संगिताची आवड - माझा अत्यंत आवडीचा विषय.
माझ्याबाबतीत, माझ्या भावाच्या बाबतीत आणि माझ्या लेकाच्या बाबतीत काय उपयोगी पडलं ते सांगणार आहे इथे.
त्याआधी हे ही सांगणं आवश्यक की माझा भाऊ उत्तम हार्मोनियम, तबला, बासरी वाजवतो. त्यापैकी फक्त तबला थोडाफार शिकलाय.
मी तबला वाजवते (बहुतेक बर्यापैकी
), हार्मोनियम शास्त्रोक्त गायकाला साथ करता येईल इतपत. तबल्याच्या योगे ढोलकी आणि ढोलक सारखी वाद्य वाजवता येतात. भावालाही.
लेक हार्मोनियम वाजवतो. (आधी राग, चीज समजून घेऊन शास्त्रीय संगीताची, गाणी माहीत असल्यास भावगीते वगैरेची मैफिल वाजवण्याइतपत). तबला नाही. मला वाजवताना बघून (बघून) ते girs' instrument असल्याची lahaanapaNee खंबीर खात्री! त्यामुळे.
आता ही आवड जोपासण्याविषयी.
घरातल्यांना मुळात आवड असणं, कमीतकमी त्यांनी तसा प्रयत्नं करणं आवश्यक आहे. नाहीतर मुलांत आवड निर्माण करणं किंवा जोपासणं हा एक ’कार्यभाग’ होऊन बसतो आणि त्यातला सहजभाव निघून जातो.
आमच्या घरी सगळ्यांनाच संगीताची आवड. घरात गोकुळ-अष्टमी, गणपती वगैरे निमित्त कायम कार्यक्रम चालू. मला माहीतही नव्हतं तेव्हापासून घरात पेटी, तबला, ढोलकी, तानपुरा, बासरी अशी वाद्य होती. खंजिरी, डफ, घुंगुर, कब्बास अशीही वाद्य होती, ज्यांना साईड रिदमची वाद्य म्हणता येतील. ह्या ना त्या निमित्ताने आणि तसंही, सगळ्याच वाद्यांवर हात चालवलाय. त्यामुळेच न शिकता पेटी वाजवता येतेय, आम्हा दोन्ही भावंडांना.
तेव्हा..... घरात विविध वाद्य असावीत आणि तीही चांगल्या अवस्थेत. माझे आई-बाबा तबला, ढोलकी वाजवत नव्हते तरी घरात दोन उत्तम जोड होते.
घरात कायम रेडिओवर गाणी चालू असायची. रात्री झोपताना नॅशनल कार्यक्रम ऐकतच झोपलोय... बाबा कधीतरी रेडिओ बंद करत असावेत. हे ऐकणं मुद्दाम किंवा ज्याला active म्हणतात तसं नव्हतं.... सहज होतं, passive. समोर बसून हे ऐक असं कुणी सांगितलं नाही. संगीत आमच्याभोवती घडत राहिलं आणि आम्ही ते शोषत राहिलो, बहुतेक. एकवेळ नवीन कपडे केले नाहीत एखाद्या दिवाळीला, पण आठ वर्षांची होते तेव्हापासून लग्न होईपर्यंत वारीला जावं तशी सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला गेलेय, बाबांबरोबर. म्हणजे त्यांनी नेलय. नुस्तं शास्त्रीय नाही पण भावगीतं, नाट्यगीतं अशा कार्यक्रमांनाही बाबा आवर्जून न्यायचे.
माझा लेक (एकच आहे)- लहानपणी, मी आणि माझा नवरा त्याच्याशी त्याच्या वयाचे होऊन भांडलो आहोत... गाडीने कुठेही जायचं असल्यास, एक वेळ आमची गाणी लावली जातील ह्यावरून. माझं आणि नवर्याची भांडण(??) त्याने बघितली ह्यावरून, त्यामुळे त्याच्याशी केलेलं भांडण नडलं नाही त्याला. नवरा जुन्या हिंदी गाण्यावरून आणि मी शास्त्रोक्त पासून भावगीतां पर्यंत आणि गजलांपासून लावण्यांपर्यंत कशाहीसाठी.
आता (वय १८), जाईन विचारित रानफुला सारखं भावगीत, ’बोलावा विठ्ठल’च्या तीनेक चाली, मेहदी हसनच्या गजला, मदन मोहनची हिन्दी गाणी, असलं त्याला माहीत असतं आणि थोडक्याच प्रयत्नांत तो वाजवू शकतो. त्याचं त्यालाच आश्चर्य वाटतं की "हे असलं" गाणं त्याला माहीत आहे आणि तेसुद्धा कधी कधी मधल्या म्युझिकसकट.
तर, अशाप्रकारे चांगलं सगीत आजूबाजूला घडू द्यावं... आपोआप मुलं ते आत्मसात करतात. कधी कधी वरच्यासारखा थोडा वेगळा मार्ग अवलंबावा लागतो 
मुलगा लहान होता तेव्हापासून माझ्या घरात तबला (हं?), हार्मोनियम, सन्तूर, बोंगो, कब्बास, चिपळ्या, घुंगरू, आणि इतर ताल वाद्य आहेत. मी काहीतरी वाजवतेय म्हटल्यावर तो नकळत वाजवायचा. कधी कधी मी मुद्दाम चुकायचे. तो सुधरायचा मला... असं नाही आई, असं!
माझ्या एका मैत्रिणीला मी तिच्या मुलीबरोबर गाणं शिकायला जा असं सांगितलं. मुलगी कधी कधी तिला शिकवते आणि म्हणूनच मग आईनं सांगितलेलं ऐकतेही.
मुलाने पियानो वाजवावा असं मला वाटलं. कारण त्यायोगे त्याच्या ऑस्ट्रेलियन मित्रांशी त्याचा संवाद राहील, असं मला वाटलं. घरातला कीबोर्ड पहिला महिनाभर वापरला. त्याच्या क्लासला मी सुद्धा जात होते, नुस्तीच. शिकायला नाही.
लक्षात आलेली गोष्टं म्हणजे, तिच्याकडल्या "खर्या" पियानोवर हा आवडीने वाजवतो आणि घरात पाट्या टाकतो. तेव्हा घरी पियानो आणला (हिन्दी सिनेमासारखा ग्रँड नाही पण व्हर्टिकल). तेव्हापासून उत्साहाने प्रॅक्टीस. मनापासून प्रयत्नं करून पियानोच्या पाच परिक्षा पूर्ण केल्या. तबला आणि संतूर, सोडल्यास, सगळीच साइड रिदम्सची वाद्य जी घरात आहेत, ती त्याला वाजवता येतात.
आपल्या लहानग्याला (वय वर्ष ३ म्हणजे शिकायला सुरूवात करायला अजून लहान) माझ्याकडे तबला शिकवू इच्छिणार्या एकीला, पहिली दोन वर्षं नुस्ती वेगवेगळी तालवाद्य आणून दे घरात असं सांगितलं. त्याचा तालाचा सेन्स इतका उत्तम झालाय की... बस्स.
तर... वाद्य असावीत आणि ही सगळी वाद्य उत्तम प्रतीची असावीत. "उत्तम प्रतिची" हे सांगणं अतिशय महत्वाचं.
