मुलांमधे संगिताची आवड आणि जोपासना

Submitted by दाद on 3 August, 2008 - 20:56

संगिताची आवड - माझा अत्यंत आवडीचा विषय.
माझ्याबाबतीत, माझ्या भावाच्या बाबतीत आणि माझ्या लेकाच्या बाबतीत काय उपयोगी पडलं ते सांगणार आहे इथे.
त्याआधी हे ही सांगणं आवश्यक की माझा भाऊ उत्तम हार्मोनियम, तबला, बासरी वाजवतो. त्यापैकी फक्त तबला थोडाफार शिकलाय.
मी तबला वाजवते (बहुतेक बर्‍यापैकी Happy ), हार्मोनियम शास्त्रोक्त गायकाला साथ करता येईल इतपत. तबल्याच्या योगे ढोलकी आणि ढोलक सारखी वाद्य वाजवता येतात. भावालाही.
लेक हार्मोनियम वाजवतो. (आधी राग, चीज समजून घेऊन शास्त्रीय संगीताची, गाणी माहीत असल्यास भावगीते वगैरेची मैफिल वाजवण्याइतपत). तबला नाही. मला वाजवताना बघून (बघून) ते girs' instrument असल्याची lahaanapaNee खंबीर खात्री! त्यामुळे.

आता ही आवड जोपासण्याविषयी.

घरातल्यांना मुळात आवड असणं, कमीतकमी त्यांनी तसा प्रयत्नं करणं आवश्यक आहे. नाहीतर मुलांत आवड निर्माण करणं किंवा जोपासणं हा एक ’कार्यभाग’ होऊन बसतो आणि त्यातला सहजभाव निघून जातो.

आमच्या घरी सगळ्यांनाच संगीताची आवड. घरात गोकुळ-अष्टमी, गणपती वगैरे निमित्त कायम कार्यक्रम चालू. मला माहीतही नव्हतं तेव्हापासून घरात पेटी, तबला, ढोलकी, तानपुरा, बासरी अशी वाद्य होती. खंजिरी, डफ, घुंगुर, कब्बास अशीही वाद्य होती, ज्यांना साईड रिदमची वाद्य म्हणता येतील. ह्या ना त्या निमित्ताने आणि तसंही, सगळ्याच वाद्यांवर हात चालवलाय. त्यामुळेच न शिकता पेटी वाजवता येतेय, आम्हा दोन्ही भावंडांना.

तेव्हा..... घरात विविध वाद्य असावीत आणि तीही चांगल्या अवस्थेत. माझे आई-बाबा तबला, ढोलकी वाजवत नव्हते तरी घरात दोन उत्तम जोड होते.

घरात कायम रेडिओवर गाणी चालू असायची. रात्री झोपताना नॅशनल कार्यक्रम ऐकतच झोपलोय... बाबा कधीतरी रेडिओ बंद करत असावेत. हे ऐकणं मुद्दाम किंवा ज्याला active म्हणतात तसं नव्हतं.... सहज होतं, passive. समोर बसून हे ऐक असं कुणी सांगितलं नाही. संगीत आमच्याभोवती घडत राहिलं आणि आम्ही ते शोषत राहिलो, बहुतेक. एकवेळ नवीन कपडे केले नाहीत एखाद्या दिवाळीला, पण आठ वर्षांची होते तेव्हापासून लग्न होईपर्यंत वारीला जावं तशी सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला गेलेय, बाबांबरोबर. म्हणजे त्यांनी नेलय. नुस्तं शास्त्रीय नाही पण भावगीतं, नाट्यगीतं अशा कार्यक्रमांनाही बाबा आवर्जून न्यायचे.

माझा लेक (एकच आहे)- लहानपणी, मी आणि माझा नवरा त्याच्याशी त्याच्या वयाचे होऊन भांडलो आहोत... गाडीने कुठेही जायचं असल्यास, एक वेळ आमची गाणी लावली जातील ह्यावरून. माझं आणि नवर्‍याची भांडण(??) त्याने बघितली ह्यावरून, त्यामुळे त्याच्याशी केलेलं भांडण नडलं नाही त्याला. नवरा जुन्या हिंदी गाण्यावरून आणि मी शास्त्रोक्त पासून भावगीतां पर्यंत आणि गजलांपासून लावण्यांपर्यंत कशाहीसाठी.
आता (वय १८), जाईन विचारित रानफुला सारखं भावगीत, ’बोलावा विठ्ठल’च्या तीनेक चाली, मेहदी हसनच्या गजला, मदन मोहनची हिन्दी गाणी, असलं त्याला माहीत असतं आणि थोडक्याच प्रयत्नांत तो वाजवू शकतो. त्याचं त्यालाच आश्चर्य वाटतं की "हे असलं" गाणं त्याला माहीत आहे आणि तेसुद्धा कधी कधी मधल्या म्युझिकसकट.

