मसाला (रोजच्या वापरातला)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 May, 2011 - 03:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

मसाला १ किलोच्या प्रमाणात करायचा असेल तर
१/२ किलो संकेश्वरी मिरची (जास्त तिखट हवा असेल तर पांडी/घाटी मिरची)
१/२ लो बेडगी किंवा काश्मिरी मिरची
५० ग्रॅम धणे
६० ग्रॅम मिरी
६० ग्रॅम बडीशेप
१०० ग्रॅम राई
६० ग्रॅम खसखस
५० ग्रॅम हळद
५० ग्रॅम जिरे
१० ग्रॅम शहाजिरे
१० ग्रॅम लवंग
१० ग्रॅम दालचिनी
१० ग्रॅम बाद्यान
४ ग्रॅम मसाले वेलची
४ ग्रॅम दगडी फुल
५ ग्रॅम तमाल पत्र
६ ग्रॅम जायपत्री
४ ग्रॅम नाकेश्वर
४ ग्रॅम तिरफला
अर्धा जायफळ
छोटासा हिंगाचा खडा

मी पाच किलो मिरचीचा मसाला केला त्यात मी तिन प्रकारच्या मिरच्या घेतल्या. २ कोलो पांडी, २ किलो बेडगी आणि १ किलो काश्मिरी.

ही आहे पांडी उर्फ घाटी मिरची. मला मार्केटमध्ये संकेश्वरी मिरची चांगली नाही मिळाली म्हणुन पांडी घेतली

ही आहे बेडगी मिरची हि रंग चांगला येण्यासाठी वापरतात.

ही आहे काश्मिरी मिरची रंग लाल भडक येण्यासाठी ही मिरची घेतात. हिच्या लाल भडक रंगाप्रमाणे हि महाग असते. ही आकाराने रुंद व बुटकी असते.

हे आहे ५ किलोच्या मसाल्याचे साहित्य

क्रमवार पाककृती: 

मिरची २-३ दिवस चांगली कडक उन्हात तापवा.

१-२ दिवस तापली की जरा कुरकुरीत होते मग ती मोडायला सोपी पडते. मिरचीची देठे काढून (काही जणं नाही काढत देठे तसेही चालते, हल्ली बाजारात देठे काढलेली मिरची पण मिळते) एका मिरचीचे दोन ते तिन तुकडे करा. मिरचीचे तुकडे केल्यावर त्यातील जे बी पडते ते वेगळे ठेवायचे.

ज्या दिवशी मसाला करायचा असेल त्या दिवशी मसाल्यासे सगळे सामान कडकडीत उन्हात वाळवा. आधीपासुन वाळवले तर मसाल्यांचा वास काही प्रमाणात उडतो असे आईचे मत आहे.

प्रचि १) मध्ये हळद व बाजुला दालचिनी, तमालपत्र,जायपत्री, मिरी व बाद्यान किंवा चक्रिफुल

प्रचि २) मध्ये जिर बाजुला डाविकडुन दगडफुल, शहाजिर, लवंग, मसाले वेलची, हिंग, नाकेश्वर, जायफळ, तिरफला,

प्रचि ३) ह्यामध्ये मधल्या डिशमध्ये खसखस, दोन परातीत राई व धणे. पाठचे दोन थाळे प्रचि १ व प्रचि २ आहेत.

आता मसाला करण्यासाठी सज्ज व्हा.

हळद, हिंग खडा आणि जायफळ वेगवेगळे कुटून त्यांचे बारीक तुकडे करुन वेगवेगळे ठेवा.

मोठ्या कढईत किंवा टोपात मिरच्या भाजुन घ्या. जास्त भाजु नका नाहीतर रंग काळा पडेल. तापतील इथपत ठिक आहे. (काही जणं मिरच्या भाजत नाहीत त्या गिरणीत भाजल्या जातात असे त्यांचे मत आहे) हे जरा सहनशिलतेचे काम आहे. कारण मिरच्यांचा तिखट ठसका लागत राहतो मिरची भाजताना. तोंडाला फडके बांधुन भाजलेत तर ठसक्याचे प्रमाण कमी होईल.

