चित्रपट विषयक नियम (व पोटनियम) - भाग दुसरा

Submitted by फारएण्ड on 31 October, 2011 - 09:59

काही चित्रपटविषयक नियम - भाग १ लिहायच्या वेळेस आम्हाला खरे म्हणजे आणखी नियम जाणवतील/सुचतील असे वाटले नव्हते (जरी आम्ही आणखी लिहू असे आश्वासन लेखाच्या शेवटी दिले असले तरी). नाहीतर मॉन्स्टर मूव्हीज च्या पहिल्या भागाच्या शेवटी ती मोठी मगर, डायनोसोर, अजगर वगैरे मारल्यावर जगातले सर्व मॉन्स्टर्स संपले असे गृहीत धरून सगळे लोक काहीतरी स्मार्ट डॉयलॉग्ज मारून तेथून निघून गेल्यावर मग तेथे पुन्हा एखादे अंडे फुटताना किंवा काहीतरी वळवळताना दिसते, तसे आम्ही पहिल्या नियमांच्या शेवटी काहीतरी सिम्बॉलिक ठेवले असते. निदान एखादी हलती स्माईली. पण असो.

हे वाचायच्या आधी पहिला भाग जरूर वाचा. प्रतिक्रियांमधे हे क्रमा़ंक तेरा पासून का चालू केले असे विचारलेत तर आपण पहिला भाग वाचला नाही हे चाणाक्ष लेखक नक्की ओळखतील.

तर हा घ्या नियमांचा नवीन ष्टॉकः

१३: पाच मिनीटांचा नियम.
खालील गोष्टीतील एक गोष्ट/थीम जर सिनेमात असेल तर दुसरी पाच मिनीटांत येतेच येते:

१३.१> कॉलेज तरूणांवरची कथा: (सुरू झाल्यावर ५ मिनीटांत) "इस साल के डान्स कंपिटिशन मे...." हा संवाद. शक्यतो आत फुल व वरती चौकटीचा हाफ शर्ट घातलेल्या व जन्मापासून "अच्छे दोस्त"च असलेल्या तरूणाला.
१३.२> हीरो ने कोणालातरी बहीण मानलेय किंवा त्याला एक बहीण आहे हे आपल्याला कळलेय - ते - रक्षाबंधन येण्याचा काळ
१३.३> हीरो किंवा साईडहीरो हा मुस्लिम आहे हे कळल्यावर - ते - तो नमाज अदा करतानाचा शॉट
१३.४> हीरो एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे हे कळते - ते - "आज बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग आहे" हा संवाद
१३.५> किंवा तो सेल्स मधे आहे हे कळल्यावर - तो एक डावीकडून उजवीकडे वर जाणार ग्राफ असलेला सेल्स प्रेझेंटेशन चा शॉट

१४.
काही विशिष्ट गोष्टी करणारे लोक त्या करताना दारे व्यवस्थित बंद करून करत नाहीत. पण पूर्ण उघडीही ठेवत नाहीत. किंचित किलकिले असते. त्याच दिवशी काहीतरी पराक्रम करून आलेला हीरो किंवा हीरॉइन दार उघडायचा प्रयत्न करते तर ते उघडेच असते. मग तो आत गेल्यावर अस्पष्ट आवाज येतात. पुढे जे होते त्यातून चित्रपटाची कथा तयार होते.
तसेच हे लोक खिडकीत असतील तर त्यांच्या सावल्या खिडकीतील काचेवर काय चालले आहे याची अचूक कल्पना बाहेरून येइल अशाच पडतात. खिडकी उघडी असेल तर बाहेरून कोठूनही क्लिअर दिसेल अशा ठिकाणीच हे चाललेले असते.

१५:
हीरॉईन किंवा कोणीही मुलगी झोपलेली आहे. अशा स्थितीत तेथे जागा असलेला तरूण जर अच्छा दोस्त असेल तर तो आपले पवित्र हेतू दर्शवण्याकरिता भर मुंबईत भर उन्हाळ्यात सुद्धा तिच्या अंगावर पांघरूण घालून तेथून जातो.

