मुलांमधे संगिताची आवड आणि जोपासना

Submitted by दाद on 3 August, 2008 - 20:56

संगिताची आवड - माझा अत्यंत आवडीचा विषय.
माझ्याबाबतीत, माझ्या भावाच्या बाबतीत आणि माझ्या लेकाच्या बाबतीत काय उपयोगी पडलं ते सांगणार आहे इथे.
त्याआधी हे ही सांगणं आवश्यक की माझा भाऊ उत्तम हार्मोनियम, तबला, बासरी वाजवतो. त्यापैकी फक्त तबला थोडाफार शिकलाय.
मी तबला वाजवते (बहुतेक बर्‍यापैकी Happy ), हार्मोनियम शास्त्रोक्त गायकाला साथ करता येईल इतपत. तबल्याच्या योगे ढोलकी आणि ढोलक सारखी वाद्य वाजवता येतात. भावालाही.
लेक हार्मोनियम वाजवतो. (आधी राग, चीज समजून घेऊन शास्त्रीय संगीताची, गाणी माहीत असल्यास भावगीते वगैरेची मैफिल वाजवण्याइतपत). तबला नाही. मला वाजवताना बघून (बघून) ते girs' instrument असल्याची lahaanapaNee खंबीर खात्री! त्यामुळे.

आता ही आवड जोपासण्याविषयी.

घरातल्यांना मुळात आवड असणं, कमीतकमी त्यांनी तसा प्रयत्नं करणं आवश्यक आहे. नाहीतर मुलांत आवड निर्माण करणं किंवा जोपासणं हा एक ’कार्यभाग’ होऊन बसतो आणि त्यातला सहजभाव निघून जातो.

आमच्या घरी सगळ्यांनाच संगीताची आवड. घरात गोकुळ-अष्टमी, गणपती वगैरे निमित्त कायम कार्यक्रम चालू. मला माहीतही नव्हतं तेव्हापासून घरात पेटी, तबला, ढोलकी, तानपुरा, बासरी अशी वाद्य होती. खंजिरी, डफ, घुंगुर, कब्बास अशीही वाद्य होती, ज्यांना साईड रिदमची वाद्य म्हणता येतील. ह्या ना त्या निमित्ताने आणि तसंही, सगळ्याच वाद्यांवर हात चालवलाय. त्यामुळेच न शिकता पेटी वाजवता येतेय, आम्हा दोन्ही भावंडांना.

तेव्हा..... घरात विविध वाद्य असावीत आणि तीही चांगल्या अवस्थेत. माझे आई-बाबा तबला, ढोलकी वाजवत नव्हते तरी घरात दोन उत्तम जोड होते.

घरात कायम रेडिओवर गाणी चालू असायची. रात्री झोपताना नॅशनल कार्यक्रम ऐकतच झोपलोय... बाबा कधीतरी रेडिओ बंद करत असावेत. हे ऐकणं मुद्दाम किंवा ज्याला active म्हणतात तसं नव्हतं.... सहज होतं, passive. समोर बसून हे ऐक असं कुणी सांगितलं नाही. संगीत आमच्याभोवती घडत राहिलं आणि आम्ही ते शोषत राहिलो, बहुतेक. एकवेळ नवीन कपडे केले नाहीत एखाद्या दिवाळीला, पण आठ वर्षांची होते तेव्हापासून लग्न होईपर्यंत वारीला जावं तशी सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला गेलेय, बाबांबरोबर. म्हणजे त्यांनी नेलय. नुस्तं शास्त्रीय नाही पण भावगीतं, नाट्यगीतं अशा कार्यक्रमांनाही बाबा आवर्जून न्यायचे.

माझा लेक (एकच आहे)- लहानपणी, मी आणि माझा नवरा त्याच्याशी त्याच्या वयाचे होऊन भांडलो आहोत... गाडीने कुठेही जायचं असल्यास, एक वेळ आमची गाणी लावली जातील ह्यावरून. माझं आणि नवर्‍याची भांडण(??) त्याने बघितली ह्यावरून, त्यामुळे त्याच्याशी केलेलं भांडण नडलं नाही त्याला. नवरा जुन्या हिंदी गाण्यावरून आणि मी शास्त्रोक्त पासून भावगीतां पर्यंत आणि गजलांपासून लावण्यांपर्यंत कशाहीसाठी.
आता (वय १८), जाईन विचारित रानफुला सारखं भावगीत, ’बोलावा विठ्ठल’च्या तीनेक चाली, मेहदी हसनच्या गजला, मदन मोहनची हिन्दी गाणी, असलं त्याला माहीत असतं आणि थोडक्याच प्रयत्नांत तो वाजवू शकतो. त्याचं त्यालाच आश्चर्य वाटतं की "हे असलं" गाणं त्याला माहीत आहे आणि तेसुद्धा कधी कधी मधल्या म्युझिकसकट.

तर, अशाप्रकारे चांगलं सगीत आजूबाजूला घडू द्यावं... आपोआप मुलं ते आत्मसात करतात. कधी कधी वरच्यासारखा थोडा वेगळा मार्ग अवलंबावा लागतो Happy

मुलगा लहान होता तेव्हापासून माझ्या घरात तबला (हं?), हार्मोनियम, सन्तूर, बोंगो, कब्बास, चिपळ्या, घुंगरू, आणि इतर ताल वाद्य आहेत. मी काहीतरी वाजवतेय म्हटल्यावर तो नकळत वाजवायचा. कधी कधी मी मुद्दाम चुकायचे. तो सुधरायचा मला... असं नाही आई, असं!
माझ्या एका मैत्रिणीला मी तिच्या मुलीबरोबर गाणं शिकायला जा असं सांगितलं. मुलगी कधी कधी तिला शिकवते आणि म्हणूनच मग आईनं सांगितलेलं ऐकतेही.

मुलाने पियानो वाजवावा असं मला वाटलं. कारण त्यायोगे त्याच्या ऑस्ट्रेलियन मित्रांशी त्याचा संवाद राहील, असं मला वाटलं. घरातला कीबोर्ड पहिला महिनाभर वापरला. त्याच्या क्लासला मी सुद्धा जात होते, नुस्तीच. शिकायला नाही.
लक्षात आलेली गोष्टं म्हणजे, तिच्याकडल्या "खर्‍या" पियानोवर हा आवडीने वाजवतो आणि घरात पाट्या टाकतो. तेव्हा घरी पियानो आणला (हिन्दी सिनेमासारखा ग्रँड नाही पण व्हर्टिकल). तेव्हापासून उत्साहाने प्रॅक्टीस. मनापासून प्रयत्नं करून पियानोच्या पाच परिक्षा पूर्ण केल्या. तबला आणि संतूर, सोडल्यास, सगळीच साइड रिदम्सची वाद्य जी घरात आहेत, ती त्याला वाजवता येतात.