मोकळ्या जागी खाली पेपर रचुन ठेवा. त्यावर भाजलेल्या मिरच्या गार करण्यासाठी ठेवा.

मिरच्या भाजून झाल्यावर राई सोडून मसाल्यासाठी लागणारे सगळे साहित्य एक एक करुन भाजा, करपवु नका. जिर, शहाजिर एकत्र भाजलत तरी चालेल, मिरी, तिरफला, नाकेश्वर असे जे एकाच आकाराचे पदार्थ आहेत ते एकत्र भाजलेत तरी चालतील. मिरचिच्या बियाही भाजुन घ्या. बाकीचे सगळे जिन्नस भाजुन झाले की मिरच्यांवर टाकुन गार करण्यासाठी ठेउन द्या.

आता राई करपेपर्यंत भाजा. करपली कि थंड करुन ती मिक्सरमध्ये वाटून एका डब्यात भरुन ठेवा. राई दळायला गिरणवाले घेत नाहीत कारण ती गिरणीला चिकटते. म्हणुन घरीच मिक्सरमध्ये काढून सोबत घेउन जायची.

आता मिश्रण गार झाले की ते स्वच्छ जाड पिशवीत भरा आणि दळायला घेउन जा. सोबर दळलेली राई न्यायला विसरू नका. मसाल्या दळणाच्या वेळा ठरलेल्या असतात. एक दिवस आधीच विचारुन या गिरणवाल्याला की मसाला कधी आणु ? (अपॉइंटमेंट घ्यावी लागते दळणासाठी )

आता गिरण वाल्याकडे मिश्रण आणि राईची पुड सोपवा आणि लक्ष ठेवा तो आपलेच दळण आपल्याला देतो का ? (हे ऑप्शनल आहे, विश्वासावर अवलंबुन आहे :हाहा:) आपली मिरची दळली की गिरणवाल्याकडे हल्ली चाळण्यासाठी बायका असतातच. मग ह्या बायका मसाला चाळतात आणि त्यात राई मिक्स करुन देतात. पुर्वी आपल्यालाच बायका मॅनेज कराव्या लागत. किंवा मग घरातलच कोणितरी चाळावी लागे. आता जर तुम्ही डबा नेला असेल तर डब्यात किंवा पिशवीत मसाला भरुन आणा.

(स्टिलच्या डब्याचा फ्लॅश मसाल्यावर पडलाय म्हणुन फोटो तिखट मानुन घ्या.)

मसाला थंड झाला की एखाद्या घट्ट झाकणाच्या डब्यात भरुन वरुन १-२ हिंगाचे खडे ठेवा म्हणजे तो लवकर उतरत नाही. तसेच त्याच्या तुम्ही पाव किलो अर्था कोलो च्या पिशव्या भरुन मेणबत्तीने पॅक करुन ठेवलात की डब्याच्या उघडझाकीमुळे मसाल्याला हवा लागणार नाही.

इति मसाला पुराण संपुर्णम.

वाढणी/प्रमाण: 
५ किलो चा मसाला हा आमच्या दोन घरांच्या कुटुंबासाठी म्हणजे १० माणसांसाठी वर्षभरासाठी आहे आता त्यावरुन तुम्ही तुमचा अंदाज बांधा.
अधिक टिपा: 

मी जेंव्हापासुन माबोवर रेसिपिज टाकते तेंव्हापासुन मला काही माबोकर मैत्रीणी मी वापरत असलेल्या मसाल्याची रेसिपी विचारतात. त्यांना मी रोज आईला विचारुन सांगते , तिच मसाला करते अस सांगत सांगत जवळ जवळ दिड दोन वर्ष झाली. त्यासाठी पहिला मी त्या सर्व मैत्रीणिंची माफी मागते.

ह्यावर्षी मी स्वतः घरी मसाला केलाय त्यामुळे ही फोटो सकट रेसिपी मला इथे टाकता आली. अर्थात सामानाची यादी आईकडूनच घेतली.
आता काही महत्वाच्या टिप्स.

