संधिप्रकाशात शक्य तितके खाली उतरायचे बघत होतो.. ही पाउलवाट थेट उतरणीची आहे.. जिथे अधुनमधून कोरलेल्या पायर्‍या लागतात.. काही ठिकाणी साखळदंड आहेत.. रेलिंग्जचा मात्र पत्ता दिसत नाही.. दरी मात्र दिसत राहते.. Proud सरळसोट उतरण असल्याने खाली वाट कशी आहे तेही उतरताना कळत नव्हते.. तोच अंधारही दाटून येत होता..

प्रचि १४

समिर व प्रदीपसाठी तर आधीपासूनच ही मोठी जोखीम वाटत होती.. त्यात सुक्या पण येउन मिळाला.. मग काय तिघांनी फक्त शक्य तिथेच उभे राहून मार्गाक्रमण सुरु केले.. थोडक्यात यांचे बुड चांगलेच मळले होते.. त्यात आता अंधार होउ लागला... दोन हात होते तिथे एकच उरला कारण दुसर्‍या हातात टॉर्च आली.. म्हणजे आणखीन समस्या... Proud पण त्यांच्या सोबतीलाच राहून प्रोत्साहन देत होतो.. खरे तर त्यांचा स्पीड बघून मलाच टेंशन आले होते.. कारण उतरायला नुकतीच सुरवात झाली होती.. नि आता अंधारात अख्खे जंगल पालथे घालत उतरायचे होते...!

प्रचि १५

अंधारात उतरण्याची जास्त भानगड नको म्हणून आमच्यातील तो सिनियर माणूस पुढे निघून गेला... इतके की तो दिसेनासा झाला.. खरे तर ठरले होते ग्रुप सोडून पुढे जायचे नाही.. हाकेच्या अंतरावर रहायचे.. पण हा भला माणूस वेगाने पुढे गेला.. साठी ओलांडलेल्या या व्यक्तीची चपळाई खरच कौतुकास्पद ! पण इतक्या जंगलात रिस्की होते ते.. नि सुन्याला त्यांच्यामुळे धावत पाठलाग करावा लागला.. !! सारे काही अंधारमय प्रकाशात सुरु होते.. ! रोहीत व गोपालन सुन्याच्या मागून गेले.. मी इथे सम्या, प्रदीप व सुकी या तिघांना साथ देत होतो (की सांभाळत होतो ? :P) नि मागे बाकीचे विपुलवर लक्ष ठेवून.. या गडबडीतत एक गंमत होती.. सम्या जीव पणाला लावून कसाबसा उतरत होता नि या झंझटीमध्ये त्याच्या मोबाईलवर सुकीची विचारपूस करणारा फोन येत होता.. Lol असो.. पुढे गेलेल्यांचा टॉर्चचा झोत दिसू लागला नि सारे काही ओके असल्याचा संदेश मिळाला.. सुन्या क्षणातच बाकीच्या ग्रुपसाठी पुन्हा वरती आला !! मान गये उत्साद !

