चित्रपट विषयक नियम (व पोटनियम) - भाग दुसरा

Submitted by फारएण्ड on 31 October, 2011 - 09:59

काही चित्रपटविषयक नियम - भाग १ लिहायच्या वेळेस आम्हाला खरे म्हणजे आणखी नियम जाणवतील/सुचतील असे वाटले नव्हते (जरी आम्ही आणखी लिहू असे आश्वासन लेखाच्या शेवटी दिले असले तरी). नाहीतर मॉन्स्टर मूव्हीज च्या पहिल्या भागाच्या शेवटी ती मोठी मगर, डायनोसोर, अजगर वगैरे मारल्यावर जगातले सर्व मॉन्स्टर्स संपले असे गृहीत धरून सगळे लोक काहीतरी स्मार्ट डॉयलॉग्ज मारून तेथून निघून गेल्यावर मग तेथे पुन्हा एखादे अंडे फुटताना किंवा काहीतरी वळवळताना दिसते, तसे आम्ही पहिल्या नियमांच्या शेवटी काहीतरी सिम्बॉलिक ठेवले असते. निदान एखादी हलती स्माईली. पण असो.

हे वाचायच्या आधी पहिला भाग जरूर वाचा. प्रतिक्रियांमधे हे क्रमा़ंक तेरा पासून का चालू केले असे विचारलेत तर आपण पहिला भाग वाचला नाही हे चाणाक्ष लेखक नक्की ओळखतील.

तर हा घ्या नियमांचा नवीन ष्टॉकः

१३: पाच मिनीटांचा नियम.
खालील गोष्टीतील एक गोष्ट/थीम जर सिनेमात असेल तर दुसरी पाच मिनीटांत येतेच येते:

१३.१> कॉलेज तरूणांवरची कथा: (सुरू झाल्यावर ५ मिनीटांत) "इस साल के डान्स कंपिटिशन मे...." हा संवाद. शक्यतो आत फुल व वरती चौकटीचा हाफ शर्ट घातलेल्या व जन्मापासून "अच्छे दोस्त"च असलेल्या तरूणाला.
१३.२> हीरो ने कोणालातरी बहीण मानलेय किंवा त्याला एक बहीण आहे हे आपल्याला कळलेय - ते - रक्षाबंधन येण्याचा काळ
१३.३> हीरो किंवा साईडहीरो हा मुस्लिम आहे हे कळल्यावर - ते - तो नमाज अदा करतानाचा शॉट
१३.४> हीरो एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे हे कळते - ते - "आज बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग आहे" हा संवाद
१३.५> किंवा तो सेल्स मधे आहे हे कळल्यावर - तो एक डावीकडून उजवीकडे वर जाणार ग्राफ असलेला सेल्स प्रेझेंटेशन चा शॉट

१४.
काही विशिष्ट गोष्टी करणारे लोक त्या करताना दारे व्यवस्थित बंद करून करत नाहीत. पण पूर्ण उघडीही ठेवत नाहीत. किंचित किलकिले असते. त्याच दिवशी काहीतरी पराक्रम करून आलेला हीरो किंवा हीरॉइन दार उघडायचा प्रयत्न करते तर ते उघडेच असते. मग तो आत गेल्यावर अस्पष्ट आवाज येतात. पुढे जे होते त्यातून चित्रपटाची कथा तयार होते.
तसेच हे लोक खिडकीत असतील तर त्यांच्या सावल्या खिडकीतील काचेवर काय चालले आहे याची अचूक कल्पना बाहेरून येइल अशाच पडतात. खिडकी उघडी असेल तर बाहेरून कोठूनही क्लिअर दिसेल अशा ठिकाणीच हे चाललेले असते.

१५:
हीरॉईन किंवा कोणीही मुलगी झोपलेली आहे. अशा स्थितीत तेथे जागा असलेला तरूण जर अच्छा दोस्त असेल तर तो आपले पवित्र हेतू दर्शवण्याकरिता भर मुंबईत भर उन्हाळ्यात सुद्धा तिच्या अंगावर पांघरूण घालून तेथून जातो.

१६. नॅरो एस्केप रूल:
डायनोसॉर, मॉन्स्टर्स, भुते, पाण्याच्या लाटा, आगीचे लोळ यापासून पळणारे जर "मेन कलाकार" असतील तर ते नेहमी एक दोन इंचांच्या किंवा सेकंदांच्या फरकाने वाचतात. त्यापेक्षा जास्त किंवा कमी नाही. बंद खोल्यांची, लिफ्टची, दारे/शटर्स बंद होता होता त्यातून निसटतात. पूर असेल तर "पानी सरके उपर" होता होता एखादी व्हाल्व उघडते. आगीचे लोळ भुयारातून वर जाण्याआधी एक सेकंद हे लोक तेथून खाली पडतात व त्यांच्या सोयीसाठी खाली पाणीही असते.
तसेच हे सहकलाकार असतील तर ते आपण घाबरून किंवा फाजील आत्मविश्वासाने हसून ज्या दिशेला बघत आहोत त्याच्यापेक्षा वेगळ्या दिशेने हल्ला होउ शकतो याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ असतात.