आपल्या लहानग्याला (वय वर्ष ३ म्हणजे शिकायला सुरूवात करायला अजून लहान) माझ्याकडे तबला शिकवू इच्छिणार्‍या एकीला, पहिली दोन वर्षं नुस्ती वेगवेगळी तालवाद्य आणून दे घरात असं सांगितलं. त्याचा तालाचा सेन्स इतका उत्तम झालाय की... बस्स.

तर... वाद्य असावीत आणि ही सगळी वाद्य उत्तम प्रतीची असावीत. "उत्तम प्रतिची" हे सांगणं अतिशय महत्वाचं.
मुलांना एखादं वाद्य वाजवण्यात आनंद मिळाला तरच ती त्यात रस घेतात. शिकण्याच्या काळात, गुरुजींनी ऐकवलेला नाद, सूर आपल्या वाद्यातून तस्सा येण्यासाठी, वाद्य चांगलं हवं. तरच रियाज करताना आपल्या आणि गुरुजींच्या नादातला फरक कळू शकेल.
चांगला नाद असलेला तबला, सगळे सूर वाजणारी, त्यांच्या उंचीला झेपेल अशी, भाता फार जड असणार नाही अशी पेटी... हे महत्वाचं आहे.
साधारणपणे ’आत्ता घेऊ काहीतरी सेकंड हँड किंवा शेजारच्याचं वगैरे आणू. शिकला आणि जमतय त्याला असं दिसलं तर मग आणू बर्‍यापैकी. आत्ता काय करायच नवीन?’ असा विचार असतो पालकांचा.
पाल्यात आवड निर्माण करण्याची आवश्यकता तुम्हाला आहे, पाल्याला (अजून) नाही.

त्यांच्या शिकण्यात आपल्याला रस हवा, त्यांचा क्लास ही घरात महत्वाची, (हाय प्रायॉरिटीची) गोष्टं मानावी. शक्यतो क्लास चुकवू नये. एकवेळ डबल बुक केली म्हणून पार्टीला जाणं रद्द करावं. मोठ्यांनी महत्वं दिलं की लहानही देतात.

मुलगा सुरुवातीची पेटी माझ्याकडेच शिकला. मग आमची भांडणं जास्तं आणि शिकणं कमी Happy व्हायला लागल्यावर, दुसरीकडे शिकणं चालू केलं. अगदी गेल्यावर्षीपर्यंत त्याच्या क्लासला जाण्यापाई दर शुक्रवारी माझे ड्रायव्हिंग करण्यात पाच तास जायचे. दोन तास कामावर जाणे-येणे आणि तीन तास क्लासला जाणे-येणे.
इथे फुशारकी नाही सांगायचीये. बात अशी आहे की, आपल्यातले अनेकजण वेळ नाही म्हणून अशा गोष्टी टाळतो. शुक्रवारी पार्टीला बोलावल्यास एखाद्यावेळी जाऊ दीड तासाचं ड्रायव्हिंग करीत. हे माझ्या एका मैत्रिणीने आपल्या मुलीचा पेटीचा क्लास बंद करण्यामागचं कारण म्हणून सांगितलं.
घराच्या जवळ पंधरा मिनिटांच्या टप्प्यात नाही म्हणून आमच्या मुलांना "हे असलं" शिकता आलं नाही..... इतर काही अतिशय तशीच "नाईलाज" असणार्‍या कारणांव्यतिरिक्तं हे कारण... माझ्या दृष्टीने "हलगर्जीपणाचं"च आहे.

अनेकजण मुलाच्या क्लासशी संबंध हा नेणे-आणणे, फी देणे यापुरताच ठेवतात. लेकाचा क्लास हा त्या वेळात शॉपिंग किंवा जवळच्या मैत्रिणीकडे चक्कर ह्यासाठी वापरू नये. (अगदीच त्याच्या गुरूंना पालकांचं बसणं पसंत नसेल तर इलाज नाही)
ह्यामुळे मुलांना मुळात खूपच आवड असेल तरच ती आपणहून क्लासला जाणं, शिकणं, घरी येऊन रियाज करणं करतील.

माझ्या मुलाच्या क्लासला मी जाते. सर्ववेळ बसते. तो काय शिकतोय, कोणता राग, कोणती चीज, कोणतं गाणं, हे समजून घेते.
पूर्वी घरी आल्यावर ते गाणं, त्या रागाचं रेकॉर्डिंग घरात नसलं तर मिळवायचे. आणि तो घरात असताना नुस्तच लावायचे. समोर बस, ऐक वगैरे नाही. नुस्तं कानावर पडू द्यायचं. आधी आधी ’हे कशाला लावलय आता परत?" असं विचारायचा.
’मला आवडलं गाणं. मस्तचय. म्हणून लावलं’ असलं सांगितलं की ऐकून घ्यायचा.

संगीत शिकण्याच्या बाबतीत गुरूंकडे जाऊन नियमीत शिकणं हा active भाग झाला. त्याचबरोबर passive ऐकणं हे ही अत्यंत महत्वाचं. किती ते मी शब्दात नाही सांगू शकत, इतकं.
हे असं ऐकण्याची सवय लहानपणीच लागायला हवी. एकदम शास्त्रोक्त ऐकण्याची सक्ती मुलांवर करता येणार नाही. त्याऐवजी हल्ली जुन्या हिन्दी सिनेमातल्या गाण्यांच्या DVDs मिळतात. मी त्या आणून लावायचे. ’श्शी, कसली केसांची स्टाईल’ वगैरे वगैरे बोलत का होईना पण ऐकायचो ती गाणी. मीही जरा अरे, ह्या गाण्यात बघ कसले कपडे घातलेत वगैरे बोलून अजून एखादं ऐकवायचे.

त्याची आवडती हल्लीची गाणी त्याच्याबरोबरीने ऐकते. मुद्दाम वाद घालून त्यालाच नवीन काहीतरी आणायला लावते. मग मूव्ही बघायच्या आधी ’हे ऐक... आणि मग बोल’. असं म्हणून त्याने ऐकवलेलं ’रंग दे बसंती’ चे सगळे ट्रॅक्स मला नि:शब्द करून जातात.

