मुलांमधे संगिताची आवड आणि जोपासना

Submitted by दाद on 3 August, 2008 - 20:56

संगिताची आवड - माझा अत्यंत आवडीचा विषय.
माझ्याबाबतीत, माझ्या भावाच्या बाबतीत आणि माझ्या लेकाच्या बाबतीत काय उपयोगी पडलं ते सांगणार आहे इथे.
त्याआधी हे ही सांगणं आवश्यक की माझा भाऊ उत्तम हार्मोनियम, तबला, बासरी वाजवतो. त्यापैकी फक्त तबला थोडाफार शिकलाय.
मी तबला वाजवते (बहुतेक बर्‍यापैकी Happy ), हार्मोनियम शास्त्रोक्त गायकाला साथ करता येईल इतपत. तबल्याच्या योगे ढोलकी आणि ढोलक सारखी वाद्य वाजवता येतात. भावालाही.
लेक हार्मोनियम वाजवतो. (आधी राग, चीज समजून घेऊन शास्त्रीय संगीताची, गाणी माहीत असल्यास भावगीते वगैरेची मैफिल वाजवण्याइतपत). तबला नाही. मला वाजवताना बघून (बघून) ते girs' instrument असल्याची lahaanapaNee खंबीर खात्री! त्यामुळे.

आता ही आवड जोपासण्याविषयी.

घरातल्यांना मुळात आवड असणं, कमीतकमी त्यांनी तसा प्रयत्नं करणं आवश्यक आहे. नाहीतर मुलांत आवड निर्माण करणं किंवा जोपासणं हा एक ’कार्यभाग’ होऊन बसतो आणि त्यातला सहजभाव निघून जातो.

आमच्या घरी सगळ्यांनाच संगीताची आवड. घरात गोकुळ-अष्टमी, गणपती वगैरे निमित्त कायम कार्यक्रम चालू. मला माहीतही नव्हतं तेव्हापासून घरात पेटी, तबला, ढोलकी, तानपुरा, बासरी अशी वाद्य होती. खंजिरी, डफ, घुंगुर, कब्बास अशीही वाद्य होती, ज्यांना साईड रिदमची वाद्य म्हणता येतील. ह्या ना त्या निमित्ताने आणि तसंही, सगळ्याच वाद्यांवर हात चालवलाय. त्यामुळेच न शिकता पेटी वाजवता येतेय, आम्हा दोन्ही भावंडांना.

तेव्हा..... घरात विविध वाद्य असावीत आणि तीही चांगल्या अवस्थेत. माझे आई-बाबा तबला, ढोलकी वाजवत नव्हते तरी घरात दोन उत्तम जोड होते.

घरात कायम रेडिओवर गाणी चालू असायची. रात्री झोपताना नॅशनल कार्यक्रम ऐकतच झोपलोय... बाबा कधीतरी रेडिओ बंद करत असावेत. हे ऐकणं मुद्दाम किंवा ज्याला active म्हणतात तसं नव्हतं.... सहज होतं, passive. समोर बसून हे ऐक असं कुणी सांगितलं नाही. संगीत आमच्याभोवती घडत राहिलं आणि आम्ही ते शोषत राहिलो, बहुतेक. एकवेळ नवीन कपडे केले नाहीत एखाद्या दिवाळीला, पण आठ वर्षांची होते तेव्हापासून लग्न होईपर्यंत वारीला जावं तशी सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला गेलेय, बाबांबरोबर. म्हणजे त्यांनी नेलय. नुस्तं शास्त्रीय नाही पण भावगीतं, नाट्यगीतं अशा कार्यक्रमांनाही बाबा आवर्जून न्यायचे.