१६. नॅरो एस्केप रूल:
डायनोसॉर, मॉन्स्टर्स, भुते, पाण्याच्या लाटा, आगीचे लोळ यापासून पळणारे जर "मेन कलाकार" असतील तर ते नेहमी एक दोन इंचांच्या किंवा सेकंदांच्या फरकाने वाचतात. त्यापेक्षा जास्त किंवा कमी नाही. बंद खोल्यांची, लिफ्टची, दारे/शटर्स बंद होता होता त्यातून निसटतात. पूर असेल तर "पानी सरके उपर" होता होता एखादी व्हाल्व उघडते. आगीचे लोळ भुयारातून वर जाण्याआधी एक सेकंद हे लोक तेथून खाली पडतात व त्यांच्या सोयीसाठी खाली पाणीही असते.
तसेच हे सहकलाकार असतील तर ते आपण घाबरून किंवा फाजील आत्मविश्वासाने हसून ज्या दिशेला बघत आहोत त्याच्यापेक्षा वेगळ्या दिशेने हल्ला होउ शकतो याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ असतात.

१७.
हीरो व हीरॉईन दोघेही पळालेले असतील व ते एरव्ही सुद्धा क्वचित घरी जेवणारे असतील तरीही ते पळून येउन लपलेल्या जागी मात्र त्यांना एकदम लाकडे तोडून आणून दगडांची चूल करून त्यावर स्वयंपाक करावा लागतो. त्यासाठी तवा वगैरे भांडीही अचानक उपलब्ध होतात. जवळच्या गावात सामान आणायला जाता येते पण एखाद्या हॉटेलातून थेट काहीतरी खायला आणायचा पर्याय नसतो.

१८.
घरातून असे पळालेले लोक एखाद्या पानाच्या टपरीवर, चहाच्या हॉटेल मधे किंवा दुकानात काहीतरी आणायला जातात. तेव्हा तेथे पेपर उघडून बसलेल्या एखाद्या माणसाच्या अगदी समोरच्या पानावर अर्ध्या पानाच्या साईजएवढा त्या पळालेल्या व्यक्तीचा फोटो हेडलाईन सकट आलेला असतो. पान सुद्धा पलटावे लागत नाही.

१९. खालील नावे असलेले लोक कधीही वाईट नसतातः
१. मास्टरजी
२. खान चाचा
३. मिसेस ब्रिगॅन्झा

२०.
जेव्हा दोन हीरोंचे एकाच हीरॉईन वर प्रेम असते ते तिघेही एकमेकांना ओळखत असले तरी तिचे नाव किंवा जरा क्लू लावता येइल अशी इतर काहीही माहिती एकमेकांना देत नाहीत. चित्रपटात असंख्य एकत्र शॉट्स असले तरी तेव्हा "अरे हीच ती" असेही सांगत नाहीत. पूर्ण चित्रपटात तिच्याशिवाय दुसरी कोणीही मुलगी नसली तरी दोघांनाही तीच ती असेल याचीही शंका येत नाही. मग पूर्ण चित्रपटभर सगळा गोंधळ झाल्यावर कधीतरी ते उघडकीस येते. मग ते जबरी दोस्त असल्याने ज्याला आधी कळते त्याला मरणे किंवा स्वतःला तिच्या नजरेत बदनाम करणे हे दोनच पर्याय असतात.

२१.
हिन्दीतील हीरो कोणत्याही आर्थिक स्तरावर असेल तरी त्याच्या देशा-परदेशातील गाड्या लक्झरी ब्रॅण्डच्याच असतात. त्या नेहमी थांबताना स्क्रीनवर तो लोगो मोठ्ठा दिसेल अशाच थांबतात. इतर देशांतील कडक ट्रॅफिक नियम- लेन पाळणे, सीट बेल्ट लावणे- केवळ या लोकांसाठी शिथील केलेले असतात.

तोच हीरो हॉलीवूडचा असेल तर त्याच्या कारचा ब्रॅण्ड हे एक 'स्टेटमेंट' असते तो हीरो कसा आहे त्याचे. Show him driving a Camry, a Taurus or an F150 and move on? चान्सच नाही. तो कारमधे बसल्यावर रेडिओवर जे गाणे लागते ते ही रॅण्डम नसते, त्याच्या खास आवडीचेच असते आणि त्या गाण्याचा संदर्भ पुढे कथेत येतोच येतो.

२२.
वन वे रस्त्यावरून उलट्या दिशेने गाडी घातली की स्टिअरिंग एकदा थोडेसे इकडे व एकदा तिकडे फिरवत रस्त्याच्या मधून चालवत सर्व येणार्‍या गाड्या चुकवत जाता येते.