लहान होता तेव्हा इथे आलेल्या चांगल्या कलाकारांच्या मैफिली ऐकायला येण्यासाठी त्याला लाच दिलीये (होय). जुन्या एखाद्या हिन्दी गाण्याचा राग ओळखता आला तर बक्षीस. दोघांनी मिळून एखाद्या गाण्यात कोणकोणती वाद्य वाजवलीत ते ओळखायचं. हे वाद्य वाजतय ते व्हायोलीन आहे की चेलो? हा ढोलकचा पीस ऐकरे परत... एकदाच. हा हार्मोनियमचा पीस जसाच्या तस्सा वाजवलास तर मागशील तो व्हिडिओ गेम!
हे आणि असलं बरच काही.

अर्थात माझं गाण्यात वावरणं त्याला आणि मलाही खूप फायद्याचं ठरलय. सिडनीत एक शास्त्रोक्त गाण्यात रमणायांचा एक ग्रूप गेली सतरा वर्षं दर महिन्याला एक कार्यक्रम करतो. घरगुती विनामूल्य मैफिल. त्यात मुलांसाठी वेळ असतो.
तसाच एक ग्रूप फक्तं मुलांचा मुलांनी सादर केलेला कार्यक्रम करतो. म्हणजे नेणे-आणणे आणि खाऊ-पिऊ सोडल्यास सगळं मुलं करतात. हिरिरीने छोटे-मोठे कार्यक्रम करतात. त्यांना आवश्यक साथीसाठी त्यांच्या आईने अगर वडिलांनी साथीदारांना फोन करून चालत नाही, ती मुलांचीच जबाबदारी. कार्यक्रमाचं ध्वनी-नियोजन आणि सूत्र संचालनही मुलच करतात.
आम्ही अशात कार्यरत आहोत. अशा काही गोष्टींत मुलांचा सहभाग असावा.

आता अजून एक गंमत.
गेली दोन वर्ष मुलाचा पियानो संपूर्ण बंद आहे. मी धूळ झटकते तितकच. ह्यात मी वैतागून, त्याला कोसून, ढोसून काही उपयोग नाही. कारण, मला माहीत आहे की कदाचित ही एक "अवस्था" असेल... फेज. ती संपून तो परत पियानोकडे वळेल.
आणि नाही वळला तरी हरकत नाही. त्याचं ते आनंदाने वाजवणं, प्रयत्नं करून पाच परिक्षा तीन वर्षाच्या अवधीत देणं, हा प्रवास इतका सुंदर होता की त्यासाठी हा पियानो सत्कारणी लागला.
आपण सहजासहजी "इन्व्हेस्ट" केलेले रिसोर्सेस वाया जाऊ द्यायला तयार नसतो. सगळेच प्रयत्नं हव्या तितक्या वेळात हव्या तितक्या प्रमाणात "रिटर्न्स" देत नाहीत - हा मी माझ्या काही चुकांमधून शिकलेला एक मोठा धडा आहे.

आतापर्यंत एव्हढं सगळं जमलं याचा अर्थ मुलगा हे आजन्म करेल असं आहे का?
अपेक्षाही नाही.
रुजवा केलेलं प्रत्येक रोप फळाला येत नाही म्हणून रोवायचं थांबवलं तर खायला नाही अशी अवस्था येईल.
मुलांच्यात करायच्या अनेक रुजव्यात हा एक. आलं फळाला तर त्याच्याही पुढची पिढी खाईल.
ही माझी हौस आहे का? जी मी लेकाच्यात पुरी करतेय? तर हो आणि नाही. हौस आहे. पण त्याच्यातून पूर्ण करण्याचा सोस नाही.
प्रामाणिकपणे सांगायचं तर हे एक देणं आहे जे माझ्या आई-वडिलांनी त्यांच्या परीने त्यांच्या कुवतीच्याही बाहेर जात आम्हाला दिलं. तो ठेवा आता व्याजासकट पुढच्या पीढीला देण्याचं माझं कर्तव्य फक्तं.

**************************************************
दिनांक - २२ मे २०११
ऑगस्ट २००८ मधे हा लेख लिहिला. आज शेवटचा परिच्छेद वाचतेय अन गंमत वाटतेय. गेल्या दोन्-चार महिन्यांत मुलानं संवादिनीला फुलं वाहण्यापुरताही हात लावलेला नाही. (अदृष्टं किती अचूक आपल्या तोंडून (लेखणीतून) वदत असतं.... )
तिची जागा आता पियानोने घेतलीये. तो उठलाय हे पियानोचा आवाज येतो तेव्हा कळतं. रात्री-अपरात्री पियानो वाजवून शेजारच्यांची झोपमोड करायची नाही हा नियम घालायची वेळ आलीये.
त्याचा-माझा संवाद आता उलटा चालू आहे. काय काय तूनळीवर वगैरे शोधून मला ऐकवतो. "ह्यात तुला लेयर्स ऐकू येतायत का? हा कॉर्ड किती वेगळा आहे... ह्यात त्याची पियानोवरची कमांड बघ... लांग लांगच्या शोमनशिपवर जाऊ नकोस... डोळे मिटून ऐक..."
आढ्याचं पाणी वळचणीला जाऊ लागलय Happy
तुमच्यातल्या अनेक पालकांना ह्या माहितीचाही उपयोग होईलच. Managing their own expectations is the biggest battle of parents with themselves... I think Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऍडमिन, चुकीच्या जागी घातलं असल्यास कृपया हा लेख हलवा.

दाद, वरच्या सुरेख लेखाबद्दल धन्यवाद. मुळात माझी संगीताची पार्ष्वभुमी तशी शून्य आहे. पण लहानपणी आई बाबांनी संगीत नाटकाना नेल्यामुळे ते आवडू लागलं. तबल्याची खूप आवड होती, पण तू काही शिकणार नाहीस, पैसे फुकट जातील वगैरे नेहमीच्या कारणांमुळे ते राहीलं. पण लेकीच्या बाबतीत तसं होऊ नये याचा पुर्ण प्रयत्नं करतो आहे. Passive listening तर सतत चालु असतं. बर्‍याचदा ती ते ऐकतही असते आणि गुणगुणतेही. पण कधीतरी ईतर मैत्रिणींच्या किंवा भावंडांच्या परिणामामुळे, "बाबा काय तुझी पकाव गाणी लावतोस" असा डायलॉग मारते आणि माझं डोकं फिरतं. मी स्वतः जरी आवर्जुन संगीताच्या शक्य तितक्या कार्यक्रमाना जात असलो तरी अजुन तीला न्यायला सुरवात केलेली नाही. पण ती पण आता करीन.