माझा लेक (एकच आहे)- लहानपणी, मी आणि माझा नवरा त्याच्याशी त्याच्या वयाचे होऊन भांडलो आहोत... गाडीने कुठेही जायचं असल्यास, एक वेळ आमची गाणी लावली जातील ह्यावरून. माझं आणि नवर्‍याची भांडण(??) त्याने बघितली ह्यावरून, त्यामुळे त्याच्याशी केलेलं भांडण नडलं नाही त्याला. नवरा जुन्या हिंदी गाण्यावरून आणि मी शास्त्रोक्त पासून भावगीतां पर्यंत आणि गजलांपासून लावण्यांपर्यंत कशाहीसाठी.
आता (वय १८), जाईन विचारित रानफुला सारखं भावगीत, ’बोलावा विठ्ठल’च्या तीनेक चाली, मेहदी हसनच्या गजला, मदन मोहनची हिन्दी गाणी, असलं त्याला माहीत असतं आणि थोडक्याच प्रयत्नांत तो वाजवू शकतो. त्याचं त्यालाच आश्चर्य वाटतं की "हे असलं" गाणं त्याला माहीत आहे आणि तेसुद्धा कधी कधी मधल्या म्युझिकसकट.

तर, अशाप्रकारे चांगलं सगीत आजूबाजूला घडू द्यावं... आपोआप मुलं ते आत्मसात करतात. कधी कधी वरच्यासारखा थोडा वेगळा मार्ग अवलंबावा लागतो Happy

मुलगा लहान होता तेव्हापासून माझ्या घरात तबला (हं?), हार्मोनियम, सन्तूर, बोंगो, कब्बास, चिपळ्या, घुंगरू, आणि इतर ताल वाद्य आहेत. मी काहीतरी वाजवतेय म्हटल्यावर तो नकळत वाजवायचा. कधी कधी मी मुद्दाम चुकायचे. तो सुधरायचा मला... असं नाही आई, असं!
माझ्या एका मैत्रिणीला मी तिच्या मुलीबरोबर गाणं शिकायला जा असं सांगितलं. मुलगी कधी कधी तिला शिकवते आणि म्हणूनच मग आईनं सांगितलेलं ऐकतेही.

मुलाने पियानो वाजवावा असं मला वाटलं. कारण त्यायोगे त्याच्या ऑस्ट्रेलियन मित्रांशी त्याचा संवाद राहील, असं मला वाटलं. घरातला कीबोर्ड पहिला महिनाभर वापरला. त्याच्या क्लासला मी सुद्धा जात होते, नुस्तीच. शिकायला नाही.
लक्षात आलेली गोष्टं म्हणजे, तिच्याकडल्या "खर्‍या" पियानोवर हा आवडीने वाजवतो आणि घरात पाट्या टाकतो. तेव्हा घरी पियानो आणला (हिन्दी सिनेमासारखा ग्रँड नाही पण व्हर्टिकल). तेव्हापासून उत्साहाने प्रॅक्टीस. मनापासून प्रयत्नं करून पियानोच्या पाच परिक्षा पूर्ण केल्या. तबला आणि संतूर, सोडल्यास, सगळीच साइड रिदम्सची वाद्य जी घरात आहेत, ती त्याला वाजवता येतात.

आपल्या लहानग्याला (वय वर्ष ३ म्हणजे शिकायला सुरूवात करायला अजून लहान) माझ्याकडे तबला शिकवू इच्छिणार्‍या एकीला, पहिली दोन वर्षं नुस्ती वेगवेगळी तालवाद्य आणून दे घरात असं सांगितलं. त्याचा तालाचा सेन्स इतका उत्तम झालाय की... बस्स.

तर... वाद्य असावीत आणि ही सगळी वाद्य उत्तम प्रतीची असावीत. "उत्तम प्रतिची" हे सांगणं अतिशय महत्वाचं.
मुलांना एखादं वाद्य वाजवण्यात आनंद मिळाला तरच ती त्यात रस घेतात. शिकण्याच्या काळात, गुरुजींनी ऐकवलेला नाद, सूर आपल्या वाद्यातून तस्सा येण्यासाठी, वाद्य चांगलं हवं. तरच रियाज करताना आपल्या आणि गुरुजींच्या नादातला फरक कळू शकेल.
चांगला नाद असलेला तबला, सगळे सूर वाजणारी, त्यांच्या उंचीला झेपेल अशी, भाता फार जड असणार नाही अशी पेटी... हे महत्वाचं आहे.
साधारणपणे ’आत्ता घेऊ काहीतरी सेकंड हँड किंवा शेजारच्याचं वगैरे आणू. शिकला आणि जमतय त्याला असं दिसलं तर मग आणू बर्‍यापैकी. आत्ता काय करायच नवीन?’ असा विचार असतो पालकांचा.
पाल्यात आवड निर्माण करण्याची आवश्यकता तुम्हाला आहे, पाल्याला (अजून) नाही.

