कोल्हापुरी मिसळ

Submitted by लालू on 10 July, 2008 - 16:24
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३ वाट्या मोड आलेली मटकी
४ मोठे कान्दे (पान्ढरे नको!)
२ वाट्या ओले खोबरे
१ वाटी सुके खोबरे
३ इन्च आल्याचा तुकडा
२ लसणाचे गड्डे (सोलून वाटीभर व्हावा)
१ जुडी कोथिम्बीर
२ मोठे चमचे कोल्हापुरी कान्दा लसूण चटणी
१ मोठा चमचा गरम मसाला पावडर
किन्वा अख्खा (५,६ लवन्गा, १ दालचिनीचा २ इन्चाचा तुकडा, ५,६ काळे मिरे, धणे - जीरे १,१ चमचा)
२ बटाटे चिरून.
मीठ, तेल, हिन्ग, हळद, तिखट, पाणी.
फरसाण किन्वा hot mix , ब्रेड, बारीक चिरलेला कच्चा कान्दा, कोथिम्बीर, लिंबू.

क्रमवार पाककृती: 

पातेल्यात तेल तापवून त्यात हिन्ग, हळद घालावी. मटकी, बटाटे टाकून परतावे, बुडेल इतके पाणी,तिखट, मीठ घालून शिजवून घ्यावी. फ़ार मऊ नको. यात थोडे पाणी राहिले तरी चालेल.

कटाची तयारी - कान्दे उभे पातळ चिरून घ्यावेत. यातला वाटीभर कान्दा बाजूला ठेवून उरलेला कान्दा, खोबरे(दोन्ही), गरम मसाला तेलावर भाजून बारीक वाटावे. आले, लसूण, कोथिम्बीर बारीक वाटावी. वाटताना जास्त पाणी घालू नये.

जाड बुडाच्या पातेल्यात १ वाटी(!) तेल तापवून हिन्ग, हळद आणि उभा चिरलेला वाटीभर कान्दा, कोल्हापुरी चटणी टाकावी. परतून घेउन मग दोन्ही वाटणे घालून पुन्हा चान्गले परतावे. त्यात मीठ आणि ४ कप पाणी घालून उकळी आणावी.

घेताना एका खोलगट प्लेट मधे २ मोठे चमचे फरसाण घ्यावे. त्यावर मटकी, थोडा कच्चा कान्दा,कोथिम्बीर घालून मग १ पळी कट घालावा. कट घेताना ढवळून घ्यावा. आवडतो त्यानी वरचा तवंग घ्यावा. लिम्बू पिळावा. ब्रेड बरोबर खावे.

वाढणी/प्रमाण: 
५-६ लोकांना पुरेल.
अधिक टिपा: 

ही मिसळ बर्‍यापैकी झणझणीत होते. झेपत नाही त्यानी तिखट कमी करण्यासाठी दही, शेव, टोमॅटो घालावा.तिखट नको असणार्‍यानी मटकी जास्त घ्यावी.

वरील प्रमाणे केलेली मिसळ खाऊन कुणाला काही झाल्यास किन्वा न झाल्यास मी जबाबदार नाही. Happy

अलिकडे 'भोसले यांचे मराठा दरबार मसाले' मिळू लागलेत. कोल्हापुरात मिळतात. पुण्यातही उपलब्ध असल्याचे कळले. त्यांचा मिसळीचा मसाला छान आहे. कटासाठीचे बरेच कष्ट वाचतात आणि चवही चांगली येते. त्यात उसळीसाठीही मसाल्याचे एक छोटे पॅक आहे. पॅकवरच्या सूचनांप्रमाणे करावे.

माहितीचा स्रोत: 
पारंपारीक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुन्या मायबोलीतली ही रेसिपी इथे पेस्ट केली आहे. इथल्या विषयवार विभागांमुळे शोधायला सोपे जाईल म्हणून हळूहळू माझ्या रेसिपीज नवीन मायबोलीत आणेन. 'dev' मध्ये होती त्यामुळे कॉपी-पेस्ट करता आली. नवीन टिपा लिहील्या आहेत.

मी कट करताना (:P) त्यातही चिंचेचा कोळ घालते थोडा आणि शिवाय घेताना वरून लिंबू पिळते. (डिफरन्ट डिफरन्ट आंबट फ्लेवर्स! :P)

लालू, तुझी ही रेसिपी खूप वर्षांपूर्वी करुन पाहिलीय. चांगली लागते.

ह्ह्ह..... मीसळ म्हटले की तोंडाला अगदी पाणिच सुटते...