मुलांना एखादं वाद्य वाजवण्यात आनंद मिळाला तरच ती त्यात रस घेतात. शिकण्याच्या काळात, गुरुजींनी ऐकवलेला नाद, सूर आपल्या वाद्यातून तस्सा येण्यासाठी, वाद्य चांगलं हवं. तरच रियाज करताना आपल्या आणि गुरुजींच्या नादातला फरक कळू शकेल.
चांगला नाद असलेला तबला, सगळे सूर वाजणारी, त्यांच्या उंचीला झेपेल अशी, भाता फार जड असणार नाही अशी पेटी... हे महत्वाचं आहे.
साधारणपणे ’आत्ता घेऊ काहीतरी सेकंड हँड किंवा शेजारच्याचं वगैरे आणू. शिकला आणि जमतय त्याला असं दिसलं तर मग आणू बर्यापैकी. आत्ता काय करायच नवीन?’ असा विचार असतो पालकांचा.
पाल्यात आवड निर्माण करण्याची आवश्यकता तुम्हाला आहे, पाल्याला (अजून) नाही.
त्यांच्या शिकण्यात आपल्याला रस हवा, त्यांचा क्लास ही घरात महत्वाची, (हाय प्रायॉरिटीची) गोष्टं मानावी. शक्यतो क्लास चुकवू नये. एकवेळ डबल बुक केली म्हणून पार्टीला जाणं रद्द करावं. मोठ्यांनी महत्वं दिलं की लहानही देतात.
मुलगा सुरुवातीची पेटी माझ्याकडेच शिकला. मग आमची भांडणं जास्तं आणि शिकणं कमी
व्हायला लागल्यावर, दुसरीकडे शिकणं चालू केलं. अगदी गेल्यावर्षीपर्यंत त्याच्या क्लासला जाण्यापाई दर शुक्रवारी माझे ड्रायव्हिंग करण्यात पाच तास जायचे. दोन तास कामावर जाणे-येणे आणि तीन तास क्लासला जाणे-येणे.
इथे फुशारकी नाही सांगायचीये. बात अशी आहे की, आपल्यातले अनेकजण वेळ नाही म्हणून अशा गोष्टी टाळतो. शुक्रवारी पार्टीला बोलावल्यास एखाद्यावेळी जाऊ दीड तासाचं ड्रायव्हिंग करीत. हे माझ्या एका मैत्रिणीने आपल्या मुलीचा पेटीचा क्लास बंद करण्यामागचं कारण म्हणून सांगितलं.
घराच्या जवळ पंधरा मिनिटांच्या टप्प्यात नाही म्हणून आमच्या मुलांना "हे असलं" शिकता आलं नाही..... इतर काही अतिशय तशीच "नाईलाज" असणार्या कारणांव्यतिरिक्तं हे कारण... माझ्या दृष्टीने "हलगर्जीपणाचं"च आहे.
अनेकजण मुलाच्या क्लासशी संबंध हा नेणे-आणणे, फी देणे यापुरताच ठेवतात. लेकाचा क्लास हा त्या वेळात शॉपिंग किंवा जवळच्या मैत्रिणीकडे चक्कर ह्यासाठी वापरू नये. (अगदीच त्याच्या गुरूंना पालकांचं बसणं पसंत नसेल तर इलाज नाही)
ह्यामुळे मुलांना मुळात खूपच आवड असेल तरच ती आपणहून क्लासला जाणं, शिकणं, घरी येऊन रियाज करणं करतील.
माझ्या मुलाच्या क्लासला मी जाते. सर्ववेळ बसते. तो काय शिकतोय, कोणता राग, कोणती चीज, कोणतं गाणं, हे समजून घेते.
पूर्वी घरी आल्यावर ते गाणं, त्या रागाचं रेकॉर्डिंग घरात नसलं तर मिळवायचे. आणि तो घरात असताना नुस्तच लावायचे. समोर बस, ऐक वगैरे नाही. नुस्तं कानावर पडू द्यायचं. आधी आधी ’हे कशाला लावलय आता परत?" असं विचारायचा.
’मला आवडलं गाणं. मस्तचय. म्हणून लावलं’ असलं सांगितलं की ऐकून घ्यायचा.
संगीत शिकण्याच्या बाबतीत गुरूंकडे जाऊन नियमीत शिकणं हा active भाग झाला. त्याचबरोबर passive ऐकणं हे ही अत्यंत महत्वाचं. किती ते मी शब्दात नाही सांगू शकत, इतकं.
हे असं ऐकण्याची सवय लहानपणीच लागायला हवी. एकदम शास्त्रोक्त ऐकण्याची सक्ती मुलांवर करता येणार नाही. त्याऐवजी हल्ली जुन्या हिन्दी सिनेमातल्या गाण्यांच्या DVDs मिळतात. मी त्या आणून लावायचे. ’श्शी, कसली केसांची स्टाईल’ वगैरे वगैरे बोलत का होईना पण ऐकायचो ती गाणी. मीही जरा अरे, ह्या गाण्यात बघ कसले कपडे घातलेत वगैरे बोलून अजून एखादं ऐकवायचे.
त्याची आवडती हल्लीची गाणी त्याच्याबरोबरीने ऐकते. मुद्दाम वाद घालून त्यालाच नवीन काहीतरी आणायला लावते. मग मूव्ही बघायच्या आधी ’हे ऐक... आणि मग बोल’. असं म्हणून त्याने ऐकवलेलं ’रंग दे बसंती’ चे सगळे ट्रॅक्स मला नि:शब्द करून जातात.
लहान होता तेव्हा इथे आलेल्या चांगल्या कलाकारांच्या मैफिली ऐकायला येण्यासाठी त्याला लाच दिलीये (होय). जुन्या एखाद्या हिन्दी गाण्याचा राग ओळखता आला तर बक्षीस. दोघांनी मिळून एखाद्या गाण्यात कोणकोणती वाद्य वाजवलीत ते ओळखायचं. हे वाद्य वाजतय ते व्हायोलीन आहे की चेलो? हा ढोलकचा पीस ऐकरे परत... एकदाच. हा हार्मोनियमचा पीस जसाच्या तस्सा वाजवलास तर मागशील तो व्हिडिओ गेम!
हे आणि असलं बरच काही.
अर्थात माझं गाण्यात वावरणं त्याला आणि मलाही खूप फायद्याचं ठरलय. सिडनीत एक शास्त्रोक्त गाण्यात रमणायांचा एक ग्रूप गेली सतरा वर्षं दर महिन्याला एक कार्यक्रम करतो. घरगुती विनामूल्य मैफिल. त्यात मुलांसाठी वेळ असतो.
तसाच एक ग्रूप फक्तं मुलांचा मुलांनी सादर केलेला कार्यक्रम करतो. म्हणजे नेणे-आणणे आणि खाऊ-पिऊ सोडल्यास सगळं मुलं करतात. हिरिरीने छोटे-मोठे कार्यक्रम करतात. त्यांना आवश्यक साथीसाठी त्यांच्या आईने अगर वडिलांनी साथीदारांना फोन करून चालत नाही, ती मुलांचीच जबाबदारी. कार्यक्रमाचं ध्वनी-नियोजन आणि सूत्र संचालनही मुलच करतात.
आम्ही अशात कार्यरत आहोत. अशा काही गोष्टींत मुलांचा सहभाग असावा.
आता अजून एक गंमत.