त्यांच्या शिकण्यात आपल्याला रस हवा, त्यांचा क्लास ही घरात महत्वाची, (हाय प्रायॉरिटीची) गोष्टं मानावी. शक्यतो क्लास चुकवू नये. एकवेळ डबल बुक केली म्हणून पार्टीला जाणं रद्द करावं. मोठ्यांनी महत्वं दिलं की लहानही देतात.

मुलगा सुरुवातीची पेटी माझ्याकडेच शिकला. मग आमची भांडणं जास्तं आणि शिकणं कमी Happy व्हायला लागल्यावर, दुसरीकडे शिकणं चालू केलं. अगदी गेल्यावर्षीपर्यंत त्याच्या क्लासला जाण्यापाई दर शुक्रवारी माझे ड्रायव्हिंग करण्यात पाच तास जायचे. दोन तास कामावर जाणे-येणे आणि तीन तास क्लासला जाणे-येणे.
इथे फुशारकी नाही सांगायचीये. बात अशी आहे की, आपल्यातले अनेकजण वेळ नाही म्हणून अशा गोष्टी टाळतो. शुक्रवारी पार्टीला बोलावल्यास एखाद्यावेळी जाऊ दीड तासाचं ड्रायव्हिंग करीत. हे माझ्या एका मैत्रिणीने आपल्या मुलीचा पेटीचा क्लास बंद करण्यामागचं कारण म्हणून सांगितलं.
घराच्या जवळ पंधरा मिनिटांच्या टप्प्यात नाही म्हणून आमच्या मुलांना "हे असलं" शिकता आलं नाही..... इतर काही अतिशय तशीच "नाईलाज" असणार्‍या कारणांव्यतिरिक्तं हे कारण... माझ्या दृष्टीने "हलगर्जीपणाचं"च आहे.

अनेकजण मुलाच्या क्लासशी संबंध हा नेणे-आणणे, फी देणे यापुरताच ठेवतात. लेकाचा क्लास हा त्या वेळात शॉपिंग किंवा जवळच्या मैत्रिणीकडे चक्कर ह्यासाठी वापरू नये. (अगदीच त्याच्या गुरूंना पालकांचं बसणं पसंत नसेल तर इलाज नाही)
ह्यामुळे मुलांना मुळात खूपच आवड असेल तरच ती आपणहून क्लासला जाणं, शिकणं, घरी येऊन रियाज करणं करतील.

माझ्या मुलाच्या क्लासला मी जाते. सर्ववेळ बसते. तो काय शिकतोय, कोणता राग, कोणती चीज, कोणतं गाणं, हे समजून घेते.
पूर्वी घरी आल्यावर ते गाणं, त्या रागाचं रेकॉर्डिंग घरात नसलं तर मिळवायचे. आणि तो घरात असताना नुस्तच लावायचे. समोर बस, ऐक वगैरे नाही. नुस्तं कानावर पडू द्यायचं. आधी आधी ’हे कशाला लावलय आता परत?" असं विचारायचा.
’मला आवडलं गाणं. मस्तचय. म्हणून लावलं’ असलं सांगितलं की ऐकून घ्यायचा.

संगीत शिकण्याच्या बाबतीत गुरूंकडे जाऊन नियमीत शिकणं हा active भाग झाला. त्याचबरोबर passive ऐकणं हे ही अत्यंत महत्वाचं. किती ते मी शब्दात नाही सांगू शकत, इतकं.
हे असं ऐकण्याची सवय लहानपणीच लागायला हवी. एकदम शास्त्रोक्त ऐकण्याची सक्ती मुलांवर करता येणार नाही. त्याऐवजी हल्ली जुन्या हिन्दी सिनेमातल्या गाण्यांच्या DVDs मिळतात. मी त्या आणून लावायचे. ’श्शी, कसली केसांची स्टाईल’ वगैरे वगैरे बोलत का होईना पण ऐकायचो ती गाणी. मीही जरा अरे, ह्या गाण्यात बघ कसले कपडे घातलेत वगैरे बोलून अजून एखादं ऐकवायचे.