तर, अशाप्रकारे चांगलं सगीत आजूबाजूला घडू द्यावं... आपोआप मुलं ते आत्मसात करतात. कधी कधी वरच्यासारखा थोडा वेगळा मार्ग अवलंबावा लागतो Happy

मुलगा लहान होता तेव्हापासून माझ्या घरात तबला (हं?), हार्मोनियम, सन्तूर, बोंगो, कब्बास, चिपळ्या, घुंगरू, आणि इतर ताल वाद्य आहेत. मी काहीतरी वाजवतेय म्हटल्यावर तो नकळत वाजवायचा. कधी कधी मी मुद्दाम चुकायचे. तो सुधरायचा मला... असं नाही आई, असं!
माझ्या एका मैत्रिणीला मी तिच्या मुलीबरोबर गाणं शिकायला जा असं सांगितलं. मुलगी कधी कधी तिला शिकवते आणि म्हणूनच मग आईनं सांगितलेलं ऐकतेही.

मुलाने पियानो वाजवावा असं मला वाटलं. कारण त्यायोगे त्याच्या ऑस्ट्रेलियन मित्रांशी त्याचा संवाद राहील, असं मला वाटलं. घरातला कीबोर्ड पहिला महिनाभर वापरला. त्याच्या क्लासला मी सुद्धा जात होते, नुस्तीच. शिकायला नाही.
लक्षात आलेली गोष्टं म्हणजे, तिच्याकडल्या "खर्‍या" पियानोवर हा आवडीने वाजवतो आणि घरात पाट्या टाकतो. तेव्हा घरी पियानो आणला (हिन्दी सिनेमासारखा ग्रँड नाही पण व्हर्टिकल). तेव्हापासून उत्साहाने प्रॅक्टीस. मनापासून प्रयत्नं करून पियानोच्या पाच परिक्षा पूर्ण केल्या. तबला आणि संतूर, सोडल्यास, सगळीच साइड रिदम्सची वाद्य जी घरात आहेत, ती त्याला वाजवता येतात.

आपल्या लहानग्याला (वय वर्ष ३ म्हणजे शिकायला सुरूवात करायला अजून लहान) माझ्याकडे तबला शिकवू इच्छिणार्‍या एकीला, पहिली दोन वर्षं नुस्ती वेगवेगळी तालवाद्य आणून दे घरात असं सांगितलं. त्याचा तालाचा सेन्स इतका उत्तम झालाय की... बस्स.

तर... वाद्य असावीत आणि ही सगळी वाद्य उत्तम प्रतीची असावीत. "उत्तम प्रतिची" हे सांगणं अतिशय महत्वाचं.
मुलांना एखादं वाद्य वाजवण्यात आनंद मिळाला तरच ती त्यात रस घेतात. शिकण्याच्या काळात, गुरुजींनी ऐकवलेला नाद, सूर आपल्या वाद्यातून तस्सा येण्यासाठी, वाद्य चांगलं हवं. तरच रियाज करताना आपल्या आणि गुरुजींच्या नादातला फरक कळू शकेल.
चांगला नाद असलेला तबला, सगळे सूर वाजणारी, त्यांच्या उंचीला झेपेल अशी, भाता फार जड असणार नाही अशी पेटी... हे महत्वाचं आहे.
साधारणपणे ’आत्ता घेऊ काहीतरी सेकंड हँड किंवा शेजारच्याचं वगैरे आणू. शिकला आणि जमतय त्याला असं दिसलं तर मग आणू बर्‍यापैकी. आत्ता काय करायच नवीन?’ असा विचार असतो पालकांचा.
पाल्यात आवड निर्माण करण्याची आवश्यकता तुम्हाला आहे, पाल्याला (अजून) नाही.

त्यांच्या शिकण्यात आपल्याला रस हवा, त्यांचा क्लास ही घरात महत्वाची, (हाय प्रायॉरिटीची) गोष्टं मानावी. शक्यतो क्लास चुकवू नये. एकवेळ डबल बुक केली म्हणून पार्टीला जाणं रद्द करावं. मोठ्यांनी महत्वं दिलं की लहानही देतात.

मुलगा सुरुवातीची पेटी माझ्याकडेच शिकला. मग आमची भांडणं जास्तं आणि शिकणं कमी Happy व्हायला लागल्यावर, दुसरीकडे शिकणं चालू केलं. अगदी गेल्यावर्षीपर्यंत त्याच्या क्लासला जाण्यापाई दर शुक्रवारी माझे ड्रायव्हिंग करण्यात पाच तास जायचे. दोन तास कामावर जाणे-येणे आणि तीन तास क्लासला जाणे-येणे.
इथे फुशारकी नाही सांगायचीये. बात अशी आहे की, आपल्यातले अनेकजण वेळ नाही म्हणून अशा गोष्टी टाळतो. शुक्रवारी पार्टीला बोलावल्यास एखाद्यावेळी जाऊ दीड तासाचं ड्रायव्हिंग करीत. हे माझ्या एका मैत्रिणीने आपल्या मुलीचा पेटीचा क्लास बंद करण्यामागचं कारण म्हणून सांगितलं.
घराच्या जवळ पंधरा मिनिटांच्या टप्प्यात नाही म्हणून आमच्या मुलांना "हे असलं" शिकता आलं नाही..... इतर काही अतिशय तशीच "नाईलाज" असणार्‍या कारणांव्यतिरिक्तं हे कारण... माझ्या दृष्टीने "हलगर्जीपणाचं"च आहे.