१७.
हीरो व हीरॉईन दोघेही पळालेले असतील व ते एरव्ही सुद्धा क्वचित घरी जेवणारे असतील तरीही ते पळून येउन लपलेल्या जागी मात्र त्यांना एकदम लाकडे तोडून आणून दगडांची चूल करून त्यावर स्वयंपाक करावा लागतो. त्यासाठी तवा वगैरे भांडीही अचानक उपलब्ध होतात. जवळच्या गावात सामान आणायला जाता येते पण एखाद्या हॉटेलातून थेट काहीतरी खायला आणायचा पर्याय नसतो.

१८.
घरातून असे पळालेले लोक एखाद्या पानाच्या टपरीवर, चहाच्या हॉटेल मधे किंवा दुकानात काहीतरी आणायला जातात. तेव्हा तेथे पेपर उघडून बसलेल्या एखाद्या माणसाच्या अगदी समोरच्या पानावर अर्ध्या पानाच्या साईजएवढा त्या पळालेल्या व्यक्तीचा फोटो हेडलाईन सकट आलेला असतो. पान सुद्धा पलटावे लागत नाही.

१९. खालील नावे असलेले लोक कधीही वाईट नसतातः
१. मास्टरजी
२. खान चाचा
३. मिसेस ब्रिगॅन्झा

२०.
जेव्हा दोन हीरोंचे एकाच हीरॉईन वर प्रेम असते ते तिघेही एकमेकांना ओळखत असले तरी तिचे नाव किंवा जरा क्लू लावता येइल अशी इतर काहीही माहिती एकमेकांना देत नाहीत. चित्रपटात असंख्य एकत्र शॉट्स असले तरी तेव्हा "अरे हीच ती" असेही सांगत नाहीत. पूर्ण चित्रपटात तिच्याशिवाय दुसरी कोणीही मुलगी नसली तरी दोघांनाही तीच ती असेल याचीही शंका येत नाही. मग पूर्ण चित्रपटभर सगळा गोंधळ झाल्यावर कधीतरी ते उघडकीस येते. मग ते जबरी दोस्त असल्याने ज्याला आधी कळते त्याला मरणे किंवा स्वतःला तिच्या नजरेत बदनाम करणे हे दोनच पर्याय असतात.

२१.
हिन्दीतील हीरो कोणत्याही आर्थिक स्तरावर असेल तरी त्याच्या देशा-परदेशातील गाड्या लक्झरी ब्रॅण्डच्याच असतात. त्या नेहमी थांबताना स्क्रीनवर तो लोगो मोठ्ठा दिसेल अशाच थांबतात. इतर देशांतील कडक ट्रॅफिक नियम- लेन पाळणे, सीट बेल्ट लावणे- केवळ या लोकांसाठी शिथील केलेले असतात.

तोच हीरो हॉलीवूडचा असेल तर त्याच्या कारचा ब्रॅण्ड हे एक 'स्टेटमेंट' असते तो हीरो कसा आहे त्याचे. Show him driving a Camry, a Taurus or an F150 and move on? चान्सच नाही. तो कारमधे बसल्यावर रेडिओवर जे गाणे लागते ते ही रॅण्डम नसते, त्याच्या खास आवडीचेच असते आणि त्या गाण्याचा संदर्भ पुढे कथेत येतोच येतो.

२२.
वन वे रस्त्यावरून उलट्या दिशेने गाडी घातली की स्टिअरिंग एकदा थोडेसे इकडे व एकदा तिकडे फिरवत रस्त्याच्या मधून चालवत सर्व येणार्‍या गाड्या चुकवत जाता येते.

२३.
क्लोज मॅच. हीरो बॅटिंग करतोय. शेवटच्या बॉलवर सहा हवे आहेत. अशा वेळेस दुसर्‍या टीमचा कॅप्टन सगळे फिल्डर्स इतके "आत" लावतो की बाउन्ड्रीच्या जवळ उडालेला कॅच घ्यायला त्यांना मागे मागे पळत जावे लागते.

२४. अॅडव्हेंचर चित्रपटात कोणीही पाण्यात पडून वाहून जाऊ लागले किंवा होडीत्/तराफ्यात बसून जाऊ लागले की लगेच धबधबा समोर येतो.

२५. जरा फॅशनेबल असलेली हीरॉईन जेव्हा हीरोच्या घरी पहिल्यांदा जाते तेव्हा भावी सासूबरोबर किचनमधे तिला नेहमी ऑम्लेटच बनवावे लागते व तिला ते येत नसते, एवढेच नव्हे तर "अंडी सुरक्षितरीत्या कशी हाताळावीत" याचेही तिला सामान्यज्ञान नसते.