______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!

झटपट मिसळः
१ वाटी उकडुन बारीक चिरलेला बटाटा
२ वाट्या मोड आलेली मटकी
२ उभे चिरलेले कांदे
२ टोमॅटो चिरलेले
१ मोठा चमचा ओले खोबरे (दाटपणासाठी)
२ मोठे चमचे कांदा लसूण मसाला
२-३ चमचे तिखट
मीठ
हळद, हिंग

पातेल्यात अगदी थोडे तेल तापवून त्यात हिन्ग, हळद घालावी. मटकी टाकून परतावे. पाणी, मीठ घालून शिजवून घ्यावी. फ़ार मऊ नको.

कटः
थोड्या तेलावर उभा चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतुन त्यात टोमॅटो घालुन परतुन घ्यावे. थंड झाले की ओले खोबरे घालुन ब्लेंड करावे.
पातेल्यात भरपुर तेल घालुन त्यात हे मिश्रण, कांदा लसुण मसाला, लाल तिखट घालुन तेल सुटेपर्यंत परतावे. मग त्यात पाणी आणि मीठ घालुन उकळी आणावी.

घेताना एका खोलगट प्लेट मधे २ मोठे चमचे फरसाण घ्यावे. त्यावर मटकी, बटाटा, बारीक चिरलेला कान्दा,कोथिम्बीर घालून मग कट घालावा. लिम्बू पिळावे. ब्रेड बरोबर खावे.

मी ही हल्ली कोल्हापुरी मिसळ केप्र किंवा दुसर्‍या कोणत्याही ब्रँडचा कांदा-लसूण मसाला घालूनच करते. मस्त झणझणीत होते आणि लाल तवंगही मस्त येतो. बाकी काहीही घालायची गरजच पडत नाही.

लालु मी तुझी हि मिसळ करुन पाहिली मागच्या महिन्यात, एकदम मस्त! Happy

लालु, काल केलिये या पद्धतीने मिसळ, मस्त झाली एकदम. धन्यवाद!!

काल 'भोसले यांचे मराठा दरबार मसाला' वापरुन केली मिसळ, शीट्टी ए वे ए ठि साठी. मस्त झाली होती (असे म्हंटले खरे सर्व जण Happy )

कुठे मिळाला हा मसाला तुम्हाला सिन्ड्रेला?

आमच्याकडे मी मिसळ केली तर त्याला "बिहारी मिसळ" म्हणतात. कारण मी रेसिपी लिहिताना "लालूची मिसळ" असं लिहून घेतलय वहीमधे!!!

पण रेसिपी मात्र हिट आहे Happy

गोडसर चव असते म्हणून. या पदार्थाचा गोडाशी काही संबंध नाही.
>> परवा ती प्रसिद्ध 'बेडेकर' मिसळ खायला गेले.. ती चक्क गोड होती!
पण काय करणार, दिलेल्या पैशांना स्मरून संपवली सगळी!
(म्हणजे चवीला वाईट नव्हती, पण पैसा-वसूल मिसळ नव्हती!)

वरील प्रमाणे केलेली मिसळ खाऊन कुणाला काही झाल्यास किन्वा न झाल्यास मी जबाबदार नाही
लालु, कोल्हापुरी मिसळीचा दणका सगळ्यांना सहन कसा होईल ? खाल्ल्यावर पचवणार कोण ?
Lol

लालु .....
अहो याची प्रिंट घेतली ,खुप दिवसापसुन मिसळ खाल्ली नव्हती, बायकोला घरी करायला सांगीतल ...
आणि काय आश्चर्य ..मिसळ खास झाली आणि अशी मिसळ पहिल्यांदाच खाल्ली ...फक्त खोबरेच प्रमाण थोडे ज्यास्त होत .इतकच !
धन्यवाद !
Happy

नानबा, बेडेकर नव्हे, बेंडेंकर. मिही गिळली त्या २०-२५ रु. ना जागुन. Uhoh मिसळ खावी कोल्हापुरीच!

धन्यवाद.
वाटी, कप, जुडी असे प्रमाण आहे त्यामुळे आकारानुसार थोडे कमी-जास्त होते. 'कोथिंबीर जास्त झाली त्यामुळे रंग लालभडक आला नाही' असेही मी ऐकले आहे. निवडून साधारण २ वाट्या होईल इतकी कोथिंबीर हवी. खोबर्‍याचे प्रमाण जास्त वाटले आणि तिखट चालत असेल तर ओले खोबरे थोडे कमी घातले तरी चालेल. इथे मिळते ते सुके खोबरे पाऊण वाटी चालेल. खोबर्‍याची वाटी किसून घेतली तर किसून १ वाटी होईल इतके.

धनुडी, मुंबईत मिळायला हरकत नाही.

साधे तिखट आणि धणे-जीरे पूड, गरम मसाला पावडर किंवा गरम मसाल्याचे जिन्नस लवंग, दालचिनी, मिरे, मसाला वेलची, जायफळ, खसखस, धणे, जीरे हे सगळं भाजून वाटून घालायचं.
कांदा लसूण चटणीची कृती जुन्या मायबोलीत इथे आहे-

http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/93126.html?1134078719

Pages