अनेकजण मुलाच्या क्लासशी संबंध हा नेणे-आणणे, फी देणे यापुरताच ठेवतात. लेकाचा क्लास हा त्या वेळात शॉपिंग किंवा जवळच्या मैत्रिणीकडे चक्कर ह्यासाठी वापरू नये. (अगदीच त्याच्या गुरूंना पालकांचं बसणं पसंत नसेल तर इलाज नाही)
ह्यामुळे मुलांना मुळात खूपच आवड असेल तरच ती आपणहून क्लासला जाणं, शिकणं, घरी येऊन रियाज करणं करतील.

माझ्या मुलाच्या क्लासला मी जाते. सर्ववेळ बसते. तो काय शिकतोय, कोणता राग, कोणती चीज, कोणतं गाणं, हे समजून घेते.
पूर्वी घरी आल्यावर ते गाणं, त्या रागाचं रेकॉर्डिंग घरात नसलं तर मिळवायचे. आणि तो घरात असताना नुस्तच लावायचे. समोर बस, ऐक वगैरे नाही. नुस्तं कानावर पडू द्यायचं. आधी आधी ’हे कशाला लावलय आता परत?" असं विचारायचा.
’मला आवडलं गाणं. मस्तचय. म्हणून लावलं’ असलं सांगितलं की ऐकून घ्यायचा.

संगीत शिकण्याच्या बाबतीत गुरूंकडे जाऊन नियमीत शिकणं हा active भाग झाला. त्याचबरोबर passive ऐकणं हे ही अत्यंत महत्वाचं. किती ते मी शब्दात नाही सांगू शकत, इतकं.
हे असं ऐकण्याची सवय लहानपणीच लागायला हवी. एकदम शास्त्रोक्त ऐकण्याची सक्ती मुलांवर करता येणार नाही. त्याऐवजी हल्ली जुन्या हिन्दी सिनेमातल्या गाण्यांच्या DVDs मिळतात. मी त्या आणून लावायचे. ’श्शी, कसली केसांची स्टाईल’ वगैरे वगैरे बोलत का होईना पण ऐकायचो ती गाणी. मीही जरा अरे, ह्या गाण्यात बघ कसले कपडे घातलेत वगैरे बोलून अजून एखादं ऐकवायचे.

त्याची आवडती हल्लीची गाणी त्याच्याबरोबरीने ऐकते. मुद्दाम वाद घालून त्यालाच नवीन काहीतरी आणायला लावते. मग मूव्ही बघायच्या आधी ’हे ऐक... आणि मग बोल’. असं म्हणून त्याने ऐकवलेलं ’रंग दे बसंती’ चे सगळे ट्रॅक्स मला नि:शब्द करून जातात.

लहान होता तेव्हा इथे आलेल्या चांगल्या कलाकारांच्या मैफिली ऐकायला येण्यासाठी त्याला लाच दिलीये (होय). जुन्या एखाद्या हिन्दी गाण्याचा राग ओळखता आला तर बक्षीस. दोघांनी मिळून एखाद्या गाण्यात कोणकोणती वाद्य वाजवलीत ते ओळखायचं. हे वाद्य वाजतय ते व्हायोलीन आहे की चेलो? हा ढोलकचा पीस ऐकरे परत... एकदाच. हा हार्मोनियमचा पीस जसाच्या तस्सा वाजवलास तर मागशील तो व्हिडिओ गेम!
हे आणि असलं बरच काही.

अर्थात माझं गाण्यात वावरणं त्याला आणि मलाही खूप फायद्याचं ठरलय. सिडनीत एक शास्त्रोक्त गाण्यात रमणायांचा एक ग्रूप गेली सतरा वर्षं दर महिन्याला एक कार्यक्रम करतो. घरगुती विनामूल्य मैफिल. त्यात मुलांसाठी वेळ असतो.
तसाच एक ग्रूप फक्तं मुलांचा मुलांनी सादर केलेला कार्यक्रम करतो. म्हणजे नेणे-आणणे आणि खाऊ-पिऊ सोडल्यास सगळं मुलं करतात. हिरिरीने छोटे-मोठे कार्यक्रम करतात. त्यांना आवश्यक साथीसाठी त्यांच्या आईने अगर वडिलांनी साथीदारांना फोन करून चालत नाही, ती मुलांचीच जबाबदारी. कार्यक्रमाचं ध्वनी-नियोजन आणि सूत्र संचालनही मुलच करतात.
आम्ही अशात कार्यरत आहोत. अशा काही गोष्टींत मुलांचा सहभाग असावा.