वरच्या पोस्ट बद्दल परत एकदा धन्यवाद.

daad,
tumache sagaLe lekh abhyaaspoorNa asataatach,paN haa kharokhar itakaa margadarshak lekh aahe.mii agadi taataDini passive learning tari suru karate mulaansaaThi gharaat.
tumhi "mulaanche sangopan" BB varahi lekh lihin asa promise kelay aaNi maajhi khaatri aahe,maajhyaasaarkhe barech jaN tyaa lekhaachi aaturteni vaaT baghat asatil:)thoDakyaat kaay tumhaalaa swastha basuu dyaaycha naahi:)
paN atishay muddesuud,nemakaa,aaNi margadarshanpar lekh aahe.lihityaa rahaa...
~Vrushali

धन्स जयदीप, वृशाली.
जयदीप, हे जे 'मग माझं डोकं फिरतं' आहे ना, तेच नेमकं माझ्या बाबतीतही झालं. मुलाला हार्मोनियम घरी शिकवत होते. एका विशिष्ट वयात आई-वडील सांगतात ते सर्वं चूक... ह्या फेजमध्ये शिकणं कमी (नाहीच) आणि भांडणंच जास्तं व्हायला लागली.
त्याचं शिकणं माझ्या 'आई आणि शिक्षक' पणाच्या इगोपेक्षा जास्तं महत्वाचं म्हणून दुसरीकडे सुरूवात केली. आता मी सांगितलेलंही ऐकतोच.
माझा लेक आमच्या जुन्या गाण्यांना अजूनही 'गॉथिक साँग्ज' म्हणतो. पण हल्ली ऐकतोही, आपणहून.

दाद, नेहेमीप्रमाणेच सुंदर लेखन.. इतकी सगळी वाद्यं घरात असणं म्हणजे किती सही!! थोड्याफार प्रमाणात माझ्या आईने असंच करायचा प्रयत्न केला.. दादाने गिटार,पेटी वाजवून्,शिकून तो प्रयत्न सफल केलाही.. पण मी सिंथेसायझर वाजवणे तितके पुढे नाही नेले.. तुमचा लेख वाचून परत सिंथ सुरू करावासा वाटलं.. Happy
तुम्ही वरचेवर लिहीत जा.. अप्रतिम लिहीता!!

दाद, तुम्ही खुप छान लिहीता, खरच तुमचे लेख वाचुन छान मार्गदर्शन होते.

मलापण खुप गाण्याची आवड आहे. आमच्या घरीपण सतत गाणी चालुच असत त्यामुळे कानावर चांगले संगीत संस्कार झालेत. मी पण बरेचदा सवाईला जात असे. मला तबला हे वाद्य खुप आवडते शिकायचेही होते पण तेव्हा घरुन काही प्रोत्साहन मिळाले नाही पण जेव्हा झाकीर हुसेन यांचा तबला सवाईला पहिल्या रांगेत बसुन ऐकला तेव्हा काय वाटले ते आता सांगता येत नाहिए.

आता माझी लेकपण (वय १०) सतत गाणी ऐकत असते, ती शाळेत जाताना त्यांचे व्हैन अंकल रेडिओवर जुनी गाणी लावतात बाकीची मुले ओरडतात पण हीला ती जुनी गाणी आवडतात. तेच गाणे पुन्हा कधी ऐकले की ती लगेच सांगते मी हे गाणे ऐकले आहे मला आवडले.
असेच तिने एकदा मला विचारले की मला ते 'मेरा जुता है जपानी' गाणे आवडले आहे, आपल्याकडे ते आहे का?

मी तिला अनिल मोहिलेंच्या संगीत रजनीला घेउन गेले होते प्रथम तीला फक्त स्वप्नील बांदोडकरची गाणी ऐकण्यातच इंटरेस्ट होता पण तिने ३ तास न कंटाळता तो पुर्ण कार्यक्रम ऐकला.

भाग्यश्री, सुरूवात करच. असा छंद माणसाला एकटं होऊ देत नाही हा माझा अनुभव आहे. वर्षा, धन्स गं. ऐकत राहिलं की आपोपाप गुणगुणायला होतं नाही?...

दाद,
खुपच छान लिहील आहेस. अगदी मनापासुन आवडले. हे मायबोलीवर नसलेल्या माझ्या काही मैत्रीणींना ज्यांना लहान मुले आहेत त्यांना ईमेल केले तुझ्या नावासहीत तर चालेल का? त्यांना याचा नक्कीच उपयोग होईल.

रुनी, जरूर. इथे आपण जी चर्चा करतोय ते सगळं एकमेकांच्या मदतीसाठी... त्यात तुझ्या मैत्रिणीही आल्याच.

सुरेख ! सुरेख !! सुरेख !!! धन्यवाद.

  ***
  We must not avoid pleasures, but we must select them. - Epicurus

  सुंदर दाद ! मी पण हार्मोनीयम वाजवायचे ( कोणे एके काळी ) माझ्या मुलाला तो २ वर्षाचा असल्या पासून त्यात आवड निर्माण झाली आणि ३ वर्षाचा असतांना सा रे ग म वाजवायलाही लागला, क्लास ला घेत नव्हते ( लहान होता म्हणून ). मी जमेल तस घरीच शिकवते. आता तो ४.५ वर्षाचा आहे.. क्लास ला घातल पण पहिल्याच दिवशी क्लास मधुन फोन रडतोय म्हणुन; मग जायला तयार नाही... आता तबला शिकायचा म्हणतोय पण पुन्हा मागल्या वेळे सारखेच घडणार नाही ह्याची शाश्वती नाही. आता तुमच वाचून मी सुद्धा त्याच्या बरोबर हार्मोनीयम शिकायला जायच अस ठरवलय. खरोखर मुलांवर इतकी मेहनत घेणारे पालक किती कमी असतील !

  रुजवा केलेलं प्रत्येक रोप फळाला येत नाही म्हणून रोवायचं थांबवलं तर खायला नाही अशी अवस्था येईल.
  >>>> सुंदर!
  _________________________
  -A hand that erases past can create a new begining.

