लेकुरवाळे

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

आम्ही जेव्हा रत्नागिरीत हा बंगला विकत घेतला तेव्हा तो आम्हाला फारच स्वस्तात पडला. कित्येकानी तर शहरापासून इतक्या लांब घर का घेताय. त्यापेक्षा इथेच फ्लॅट घ्या, याहून स्वस्त पडेल. असे सल्ले दिले होते. पण माझ्या मम्मीला झाडमाड असलेलेच घर हवे होते.

जेव्हा घर घेतले तेव्हा मूळ मालकाने तीन माड लावलेले होते. माड म्हणजे काय इवलाली रोपेच होती ती. बरीच फुलझाड होती. दारात एक फणस होता, सीताफळ, रामफळ आणि चिकू होते. पप्पाना झाडाची भरपूर आवड. घर घेतल्यावर मुद्दाम मलकापूरवरून मातीचा ट्रक आणवून त्यानी सर्व बाग सारखी करवून घेतली. मारूती नावाचा एक गडी खास झाडासाठी म्हणून ठेवला. त्याचबरोबर मम्मीने पण झाडावर भरपूर लक्ष दिलं. तर्‍हेतर्‍हेची फुलझाडं, पालेभाज्या, मिरच्या, भेडी, गवार अशी तिची "शेती" चालूच असते. जेव्हा तिने लावलेल्या केळीला "दिवस गेले" तेव्हा आईने पाच सवाष्णी वगैरे बोलावून केळबाईचे डोहाळजेवण केले. (आमची आई पण एक मॅडच आहे ना???)

तीन माड बघता बघता आकाशापर्यंत जाऊन पोचले. एकावेळेला १०० नारळ उतरवता याय्ला लागलेत. या घरात आम्हाला येऊन १० वर्षे झाली असं वाटतच नाही. आज्जीने लावलेल्या आंब्याला दरदरून मोहोर फुटला. कोकीळेच्या गाण्याच पार्श्वसंगीत सकाळ संध्याकाळ चालू झालं. जास्वंद, अबोली, मोगरा, ब्रह्मकमळ अशी परसातली झाडं शांत डोलायला लागली. घरतल्या सर्वाच्या वाढदिवसाचे एक एक झाड अंगणात आले. वाढत्या वर्षाला तेपण वाढायला लागले.

पण मनाला एक रूख रूख अजून लागून होती.

आमच्या दारच्या अंगणावर स्वतःची भली मोठी सावली धरणारा फणस मात्र अजून कधी फळला नव्हता. दरवर्षी या वेळेला येइल फणस असेच वाटायचे.

एकदा मम्मी गावाला गेली होती तेव्हा शेजारच्या काकूनी त्याच्या अंगणात कचरा पडतो म्हणून आमचा हा फणस परस्पर वेडावाकडा कापून टाकला होता. मम्मी आल्यावर अंगण बघताक्षणीच ती हबकली. सर्वानी पोलिस केस करा असे सांगितले. पण पोलिस केस करून तरी फणस पुन्हा होणार आहे का? असा तिचा प्रश्न असायचा.

त्यानंतर दोन तीन वर्षे गेली. कुणीकुणी काय काय सल्ले दिले. चप्पल बांधा, गिराणात झाडाची फांदी तोडा, नजर उतरवून घ्या. सगळे काही मनापासून केले. फणस काही धरेनात.

एकदा माझे सासरे आले होते ते म्हणाले. "कसली वाट बघताय? फणसाच्या लाकडाला किंमत आहे. झाड काढून टाका. तिथे दुसरे झाड लावा,"

माझा भाऊ (सासरे निघून गेल्यावर) म्हणाला "उद्या वडील अंथरूणाला खिळले तर "मारून टाका किमान विम्याचे पैसे मिळतील" असं म्हणायची की काय???"

दारच्या झाडाची इतकी काळजी करणारा लेक बघून आईवडिल सुखावले. उद्या आपल्यानंतर या सर्वझाडाचे काय असा प्रश्न माझ्या आईला कॅथ लॅबमधे सुद्धा पडला होता!!

पण २०१० साल आमच्यासाठी लेकुरवाळं ठरलं. पोफळीला सुपार्‍या आल्या. आंब्याला कैर्‍या आल्या. आणि फणसाला कुयर्‍या आले. Happy

छोटे छोटे इवलाले फणस पानापानामागून डोकवायला लागले. एक दोन तीन चार.... आईला तो एक छंदच लागला.

एखाद दुसरा फणस कधीतरी गळून पडायचा. पण अजून चार फणस झाडावर दिसायचे...

