दोडक्याची रस्सा भाजी

Submitted by तृप्ती आवटी on 23 September, 2011 - 12:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ मध्यम दोडकी, १ चमचा तिखट, १ चमचा गोडा/काळा मसाला, मीठ, १ टे स्पू तेल, २-३ चहाचे कप गरम पाणी, कोथिंबीर

वाटणासाठी: १ लहान कांदा, २ टे स्पू सुकं खोबरं, १ टे स्पू भाजलेले तीळ, ५-६ लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं

फोडणीसाठी: हळद, हिंग, मोहरी

क्रमवार पाककृती: 

दोडक्याची नाकं कापून, शिरा काढून बोटभर लांबीचे तुकडे करावेत. एका तुकड्याचे प्रत्येकी चार तुकडे करावेत. थोड्याशा तेलावर दोडकी जराशी वाफवून घ्यावीत. एकीकडे वाटणासाठी दिलेलं साहित्य मिक्सरमध्ये अथवा पाट्यावर वाटून घ्यावं. तेलात हिंग-हळद-मोहरीची फोडणी करुन त्यात वाटण घालावं. तेल सुटायला लागलं की त्यात वाफवलेली दोडकी, तिखट, मीठ आणि मसाला घालून नीट मिसळून घ्यावं. गरम पाणी घालून १-२ उकळ्या काढाव्यात. वरुन कोथिंबीर घालावी.

भात, पोळी, ज्वारीची भाकरी कशाही बरोबर मस्त लागते भाजी.

वाढणी/प्रमाण: 
२-३ मोठे
अधिक टिपा: 

_दोडकी फार शिजवु नयेत, बुळबुळीत होतात.
_वाटण वांग्याच्या भाजी सारखेच आहे साधारण. फक्त ह्यात वहाता रस्सा होइल इतपत पाणी घालायचं आहे, अगदी दाट ग्रेव्ही नको.
_ह्याच प्रकारे भारतात मिळणारी छोटी ढब्बु मिरची पण मस्त लागते. मिरच्यांची नाकं कापून अख्ख्या घातल्या तरी चालतं.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच Happy मी नेहेमी गुजराथी पद्धतीने करते. दोडका + बटाटा + टोमॅटो अशी. नेहेमीची फोडणी, मसाला म्हणून फक्त किंचित गोडा मसाला आणि ताजी धणेपूड, थोडी साखर. वरतून भरपूर कोथिंबीर. टोमॅटो अगदी गॅस बंद करताना घालायचा. आता ह्या पद्धतीने करुन बघेन. जास्त चमचमीत होईल असं वाटतंय Happy

ओह अल्पना, मला वाटलेलं तुला कदाचित माहिती असेल रेसिपी Happy

अगो, हरभरा डाळ घालून पण करतेस का ? कोरडी भाजी आम्ही नेहमी डाळ घालूनच करतो.

मी अशीच करते खूपदा. पण मी वांग्यासारखं मसाला भरून करते. आजच आणलीयेत डब्याला, दतेम वापरून केलेली Happy

नाही गं. ही सुद्धा रसाचीच असते. दोडका + बटाटा जरा खमंग परतून मग पाणी घालायचं. धनेपूड आणि पाव चमचा गोड्या मसाल्याने दाटसरपणा येईल तेवढाच. तेलाचा लाल तवंग छान दिसतो रसावर ( मी जास्त तिखट घालत नाही ) Happy

कोरडी म्हणजे कशी? >>>> दोडक्याचे बारीक छोटे तुकडे करायचे, दुधीचे/बटाट्याचे करतो तसे. ह-हि-मो फोडणी करुन त्यात कडिपत्ता, वाटीभर भिजवलेली ह.डाळ, दोडके घालायचे. तिखट, गोडा मसाला, गूळ, मीठ घालून घाकण घालुन वाफेवर शिजवायचे. वरुन को आणि ना.

हो सिंडरेला. बर्‍याच रस्सा भाज्यांना मी हे वाटण वापरते. मी वाटणात भाजलेले धणे, जीरे पण घालते.घरच्या काळ्या मसाल्याऐवजी कधी दतेम, कांदा-लसूण मसाला असे वेगळे मसाले वापरते.

सारीका, चालतो ना. Happy

हाच मसाला, पण आलं नाही घालत आणि तिळकुटाऐवजी दाणकूट घालते. आंबटगोड चव आवडते म्हणून कधीतरी गूळ आणि आमसूल (आगळ)ही घालते. भरली वांगी करतांना टोमॅटोही घालते, दोडक्याला नाही घालत.

वा मस्तच. सिंडे त्या शिरांबरोबर दोडक्याचे सालहीकाढलेना तो दोडका गुळगुळीत होतो आणि त्याची चव मस्त लागते. चरचरीत पणा आजीबात जाणवत नाही. मग त्या शिरांची आणि सालांची चटणी करायची.

जग्गातली अप्रतिम दोडक्याची रस्साभाजी झालेली आहे! प्रचंड थँक्स सिंडे.. पहिल्यांदाच दोडका केला, नशीब ही रेस्पी पाहिली मी. Happy Happy Happy