गेली दोन वर्ष मुलाचा पियानो संपूर्ण बंद आहे. मी धूळ झटकते तितकच. ह्यात मी वैतागून, त्याला कोसून, ढोसून काही उपयोग नाही. कारण, मला माहीत आहे की कदाचित ही एक "अवस्था" असेल... फेज. ती संपून तो परत पियानोकडे वळेल.
आणि नाही वळला तरी हरकत नाही. त्याचं ते आनंदाने वाजवणं, प्रयत्नं करून पाच परिक्षा तीन वर्षाच्या अवधीत देणं, हा प्रवास इतका सुंदर होता की त्यासाठी हा पियानो सत्कारणी लागला.
आपण सहजासहजी "इन्व्हेस्ट" केलेले रिसोर्सेस वाया जाऊ द्यायला तयार नसतो. सगळेच प्रयत्नं हव्या तितक्या वेळात हव्या तितक्या प्रमाणात "रिटर्न्स" देत नाहीत - हा मी माझ्या काही चुकांमधून शिकलेला एक मोठा धडा आहे.
आतापर्यंत एव्हढं सगळं जमलं याचा अर्थ मुलगा हे आजन्म करेल असं आहे का?
अपेक्षाही नाही.
रुजवा केलेलं प्रत्येक रोप फळाला येत नाही म्हणून रोवायचं थांबवलं तर खायला नाही अशी अवस्था येईल.
मुलांच्यात करायच्या अनेक रुजव्यात हा एक. आलं फळाला तर त्याच्याही पुढची पिढी खाईल.
ही माझी हौस आहे का? जी मी लेकाच्यात पुरी करतेय? तर हो आणि नाही. हौस आहे. पण त्याच्यातून पूर्ण करण्याचा सोस नाही.
प्रामाणिकपणे सांगायचं तर हे एक देणं आहे जे माझ्या आई-वडिलांनी त्यांच्या परीने त्यांच्या कुवतीच्याही बाहेर जात आम्हाला दिलं. तो ठेवा आता व्याजासकट पुढच्या पीढीला देण्याचं माझं कर्तव्य फक्तं.
**************************************************
दिनांक - २२ मे २०११
ऑगस्ट २००८ मधे हा लेख लिहिला. आज शेवटचा परिच्छेद वाचतेय अन गंमत वाटतेय. गेल्या दोन्-चार महिन्यांत मुलानं संवादिनीला फुलं वाहण्यापुरताही हात लावलेला नाही. (अदृष्टं किती अचूक आपल्या तोंडून (लेखणीतून) वदत असतं.... )
तिची जागा आता पियानोने घेतलीये. तो उठलाय हे पियानोचा आवाज येतो तेव्हा कळतं. रात्री-अपरात्री पियानो वाजवून शेजारच्यांची झोपमोड करायची नाही हा नियम घालायची वेळ आलीये.
त्याचा-माझा संवाद आता उलटा चालू आहे. काय काय तूनळीवर वगैरे शोधून मला ऐकवतो. "ह्यात तुला लेयर्स ऐकू येतायत का? हा कॉर्ड किती वेगळा आहे... ह्यात त्याची पियानोवरची कमांड बघ... लांग लांगच्या शोमनशिपवर जाऊ नकोस... डोळे मिटून ऐक..."
आढ्याचं पाणी वळचणीला जाऊ लागलय 
तुमच्यातल्या अनेक पालकांना ह्या माहितीचाही उपयोग होईलच. Managing their own expectations is the biggest battle of parents with themselves... I think 
छान
छान लिहीलंय. ज्यांना गाणं शिकायचं आहे, active भाग घ्यायचा आहे त्यांच्यासाठी चांगले मार्गदर्शन केलं आहे.
) भारतात एकदा मराठी सारेगमप ऐकताना एका छान गाण्याला 'now THAT was good' अशी दाद त्यानं दिली. ही समज आली की मग कोणत्याही प्रकारच्या, भाषेतल्या संगीताची पत समजते. यासाठी मी काही खास प्रयत्न केले नाहीत पण करता येण्यासारखे असतात का?
मला वाटतं कोणत्या ना कोणत्या संगीताची आवड प्रत्येकातच असते. 'संगीतच आवडत नाही' अशी व्यक्ती मी अजूनतरी पाहिली नाही. शिकणं आणि प्रत्यक्षात गाणं मात्र सर्वांनाच काही मर्यादांमुळे शक्य होत नाही. passive ऐकण्याचा मुद्दा आलाच आहे तो पुढे active भाग घेण्याच्या दृष्टीने आहे असं मला वाटलं. पण नुसतंच ऐकण्यापुरती जरी आवड जोपासली तर कानावर जे पडतं त्यातलं दर्जेदार काय आहे हे कळावं यासाठीही प्रयत्न करावे लागतात का? पैसा आणि साधनांची उपलब्धता यामुळे हल्ली जशी चांगल्या नवीन कलाकारांना संधी मिळते आहे तसेच सुमार दर्जाच्या गोष्टींचाही सुळसुळाट झाला आहे.
भारतीय आणि पाश्चात्य मधलं सर्वमान्य असं जे दर्जेदार आहे ते लहानपणापासून कानावर पडल्याने किंवा आणि कोणत्या कारणाने का होईना, पण सुदैवाने ती समज मुलात आली आहे. (याचे थोडेफार श्रेय आयडॉल चे सायमन कॉवेल यांनाही दिले पाहिजे.
लालू,
लालू, सुरेख प्रश्न. मला वाटतं, सुरूवातीला चांगलं ते कानी पडू देणं आवश्यक आहे. जसं चांगली पुस्तकं वाचायला देऊन आपण त्यांच्या वाचनाची एक दिशा ठरवू शकतो आणि विकास करू शकतो तसच.
पूर्वीच्या काळी गुरूने परवानगी दिल्याशिवाय दुसर्या घराण्याचं ऐकायलाही बंदी होती. ह्याचं कारण हेच की घडण्याच्या काळात जे "उत्तम" ते ते अनुभवलं की पुढे काय घ्यायचं अन काय नाही हे ठरवण्याचं शहाणपण येतं. ते येईपर्यंत "चांगलं" ते(च?) ऐकावं.
कोण ठरवतं चांगलं-वाईट? चांगलं कोणतं आणि वाईट कोणतं? हा मुद्दा इथे वादला जाऊ नये. त्या शिष्यांच्या बाबतीत त्यांचे गुरू ठरवायचे. आपल्या मुलांच्या बाबतीत आपण ठरवावं.
खास प्रयत्नं हेच... आवर्जून चांगल्या संगीताचं आजूबाजूला घडवणं.
सुन्दर
सुन्दर लेख...
अतिशय
अतिशय सुंदर लेख.
सहज सोप्या भाषेत लिहिलेला.
मी ह्याची प्रिन्ट करणार आहे
..........................................................

Marriage is a relationship in which one person is always right and the other is husband!
खूपच सुरेख
खूपच सुरेख लिहिलं आहेस दाद!!
दाद, धन्यवा
दाद,
धन्यवाद. फारच सुंदर लेख. (मायबोली वरील संग्रह करुन ठेवण्यासारख्या लेखात मान मिळवण्याएवढा).
दाद ग्रेट
दाद ग्रेट लिहिल आहेस!
मी खूपच उशीरा वाचलं.
मुलांसाठी इतक्या जागरूकपणे जगणार्या पालकांना दाद द्यावी तेवढी थोडीच!
