शाळेची निवड

Submitted by माधव on 6 July, 2011 - 06:05

आज आपल्या भोवती अनुदानीत / विनाअनुदानीत, मराठी / इंग्रजी माध्यम, SSC / ICSC / CBSC असे वेगवेगळे बोर्ड अशा अनेक पर्याय असलेल्या शाळा उपलब्ध आहेत. आपल्या पाल्याला नक्की कुठल्या शाळेत घालावे याचा गोंधळ उडतो. या विविध पर्यांयांचे फायदे / तोटे आणि त्याच्या अनुषंगाने इतर बाबींची चर्चा करण्यासाठी हा बाफ.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधना छान लिहिलंय.

चांगली मराठी शाळा कुठे उपलब्ध आहे? पण उपलब्ध असलेली प्रत्येक इंग्रजी शाळा चांगलीच असाही होत असेल का?
मोजायला लागलेल्या किमतीच्या प्रमाणात त्या दर्जाची सेवा मिळतेय का हे आपण बघतो का?

बर्‍याच जणांनी मराठी माध्यमातून शालेय शिक्षण घेऊन मग कॉलेजात इंग्रजीतून शिकताना त्रास झाला असं म्हटलंय. आता वयाच्या १५-१६व्या वर्षी दुसर्‍या भाषेतून (जिचा किमान ६ वर्षे अभ्यास केलाय..आता तर पहिलीपासून मराठी शाळेत इंग्रजी शिकवतात ना?)शिक्षण घेताना त्रास होतो, तर वयाच्या ६ व्या वर्षी इंग्रजीतून शिकताना कठीण होत नसेल का?की लहान वयात कोणत्याही भाषा सहजपणे शिकता येतात?

साधना सुंदर पोस्ट.

काही गोष्टींशी असहमत (माझ्या अनुभवावरुन) -

१. मराठीसाठी तसे अजिबात करावे लागले नाही >> मला इंग्रजीच्या बाबतीत कसलेच प्रयत्न करावे नाही लागले. पण ती मराठी अजिबात वाचत नाही. म्हणजे शेवटी वाचनाची आवड ही उपजतच असली पाहिजे. पहिल्या अनुभवावरून धडा घेऊन प्रोजेक्ट क्रमांक २ मधे आत्तापासूनच मराठी वाचन सुरु केले आहे Happy

२. मुले मातृभाषेत जास्त सहजपणे शिकतात हे जगभरच्या शिक्षणतज्ज्ञानी मान्य केलेय. >> हे सर्वच विषयांबाबत खरे नाही. भाषा, इतिहास, भूगोल या विषयात हा मुद्दा अगदी खरा आहे. मूल हे शाळेपेक्षा त्याच्या भोवतालातून जास्त शिकत असते. त्यामुळे भोवताली बोलली जाणारी भाषा हि कधीही जास्त जवळची असते. मुलांना गोष्टी सांगताना बर्‍याचदा इतिहास येतो. गोष्टी जर मराठीतून सांगितल्या असतील आणि त्यावर आधारीत घडा मराठीतूनच असेल तर आकलन सहज होते त्याकरता वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. पण धडा जर इंग्रजीत असेल तर वेगळे आकलन करून घ्यावे लागते त्या मुलाला ---
मुलगी: बाबा siege म्हणजे काय?
मी: fort भोवती soldiers उभे करतात ना fort जिंकायला त्याला siege म्हणतात (मला धेडगुजरीत बोलावे लागते शिकवताना Sad )
मुलगी: Oh म्हणजे 'वेढा' का?
मी दोन मिनीटे निरुत्तरच झालो ह्या नंतर.मुलगी मराठी माध्यमात असली तर हे घडलेच नसते.

पण शास्त्र, गणित आणि इतर अनेक विषय जे आपण नेहमीच्या व्यवहारात कधी बोलत नाही ते शिकताना माध्यमाचा अडसर नसतो. कारण जे शिकायचे असते ते पूर्णप्णे नविन असते - मराठीतही आणि इंग्रजीतही. ते शिकून घेताना सारखेच कष्ट पडतात.

भरत, लहान मुले कोणत्याही भाषा एका विशिष्ट वयापर्यंत (किती ते माहित नाही :() सहज आत्मसात करू शकतात. अर्थात साधना ह्यांनी म्हट्ल्याप्रमाणे आता परिस्थीती बदलली आहे. एवढा त्रास होणार नाही कदाचित.

