चित्रपट विषयक नियम (व पोटनियम) - भाग दुसरा

Submitted by फारएण्ड on 31 October, 2011 - 09:59

काही चित्रपटविषयक नियम - भाग १ लिहायच्या वेळेस आम्हाला खरे म्हणजे आणखी नियम जाणवतील/सुचतील असे वाटले नव्हते (जरी आम्ही आणखी लिहू असे आश्वासन लेखाच्या शेवटी दिले असले तरी). नाहीतर मॉन्स्टर मूव्हीज च्या पहिल्या भागाच्या शेवटी ती मोठी मगर, डायनोसोर, अजगर वगैरे मारल्यावर जगातले सर्व मॉन्स्टर्स संपले असे गृहीत धरून सगळे लोक काहीतरी स्मार्ट डॉयलॉग्ज मारून तेथून निघून गेल्यावर मग तेथे पुन्हा एखादे अंडे फुटताना किंवा काहीतरी वळवळताना दिसते, तसे आम्ही पहिल्या नियमांच्या शेवटी काहीतरी सिम्बॉलिक ठेवले असते. निदान एखादी हलती स्माईली. पण असो.

हे वाचायच्या आधी पहिला भाग जरूर वाचा. प्रतिक्रियांमधे हे क्रमा़ंक तेरा पासून का चालू केले असे विचारलेत तर आपण पहिला भाग वाचला नाही हे चाणाक्ष लेखक नक्की ओळखतील.

तर हा घ्या नियमांचा नवीन ष्टॉकः

१३: पाच मिनीटांचा नियम.
खालील गोष्टीतील एक गोष्ट/थीम जर सिनेमात असेल तर दुसरी पाच मिनीटांत येतेच येते:

१३.१> कॉलेज तरूणांवरची कथा: (सुरू झाल्यावर ५ मिनीटांत) "इस साल के डान्स कंपिटिशन मे...." हा संवाद. शक्यतो आत फुल व वरती चौकटीचा हाफ शर्ट घातलेल्या व जन्मापासून "अच्छे दोस्त"च असलेल्या तरूणाला.
१३.२> हीरो ने कोणालातरी बहीण मानलेय किंवा त्याला एक बहीण आहे हे आपल्याला कळलेय - ते - रक्षाबंधन येण्याचा काळ
१३.३> हीरो किंवा साईडहीरो हा मुस्लिम आहे हे कळल्यावर - ते - तो नमाज अदा करतानाचा शॉट
१३.४> हीरो एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे हे कळते - ते - "आज बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग आहे" हा संवाद
१३.५> किंवा तो सेल्स मधे आहे हे कळल्यावर - तो एक डावीकडून उजवीकडे वर जाणार ग्राफ असलेला सेल्स प्रेझेंटेशन चा शॉट

१४.
काही विशिष्ट गोष्टी करणारे लोक त्या करताना दारे व्यवस्थित बंद करून करत नाहीत. पण पूर्ण उघडीही ठेवत नाहीत. किंचित किलकिले असते. त्याच दिवशी काहीतरी पराक्रम करून आलेला हीरो किंवा हीरॉइन दार उघडायचा प्रयत्न करते तर ते उघडेच असते. मग तो आत गेल्यावर अस्पष्ट आवाज येतात. पुढे जे होते त्यातून चित्रपटाची कथा तयार होते.
तसेच हे लोक खिडकीत असतील तर त्यांच्या सावल्या खिडकीतील काचेवर काय चालले आहे याची अचूक कल्पना बाहेरून येइल अशाच पडतात. खिडकी उघडी असेल तर बाहेरून कोठूनही क्लिअर दिसेल अशा ठिकाणीच हे चाललेले असते.

१५:
हीरॉईन किंवा कोणीही मुलगी झोपलेली आहे. अशा स्थितीत तेथे जागा असलेला तरूण जर अच्छा दोस्त असेल तर तो आपले पवित्र हेतू दर्शवण्याकरिता भर मुंबईत भर उन्हाळ्यात सुद्धा तिच्या अंगावर पांघरूण घालून तेथून जातो.

१६. नॅरो एस्केप रूल:
डायनोसॉर, मॉन्स्टर्स, भुते, पाण्याच्या लाटा, आगीचे लोळ यापासून पळणारे जर "मेन कलाकार" असतील तर ते नेहमी एक दोन इंचांच्या किंवा सेकंदांच्या फरकाने वाचतात. त्यापेक्षा जास्त किंवा कमी नाही. बंद खोल्यांची, लिफ्टची, दारे/शटर्स बंद होता होता त्यातून निसटतात. पूर असेल तर "पानी सरके उपर" होता होता एखादी व्हाल्व उघडते. आगीचे लोळ भुयारातून वर जाण्याआधी एक सेकंद हे लोक तेथून खाली पडतात व त्यांच्या सोयीसाठी खाली पाणीही असते.
तसेच हे सहकलाकार असतील तर ते आपण घाबरून किंवा फाजील आत्मविश्वासाने हसून ज्या दिशेला बघत आहोत त्याच्यापेक्षा वेगळ्या दिशेने हल्ला होउ शकतो याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ असतात.

