अंबाडीची झणझणीत चटणी (गोंगुरा पचडी)

Submitted by चिन्नु on 10 July, 2008 - 11:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अंबाडीची पाने-दीड कप, १२ (बारा) हिरव्या मिरच्या, १ मोठा कांदा कापुन, धणे -दीड चमचे, मेथी- पाव चमचा, मोहरी-पाव चमचा, ३ पाकळ्या लसुण ठेचून, २ मोठे चमचे तेल, एक चिमुट हिंग, मीठ चवीनुसार.

क्रमवार पाककृती: 

१ चमचा तेल फ्राय पॅन मध्ये गरम करा. मोहरी, मेथी, हिंग घालून तडतडल्यावर बाजुला काढून घ्या. धणे आणि मिरच्या त्याच तेलात एक मिनिटासाठी फ्राय करा. बाजुला काढून घ्या. आता पाने घालून shrink होईपर्यंत फ्राय करा.
आधी बाजुस काढलेला मसाला वाटून घ्या. नंतर फ्राय केलेली पाने, कांदा, मीठ घालून चटणी वाटा.
चटणीला मोहरी, लसुण घातलेली फोडणी द्या.

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी
अधिक टिपा: 

१. धणे आणि लसुण वापरणे ऐच्छीक.
२. कांदा वाटला तरी चालेल किंवा बारीक कापुन मिक्स केला तरी चालेल. लसुणाचे बारीक तुकडे देखील घालता येतील.
३. पाने जास्त आंबट नसतील तर वाटतांना थोडा चिंचेचा कोळ घालावा.
४. वाटतांना पाणी थोडे किंवा अजिबात वापरू नये.

ही दाक्षिणात्य पारंपारिक गोंगुरा पचडी, मल्लिका बद्रीनाथ यांच्या पुस्तकातून लिहीली आहे. वेळ अंदाजे दिला आहे.
पानात घेतांना गरमागरम भात, त्यावर घरी कढवलेले तूप आणि तांदळाचा पापड घ्यावा आणि चाटूनपुसून खावे.
थोडे झणझणीत आणि चवीने खाणार्‍या हौशी दाक्षिणात्यांना घरी जेवायला बोलावयाचे असेल तर ही पचडी जेवण अगदी अविस्मरणीय करेल यात शंकाच नाही! Happy

माहितीचा स्रोत: 
South Indian Vegetarian cookbook by Mallika Badrinath.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही चटणी करताना अंबाडीची पाने कोरडी असावीत. जर धुवुन ओलसर झालेली पाने घेतली तर ही चटणी जरा गिळगिळीत होते.
म्हणून पाने धुवुन नीट कोरडी करून घ्यावीत.

कांदा आणि चिंचेच्या कोळामुळे ही पचडी कोरड्या चटणीसारखे नसतेच. पण पाणी वापरू नये शक्यतो.