२३.
क्लोज मॅच. हीरो बॅटिंग करतोय. शेवटच्या बॉलवर सहा हवे आहेत. अशा वेळेस दुसर्‍या टीमचा कॅप्टन सगळे फिल्डर्स इतके "आत" लावतो की बाउन्ड्रीच्या जवळ उडालेला कॅच घ्यायला त्यांना मागे मागे पळत जावे लागते.

२४. अॅडव्हेंचर चित्रपटात कोणीही पाण्यात पडून वाहून जाऊ लागले किंवा होडीत्/तराफ्यात बसून जाऊ लागले की लगेच धबधबा समोर येतो.

२५. जरा फॅशनेबल असलेली हीरॉईन जेव्हा हीरोच्या घरी पहिल्यांदा जाते तेव्हा भावी सासूबरोबर किचनमधे तिला नेहमी ऑम्लेटच बनवावे लागते व तिला ते येत नसते, एवढेच नव्हे तर "अंडी सुरक्षितरीत्या कशी हाताळावीत" याचेही तिला सामान्यज्ञान नसते.

२६. हीरोच्या जगण्यामरण्याचे नियम. जुन्या माबोवर होते पण आता ते सापडत नाहीत म्हणून येथे "समग्र सूची" करण्याकरिता पुन्हा, व सुधारित आवृत्ती:

बॅकग्राउंडः हीरोला गोळी लागली आहे किंवा तो पाण्यात पडला किंवा "इन जनरल" गायब झाला आहे.
1 दंडात गोळी: नक्की वाचतो, एवढेच नाही तर त्यावर काही इलाजही करावा लागत नाही. फक्त एक रूमाल बांधून जणू मुंगी चावली आहे इतक्या सहजतेने फक्त तेथे हात धरून तो उरलेले संवाद म्हणतो.
2 डोक्यात किंवा छातीत गोळी: हिरॉईन जिवंत आहे का यावर ते ठरते.
2a हिरॉईन आधी मेलेली: मग हा ही मरतो. एरव्ही चिवट असला तरी शेवटी अगदी कोठेतरी "आ बैल" करून मरतो.
2b हिरॉईन अजून जिवंत्: मग बहुधा वाचतो आणि शेवटच्या शॉट मधे हॉस्पिटल मधे बँडेज च्या भेंडोळ्यात रोमँटिक संवाद म्हणतो.
2c तसेच याला मारून इतर कोणी कोणाबरोबर लग्न करावे हा प्रश्न सुटणार आहे: नक्कीच मरतो, डायरेक्ट गोळीने मेला नाही तर ज्याच्या लग्नाचा प्रश्न सुटणार आहे त्याला व्हिलन गोळी घालत असताना "नहीSSSS" म्हणून मधे कडमडतो.

3 सुरूवातीचे रोमँटिक गाणे झाल्यानंतर पुढे नदीत पडणे किंवा अपघात होणे पण पुढे काय झाले ते न दाखवणे: नक्कीच वाचतो आणि नंतर परत येतो
3a यात चित्रपट emotional, "this movie is about relationships" वगैरे असेल तर तो नदीत पडला किंवा अपघात झाला म्हणजे मेलाच असे गृहीत धरून नायिका दुसरे लग्न करते, आणि ते जरा सेटल होत आहेत म्हणेपर्यंत हा तेथे कडमडतो. तिच्या पार्टीत एक ग्लास हातात धरून तिच्या बेवफाईबद्दल तो वाचल्याचा आपल्याला पश्चात्ताप होईल एवढी एक बोअर गझल गातो, ते गाणे कशाबद्द्ल आहे हे उपस्थितांपैकी इतरांना तर सोडाच पण दुसर्‍या नवर्‍यालाही कळत नाही. मग दोन्हीपैकी कोणते लग्न जास्त पुढच्या स्टेज ला गेलेले आहे त्यावर हा की तो मरतो ते ठरते.

4 कोठेही गोळी, पण अजून व्हिलन जिवंत आहे, थोडा बदला बाकी आहे आणि तो घेणारे अजून कोणी शिल्लक नाही: नक्कीच वाचतो आणि बरा व्हायच्या आधीच सलाईनसकट हॉस्पिटल मधून धावत सुटतो आणि व्हिलन ला "त्यापेक्षा हा ठीक असताना याच्याशी मारामारी परवडली" असे वाटावे इतका बडवतो.