२६. हीरोच्या जगण्यामरण्याचे नियम. जुन्या माबोवर होते पण आता ते सापडत नाहीत म्हणून येथे "समग्र सूची" करण्याकरिता पुन्हा, व सुधारित आवृत्ती:

बॅकग्राउंडः हीरोला गोळी लागली आहे किंवा तो पाण्यात पडला किंवा "इन जनरल" गायब झाला आहे.
1 दंडात गोळी: नक्की वाचतो, एवढेच नाही तर त्यावर काही इलाजही करावा लागत नाही. फक्त एक रूमाल बांधून जणू मुंगी चावली आहे इतक्या सहजतेने फक्त तेथे हात धरून तो उरलेले संवाद म्हणतो.
2 डोक्यात किंवा छातीत गोळी: हिरॉईन जिवंत आहे का यावर ते ठरते.
2a हिरॉईन आधी मेलेली: मग हा ही मरतो. एरव्ही चिवट असला तरी शेवटी अगदी कोठेतरी "आ बैल" करून मरतो.
2b हिरॉईन अजून जिवंत्: मग बहुधा वाचतो आणि शेवटच्या शॉट मधे हॉस्पिटल मधे बँडेज च्या भेंडोळ्यात रोमँटिक संवाद म्हणतो.
2c तसेच याला मारून इतर कोणी कोणाबरोबर लग्न करावे हा प्रश्न सुटणार आहे: नक्कीच मरतो, डायरेक्ट गोळीने मेला नाही तर ज्याच्या लग्नाचा प्रश्न सुटणार आहे त्याला व्हिलन गोळी घालत असताना "नहीSSSS" म्हणून मधे कडमडतो.

3 सुरूवातीचे रोमँटिक गाणे झाल्यानंतर पुढे नदीत पडणे किंवा अपघात होणे पण पुढे काय झाले ते न दाखवणे: नक्कीच वाचतो आणि नंतर परत येतो
3a यात चित्रपट emotional, "this movie is about relationships" वगैरे असेल तर तो नदीत पडला किंवा अपघात झाला म्हणजे मेलाच असे गृहीत धरून नायिका दुसरे लग्न करते, आणि ते जरा सेटल होत आहेत म्हणेपर्यंत हा तेथे कडमडतो. तिच्या पार्टीत एक ग्लास हातात धरून तिच्या बेवफाईबद्दल तो वाचल्याचा आपल्याला पश्चात्ताप होईल एवढी एक बोअर गझल गातो, ते गाणे कशाबद्द्ल आहे हे उपस्थितांपैकी इतरांना तर सोडाच पण दुसर्‍या नवर्‍यालाही कळत नाही. मग दोन्हीपैकी कोणते लग्न जास्त पुढच्या स्टेज ला गेलेले आहे त्यावर हा की तो मरतो ते ठरते.

4 कोठेही गोळी, पण अजून व्हिलन जिवंत आहे, थोडा बदला बाकी आहे आणि तो घेणारे अजून कोणी शिल्लक नाही: नक्कीच वाचतो आणि बरा व्हायच्या आधीच सलाईनसकट हॉस्पिटल मधून धावत सुटतो आणि व्हिलन ला "त्यापेक्षा हा ठीक असताना याच्याशी मारामारी परवडली" असे वाटावे इतका बडवतो.

5a चित्रपटाच्या शेवटी मेला: पर्मनंट मरतो.
5b चित्रपटाच्या मधेच मेला अशी शंका: नक्कीच नंतर उगवतो.
5c चित्रपटाच्या मधेच मेला आणि जाळलेला किंवा पुरलेला दाखवला: नक्कीच डबल रोल असतो.
5d चित्रपटाच्या क्लायमॅक्स मधे काहीतरी चांगले काम करताना मेला: उर्वरित लोक शेवटच्या शॉट्ला त्याच्या पुतळ्याला वंदन वगैरे करतात.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रपटातले हिरो हिरॉईन नेहमीच कोण्त्या तरी खानदानाला बिलोंग करत असतात. आणि आपण म्हणजे अगदीच बेइज्ज्जत लोक्स हॅ!

पुश्तैनी हवेली, करोडोंकी जायदाद, इतना बडा कारोबार, अकेली वारिस.. हे तर हवंच.

हमे कहीका नही छोडा, जीतेजी मार दिया, खानदान की इज्जम मिट्टीमे मिलादी... मांबाप का सर शरम से झुका दिया, किसिसे आँख मिलाने के काबिल न छोडा, मुंह काला कर दिया.. इ. हिरो आणि हिरॉईनने करण्याची कामे. उरला वेळ तर पुढिल पोटभरीसाठी काही कामे.

हिरोने हिरॉईन ला द्यायची वचने - मै तुम्हारी कसम खा के केहता हू, ऑंख उठाकर किसि और लडकी की तरफ नही देखूंगा किम्वा जिस दिन कुछ बनजाऊ उसि दिन तुम्हारे घर की देहलिज पर कदम रखूंगा और तुम्हारे बाप से तुम्हारा हात मागूंगा...

हिरॉईन टू हिरो - ये तुमने क्या कर दिया? मुझे कही का नही छोडा... दूर हो जाओ मेरी नजरोंसे...
मैणे उसी दिन तुम्हे अपना पती मान लिया था.. वगैरे

सुहागरात ह्या विषयावर न लिहिणं अशक्य आहे:

५२: ह्यातला USP म्हणजे फुलांनी सजवलेला पलंग. एव्हढी मेहनत घेऊन हा पलंग सजवणारा/री डोंगरात लेणी खोदणार्‍या कारागिरासारखे 'नाही चिरा नाही पणती' अज्ञात रहातात. मला बिचार्‍या त्या फुलांची दया येते. विशेषतः हिरो प्रकु, राकु, मकु असे कुमार असतील तर जास्तच. त्याहून जास्त दया हिरविणीची येते. असा प्रसंग वैर्‍यावरही येऊ नये.