पत्रकारिता/ मिडीया स्टीज ?

मी ११वी प्रवेशासंदर्भात मेधाच्या बहिणीशी बोलतना तिने सांगितलेले की रुईया मध्ये पत्रकारीतेचे पुर्ण शिक्षण मराठीतुन उपलब्ध आहे आणि ते तसे घेऊन मराठी चॅनेल्स जॉइन करणारे लोकही आहेत.

मुंबईत ब-याच कॉलेजात निदान ११-१२ पर्यंत तरी मराठी माध्यमाची सोय आहे. ११वी ऑनलाईन प्रवेशासाठी पुर्ण मुंबईतल्या (अगदी भिवंडीपर्यंत) कॉलेजची माहिती देणारी पुस्तिका घ्यावी लागली त्यात अगदी साऊथ मुंबईतही दोन्ही माध्यमे असलेली कॉलेजेस सापडली. हिंदी/गुज्जु पण आहेत.

१२वी पुढचे अजुन काही माहित नाही Happy रुइयाला मराठी इंग्रजी दोन्ही ऑप्शन्स आहेत.

सावली, थोडसं अनुमोदन.

मीही दहावी नंतर डिप्लोमा.. मग डिग्री असेच शिक्षण घेतले.. आणि दहावीपर्यंत मराठी मिडिअम.

ह्याचे कारण मला आणि माझ्या कुटंबाला माझ्या उणिवांची जाणिव होती -
१. पाठांतर जमणार नाही.
२. गणित, शास्त्र समजून घेणयासाठीचा त्रास मी घेणार नाही (थोडक्यात आळशी)
३. एका जागेवर बसून अभ्यास जमत नाही.

म्हणून डिप्लोमा जवळचा वाटला, कारण -
१. डिग्रीला जाण्याची जास्त शक्यता (बारावीच्यापेक्षा)
२.घरात बाबा, भाऊ वेगवेगळ्या अभियांत्रिकी उद्योगात असल्याने, त्या क्षेत्रातल्या बर्याच संकल्पना ठाऊक
३. गरज पडल्यास बाबा, भाऊ कितीही वेळा एकच संकल्पना समजावू शकतात म्हणून (अजुन एलेक्ट्रो मॅग्नेटिक थिअरी नीटशी कळली नाहीये :फिदी:)

पण मी इंग्रजी माध्यामात असते तरी पुढच्या शिक्षणासाठी हाच निर्णय घेतला असता.

आमच इंग्रजी सुधारण्याच श्रेय विजय नाईक, प्रकाश गावकर आणि नलावडे बाईंना जातं. पहिले दोघे माझ्या मित्राचे नि मैत्रिणीचे वडील. ह्या दोन्ही घरात मला कुठल्याही पुस्तकाला अ‍ॅक्सेस होता.. निषादचे बाबा आम्हा तिघांसाठीच पुस्तके आणायचे Wink एवढी त्यांच्या घरची पुस्तके मी वाचली. लहानपणीच सगळ्या संस्कृतीतली अनुवादीत पुस्तके आम्ही वाचली.. मग त्यावर चर्चा वै.. त्यामुळे नंतर इंग्रजीत मूळ पुस्तके वाचताना सहज धागे जुळले.. उपरं वाटलं नाही. बाईंनी सगळे इतरत्र वाचन इंग्रजीत भाषांतर करायला लावलं.. रोजच्या बोलण्यात इंग्रजी वाक्य बोलायला लावली. यातून भाषेची गोदी, आकलन आणि मग आत्मविश्वास निर्माण झाला. हीच पद्धत लेकीसाठी सध्या उल्ट वापरतेय.. परदेशात मराठीशी नाळ जुळायला.. नि इंग्रजीत उपरेपणा वाटू नये म्हणून हाच पर्याय सध्या सुचतोय.

साधना - लेकीचे अभिनंदन. कोणी कला शाखेला कमी लेखत नाहीत हल्ली.
माधव, ह्या शेवटच्या पोष्ट्शी सहमत.

आम्ही आतापण मराठीत आधी अर्थ सांगतो नि मग इंग्रजी सांगतो.. तिला समजायला सोपे पडते.

जर ठाण्यात रहाणार हे नक्की झालं आणि सरस्वतीमध्ये अ‍ॅडमिशन मिळाली तर उत्तमच नाही तर लेकीला शिकवायला मला शब्दकोश उघडावा लागेल असे वाटते. Proud

साधना, पोस्ट आवडली. मराठी माध्यमाच्या सैनिकी शाळेबद्दल कुतूहल वाढले आहे.