5a चित्रपटाच्या शेवटी मेला: पर्मनंट मरतो.
5b चित्रपटाच्या मधेच मेला अशी शंका: नक्कीच नंतर उगवतो.
5c चित्रपटाच्या मधेच मेला आणि जाळलेला किंवा पुरलेला दाखवला: नक्कीच डबल रोल असतो.
5d चित्रपटाच्या क्लायमॅक्स मधे काहीतरी चांगले काम करताना मेला: उर्वरित लोक शेवटच्या शॉट्ला त्याच्या पुतळ्याला वंदन वगैरे करतात.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Rofl
अजुन एक,
चित्रपटाच्या क्लायमॅक्स मधे काहीतरी चांगले काम करताना हिरो मेला: उर्वरीत काम मुलगा/मुलगी/दोस्त पूर्ण करणारच.
क्रांतीचा शेवट आठवा. मनोज कुमारचा मुलगा त्याच्यासारखीच श्टाईल मारत व्हिलनला संपवून झेंडा फडकावतो.

सिलसिलाच्या शेवटी रेखाला ( अमिताभ विबासंवाली) >>>>>>> विबासंवाली म्हणजे काय?
>>>>> विहंग,
विबासं ही मायबोलीवरची कधीही न संपणारी स्वीट डिश आहे. तोच पदार्थ वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या प्लेटमध्ये मांडून ती अधूनमधून खिलवली जाते. Proud

अनुक्रमे पुढला आकडा) हा नियम फकस्त बॉलिवुड मधल्या तमाम हिरविणींना लागू:

चित्रपटातील हिरवीणीचे पात्र कुठच्याका टुकार ़ गावातील असेनाका पण ह्या
१. फॅशन, मेकप व हेअरस्टाईल मात्र लेटेस्टच करणार...
२. हातभर बांगड्या, चित्रविचित्र बिंद्या आणि उंच टाची वहाणा घालून गावातील इतर सामान्य मुली आणि स्वतःच्या
सख्ख्या आणि/किंवा# आते /काके / मामे /मावस बहिणींच्यात टोटली एलियन दिसणार.... अगदी स्टिक आउट
लाईक अ सोअर थम्ब.... कही वेळेस एलियन भाषा ही बोलणार.[ # म्हंजे and/or ]
(उदाहरणार्थ पहा : स्वदेस, परदेस, विवाह, मैने प्यार किया, हम आपके है कोन, हम साथ साथ है, बोल राधा बोल,
अगदी वेल डन अब्बा पण)
३. आणि हो ....एंंट्री ' उंच उं च माझा झोका...' सारखं काहितरी गात ( आपल्या आयुष्यातील बालकाण्ड संपून
युवा ( का यौवन ?) काण्ड सुरू असा साक्षात्कार झाल्या झाल्या ) गात ... अशीच होणार.

शेवटी अगदी कोठेतरी "आ बैल" करून मरतो.>> Biggrin
जबरी रे, दिवसाची मस्त सुरुवात झाली Biggrin
विबासं बद्दल मामीला अनुमोदन!!!

Wink

कथेशी आणि आपल्या रोलशी विसंगत दिसणार्या हिरॉईन्स मधे कदाचित करीना बाईंचा बराच वर नंबर लागेल....पण त्यांचा तसला यक पण शिणूमा आठवत न्हाई....

असो. ह्या विसंगती पाहून ' कागज के फूल' मधल्या वहिदा रेहमानला मेकप करून पार्टीला आल्याबद्दल खाड्कन झापणार्या गुरू दत्त ची आठवण होते.

अजून काही नियमः

१. हिरोचा बाप लवकर गचकलेला असतो. त्याची आई नोकरी करणारी नसते. कपडे शिवून ती त्याला लहानाचा मोठा करते. मग हिरोने चांगलं काम केलं तर 'आज अगर तुम्हारे बापू/पिताजी जिंदा होते' हा आणि तो वाईट मार्गला लागला असेल तर 'तुमने घरानेकी इज्जत मिट्टीमे मिला दी' हा ड्वायलॉग बापाच्या फोटोपुढे म्हणण्यात येतो. ह्या सोयीसाठीच त्याचा फोटो घराच्या हॉलमध्ये लावलेला असतो.