५३: नंतरची आवश्यक गोष्ट म्हणजे फुल टू भरलेला दुधाचा ग्लास. आता एव्हढा ग्लासभर दूध रिचवून दात घासले नाहीत तर ते किडणार नाहीत का? पण हिरोच्या दातांची काळजी कोणालाच नसते.

५४: हिरवीणीच्या मैत्रिणी खिदळत तिला खोलीपर्यंत आणतात आणि विहिरीत ढकलल्यासारखं आत ढकलतात. ह्याला 'बेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना' असं म्ह्णत असावेत. ह्या सर्व मैत्रिणी अविवाहित असतात. म्हणून खिदळत असतात. एका तरी पिक्चरमध्ये हिरो पलंगावर बसलाय आणि हिरोईन मागून सावकाश येतेय असं दृश्य पहायला मिळावं अशी माझी तहे-दिलसे ख्वाहीश आहे. नाही म्हणायला 'रुक जा रात ठहर जा रे चंदा' ह्या गाण्यात मीनाकुमारीला तिची सुहागरात (का!) आठवते तेव्हा तिच्या मैत्रिणी तिला खोलीत आणतात आणि तिथे राकु आधीच असतो असं दाखवलंय. तो तिचे डोळे का बंद करतो ते मात्र अजूनही न सुटलेलं कोडं आहे.

५५: तो पलंग बर्‍याचदा एव्हढा छोटा असतो की दोघं त्याच्यावर कसे मावणार ही काळजी आपल्याला लागते. ते निवांत असतात.

५६: ह्यानंतर घुंगट बाजूला करायचा कार्यक्रम यथासांग पार पडतो. पंखा नसलेल्या त्या खोलीत फुलांनी झाकलेल्या पलंगावर नखशिखांत दागिने घालून घुंगट घेऊन बसलेल्या हिरविणीच्या तोंडावर घामाचा टिपूस नसतो. आणि आपण एका सेकंदासाठी पंख्याखालून बाजूला झालो की घामाच्या धारा लागतात.

५७. मग काहीकाही पिक्चरमध्ये हिरो तिचे दागिने उतरवतो (पहा:कभी कभी). तेही इतक्या सावकाशपणे की काही न घडताच रात्र संपेल की काय असं आपल्याला वाटून जातं.

५८: 'लगता है चांद जमीनपे उतर आया है' किंवा 'ये सपना है या सच' असले निरर्थक संवाद म्हणून हिरो साखरपेरणी करतो. ह्याला 'ताकाला जाऊन भांडं लपवणं' म्हणतात. 'ये सपना है या सच' म्हटल्यावर हिरविणीने त्याच्या कानाखाली एक सणसणीत आवाज काढावा अशीही माझी तह-ए-दिलसे ख्वाहिश आहे.

५९: हिरो हिरविणीच्या फार जवळ आला की कॅमेरा आज्ञाधारकपणे फुलांवर विसावतो. "सुज्ञांस सांगणे न लगे" हा मंत्र सिनेमावाले फार कसोशीने जपतात. मग लगेच दुसर्‍या दिवशी सकाळी हिरविण लवकर उठून केस-बिस धुवून तुळशीला पाणी घालताना किंवा देवासमोर भजन म्हणताना दिसते. हिरो मात्र सावकाशपणे उठून काहीतरी मोठी कामगिरी केल्याच्या आवेशात एकेक जिना उतरून खाली येतो. किंवा हिरविण चहाचा कप घेऊन 'अब उठिये ना, नीचे सब इंतजार कर रहे है' असं काहीतरी म्हणते (इथेही केस धुतलेले असतात!). खाली काय मंडळी साग्रसंगीत वृत्तांत ऐकायला गोळा झालेली असतात का काय देव जाणे. हिरो पुन्हा जवळ यायला लागला की 'कोई आ जायेगा' आहेच. बये, मग दरवाज्याला कडी घाल की. हात कोकणात गेलेत का?

स्वप्ना Lol

आगाऊ, फाजिल (ज जेवणातला) नसून 'फाझिल' (झ झंझावातातला) आहे ते. म्हणजे ग्रेट. Happy

आता लग्नावर गाडी आलीच आहे तर - पाचपाच दिवस चालणारी लग्नं तीन तासांत बसवणं जगात फक्त बडजात्यांनाच शक्य आहे. कॉलेजमधे मिनीस्कर्ट्स वगैरे घालून फिरणारी हिरॉइन लग्न ठरलं रे ठरलं की एकदम 'घरेलू' होते आणि किमान चूडीदार घालायला लागते. हीरो मेला की साड्याच नेसते.
आधी स्पॉइल्ड ब्रॅट दाखवली असेल तर तिला हीरो(च) वठणीवर आणतो आणि मग तिच्याशी लग्न करतो. त्या वठणीवर आणण्यात तिने पार्टीत स्ट्रॅपलेस ड्रेस घालणं आणि हीरोने त्याचे दुष्परिणाम भोगता भोगता तिला वाचवल्यावर दोन्ही खांद्यांवरून हाताशी असली तर ओढणी वगैरे गुंडाळून, नसली तर स्वतःचं जॅकेट घालून ते उघडे खांदे झाकणं हा मोठा ईव्हेन्ट.
मुंबईत ३५ डिग्री सेन्टीग्रेडमधे जॅकेट्स घालून हिंडण्यामागे कधीतरी हिरॉइनचे खांदे झाकता यावेत इतकाच उद्देश असतो.