१७.
हीरो व हीरॉईन दोघेही पळालेले असतील व ते एरव्ही सुद्धा क्वचित घरी जेवणारे असतील तरीही ते पळून येउन लपलेल्या जागी मात्र त्यांना एकदम लाकडे तोडून आणून दगडांची चूल करून त्यावर स्वयंपाक करावा लागतो. त्यासाठी तवा वगैरे भांडीही अचानक उपलब्ध होतात. जवळच्या गावात सामान आणायला जाता येते पण एखाद्या हॉटेलातून थेट काहीतरी खायला आणायचा पर्याय नसतो.

१८.
घरातून असे पळालेले लोक एखाद्या पानाच्या टपरीवर, चहाच्या हॉटेल मधे किंवा दुकानात काहीतरी आणायला जातात. तेव्हा तेथे पेपर उघडून बसलेल्या एखाद्या माणसाच्या अगदी समोरच्या पानावर अर्ध्या पानाच्या साईजएवढा त्या पळालेल्या व्यक्तीचा फोटो हेडलाईन सकट आलेला असतो. पान सुद्धा पलटावे लागत नाही.

१९. खालील नावे असलेले लोक कधीही वाईट नसतातः
१. मास्टरजी
२. खान चाचा
३. मिसेस ब्रिगॅन्झा

२०.
जेव्हा दोन हीरोंचे एकाच हीरॉईन वर प्रेम असते ते तिघेही एकमेकांना ओळखत असले तरी तिचे नाव किंवा जरा क्लू लावता येइल अशी इतर काहीही माहिती एकमेकांना देत नाहीत. चित्रपटात असंख्य एकत्र शॉट्स असले तरी तेव्हा "अरे हीच ती" असेही सांगत नाहीत. पूर्ण चित्रपटात तिच्याशिवाय दुसरी कोणीही मुलगी नसली तरी दोघांनाही तीच ती असेल याचीही शंका येत नाही. मग पूर्ण चित्रपटभर सगळा गोंधळ झाल्यावर कधीतरी ते उघडकीस येते. मग ते जबरी दोस्त असल्याने ज्याला आधी कळते त्याला मरणे किंवा स्वतःला तिच्या नजरेत बदनाम करणे हे दोनच पर्याय असतात.

२१.
हिन्दीतील हीरो कोणत्याही आर्थिक स्तरावर असेल तरी त्याच्या देशा-परदेशातील गाड्या लक्झरी ब्रॅण्डच्याच असतात. त्या नेहमी थांबताना स्क्रीनवर तो लोगो मोठ्ठा दिसेल अशाच थांबतात. इतर देशांतील कडक ट्रॅफिक नियम- लेन पाळणे, सीट बेल्ट लावणे- केवळ या लोकांसाठी शिथील केलेले असतात.

तोच हीरो हॉलीवूडचा असेल तर त्याच्या कारचा ब्रॅण्ड हे एक 'स्टेटमेंट' असते तो हीरो कसा आहे त्याचे. Show him driving a Camry, a Taurus or an F150 and move on? चान्सच नाही. तो कारमधे बसल्यावर रेडिओवर जे गाणे लागते ते ही रॅण्डम नसते, त्याच्या खास आवडीचेच असते आणि त्या गाण्याचा संदर्भ पुढे कथेत येतोच येतो.

२२.
वन वे रस्त्यावरून उलट्या दिशेने गाडी घातली की स्टिअरिंग एकदा थोडेसे इकडे व एकदा तिकडे फिरवत रस्त्याच्या मधून चालवत सर्व येणार्‍या गाड्या चुकवत जाता येते.

२३.
क्लोज मॅच. हीरो बॅटिंग करतोय. शेवटच्या बॉलवर सहा हवे आहेत. अशा वेळेस दुसर्‍या टीमचा कॅप्टन सगळे फिल्डर्स इतके "आत" लावतो की बाउन्ड्रीच्या जवळ उडालेला कॅच घ्यायला त्यांना मागे मागे पळत जावे लागते.

२४. अॅडव्हेंचर चित्रपटात कोणीही पाण्यात पडून वाहून जाऊ लागले किंवा होडीत्/तराफ्यात बसून जाऊ लागले की लगेच धबधबा समोर येतो.

२५. जरा फॅशनेबल असलेली हीरॉईन जेव्हा हीरोच्या घरी पहिल्यांदा जाते तेव्हा भावी सासूबरोबर किचनमधे तिला नेहमी ऑम्लेटच बनवावे लागते व तिला ते येत नसते, एवढेच नव्हे तर "अंडी सुरक्षितरीत्या कशी हाताळावीत" याचेही तिला सामान्यज्ञान नसते.

