परेड स्पेक्टॅक्युलर

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

इथे आल्यापासून नवीन वर्ष सुरू झालं की करायच्या अनेक कामांमध्ये एक असतं वर्षभराचे परेड कॅलेंडर बघून कालनिर्णयावर नोंदी करून ठेवणे. आम्ही राहतो ते गाव आणि शेजारचं स्टॅमफर्ड इथे काही ना काही निमित्ताने वर्षभर परेड्स निघतात. वर्षातली पहिली सेंट पेट्रिक डे परेड झाली की मग ईस्टर परेड, इंडिपेंडन्स डे परेड, मेमोरियल डे परेड, हॅलोवीन परेड आणि वर्षाची सांगता करणारी थँक्स गिव्हिंग परेड. काही ठिकाणी सँटा परेड पण असते. इथे ईस्ट कोस्टवर न्यू यॉर्क सिटी आणि स्टॅमफर्ड ह्या दोन थँक्स गिव्हिंग परेड्स प्रसिद्ध आहेत. पैकी थँक्स गिव्हिंगच्या आदल्या रविवारी होणारी स्टॅमफर्डमधील परेड ओळखली जाते 'परेड स्पेक्टॅक्युलर' नावाने.

दर वर्षी ह्या दोन्ही परेड्स बर्‍याच मोठ्या प्रमाणात आयोजीत केल्या जातात. खरं तर मोठ्या प्रमाणात 'प्रायोजित' केल्या जातात असं म्हणावं लागेल. स्टॅमफर्डमधल्या परेडचा मुख्य प्रायोजक आहे यु बी एस. साहजिकच ही परेड 'युबीएस परेड' म्हणून सुद्धा ओळखली जाते. स्थानिक शाळा-विद्यालये, डान्स/मुझिक अकॅडमी, गावचे महापौर, पोलीस, अग्निशमन दल ह्यांची देखणी पथकं परेडमध्ये भाग घेतात. बरोबर 'लोकल टॅलंट' जसे मिस स्टॅमफर्ड किंवा एखादा म्युझिक बँड पण सहभागी असतात. बाहेरुन बोलावलेले विशेष पाहुणे एका खास गाडीतून सर्वांना अभिवादन करत परेडमध्ये भाग घेतात.

नोव्हेंबरातल्या बोचर्‍या थंडीत सुद्धा परेडच्या दिवशी स्टॅमफर्डमधले रस्ते माणसांनी उतू जात असतात. परेड जाते त्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूस दाटीवाटीने लोकं उभे असतात. बरीच मंडळी लवकर येऊन शब्दशः पथारी पसरून बसतात. बरोबर फोल्डिंगच्या खुर्च्या आणणारे पण कमी नाहीत. सतरा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ह्या परेडला कनेटिकट आणि आसपासच्या राज्यांतून जवळ जवळ एक लाख लोक भेट देतात आणि ही संख्या दर वर्षी वाढतेच आहे.

परेडचं मुख्य आकर्षण म्हणजे जायन्ट हिलियम बलून्स ते सुद्धा बच्चे कंपनीच्या आवडत्या कार्टून्सच्या रूपांत. एका छोट्या मुलाने वर मान करून बघितल्यास अक्षरशः त्याचं सगळं आकाश व्यापून जाईल एवढे मोठे हे बलून्स असतात. दर वर्षी त्यात एखाद दोन बलून्सची भर पडते. गेल्या वर्षी, २०१० मध्ये नव्यानेच सामील झालेल्या स्कुबी डु सोबत एकूण १७ बलून्सनी परेडमध्ये भाग घेतला. परेडची सुरुवात समर स्ट्रीट आणि हॉयट स्ट्रीटवर बलून्स फुगवण्याच्या कार्यक्रमाने (Balloon Inflation Party) एक दिवस आधीच होते. तिथे सुद्धा स्थानिक म्युझिक बँडस्, चित्र-विचित्र वेषातली कार्टून्स असतात. हे बलून्स मोठ्या दोरांच्या साहाय्याने वाहून नेले जातात. त्यासाठी शंभर एक वॉलन्टियर्स ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यातच नेमले जातात. हे काम आणि बाकी सर्व आयोजन स्टॅमफर्ड टाउन सेंटर करते. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्यांची रंगीत तालीम होते. बलूनचे दोर नीट पकडण्याबरोबरच अधून मधून गोल गिरक्या घेत बलूनचं तोंड फिरवण्याचे जिकिरीचे काम त्यांना करावे लागते जेणेकरून रस्त्याच्या दोन्ही बाजूस उभ्या/बसलेल्या लोकांना नीट बघता येईल. एक एक बलून रस्त्यावरून जायला लागला की बच्चे कंपनीच्या आरड्या-ओरड्याला अक्षरशः उधाण येतं.