आता अजून एक गंमत.
गेली दोन वर्ष मुलाचा पियानो संपूर्ण बंद आहे. मी धूळ झटकते तितकच. ह्यात मी वैतागून, त्याला कोसून, ढोसून काही उपयोग नाही. कारण, मला माहीत आहे की कदाचित ही एक "अवस्था" असेल... फेज. ती संपून तो परत पियानोकडे वळेल.
आणि नाही वळला तरी हरकत नाही. त्याचं ते आनंदाने वाजवणं, प्रयत्नं करून पाच परिक्षा तीन वर्षाच्या अवधीत देणं, हा प्रवास इतका सुंदर होता की त्यासाठी हा पियानो सत्कारणी लागला.
आपण सहजासहजी "इन्व्हेस्ट" केलेले रिसोर्सेस वाया जाऊ द्यायला तयार नसतो. सगळेच प्रयत्नं हव्या तितक्या वेळात हव्या तितक्या प्रमाणात "रिटर्न्स" देत नाहीत - हा मी माझ्या काही चुकांमधून शिकलेला एक मोठा धडा आहे.

आतापर्यंत एव्हढं सगळं जमलं याचा अर्थ मुलगा हे आजन्म करेल असं आहे का?
अपेक्षाही नाही.
रुजवा केलेलं प्रत्येक रोप फळाला येत नाही म्हणून रोवायचं थांबवलं तर खायला नाही अशी अवस्था येईल.
मुलांच्यात करायच्या अनेक रुजव्यात हा एक. आलं फळाला तर त्याच्याही पुढची पिढी खाईल.
ही माझी हौस आहे का? जी मी लेकाच्यात पुरी करतेय? तर हो आणि नाही. हौस आहे. पण त्याच्यातून पूर्ण करण्याचा सोस नाही.
प्रामाणिकपणे सांगायचं तर हे एक देणं आहे जे माझ्या आई-वडिलांनी त्यांच्या परीने त्यांच्या कुवतीच्याही बाहेर जात आम्हाला दिलं. तो ठेवा आता व्याजासकट पुढच्या पीढीला देण्याचं माझं कर्तव्य फक्तं.

**************************************************
दिनांक - २२ मे २०११
ऑगस्ट २००८ मधे हा लेख लिहिला. आज शेवटचा परिच्छेद वाचतेय अन गंमत वाटतेय. गेल्या दोन्-चार महिन्यांत मुलानं संवादिनीला फुलं वाहण्यापुरताही हात लावलेला नाही. (अदृष्टं किती अचूक आपल्या तोंडून (लेखणीतून) वदत असतं.... )
तिची जागा आता पियानोने घेतलीये. तो उठलाय हे पियानोचा आवाज येतो तेव्हा कळतं. रात्री-अपरात्री पियानो वाजवून शेजारच्यांची झोपमोड करायची नाही हा नियम घालायची वेळ आलीये.
त्याचा-माझा संवाद आता उलटा चालू आहे. काय काय तूनळीवर वगैरे शोधून मला ऐकवतो. "ह्यात तुला लेयर्स ऐकू येतायत का? हा कॉर्ड किती वेगळा आहे... ह्यात त्याची पियानोवरची कमांड बघ... लांग लांगच्या शोमनशिपवर जाऊ नकोस... डोळे मिटून ऐक..."
आढ्याचं पाणी वळचणीला जाऊ लागलय Happy
तुमच्यातल्या अनेक पालकांना ह्या माहितीचाही उपयोग होईलच. Managing their own expectations is the biggest battle of parents with themselves... I think Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दाद, नेहेमीप्रमाणेच सुंदर लेखन असं म्हणून थांबणार नाही. माझ्या घरी यातलं काय काय करता येईल याचा विचार मी आत्तापासूनच सुरु केलाय. आत्तापासूनच अशासाठी की माझी मोठी मुलगी जवळ जवळ अडीच वर्षांची आहे आणि दुसरं पिल्लु फक्त एक आठवडा Happy

दाद्. खूप छान लिहिलं आहेस.

सर्वच पालकाना त्याच्या त्याच्या पाल्याना/मेथीला/कोथिंबीरीला संगीताची आवड निर्माण होण्यासाठी घेत असलेल्या मेहनतीसाठी लाखो सलाम. Happy

....

आजची मुक्ताफळं.
"मला आईचे आS आS गाणं आवडत नाही.
मगं कुठलं आवडतं ?
आज्जा आज्जा दिल निचोडे माहेर पंढरी विश्वात्मके देवे. " (मध्ये स्वल्पविराम नाहीत) Proud

>>>आज्जा आज्जा दिल निचोडे माहेर पंढरी विश्वात्मके देवे. "
चालीत म्हणून बघितलं. सगळं मीटरसकट फीट आहे आणि दिल निचोडे नंतर विश्वात्मके देवे मुळे एका ऊच्च पातळीवर जावून बसलय. Happy
भारी होणार तुमचं पिल्लू. Happy
** "मी केलेली चूकीची" गाणी असा बा.फ. होवू घातलाय!!

हा लेख मी आज वाचला. खुप सुंदर लिहिलेला आहे.

मला माझ्या मुलाला (वय वर्षे ४) तबला शिकवायचा आहे. त्यालाही आवड आहे असे वाटतेय खरे आता, पुढे काय होईल माहिती नाही.

पुण्यात कोणी चांगले शिक्षक माहिती आहेत का कोणाला? शक्यतो मला घोकंपट्टी पद्धतीने शिकवणार्‍या क्लास मधे नाही घालायचे आहे. वैयक्तिक रीत्या शिकवणारे, जिथे मला पण त्याच्यासोबत बसता येईल शिकवणे चालू असताना, असे हवे आहे.