२६. हीरोच्या जगण्यामरण्याचे नियम. जुन्या माबोवर होते पण आता ते सापडत नाहीत म्हणून येथे "समग्र सूची" करण्याकरिता पुन्हा, व सुधारित आवृत्ती:

बॅकग्राउंडः हीरोला गोळी लागली आहे किंवा तो पाण्यात पडला किंवा "इन जनरल" गायब झाला आहे.
1 दंडात गोळी: नक्की वाचतो, एवढेच नाही तर त्यावर काही इलाजही करावा लागत नाही. फक्त एक रूमाल बांधून जणू मुंगी चावली आहे इतक्या सहजतेने फक्त तेथे हात धरून तो उरलेले संवाद म्हणतो.
2 डोक्यात किंवा छातीत गोळी: हिरॉईन जिवंत आहे का यावर ते ठरते.
2a हिरॉईन आधी मेलेली: मग हा ही मरतो. एरव्ही चिवट असला तरी शेवटी अगदी कोठेतरी "आ बैल" करून मरतो.
2b हिरॉईन अजून जिवंत्: मग बहुधा वाचतो आणि शेवटच्या शॉट मधे हॉस्पिटल मधे बँडेज च्या भेंडोळ्यात रोमँटिक संवाद म्हणतो.
2c तसेच याला मारून इतर कोणी कोणाबरोबर लग्न करावे हा प्रश्न सुटणार आहे: नक्कीच मरतो, डायरेक्ट गोळीने मेला नाही तर ज्याच्या लग्नाचा प्रश्न सुटणार आहे त्याला व्हिलन गोळी घालत असताना "नहीSSSS" म्हणून मधे कडमडतो.

3 सुरूवातीचे रोमँटिक गाणे झाल्यानंतर पुढे नदीत पडणे किंवा अपघात होणे पण पुढे काय झाले ते न दाखवणे: नक्कीच वाचतो आणि नंतर परत येतो
3a यात चित्रपट emotional, "this movie is about relationships" वगैरे असेल तर तो नदीत पडला किंवा अपघात झाला म्हणजे मेलाच असे गृहीत धरून नायिका दुसरे लग्न करते, आणि ते जरा सेटल होत आहेत म्हणेपर्यंत हा तेथे कडमडतो. तिच्या पार्टीत एक ग्लास हातात धरून तिच्या बेवफाईबद्दल तो वाचल्याचा आपल्याला पश्चात्ताप होईल एवढी एक बोअर गझल गातो, ते गाणे कशाबद्द्ल आहे हे उपस्थितांपैकी इतरांना तर सोडाच पण दुसर्‍या नवर्‍यालाही कळत नाही. मग दोन्हीपैकी कोणते लग्न जास्त पुढच्या स्टेज ला गेलेले आहे त्यावर हा की तो मरतो ते ठरते.

4 कोठेही गोळी, पण अजून व्हिलन जिवंत आहे, थोडा बदला बाकी आहे आणि तो घेणारे अजून कोणी शिल्लक नाही: नक्कीच वाचतो आणि बरा व्हायच्या आधीच सलाईनसकट हॉस्पिटल मधून धावत सुटतो आणि व्हिलन ला "त्यापेक्षा हा ठीक असताना याच्याशी मारामारी परवडली" असे वाटावे इतका बडवतो.

5a चित्रपटाच्या शेवटी मेला: पर्मनंट मरतो.
5b चित्रपटाच्या मधेच मेला अशी शंका: नक्कीच नंतर उगवतो.
5c चित्रपटाच्या मधेच मेला आणि जाळलेला किंवा पुरलेला दाखवला: नक्कीच डबल रोल असतो.
5d चित्रपटाच्या क्लायमॅक्स मधे काहीतरी चांगले काम करताना मेला: उर्वरित लोक शेवटच्या शॉट्ला त्याच्या पुतळ्याला वंदन वगैरे करतात.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे चार आणे.

* कोणत्याही चित्रपटात वीज चमकली की हिरॉईनने घाबरून हिरोला मिठी मारलीच पाहिजे.
* डान्स काँपिटिशन्/परिक्षा यात हिरोला 'अच्छे नंबर्स' मिळालेच पाहिजेत.
* मैदानातल्या दृश्यात हिरो/हिरॉईन २-४ पावलं पळून आली की लग्गेच पाण्याची बॉटल तोंडाला लावतात. शिवाय ड्रेस ही एकदम स्टायलिश.. म्हणजे डोक्याला बँड, ट्रॅक सुट वगैरे आणि आत स्लीवलेस टिशर्ट असं घालून कोण व्यायाम करतं? Uhoh
* हिरॉईनची आई नेहमी 'तुमने सुबहसे कुछ खाया नही लो ये थोडा ज्यूस पिलो असंच का म्हणते? Uhoh येलो थोडी उकड खालो, थोडा वरण भात खाओ. कल की भाकरी उरी है उसके साथ थोडी चटणी और तेल खाओ असं का म्हणत नाही? Uhoh
* सिनेमात सर्वांनी प्रॉपर्टीसाठीच भांडले पाहिजे.
* आया भयणी पळवल्या की त्यांना रिकामी बॅरलं आणि खोकी असलेल्या ठिकाणीच बांधून घालावे लागते.
* कोणत्याही दिशेला, कसेही आपटले तरि डोक्याच्या उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूलाच जखम.. एखादा दात बित पडला तर चालत नाही? Uhoh

>>हिरॉईनची आई नेहमी 'तुमने सुबहसे कुछ खाया नही लो ये थोडा ज्यूस पिलो असंच का म्हणते? अ ओ, आता काय करायचं येलो थोडी उकड खालो, थोडा वरण भात खाओ. कल की भाकरी उरी है उसके साथ थोडी चटणी और तेल खाओ असं का म्हणत नाही?

Proud

कोणत्याही चित्रपटात वीज चमकली की हिरॉईनने घाबरून हिरोला मिठी मारलीच पाहिजे.
>>> Lol आणि दक्षे, या प्रमेयाचा व्यत्यासही खरा आहे.