शलाका, आत्त
शलाका,
आत्तापर्यंत सर्व तर्हेच्या प्रतिक्रिया तुझ्यापर्यंत पोचल्या असतील. (मी प्रतिक्रिया वाचल्या नाहीत.) लेख वाचून भारावून गेलो. दुर्दैवाने मी माझ्या मुलाला संगीत शिक्षण देऊ शकलो नाही. मला लय-ताल आणि थोडंफार सुरांचंसुद्धा भान आहे. पण वाद्य एकही वाजवता येत नाही. तसा गळा चांगला आहे. In fact, मी आणि सहा महिन्यांनी वगैरे माझ्या ग़ज़लांचे कार्यक्रम सुरु करणार आहे. मला सर्वात गंमतीची गोष्ट वाटते ती म्हणजे मला -एखादं दुसरं मोजकं गाणं सोडल्यास- कुठल्याच गाण्यांचे बोल आठवत नाहीत. पण धुन आठवते - ताल आठवतात - अगदी अंतर्यासह संगीत आठवते. हा सगळा passive music चाच भाग असावा. लहानपणी 'आपली आवड' आणि 'उर्दू सर्व्हिस' ऐकत ऐकतच झोपायचो. आर्मीमध्येसुद्धा कुठे remote भागात असेन तेव्हा transister हाच एक entertainment चा दुवा असायचा. नाहीतरी आमच्या उमेदीच्या काळात टी.व्ही. नव्हताच.
मी माझ्याविषयीच सांगत सुटलो. Anyway, लेख खूप सुरेख आहे.
शरदचंद्र पाटील (शरद)
[माना कि इस ज़मीं को न गुलजा़र कर सके
कुछ खार कम तो कर दिये, गुज़रे जिधर से हम] साहिर लुधियानवी
दाद मस्त लेख. आणि मस्त
दाद
मस्त लेख. आणि मस्त मार्गदर्शन आमच्यासारख्यांसाठि. तुझ्या मुलाला किति छान मर्गदर्षन केलस तु.
अग मला खरच असेच कोणितरि हवे होते बोलायला.
मला खरतर संगिताचे ज्ञान शुन्य आहे. जुनी हिन्दि, मराठि गाणि ऐकणे यापलिकडे काहि केल नाहि. तेहि आता फारस होत नाहिये.
पण मुलीला मात्र संगित अतिप्रिय आहे. आधि मला वाटल तिला नाच, ताल अस आवडत म्हणुन मैत्रिणिंच्या एक ग्रुप बरोबर तिला बॅलेच्या ट्रायल क्लासला नेल. बाकि मुलीहि तिच्या एवध्याच. त्याना मजा आली पण हि तोंड माझ्या मांडित लपवुन बसली होति. तिला आवडल नाहि म्हणुन परत गेलोच नाहि. नंतर जाणवल कि तिला कोणत्याहि गाण्यात जर पियानो, सितार किन्वा तबलाचा पिस असेल तर तिला पटकन कळत. आनि ति आपल्याला साण्गतेहि. तेव्हा ती ३ वर्षाचीहि झाली नव्हती. मग हळुहळु ती नर्सरीमधे बघुन पियानो वाजवायचि अॅक्टिग करायला लागली. पियानो घरात नाहिच तर सोफ्याला पियानो इमॅजिन करुन वाजवत होती. आधि खेळण्यातला पियानो आणला. पण त्यातला इंट्रेस्ट १५ दिवसात संपला. मग आम्हि विचार केला पियानो क्लासला घालण्याचा. मी क्लास शोधताना - त्यांचा वेळ जास्त नाहि,जिथे जबरदस्ति करत नाहित,हेच एक पुस्त्क शिकवायचे असेहि करत नाहित, तिने ठराविक दिवसात ठराविक गोश्टि शिकाव्या असा आग्रह नाहि असा क्लास शोधला. होता.
क्लास चालु केला. २ महिन्याने डिजिटल पियानोहि घेतला (कारण छोट्या किबोर्डच कि च वजन आणि साइज वेगळे असतिल अस वाटल). आता क्लास चालु करुन फक्त ४ महिने झालेत. तिच वय साडेतीन वर्षे. पण सगळ दो, रे,मी पुर्ण नीट वाजवतेच, पाचि बोटं आणि दोन्हि हात नीट वापरुन. ३/४ छोटि छोटि बडबडगितेहि वाजवते. महिन्यातुन एकदा तिथे रिदम प्ले असतो. शिक्षकानी ठराविक सुर वाजवल्यावर अॅक्शन बदलायची. हेहि तिला लगेच जमत. अजुन मराठि अक्षरं वाचता येत नाहित पण संगित १ २ ३ ४ अस बोटाचे नंबर देउन लिहिल असेल तर ते पुस्त्कात बघुन मनातल्या मनात दो रे मी अस मॅप करुन वाचते आणि वाजवते. तीच्या शिक्षकानी मला सुद्धा तिच्याबरोबर शिकायला , वाजवायला सांगितलेच आहे. मी ते करते. पण मला वाटत माझ ज्ञान अपजत नसल्याने ते कमी पडणार आहे. मी तिला जबरदस्तिने रियाझ बियाझ करायला सांगत नाहि. पण वेळ असला कि आम्हि पियानो गेम खेळतो म्हणजे काय तर
- सगळे दो किन्वा फा अस काहितरि वाजवणे.
- मी ज्या दोन तीन कि वाजवेन त्या तिला रिपिट करायला लावणे. किन्वा ते जे काय वाजवेल ते मी रिपिट करणे.
- मधेच सुर सांगुन त्याचि की कुठे आहे ते विचारणे अस.
परवा तिने नविन गेम शोधला. मग एक्दम बारिक आवाजात , तालात काहितरि कि वाजवल्या कि मी झोपायच. जोरात , फास्ट वाजवल्या कि मी उठायच.
हा गेम मस्त आहे. आता सगळे हावभाव असे दाखवायला काय कराव लागेल ?
तीच्या शिक्षकानी सांगितल कि अस एवढ्या लहान्पणि करता येत नाहि मुलांना. खर खोट देव जाणे. माझि मुलगि असल्याने जरा जास्त अभिमान वैगरे वाटतोय मला कि काय अस वाटत्च.
पण तीला मार्गदर्शन करायला कमी पडु नये असहि वाटत.
आणी इथे जपान मधे पुस्तका शिवाय शिकवत नाहित. तिला ऐकुन नुसत नोट्स न बघता वाजवता येण्याचि सवय लावायला काय करावे लागेल?
तिच्यासाठि अजुन काय करता येईल मला?
सावली... मज्जा आहे. मुलीला
सावली... मज्जा आहे. मुलीला संगीताची आवड आहे... तिचे शिक्षक सांगतात तर असणार ती तशी. तुझा अभिमान रास्तं!
पाश्चात्यं संगीत बहुतेक करून सिंफनी आहे. म्हणजे काय तर, कुणी लिहून ठेवलेलं, वाजवणे.
एक राग्/ताल ह्याची चौकट धरून मधला सगळा फुलवरा आपण करणे हे - उत्तर भारतीय संगीत. (कर्नाटिक संगीतातही बराचसा भाग "लिखित कृती सादर करणे" असाच असतो).
ह्यासाठी तिचा "कान तयार" होणं आवश्यक, दोन प्रकारांनी.