२. हिरोच्या आईला मूली/आलूचे पराठे आणि गाजरका हलवा ह्याव्यतिरिक्त काहीही बनवता येत नसल्याने खाणावळ चालवून उदरनिर्वाह करणं अशकय असतं.

३. हिरोने 'साली आधी घरवाली' ह्या म्हणीचं पालन करू नये म्हणून हिरविणीला बहिण नसते. ती बहुतेक एकुलती एक लेक असते. किंवा तिला भाऊ असलाच तर तो हिरोचा जानी दोस्त निघतो. हिरविणीचा बाप नामांकित वकिल, जज किंवा बिझनेसमन असतो. त्याचा बिझनेस काय हे आपल्याला शेवटपर्यंत कळत नाही. त्यांचा मोठा वाडा असतो, त्यात कृष्णाची/रामाची/राम-सीतेची मूर्ती असलेलं देवघर असतं, एक मोठी तिजोरी असते. तिचे वडिल चिरूट ओढत पुस्तकांनी भरलेल्या लायब्ररीत बसलेले असतात. आणि तिची आई अतिप्रेमळ असून 'अजि सुनते हो' म्हणून लेकीच्या लग्नाची भुणभूण नवर्‍यामागे लावत असते. घरात एक मुनीम आणि खांद्यावर फडकं घेतलेला नोकर असतोच असतो. घराला गच्ची असलीच तर तिचा उपयोग हिरोच्या विरहात विव्हळण्यासाठी होतो. हॉलमध्ये भिंतीवर पूर्वजांच्या फोटोशेजारी बंदूक असेल तर तिचे वडिल ती हिरोवर रोखणार हे समजावं.

४. हिरविणीला एक पुस्तक घेऊन कॉलेजात जाणे, मैत्रिणीसोबत सायकल किंवा गाडीतून फिरणे आणि हिरोचा फोटो घेऊन पलंगावर लोळत पडणे एव्हढेच उद्योग अस्तात. 'मेरा फ्युचर पक्का' हे तिला माहित असतं. पिक्चरच्या सुरुवातीला ती हिरोच्या गरीबीचा मजाक उडवते आणि मग पिक्चरभर सुतासारखी सरळ येते. आपल्याला मात्र पिच्कर संपला तरी हिचं आणि हिरोच्या माताजीचं कसं पटणार ही चिंता लागते.

तिचे वडिल चिरूट ओढत पुस्तकांनी भरलेल्या लायब्ररीत बसलेले असतात<<< इथे सर्व पुस्तकं लाल, निळ्या अथवा काळ्या कव्हर घातलेलीच असतात. सर्व पुस्तके ठराविक उंचीची आणि जाडीची असतात हे देखील एक वैशिष्ट्यच.

५. हिरोला बहिण असली तर फक्त ऐन मोक्याच्या वेळी व्हिलनने ओलिस धरण्यासाठीच तिला देवाने त्या घरात जन्माला घातलेलं असतं.

६. हिरोने खोटी दाढी-मिशी लावली की त्याचं वेषांतर पूर्ण झालं असं समजावं. मग व्हिलनच्या बापाची टाप नाही त्याला ओळखायची. व्हिलनला वेषांतर करायचं असेल तर चेहेर्‍यावर एक मोठा काळा मस लावला की झालं. व्हिलन लोकांना विचित्र विगखेरीज अन्य मेकअप करण्यास सक्त मनाई असते. फार तर ते हॅट घालू शकतात.

७. हॉरर पिक्चरमध्ये रात्री अपरात्री चित्रविचित्र आवाज आले की रामरक्षा किंवा गायत्री मंत्र म्हणत पांघरूण डोक्यावरून घेऊन झोपण्याऐवजी 'ये कैसी आवाज है' किंवा 'कौन हे वहा' असले निरर्थक संवाद म्हणत लोक बाहेर पडतात आणि मरतात.

८. भूताखेतांना मारायला भगवान शंकरांचा त्रिशूळ बरा. त्यावेळी विजा चमकत असल्या आणि सोसाट्याचा वारा वाहत असला तर त्यांचा आत्मा लवकर अनंतात विलीन होतो.

९. मोकळे सोडलेले केस आणि पांढरी साडी हा युनिफॉर्म असल्याशिवाय भूतिणींना 'हडळ' म्हणून मान्यता मिळत नाही.