आता अंधाराने आपले जाळे पुर्णपणे फेकले होते.. पण वाटेचे स्वरुप काही बदलले नव्हते.. मातीदगडधोंडयाच्या वाटेतून उतरणच होती.. सरळ वाट क्वचितच.. कुठल्यातरी वळणावर... पण अंतर किती शिल्लक आहे हे फक्त इथे आधी जाउन आलेल्या सुन्यालाच माहीत होते.. काही अवधीतच ग्रुप पुन्हा एकत्र आला.. अंधारात क्षणभर विश्रांती झाली.. गंमत म्हणून सगळ्या टॉर्च पाच सहा सेकंद बंद करून पाहिल्या तर मिटट काळोख ! खरतर नुकतीच पौर्णिमा होउन गेलेली.. पण चंद्रोद्य डोंगराआड झाल्याने चंद्रप्रकाशाचा आधार मिळाला नव्हता.. थकलेभागलेले जीव मरकुंडीला आले होते.. सकाळचे गप्पागोष्टी करत चालणारे आता मात्र शांततेच चालत होते.. चालणेच अवघड होउन बसलेल्या विपुलला घेउन सुन्या आघाडीला होता.. नि मागे आम्ही सगळे असे तेराजण अंतर ठेवून रांगेत जात होतो.. विपुल व प्रदीप खूपच थकलेले.. त्यात अंधार नि जंगल यामुळे भयभीत झालेले.. अशातच एक किस्सा झाला.. त्या शांततेत हिस्स्स्स्स्स्स्स्स असा जोरदार आवाज झाला.. 'मेलोs मेलोs' असे ओरडणारा बाजूच्या गवतमय दरीत कोलंडलेला विपुल दिसला.. त्याचा हात धरुन जागेवर उडया मारणारा सुन्या दिसला.. काही कळायच्या आतच त्यांच्या मागे असलेला प्रदीप भोकाट पसरत मागे सुसाट धावत आला..!! पण तो हिस्स्स्स आवाज चालूच होता.. क्षणात बंद झाला.. क्षणात शांतता !! वाटले कुठल्यातरी प्राण्याने हल्ला केला.. पण सगळे काही सापाची करामत होती.. ! पावलेही नीट टाकू न शकणार्‍या विपुलचा वाटेच्याबाजुला चुकून पाय पडला नि हा सारा गरदोळ उठला.. सापाने दंश करायचा नक्कीच प्रयत्न केला असेल पण नशिबाने नेम साधला नाही.. सुन्याच्या पायांतूनसुद्धा तो घुटमळला नि पशार झाला... दर्शन सुन्यानेच घेतले.. विपुल व प्रदीप चांगलेच भयभीत झालेले त्यात त्यांच्या ओरडण्यामुळे क्षणभर का होईना बाकीचेदेखील घाबरले.... पण तो आवाज खरच काळजाला चीर पाडणार होता.. काहीही असो..न विसरता येण्याजोगा एक प्रसंग ! आधीच थंडी गायब होती.. त्यात हा ज्यादा घाम फुटला..(वाटले होते विषारी असेल पण नंतर सुन्याकडून कळले बिनविषारी होता !! )

आता मात्र सगळे जास्तच सावध झालेले.. पण वाट संपता संपत नव्हती.. नुसते उतरण.. साधीसरळ वाट लागताच थकलेभागलेले जीव सुस्कारा टाकत होते.. ते संपते न संपते तोच पुन्हा दगडधोंडयाची उतरणीची वाट ! शेवटी थोडी साथ द्यावी म्हणून चंद्राने अखेर डोंगरापल्ल्याड कसेबसे तोंड वरती काढले...

प्रचि १६

चंद्र आकाशात असला तरी जंगलातून जाताना त्याचा दुधाळ प्रकाश जमिनीवर पोहोचतच नव्हता...अर्थात बोंबच होती.. बराच वेळ चालल्यानंतर दुरवर गावाकडच्या लाईटस तारकाप्रमाणे लुकलुकताना दिसल्या.. नि अजून इतके अंतर बाकीच असल्याचा अंदाज आला.. पुढे शेवटी पायर्‍यांची वाट लागली.. नव्याने बांधलेल्या रुंद पायर्‍या आहेत.. इथे मात्र चालताना थोडी मोकळीक मिळाली...

अखेरीस भलीमोठी तंगडतोड करून आम्ही डांबरी रस्त्यावर आलो..तेव्हा कुठे त्या 'सर्पपिडीत' विपुलला तरतरी आली.. थकवा पळून गेला.. कारण आता गाव हाकेच्या अंतरावर येउन ठेपले होते.. याच रस्त्यावर क्षणभर विश्रांतीसाठी बसकण मारली..

प्रचि १७

इथेच मग त्या हिस्स्स्स्स प्रसंगावरून विनोदगप्पा सुरु झाल्या... नि या गप्पागोष्टींत गाव कधी आले ते कळलेच नाही.. ऑफबीटने आधीच व्यवस्था करून ठेवलेल्या घरात आम्ही पोहोचलो..! नि सगळे आपल्या पाठीवरच्या सॅक टाकून ऐसपैस बसले.. थंड पाण्याचा चेहर्‍यावर फवारा झाला.. तर थकल्याभागलेल्यांनी दुखर्‍या भागावर स्प्रे मारला... इथे पाण्याची सोय चांगलीच होती त्यामुळे दोघा तिघांनी गरम पाण्याने अंघोळ देखील केली.. पण येउन जाउन जो तो 'हिस्स्स्स्स्स' वाला प्रसंगाबद्दलच बोलत होता... जोक मारत होता..त्या विपुलला तर ज्याम पिडले.. लवकरच गरमागरम चहा नि मागोमाग जेवण झाले.. घरातल्यांशी गप्पा मारताना कळले जुन्या वासोटयाच्या वाटेला फारसे कोणी जात नाही.. त्यांनीदेखील अजुन पाहिलेला नाही.. नागेश्वरला महाशिवरात्रीनिमित्त मोठी जत्रा असते.. इति... जेवण झाले नि झोपण्यासाठी सरावलो.. एव्हाना रात्रीचे अकरा वाजून गेले होते..