  दाद, खरंच खूप सुरेख लिहिलं आहेस! ( त्यात नवं ते काय? Happy )

  मला संगीतातलं ओ की ठो कळंत नाही. प्रयत्न केला पण आवडही निर्माण झाली नाही. लग्नानंतर नवर्‍याच्या कृपेनं जसराज, चौरासिया वगैरे ऐकायला मिळाले. पण नादब्रह्म कधी प्रसन्न झालं नाही.
  मुलाच्या बाबतीत मात्र तो अगदी लहान (२-३वर्षांचा) असतानापासून आम्ही बरेच प्रयत्न केले. त्याचा बाबा त्याला घेऊन बासरी वाजवायचा. न्यु यॉर्कला आल्यावर भारतीय आणि पाश्चात्य संगीताचं एक्स्पोजर द्यायचा प्रयत्न केला. युनिव्हर्सिटीत होणार्‍या गाण्याच्या, वादनाच्या समारंभांना घेऊन जायचो. पण 'पोर आईवर गेलंय' अशी स्थिती होती. मी तरी जवळजवळ नाद सोडला.
  तो ७ वर्षांचा असताना ओळखीतल्या एका मुलाच्या व्हायलीन वादनाच्या कार्यक्रमाला त्याला नेलं. बरोबरीची मुलं च्यलो, व्हायलीन, व्हिओला वगैरे वाजवताना बघून स्वारी खुष! अचानक त्याला शिकावसं वाटायला लागलं. डॉ. सुझुकी नामक संगीतकारानं अगदी लहान वयापासून मुलांना वाद्य शिकवण्याच्या सुंदर पध्दती शोधून काढल्यात. त्यांचे शिष्य जगभर ह्या शाळा चालवतात. निषाद अश्याच एका शिक्षकांकडे व्हायलीन वाजवणं शिकायला लागला. आज तो उत्तम वाजवतो, अजुनही एका शिक्षिकेकडे शिकायला जातो.. इथल्या प्रतिष्ठीत फ्लोरिडा सिंफनी युथ ऑर्केस्ट्रामधे व्हायलीन्वादक म्हणून ओळीनं तीसर्‍या वर्षी निवडला गेलाय.
  सांगायचं काय, कधीतरी मुलांना उपरती होते! आपण केलेल्या प्रयत्नांना यश येईलच असं नाही. मुलांना शक्य असेल तेव्हड्या सगळ्या गोष्टींची ओळख करून देणं महत्वाचं! त्यातलं जे काय आवडेल ते ती उचलतातच.

  दाद म्हणतेय तसं...रुजवा केलेलं प्रत्येक रोप फळाला येत नाही म्हणून रोवायचं थांबवलं तर खायला नाही अशी अवस्था येईल.

  धन्यवाद दाद.
  हे थोडस अस्थानी आहे खर तर पण तरीही लिहितेय.
  बर्‍याच दिवसापुर्वी हा व्हिडीओ बघीतला होता [video:http://www.youtube.com/watch?v=HKSZiZrYbcM]
  याचे बाकीचे पण बरेच व्हिडीओ आहेत मराठी गाणी, नाट्यगीत, शास्त्रीय संगीत वाजवतांनाचे.
  मला नेहमी प्रश्न पडतो या मुलाच्या आई बाबांनी याला नक्की कसे शिकवले असेल?

  दाद अप्रतिम लेख. जुईचा बाबा कुठेही न शिकता casio वाजवतो. रोज रात्री दोघे काहिना काही वाजवत असतात. मलाही शिकवायला ट्राय केल पण नाही जमल. Happy पण मुलीला जमतय. संगीतात रस आहेच. एकदा ऐकलेली गाणी लक्षात रहातात. तु लिहिलयस तस कार मधे आम्ही जुनी गाणी पण लावतो आणि नको नको बोर आहेत अस म्हणत ती नंतर ती गाणी गुणगुणत असते. Happy

  खूप छान माहिती दिलीत. इशान आत्ता सव्वा वर्षाचा आहे त्यामुळे संगिताची आवड आहे की नाही ते सांगता येणार नाही. पण स्वारीला खेळण्यातले पिआनो फार आवडतात. नवर्‍याच्या मित्राने आमच्या घरी ठेवलेला key-board पण बदडत असतो. तसेच अगदी लहान असल्यापाउन गाणे लागले की तज्ञासारखी मान हलवतो. अर्थात हे आपले "माझा तो बाळु..." अशी काय म्हण आहे ना तसे पण असु शकते Happy पण तुझा लेख वाचुन प्रयत्न करायला हरकत नाही असे वाटते आहे. माझी आई कुठेही गाणे न शिकता फार गोड गाते. नवरा पण बराच गातो (असे त्याच्या मेहुण्या म्हणतात, मला तर कधी ऐकु आले नाही ;)). मी कायम अभ्यास एके अभ्यास केले (आणि त्यातच फुशारकी मारली :() पण इशानला एखादे वाद्य आले किंवा गाण्यात आवड असेल तर कित्ती छान असे वाटते. अर्थात अपेक्षा ठेवायच्या नाहीत असे पण ठरवले आहे.

  सगळेच प्रयत्नं हव्या तितक्या वेळात हव्या तितक्या प्रमाणात "रिटर्न्स" देत नाहीत - हा मी माझ्या काही चुकांमधून शिकलेला एक मोठा धडा आहे >>> आई गं...मला विचार्....गेले चार्-साडे चार महिने प्रयत्न करते आहे, गाडी ० थेंब वरनं कधी अर्धा तर कधी एक oz दुधावर आली आहे (सर्वांनी लाकडाला हात लावा...;)).

  रूनी, माझा एक फंडा आहे. ह्या मुलाइतकी तयारी जेव्हा इतक्या लहान वयात दिसते तेव्हा माझी खात्री आहे की ह्याचा "रियाज" ह्या जन्मीचा नाही, आधीचाच आहे. अशी चाइल्ड प्रॉडेजी अनेकवेळा दिसतात. हा पठ्ठ्या त्याच कुळातला दिसतो.
  मी जेव्हा तबला शिकत होते तेव्हा एक मुलगा माझ्या गुरुजींकडे गाणं शिकायला यायचा. वय वर्षं पाच पण बालगंधर्वांचं नाट्यसंगीत इतक्या तयारीने म्हणायचा..... की आजही ते आठवून माझ्या अंगावर काटा उठतो.
  पण पुढे काही नाही गं. एकदम झोपेतून उठल्यासारखं तीनेक वर्षांत गाणच सोडलं Sad

  सुरभी, ये हुई ना बात! करच तूही सुरूवात. त्याच्याबरोबर वेळ घालवण्याचं अजून एक साधन.