१. जे काही ऐकेल ते पुन्हा गाता/वाजवता यायला हवं - ह्यासाठी शिकणे आणि रियाज आवश्यक
२. कान, डोकं, मन समृद्धं, श्रीमंत करायला हवं - खूप खूप ऐकणं आवश्यक
तिचं वय ध्यानात घेता, ह्या दोन्ही गोष्टी हळू हळू करायच्यात.
स्वर मी पेटीवर शोधायचा आटोकाट प्रयत्नं करायचा 

तुझ्यासारखेच मी काही खेळ खेळायचे लेकाबरोबर -
मी गायलेला स्वर त्याने पेटीवर वाजवून दाखवायचा. किंवा त्याने ओरडलेला
पेल्यात, बाऊलमधे पाणी घेऊन ते वाजवायचं... त्याने सूर शोधायचा. पाण्याचं प्रमाण कमी जास्तं केल्यावर सूर बदलतो.
तिला तिच्या सध्याच्या स्थितीशी (नोट्स वाचणे) रिलेट करण्यासाठी एक करू शकतेस. अशा पद्धतीने बर्रोब्बर वाजवलेले तिने नोट्स लिहून ठेवायचे. आणि नंतर गंमत म्हणून ते वाचून वाजवायचं.
वेगवेगळी परकशन वाद्यं घेऊन वाजवायची... नुस्तीच किंवा एखाद्या झंपक्-चंपक गाण्याबरोबर (आरडीची जुनी गाणी?)
आम्ही दोघं काही ओरडत, गात, वाजवत नसलो तर सीडीप्लेयरवर गाणं चालू असायचं घरात, कायम.
कान समृद्ध करण्यासाठी खूप ऐकव तिला.... पुढ्यात बसून नाही पण कळत्-नकळत, सतत.
येत्या शुक्रवारी, केदार, माझा मुलगा, पुण्याच्या श्री राजेंद्र कांदळगावकर(पं. भीससेन जोशी ह्यांचे शिष्यं) ह्यांच्याबरोबर सिडनीतली शास्त्रीय संगीताची मैफिल वाजवतोय.
फारच सुंदर लेख दाद. आणि
फारच सुंदर लेख दाद. आणि तितकाच महत्वाचा!
संगीत हा विषय हा एका जन्मात
संगीत हा विषय हा एका जन्मात येत नाही.>> हे तुमचे वाक्य वाचुन मला परावाच ऐकलेली मुलाखत आठवली. पंडीत भिमसेन जोशींचे शिष्य होते (उपेंद्र भट बहुतेक. मला नाव आठवत नाहिये
) ते स्वःता बरेच नावाजलेले व अभ्यासु आहेत. ते बोलताना सुद्दा म्हणत होते पंडितजींच गाण ऐकल्यावर कळल गाण काय या जन्मी यायच नाही ते बघु आता पुढच्या जन्मी. 
छान लिहीलयत अनिताताई. तुमची धडपड मुलांपर्यंत गाण पोहचवायची कळकळ समजतीये. भाग्यवान आहेत मुली
दाद <<येत्या शुक्रवारी,
दाद <<येत्या शुक्रवारी, केदार, माझा मुलगा, पुण्याच्या श्री राजेंद्र कांदळगावकर(पं. भीससेन जोशी ह्यांचे शिष्यं) ह्यांच्याबरोबर सिडनीतली शास्त्रीय संगीताची मैफिल वाजवतोय.>> अभिनंदन मुलाच आणि तुझहि
त्यामुळे तिला सुराचे नाव सांगता येणार नाहि.
इतक्या पटकन उत्तराबद्द्ल धन्यवाद.
भारतीय आणि परदेशि संगितामधला हा फरक माहितच नव्हता मला. भारतात नसल्याचे जरा दुखःच आहे. पण एक हेहि आहे कि भारतात एव्ढ्या लवकर क्लास लावता आला नसता.
तु सांगितलेले गेम छान आहेत. मी करुन पाहिनच. फक्त प्रोब्लेम हा कि मी सुर ओळखण्यात ठार बहिरि आहे. त्यामुळे जे वाजतय ते कोणता सुर हे मलाच कळत नाहि.
तु साण्गितल्याप्रमणे तीला गाणि ऐकायवायच काम नक्कि करेन आजपासुनच
दाद तुमच्या मुलाचे
दाद तुमच्या मुलाचे अभिनंदन
सावली जर तुला आवड आणि वेळ असेल तर तु पण जाउ शकतेस क्लास ला. तेवढेच कॉमन टॉपिक पण रहातात.
घरातल्यांना मुळात आवड असणं,
घरातल्यांना मुळात आवड असणं, कमीतकमी त्यांनी तसा प्रयत्नं करणं आवश्यक आहे. नाहीतर मुलांत आवड निर्माण करणं किंवा जोपासणं हा एक ’कार्यभाग’ होऊन बसतो आणि त्यातला सहजभाव निघून जातो.>>>>
मला एक प्रश्न पडलाय , मला संगीतातल काहीच कळत नाही. मुलीला मात्र अतिशय आवड आहे. म्हणजे दिवसभर ती काहीना काही गातच असते.
(तिच वय वर्षे अलमोस्ट सहा आहे.)
तिला मी क्लासला घातलय.पण माझ्यासारखी संगीतात ओ कि ठो न कळणारी बाई तिला प्रोत्साहन कशा प्रकारे देउ शकणार?
तिला तिथे नेणे ,आणने, "मस्त म्हणती आहेस" या पलिकडे जावुन मी काहीच करु शकणार नाही. माझ्याकडुन नकळत का होईना तिच्यावर अन्याय होईल का अशी भिती मला तिचा सध्याचा कल बघुन वाटते.
म्हणजे मी तुमच्या सारख्या अनेकांसारखी "संगीताची आवड असणारी ,त्यातली थोडीफार जाणकार असणारी" असते तर किती बर झाल असतं अस अधुन मधुन मनात येत.
हा लेख वाचून मलाही मुलाला
हा लेख वाचून मलाही मुलाला उत्तेजन द्यायची खूप इच्छा झाली होती पण त्याच्या वर्गात दोन तीन संगीता आहेत
<< संगीत हा विषय हा एका
<< संगीत हा विषय हा एका जन्मात येत नाही. >>. सलाम...
दाद, मुलांना संगीताची गोडी
दाद, मुलांना संगीताची गोडी लागावी..त्यांनी पारंगत व्हावं यासाठी पालकांचे अथक परिश्रम आणि त्याग कारणीभूत होतात. अशी अनेक उदाहरणे जवळून पाहिली आहेत. तुम्हीही मुलासाठी किती काय काय केलंत...आज त्याला फळ आलेलं दिसलं. तुमचं अभिनंदन.
पण सर्व काही करूनही कलाकार होणं..प्रसिद्धी मिळणं हे सर्वांना शक्य होत नाही. संगीतातून मुलांना आनंद मिळाला..रिलॅक्सेशन झालं तरी आपला हेतु साध्य झाला असं म्हणावं लागेल.
आमच्या गुरु म्हणायच्या, '' आपल्या गाण्याने १०० पॉवरचे दिवे लागायला हवेत!! समोरचे श्रोते अगदी दिपून गेले पाहिजेत!'' पण आपली कुवत, आपल्या पदरी पडलेले ज्ञान, मेहनतीला मिळालेला वेळ, आणि जी काही मिळालेली प्रतिभा याच्या साह्याने समाधानी मनाने जर एक पणती जरी लावता आली तरी ऐकणा-याच्या मनात [दिपणे वगैरे सोडाच.] शांतता निर्माण झाली तरी खूप काही मिळालं , साधलं. असं मला फार वाटतं!