हे घर म्हणज एकदम प्रशस्त जागा.. वर्‍हंडा म्हणाल तर दिडशे माणसे झोपतील इतकी जागा.. त्यात आम्हाला थंडीपासून बचाब म्हणून एक चूलीची खोली मिळाली.. तीपण एका सभागृहासारखची बर्‍यापैंकी मोठी !! अंथरायला कोणी तरी चटई मागितली तर आमच्यापुढे त्यांनी गोधडी-ब्लँकेट-चादर यांचा ढिग आणून ठेवला.. !! जल्ला मग काय सगळेच खूष !! अगदी घरच्याप्रमाणे झोपी गेले.. ! नि मग सुरु झाला कान बधीर करणारा घोरण्याचा सोहळा ! Biggrin

प्रचि १८

एकंदर दिवसभरात बेफाम तंगडतोड झाली होती.. एक अविस्मरणीय ट्रेकची भर पडली होती.. सकाळच्या बोटीतल्या प्रवासापासून वासोटा, वासोटयाहून नागेश्वर व नागेश्वरहून कोकणात प्रवेश म्हणजेच या चोरवने गावात ! एक मोठी मोहीम फत्ते झाल्यासारखे वाटत होते... ! इथूनच मग परतीच्या प्रवासासाठी चिपळूण गाठणार होतो..

दुसरा दिवस उजाडला तो आरामातच.. माझे म्हणाल तर मी पाच वाजताच उठून बाहेर आलो नि पहाट उजाडण्याची वाट बघू लागलो.. इथून सकाळी साडेनउ दहाच्या सुमारास पुण्यास जाण्यास एसटी आहे.. तर मुंबईकरत सकाळी साडेसातवाजता.. पण ही एसटी सिजनल ! पहाट उजाडली नि घरासमोरच अंगण नजरेस पडले.. जास्वंदीची झाडे.. तुळशीचे वृंदावन.. माडाची झाडे.. एकीकडे सुक्या लाकडांचा रचलेला डोंगर.. तर एकीकडे सुक्या गवताचा.. साहाजिकच कोकणाची ओळख होती.. नीटसे उजाडले.. नि सॅकमधील सटरफटर काढून खादाडीला सुरवात केली.. सगळ्यांचे आटपेपर्यंत प्रणव, मी, रोहीत नि आमच्यातले सिनीयर नारायण असे चौघेजण आजुबाजूचा परिसर बघायला बाहेर पडलो.. ट्रेकसाठी आलोत तर स्वस्थ बसणार तरी कसे.. बाजूलाच एका ओहोळाचे मोठे पात्र नजरेस पडले.. पण पाणी आता नावाला शिल्लक होते.. तरीही सकाळच्यावेळी त्या प्रवाहाचा खळखळाट भुरळ पाडत होता.. इथेच मग फोटोशुट केले नि पोह्यांच्या नाश्त्याला परतलो..

प्रचि १८:

आमचा नित्यनियमाप्रमाणे इथेही उडीसोहळा पार पडला.. पण खास उडी होती ती या हौशी रिटायर्ड व्यक्तीची.. मिस्टर नारायण यांची..
प्रचि १९

आमचा मुक्काम असलेल्या घरात हे दोन लहान बच्चे...
प्रचि २०

नि झोपाळा बघून लहानपण अनुभवणारे हे मोठे बच्चे !
प्रचि २१

नाश्तापाणी आटपून आम्ही त्या घरातल्यांचा निरोप घेतला.. नि एका अविस्मरणीय ट्रेकची भर पडली या आनंदात चिपळूणची वाट धरली.. !