राई ही स्वाद व रंगासाठी घालतात. ती चांगली करपवुन घ्या कच्ची ठेवु नका.

तुम्हाला मसाला जर जास्त तिखट हवा असेल तर खसखस आणि धण्यांचे प्रमाण कमी करु शकता.

काही जणं ह्या मसाल्यात रश्याला दाटपणा येण्यासाठी चणाडाळही घालतात.

मसाला भाजल्यावर व दळुन आणतानाही थोडी आग होते ती सहन करायची तयारी ठेवायची.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू धन्य आहेस गं! सामान आणून वाळवून फोटो काढून( आणि अर्थातच मसाला करूनही) रेसिपी दिलीस! उरक्याची आहेस गं बाई!

जागू _^_ . धन्य गो बाय तुझी! सासरी अगदी लाडकी असशील सगळ्यांची एवढ्या उरकाने सगळं करतेस ते.

प्रज्ञा, मानुषी, प्राची, सानी शैलजा, सावनी धन्स.

तुम्हाला जितक विशेष वाटतय तितक मला वाटत नाही. कारण मी अगदी लहानपणापासुन हे सगळ पाहील आहे. हा एक दिवस त्रास मात्र होतो, पण वर्षभराच्या घरच्या मसाल्याचा आनंद मिळतो जेवण करताना.

जागु केवढा तो उरक -/\-
एका वर्षाला ५ किलो मसाला...अबबब. मला बहुदा आयुष्यभरासाठी एवढा पुरेल.

रुनी अग तो दोन घरांचा आहे. माझ्या जावेचा आणि माझा. आणि तुम्हाला वाटत तसा काही अगदीच तिखट नसतो. १ ते २ चमचेच एका पदार्थात टाकावे लागतात मला.

आम्ही(मातोश्री) पण ५ किलो वर्षभरासाठी करायचो फक्त तीन माणसाच्या कुटुंबासाठी.
रोजचे उसळी/मासे/मटण व पाहुणे राहुण्यासाठी जेवणं धरून इतका मसाला लागयचाच.

मिरा म्हणजे तुला चांगली माहीती आहे.

खरे तर हे मी मसाल्याच्या रेसिपीत आधीच लिहायला पाहीजे होते पण आता इथे देते. ह्याचा विचार मी केला तुमच्या पोस्ट वाचुन कारण आम्ही रोज मसाला वापरतो तो आम्हाला इतका तिखट वाटत नाही.

ह्या मसाल्यातील गरम मसाले हे औषधी गुणधर्माचे आहेत. ह्या औषधी गुणधर्माचे पुस्तक माझ्याकडे आहे. शोधुन मी हवे तर लिहेन सगळे. शिवाय ह्या मसाल्याचा दाह कमी करण्यासाठी मसाल्यात धणे व जिरे हे जास्त प्रमाणात टाकतात. धणे व जिर्‍याचा गुणधर्म हा थंडपणा आणणारा आहे हे सगळ्यांना माहीतच असेल.

जबरी... आमच्याकडे पण आजी-आई हे कारायच्या पूर्वी. वाळवणाच्या कामाला आम्हालाच बसवायच्या. त्या मिरच्यांचे काम चालू असताना खूपच ठसका लागायचा. पण अप्रतिम खमंग वास सुटायचा घरात मसाल्याच्या/भाजल्याचा.
तुझ्यामुळे आज ते परत आठवले. मस्तच. तुझे कौतुक.

जागु शाकाहारी असून आजकाल मी तुझ्या माश्यांच्या बीबीवर पहिली हजेरी लावते. त्यामुळे मसाल्याच्या बीबीवर आज उशिराने Proud
तुझी लिहिण्याची पद्धत, करण्याची पद्धत सगळंच मनापासून आणि निगुतिने करतेस ते जाणवतं. मस्तंच झाला असेल मसाला... Happy

जागू, Happy

हा मसाला बिरडं, काळ्या वाटाण्याची आमटी, कोरडं मटण/कोंबडं, तळणीचे मासे, भरली वांगी/भेद्रं,थालीपीठं, पाटोड्या वगैरे अश्यासाठी मातोश्री वापरते. बाकी साध्या आमटीसाठी गोडा मसाला वगैरे.
माश्याच्या कालवणाला वेगळा लाल मसाला बनवते, किंचितसाअ फरक असतो ह्या व वरच्या मसाल्यात. आपण बघ्याचे काम केलेय मातोश्री अशी मसाले बनवताना.