>>>बाकी वर लिहिलेल्या विषयात आयुर्वेद, संगित यांचा उल्लेख झालाय का? मला वाटते कि हे हि मराठी मधुन शिकता येत असावे ( मराठी येत नसेल तर संस्कृत शी संबंधीत काही शिकता येते का हा मलाच पडलेला प्रश्न आहे)<<<
महाराष्ट्रात आयुर्वेद शिक्षण हे मराठी किंवा हिंदी माध्यमातूनच आहे. निदान मुंबई विभाग सोडून तरी नक्कीच.

संगीताबद्दल मी वरती लिहिले तसे पुणे विद्यापिठाच्या आमच्या ललित कला केंद्रात संगीत, नृत्य, नाट्य तिन्ही विभागांच्यातील बॅचलर आणि मास्टर्स डिग्र्या या मराठी माध्यमाच्याच आहेत.
तसंही ललित कला/ परफॉर्मिंग आर्टस शिकताना माध्यम हा खूप कमी महत्वाचा भाग असतो. वेगवेगळे लेक्चरर्स मराठी, हिंदी वा इंग्रजी कुठल्याही भाषेत शिकवतात. ललितमधे शिकवताना मी इंग्रजी आणि मराठी अश्या दोन्हीतून शिकवते तर मुंबई विद्यापिठात जमेल तितकी हिंदी आणि इंग्रजी व मराठी अश्या तिन्ही भाषांतून. परिक्षा मराठीतून देणे ललित कला केंद्रात सक्तीचे आहे तर मुंबई विद्यापिठाच्या नाट्य विभागात बहुतेक तरी परिक्षा हिंदी, इंग्रजी आणि मराठी तिन्हीपैकी कुठल्याही भाषेत दिलेली चालते (हेच संगीत विभागासाठीही असावे).

मुलीला मातृभाषेतून शिकायची संधी आणि स्वतःच्या आवडीचा शिक्षणक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य दिल्याबद्दल साधना , तुमचे अभिनंदन.

>>> चांगली मराठी शाळा कुठे उपलब्ध आहे? पण उपलब्ध असलेली प्रत्येक इंग्रजी शाळा चांगलीच असाही होत असेल का?

पुण्यापुरतं बोलायचं तर पुण्यातल्या बहुसंख्य मराठी, इंग्रजी माध्यम व कॉन्व्हेंट शाळांचा दर्जा सामान्य.

त्यातल्या त्यात बर्‍या मराठी शाळा म्हणजे रेणुकास्वरूप, हूजूरपागा, अहिल्यादेवी, अक्षरनंदन आणि अभिनव. उरलेल्या फारश्या चांगल्या नाहीत. नूमवि, महाराष्ट्र मंडळ, न्यू इंग्लिश स्कूल, इ. जुन्या शाळांचा दर्जा केव्हाच घसरला आहे.

त्यातल्या त्यात बर्‍या इंग्रजी माध्यमाच्या शाळा म्हणजे अभिनव व एसपीएम. ज्ञानप्रबोधिनी ही सर्वात जास्त चांगली इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. पण तिथे प्रवेश मिळणे खूप अवघड आहे. ती शाळा ५ वी पासून आहे व दरवर्षी फक्त ८० विद्यार्थी (४० मुले व ४० मुली) घेतात.

एकही कॉन्व्हेंट शाळा चांगली असल्याचे ऐकिवात नाही.

काहि इंग्रजी माध्यम व काँव्हेंट शाळात मुलांना खूप हॅरॅस करतात. मुले दंगा करत असतील तर पालकांना बोलवून समज देतात. तरीही फरक पडला नाही तर पालकांना दिवसभर वर्गात मागे बसवायला लावतात (माझ्या ओळखीच्या दोन कुटंबांना हा त्रास झालेला आहे. एक उदाहरण अभिनव शाळेचे आहे.) तरीही ऐकले नाही तर मानसोपचार घ्यायला लावतात. या शाळांत प्रचंड अभ्यासक्रम असतो. अनेक अपात्र लोकांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढून प्रचंड पैसा कमावलेला आहे. ५-६ वर्षांपूर्वी जोग शाळेत १० पास तरूण कंत्राटी शिक्षक नेमले होते असे उघडकीला आले. या शाळांची फी खूप जास्त आहे व त्यात दरवर्षी मोठी वाढ होत असते. या बर्‍याचश्या शाळेतल्या शिक्षकांचा दर्जा खूपच सामान्य आहे. शाळेच तासही खूप जास्त असतात. बर्‍याच मुलांना फालतू कारणे देऊन वर्ष रिपीट करायला लावतात. "इंग्रजी माध्यम" हा शिक्का बघितला की पालक मागचापुढचा विचार न करता या शाळेत मुलांना घालतात. मी जवळच्या नातेवाईकांमध्ये अशा शाळांची खूप संतापजनक उदाहरणे पाहिली आहेत.