कॄपया कोणाला माहिती असल्यास सांगावे.

धन्यवाद...

अरे
मी वाचलेला हा लेख. मला आवडला ( हा लेख तुझाच आहे हे नंतर लक्षातच नाही राहीलं.)..
मी प्रिंटस काढून जपून ठेवतोय हा लेख. पुढे मागे उपयोगी होईल..

मिस्टर योगी,
त्याला क्लासला घालण्यापेक्षा आपण शिकायला सुरवात करा असे सुचवेन आणि त्याला बरोबर घेऊन जा. हळुहळू त्याला शिकावेसे वाटेल. Happy

संगीताची आवड हे बर्‍यापैकी गुणसुत्रांमधून येणारी गोष्ट असावी. म्हणजे आवड जोपासणे चुकीचं आहे असं नाहीय, पण काहीवेळा जे आडात नाही ते पोहर्‍यात येत नाही हेच खरं.
माझा एक मित्र.. वडील सुप्रसिध्द सतारवादक/शिक्षक आहेत. १२ वर्ष उत्तम शिकला आणि आवडत नाही म्हणुन सोडून दिलं. (हा माणूस हिंदी चित्रपट्/टिव्हीवर दिग्दर्शक आहे).

दुसरा पण एक आहे.. गाण्याची अत्यंत आवड. गायला लागला की खरोखरच मस्त गातो. म्हणून मग चांगला मोठ्ठा असताना स्वतःम्हणून पेटीच्या क्लासला गेला. मास्तरांनी सहा महिने मेहनत करून घेतली आणि मग म्हणाले, 'तुम्हाला स्वरज्ञान नाही, कितीही शिकलात तरी सा, रे, ग.. च्या पुढे नाही जाणार तुम्ही... क्लास सोडा'.. (हा बॅडमिंटनपटू आहे).

माझ्या मित्राची मुलं आहेत.. मला गाण्याची आवड आहे हे त्यांच्या बापाला माहीत असल्यामुळे एकदा बसल्या बसल्या भेंड्या खेळलो त्यांच्याबरोबर.. भारतात आहेत त्यामुळे 'किसी होटलमें जायें' सारखी
रेडियो/टिव्ही वर तिन्हीत्रिकाळ वाजणारी न चालीची गाणी सुध्दा एका स्वरात एकही उतारचढाव नसल्यासारखी गातात.

वाद्य वाजवता येणं हा दुसराच एक प्रकार. एकाद्या वाद्यातून जादू व्हावी असे सूर येतात हे पाहून बहुतेक सगळेच लोक भारावून जातात. पण ते वाद्य हातात घेऊन आपण वाजवायला लागल्यावर तसे सूर तर सोडाच, 'जन गन मन' पण निघत नाही म्हटल्यावर पांगापांग होते..

खूप उशिरा वाचला हा लेख..पण प्रिंट करून ठेवावा असाच झालाय खरा.
रियाजाला पर्याय नाही... पण लहान मुलांकडून काही करवून घ्यायचे म्हटले की त्यांच्या कलानेच घ्यावे लागते.
अजून माझं लग्नही झालं नाहिये Happy पण माझ्या मुलाला/मुलीला संगीतात आवड निर्माण व्हावी यासाठी नक्की प्रयत्न करेन. ग्रूपची कल्पना तर अतिशय आवडली...
अनेकानेक धन्यवाद Happy आणि तुमचं (तुम्हा तिघांचंही) अभिनंदन !!

रैना,
हो, मला तसेच करायचे आहे खरे तर.. चांगला शिक्षक शोधतोय. आमच्या शेजारी एक मुलगी गेले वर्षभर एका क्लासला जाउन व्हायोलीन शिकली पण समोर वही असेल त्यातले सुर वाजवत बसायची. आता त्यांनी तो क्लास बंद केला आणि एका चांगल्या गुरूकडे शिकतीये ती. लगेच फरक पडला तिच्या वाजवण्यात. चांगला गुरू मिळणे आवश्यक आहे...

मी पण या लेखाची प्रिंट काढून ठेवलीये.. खरे तर दाद चे सर्व लेख प्रिंट काढण्याजोगेच आहेत, खुपच सुंदर लिखाण आहे!

मि. योगी, मी मुंबईची आणि सिडनीत वास्तव्याला येऊन तप उलटून गेलय तेव्हा पुण्यातलं माहीत नाही. पण इथले माहिर पुणेकर सांगू शकतिल.
चांगला गुरू - खरच आहे तुमचं म्हणणं. शिष्याची पायरी ध्यानात घेऊन त्याला पुढल्या पायरीवर नेण्यासाठी झटणारा "नजर्"वाला गुरू हवा. मुलाचं वय, त्याची आवड वगैरे सगळ्याच गोष्टी त्यात येतात.
तुमच्यावतीनं तुम्ही काही गोष्टी करू शकता. घरात एक्-दोन पर्कशन वाद्यं आणून ठेवणे. अर्थात ती वाजवायला प्रोत्साहन. काही छान व्हिडिओज त्याला दाखवणे - झाकिर अपरिहार्य Happy
त्याला आवड आहे की नाही हे ध्यानात यायला लागेलच. रैना म्हणतेय तसं तुम्ही क्लास चालू केलात की, आपोआप "रियाज करावा लागतो" वगैरे शिकतात मुलं.