>>बडजात्यांनाच शक्य आहे. कॉलेजमधे मिनीस्कर्ट्स वगैरे घालून फिरणारी हिरॉइन लग्न ठरलं रे ठरलं की एकदम 'घरेलू' होते आणि किमान चूडीदार घालायला लागते. हीरो मेला की साड्याच नेसते.

+१

६०. हिरो-हिरविण ट्रेनने जात असताना स्टेशनात गाडी थांबली म्हणून हिरो काही आणायला उतरला की गाडी चालू होते आणि दोघांची ताटातूट होते.

६१. पिक्चरच्या शेवटी हिरो किंवा हिरविण ट्रेनने सोडून जाणार असले आणि ट्रेन जाताना दाखवली की पासिंजर त्या ट्रेनने कधीच जात नाही. ट्रेन धडधडत पुढे निघून जाते तेव्हा (रिकामी!) बॅग हातात घेऊन फलाटावर उभा असतो. ह्यांना बॅगा उचलायला कधी हमाल लागत नाहीत आणि हे कायमचे शहर सोडून चाललेले असले तरी ह्यांचे सगळे कपडे एकाच बॅगेत मावतात (पिक्चरभर उंडारताना वापरलेले कपडे धोब्याने हरवलेले असतात का?)

६२. कोणालाही आत्महत्या करायची असेल तर गाडीसमोरून दुरून धावत येतात. हे मला एस्कलेटर चढून जाण्याइतकं मूर्खपणाचं वाटतं. एका बाजूला शांतपणे गाडी येण्याची वाट पहात थांबावं आणि ती आली की तिच्यासमोर उडी मारावी हे शहाणपण त्यांना नसतं.

६३. कोणीही विष घेतलं की त्या बाटलीवर मोठ्या अक्षरात 'जहर' असं लिहिलेलं असतं. बाकी कंपनीचं नाव, एक्सपायरी डेट वगैरे बाबी नसतात. बहुतेक ते खाऊन कोणी मेलं नाही तर त्यांचे नातेवाईक बडवायला येतील म्हणून कंपनीने घेतलेली काळजी असते.

६४. बायका नेहमी ओढणी किंवा साडीनेच गळफास लावून घेतात. बेडशीट किंवा पांघरूण वापरलं तर जीव जायची हमी नसते. ह्यांच्या वजनाने कधी पंखे तुटत नाहीत किंवा खुर्च्या मोडत नाहीत. पुरुषांना दोरीला लटकण्यावाचून पर्याय नसतो कारण त्यांचा पायजमा ते गेल्यावर त्यांच्या बायकांना बोहारणीला द्यायला उपयोगी पडणार असतो.

६५. कोणी सुरा स्वत:च्या पोटात खुपसून घेतला की हिरो किंवा हिरविण तो त्यांच्या पोटातून बाहेर काढायच्या मागे लागतात. तो आत राहिला तर आत्म्याला मुक्ती मिळत नसावी.

>> ह्यांना बॅगा उचलायला कधी हमाल लागत नाहीत
पण हीरोच कूली असला तर मात्र त्याचे कस्टमर्स सगळ्या आळीच्या बॅगा त्याच्या डोक्यावर देऊन प्रवास करतात. हीरोने कुठल्याही बाईचं सामान उचलायला मदत केलेली दाखवली तर तिच्या एकटीच्या सामानालाही तोच नियम.

>> ६५. कोणी सुरा स्वत:च्या पोटात खुपसून घेतला की हिरो किंवा हिरविण तो त्यांच्या पोटातून बाहेर काढायच्या मागे लागतात. तो आत राहिला तर आत्म्याला मुक्ती मिळत नसावी.
हो. याचा अर्थ ते हिंदी सिनेमे, क्राइम पेट्रोल इ. बघत नाहीत. 'उंगलियोंके निशान'चं महत्त्व त्यांना कोणीतरी वन्स अ‍ॅन्ड फॉर ऑल समजावून सांगणं आवश्यक आहे.

६६. हीरोचा बाप मेला की त्याचा बिझनेस एक प्रेमळ भासणारा चाचा आणि त्याचा काबिल भासणारा मुलगा सांभाळतात. सह्या मात्र भाभीजींच्याच लागतात. उडाणटप्पू हीरोबद्दल हा प्रे.भा. चाचा नेहमी 'जाने दीजिये भाभीजी, ये उसके खाने-खेलने के दिन हैं' इ. डायलॉग्ज टाकतो.
इन्टर्व्हलपर्यंत प्रेमळ आणि काबिलने वाट्टेल तिथे भाभीजीके दस्तखत घेऊन जायदादमधे केलेले घपले उघड होतात. मग हीरो जबाबदार होतो आणि प्रेमळ आणि काबिल दारूचे ग्लास, तोकड्या कपड्यांतल्या बायका इ. शृंगारासह नीट व्हिलनसारखं वागायला मोकळे होतात. तेव्हाच काबिलवर हिरॉइनबरोबर अतिप्रसंग करायचीही एक जबाबदारी येऊन पडते.