१०. हिरॉइन गावकी गोरी असेल तर हिरो बडे बापका बेटा असतो. हे बडे बाप ठाकूर किंवा जमीनदार (म्हणजे मराठी पिक्चरमधल्या सूर्यकांत्/चन्द्रकांत्/साळवी वगैरे पाटलांचे काऊन्टरपार्टस) असतात (ह्या बाबतीत विश्वजीत बाबूमोशायनी पीएचडी केलेली आहे). इथे हिरवीणीला शेळ्यामेंढ्यांचे कळप चारणे, उस दाताने तोडणे, नदीवर पाणी भरायला जाणे, सावनके झुलोंपर झुलणे, शेताच्या बांधांवरून धावत जाणे आदि महत्त्वाची कामं पार पाडावी लागतात. कधीकधी व्हिलनच्या अड्ड्यावर त्याच्यासमोर हिरोचा जीव वाचवायला नाचावं लागतं.

भूताखेतांना मारायला भगवान शंकरांचा त्रिशूळ बरा. त्यावेळी विजा चमकत असल्या आणि सोसाट्याचा वारा वाहत असला तर त्यांचा आत्मा लवकर अनंतात विलीन होतो.
>>>>>> Biggrin

मिळालेला साईन्ड ब्लँक चेक ताबडतोब मोठी रक्कम घालून खात्यात भरण्याऐवजी बाणेदार हीरो प्रत्येक वेळी तो फाडून टाकतो आणि इमान, धरम, गरीबीका लहू जादा लाल होता है टाईप डाय्लॉग समोरच्याला ऐकवतो.

११. व्हिलन हिरोला धुणं धुतल्यासारखा बडवत असताना पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजला तर व्हिलन आरामात पळ काढणार हे समजावं. हिरो व्हिलनला मारताना सायरन वाजला तर पिक्चर संपणार हे समजून उठायची तयारी करावी. शेवट्च्या सिनमध्ये हिरो-हिरविणीचे आईबाप पोरांचं लग्न लावण्याबाबत, हिरोचा मित्र आणि हिरोची मैत्रिण आपल्या लग्नाबाबत आणि पिक्चरातलं एखादं पात्र प्रेक्षकांकडे वळून जे काही संवाद म्हणतात त्याचा तिकिटाचे पैसे वसूल होण्याशी काssही संबंध नसतो.

१२. हिरविणीला चक्कर आली किंवा तिने उलटी केली तर तिला अपचन्/अ‍ॅसिडीटी/पित्त ह्यापैकी एक किंवा सर्व झाले आहे किंवा 'काल रात्री घेतलेली जास्त झाली' असं न म्हणता रोगी चेहेर्‍याचे डॉक्टर्स ती प्रेग्न्ंट आहे हा निष्कर्ष काढतात. तपासून झाल्यावर डॉक्टरांचे पैसे कोणी देताना दिसत नाही. आणि ते त्यांची बॅग उचलायला जातात तेव्हा झटकन पुढे होऊन 'मै लेता हू' म्हणून कोणीतरी ती का उचलतं हे मला न सुटलेलं कोडं आहे.

१३. हिरविण 'मै तुम्हारे बच्चेकी मा बननेवाली हू' म्हणण्याऐवजी 'तुम मेरे बच्चेके बाप बननेवाले हो' असं कधी का म्हणत नाही?

१४. कोणालातरी रक्ताची नितांत गरज असताना एखादी व्यक्ती 'डॉक्टरसाहब, मेरे शरीरका एकेक कतरा निकाल लिजिये लेकिन इसे बचाईये' असं म्हणते. अरे, तो डॉक्टर आहे का ड्रॅक्युला? जास्तीचं रक्त घेऊन काय तो ग्लासात घालून पिणार आहे का? एखाद्या कर्तव्यनिष्ठ डॉक्टराने ब्लड ग्रूप मॅच होण्याचा मुद्दा (विरोधी पक्ष लावून धरतात तसा) लावून धरलाच तर 'मुझे यकीन है हमारा खून मॅच होगा' असं बिनदिक्कत सांगतात. हे असे सांगणारे बहुधा मुस्लीम असतात. ख्रिश्चन लोकांचा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याच्या दृष्टीने फारसा उपयोग नसतो. नवनिर्वाचित पोप ह्याकडे लक्ष देतील काय?