पर्देसाय, योग्यं बोललात. थोडं मुळात असावच लागतं हे माझंसुद्धा मत आहे. पण मुळातलं किती आहे, कोणत्या जातीचं आहे, हे शोधून काढून पुढल्या विकासाला मदत करता येणं ह्यात सगळी गोम आहे.

आणि ह्या सगळ्या घोर मेहनतीनंतर पोरांनी हातातलं टाकलं तर? तर... काही नाही. आपण लावलेलं "हे एक" झाड फळाला आलं नाही म्हणायचं... इतकच!
योगी, चैतन्यं खूप सदिच्छा तुमच्यासाठी. हा सहप्रवास अत्यंत सुखाचा-समाधानाचा होवो.

धन्यवाद दाद..
गुरूच्या बाबतीतले तुमचे म्हणणे १००% पटले.

आणि एक तबला पण घेणार आहे घरी. काही जण म्हणाले की आता नका घेऊ तबला वगैरे. मुलगा जर काही शिकला नाही वगैरे तर वाया जाईल. पण मी विचार केला की तो नाही तर मी शिकेन.. Happy

मुलाला काहीतरी ऐकवणे पण चालूच असते. झाकीरच्या आणि इतर काही कार्यक्रमाला पण नेले होते. पण अजुन तासभर एका जागी बसून शास्त्रीय संगीत ऐकण्याएवढा patience नाही आलाय त्याच्यात. हे साहजिकच आहे.

आणि ह्या सगळ्या घोर मेहनतीनंतर पोरांनी हातातलं टाकलं तर? तर... काही नाही. "हे एक" झाड फळाला आलं नाही म्हणायचं... इतकच"! हे पण अगदी पटलं!

दाद, हा लेख बर्‍याचदा वाचला जातो. खूप आवडता लेख आहे आणि इथल्या प्रतिक्रियापण छान आहेत. माझा मुलगा आता ३ वर्षाचा होईल. तो काही शिकेल का किंवा आवड निर्माण होईल का माहित नाही.
माझ्याकडून मी स्वतः संगित ऐकणे, जेणेकरून त्याच्या कानावर काहीतरी पडत रहावं इतकंच मी करू शकते.

त्याचा बाबा वेळ काढून बासरी आणि गिटार वाजवत असतो. हे वाजवणं चालू असताना पोरगा शांतपणे ऐकतो. बाबाची एक जुनी गिटार घरात एका कोपर्‍यात ठेवली आहे. येता-जाता प्लॅक्ट्रमने त्या गिटारच्या तारा छेडणं आवडतं त्याला. पण मुद्दाम शिकवायला गेलो तर कितपत आवडीने शिकेल याची शंका आहे अजूनतरी. बाबाच्या बासर्‍या बघून माझी बासरी कुठंय हेही विचारतो. Happy

त्याला सगळ्यात जास्त काय आवडत असेल तर टाळ वाजवायला Happy आणि स्वतःच्या खेळण्याच्या डब्याला ढोल समजून वाजवणे किंवा दोन खेळण्याचे डब्बे उभे करुन खेळण्यातल्या प्लास्टिकच्या बोलिंगवाल्या बाहूल्यांना ड्रमस्टिक बनवून ड्रम वाजवणे. Happy