  सिंडरेला, (खरी, खेळातली नाही) तालवाद्य आणून दे त्याला. बोंगो, झांज, चिपळ्या, खंजिरी, माऊथ ऑर्गन इ. फार महाग नसतात ही वाद्य. तीन्-चार महिन्यांत एक वाद्य घ्यायचं. भारतात गेल्यावर किंवा इथे कुणी येत असल्यास, लेकासाठी काय आणू म्हटल्यावर मी असलच काहीतरी सांगायचे. काहीतरी महाग कपडे, खेळ वगैरे आणण्यापेक्षा हे बरं.

  दणादणा वाजवून डोकं ऊठवेल तेव्हा मला शिव्या घाला... चालतिल Happy

  हे एक देणं आहे जे माझ्या आई-वडिलांनी त्यांच्या परीने त्यांच्या कुवतीच्याही बाहेर जात आम्हाला दिलं. तो ठेवा आता व्याजासकट पुढच्या पीढीला देण्याचं माझं कर्तव्य फक्तं.>>>>>>>>>>>>>>>>

  कित्ती खर, कित्ती विचार करायला लावणार....

  खुप छान लिहितेस दाद. अशीच लिहित राहा ग... खुप काही मिळतय तुझ्या लिखाणातून.
  -प्रिन्सेस...

  अरे ती वरती रुनीने दिलेली अक्षर साठ्येचे व्हीडीओ मी पण बरेच वेळा बघतो तू-नळी वर.. तो पोरगा नुसता ताला-लयीत्-सुरात वाजवत नाही तर भन्नाट जागा पण घेतो अधल्या मधल्या.. केवळ अशक्य आहे तो मुलगा..

  दाद, अप्रतिम लेख!! मी आजच वाचला...... इतक्या उशीरा का वाचला असा पश्चात्ताप होतोय. मी ह्या गृपची सदस्यच नव्हते, त्यामुळे हा लेख तू इथे टाकला आहेस हे कोणाच्या तरी विचारपुशीत वाचले. आज शोधून काढला आणि वाचला....

  मुलांना गाणं शिकवण्यासाठी योग्य वय काय?

  माझी मुलगी : वय वर्षे अडिच : ह्या वयात भरपूर गाणी/बडबडगीतं तोंडपाठ आहेत. तिच्या लहानपणापासून तिला भरवताना, आंघोळ घालताना वगैरे माझं तोंड अखंड चालू असायचं. गाणं म्हण, गोष्ट सांग, तिच्याशी गप्पा मार वगैरे .... त्यामुळे ती वयाच्या ८व्याच महिन्यात व्यवस्थित सुस्पष्ट बोलायला लागली. बढाया मारत नाही पण आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती खरोखरच बेफाट आहे तिची. एकदा ऐकलेलं गाणं (आणि आवडलेलं असेल तरच) तिच्या व्यवस्थित लक्षात राहतं, निदान धृवपद किंवा पहिल्या दोन ओळी तरी. आणि मग पूर्ण पाठ होईपर्यंत माझ्याकडून म्हणून घेते. गाण्याची चालही बर्‍यापैकी बरोबर असते.

  तिने गाणंच शिकलं पाहिजे, किंवा नृत्यच शिकलं पाहिजे किंवा एक तरी खेळ आलाच पाहिजे, ह्या सगळ्याबरोबर अभ्यास तर १००% हवाच असा काही अट्टाहास मी करणार नाहीये. पण जे तिच्या अंगात नैसर्गिक आहे ते फुलवायचा मात्र आमच्या परीने प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे एकूण पाहता, तिचा कल गाण्याकडे आहे असं आत्ता तरी मला वाटतंय, कदाचित माझं रीडींग चुकीचंही असू शकेल. पण तिला गाणं शिकायला पाठवावी असं वाटतंय. तर साधारण तिच्या कुठल्या वयापासून तिला पाठवू? सुदैवाने आम्ही ठाण्यात राहत असल्यामुळे चांगले resources ही उपलब्ध आहेत.

  दाद, तुझं प्रत्येक लिखाण म्हणजे आमच्यावर संस्कार असतात. मग भले ती कथा असो, लेख असो, कविता असो वा ललित, तुझे शब्द आम्हाला खुप काही शिकवून जातात. वेळ मिळेल तसं प्लिज नियमितपणे लिखाण करत जा, आम्ही सगळेच अगदी आतुरतेने वाट पाहत असतो.

  व्वा! सुन्दर लेख! तुझ्या पोराचा हेवा वाटतो की त्याला हे सर्व अशापद्धतीने उपलब्ध झाल आणि त्याने त्याचा वापर केला! Happy
  [नाहीतर आम्ही, जळ्ळ मेल लक्षण ते, औरन्गजेबी खाक्यात वाढलेले! साध विविधभारती वा बिनाका ऐकायच तर लपुन लपुन ऐकाव लागे! शेवटी जेव्हा स्वतःचा ट्रान्झिस्टर स्वतः बनवला (जेटकिन्गचे ७५ रुपयान्च किट वापरुन) तेव्हा खुशीचा श्वास घेतला! नाही म्हणायला मावशी लग्नाआधी जेव्हा आमच्याकडे होती स्थळशोधमोहिमेकरता, तेव्हा ती अकरा की साडेअकराचे कामगार विश्व वगैरे कार्यक्रम लावायची, खूप सुन्दर मराठी गाणि ऐकली तेव्हा! (तिसर्‍या इयत्तेआधी)
  नाहीतर तो जमाना म्हणजे "गाणीबजावणी करुन अन चित्र काढून काय कधी कुणाच पोट भरतय का?" या विचारान्चे!
  तस आमच्या आजोळी सगळे सन्गितातले कलाकार! एक मामा तर वयाच्या चौथ्या वर्षापासून तबला वाजविणारा! पण मे महिन्यातल्या मोजक्या मुक्कामात तिकडून ही अक्कल काही मिळविता आली नाही!
  आता माझ्या पोरान्चा मामा देखिल सन्गितातलाच, सन्गित शिक्षक! जमेल तेवढ्या सन्धी पोरान्पुढे ठेवल्या हेत! घेतिल्/शिकतील तेवढ त्यान्नाच उपयोगी!]
  ह्या वरल्या उत्कृष्ट लेखाने काही जुन्या बर्‍यावाईट आठवणी जाग्या झाल्या!
  अन मी पोरान्ना काय पुरवतो हे, कस पुरवायला पाहिजे, याचीही उजळणी झाली
  गुड! Happy
  ...;
  आपला, लिम्बुटिम्बु