बरोबर १२ वाजता परेड सुरू होते ती हॉयट आणि समर स्ट्रीटच्या चौकात. तिथून सरळ ब्रॉड स्ट्रीटपाशी येत ती डावीकडे वळते आणि मॅक्डीपाशी उजवीकडे वळत अटलांटिक स्ट्रीटला जाते. अटलांटिक स्ट्रीटच्या टोकाशी परेड संपते. ह्या संपूर्ण रुटमध्ये एकूण चार चौक लागतात. प्रत्येक चौकात पथकं, बलून्स ह्यांचा १ मिनिटांचा थांबा असतो. कार्टुनवेषधारी मुलांशी हस्तांदोलनासाठी थांबतात. गावातल्या डान्स अकॅडमी वगैरेंची पथकं काही खास संचलन सादर करतात. बलूनवाले गिरक्या घेतात.

परेडच्या प्रायोजकांच्या पथकासमोर त्यांचा खास बलून असतो. मी काम करते त्या कंपनीचा गेल्या वर्षी बलून होता स्कुबी डु. परेडच्या साधारण महिनाभर आधी कंपनीत त्या वर्षीच्या बलूनसाठी मतदान होतं. परेडच्या दिवशी कंपनीचा एक खास 'रिफ्रेशमेंट' तंबू असतो. तिथे मदतकामासाठी कंपनीतले लोक वॉलन्टियर्स म्हणून नेमले जातात. कंपनीच्या दोन्ही-तिन्ही इमारतींसमोर ३०-३५ लोकांची बसण्याची व्यवस्था केली जाते. हे स्टँडस् दोन-तीन दिवस आधीच उभे केले जातात. त्यातल्या एका इमारतीचे ठिकाण इतके मोक्याचे आहे की बरेच लोक आपापल्या डेस्कजवळच्या खिडकीतून परेड बघतात. ऑफिसमधल्या रोजच्या काहीशा तणावपूर्ण रूटीनमध्ये परेडच्या निमित्ताने जरा बदल घडतो. ही परेड म्हणजे कंपनीसाठी लोकांपर्यंत पोचण्याचा एक सहज मार्ग आहे असे मला वाटते. म्हणूनच २००८/२००९ च्या कठीण काळात सुद्धा कंपनीने परेड प्रायोजित केली असावी जेणेकरून कंपनीच्या आणि त्यायोगे आपल्या भवितव्याविषयी लोकांना विश्वास वाटावा.

साधारण दोन तासांची ही परेड सुरू कधी झाली नी संपली कधी हे लक्षात येऊ नये इतकी मस्त आहे. घरात बच्चे कंपनी असेल तर एकदा तरी अवश्य भेट द्यावी. ह्या परेड स्पेक्टॅक्युलरमधली ही काही क्षणचित्रं:

dsc03826_0.jpgdsc03814_0.jpgdsc03809_0.jpgdsc03801_1.jpgdsc03829.jpgdsc03837.jpgdsc03841.jpgdsc03842.jpgdsc03846.jpgdsc03848.jpgdsc03850_0.jpgपरेड दिवसः थँक्स गिव्हिंगचा आदला रविवार (२० नोव्हे. २०११)
वेळः दुपारी १२ वा.
पथः समर स्ट्रीट-ब्रॉड स्ट्रीट-अटलांटिक स्ट्रीट (स्टॅमफर्ड, कनेटिकट)
पार्किंगः स्टॅमफर्ड टाउन सेंटर (AKA स्टॅमफर्ड मॉल), बेल स्ट्रीट पार्किंग गराज (वॉशिंग्टन बुलेवड एन्ट्रन्स), टार्गेट (वॉशिंग्टन बुलेवड एन्ट्रन्स)
परेड बघण्यासाठी सोयीच्या जागा: समर आणि ब्रॉडच्या मधला चौक, अटलांटिक स्ट्रीट आणि ट्रेसर बुलेव्हडच्या मधला चौक. शक्य झाल्यास सप्टेंबरमध्येच कोरोमंडल इथे वरच्या मजल्यावर टेबल आरक्षित करून ठेवणे. मस्त गरम गरम भारतीय जेवणाचा आस्वाद घेत परेडची मजा घेता येते Happy
हॉलिडे परेड कॅलेंडरः इथे अमेरिकेतल्या सर्व राज्यांमधील मोठ्या परेड्सची यादी आहे.
माहितीचा स्त्रोतः परेडवेळी मिळालेली माहितीपत्रकं, स्टॅमफर्ड टाउनचं संकेतस्थळ, विकी.

प्रकार: 

मोठा लाल कुत्रा हॉलमार्क चॅनेल वर असतो लै गोड आहे. ह्याच्या बरोबर एक पूडल पण अस्ते.
मग मिस्टर पोटॅटो हेड आपल्या ठकीसारखे हे सर्व अमेरिकन मुलांकडे अस्तेच. ( सं टॉय स्टोरी)
डिस्नेचा हत्ती
पिंक पँथर
पोपॉय ऑफ स्पिनॅच फेम
क्रेमिट, मिस पिगी व मपेट्स कंपनी. मपेट्स ची मूव्ही येत आहे. वॉचा. Happy पिवळे झगरेवाले मपेट कुठे आहे?

आता तुमच्यात इंडिया डे परेड असेल १५ ला ना? इथून सेलेब्रिटीज जातात मग हामी फोटो बघतो त्यांचे.

परेड्स बघायचे असतील, तर न्यू ऑर्लीन्सला या मार्डी ग्रा साठी. महिनाभर चालू असतात, आणि सगळ्यात छान म्हणजे बघणार्‍यांवर मण्यांच्या माळा, स्ट्फ्ड टॉइज, खे़ळणे, काय वाटेल ते फेकत जातात. मी ह्या वर्षी मुलीसाठी ३ मोठ्या बॅग्स भरून खेळणी जमवली Happy

तर न्यू ऑर्लीन्सला या मार्डी ग्रा साठी >>> अहो.. पण न्यू ऑर्लीन्सच्या मार्डी ग्रा मध्ये लहान मुलांना दाखवू नयेत अश्याच बर्‍याच गोष्टी असतात की...

त्या downtown च्या बाजूला..दुसरीकडे तो प्रॉब्लेम नसतो..

पहिली इस्टर परेड झाली की मग सेंट पेट्रिक डे परेड >>
सेंट पॅट्रिक डे मार्च १७ ला. त्या आधी इस्टर परेड होत नसणार गं.
फोटो छान आहेत. आता ममर परेड चा झब्बू द्यावा का ? मार्डी ग्रा चे प्रिंट फोटो आहेत अन ते इथे टाकण्यासारखे नाहीयेत Happy

खुप मस्तय....फोटो पण छान आहेत.....वाचताना संपुर्ण परेड डोळ्यापुढे उभी रहाते इतकं छान लिहीलं आहेस.
धन्यवाद!!!

Pages