लेकुरवाळे
आम्ही जेव्हा रत्नागिरीत हा बंगला विकत घेतला तेव्हा तो आम्हाला फारच स्वस्तात पडला. कित्येकानी तर शहरापासून इतक्या लांब घर का घेताय. त्यापेक्षा इथेच फ्लॅट घ्या, याहून स्वस्त पडेल. असे सल्ले दिले होते. पण माझ्या मम्मीला झाडमाड असलेलेच घर हवे होते.
जेव्हा घर घेतले तेव्हा मूळ मालकाने तीन माड लावलेले होते. माड म्हणजे काय इवलाली रोपेच होती ती. बरीच फुलझाड होती. दारात एक फणस होता, सीताफळ, रामफळ आणि चिकू होते. पप्पाना झाडाची भरपूर आवड. घर घेतल्यावर मुद्दाम मलकापूरवरून मातीचा ट्रक आणवून त्यानी सर्व बाग सारखी करवून घेतली. मारूती नावाचा एक गडी खास झाडासाठी म्हणून ठेवला. त्याचबरोबर मम्मीने पण झाडावर भरपूर लक्ष दिलं. तर्हेतर्हेची फुलझाडं, पालेभाज्या, मिरच्या, भेडी, गवार अशी तिची "शेती" चालूच असते. जेव्हा तिने लावलेल्या केळीला "दिवस गेले" तेव्हा आईने पाच सवाष्णी वगैरे बोलावून केळबाईचे डोहाळजेवण केले. (आमची आई पण एक मॅडच आहे ना???)
तीन माड बघता बघता आकाशापर्यंत जाऊन पोचले. एकावेळेला १०० नारळ उतरवता याय्ला लागलेत. या घरात आम्हाला येऊन १० वर्षे झाली असं वाटतच नाही. आज्जीने लावलेल्या आंब्याला दरदरून मोहोर फुटला. कोकीळेच्या गाण्याच पार्श्वसंगीत सकाळ संध्याकाळ चालू झालं. जास्वंद, अबोली, मोगरा, ब्रह्मकमळ अशी परसातली झाडं शांत डोलायला लागली. घरतल्या सर्वाच्या वाढदिवसाचे एक एक झाड अंगणात आले. वाढत्या वर्षाला तेपण वाढायला लागले.
पण मनाला एक रूख रूख अजून लागून होती.
आमच्या दारच्या अंगणावर स्वतःची भली मोठी सावली धरणारा फणस मात्र अजून कधी फळला नव्हता. दरवर्षी या वेळेला येइल फणस असेच वाटायचे.
एकदा मम्मी गावाला गेली होती तेव्हा शेजारच्या काकूनी त्याच्या अंगणात कचरा पडतो म्हणून आमचा हा फणस परस्पर वेडावाकडा कापून टाकला होता. मम्मी आल्यावर अंगण बघताक्षणीच ती हबकली. सर्वानी पोलिस केस करा असे सांगितले. पण पोलिस केस करून तरी फणस पुन्हा होणार आहे का? असा तिचा प्रश्न असायचा.
त्यानंतर दोन तीन वर्षे गेली. कुणीकुणी काय काय सल्ले दिले. चप्पल बांधा, गिराणात झाडाची फांदी तोडा, नजर उतरवून घ्या. सगळे काही मनापासून केले. फणस काही धरेनात.
एकदा माझे सासरे आले होते ते म्हणाले. "कसली वाट बघताय? फणसाच्या लाकडाला किंमत आहे. झाड काढून टाका. तिथे दुसरे झाड लावा,"
माझा भाऊ (सासरे निघून गेल्यावर) म्हणाला "उद्या वडील अंथरूणाला खिळले तर "मारून टाका किमान विम्याचे पैसे मिळतील" असं म्हणायची की काय???"
दारच्या झाडाची इतकी काळजी करणारा लेक बघून आईवडिल सुखावले. उद्या आपल्यानंतर या सर्वझाडाचे काय असा प्रश्न माझ्या आईला कॅथ लॅबमधे सुद्धा पडला होता!!