प्रचि २२

१. वासोटा २. जुना वासोटा ३. बाबू कडा ४. तुळस वृंदावन ५. नागेश्वर ६. चोरवणे गावात उतरणारा मार्ग

एकदा करावा असा हा ट्रेक ! Happy

समाप्त नि धन्यवाद Happy

(प्रकाशचित्र विभाग असूनही फोटो टाकता टाकता वर्णन वाढल्यामुळे क्षमस्व.. नाही वाचले तरी चालेल Proud )
(प्रचि क्र. १३,१७ व १८ हे प्रणव कवळे या मायबोलीकराकडून उधार.. यासाठी थँक्स बोलण्याची पदधत नाही.. :P)

गुलमोहर: 

व्वा..मस्त वर्णन आणी प्रचि. मज्जा आली वाचताना Happy
सुक्याला नेताना सावधान.. आधी त्या डोंगरावर जोराचा वारा वाहात नसल्याची खबरदारी घेणे Lol
सुकि Light 1

थरारक अनुभव आणि साजेसे वर्णन/फोटो Happy

त्या शांततेत हिस्स्स्स्स्स्स्स्स असा जोरदार आवाज झाला.. 'मेलोs मेलोs' असे ओरडणारा बाजूच्या गवतमय दरीत कोलंडलेला विपुल दिसला.. त्याचा हात धरुन जागेवर उडया मारणारा सुन्या दिसला.. काही कळायच्या आतच त्यांच्या मागे असलेला प्रदीप भोकाट पसरत मागे सुसाट धावत आला..!! पण तो हिस्स्स्स आवाज चालूच होता.. क्षणात बंद झाला.. क्षणात शांतता !! >>>>>>> Sad

सुक्याला नेताना सावधान.. आधी त्या डोंगरावर जोराचा वारा वाहात नसल्याची खबरदारी घेणे>>>>वर्षूदी Biggrin

अफलातून ! एवढा सगळा थरार एका दिवसात कोंबता येतो ? माबोवरच्या ट्रेकर्सना यापुढे "थरारीस्ट"च म्हणायला हवं ! तुमच्यातल्या 'सिनीयरमोस्ट'ना माझा 'ज्येष्ठ नागरिक' त्रिवार सलाम जरूर पोचवा !!!
<< प्रकाशचित्र विभाग असूनही फोटो टाकता टाकता वर्णन वाढल्यामुळे क्षमस्व.. नाही वाचले तरी चालेल >> >> निदान ट्रेकरने तरी लोकाना अशी साफ चूकीची वाट दाखवूं नये !! Wink
धन्यवाद.

ऐ शाब्बास रे सर्वांना......... खूपच धाडसी मंडळी आहात सर्वजण.........
वर्णन, फोटो - सर्व मस्तच........

-------------^-----------
महान आहात लेको.
सुन्या क्षणातच बाकीच्या ग्रुपसाठी पुन्हा वरती आला !! मान गये उत्साद !>>>>सुन्याला तर जितके दंडवत घालावे तेव्हढे कमीच. Happy
त्या शांततेत हिस्स्स्स्स्स्स्स्स असा जोरदार आवाज झाला>>>> अर्‍र्र्र्र्र्र्र्र लयी टरकीफाय करणारा आवाज आहे तो.
च्यामारी, दिसणार नाही एवढा जीव तो पण हृदयाचे ठोके शुमाकरच्या फेरारीपेक्षा फाष्ट पळवणारा आवाज तो हि दिवसाउजेडी, इथे तर रात्र होती. Sad
पण खास उडी होती ती या हौशी रिटायर्ड व्यक्तीची.. मिस्टर नारायण यांची>>>
हम्म ग्रेट माणुस.

एकदम थरारक ! ते हिस्स्स्स्स्स्स प्रकरण फारच जोखमीचे. विषारी असता तर? मला आजपर्यंत वाटायचं की फक्त नागच फुत्कार सोडतो.

पुर्वी अजून कुणीतर वासोटा ट्रेकचा वृत्तांत टाकला आहे. त्या जंगलात गवा वगैरे दिसतात म्हणे.

त्या मिस्टर नारायणांची उडी खासच ! व्यवस्थित उडालेत Proud

___/\___

थरथराट थरथराट आणि थरथराट भाग हा. नागेश्वर ते चोरवणे म्हणजे नुसता थरथराट.
यो मस्त चित्रवृत्तांत.

वर्षू Lol

यो फक्कड व्रूतांत अन प्र. ची. छान Happy एका दिवसात लय त्रास घेतलात , गवे दिसतात पण निवांत पाहीजे
एकदा करावा असा हा ट्रेक !>>>>> एकदाच Sad , सुन्या क्षणातच बाकीच्या ग्रुपसाठी पुन्हा वरती आला !! मान गये उत्साद !>>>>> खरा ट्रेक लिडर Happy << ते हिस्स्स्स्स्स्स प्रकरण फारच जोखमीचे>>> यो तो फुरश्या आसणार कींवा घोनस कारण कोकणात घोनसी लय .....