दाद, लेकाचं मनःपूर्वक
दाद, लेकाचं मनःपूर्वक अभिनंदन.
>>>>>>>>तिला तिथे नेणे ,आणने, "मस्त म्हणती आहेस" या पलिकडे जावुन मी काहीच करु शकणार नाही. माझ्याकडुन नकळत का होईना तिच्यावर अन्याय होईल का अशी भिती मला तिचा सध्याचा कल बघुन वाटते. म्हणजे मी तुमच्या सारख्या अनेकांसारखी "संगीताची आवड असणारी ,त्यातली थोडीफार जाणकार असणारी" असते तर किती बर झाल असतं अस अधुन मधुन मनात येत
सीमा, स्वतः आई-वडलांचा कल जरी संगिताचा नसला, तरी मुलाला ते exposure मिळावं म्हणून प्रयत्न व्हावा असं वाटतं. तू तो करतेस हे खरंच कौतुकाचं. मुलांना आवडणं, न आवडणं पुढल्या गोष्टी. पण हा प्रयत्न, प्रोत्साहन खूप उपयोगी असेल.
माझ्या मुलाच्या बाबतीत सांगायचं तर त्याच्या वडलांना थोडीफार बासरी वाजवता येते, आणि मी tone deaf. वयाच्या ५-६व्या वर्षी त्याने त्याच्या वयाच्या मुलांची काँन्सर्ट ऐकली. पण याला खास इंटरेस्ट वाटला नाही. तरी थोड्या वेळाकरता का होईना, आणखी १-२ दा घेऊन गेलो. आठव्या वर्षी त्याने आपणहून, "मला व्हायलीन शिकायचंय" सांगितलं. सुझुकी पध्दतीनं व्हायलीन शिकायला सुरुवात केली. गेल्या ६ वर्षांमधे चांगली प्रगती केली आहे, मुख्य म्हणजे आवडून वाजवणे हा प्रकार सुरू झालाय. आमचा सहभाग त्याला क्लासेसना , ऑर्केस्ट्रा तालमींना नेणं आणणं, तिथे बसून श्रवणभक्ती करणं इतपतच असतो. पण डॉ सुझुकींच्या तत्त्वाप्रमाणे 'प्रत्येक मूल संगीत शिकू शकतं' हे पटायला लागलंय.
रुजवा केलेलं प्रत्येक रोप
रुजवा केलेलं प्रत्येक रोप फळाला येत नाही म्हणून रोवायचं थांबवलं तर खायला नाही अशी अवस्था येईल. मुलांच्यात करायच्या अनेक रुजव्यात हा एक. आलं फळाला तर त्याच्याही पुढची पिढी खाईल.>>>> दाद अगदी ..माझं स्वप्नं आहे कि मुलांनी काही तरी असं करावे आणि हि ठेव फ़क़्त आपणच देवू शकतो.. म गाणी आमच्या इथे अखंड सुरु असतात.. श्लोक अभंग अगदी गझल पासून सगळ .. तुम्ही खरच नशीबवान आहात.. आमच्या घरात वडील येणार घरात म्हटल्यावर पटापट बंद करायचो आम्ही सगळ रेडियो असोत नाही तर टेप. मला नृत्य शिकायचं आहे हे ऐकल्यावर तर घरात युद्ध होणार होतं.. ते शेवटी म्हटले गाणं शिक मी अडून बसले आणि ते हि ..
आता गाणे काय आणि राग काय काहीच माहिती नाही तेव्हा स्वतः शिकणार आहे त्यांच्यासोबत
..ह्या लेखासाठी मनापासून आभार .. कोणी तरी मार्गदर्शन करतं तेव्हा खूप छान वाटत
>> ग्रुप ची आयडिया खरच छान आहे ..
दीदी... तुमचा हा लेख
दीदी...
तुमचा हा लेख दुसर्यांदा वाचून काढला... कां?... कुणास ठाउक!... पण वाचुन काढला... तुमच्याच लेखनाच्या अनुषंगाने एक किस्सा ईथे लिहितोय (तुमची परवानगी न घेता, त्याबद्दल क्षमस्व)...
मी सध्या ज्या Academy मधे 'संगित' शिकतोय तिथे, माझ्या समोर घडलेला किस्सा आहे:-
शाळांच्या वार्षीक परीक्षा संपून सुट्ट्या सुरु होण्या पर्यंतचा मधला काळ... 'गिटार'च्या क्लास मधे,एक 'संगित प्रेमी मम्मी (महाराष्ट्रीय)' आपल्या मुलाला घेऊन आली, आणि आमच्या शिक्षकांना भेटली. सर्व माहिती गोळा करुन क्लास मधे Addmission घेऊन, आणी मुलाला शिक्षकांच्या स्वाधीन करुन निघुन गेली (शिकणारा मुलगा पाचवितून सहावित जात होता). तीन-चार दिवसांनी मम्मी आणी मुलगा परत क्लास मधे हजर. मम्मीने शिक्षकांना गाठलं आणी चौकशी सुरू केली, "तुम्ही त्याला नीट सगळं शिकवताय ना?"... तरुण शिक्षक गांगरुन गेला. "नाही 'तो' म्हणतोय की, अजून शिकवायला सुरुवात केली नाही क्लासमधे!". शिक्षकाच्या लक्षात आलं,
"सध्या त्याला Strumming Practice करायला सांगितली आहे. पुढच्या आठवड्यात Note Practice सुरु करणार आहे"...
"ते Strumming खरोखरच गरजेचं आहे का?, की त्याच्या शिवाय पुढे जाताच येत नाही?"...
"गिटारच्या प्रत्येक तारेतला फरक त्याला समजला पाहिजे, तरच त्याला 'स्वर' लक्षात येतील, त्यांच्यातले फरक लक्षात येतील'... नाईलाजाने 'मम्मी' हिरमुसली होऊन निघून गेली... या नंतर पुन्हा एकदा, आठ-दहा दिवसांनी 'मम्मी आणी मुलगा' क्लास मधे हजर झाले... (मधल्या काळात Notes, Scales शिक्षकांनी सुरु केलेले होते. शिकणारा मुलगा स्टूलवर बसून शिकण्या ऐवजी उभा राहून शिकण्याचा प्रयत्न करत होता. 'क्लासच्या गिटारला बेल्ट का नाही?' याची चौकशी करत होता...) मम्मीने आल्या-आल्या शिक्षकांना गाठलं आणि चौकशी सुरु केली, "गिटार पूर्ण-पणे शिकायला साधारण किती दिवस लागतील?"...
"मुलगा गिटारची Practice किती आणि कशी करतो त्यावर अवलंबून आहे... Practice साठी घरी गिटार आहे कां?"...
"सध्या नाहि आहे, पण त्याचा मामा पुढच्या महिन्यात दुबईहुन येतोय, येताना त्याला याच्यासाठी Electric Guitar आणायला सांगितलंय... पण मला सांगा त्याला एकादं गाणं वाजवता यायला किती दिवस लागतील?"...
"मी तसं काही सांगू शकत नाही..."...