पण २०१० साल आमच्यासाठी लेकुरवाळं ठरलं. पोफळीला सुपार्या आल्या. आंब्याला कैर्या आल्या. आणि फणसाला कुयर्या आले. 
छोटे छोटे इवलाले फणस पानापानामागून डोकवायला लागले. एक दोन तीन चार.... आईला तो एक छंदच लागला.
एखाद दुसरा फणस कधीतरी गळून पडायचा. पण अजून चार फणस झाडावर दिसायचे...
आणि यावर्षी आमचा दारचा फणस तब्बल चौदा फणसानी भरून गेला.
इतके दिवस "या झाडाला फळच नाहिये का? वांझोटं दिसतय" असे कुजकट टोमणे ऐकणार्या फणसाला दारातून येणार प्रत्येक माणूस थाबून बघायला लागला.
आईची अंगणातली बाग एखाद्या नांदत्या घराप्रमाणे लेकीसुनाजावई आणि नातवंडानी गजबजून गेली.

फणस खाल्ल्यावर पाणी पिउ नये.
फणस खाल्ल्यावर पाणी पिउ नये. आमच्याकडे (कोकणात) फणसाबरोबर खोबरं खाल्लं जातं.
>>>कापा फणस असेल तर त्याचे
>>>कापा फणस असेल तर त्याचे काटे मोठे असतात व बोथट. बरक्याचे काटे टोकदार व छोटे असतात. एक ढोबळ अन>>><<
बरोबर.
कापा फणसावर पाणी पिवू नये.!
बरका खाल्ला की प्याले तर चालते. थोडा गूळ टाकून पाणी प्यावे.
अगो, अगदी ग. माझ्याही मनात
अगो, अगदी ग. माझ्याही मनात असंच काहीसं आलं होतं.
आमच्या शेजारच्यांनी त्यांच्या
आमच्या शेजारच्यांनी त्यांच्या दिवंगत मुलाच्या स्मरणार्थ बकुळीचं झाड लावलं. २३ वर्षात त्याला एकही फूल आलं नाही. ते आजी-आजोबा गेले. बकुळीचं झाड नुसतंच वाढलं उंच आणि तिरकं होऊन मागच्या बंगल्याच्या आउटहाउसवर झुकलं. झाड किडीनं पोखरलंही जायला लागलं होतं शेवटी आजोबांच्या मुलीला विचारून ते तोडावं लागलं.
लेकूरवाळे!!! >>> नंदिनी खूपच
लेकूरवाळे!!! >>> नंदिनी खूपच मस्त
आमची पण एक आठवण...
लहान भावाने १०-१२ वर्षाचा असताना अमुलच्या रिकाम्या डब्यात आंब्याचा बाटा ठेवून त्याची माती-पाणी टाकून जोपासना सुरू केली... रोप थोडं मोठं झाल्यावर त्याला दारा समोरील जास्वंदीच्या कुशीत नेऊन ठेवले... कोंबड्यांचा त्रास होऊ नये म्हणून आंब्याच्या रोपाला तारेचे कुंपण घातलं... तिन वर्षात रोप पुरुषभर उंच झाल्यावर त्याला फांद्या फुटू लागल्या पण खोड म्हणावं तस जोर धरत नव्हतं... म्हणून मामाने चप्पल बांधली... त्यानंतर दोन एक वर्षात झाडाने चांगला जोर धरला... झाडावर कावळे, चिमण्यां सोबत बुलबुलचाही संचार असतो... फार मस्त वाट्टं... तसंच गेल्या सात्-आठ वर्षांपासून आंबा चाखायला मिळतोय...
या दिवाळी नंतर रिडेव्हलपमेन्टच्या नावाखाली झाडावर कुर्हाडं फिरणार...