त्यामानाने मराठी शाळा फार ग्रेट नसल्या तरी सरकारी नियमानुसार चालतात. फी खूपच कमी असते. शाळेचे तास कमी असतात त्यामुळे मुलांना इतर गोष्टी शिकायला वेळ मिळतो. सरकारने जो अभ्यासक्रम नेमला आहे तो व्यवस्थित शिकवतात. अभ्यासाव्यतिरिक्त तिथे इतर फारसे उपक्रम चालत नाहीत. तिथे चाकोरीबध्द रूटिनच्या बाहेर फारसे कोणी जात नाही.

धन्यवाद नीधप.

मराठी येत नसेल तर आयुर्वेद शिक्षण घेता येतं का?

<<काहि इंग्रजी माध्यम व काँव्हेंट शाळात मुलांना खूप हॅरॅस करतात. मुले दंगा करत असतील तर पालकांना बोलवून समज देतात. तरीही फरक पडला नाही तर पालकांना दिवसभर वर्गात मागे बसवायला लावतात (माझ्या ओळखीच्या दोन कुटंबांना हा त्रास झालेला आहे. एक उदाहरण अभिनव शाळेचे आहे.) तरीही ऐकले नाही तर मानसोपचार घ्यायला लावतात.>> बापरे हे भयानक आहे. दंगा मुलं नाही करणार तर कोण करणार Uhoh

सावली,
एका मर्यादेपर्यंत मुलानी केलेला दंगा चालवून घेतला जाऊ शकतो, पण एका मुलामुळे जर पूर्ण वर्गाला त्रास होत असेल आणि वेळ वाया जात असेल, तर शिक्षकांना काहीतरी कृती करावीच लागणार ना!
ज्याना शिक्षा झाली, ते नेहमीच आपली बाजु मांडणार आणि शाळेला दोष देणार. ( हे मी कोणा एका शाळेबद्दल बोलत नाहीए) मुले काय काय करु शकतात ह्याची आपल्याला कल्पनाही नसते. शक्यतो शिक्षक पहिल्याच प्रसंगी पालकाना बोलवत नाहीत, जेव्हा केस त्यांच्या हाताबाहेर जाते तेव्हाच पालकाना बोलावले जाते.

मास्तुरे, तुम्ही सांगितलेल्या कुटुंबांची सत्य परिस्थिती मला महिती नाही. मी केवळ सर्वसाधारण विधान केले.

मराठी येत नसेल तर आयुर्वेद शिक्षण घेता येतं का?>>>
हो घेता येत.सर्व भाषेत पुस्तके उपलब्ध आहेत . संस्कृत येत नसेल तरीही पहील्या वर्षाला बेसिक लेव्हल चा संस्कृत हा विषय असतो. त्यानंतर वाचनाने संस्कृत वाढवता येते.

मिलेनियम डे स्कूल आहे.. सकाळी ८ ते संध्याकाळी ६.. काहीही न घेता शाळेत जायचे असते.. सगळं शाळाच पुरवते.. त्या मानाने त्यांची फी योग्य वाटते..

सकाळी आंघोळ करुन शाळेत जायचं ते डायरेक्ट संध्याकाळीच परत यायचं... दुपारी झोपतात वगैरे पण शाळेतच म्हणे..
बाकीची माहिती इथे. http://www.myshala.com/home

>>> मिलेनियमची फी खूप आहे असे ऐकले. मिळाली तर माहिती द्या.

फी वर्षाला ३६००० रू आहे असे एका मित्राकडून समजले. त्याची मुलीने नुकताच या शाळेत ७ वी मध्ये प्रवेश घेतलेला आहे.

३६००० फी रास्त वाटते.