  अरे वा. सुंदर लेख. आम्हीही ह्याच गोष्टीतुन जात आहोत. माझी लेक आता थोडाफार बर्यापैकी कि बोर्ड वाजवते. रोज वाजव सांगीतले तरी टाळाटाळ करते पण मध्ये काही दिवसांपुर्वी तिने "माँ" ह्या गाण्याचे पहिले कडवे अचानक वाजवुन दाखवले. ऐक्दम खल्लास झालो होतो आम्ही तेव्हा. रागदारी शिकतेय. पण रियाजात रोज टाळाटाळ. ह्या साठी तिच्या बाईंनी ऐक महीना क्लास बंद करुन पाहीला, मग काही दिवस रोज रियाज पण परत टाळाटाळी. बहुतेक ही ऐक फेजच असते. ऐका दिवशी सुरत पियाकी म्हणुन दाखविले अचानक. पॅसीव्ह ऐकन्यामुळे असेल कदाचित. तिला कान नक्कीच आहे. गुरुपोर्णीमेच्या कार्यक्रमात आम्ही "भुप" ची तयारी करुन घेण्याचा प्रयत्न केला, वाटले स्टेज वर काय गाणार ही बाई पण तिकडे बाई साहेबांनी कडकडुन टाळ्या घेतल्या.
  ही घरसोड थांबविन्यासाठी अजुन काही वेगळे करता येईल का ते सांग. मदत होईल.

  रुपाली तो गिफ्टेड पोरगा आहे. त्याचा दुसरा भाऊ (तो नाचनारा) तो ही मस्त वाजवतो. कैक दिवंसापुर्वी त्यांची ही चित्रफित पाहीली तेव्हा पासुन यामिनीला उत्तेजन देन्यासाठी बरेचदा दाखविली.

  बापरे, मंजू! संस्कार वगैरे नको म्हणू गं... हे म्हणजे कसं तर 'ही माझी रेसिपी आणि ती तशीच का ह्याची, ही माझी कारणं'! इतकच.
  तुमचा पदार्थ करून बघताना थोडं इथलं तिथलं करावं लागणारच. मलाच अजून एखादं असतं तर हाच फॉर्म्युला उपयोगी पडला असता असं नाही.... आमच्या आईकडची अस्सल मालवणी म्हण सांगायची तर - आपल्या परड्यातल्या अळवाची खाज आपल्यालाच माहीत Happy
  असो.
  मंजू ज्या वेळी तिला एका जागी बसून काही instructions घेऊन त्याबरहुकूम प्रयत्नं करता येईल तेव्हा ती रितसर "शिकायला" तयार झाली असं समजावं. तोपर्यंत अशा गुरूकडे तिनं जायला हवं जो/जी तिचा गाण्यातला इंटरेस्ट टिकवून ठेवेल. काही मुलं साताठ वर्षांची होईपर्यंत त्या फेजला आलेले नसतात. म्हणजे आपली आपण गुणगुणतिल, वाजवतील. पण सांगितलेली गोष्टं "taking on board" करून त्यानुसार "रियाज" व्हायला हवा, त्याला तयार नसतात.
  अशा मुलांना एका जागी बसून अभ्यासही करायला आवडत नाही. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्याला exposure देत रहावं लागतं. गाण्याचा कंटाळा आला तर एखादं वाद्य सुरू करावं.... त्याचाही कंटाळा येतोच. मग परत गाणं.

  केदार, रियाज हा मोठ्ठा शब्दं आहे. दररोज पाढे म्हणणे, परवचा, शुद्धलेखन ह्याचा आपल्याला किती कंटाळा होता ते आठव म्हणजे रोज ठरवून अमुक इतका "रियाज" तिला किती जाचक वाटत असेल ते लक्षात येईल. मुलांसाठी ती एक activity आहे. ती येनकेनप्रकरणेन चालू ठेवणं आपलं काम Happy
  तिची धरसोड होणार आहे असं गृहीतच धर. त्याबद्दल फारसं बोलायचच नाही. फक्तं तिनं एक सोडलं तर धरायला दुसरं तयार हवं.... गाणं, नाच, परत वाद्य. एक दिवस असं लक्षात येईल की, कोणतीतरी एकच गोष्टं ती सातत्याने करायला तयार होते आहे. मग ते पुढे वाढवायचं.

  तुम्हाला सगळ्यांनाच एक विनंती. हे करून बघा. एखादा छोटासाच ग्रूप - समवयस्कं मुलांच्या कुटूंबांचा असावा. ठरवून तीनेक महिन्यातून एकदा सगळे भेटा. खाणं-पिणं अगदी माफक असावं... objective मुलांचा कार्यक्रम आहे, एवीएठी नाही.
  त्यावेळी मुलांनी काहीतरी सादर करायचं. मुलांना वेळ ठरवून द्यायची. त्या वेळेत ते झालं पाहिजे. मी वर म्हटल्याप्रमाणे असा एक ग्रूप इथे आहे. माझ्या लेकाला आणि बाकी बर्‍याच मुलांना त्याचा खूप फायदा झाला. ठरवून तीन महिन्यांत काहीतरी "सादर" करायचय म्हटलं की आपसूक प्रयत्नं करतात मुलं.

  हो ते आठवुनच तिच्या बळजबरी नाही. Happy अजुन लहान असल्यामुळेच कदाचित धरसोड असावी. दोन ऐक वर्षांनंतर लागेल गाडी रुळाला. तसा ग्रुप अजुन नाही पण ओळखीच्यातील प्रत्येक मुल काही तरी प्रत्येक गेट टुगेदरला काही तरी म्हणून दाखवतात. ग्रुपची आयडिया आवड्ली.

  ही गृपची कल्पना चांगली आहे. तसे आमच्याकडे कौटुंबिक कार्यक्रम सारखेच होत असतात. त्यावेळी उपस्थित सर्वांना काहीतरी सादर करण्याची प्रेमळ सक्ती असतेच, तेव्हा ती तिला येत असलेलं काहीतरी म्हणून दाखवते, पण ते सुद्धा इतर मुलं काहीतरी करून दाखवतात म्हणून, स्वतःहून काही करायला अजून लाजते. पण 'मी काय म्हणू' असं मला विचारत मात्र नाही, जे मनात येईल ते म्हणते. तेवढा बोल्डनेस असला तरी पुरे झाला नाही का.... Happy आणि एका जागी बसणं म्हणशील तर सध्या झी मराठीवर लहान मुलांच्या गाण्याची स्पर्धा असते, तो कार्यक्रम एका जागी बसून, लक्ष देऊन ऐकते.