जागू... काय हा उत्साह, उरक आणी त्याहुनही... ही माहिती इथे इतरांच्यात वाटण्याची तळमळ...
तुला साष्टांग नमस्कार.
एखादा जुना (आजच्या मराठीत अ‍ॅन्टिक) दागिना, पुराणी कुसर असं बघितलं की कसं भरून येतं... तसं झालं हे वाचून.
तुझं प्रेम आहे पाककलेवर... अत्यंत आत्मियतेनं करतेस हे दिसतच. देवानं तुला खूप आयुष्यं, सुंदर आरोग्यं द्यावं...

जागू... काय हा उत्साह, उरक आणी त्याहुनही... ही माहिती इथे इतरांच्यात वाटण्याची तळमळ...
तुला साष्टांग नमस्कार.
>>> +१.

हे वाचता वाचताच मला दम लागला. मागच्या वर्षी माबोवरच रेसिपी वाचून मी गोडा मसाला बनवला होता (अर्ध्या(च)) किलोचा. तर महिनाभर त्याचं कौतुक चालू होतं. Proud पाच किलो म्हणजे काय चेष्टा आहे का?

_/\_ जागु...खरच धन्य आहे तुझी!!

फोटो भारी आहेत. धन्यवाद मसाल्याच्या रेसिपीसाठी.

Happy

एखादा जुना (आजच्या मराठीत अ‍ॅन्टिक) दागिना, पुराणी कुसर असं बघितलं की कसं भरून येतं... तसं झालं हे वाचून.
तुझं प्रेम आहे पाककलेवर... अत्यंत आत्मियतेनं करतेस हे दिसतच. देवानं तुला खूप आयुष्यं, सुंदर आरोग्यं द्यावं...

हे वाचून आता मला भरून आल.

सगळ्यांना खुप खुप धन्यवाद. आणि हा मसाला नक्की करुन बघा आवडेल. कारण दिसतो तितका हा तिखट नसतो. धणे, जिर थंडपणाही आणतात तर इतर मसालेही औषधी असतात.

माउरुची देते तुम्हाला ५ किलोचे प्रमाण.

jaagu tai vat pahun thakle kadhi deta praman , udya suttichya divshich mala sahitya gola karne jamel. pls. ki var dilele praman tippat karu pratisadachi vat pahate aahe

मानुरुची हे ५ किलोचे प्रमाण जरा उशीरानेच देतेय ग.

३ किलो संकेश्वरी मिरची
२ किलो बेडगी किंवा काश्मिरी मिरची
धणे - दिड किलो
बडिशेप - पाव किलो
मिरी - पाव किलो
राई - पाव किलो
खसखस - पाव किलो
हळद - ३०० ग्रॅम
जिरे ३०० ग्रॅम
लवंग ५० ग्रॅम
दालचिनी - ५० ग्रॅम
बाद्यान - ५० ग्रॅम
मसाले वेलची - ३० ग्रॅम
दगडी फुल - २० ग्रॅम
तमाल पत्र २० ग्रॅम
जायपत्री - २० ग्रॅम
नाकेश्वर - २० ग्रॅम
त्रिफळा - २० ग्रॅम
शहाजिरे - ५० ग्रॅम
२ जायफळ
हिंगाचा मोठा खडा

जागु मस्तच !
मिरची चे बी पण मसाल्यात वापरले आहे... तर बी वेगळे का भाजावे लागते? देठ काढुन मिरची न मोडता व बी न काढता मिरची भाजुन वापरली ... तर काही फरक पडतो का ?

Pages