* जेव्हा हिरो-हिरॉईनला मिठी मारण्याची संधी असते तेव्हाच विजा चमकतात. म्हणजे ते जेव्हा नातेवाईकांच्या गोतावळ्यात असतात, मित्रमैत्रिणींच्या गराड्यात असतात किंवा शाळाकॉलेजमध्ये पाटया टाकत असतात तेव्हा कधीही विजा चमकत नाहीत. पण हिरो-हिरॉईन + एकांत = विजा.

१६. हिरोच्या फॅमिलीत एकापेक्षा जास्त मुलं असतील तर ती कधीकाळी हरवली तर आईबापांना त्यांना शोधणं सोपं जावं म्हणून त्यांनी कुटुंबाचं एक अ‍ॅन्थेम बनवून ठेवलेलं असतं. ते गायलं की हरवलेले लोक परत मिळतात. किंबहुना हिरोची फॅमिली असं गाणं गाताना दाखवली की त्यांची ताटातूट होणार हे समजावं. २ मुलं असतील तर एक श्रीमंताकडे आणि एक गरीबाकडे जाणार, पुढे एकमेकांच्या खूनके प्यासे होणार आणि शेवटच्या रीळापर्यंत आपल्यला पकवणार हे समजून पुढला चित्रपट स्किप करून आपल्या आयुष्याची वर्ष वाढवावीत. (उदा, यादोंकी बारात निकली है, जिंदगी हर कदम एक नई जंग है)

१७. हिरो किंवा हिरविणीच्या गाडीचा अ‍ॅक्सिडेन्ट झाला किंवा करवला गेला आणि तो किंवा ती डोक्याला पांढरी पट्टी लावून हॉस्पिटलात दिसले रे दिसले की त्याने किंवा तिने तोंड उघडायच्या आत 'मै कहा हू' असं ओरडून आजूबाजूच्या प्रेक्षकांना कॉमिक रिलिफ द्यायचं काम केल्यास आपल्या खाती खूप पुण्य जमा होतं हे ध्यानात असू देत.

१८. कितीही मोठा अ‍ॅक्सिडेन्ट झाला अस्ला आणि शरीराचा कुठलाही अवयव निकामी झाला असला तरी पट्टी ही नेहमी डोक्यावरच बांधली असली पाहिजे आणि त्यावर तीट लावल्या सारखा रक्ताचा एकच ठिपका हवा.

१९. शेवटच्या मारामारीत हिरोला लागल्यास तो हिरविणीच्या भांगावर हात धरून तिची मांग भरणार हे नक्की. हे किती अनहायजिनिक आहे हे आपल्याला माहित असतं, त्याला पर्वा नसते. हिरविणीला खूप लागलं असलं तर मांग भरो सजना चा कार्यक्रम पार पडल्यावर ती हिरोच्या मांडीवर डोकं ठेवून सुखाने सुहागन मरते. हिरो मग हाराकिरी केल्यासारखा व्हिलनला यमसदनाला पाठवून आपण तिथे जाणारी पुढली गाडी पकडतो.

२०. पूर्ण पिक्चरमध्ये कोणीही मेलं असलं आणि तिथे इन्स्पेक्टर आला की तो आपली टोपी का काढतो हे मला कळलेलं नाही. त्याने काढली काय किंवा नाही काढली काय, मुडद्याला काहीही फरक पडणार नसतो. हे काम इप्तेकार आणि जगदीश राजने इतक्या वेळा केलंय की ही भूमिका करताना 'नको ती टोपी' असं त्यांना होत असेल.

२१. 'अब इन्हे दवा की नही, दुवाकी जरुरत है' हे वाक्य डॉक्टरांना hippocratic oath बरोबर शिकवतात का?

२२. ही दुआ मांगता यावी म्हणून हॉस्पिटलच्या एका कोपर्‍यात संतोषी मा (शेरावाली) किंवा आपला गणपती बाप्पा ह्यांना जागा रेन्टवर दिलेली असते. भगवान शंकरांचा उपयोग आधी म्हटल्याप्रमाणे अतृप्त आत्म्यांच्या नाशासाठी त्रिशूळ उसना द्यायला असतो त्यामुळे ते सहसा हॉस्पिटलात दिसत नाहीत. हिरो किंवा हिरविणीचे नातेवाईक तिथे जाऊन आरडाओरडा करतात. ह्याला 'जिन्दगीकी भीक मांगना' असं का म्हणतात ते त्याम्नाच ठाऊक. बहुतेक आई, बहिण अश्या बायाच इथे येतात. बाप, भाऊ वगैरे मंडळींना जन्मात काही बोलायचा चान्स मिळालेला नसल्याने हया अचानक मिळालेल्या संधीचं सोनं करता येणार नाही ह्या भीतीने त्यांना पाठवलं जात नाही. बहुतेक करून ह्या प्रार्थनेची सुरुवात 'भगवान, मैने आज तक तुमसे कुछ नही मांगा' अश्या संतापजनक प्रस्तावनेने होते.