त्याची आवडती हल्लीची गाणी त्याच्याबरोबरीने ऐकते. मुद्दाम वाद घालून त्यालाच नवीन काहीतरी आणायला लावते. मग मूव्ही बघायच्या आधी ’हे ऐक... आणि मग बोल’. असं म्हणून त्याने ऐकवलेलं ’रंग दे बसंती’ चे सगळे ट्रॅक्स मला नि:शब्द करून जातात.

लहान होता तेव्हा इथे आलेल्या चांगल्या कलाकारांच्या मैफिली ऐकायला येण्यासाठी त्याला लाच दिलीये (होय). जुन्या एखाद्या हिन्दी गाण्याचा राग ओळखता आला तर बक्षीस. दोघांनी मिळून एखाद्या गाण्यात कोणकोणती वाद्य वाजवलीत ते ओळखायचं. हे वाद्य वाजतय ते व्हायोलीन आहे की चेलो? हा ढोलकचा पीस ऐकरे परत... एकदाच. हा हार्मोनियमचा पीस जसाच्या तस्सा वाजवलास तर मागशील तो व्हिडिओ गेम!
हे आणि असलं बरच काही.

अर्थात माझं गाण्यात वावरणं त्याला आणि मलाही खूप फायद्याचं ठरलय. सिडनीत एक शास्त्रोक्त गाण्यात रमणायांचा एक ग्रूप गेली सतरा वर्षं दर महिन्याला एक कार्यक्रम करतो. घरगुती विनामूल्य मैफिल. त्यात मुलांसाठी वेळ असतो.
तसाच एक ग्रूप फक्तं मुलांचा मुलांनी सादर केलेला कार्यक्रम करतो. म्हणजे नेणे-आणणे आणि खाऊ-पिऊ सोडल्यास सगळं मुलं करतात. हिरिरीने छोटे-मोठे कार्यक्रम करतात. त्यांना आवश्यक साथीसाठी त्यांच्या आईने अगर वडिलांनी साथीदारांना फोन करून चालत नाही, ती मुलांचीच जबाबदारी. कार्यक्रमाचं ध्वनी-नियोजन आणि सूत्र संचालनही मुलच करतात.
आम्ही अशात कार्यरत आहोत. अशा काही गोष्टींत मुलांचा सहभाग असावा.

आता अजून एक गंमत.
गेली दोन वर्ष मुलाचा पियानो संपूर्ण बंद आहे. मी धूळ झटकते तितकच. ह्यात मी वैतागून, त्याला कोसून, ढोसून काही उपयोग नाही. कारण, मला माहीत आहे की कदाचित ही एक "अवस्था" असेल... फेज. ती संपून तो परत पियानोकडे वळेल.
आणि नाही वळला तरी हरकत नाही. त्याचं ते आनंदाने वाजवणं, प्रयत्नं करून पाच परिक्षा तीन वर्षाच्या अवधीत देणं, हा प्रवास इतका सुंदर होता की त्यासाठी हा पियानो सत्कारणी लागला.
आपण सहजासहजी "इन्व्हेस्ट" केलेले रिसोर्सेस वाया जाऊ द्यायला तयार नसतो. सगळेच प्रयत्नं हव्या तितक्या वेळात हव्या तितक्या प्रमाणात "रिटर्न्स" देत नाहीत - हा मी माझ्या काही चुकांमधून शिकलेला एक मोठा धडा आहे.

आतापर्यंत एव्हढं सगळं जमलं याचा अर्थ मुलगा हे आजन्म करेल असं आहे का?
अपेक्षाही नाही.
रुजवा केलेलं प्रत्येक रोप फळाला येत नाही म्हणून रोवायचं थांबवलं तर खायला नाही अशी अवस्था येईल.
मुलांच्यात करायच्या अनेक रुजव्यात हा एक. आलं फळाला तर त्याच्याही पुढची पिढी खाईल.
ही माझी हौस आहे का? जी मी लेकाच्यात पुरी करतेय? तर हो आणि नाही. हौस आहे. पण त्याच्यातून पूर्ण करण्याचा सोस नाही.
प्रामाणिकपणे सांगायचं तर हे एक देणं आहे जे माझ्या आई-वडिलांनी त्यांच्या परीने त्यांच्या कुवतीच्याही बाहेर जात आम्हाला दिलं. तो ठेवा आता व्याजासकट पुढच्या पीढीला देण्याचं माझं कर्तव्य फक्तं.