"नाही, माझ्या मैत्रीणिचा मुलगा देखिल दुसर्या क्लास मधे गिटार शिकतोय... तिथे तर अगदी पहिल्या महिन्यातच गाणं वाजवायला शिकवतात, असं म्हणत होति!"...
"गिटारचे स्वर आणी त्यांच्या जागा लक्षात आल्याशिवाय, मी गाणं शिकवायला सुरुवात करत नाही..."
"तसं नव्हे, पण साधारण त्यांच्या शाळेचं जानेवारी मधे 'गॅदरींग' असतं, तेव्हा पर्यंत तो 'गाणं' वाजवायला शिकेल ना? आणी त्याच दरम्याने ना आमच्या सोसायटि मधे आणी माझ्या सोशल मधे पण कार्यक्रम असतात, तेव्हा पर्यंत त्याला गाणं वाजवता येईल असं काहितरी शिकवा..."... मम्मी सुरुवाती पासुनच डोक्यात Instant Guitar Tution चा विचार घेऊन मुलाला लवकरात-लवकर 'गिटारीस्ट' बनवायच्या मागे होती... "... आणि त्याला ना उभं राहून 'गिटार' वाजवायला शिकवा, म्हणजे आता पासुनच त्याला जरा 'त्या Style'ची सवय होईल..." मम्मी आपल्या लेकाला 'सिनेमा/सिरियल'चा 'हीरो' बनवत होती की 'गिटार' वाजवणारा एक कलाकार बनवत होती, काही समजत नव्हतं... शेवटी आमच्या अंदाजा प्रमाणेच मम्मीने लेकाला 'या क्लास' मधुन काढुन दुसर्या 'Instant Guitar Tution Institue' मधे दाखल केलं... सर्वात महत्वाचं म्हणजे मुलाला 'गिटार' शिकण्यात अजिबात Interest नव्हता...
दाद, खुप सुन्दर
दाद, खुप सुन्दर लिहिलय...
मुलीसाठी काहितरी करेनच पण सोबतिला माझ्यासाठी पण काहितरी सुरु करावं अशी उर्मी दाटुन आली.
खुप छान वाट्लं
धन्यवाद...
सीमा, तुझं वाचून खरच भरून
सीमा, तुझं वाचून खरच भरून आलं.
<<तिला तिथे नेणे ,आणने, "मस्त म्हणती आहेस" या पलिकडे जावुन मी काहीच करु शकणार नाही. माझ्याकडुन नकळत का होईना तिच्यावर अन्याय होईल का अशी भिती मला तिचा सध्याचा कल बघुन वाटते.
म्हणजे मी तुमच्या सारख्या अनेकांसारखी "संगीताची आवड असणारी ,त्यातली थोडीफार जाणकार असणारी" असते तर किती बर झाल असतं अस अधुन मधुन मनात येत<<>>
मुळिच असं वाटून घेऊ नकोस.
अगं, तू तुझ्यापरीने जे करणार आहेस, तेच आवश्यक असेल तिच्यासाठी. आपण पालक, आवश्यक आणि पुरेसं ह्याच्या पारड्यात बरेचदा अडकतो. तू तिला जे देशील (संगीताच्याच बाबतीत नाही पण कशाच्याही बाबतीत) ते तुझ्यापरीनं तू १००% पेक्षाही अधिक असेल असाच प्रयत्नं करणार आहेस.... पालक म्हणून ते आवश्यक आणि तुझ्याबाजूने पुरेसं असेलच असेल.
दुसरे पालक आणि त्यांची मुलं ह्यांच्याशी तुलना करू जाताच, ह्या गणितात अनेक अननोन परिमाणं शिरतात आणि सगळच चुकतं.
असो....
सीमा, सावली, तुमच्या मुलांसारखंच तुम्हीही शिकायला सुरूवात करता का? स्वाती म्हणतेय ते खरय. एकतर सामायिक विषय होऊन संवाद वाढतो. आणि सीमा तुला जे, "आपल्याला काही कळत नाहीये" वाटतय ना, तसं वाटायचं नाही, मग.
मॄण्मयी काय म्हणतेय ते बघ - <आमचा सहभाग त्याला क्लासेसना , ऑर्केस्ट्रा तालमींना नेणं आणणं, तिथे बसून श्रवणभक्ती करणं इतपतच असतो. पण डॉ सुझुकींच्या तत्त्वाप्रमाणे 'प्रत्येक मूल संगीत शिकू शकतं' हे पटायला लागलंय.>
अनिताताई, तुम्ही कला जोपासण्याचा मूळ उद्देशच इतकं सुंदर सांगितलात.... <<पण आपली कुवत, आपल्या पदरी पडलेले ज्ञान, मेहनतीला मिळालेला वेळ, आणि जी काही मिळालेली प्रतिभा याच्या साह्याने समाधानी मनाने जर एक पणती जरी लावता आली तरी ऐकणा-याच्या मनात [दिपणे वगैरे सोडाच.] शांतता निर्माण झाली तरी खूप काही मिळालं , साधलं. असं मला फार वाटतं!>>
संगीत सदोदीत बरोबर असल्याने मला आजवर कधीच एकटं वाटलेलं नाही. हे काय कमी आहे? स्वस्थंपणे बसून थोडावेळ मन एकाग्रं करावं हे विनासायास होतं. ह्याला संगीताची आवड आणी थोडीफार उपासनाच कारणीभूत आहे.
माझ्या मुलाला हे जरी मिळालं तरी खूप झालं. ह्या धकाधकीच्या आयुष्यात जिथे निवार्याला जाता येईल अशी जागा त्याच्याच मनात निर्माण झालीये.... माझ्यासाठी इतकं पुरेसं आहे. त्याचा पुढला फुलोरा किती अन कसा होऊ द्यायचा ते तो ठरवेल...
अनिताताई, इथे जागा व्यस्तं होऊ नये एव्हढ्यासाठी "तो" प्रतिसाद काढून टाकला असल्यास प्लीज पुन्हा इथे टाका. हा लेख नुस्ती एक सुरूवात होती. इथे आलेले अनेक प्रतिसाद आणि चर्चाच आपल्यातल्या अनेकांना अधिक मार्गदर्शक, प्रेरणा देणारी झालीये... तेव्हा खरच पुन्हा इथे पोस्टा तो प्रतिसाद.
खूपच छान आहे
खूपच छान आहे लेख..
अभ्यासपूर्ण...
दाद! तुम्हाला (तुम्हाला आणि
दाद! तुम्हाला (तुम्हाला आणि केदारला) सलाम. परदेशात राहून तुम्ही मुलाला इतकं तयार केलंत. आणि तो तयार झाला. हे दोन्हीबाजूंनी घेतलेल्या ध्यासाशिवाय अशक्य. मुलाच्या आणि पालकांच्या आवडी एकमेकांना पूरक असणं किती भाग्याचं ना! इथल्या सगळ्यांचं - ज्यांना संगीतातलं फारसं कळत नसूनही मुलांच्या आवडीसाठी प्रयत्न करणार्यांचं - पण खूप कौतुक वाटतं.
विवेक, LOL. मीपण ऐकले आहेत असे किस्से.