२३. हिरविण हिरोला आपण प्रेग्नंट असल्याचं सांगते तेव्हा तो 'सच?' असं का विचारतो हे मला आजतागायत न सुटलेलं कोडं आहे. ती काय टाईमपास म्हणून सांगते का असं? आणि त्यात आश्चर्य वाटण्याचं काय कारण आहे? 'कर्मण्येवाधिकारस्ते...' ह्या गीतावचनाच्या पालनाचा हा उत्तम नमुना आहे.

आणि त्यात आश्चर्य वाटण्याचं काय कारण आहे? 'कर्मण्येवाधिकारस्ते...' ह्या गीतावचनाच्या पालनाचा हा उत्तम नमुना आहे.<<<< Lol टू गूड!!!

* हिरो किंवा हिरॉईन नेहमी मोठ्याच पदावर काम करत अस्ते. मामुली कारकुंडा वगैरे का नाही दाखवत?

* मिटींग मध्ये नेहमी अत्यंत फालतू सजेशन देऊन भाव खाऊन जातात. त्यांच्या बॉस लोकांना इतकी साधी गोष्ट कळत नाही यावरून त्यांनी इतकी वर्ष (चित्रपटात) बिझनेस केला की हजामत हा प्रश्न जरूर पडतो.

* एक घिसापिटा डायलॉग, 'वो अमूक अमूक इंडस्ट्री की फाईल मेरे ऑफिस भिजवा दो.
आता येवडं या फायलीत असतं तरी काय? आमी धा वर्ष काम करतोय, एक बी फाईल बाळगली न्हाई कदी.

इच्छाधारी नाग हा हिंदी पिक्चरांचा फेव्हरेट विषय. ह्याचे काही नियमः

२४. इच्छाधारी नाग हे डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, वकिल वगैरे नसतात. नेहमी जंगलातच सापडतात.
२५. ते नागातून मानवीरुपात येताना त्यांच्या अंगावर अचानक कपडे येतात आणि परत नागरुपात जाताना ते अचानक गायब होतात.
२६. हे इच्छाधारी नाग नागाप्रमाणे बेडूक वगैरे खातात का माणसाप्रमाणे चपाती, भात खातात ह्याचा उल्लेख कुठल्याही पिक्चरात नाही.
२७. इच्छाधारी नाग किंवा नागीण जोडपं म्हणूनच जन्माला येत असावेत. मी त्यांना नेहमी जोडीनेच पाहिलं आहे. एकेकटे जन्माला येत असल्यास लव्ह मॅरेज होतं का अ‍ॅरेन्जड कळायला मार्ग नाही. त्यांना आई, बाप, भाऊ, बहिण, आत्या, मामा, काका, मावश्या, मित्र, मैत्रिणी कोणीही नसतं. फक्त राजाराणीचा संसार असतो.
२८. ह्या नागांनी आणखी काही केलं नाही तरी चालेल पण पुंगीची धून असलेल्या गाण्यावर नागाच्या स्टेप्स असलेला डान्स केल्याशिवाय त्यांना 'इच्छाधारी नाग' ह्या जातीचा दाखला मिळत नसेल.
२९. दोघांपैकी एकाला दुष्ट शिकार्‍यांनी मारलंच पाहिजे. तेव्हा जोडीतला दुसरा मौजूद नसतो. म्हणून आपल्याला उरलेला पिक्चर पहावा लागतो.
३०. शिकार्‍यांचे फोटो मृत नागाच्या डोळ्यात असतात. त्यावरून त्याच्या जोडीदाराला कोणाचा बदला घ्यायचा ते कळतं. आता हे फोटो जीपीएस कोऑर्डिनेटस असल्यासारखे ते नाग त्यांना कसे शोधतात ह्यावर गुगलने सर्च मारायला हरकत नाही. नागांना मोतीबिंदू वगैरे सारखे रोग नसतात. त्यामुळे फोटो व्यवस्थित दिसतात, आऊट ऑफ फोकस नसतात, त्यांना फ्लॅश लागत नाही आणि शिकारी कुठेही असला तरी हे फोटो क्लोजअपच असतात.

म्हणजे डोक्याला बँड, ट्रॅक सुट वगैरे आणि आत स्लीवलेस टिशर्ट असं घालून कोण व्यायाम करतं? -

मी एकदा Endurance जिम मध्ये एका पोरीला Tube Top घालून व्यायाम करताना ह्याच डोळ्यांनी बघितलं आहे. अगदी rowing , bench press करत होती ती. त्याचा हेतू मुळी व्यायाम करण्याचा नसतोच

मृणाल खरं की काय? Uhoh
मला एक नमुना जिम मध्ये दिसला होता. ट्रेडमिल असो, एलिप्टिकल असो, आरश्याच्या जवळचं पकडून ऑल द टाईम चश्मा, केस हेच निरखणार. व्यायामाच्या नावानं बोंब.

>>हिरो किंवा हिरॉईन नेहमी मोठ्याच पदावर काम करत अस्ते. मामुली कारकुंडा वगैरे का नाही दाखवत

तर काय? करोडोंका बिझनेस असतो. मोस्टली इम्पोर्ट-एक्स्पोर्ट चा. आणि आपण मार्केटमध्ये भाजी आणायला जातो तसं विदेशात जातात. व्हिसा वगैरे मर्त्य मानवांना लागणार्‍या गोष्टी ह्यांना लागत नाहीत.

