कोल्हापुरी मिसळ

Submitted by लालू on 10 July, 2008 - 16:24
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३ वाट्या मोड आलेली मटकी
४ मोठे कान्दे (पान्ढरे नको!)
२ वाट्या ओले खोबरे
१ वाटी सुके खोबरे
३ इन्च आल्याचा तुकडा
२ लसणाचे गड्डे (सोलून वाटीभर व्हावा)
१ जुडी कोथिम्बीर
२ मोठे चमचे कोल्हापुरी कान्दा लसूण चटणी
१ मोठा चमचा गरम मसाला पावडर
किन्वा अख्खा (५,६ लवन्गा, १ दालचिनीचा २ इन्चाचा तुकडा, ५,६ काळे मिरे, धणे - जीरे १,१ चमचा)
२ बटाटे चिरून.
मीठ, तेल, हिन्ग, हळद, तिखट, पाणी.
फरसाण किन्वा hot mix , ब्रेड, बारीक चिरलेला कच्चा कान्दा, कोथिम्बीर, लिंबू.

क्रमवार पाककृती: 

पातेल्यात तेल तापवून त्यात हिन्ग, हळद घालावी. मटकी, बटाटे टाकून परतावे, बुडेल इतके पाणी,तिखट, मीठ घालून शिजवून घ्यावी. फ़ार मऊ नको. यात थोडे पाणी राहिले तरी चालेल.

कटाची तयारी - कान्दे उभे पातळ चिरून घ्यावेत. यातला वाटीभर कान्दा बाजूला ठेवून उरलेला कान्दा, खोबरे(दोन्ही), गरम मसाला तेलावर भाजून बारीक वाटावे. आले, लसूण, कोथिम्बीर बारीक वाटावी. वाटताना जास्त पाणी घालू नये.

जाड बुडाच्या पातेल्यात १ वाटी(!) तेल तापवून हिन्ग, हळद आणि उभा चिरलेला वाटीभर कान्दा, कोल्हापुरी चटणी टाकावी. परतून घेउन मग दोन्ही वाटणे घालून पुन्हा चान्गले परतावे. त्यात मीठ आणि ४ कप पाणी घालून उकळी आणावी.

घेताना एका खोलगट प्लेट मधे २ मोठे चमचे फरसाण घ्यावे. त्यावर मटकी, थोडा कच्चा कान्दा,कोथिम्बीर घालून मग १ पळी कट घालावा. कट घेताना ढवळून घ्यावा. आवडतो त्यानी वरचा तवंग घ्यावा. लिम्बू पिळावा. ब्रेड बरोबर खावे.

वाढणी/प्रमाण: 
५-६ लोकांना पुरेल.
अधिक टिपा: 

ही मिसळ बर्‍यापैकी झणझणीत होते. झेपत नाही त्यानी तिखट कमी करण्यासाठी दही, शेव, टोमॅटो घालावा.तिखट नको असणार्‍यानी मटकी जास्त घ्यावी.

वरील प्रमाणे केलेली मिसळ खाऊन कुणाला काही झाल्यास किन्वा न झाल्यास मी जबाबदार नाही. Happy

अलिकडे 'भोसले यांचे मराठा दरबार मसाले' मिळू लागलेत. कोल्हापुरात मिळतात. पुण्यातही उपलब्ध असल्याचे कळले. त्यांचा मिसळीचा मसाला छान आहे. कटासाठीचे बरेच कष्ट वाचतात आणि चवही चांगली येते. त्यात उसळीसाठीही मसाल्याचे एक छोटे पॅक आहे. पॅकवरच्या सूचनांप्रमाणे करावे.

माहितीचा स्रोत: 
पारंपारीक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"अंबारी" ब्रँडचा चांगला आहे कांदा लसूण मसाला. आणी कोल्हापूर मधले लोकल "मराठा दरबार" किंवा "पिळणकर" दोन्ही ब्रँडचे मिसळ मसाले पण छान होते.

मला काळा चणा , मुग आनि मटकी वापरायची आहे मिसळ्मध्ये. pressure cooker मध्ये बनवु का? नुस्ति मटकी वापरुन बर्याचदा केलि आहे पण या वेळी चणा असल्याने confused आहे . कृपया सांगा.