**************************************************
दिनांक - २२ मे २०११
ऑगस्ट २००८ मधे हा लेख लिहिला. आज शेवटचा परिच्छेद वाचतेय अन गंमत वाटतेय. गेल्या दोन्-चार महिन्यांत मुलानं संवादिनीला फुलं वाहण्यापुरताही हात लावलेला नाही. (अदृष्टं किती अचूक आपल्या तोंडून (लेखणीतून) वदत असतं.... )
तिची जागा आता पियानोने घेतलीये. तो उठलाय हे पियानोचा आवाज येतो तेव्हा कळतं. रात्री-अपरात्री पियानो वाजवून शेजारच्यांची झोपमोड करायची नाही हा नियम घालायची वेळ आलीये.
त्याचा-माझा संवाद आता उलटा चालू आहे. काय काय तूनळीवर वगैरे शोधून मला ऐकवतो. "ह्यात तुला लेयर्स ऐकू येतायत का? हा कॉर्ड किती वेगळा आहे... ह्यात त्याची पियानोवरची कमांड बघ... लांग लांगच्या शोमनशिपवर जाऊ नकोस... डोळे मिटून ऐक..."
आढ्याचं पाणी वळचणीला जाऊ लागलय Happy
तुमच्यातल्या अनेक पालकांना ह्या माहितीचाही उपयोग होईलच. Managing their own expectations is the biggest battle of parents with themselves... I think Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दाद, "गानभुली - काळ देहासी आला खाऊ" प्रच्ंड आवडला, योगायोग हा वाचल्यावर मनात आले, तुला आपल्या ३ वर्षांच्या लेकिकरिता, संगिताची आवड कशी निर्माण करावि याबद्दल विचारावे, बघतो तर काय हा तुझा जुना लेख... नविन प्रतिसादांमुळे डोळ्यासमोर -- धन्यवाद, आगदि मोलाचा लेख हवा त्यावेळी हाती लागला.

रुजवा केलेलं प्रत्येक रोप फळाला येत नाही म्हणून रोवायचं थांबवलं तर खायला नाही अशी अवस्था येईल.>>>>>>>>>>>

दाद,मला तुमचा हा दृष्टीकोन फार आवडला. निरपेक्षपणाने केलेली कुठलीही गोष्ट कधीच वाया जात नाही.तुमचा लेख नेहेमीप्रमाणेच खूप छान आहे. मी जरा उशीरा वाचला. तुमच्या सर्वच लेखांमधली उत्कटता अगदी आत जाऊन भिडते.तुमचे बाकी लिखाण वाचणे चालू आहे.काय ताकदीने लिहिता हो तुम्ही.आणि दरवेळी आता कुठल्या शब्दांत प्रतिक्रिया द्यावी हेच समजत नाही.आता तर मला असे वाटू लागले आहे की नि:शब्दता हीच एकमेव प्रतिक्रिया माझ्यापाशी उरली आहे.

दाद, जितका तुमचा लेख सुंदर तेवढ्याच सुंदर तुमच्या (आणि इतरांच्याही) प्रतिक्रिया. Happy
मी लेख वाचून संपता क्षणी त्याची लिंक माझ्या सगळ्या पालक मित्र-मंडळींना पाठवली. आता असे सगळे लेख वाचतच सुजाण पालकत्वाची तयारी सुरू झाली आहे.

दाद कित्ती छान लिहल आहेस.
तुझ्या ह्या लेखनाला दाद द्यावी तेवढी थोडीच आहे.