अजून एक पार्टीत दिल तुटलेल्या हिरोला गाणं म्हण म्हणलं की तो फक्त हिरॉईनच्या बेवफाईचं किर्तन गातो. आणि पार्टितल्या कुणालाच (हिरो आणि हिरॉईन सोडून) कळत नाही तो असलं टुटा फुटा दिल गाणं का गातोय ते. अशी उद्व्हस्त मोहोब्बत की दास्तॉ सगळ्यांसमोर का बोलून दाखवतात हिरो लोकं? Uhoh
(आठवा - यहा मैं अजनबी हू, किंवा पत्थर के सनम तुझे हमने)

आता थोडं भूतपटांबद्दल:

३१. ह्यात बाकी काही असो वा नसो, एक पुरानी हवेली असायलाच लागते. ती दिवसाढवळया कधी दाखवत नाहीत. नेहमी रात्रीचा लॉन्ग शॉट दाखवतात. कुठेही आग न लागताही तिथे आसपास धूर येत असतो. आणि बॅकग्राउन्डला अगम्य प्राण्यांच्या ओरडण्याचा आवाज.

३२. इथले दरवाजे नेहमी कर्र असा आवाज करतच उघडतात. हॉलमध्ये मध्यभागी एक झुंबर, भिंतीवर मेलेल्या प्राण्यांची मुंडकी (एक वाघाचं, एक अस्वलाचं आणि एक काळवीटाचं इज अ मस्ट) आणि पूर्वजांच्या तसबिरी असतात. २४ तास वीज नसल्याने लाईट कधीही येतात पण भुताची एन्ट्री झाली की हमखास जातात.

३३. लाईट गेले की सहज मिळाव्या अश्या रीतीने मेणबत्त्या ठेवलेल्या असतात. आम्हाला लाईट गेले की २-३ ठिकाणी ठेचकाळल्या शिवाय मेणबत्ती काही मिळत नाही. मग ही मेणबत्ती घेऊन एकमेकांना बघून घाबरायचा कॉमिक सीन असतो. पुढे हसयला मिळेल न मिळेल म्हणून प्रेक्षकांनी हसून घ्यावं ही अपेक्षाही असते.

३४. पिक्चरात गूढ दिसणारा जुना नोकर असल्याशिवाय सेन्सॉर बोर्ड हॉरर चित्रपट म्हणून मान्यता देत नाही.

३५. हिरो किंवा हिरवीणची ही पुश्तैनी हवेली असते. त्याचे किंवा तिचे वडिल शाल पांघरून शहरात सुरक्षित बसलेले असतात. हवेली पाडून तिथे मोठं हॉटेल उभारावं असा विचार त्यांच्या मनात कधीही येत नाही. हिरो-हिरवीण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत इथे येतात. ह्या ४-५ लोकांमध्ये आधी कोण गचकणार ह्यावर छान बेटिंग होऊ शकतं. ह्यातलाच कोणीतरी त्या भूताला उचकवतो.

३६. हया मित्रांपैकी एक कोणातरी गावच्या गोरीच्या प्रेमात पडतो. ती भूताकडून मारली गेली नाही तर त्यांचं लग्न होतं.

३७. आत्मे नेहमी बायांचेच असतात. एखादा पुरुष प्रेमभंग झाला म्हणून त्याचं भूत झालेलं मी तरी पाहिलेलं नाही. ह्या भुतांचे केस नेहमी लांब असतात. तोकडे केस असलेलं भूत असेल तर त्याचा वचक वाटत नसावा. आसपास कुठेही वारा नसताना ह्यांचे केस उडत असतात. साडी पांढरीच असावी असा संकेत आहे. भूताला विकट हसता यायला हवं. साबणाच्या फुग्यापेक्षाही पारदर्शक असायला हवं आणि बंद दरवाज्यातून/भिंतीतून तरंगत आत जायला येता हवं. देवाची मूर्ती, अंगारा, ताईत ह्या गोष्टींपासून ह्यांना धोका संभवतो.

३८. ओम ह्या चिन्हाला भूतपटात खास महत्त्व आहे. बॉलीवूडमध्ये क्रॉस दाखवला की भूत पळतं. इथे ओम दाखवला की तात्पुरती का होईना सुटका होते.

३९. भूताचा नाश झाला की मंडळी आपापल्या घरी जातात. एव्हढे लोक मेलेत त्यांच्या नातेवाईकांना किंवा पोलिसांना काय सांगतात हे आपल्याला कधीच सांगत नाहीत.

४०. पोलिस स्टेशनमध्ये खून वगैरे झाल्याचा फोन आला की पिक्चर आणि सिरियलीमध्ये फोन घेणारा इन्स्पेक्टर 'क्या?' असं ओरडतो. आता पोलिस स्टेशनमध्ये असेच फोन येणार ना? बारश्याच्या किंवा लग्नाच्या आमंत्रणाचे तर येणार नाहीत. मग लगेच कोणाला तरी गाडी काढायला सांगून धावत निघतात. आणि एव्हढं करून सगळं झाल्यावरच मुक्कामी पोचतात.

४१.'कानून के हाथ बडे लंबे होते है' आणि 'कानून को अपने हाथमे मत लो' एव्हढं बोलण्यापुरताच त्यांचा आणि कानूनचा संबंध असतो. आणखी एक फेव्हरेट वाक्य 'पुलिस ने चारो तरफसे तुम्हे घेर लिया है. अपने आपको पुलिस के हवाले कर दो'.