डिस्कव्हरी वर स्नेक शो मधे दाखवले होते एकदा... शेपटीचे टोक हलवून स्र्रस्र्रस्र्रस्र्रस्र्रस्र्र असा आवाज काढणारा साप. पण नाव विसरलो त्याचे. जंगलातील शांततेत त्याचा आवाज अगदी चित्तथरारक येत असणार यात शंकाच नाही.

चोरवणेच्या वाटे बद्दल खूप ऐकून आहे. महाशिवरात्रीला गावातील लोक याच वाटेने वर येतात. त्यांच्यासाठी ती पायवाट असली तरी नवख्या ट्रेकर्ससाठी ती पुरेवाट.

एक दिवस शिल्लक होता तर तुम्ही नागेश्वरच्या गुहेत मुक्काम का नाही केलात? परवानगी मिळाली नाही की?

फोटो आणि वृत्तांतील थरार मस्तच Happy

सुन्या क्षणातच बाकीच्या ग्रुपसाठी पुन्हा वरती आला !! मान गये उत्साद ! >>
त्याचा हात धरुन जागेवर उडया मारणारा सुन्या दिसला >>> अरे ये सुन्या कोनसे चक्की का आटा खाता है ? Happy
फोटो आणि वृत्तांतील थरार मस्तच >>>> +१०० Happy

धन्यवाद मंडळी.. Happy

पण आता लवकरच रिटायर होऊ का ? >> दिनेशदा... रिटायर व्हा किंवा नको.. पण एकदा फुरसत घेउन या.. ट्रेकचे नक्कीच जमवू..

नंद्या.. Biggrin हो रे.. नेमके ते हिस्स्स्स्स प्रकरण घडले नि मग आला.. पण ते सांगतोय कोण Wink

भाऊकाका... Lol Proud
<<तुमच्यातल्या 'सिनीयरमोस्ट'ना माझा 'ज्येष्ठ नागरिक' त्रिवार सलाम जरूर पोचवा !!!>> नक्कीच..

इंद्रा.. परवानगी नव्हती रे.. त्यामुळे नाईलाजाने उतरावे लागले.. पण दिवसभर चालल्यानंतर अशी गुहा मिळणे म्हणजे तिथून पाय काढणे खूप कठीण होते.. जमल्यास नागेश्वरची गुहा बघून ये.. चिपळूणवरुन चोरवणे मार्गे चढायचे म्हणशील तर वासोटयाला जाण्यास परवानगी लागत नाही.. पण चढाई एकदम भारी पडणार.. अगदी पहाटे चढावे लागेल.. इथून उतरणेच सोयीस्कर ठरेल..

परवानगी नव्हती रे.. >>> वाटलंच Sad
चोरवणे पश्चिमेला आहे. जर पहाटे सुरवात केली तर उन्हाचा त्रास दुपार पर्यंत तरी जाणवणार नाही. फक्त खडा चढ चढण्याची तयारी ठेवून जावं लागेल. भोलेबाबांच दर्शन करून संध्याकाळ पर्यत हिस् पिस् करत खाली येता येण शक्य आहे.

सही रे!!!

आम्ही मेट इम्दवली-ओढ्याच्या मार्गाने नागेश्वर-त्या जंगलातून वासोटा-बाबूकडा दर्शन-पुन्हा बॅक टू इंदवली असा सकाळी साडेसहा ते दुपारी चार यादरम्यान ट्रेक केला होता. परत येताना वाटेत १० च मिनिटांपूर्वी 'पास झालेल्या' शिकारी कुत्र्यांची विष्ठा सापडली होती.

चोरवण्यात एकदा उतरायचं आहे. पण आता मुक्कामाची परवानगी नसल्यामुळे तुमच्यासारखंच काही करावं लागेल... लेट्स सी...

मस्त ... एकंदर जबरी झाला हा ट्रेक... मजा आली. यो मस्त वृतांत अन फोटु ...
थरथराट काय होता तो अनुभव विसरता येणार नाही.अशा या आठवणींच्या हिंदोळ्यावर असच झुलत रहावस वाटतय. पुन्हा लवकरच भेटुया ..... Happy

जुना वासोटा खुणावतोय का ? >> कधी जायच बोल ...

Pages