नंदिनी - खूपच छान! मला इथल्या
नंदिनी - खूपच छान! मला इथल्या थंडीत तुळस, कढीपत्ताही जगवणे जमत नाही. पण माझ्या काही मैत्रिणींनी मात्र अगदी मोगरा, ब्रह्मकमळ ही वाढवलय घरात कुंडीत. माझ्या सासुबाईंच्या हातातही जादू होती. some people have green fingers! त्यांचाही असाच जीव होता बागेवर. बागेच्या काळजीने घराबाहेर कुठे जास्त राहायलाही नको वाटायचं त्यांना.
येल्कम ब्याक नंदिनी. छान
येल्कम ब्याक नंदिनी.
छान लिहिलयस, त्या दरदरुन फुटलेल्या मोहोराबद्दल अगदी अगदी.
आजच सकाळी आलो गावावरुन, सासूने बाग फुलवलीये, मोठ्ठीच्या मोठ्ठी कलिंगडं लगडलीयेत आणि फुलं तर वेडी फुललीयेत.
कोणी अंधश्रद्ध म्हणायचं तर म्हणा खुशाल, पण माझा संपूर्ण आणि मनापासून विश्वास आहे. झाडाला फळाफुलायला वेळ यावीच लागते. झाड लावणार्याच्या आजूबाजूंच्यांच्या भावभावनांचा, झाडावर परीणाम होतोच. तुम्ही खुश असता तेव्हा तुमचू झाडही खुश असतात अगदी तुमच्या पाळीव प्राण्यांसारखीच.
का कोण जाणे पण मला वाटतय, शेजार्यांनी तोडल्यामुळे दुखावला गेला होता तो फणस. घरातल्यांच्या प्रेमाने परत खुशालला.
नंदे महिन्याभरात एक रत्नागिरी
नंदे महिन्याभरात एक रत्नागिरी ट्रीप नक्की आहे..
तेव्हा झाले असतील तर पुण्यातल्या पब्लिकसाठी फणस घेऊन येण्यात येतील..
>>झाड लावणार्याच्या
>>झाड लावणार्याच्या आजूबाजूंच्यांच्या भावभावनांचा, झाडावर परीणाम होतोच. तुम्ही खुश असता तेव्हा तुमचू झाडही खुश असतात अगदी तुमच्या पाळीव प्राण्यांसारखीच.<< खरेय.
कोकणात हे उपाय करतात असे मीही चर्चेत एकलेले गावच्या की झाडाला फळं यावी म्हणून,
चप्पल बांधणे,करवंटी बांधणे, शेण थापणे खोडाला, दृष्ट काढणे.
मस्त लेख आणि फणस पण!
मस्त लेख आणि फणस पण!
..भारीच विषय घेतलाय लिहायला.
..भारीच विषय घेतलाय लिहायला. आमच्या अंगणातही सेम किस्सा आहे. फक्त हिरो बदललाय. फणसाऐवजी सोनचाफा...:) ता.क. - घरात हौशी नि पेशन्स असणारी मंडळी असतील तर गरे तळायला घ्या.
छान
छान
झकाऽस तपच्चर्या फणसाला लागली
झकाऽस
तपच्चर्या फणसाला लागली जनु...
कोणी पुण्याला येणार असेल तर आम्हालाही पाठवा फणस :प
खरं तर आमची बाग म्हणून प्र.चि. टाकायला हरकत नाही. केम??
मस्त लिहीलंय..
मस्त लिहीलंय..
हिम्स, कधी येणार अहेस? परवा
हिम्स, कधी येणार अहेस?
परवा झाडावरून फणस उतरवले. कापा फणस आहे. आईच्या एका मैत्रीणीने घरी येऊन ते गरे तळून दिले. आता आई मला ते कुरीअर करणार. आणि मग मी ते खाणार!!!!
मस्त
मस्त
नंदिनी, तुझी आई क्यूट आहे.
नंदिनी,
तुझी आई क्यूट आहे.
केळबाईचं डोहाळजेवण म्हणजे हाईट्ट आहे
अतिशय सुंदर. खूप आवडला.
अतिशय सुंदर. खूप आवडला. छानच लिहीतेस तु !!!
सुरेख लेख!
सुरेख लेख!
फार सुंदर लेख.
फार सुंदर लेख.
Pages