६६ अ. बाप जिवंत असला तर तो वन फाइन डे हीरोला 'आता माझा स्वित्झर्लंड / ऑस्ट्रेलिया / सेशेल्स आयलन्ड्स इ. इथला बिझनेस आता तू सांभाळ' असं म्हणतो. असा हा कुठला बिझनेस आहे याचा आपल्यालाच काय त्यांनाही पत्ता नसतो.

६७. एकूणच हिंदी सिनेमांतले बाप (आधीच मेलेलेच नसले तर) अगदी सहज मरतात. आया मात्र चिवट. बर्‍याचदा हीरो मुलगाच यांच्या मांडीवर प्राणत्याग करतो. यांना मरायचं झालं तरी त्याआधीचा काही काळ घमेली वाहत, पायमशिनीवर कपडे शिवत, आठदहा लिटरच्या अ‍ॅल्युमिनियमच्या पातेल्यांत अर्धी वाटी भाजी परतत, फाटक्या पदराने कपाळ टिपत घालवावा लागतो. मरतानाही कोणाचा तरी हात नसत्याच कोणाच्या हातात किंवा आपलं बाळ वगैरे कोणाच्यातरी ओटीत देऊन 'इसका खयाल रखना बेटा' म्हणणं, 'मेरी मौत का बदला लेना' म्हणून मुलाला कसम घालणं वगैरे नाट्यमय प्रकार करून ष्टोरी हालती ठेवतात.

स्वप्ना, एन्ट्रॅपमेंट मधला ( झिटा जोन्स - शाँ कॉनरी ) ट्रेनच्या ताटातूटीचा सीन जरा वेगळा आहे. तसा कधी हिंदी सिनेमात बघितल्याचे आठवत नाही.

हे हे आगाऊ....:) फाजिल दोस्तवरून आठवलं..पाचवीमध्ये पहिल्यांदा हिंदी होत आम्हाला....मैत्रिणीने पहिल्या चाचणीची प्रश्नपत्रिका घरी दाखवल्यावर तिचे वडील म्हणाले, "असलं काय हिंदी शिकवतात तुमच्या शाळेत....फालतू (पालतू) जानवरोंके नाम लिखो?"
स्वप्ना.... भारी लिहिता तुम्ही.... मागच्या देशवारीमधे वेड लागायची वेळ आली होती सीरियलसमुळे. संध्याकाळी कर्फ्यू असल्यासारखी परिस्थिती घरात. त्यात भरीस भर म्हणून सा.बा. कानडी सीरियलपण पाहतात....तिथे ही हेच प्रकार.

जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी सगळ्यांच्या फोनचा एकच रिंगटोन.... उंच उंच माझा झोका....

नं. ४७ ...... फक्त न्यायालयातच नव्हे तर चित्रपटात सगळिकडे द्विरुक्ती असते....आणि आपल्याला ती अंगवळणी पडलेली
असते. थोडेसे इंग्रजी चित्रपट पाहिल्यावर आम्हाला काहीवर्षांपूर्वी एकदम जाणवलं होत हे.... ' कर दिखाया हमारे लडकोंने.... अवर बॉइज हॅव डन इट'....असं पदोपदी असतं.....
एवढच काय गाण्यांमधेही कड्व्याची प्रत्येक ओळ दोनदा गायलेली असते....आता पूर्वी ग्रेट लोक संगीत देत असत आणि ग्रेट लोक गातही असत, त्यामुळे एकच ओळ दुसर्यांदा गाताना त्यात काहीतरी सांगितिक सौंदर्य असे.....
आता काही अपवाद वगळता आनंदीआनंद आहे....
त्यामुळे कडव्याची ओळ एकदाच म्हटली आणि द्विरुक्ती अंडर कंट्रोल ठेवली तर आपलेही चित्रपट दोन नाही तरी अडीच तासात नक्कीच संपतील असा आमचा कयास आहे. तरी मा.बो.वरील उभरत्या कलाकारांनी (असतील तर) आमच्या या 'कंस्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम' ची नोंद घ्यावी अशी आमची नम्र विनंती आहे.

पण काही म्हणा, हल्ली थेट फॉर्म्यूला वाले चित्रपट येतच नाहीत.