आणि यावर्षी आमचा दारचा फणस तब्बल चौदा फणसानी भरून गेला.

इतके दिवस "या झाडाला फळच नाहिये का? वांझोटं दिसतय" असे कुजकट टोमणे ऐकणार्‍या फणसाला दारातून येणार प्रत्येक माणूस थाबून बघायला लागला.

आईची अंगणातली बाग एखाद्या नांदत्या घराप्रमाणे लेकीसुनाजावई आणि नातवंडानी गजबजून गेली.

fanas.jpg

प्रकार: 

डीजे, आमच्या घरात आम्ही जुन्या चपला झाडानाच बांधतो. आम्ही म्हणजे आमचा मारुती गडी. झाडाची फुलं, फळं काढण्याआधी, माडावर चढण्याआधी तो सर्व झाडाना नमस्कार करतो. "देवा, तुझ्यावर पाय ठेवतोय, माफी असावी, चुकलं तर क्षमा कर्" अश्या टाईपचं एक गार्‍हाणं म्हणतो. ते ऐकायला फार मस्त वाटतं.

फणस कापा आहे का बरका ते कापल्याशिवाय समजणार नाही. त्यामुळे तो एक सस्पेन्स आहेच.

मेधा, अजून तरी फणस झाडावरून उतरवले नाहीत. पिकल्यावर मगच उतरवणार. त्यामुळे भाजीसाठी पुढल्या वर्षी. Happy

खोट्टे करायला मी इथे मंगलोरला आल्यावर शिकतेय. माझी कामवाली मला ते पानाचे द्रोण बनवून देते. मला काही जमले नाहीत अजून Happy आणि तुला पानं हवीच असतील तर कधीपण येऊन घेऊन जा. अमेरिकेत पोचेपर्यंत त्याचा फ्रेशनेस गायब होइल (आणी मला आयते खोट्टे खायला मिळतील.)

डीजे, मीही लिहिलय झाडाची दृष्ट काढ असं, पण अंधश्रद्धा वगैरे म्हणून नाही बरंका. Proud झाडाबद्दल वाटणार्‍या कौतुकाचाच भाग आहे तो :)ते गार्‍हाणंही घालतात, ते ज्या झाडावर आपण चढतो, त्यालाही जीव आहे ह्या भावनेतून घातलेलं असतं. त्यात काही चूक वा हास्यास्पद काहीच नाही आणि अंधश्रद्धा त्याहून नाही.

नंदू, फणस पिकल्यावर जो घमघमाट सुटतो, त्यावरुन साधारण कळतं बहुतेक. पिकले नाहीत का फणस अजून?

साधा सहज पण सुंदर लेख... Happy

फणस कापा आहे का बरका ह्यावरून पाणी कधी प्यावे ह्याला काही मर्यादा आहेत का?
म्हणजे बरका खाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, पोटात दुखते वगैरे??

खुपच गोड लेख आहे नंदिनी Happy

मी एकदा एक रोपटे आणले होते. ते कशाचे होते, हे त्यावेळी माहिती नव्हते. त्याला मस्त एकावर एक अशी पानं होती आणि अबोली रंगाची सुंदर फुलं होती. थोड्या काळाने सगळी फुलं सुकली आणि परत कधी आलीच नाहीत. आम्हाला वाईट वाटलं. पण आम्ही तसंच त्या झाडाला पाणी देत राहिलो. फुलं नसली म्हणून काय झालं? तो ही एक जीवच ना?

असं वर्षभर चाललं. एक दिवस अचानक त्या पानांना कळ्या फुटल्या. प्रत्येक पानावर किमान चार कळ्या आणि बघता बघता आणली तेंव्हा होती, तशी सुंदर टपोरी फुलं उमलली. आम्हाला इतका आनंद झाला, की बस्स! मग चौकशी केल्यावर समजले, हा एक कॅकटसचा प्रकार आहे, ज्याला 'वाईनाख्टन' कॅकटस असं जर्मनमध्ये म्हणतात, म्हणजे ख्रिसमसमध्ये उमलणारा कॅकटस. Happy

घरात अजूनही अशी काही फुलझाडं कुंड्यांमध्ये लावलेली आहेत. आधी छान फुलं आलेली पाहून आणलेली, पण मग माती बदलून, खत देऊनही त्यांना फुलं नाहीच येत आहेत... पण पानं मात्र छान हिरवीगार आहेत. त्यामुळे फेकायचे मनातही येत नाही... एकदा घेतली, की ही झाडं/रोपं म्हणजे आपल्या घरातलीच एक बनून जातात, त्यांच्यावर जीव जडतो, हेच खरं... Happy

चांगलय. भावना समजू शकल्या. शेजारणीने तो फणस छाटल्यामुळे(prune) केल्यामुळे फायदा झाला असेल बहुधा.