४२. ह्यांच्या पिस्तूलातून किती गोळ्या निघू शकतात ह्यावर संशोधन होणं ही काळाची गरज आहे. गोळी बाहेर पडताच फटाका फुटल्यावर होतो त्यापेक्षा जास्त धूर होतो. त्याचा फायदा घेऊन गुन्हेगार पळेल की काय अशी भीती ह्यांना वाटली नाही तरी आपल्याला वाटते.

४३. एक पोलिस अधिकारी करप्ट असेल तर एक कर्तव्यनिष्ठ असलाच पाहिजे. कर्तव्यनिष्ठ बहुतेक करुन मुस्लिम असतो आणि पिक्चरचा शेवट व्हायच्या आधीच अल्लाला प्यारा होतो.कधीकधी हिरोचा मोठा भाऊ कर्तव्यनिष्ठ पोलिस अधिकारी असतो. तो गुन्हेगारांकडून मारला जातो. मग भाभीमावर - जिने हिरोला लहानाचं मोठं केलेलं असतं (हिरो आणि त्याच्या भावात एव्हढं अंतर का हे आपण विचारू नये. पाळणा लांबला ह्यात त्या दोघांचाही दोष नसतो!) - त्याला सन्मार्गाला लावण्याची आणि पिक्चरच्या शेवटी त्याचं लग्न लावायची जबाबदारी येऊन पडते. ह्यात बिचारीला व्हिलनच्या अड्ड्याची ट्रीप पण फुकटात पदरात पडते. तिचं दुसरं लग्न लावून द्यावं असे आधुनिक विचार हिरोच्या मनात येत नाहीत. बहुतेक फुकटात आया हवी असेल.

हिरॉईनची आई नेहमी 'तुमने सुबहसे कुछ खाया नही लो ये थोडा ज्यूस पिलो असंच का म्हणते? येलो थोडी उकड खालो, थोडा वरण भात खाओ. कल की भाकरी उरी है उसके साथ थोडी चटणी और तेल खाओ असं का म्हणत नाही?>>>> Rofl

मिटींग मध्ये नेहमी अत्यंत फालतू सजेशन देऊन भाव खाऊन जातात. त्यांच्या बॉस लोकांना इतकी साधी गोष्ट कळत नाही यावरून त्यांनी इतकी वर्ष (चित्रपटात) बिझनेस केला की हजामत हा प्रश्न जरूर पडतो.
* एक घिसापिटा डायलॉग, 'वो अमूक अमूक इंडस्ट्री की फाईल मेरे ऑफिस भिजवा दो.
आता येवडं या फायलीत असतं तरी काय? आमी धा वर्ष काम करतोय, एक बी फाईल बाळगली न्हाई कदी. >>> Rofl दक्षिणा मस्त निरिक्षण...

हाराकिरी, कर्मण्येवाधिकारस्ते.... Rofl स्वप्ना __/\__

शिवाय "इन्स्पेक्टरसाहब गिरफ्तार कर लो इसे " असल्या आज्ञा भारतातल्या कुठल्या भागातले नागरिक पोलिसांना देऊ शकतात?

स्वप्ना Lol ३१ ते ३९ सगळे जबरी आहेत.

हॉरर पिक्चर्स मधे इंटरव्हल आधी मरणारे व नंतर मरणारे यांचे चार्जेस वेगळे घेत असतील. "यात माझा रोल खूप महत्त्वाचा आहे. कारण मी इंटरव्हल नंतर ते आवाज कोठून येत आहेत ते शोधायला जाते व मरते" अशा मुलाखतीही देत असतील.

यात एक डायरेक्ट भुताकडून मरणारे व इनडायरेक्ट (म्हणजे भुताकडून मेल्याने भूत झालेल्यांकडून) मरणारे अशीही विभागणी करता येइल.

>>यात एक डायरेक्ट भुताकडून मरणारे व इनडायरेक्ट (म्हणजे भुताकडून मेल्याने भूत झालेल्यांकडून) मरणारे अशीही विभागणी करता येइल

Happy

हिन्दी चित्रपटातली आणखी एक महत्त्वाची जागा म्हणजे कोर्टः

४४. न्यायदेवता, तिच्या हातातला तराजू आणि डोळ्यावरची पट्टी तसंच जजच्या मागच्या भिंतीवर लटकलेला गांधीजींचा फोटो ह्या गोष्टी ह्या सिन्सचा अविभाज्य भाग आहेत.

४५. ह्या सिन्समध्ये पुढील वाक्यं किमान एकदा तरी यायलाच हवीत -

१. ऑर्डर ऑर्डर
२. गीता पर हात रखकर कसम खाता हू के जो कुछ कहूगा सच कहूंगा सच की सिवा कुछ नही कहूंगा
३. युअर ऑनर ये मेरे मुअक्किल पर सरासर गलत इल्जाम लगा रहे है
४. मेरे अगले गवाह है...
५. इन्साफकी तौहिन
६. कानून अंधा है सुना था लेकिन बहरा भी है ये आज देख रहा हू
७. तमाम सबूत और गवाहोंके बयानात को मद्द-ए-नजर रखते हुए ये अदालत इस नतीजे पर पहुंची है की
८. बाइज्जत बरी किया जाता है

४६. ह्यापैकी 'गीता पर हात रखकर' हे वाक्य म्हणून व्हिलन मंडळी इतक्या वेळा खोटं बोलली आहेत की भगवान कृष्णाला गीता सांगितल्याचा पश्चात्ताप व्हावा.