पाककृतीमध्ये लिहिलेल्या सूचनांबरहुकूम:

Kolhapuri Misal.jpg

१. उसळ वेगळी ठेवली नाही. कटातच मूग+मटकी+चवळी शिजवून घातली होती.
२. काश्मिरी तिखट घातले. लई भारी रंग आला. आणि त्यामुळे मिसळ चवीलाही आगवणी तिखट झाली नाही.

अहाहा , मंजू. .. प्रचंड लाळगाळू फोटो. स्लर्प स्लर्प. ही रेसिपी आमच्याकडेही हिट्ट आहे. मी पण कट वेगळा नाही करत. लालू, एवढ्या मस्त रेसिपी साठी धन्यवाद!

मी मागच्या वेळी लालूची रेसिपी वापरून कट करायचा प्रयत्न केला पण काही जमला नाही .. ह्यावेळी परत ट्राय केली रेसिपी .. आहे त्या प्रमाणाच्या अर्धी .. कट तर मस्त जमला चवीला .. पण खूप दाट झाला आहे .. नवरा म्हणतो ह्या सामग्रीत बाहेरचे मिसळवाले भरपूर तेल, पाणी आणि तिखट वापरून पन्नास एक लोकांसाठी आरामात वापरतील ..

तसंच आधीपासून जी शंका आहे ती कायम आहे .. माझा काही लालभडक रंग आला नाही .. पण शेवटी एकदाचा किमान चवीला तरी कट जमला त्यामुळे मी खुश आहे .. Wink

MisaL1.jpgMisaL2.jpgMisaL3.jpg

सशल, मी कांदा-खोबर्‍याचं घट्ट वाटण चांगलं दोन वाट्या भरून बाजूला काढून ठेवलं होतं. तर्री किती दाट/पातळ होतेय ते पाहून वापरायचं की नाही ठरवायचं अश्या बेताने... ते वापरावं लागलंच नाही. मग ते घट्ट झाकणाच्या डब्यात घालून डीप फ्रिजमध्ये ठेवलं. एकदा फ्लॉवरच्या रस्सा भाजीसाठी आणि एकदा मटकीच्या उसळीसाठी वापरलं. दोन्हीला एकदम मस्त चव आली होती.

हो, हो मंजूडी .. अजून दोनदा तरी बाकीच्या भाज्यांनां मसालेदार ग्रेव्ही म्हणून वापरता येईल एव्हढा कट शिल्लक आहे .. Happy

सढळ हाताने तेल घातलं असा समज आहे पण तरी लालभडक तवंग काही जमला नाही .. Happy

सशल ने कधी हॉटेलातली (हो भारतात हॉटेलच म्हणतात) मिसळ खाल्लेली नसावी असा माझा नम्र अंदाज आहे Happy

सशल, उगी उगी. चवीला छान होता ना मग झालं तर... त्या कटाच्या रंगाची काहितरी ट्रिक आहे खरी.
फोडणीत कोल्हापुरी मसाला/काश्मिरी तोखट घालणे आणि/किंवा कट उकळताना पाणी घालतो ते साधं न घालता उकळीचं पाणी घालणे वगैरे...
माझा पण लाल भडक रंग फार क्वचित येतो. आईचा मात्र येतो कटाचा परफेक्ट रंग...
तू सरळ लालभडक रंग मला आवडत नाही म्हणून मुद्दामच आणला नाही असा पवित्रा घे... Happy

कट लाल हवा असेल आणि जहाल तिखट नको असेल तर मी थोडा कॅन्ड टोमॅटो घालते. मस्त लालभडक रंग येतो. आणि चव किंचित आंबट असते पण जळजळीत होत नाही. साध्या टोमॅटोने हा रंग येत नाही.

माझी आई सरळ खायचा लाल रंग टाकते Uhoh
तिची पावभाजी अशी लालबुंद होईची आणि माझी काईंड ऑफ ब्राऊन.
एक दिवशी राज कळालं Proud

लालू खुप छान recipe आहे. जुन्या मायबोलीत होती तेव्हापासून करते आहे.....मस्त मिसळ होते. खास कोल्हपूरी चव आहे.....कोल्हपूरी लोक मिसळीत मटकी सोडुन दुसरी कडधान्ये वापरली अथवा पोहे, दही, चिवडा टाकले तर तुक देतात.

Pages