आमच्या गावी कुठल्याही झाडाला आलेले पहिलेच फळ सर्वात आधी कुलदेवताला दाखवून प्रार्थना करून मग एकदम गरीबाला घरचे जेवण व ते पहिले फळ(आंबा, फणस, चिकू, पेरु जी व जशी फळं धरतील ती) द्यायची सवय होती. त्यातून झाडाला आशिर्वाद मिळतो असे आजाचे(आजोबा) म्हणणं.

केळी प्रसवली की मोठी पूजा वगैरे असते आमच्या गावी सुद्धा.

>>>>पण मग माती बदलून, खत देऊनही त्यांना फुलं नाहीच येत आहेत... पण पानं मात्र छान हिरवीगार आहेत. त्यामुळे फेकायचे मनातही येत नाही... एकदा घेतली, की ही झाडं/रोपं म्हणजे आपल्या घरातलीच एक बनून जातात, त्यांच्यावर जीव जडतो, हेच खरं>>>><<<

अगदी % खरे.

नंदिनी, किती छान लिहिलंयस. आवडलंच Happy
तू ही ह्याच वर्षी बाळाला घेऊन माहेरच्या घरी गेली असशील ना ? ... ह्यावरुन आठवलं, माझ्या बहिणीने तिच्या बॅकयार्डमध्ये खूप हौसेने अनंताचे झाड लावले होते. व्यवस्थित वाढले होते पण फुले काही केल्या येत नव्हती. कळ्या यायच्या पण सुकून पडून जायच्या. मात्र बहिणीला बाळ झालं आणि ती बाळाला हॉस्पीटलमधून घेऊन घरी आली त्या आठवड्यात झाड अचानक फुलांनी बहरुन आलं. आम्ही श्रद्धाळू किंवा अश्रद्ध अशा कुठल्याच कॅटेगरीत मोडत नाही. ह्या योगायोगाचं आश्चर्य वाटलं. कदाचित झाड फुलण्यासाठी तोच सीझन असेल. कुणी सांगावे घरात छोटं बाळ आल्याचा आनंद झाडाने असा व्यक्त केला असेल. कुणास ठाऊक ? त्या फुलांनी खूप आनंद दिला एवढं खरं Happy

छान लिहिलयं. आमची आई काढते आम्हा मुलींची दृष्ट अधुन मधुन. तेव्हा काय वाटत त्या भावना बोलता येणार नाहीत. घरी गेल कि अजुनही पायावर पाणी टाकून ती आत घेते तेव्हा पण नेमक कस वाटत ते नाही सांगता येणार तस काहीसं. मन हळव होवून जात एवढ मात्र खर.

वा! Happy

नंदिनी, आज सकाळी हा लेख वाचला.. आणि आत्ता आईने फोनवर सांगितलं की आमच्या घरच्या फणसाला दोन फणस आलेत.. पहिल्यांदाच. Happy कापा / बरका कसे निघतायत माहित नाही. झाड लावून सुमारे १२ वर्ष झाली असतील.. आत्ता आली फळं...!

लिहिलंयस मस्तच.
आजउद्याच भातगावात पोचवायची व्यवस्था झाली तर फणस पार्ल्यापर्यंत येतील पर्वा. माझ्याकडून ज्याने त्याने घेऊन जा. पण लवकर. पुढच्या आठवड्यात शिफ्टींग हे... Happy

नक्की आठवतं नाही पण लहानपणी ऐकलं होतं फणस खाल्यावर , पान की काहीतरी खाऊ नये म्हणुन , खरं काय आहे कुणी सांगु शकेल का ?

सही लिहीले आहे. Happy आमच्या घरी कुंडीत जवळजवळ एक वर्षानी कण्हेरीला कळ्या आल्या आहेत. एका जास्वंदीला खुप फुले येत होती अचानक ६-८ महीने का वर्षभर एकही फुल नाही म्हणुन सोसायटीत खाली लावली. २ महीन्यात मस्त फुले येत आहेत.

शैलजा पुण्याकरता दोन फणस मागव. Happy कापा फणस असेल तर त्याचे काटे मोठे असतात व बोथट. बरक्याचे काटे टोकदार व छोटे असतात. एक ढोबळ अनुभव.

Pages