दाद खूपच छान लेख आणि माहितीपूर्ण Happy माझ्याही लहानपणीचे अनुभव तुमच्यासारखेच आहेत. रेडिओ सतत चालू आणि रेडिओवरचं गाणं कोणत्या रागावर आधारीत आहे यावर रंगलेल्या गप्पा Happy काय सुखद क्षण होते ते!
नशिबाने माझ्या मुलाला संगीताचा कान आहे. वय वर्ष केवळ चार पण चांगली गाणी असतील तर्च तो ऐकतो नाहितर सरळ बंद कर असे म्हणून निघून जातो. यावर मी एक केलेला प्रयोग आमच्या कडे सुदैवाने परदेशी वाहिन्यांचे आक्रमण नाही त्यामुळे दूरदर्शन्चे सगळे चॅनल्स दिसतात त्यातही डीडी भारती हे आमचं फेवरीट!
रोज या चॅनलवर सुप्रसिद्ध गायक, वादक विविध राग उकलून दाखवतात. माझा लेक ते सगळं फार आवडीनं बघतो आणि मी त्याला:)

रुजवा केलेलं प्रत्येक रोप फळाला येत नाही म्हणून रोवायचं थांबवलं तर खायला नाही अशी अवस्था येईल.>>> खूपच ग्रेट .

अतिशय अतिशय अतिशय सुरेख लेख, मार्गदर्शन ...
आपल्या संगिताचा कान तयार व्हावा निदान हे आपल्या मुलांसाठी करावं आणि ते कसं याचं उत्तम मार्गदर्शन....
़ खरंच 'दाद' द्यावी असा आय. डी ....:)

दाद ,खुप छान आहे लेख.

रुजवा केलेलं प्रत्येक रोप फळाला येत नाही म्हणून रोवायचं थांबवलं तर खायला नाही अशी अवस्था येईल.>>>>> अतिशय आवडलं हे वाक्य.

एवढ्या सुंदर लेखनाबद्द्ल मन:पूर्वक धन्यवाद!

माझी लेक ५ वर्षाची आहे.
ती नैसर्गिक समज दाखवतेय गेले २-३ वर्ष (तालासूरा ची.)
थोडी अवघड गाणीही सहज म्हणते (जे माझ्या करता "चमत्कार हो गया ताऊ" कॅटॅगरीत मोडत :ड)
तर ताला कडे जास्त कल आहे का सुराकडे हे कसे क ळेल?
ती मूड नुसार कि बोर्ड, गाणे म्हणणे, खेळातला ड्रम वाजवणे असे काहीही करते..

नानबा , तालासुराचं नाही सांगता येणार पण मला तबल्याची विशेष आवड नाही हे कळायला दहावी उजाडली आणि मी पाचवीत सुरु केलं वाजवायला. पण याचा एक उपयोग झाला कि चांगल्या ऍक्टिव्हिटीत वेळ गुंतवता आला आणि मला चांगल्या परदेशी विद्यापीठांसाठी apply करताना फार उपयोग झाला ह्या तबल्याचा extracurricular activity दाखवायला.

चांगला लेख.
ह्यात दिलेले बरेचसे मार्ग आम्हीही चोखळले आहेत. वेगवेगळ्या जॉनरची/ संगीतकारांची नवी-जुनी, हिंदी, मराठी गाणी सतत आमच्या लेकीच्या (वयः ८ वर्षे) कानावर पडतील ह्याची काळजी आम्ही घेतो. पण सध्या कोणतही सिनेसंगीत ऐकल की तिला ते गाणं बघायचं असतं. आणि अनेक सुंदर चाली असलेल्या गाण्यांचं चित्रीकरण मात्र बर्‍याचदा हिणकस असत. मुलांना नको त्या गोष्टी त्या चित्रीकरणामधून दिसू शकतात, त्यांची उत्सुकता चाळवते. Usually parental control म्हणून ज्या गोष्टी आपण दाखवायच्या टाळतो त्या मुलांना दिसतात. उदा. "रंग दे बसंती" मधील काही गाण्यांचे चित्रीकरण.
अश्यावेळी काय करावं? ते कसं टाळावं? कोणी काही विचार/ प्रयत्न केले आहेत का?

अश्यावेळी काय करावं? ते कसं टाळावं? कोणी काही विचार/ प्रयत्न केले आहेत का? >>>
मोबाईलवर गाणं लावलं की व्हिडीओ पण बघायचा असतो मुलांना. त्यामुळे मोबाईलवर गाणी लावत नाही. आमच्याकडे फिलिप्सचा एक टेपरेकॉर्डर आहे त्यावर एफ एम, युसबी , ऑडिओ सिडी चालते . हे तिन्ही ऑप्शन वापरून भरपूर गाणी ऐकतो.

Pages