दाद
हा बराच जुना लेख मी आज वाचला. तुम्ही नेहेमीच छान लिहिता. मलाही काही लिहावसं वाटलं.......
माझी आई पूर्वीचं अलंकार पर्यंत शास्त्रीय संगीत शिकली आहे. पूर्वी उत्तम गायची...कान एकदम तयार!तिची फोर्टीजमधली नोटेशनची वही आहे. माझा भाऊ व्हायोलीन सुंदर वाजवायचा. त्यालाही या वहीचा उपयोग व्हायचा. माझ्याही कानावर जन्मापासून उत्तम शास्त्रीय संगीत पडले आहे. बर्‍याचश्या दिग्गजांच्या मैफिली अगदी पुढच्या रांगेत बसून ऐकल्या आहेत. आणि कंपल्शन म्हणून नव्हे तर अत्यंत आवडीने . तो जीवनाचाच एक भाग बनून गेला होता. तेव्हा आई म्हणायची की काही तरी शीक...म्हणजे वाद्य/मौखिक काहीही. पण मी तेव्हा वेगळ्या जगात होते(अ‍ॅथलॅटिक्स साठी पूर्ण वेळ ग्राऊंडवर). त्यामुळे तेव्हा काही संगीत शिकणं झालं नाही. पण ते मनात होतंच.
नंतर मुलं झाल्यावर वाटायला लागलं मुलांना संगीताची आवड निर्माण होण्यासाठी काही तरी केलं पाहिजे.(टिपिकल आई सिंड्रोम) आणि त्यात हळूहळू लक्षात येत गेलं की मुलीला उपजत कान आहे (म्युझिकल इयर) आणि आवडही आहे, आवाजही बरा आहे. मग ती आवड जोपासली जावी यासाठी मी, माझी लेक, माझ्या नणंदेच्या दोघी मुली अश्या चौघीजणी क्लासला जाऊ लागलो. मुली प्रारंभिकला बसल्या , मी प्रथमापासून सुरू केलं. मुलींच्या दहावी बारावीमुळे त्यांनी मध्यमापर्यंतच गाडी सोडून दिली. पण माझी लेक आणि मी आम्ही दोघींनी एकत्रित खूप वेळा "सवाई"चा आनंद लुटला आहे.
पण जसं एखाद्या खेळात मुलाला घालायचं , किंवा त्यांना रोज व्यायामाला पाठवायच, यात आपल्याला त्यांना ऑलिंपिक प्लेअर्स बनवायचं नसतं....पण त्यांना माणूस म्हणून घडवण्यातल्या या पायर्‍या असतात.
तसंच घरात अगदी गायक/किंवा वादक निर्माण व्हावेत यासाठी हे प्रयत्न आपण करत नसतो...पण या सर्व गोष्टींमुळे मुलांची व्यक्तिमत्वे उत्तम प्रकारे विकसित होतात.
या तीघीही मुली आता आपापल्या क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहेतच पण त्यांनी संगीतात रुची कायम राखली आहे. त्या आपापल्या व्यापातून संगीतातला आनंद लुटत असतात.
माझी लेक पुढच्या परिक्षाही देण्याच्या विचारात आहे. गुरूच्या शोधात आहे. खूप चांगलं ऐकत असते.
गंमत म्हणजे माझ्या मध्यमाच्या पासून रियासाठी जाणवणारी तबलजीची त्रुटी जाणवायला लागली. परिक्षा आल्या की तबलजी बुक्ड असायचे आणि मग पंचाईत व्हायची. मग माझ्या मुलालाही तबल्याच्या क्लासला घातलं ...निदान हा परिक्षेच्या आधी रियाजाला साथ करेल या दूरदृष्टीने! पण दोन परिक्षा झाल्यावर तो कंटाळला.
असो .........खूप मोठी पोस्ट झाली पण खूप काही आठवत गेलं.

संगीताची आवड हे बर्‍यापैकी गुणसुत्रांमधून येणारी गोष्ट असावी. >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> परदेसाईंच्या मताशी सहमत. प्रत्येक गोष्ट क्लासला जाऊन येईलच असं नाही.

खूप छान सीमा. हे असं आपल्या लहानपणी व्हायला हवं होतं असं वाटायला लागलय. कोई बात नही, माझ्या मनवासाठी प्रयत्न नक्की करेन. Happy

मुलांनी संगीत शिकण्याच्या अनुषंगानं...

एकदा संगितात डोकं घातलं की काही काळानं त्यानंतरची फेज सुरू होते. मुलं उत्साहानं एखादं वाद्य वाजवायला किंवा व्होकलचे धडे घ्यायला सुरुवात करतात. पण मग हळूहळू उत्साह कमी होतो. त्या क्षणी पालकांचं, शिक्षकांचं मोटिव्हेशन आवश्यक असतं. मुलांना 'लहान वयात आपल्याला एखादी गोष्ट इतक्या मेहेनतीने इतक्या चांगल्या पातळीवर करता येतेय. ती मधेच सोडून नुकसान होईल' हे कळत नाही.

घरी व्हायलीनच्या बाबतीत तेच झालं. ४ वर्षं उत्साह टिकला. पाचव्या वर्षी व्हायलीन हातात घ्यायचा पण कंटाळा यायला लागला. यावर लेकाच्या एका व्हायलीन कँपमधल्या शिक्षकांनी अतीशय छान सल्ला दिला होता. "प्रॅक्टीस" हा अगदी चुकीचा शब्द आहे म्हणाले. प्रॅक्टीस कर, रियाझ कर सांगणं म्हणजे "ब्रश कर, आंघोळ कर, अभ्यास कर" सारखं 'काम' वाटायला लागतं. "वाजवशील का? गाशील का?" हे जास्त परिणामकारक असतं असा त्यांचा सल्ला. आधी आम्हाला तो फार उपयोगी पडेल असा विश्वास नव्हता. पण चक्क उपयोगी पडला. 'बरं काही वाजवू नकोस. आपण नुस्तंच ऐकू.' म्हणून ऑर्केस्ट्रा पीसेस, चेंबर म्युजिक, शक्य झाल्यावर एखादी लाइव्ह काँन्सर्ट ऐकायला जाणं असा उद्योग सुरू केला. व्हायलीन वाजवण्ञाबाबतची उदासीनता हळूहळू कमी झाली. लेकाला आपणहून व्हायलीन वाजवायची इच्छा व्हायला लागली. शिक्षकांनी देखील भरपूर मेहेनत घेऊन गाडी रुळावर आणली. आज, "बरं झालं मी व्हायलीन सोडलं नाही. त्याचा फायदा मला आज कळतोय. थँक्यू! तुम्ही सगळे माझ्या पाठीशी उभे राहिलात." हे त्याच्या तोंडून ऐकल्यावर सगळ्यांची मेहेनत सार्थकी लागली असं वाटतंय.