दाद, अप्रतिम लेख. घरात
दाद, अप्रतिम लेख. घरात संगीताला पूरक वातावरण असलं, घरातील इतर सदस्य एखादे वाद्य वाजवत असले की आपोआप घरातल्या छोट्यांना त्या वाद्याविषयी उत्सुकता निर्माण होऊन ते वाजवायचा प्रयत्न केला जातो हे आजवर अनेक घरांमध्ये पाहिलंय. लहान वयात मुलांना तालाचा सेन्सही जबरदस्त असतो. लगेच संगीताच्या तालावर पावले टाकू लागतात, त्या तालावर टाळ्या वाजवतात किंवा माना तरी हालवतात. खूप मजा वाटते हे पाहताना.
आणि जेव्हा पालक तुमच्यासारखे दक्ष, सुजाण, दर्दी आणि मुलांना प्रयत्नपूर्वक संगीताची गोडी लावणारे असतात तेव्हा ती मुले खरंच तरारतात त्या संगीतावर आणि प्रोत्साहनावर!
शास्त्रोक्त संगीत जर लहानपणापासून कानावर पडले तर त्याचाही ''कानसेन'' व्हायला, सूर-ताल समजायला तरी फार छान उपयोग होतो. संगीतासारखी समृध्द सोबत नाही. त्यासारखी उपासना नाही. चटकन तल्लीन करणारी, अंतर्मग्न करणारी साधना नाही. आजूबाजूला संगीत नसले तरी जेव्हा आतून संगीत ऐकू येते तेव्हा सार्या जगाचा विसर पडतो. मग फक्त मनात गुंजणारे ते संगीत असते आणि आपण!
दाद <<सीमा, सावली, तुमच्या
दाद
<<सीमा, सावली, तुमच्या मुलांसारखंच तुम्हीही शिकायला सुरूवात करता का?>> मी वेगळा क्लास लावलेला नाहि. मुलीसाठि क्लास लावताना ३ ठिकाणी ट्रायल क्लास केले. तेव्हा कळल की काहि शिक्षक पाल्कांना सहभागि करुनच घेत नाहित. पण आम्हि निवडलेल्या क्लास मधे त्या शिक्षिका पालकांबरोबरच मुलांना शिकवतात. मलाहि वाजवता याव असा त्यांचा आग्रह असतो. मोठि ट्युन असेल तर अर्धी मी वाजवुन अर्धी मुलीला वाजवायला सांगतात. मुलीच्या कलाने घेतात व सध्या तरि २/४ वाक्यापेक्षा मोठि गाणि नाहित त्यामुळे जेवढ शिकवता पुरतय. घरि येउन मी जे शिकवलय ते दोन तीन्दा वाजवुन बघते. जास्त शिकवायला लागले आणि मला कळत नसेल तर मात्र वेगळा क्लास लावायचा विचार करेनच, पण जरा वेळ आहे.
दाद, या लेखाबद्द्ल तुमचे
दाद, या लेखाबद्द्ल तुमचे मनापासुन आभार. माझा मुलगा (अथर्व, वय वर्षे ५) यामाहा म्युजिक स्कूल मधे सध्या इलेक्टोन वाजवायला शिकतोय. घरी यामाहा चा कीबोर्ड आहे , त्यावर प्रॅक्टिस मनापासून करतो. आणि माझा नवरा पेटी शिकलाय , त्यामुळे किबोर्ड छान वाजवतो. आम्ही दोघेही त्याच्या क्लास ला जातो , त्याच्याबरोबर बसतो, त्यमुळे काय शिकवतायेत ते कळ्ते आणि अथर्व ची प्रगतीही कळते ,पण क्लास मधे शिकवतात त्याव्यतिरिक्त काय करता येईल? क्लास च्या कोर्स ची ऑडिओ सीडी आहे ती नेहेमी लावतो. शाळेतली गाणी पण हौशीने म्ह्णणतो पण अजून मराठी गाणी म्हणत नाही किंवा तसा इंट्रेस्ट दिसला नाहीये, नवर्याला शास्त्रिय संगिताची आवड आहे, तो ऐकतो अधुनमधुन,पण ती आवड मुलात कशी निर्माण करता येईल? आणि Solfege Singing मधले नोट्स नीट ( जशी टीचर म्ह्णणते अग्दी तसे ) म्हणावे यासाठी काय करता येईल?
मुलाची संगिताची आवड कशी जोपासता येईल याबद्द्ल अनेक प्रश्न असल्याने तुमचा सल्ला हवाय.
माझा मुलगा, वय ६ वर्षे, तो ४
माझा मुलगा, वय ६ वर्षे, तो ४ चा असताना तबल्याला घातला होता. ( आपण सगळे पर्याय देऊन पहायचे, त्यातले त्याला जे आवडेल ते करु दे, या विचाराने) पहिल्या १-२ महिन्यातच खूप कंटाळला. क्लासला जायची वेळ झाली की तोंड वाकडे! "सर रागावतात, मला येत नाही" इ. इ.. मी म्हटले "ठिक आहे, कदाचित नसेल त्याला तबल्याची गोडी" क्लास बंद केला. जवळजवळ एक वर्षानंतर परत त्याला सहज विचारले " जायचे का तबल्याला?" तर हो म्हणाला (त्याच सरांकडे). आणि आता गेले ६-७ महिने एकदम खूष आहे. पटापट धडे आत्मसात करतो आहे. सरही खूष आहेत. मलाही आश्चर्य वाटतं, अगदी मोठे मोठे धडे, दिले त्याच दिवशी पाठ होतात त्याचे! अचानक ही जादू कशी झाली?
अनिताताई, आपले आधीचे पोस्ट
अनिताताई, आपले आधीचे पोस्ट अतिशय चांगले आणि प्रामाणिक होते आणि उपयुक्त.
मी पूर्वी गाणं शिकायचे. शिक्षण सुटलं, पण गाणं मनात राहिलं. आता गेले वर्षभर मुलीसाठी पुन्हा सुरु केलं आहे. ती लहान बाळ असल्यापासून दिवसाची सुरवात शास्त्रीय संगीत ऐकुन करायची शक्यतोवर हे बर्यापैकी पाळतो. क्लास्ला तिला घेऊन जाते कधीकधी. लाडु मटकावत ती बसुन असते तिकडे. घरी येऊन गुरुजींची नक्कल करते. पेटीवर बोटं फिरवू देणे, भाता मारु देणे हे विशेष आवडीचे (किंचीत धसमुसळेपणा होतोच, नाही असे नाही.). पेटीवर मी तिला तिची गाणी वाजवून दाखवते अग्गोबाई, ढग्गोबाई, जन गण मन, नाच रे मोरा वगैरे. तालयंत्र लाऊन नाचत राहणे हेही तिच्या विशेष आवडीचे. सध्या एवढेच जमते आहे. इतक्या छोट्या मुलांना तसेही बुड लाऊन एका जागी बसणे अवघड जाते. तिचे वय आणि कल वाढेल (वाढला तर !!) तशी तिची तालीम आस्ते आस्ते सुरु करेन. दरम्यान तिच्या दमदार आवाजातील किंकाळ्या ऐकुन 'आवाज खराब होईल' अशी भिती वाटते.
आणि हो, तिला गाण्यात अजिबात रुची नसली तर, आपण त्याबद्दल काहीही करु शकत नाही हे मी गृहित धरले आहे. आणि ते स्वातंत्र्य तिला आहे. हो मला वाईट जरुर वाटेल, पण गाणं (किंवा कुठलीही कला) ही अट्टाहासाची गोष्टी नाही असे मला तरी वाटते.
Pages