लॉस्ट अँड फाऊंड (मेला, अमर अकबर.. )
जुडवा ( राम और शाम, सिता और गीता, चालबाज )
प्रेमत्रिकोण ( संगम, सिलसिला ..)
नवरा बायकोतला विसंवाद ( गृहप्रवेश, दूरीयाँ )
बॉय मीट्स गर्ल ( दिलवाले... )
स्मगलर ( जुगनू, दिल का हिरा )
औरत का इंतकाम ( खून भरी माँग.. )
मुस्लीम सोशल ( दीदारे यार )
प्राणीमित्र ( हाथी मेरे साथी, गाय और गौरी )

मिस करतोय Happy

स्वप्ना Lol

>>>हिंदी सिनेमातला अजून एक मह्त्वाचा नियम म्हंजे गाण्यात असं होईल का? असं झालं तर तसं करशील का? अशा शंका काढल्या की लगेच तस्सेच घोळ होणार हे नक्की. उदा. 'गर तुम भूला न दोगे, सपने ये सच ही होंगे' असं गाणं म्हणताहेत याचाच अर्थ धा मिंटात कोण तर फाफलणार हे निश्चि>>>करेक्ट निरीक्षण Happy

त्यामुळे कडव्याची ओळ एकदाच म्हटली आणि द्विरुक्ती अंडर कंट्रोल ठेवली तर आपलेही चित्रपट दोन नाही तरी अडीच तासात नक्कीच संपतील असा आमचा कयास आहे. >>> याज्ञसेनी, मोहब्बते मधे तर अमिताभ त्रिरूक्ती करतो. काहीतरी "परिवर्तन मुझे अमुक अमुक नही है","बदलाव मुझे पसंद नही है","आय हेट चेंज". त्यामुळेच पिक्चर मोठा झाला असावा Happy

६८. हिंदी सिनेमात कोणीतरी गचकणार ह्याचा आडाखाही आधी बांधता येतो. एक वर म्हटल्याप्रमाणे गाणं. बाकीचे.....

१. कुठेही वारा नसताना देवासमोरच्या समई/निरांजनाची ज्योत फडफडणे आणि विझणे. लगेच 'हे भगवान, ये तो बहोत बडा अपशगुन है'
२. हिरविणीच्या हातातून सिंदुरची डबी पडणे. ही कधीही रिकामी नसते. नेहमी काठोकाठ भरलेली असते.
३. हिरविणीचा चुडा फुटणे.
४. एखादं कुटुंब अति आनंदी दाखवणे. आई वडिलांत कुठल्याही लग्न झालेल्या जोडप्यात आढळणार नाही एव्हढं प्रेम. मुलं अतिसद्गुणी. छोटं पण सुखी घर. वगैरे वगैरे. म्हणजे लवकरच वडिल वरची वाट धरणार. आईच्या नशिबी मोलमजुरी. मुलांची ताटातूट किंवा वाईट मार्गाला लागणे.

६९. चित्रपटात गाणं कधीही, कुठेही सुरु होऊ शकतं. त्याला काळ, वेळ, ठिकाण ह्याचं बंधन नाही. तरी....

१. गाणं गावात घडत असेल तर तळं, नदीकाठी पाणी भरणार्‍या बायका, शेळ्यामेंढ्यांचा कळप, तो राखणारे गुराखी, डोंगर, दर्‍या, गावातली मुलं, जंगल, झाडाला बांधलेले झुले ह्यातलं काहीही गाण्यात येऊ शकतं.
२. गाण्याची सुरुवात वाळवंटात झाली तरी पुढल्याच कडव्यात बर्फाच्छादित डोंगर असू शकतात.
३. गाण्याचे शब्द आणि ते जिथं म्ह्टलं जातंय ते ठिकाण ह्याचा संबंध शक्यतो नसावा. उदा. ये पर्बतोंके दायरे ह्या गाण्यात पर्बत दूर कुठेतरी सुरुवातीला दिसतात आणि मग गायब होतात. कृपया हे गाणं शोधून पाहू नका कारण कुमुद छुगानी आणि विश्वजीत अशी जोडी आहे. पाहिल्यास निद्रानाशाचा उद्भव संभवतो.
४. गाण्यात बर्फाच्छादित डोंगर असतील तर हिरॉईन स्लिव्हलेस असली पाहिजे.
५. हिरो वयस्कर असेल तर म्हातारा गळा लपवायला मफलर हवा.
६. हिरविण गावकी गोरी असेल तर गाण्यात घागर हवीच
७. हिरोचा शर्ट आणि पॅन्ट मॅचिंग असता कामा नयेत. शर्ट शक्यतो पिवळा, लाल आणि हिरवा अश्या रंगाचा असला तर प्रेक्षक पेंगत नाहीत. पॅन्ट त्याच रंगाची किंवा स्वस्तात मिळाली तर खाकीही चालते.
८. हिरो-हिरविण गात बागडत असताना व्हिलन त्यांच्या डोळ्यांसमोर असेल तरी त्यांना दिसत नाही.
९. हिरविणीच्या अंगावरचे दागिने स्पेसमधून दिसतील एव्हढे चमकतात.
१०. गाण्यात धर्मेन्द्र असेल तर १-२ स्टेप्समध्ये नाच संपतो. जितेन्द्र असेल तर हिरॉईनला खेचणे आणि उड्या मारणे हे प्रमुख भाग. मनोजकुमार संपूर्ण गाणंभर आपला चेहेरा कॅमरापासून लपवायचा प्रय्त्न करतो. भाभु, प्रकु, राकु हे आपण गाण्यात आहोत हेच हिरविण, दिग्दर्शक आणि प्रेक्षकांवर अनंत उपकार आहेत अश्या समजुतीमुळे फार काही करत नाहीत. जॉय मुकर्जी डझनभर रसगुल्ले खाल्ल्यासारखा चेहेरा ठेवून असतो. आणि शम्मी असेल तर मानवी चेहेरा किती वेडावाकडा करता येऊ शकतो ते दाखवतो.