४७. "सजाये मौत सुनाती है" ह्या वाक्यानंतर 'टू बी हॅन्ग्ड टिल डेथ' म्हणून इंग्लीश शेपूट जोडल्याखेरीज निकालाला वजन येत नसावं.

४८. 'बाइज्जत बरी' म्हणजे शाही इतमामाने पुरण्याचा समारंभ अशी माझी अनेक दिवस समजूत होती.

४९.'तमाम सबूत और गवाहोंके बयानात' म्ह्णायच्या आधी हिरो गुन्हेगार ठरेल असेच पुरावे सादर केले गेले असतील तर जज 'इस नतीजे पर पहुंची है की' पर्यंत पोचल्यावर कोणीतरी व्यक्ति 'ठहरिये जजसाहब' म्हणून धावत येणार हे नक्की समजा.

५०. ही व्यक्ति जखमी किंवा आजारी असेल तर आपली साक्ष देऊन मगच प्राण सोडते. ह्यानंतर भर कोर्टात रडारडीचा प्रोग्राम होतो.

५१.'बाइज्जत बरी' झाल्यावर हिरो वकिलाशी हस्तांदोलन करणे, समोर दिसेल त्याच्या पाया पडणे आणि हिरविणीकडे चोरून बघणे ही कामं एका दमात करतो. ह्यानंतर लगेच त्याच्या लग्नाची घोषणा होऊन 'समाप्त'चा बोर्ड झळकतो. बॅकग्राउन्डला हिरो हिरविणीचं ह्याच पिक्चरातलं एखादं गाणं लावतात. आणि 'They lived happily thereafter'

स्वप्ना...,, बाइज्जत बरी..... शाही इतमामाने पुरणे... जबरी.... Happy

स्वप्ना तु लिहीशीलीच म्हणा तुझ्या खास शैलीत.. पण हिंदी चित्रपटात दाखवलेली लग्ने.. हाही एक स्वतंत्र विषय होउ शकेल.. त्यातली रोषणाई, नाच गाणी बघुन मध्यमवर्गीय मराठी लग्ने प्रत्यक्ष बघताना मला उत्तर भारतिय व पंजाबी लोकांचे मोठे कौतुक वाटायचे.. लग्नात किंवा इंगेजमेंट सेरिमनीमधे हिरो व त्याचे सवंगडी व हिरोइन व तिच्या सख्या.. एकदम चतुर शब्दातली गाणी (ऊदा: मेहंदी लगा के रखना... तो व त्याचे सवंगडी... डोली सजा के रखना.. ती व तिच्या सख्या.) गाउ शकतात.. एवढेच नव्हे तर हिरो व त्याचे सवंगडी.. एकाच रंगाचे युनिफॉर्म कपडे घालुन व हिरॉइन व तिच्या सख्याही एकाच रंगाचे व युनिफॉर्म ड्रेस घालुन येतात... गाण्यासाठी.. व ते थोडे नाही म्हणुन त्यावर कहर म्हणजे ते सगळे.. हिरो- हिरॉइन सकट.. एकदम कॉम्प्लिकेटेड स्टेप्स असणार्‍या डान्समधेही एकदम निपुण असतात... किंबहुना असायलाच पाहीजेत असाही एक हिंदी चित्रपटातला अधिकृत नियम असतो... Happy

तळटिपः एका मराठी लग्नात हौशीने गुजराती लोकांचा दांडिया ठेवला होता ..(बहुतेक हिंदी मुव्हिजमधल्या लग्नातल्या नाचगाण्यांचे अनुकरण करण्यासाठी...) त्यात मी काही बायका गरबा खेळण्याची हौस भागवुन घेत असताना पाहील्या... त्यात दोन्ही विहीणबाईसुद्धा होत्या .. त्या दांडिया खेळत होत्या की झाशीच्या राणीसारख्या एकमेकांशी त्या दांड्यांनी दांडपट्टा चालवत होत्या हेच मला कळत नव्हते...

स्वप्ना व अमोल... तुमच्या शैलीत हिंदी चित्रपटातल्या लग्नाचे अजुन काही नियम येउ द्यात..:)

स्वप्ना Biggrin
त्या कोर्टात ते 'मेरे फाजिल दोस्त' हा काय प्रकार आहे कोण जाणे! सरळ्सरळ एकमेकाला फाजिल म्हणतात त्याअर्थी कायतरी चांगला अर्थ असावा.
हिंदी सिनेमातला अजून एक मह्त्वाचा नियम म्हंजे गाण्यात असं होईल का? असं झालं तर तसं करशील का? अशा शंका काढल्या की लगेच तस्सेच घोळ होणार हे नक्की. उदा. 'गर तुम भूला न दोगे, सपने ये सच ही होंगे' असं गाणं म्हणताहेत याचाच अर्थ धा मिंटात कोण तर फाफलणार हे निश्चित.

Pages