  बरं ती म्हण मालवणीतच लिही की, मराठीतून का लिहिली? मराठीत त्याला 'ज्याचं जळतं, त्यालाच कळतं' असं म्हणत असावेत कदाचित..... Happy

  काय लिहिलं आहेस दाद! डोळ्यात पाणीच आलं का कोण जाणे.. आपलं स्वतःचं मूल कुठल्यातरी कलेत पारंगत होत आहे हे स्वत:च्या डोळ्यानी पहाणे यात काय सुख आहे!
  कळकळीनी लिहिलं आहेस! जियो!
  --------------------------------------
  सलोनासा सजन है और मै हूँ
  जिया में इक अगन है
  और मैं हूँ..

  खूप छान विचार आहेत शलाकाताई. माझ्या मैत्रिणीची मुलगी सुंदर पियानो वाजविते. तिला नाच आणि गाण्यात रस आहे पण अळम टळम फार करते. अभ्यास असो वा इतर काही, ती फार लवकर कंटाळते. स्वत:हून सुरुवात करत नाही. प्रत्येक ठिकाणी आई लागते. एकदा सुरु झालं की मात्र रमते. ह्या सुरुवातीच्या problem वर काही उपाय?

  लेख छानच आहे. बहुतेकांची मुले लहान आहेत म्हणुन ठीक आहे. माझी मुलगी मोठी आहे. ती आम्हा दोघांप्माणे कानसेन आहे पण शाळेत बँडमध्ये फ्ल्युट वाजवते. तिला कधीही सक्ती केली नाही. तिचे तिनेच ठरवले. बकी कुठचीही रागमाला किंवा भारतिय संगीत वाजवावे असे आम्हाला कधीच वाटले नाही. मुळात आम्हाला ते कधी कळलेच नाही. पण ती जे काही वाजवते ते ऐकायला फार सुरेल आणि छान वाटते. तसेच माझ्या एका मित्राचा मुलगा गिटार वाजवतो. तोही छान वाजवतो. मला ईथे एव्हढेच म्हणावेसे वाटते की त्यांना आवडते ते वाजवू द्यावे. प्रत्येक वेळी "आमचे संगीत" वाजवावे हा आग्रह धरु नये. मी स्वत: कधी जीव काढुन इंग्रजी गाणी ऐकत नसे. पण आता मुलीमुळे बरीच गाणी आणि गाय्क कळले. ह्या देवाण-घेवाणीमुळे मुलांनाही तुमचे ऐकण्यात इंटरेस्ट वाटतो. आज ती जितकी अव्वडीने Akon ची"Dollar Dollar Bill" ,"Dangerous Girl" किंवा Leona Lewis "Keep Bleeding Love",Sean Kingston असे ऐकते त्याच बरोबर जाने तु... वगैरेही आवडीने ऐकते.

  सांगण्याचा मुद्दा एभढाच की दादने म्हटल्याप्रमाणे जो जनरेशन गॅपचा प्रॉब्लेम होतो तो कमी होण्यासाठी आपणही "त्यांच्या" संगीतात रुची घ्यायला हवी. मला एकॉन आणि लिओना लुईस त्यातुनच मिळाले. त्यामुळे आता मी आणि मुलगी गाण्यची सहज (जबरदस्ती न करता) देवाण्-घेवाण करतो.

  विस्हयाण्तर झाले असेल तर क्षमस्व. कारण मुळ मुद्दा शास्त्रीय संगीत शिक्षणाचा आहे.

  चिन्नू, अळंटळं....! बर्‍याच मुलांचा हा स्वभाव असतो. नैसर्गिक आहे ते. त्यावर उपाय असा नाही. आपण त्यात रस घेऊन त्यांच्याबरोबरीने ते करत रहाणं हा माझा उपाय होता. माझ्या एका मैत्रिणीला मी सांगितलं की, लेकाबरोबर बस आणि त्याच्याकडून शिक. एकदम फाकडू उपाय. लागू पडला. आईला शिकवायचं म्हणून फारच व्यवस्थित वाजवतो. माझी मैत्रिण कळूनही त्याच्या पियानोच्या scriopts चे भलते अर्थ लावते. आईला सुधारण्यात कोण आनंद Happy

  माझा लेक अजूनही अळंटळं करतो. नेहमीचा त्याचा रियाज त्यानं स्वत:हून करणं हे माझं स्वप्नं अजूनही स्वप्नंच आहे. पण भारतातल्या मुलांच्या आजूबाजूला जसं संगीत घडत असतं तसं इथे नसल्याने, अगदी हे सुद्धा "घडवावं" लागतं. कधी सामोपचाराने तर कधी रागावून.
  मध्यंतरीच्या काळात साथीचं वाजवणं सोप्पं, सोलो कठीण असा स्वाभाविक शोध त्याला लागलाय. कारण साथीच्या वाजवण्यात आपल्याला विचार करायचा नसतो, गाणार्‍याला फॉलो करत राहिलं की पुरे इ. इ. सोलोसाठी आप्ल्यालाच सगळं करायचं... ह्यामुळे सोलो वाजवायला अळंटळं... त्याच्या वयाला अळंटळं म्हणजे "नकार". त्यावर मलाच अजून उपाय सापडत नाहीये Sad

  mbhure, खरय. मुलं एकदा मोठी झाली की, ह्या गोष्टींसाठी किती झटावं लागेल ते मला सांगताच येणार नाही.
  मुद्दा शास्त्रीय संगीताचा नाही. मुळात संगीताची आवड निर्माण करणे आणि ती जोपासणे हा आहे. माझ्या मुलाने पियानो शिकावा हाही माझा प्रयत्नं होताच. मी स्वतः भारतीयं शास्त्रीय संगीतात वावरत असल्याने त्यात मुलाला मदत करणं मला सहज शक्य झालं. पाश्चात्य संगीत तर पाश्चात्य! पण त्यासाठीही वरच्या लेखातलं सगळं करणं आलच.

  मुलांना exposure आणि संधी हे महत्वाचं, कोणत्याही संगीतात का असेना. मुलांच्या मागे लागणं, त्यात आपण सहभाग घेणं, त्यांना सर्वतोपरी मदत करणं महत्वाचं. संगीतासारखी कला, छंद माणसाला कधीही एकटं होऊ देत नाही..... हा माझा अनुभव.

  >>संगीतासारखी कला, छंद माणसाला कधीही एकटं होऊ देत नाही.....
  अगदी खरं शलाकाताई. मुलांना त्यांचा आवडता छंद असायला हवाच.

  Pages