७०. पिक्चर ग्रामीण असेल तर त्यात एक मास्टरजी (हे बहुतेक जुल्मके खिलाफ आवाज उठवल्यामुळे मध्यंतराआधीच गचकतात), एक जमीनदार (हिरविणीवर वाईट नजर ठेवायची जबाबदारी ह्याची), एक सेठजी (गरीबांना जास्त दराने कर्ज देऊन त्यांना त्रास देत असतो), मुनिम (सेठजी/जमीनदाराचा चमचा), एक खानचाचा (पापभीरू आणि सर्वधर्मसमभावावर दृढ विश्वास) ही पात्रं स्टॅन्डर्ड आहेत.

स्वप्ना,
तवायफ या संस्थेबद्दल लिहायचे राहिले.. एकतर त्या चांगल्या तरी असतात ( नायकाला बहकू देत नाहीत, भावंडाच्या शिक्षणासाठी या पेशात येतात... ) किंवा वाईट्ट असतात ( नायिकेच्या दादल्याला बहकवतात आणि
तिच्या सोन्यासारख्या संसारात बिब्बा घालतात.... )

आजवरचे मला सगळ्यात ग्रेट वाटलेले डायल्लॉक..

१) मेरा ना कभी सुहाग था, ना होगा ( आशा सचदेव - दी बर्निंग ट्रेन )
२) हजारोंमे नही, लाखोंमे एक बस गयी तो समझूंगी औरत होने का फर्ज अदा किया / निभा लिया ( दिना पाठक - मौसम )

विकांताला पहाण्यात आलेल्या 'जिद्दी' पिक्चरमुळे अजून एक नियम सापडला. आधीच येउन गेला असल्यास माहीत नाही.

नियम - पिक्चरमधे एखादा खून झालेला आहे. हिरोची बहीण, किंवा मैत्रीण, किंवा कोणत्यातरी तत्सम पात्राला खुनी कोण ते अचानक समजते. समोर फोन ही आहे. अशा वेळी - फोन उचलला, फिरवला, हिरो फोन वर आला, आणी त्याला 'अमुक चा खून तमुक नी केलाय' असं एका वाक्यात सांगितलं - अशा प्रकारे अर्ध्या मिनीटामधे होउ शकणारी शिंपल गोष्ट पिक्चरमधे कधीही घडत नाही.

उदाहरणार्थः
'गुड्डी' नामक हिरोच्या बहीणीला खुनी कोण ते समजले आहे. प्रसंग असा घडतो:

गुड्डी समोरच असलेल्या फोन कडे वेडगळपणे उगाचच काही क्षण बघत रहाते. मागे वीजा कडाडत असतातच. खुनी तिचा नवराच असून कधीही घरी येउ शकतो. अशा परिस्थितीत, दार उघडेच ठेवून गुड्डी फोन करते. अधून मधून घाबरत दाराकडे बघत रहाते नवरा/खुनी आला का ते. पण दार लावत नाही.

संवादः
हिरो: हॅलो, हॅलो, हॅलो
गुड्डी: हॅलो
हिरो: हॅलो
गुड्डी: हॅलो .... भय्या...... भय्या मै गुड्डी बोल रही हु
हिरो: बोल गुड्डी
गुड्डी: भय्या .... भय्या, तुम सुन रहे हो ना?
हिरो: हा सुनाई दे रहा है गुड्डी, बोल
गुड्डी: भय्या......, भय्या मुझे पता चल गया है
हिरो: क्या पता चल गया है गुड्डी?
गुड्डी: भय्या मुझे पता चल गया .... (रडायला लागते)
(मधेच लाइट जातात.)
गुड्डी: हाय राम!
हिरो: गुड्डी
गुड्डी: हा..... हा
हिरो: गुड्डी बोल!
गुड्डी: भय्या...... भय्या तुम सुन रहे हो ना??? (इथे चुकून दोनदा कॉपी-पेस्ट झाले नाहीये, जसा घडला तसाच प्रसंग लिहीतोय)
हिरो: हा सुनाई दे रहा है गुड्डी, बोल बोल
गुड्डी: भय्या...... भय्या मुझे पता चल गया है की आकाश भैया को किसने मारा.
हिरो: किसने?
गुड्डी: भय्या.... (इथे खुनी येउन फोन ची वायर तोडतो!)

नवरापण घरात पाउल ठेवल्याठेवल्या पहीलं काम काय करेल तर फोन ची वायर तोडणे! घरात शिरताना समोर बायको कोणाशीतरी फोन वर बोलतीय म्हणजेच मी केलेला खून तिला समजलाय अन ती ते हिरोला सांगतीय यापेक्षा दुसरी कोणती शक्यता कशी असेल?

* हा प्रसंग अतीशयोक्ती वाटल्यास किंवा डायलॉग उगाच वाढवून लिहीलेत असे वाटल्यास प्रतेक्ष पाहून खात्री करा.

Pages