साधारणतः १०-१३ वर्षं वयात ही फेज येते. पण आपण त्यावर मात करून प्रयत्न करत राहिलो, शिकत राहिलो, सोडून दिलं नाही याचा आत्मविश्वास फक्त संगितातच नाही तर इतर ठिकाणी देखिल मुलांना कामी येतो हे जाणवलं.

मृण्मयी , अतिशय छान लिहिल आहेस. मुलीला अजुनतरी कंटाळा आला नाही आहे. पण आला तर काय करता येईल ते समजल.

>>>>>>>मुलांना 'लहान वयात आपल्याला एखादी गोष्ट इतक्या मेहेनतीने इतक्या चांगल्या पातळीवर करता येतेय. ती मधेच सोडून नुकसान होईल' हे कळत नाही. >>>>>>>
हे मुलांच्या सगळ्याच बाबतीत महत्वाच आहे. बर्‍याचवेळी आपण त्यांना पुश करतो तेव्हा कुठेतरी एक अपराधी पणाची भावना असते. पण त्यांच पोटँशियल (जे त्यांना कळत नाही) त्यांनी पुर्णपणे वापराव यासाठी थोडस पुश केल तर काहीच हरकत नसावी.

मानुषी, छान लिहिलंय..
घरात अगदी गायक/किंवा वादक निर्माण व्हावेत यासाठी हे प्रयत्न आपण करत नसतो...पण या सर्व गोष्टींमुळे मुलांची व्यक्तिमत्वे उत्तम प्रकारे विकसित होतात.
हो, अगदी खरंय.. अप्रत्यक्ष कितीतरी फायदे होतात जे त्या वयात मुलांना कळत नाहीत. आपण वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करणे आवश्यक आहे.
मॄण्मय तुमचा अनुभव पण खुप छान.. "कर" म्हणले की त्याचे एक compulsion येते म्हणून मुलांना नको वाटत असेल. तुम्ही छानच technique वापरले.

किती सुन्दर रित्या आपापले अनुभव इथे व्यक्तं होतायत... हा लेख सत्कारणी लागला. मृण्मयी, अगदी अगदी मनातलं!
रियाज, प्रॅक्टिस म्हटलं की नको वाटत असणार, पोरांना. दोन पावलं मागे जायची तयारी पालकांनी दाखवायला हवी. पेशन्स!
मानुषी, तुझ्यावतीनं जे करायचं होतं ते केलं... आवड जोपासली गेली, त्याचं बीज रोवलं गेलं. त्याही पुढल्या पीढीला त्याची फळं मिळतिल.

विनयभाऊ, अल्पना, मृण्मयी,

छान....

कुणीतरी वर लिहील्याप्रमाणे हा एक मोठा संस्काराचाच भाग. खरं तर वाद्य/कला/गायन ई. निमित्त मात्र. त्या अनुशंगाने आयुष्यात प्रत्त्येक टप्प्यावर तुम्ही आपसूक घडत जाता. सामाजिक वावर, ओळखी, शिस्त, कर्तव्यतत्परता, सादरीकरण, ईत्यादी अनेक ऊपयोगी गुण जोपासले जातातच. पण एकंदरीत आयुष्य "सुरेल" होते हे निश्चीत Happy आणि हा आनंद वैयक्तीक न रहाता ईतर अनेकांबरोबर वाटता येतो, ही सर्वात मोठी देणगी असे म्हणावे लागेल. तेव्हा सक्ती नको, पालक म्हणून ऊगा अट्टहास देखिल नको, आयडॉल वा स्टार बनवण्याची व्यावहारीक स्वप्ने/आकर्षणे देखिल नकोत. फक्त पाठबळ आणि पाठपुरावा एव्हडे देखिल पुरेसे आहे.

योग.. क्या बात है....
<<तेव्हा सक्ती नको, पालक म्हणून ऊगा अट्टहास देखिल नको, आयडॉल वा स्टार बनवण्याची व्यावहारीक स्वप्ने/आकर्षणे देखिल नकोत. फक्त पाठबळ आणि पाठपुरावा एव्हडे देखिल पुरेसे आहे>>
बहोत खूब

मानुषी, अत्यंत सुंदर प्रतिसाद! पटलचं!
घरात सतत उत्तम संगीत चालू असणे याला पर्यायच नाही. मुलांनी लहानपणी ऐकलेले संगीत त्याचा सांगितीक पिंड पोसतात, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. याची सुरुवात मुल जन्माला यायच्या आधीच करता येते हेही सिद्ध झाले आहे आणि गर्भवती स्त्रीने तिला आवड असो वा नसो नियम म्हणून तरी शास्त्रिय संगीत ऐकावेच.
माझ्या लहानपणी घरात बॉनी एम-पेट शॉप बॉईजपासून भीमसेन-कुमारपर्यंत काहीनाकाही सतत चालू असे. आणि हे ग्रेट आहे, हे'च' ऐक असे बाबांनी कधी फोर्स केले नाही. प्रत्येकाला त्याची आवड, त्याचा सूर-ताल सापडू द्यावा.

Pages