नेहमीच्या शाळेत देखील फी १८०००+
+ एखाद्या कला / खेळ शिकवणार्‍या क्लासची फी ६००० (५०० प्र.म.)
+ शैक्षणीक साहित्य ३०००+
+ जेवण / नाश्ता इ. ६०००
+ मुलांचे टीव्ही बघणे / संगणकावर खेळ खेळणे ह्याच्यावर ३००० नक्कीच बील भरतो

म्हणजे खर्चाचा मेळ जमतोय. 'मुलाला इतक्या वेळ शाळॅत ठेवावे का?' ह्याचे उत्तर जर हो येत असेल तर नक्कीच चांगला पर्याय आहे.

http://iforeye.blogspot.com/2010/10/fistful-of-soil-arvind-guptas.html
अरविंद गुप्तांचे अनुभव.
The educational terrain in our country is very harsh – almost barren. Even a good seed will wilt away in the absence of any soil. There is very little soil to nurture our young minds. We have a small historic role. Whatever be our circumstances, we have a humble task - to create a fistful of soil. Therein lies hope.

३६००० वार्षिक फिस म्हणजे खूप जास्त असं मला आधी वाटायचं. मुलाच्या अ‍ॅडमिशनसाठी दिल्लीतल्या आमच्या भागातल्या शाळा बघतेय. मी बघितलेल्या (अजून फक्त वेबसाइटच बघितली आहे. शाळांना भेट देवून त्या किती चांगल्या आहेत याची खात्री करुन घ्यायचिये) तिन्ही शाळांमध्ये मसिक फी २००० -२५०० आहे. याव्यतिरिक्त मासिक ३००-४०० पर्यंत अजून वेगवेगळे चार्जेस आहेत. स्कुलबसची फिस ७००-८५० (३ किमी च्या परिघात घर असेल तर). आणि एक शाळा डेस्कुल आहे तिथे जेवणाचे ६०० रु महिना.
म्हणजे सरासरी ३००० रु पेक्षा जास्तच मासिक फी आहे शाळांची सध्या. आणि यामध्ये इंटरनॅशनल शाळा/ एसी क्लासरुम असलेल्या शाळा नाही आहेत.

माध्यमाच्या व्यतिरिक्त काय काय गोष्टी बघाव्यात शाळेत अ‍ॅडमिशन घेताना? (आम्हाला इंग्रजी माध्यमाला पर्याय नाही). घरापासून ३ किमीच्या परिघात शाळा असणे हा एक निकष आहे. इथे नर्सरी अ‍ॅडमिशन्स एक डोकेदुखी असते. शाळा अ‍ॅडमिशनसाठी पॉइंट्स ठेवतात.

३ किमी च्या आत घर असणे - २० पॉइंट्स
एखादे भावंड त्या शाळेत असणे - १० पॉइंट्स
पालक शाळेचे विद्यार्थी असणे - २० पॉइंट्स
पालक डिफेंस /पोलिस/ इंजिनिअर /शिक्षणतज्ञ इ.इ. असणे - २० पॉइंट्स
पालकाला राज्य /केंद्र सरकारचे एखादे पारितोषिक मिळालेले असणे - १५ पॉइंट्स
पालकाने किमान एखादे वर्ष सामाजिक संस्थेत काम केलेले असणे - १५ पॉंट्स...
आम्हाला फक्त ५५ पॉइंट्स मिळू शकतात.

मला सल्ला हवा आहे.
मुलगी आठवीत सीबीएस सी मध्ये शिकते आहे. पुढील वर्षी तिला मुलुंड मधे डीएव्ही स्कूल मध्ये प्रवेश घ्यायचा आहे.

१) ही शाळा कशी आहे?
२) तिला सध्या हिंदी संस्कृत आहे नववी मध्ये एकदम मराठी घ्यावे लागेल का? तसे असेल तर मी तिला मराठी शिकवू शकेन अजून सहा महिने माझ्या हातात आहेत.
३) फी साधारण किती असेल.
४) शाळेचे टायमिन्ग काय असते मुंबईत. ही सर्व चौकशी मी शाळेत प्रत्यक्ष जाऊन करणारच आहे.
ही शाळा अशासाठी की ती माझ्या ऑफिसच्या जवळ आहे व शाळा संपल्यावर हपिसात येउन मला भेटू शकेल. माझे वर्क अवर्स संपे परेन्त ती लायब्ररीत बसू शकेल हपिसातच. शाळा फिक्स झाली की घर भाड्याने घ्यायचे आहे म्हणून चौकशी.

साधना ती कॉलेजेस ची लिस्ट कुठे मिळते? तुमचे काम झाले कि एकदा बघायला देशील का?

Pages