१५. हिंदी पिक्चरमध्ये पार्टी ही खूप महत्त्वाची घटना असते. ह्याला लागणारे महत्त्वाचे घटक म्हणजे पियानो, न शोभणारे सूट घातलेले पुरुष आणि चित्रविचित्र केशरचना केलेल्या ललना. मध्येमध्ये ड्रिन्क्सचा ट्रे भरून चालणारे वेटर्स असावे लागतात. ह्या पार्टीत बहुधा हिरविणीचे श्रीमंत वडिल तिच्या लग्नाची घोषणा करतात. मग हृदयाला भोक पडलेला हिरो पियानो बडवत गाणं गातो. प्रत्येक कडव्याच्या वेळेस हिरविण, तिचा होणारा नवरा आणि तिचे वडिल पार्टीत वेगवेगळ्या जागी, पण चेहेर्‍यावर तेच एक्सप्रेशन घेऊन फिरतात. हिरोचा मित्र असलाच तर असहायपणे पहातो. हिरविणीची मैत्रिण तिला धीर देत हिरोच्या मित्रावर लाईन मारते. हाच सीन पिक्चरच्या सुरुवातीला असला तर हिरो इजहार-ए-प्यार करायला वापरतो. पियानो वाजवत गाणार्‍या हिरोच्या अगदी तोंडासमोर हिरविणीला टेकून उभं रहाता यावं यासाठी पियानो बनवणार्‍यांनी त्याची रचना केलेली असते. हिरोवर आणखी कोणी बाई मरत असेल तर ती हिरोच्या मागे उभी राहून मागून लाईन मारत असते. ह्या नियमाचं प्रात्यक्षिक पहायचं असल्यास 'तीन देविया' मधलं 'ख्वाब हो तुम या कोई हकिकत' हे गाणं पहावं. त्यात सिमी आणि कल्पना ह्या दोन बाया भयानक मेकअप करून (आणि चेहेर्‍यावर वेडगळ हसू घेऊन) पियानोवर गाणार्‍या देवच्या समोर उभ्या असतात. पार्टीतली इतर जनता प्रत्यक्ष पहा, वर्णन करता येणं अशक्य आहे.

हिंदी पिक्चरमध्ये पार्टी ही खूप महत्त्वाची घटना असते - त्यात सर्व लोक आत्ताच लंडनहुन आल्यासारखे सुट बुट घालून असणार .

सगळ्या हिरो हिरविणींना "पेहले से देर" झालेला असतो कॉलेजला नोकरीला जाताना.
त्यामुळे ते टेबलवरचा चहा नाश्ता कधीच पूर्ण संपवत नाहीत.
बर्‍याचदा एक घोट पिऊन किंवा ब्रेड्चा एक चावा घेऊन तसेच ठेवून जातात.
यांच्याकडे कधीच पोहे, ऊपमा, ईडली नाश्त्याला नसते कायम ब्रेड, बटर, ज्यूस आणि टोपलीत सफरचंद Proud

>> हीरो व हीरॉईन दोघेही पळालेले असतील व ते एरव्ही सुद्धा क्वचित घरी जेवणारे असतील तरीही ते पळून येउन लपलेल्या जागी मात्र त्यांना एकदम लाकडे तोडून आणून दगडांची चूल करून त्यावर स्वयंपाक करावा लागतो. त्यासाठी तवा वगैरे भांडीही अचानक उपलब्ध होतात. जवळच्या गावात सामान आणायला जाता येते पण एखाद्या हॉटेलातून थेट काहीतरी खायला आणायचा पर्याय नसतो.
कसलं जबरी.. Lol
>> २४. अॅडव्हेंचर चित्रपटात कोणीही पाण्यात पडून वाहून जाऊ लागले किंवा होडीत्/तराफ्यात बसून जाऊ लागले की लगेच धबधबा समोर येतो.
काय हे? Rofl

हे काही टीपापावर गप्पा मारताना आठवलेले:
१. भारतीय हिरो-हिरोइन शिकायला जगात कुठेही गेले तरी कॅम्पसमध्ये हिंदी गाणी म्हणतात. अन बाकी फिरंग लोक ते व्यवस्थित समजुन त्यावर बॉलिवुड डान्स करतात. (श्रेय: सशल). (आठवा कभीखुशीकभिगम)
२. परदेशातल्या कुठल्याही पब/डिस्कमधून बाहेर पडताना भारतीय गुंडे भारतीय पद्धतीने हिरोशी मारामारी करतात. स्वतःच्या लहान पोरांना एक हलकीशी चापट दिल्याबद्दल पालकांना "अंदर" करणार्‍या परदेशी पोलिसांना याची हवाही लागत नाही. (श्रेय: सशल).
३. हिरो-हिरोइन परदेशातल्या डिस्क/पब मध्येही हिंदी गाणी गातात अन त्यावर तिथलं पब्लिक व्यवस्थित झटके देत नाचतं. (आठवा कलहोनाहो, कभी अलविदा ना कहना).
४. त्यांना परदेशी गेल्यावरही नेहमीच हिंदी डॉक्टर, नेबर्स अन कलिग्ज मिळतात. (आठवा कलहोनाहो, कुठलेही जोहर्-चोप्रापट).
५. स्विस आल्प्स पासून इजिप्तच्या वाळवंटापर्यंत कुठल्याही निसर्गरमणीय ठिकाणच्या गाण्यात हिरोइनी नेहमीच स्लीवलेस ब्लाउज अन शिफॉन सारी या गणवेषात असतात. (उदा. कुठल्याही चोप्रापटाची हिरोइन ते "तेरी ओर" मधली कट्रिना).
६. परदेशी लोकांच्या पार्टीतही आपले लोक हिंदीतच भाषण देतात. उदा. कभी अलविदा..मधला अमिताभ. पार्टीत "मै मेरे पत्नी को हरपल याद करता हूं" वगैरे म्हणून डोळ्यात पाणी आणतो अन सगळे फिरंग समजुन उमजुन टाळ्यांचा गजर करतात.

क्र.३ आणि ६ ला जुनी परंपरा आहे. लव्ह इन टोक्योमध्ये जॉय मुखर्जी गिंझाच्या पोलिस चौकीत जाऊन हिंदीत बोलताना दाखवलाय..

कोठेही गोळी, पण अजून व्हिलन जिवंत आहे, थोडा बदला बाकी आहे आणि तो घेणारे अजून कोणी शिल्लक नाही: नक्कीच वाचतो आणि बरा व्हायच्या आधीच सलाईनसकट हॉस्पिटल मधून धावत सुटतो आणि व्हिलन ला "त्यापेक्षा हा ठीक असताना याच्याशी मारामारी परवडली" असे वाटावे इतका बडवतो.>>>> Lol

हॉरर पिक्चरमध्ये रात्री अपरात्री चित्रविचित्र आवाज आले की रामरक्षा किंवा गायत्री मंत्र म्हणत पांघरूण डोक्यावरून घेऊन झोपण्याऐवजी 'ये कैसी आवाज है' किंवा 'कौन हे वहा' असले निरर्थक संवाद म्हणत लोक बाहेर पडतात आणि मरतात.>>> Rofl

हिरॉइन गावकी गोरी असेल तर हिरो बडे बापका बेटा असतो. हे बडे बाप ठाकूर किंवा जमीनदार (म्हणजे मराठी पिक्चरमधल्या सूर्यकांत्/चन्द्रकांत्/साळवी वगैरे पाटलांचे काऊन्टरपार्टस) असतात (ह्या बाबतीत विश्वजीत बाबूमोशायनी पीएचडी केलेली आहे). इथे हिरवीणीला शेळ्यामेंढ्यांचे कळप चारणे, उस दाताने तोडणे, नदीवर पाणी भरायला जाणे, सावनके झुलोंपर झुलणे, शेताच्या बांधांवरून धावत जाणे आदि महत्त्वाची कामं पार पाडावी लागतात. कधीकधी व्हिलनच्या अड्ड्यावर त्याच्यासमोर हिरोचा जीव वाचवायला नाचावं लागतं.>>>> Lol खतरनाक निरीक्षण

धन्स मंडळी! रच्याकने, आज संध्याकाळी ५:३० वाजता झी अ‍ॅक्शनवर रामसेंचा 'तहखाना' तर उद्या रात्री ८:३० वाजता 'बंद दरवाजा' आहे Proud भूतपटांच्या अभ्यासूंनी नोंद घ्यावी.

Pages