मसाला (रोजच्या वापरातला)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 May, 2011 - 03:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

मसाला १ किलोच्या प्रमाणात करायचा असेल तर
१/२ किलो संकेश्वरी मिरची (जास्त तिखट हवा असेल तर पांडी/घाटी मिरची)
१/२ लो बेडगी किंवा काश्मिरी मिरची
५० ग्रॅम धणे
६० ग्रॅम मिरी
६० ग्रॅम बडीशेप
१०० ग्रॅम राई
६० ग्रॅम खसखस
५० ग्रॅम हळद
५० ग्रॅम जिरे
१० ग्रॅम शहाजिरे
१० ग्रॅम लवंग
१० ग्रॅम दालचिनी
१० ग्रॅम बाद्यान
४ ग्रॅम मसाले वेलची
४ ग्रॅम दगडी फुल
५ ग्रॅम तमाल पत्र
६ ग्रॅम जायपत्री
४ ग्रॅम नाकेश्वर
४ ग्रॅम तिरफला
अर्धा जायफळ
छोटासा हिंगाचा खडा

मी पाच किलो मिरचीचा मसाला केला त्यात मी तिन प्रकारच्या मिरच्या घेतल्या. २ कोलो पांडी, २ किलो बेडगी आणि १ किलो काश्मिरी.

ही आहे पांडी उर्फ घाटी मिरची. मला मार्केटमध्ये संकेश्वरी मिरची चांगली नाही मिळाली म्हणुन पांडी घेतली

ही आहे बेडगी मिरची हि रंग चांगला येण्यासाठी वापरतात.

ही आहे काश्मिरी मिरची रंग लाल भडक येण्यासाठी ही मिरची घेतात. हिच्या लाल भडक रंगाप्रमाणे हि महाग असते. ही आकाराने रुंद व बुटकी असते.

हे आहे ५ किलोच्या मसाल्याचे साहित्य

क्रमवार पाककृती: 

मिरची २-३ दिवस चांगली कडक उन्हात तापवा.

१-२ दिवस तापली की जरा कुरकुरीत होते मग ती मोडायला सोपी पडते. मिरचीची देठे काढून (काही जणं नाही काढत देठे तसेही चालते, हल्ली बाजारात देठे काढलेली मिरची पण मिळते) एका मिरचीचे दोन ते तिन तुकडे करा. मिरचीचे तुकडे केल्यावर त्यातील जे बी पडते ते वेगळे ठेवायचे.

ज्या दिवशी मसाला करायचा असेल त्या दिवशी मसाल्यासे सगळे सामान कडकडीत उन्हात वाळवा. आधीपासुन वाळवले तर मसाल्यांचा वास काही प्रमाणात उडतो असे आईचे मत आहे.

प्रचि १) मध्ये हळद व बाजुला दालचिनी, तमालपत्र,जायपत्री, मिरी व बाद्यान किंवा चक्रिफुल

प्रचि २) मध्ये जिर बाजुला डाविकडुन दगडफुल, शहाजिर, लवंग, मसाले वेलची, हिंग, नाकेश्वर, जायफळ, तिरफला,

प्रचि ३) ह्यामध्ये मधल्या डिशमध्ये खसखस, दोन परातीत राई व धणे. पाठचे दोन थाळे प्रचि १ व प्रचि २ आहेत.

आता मसाला करण्यासाठी सज्ज व्हा.

हळद, हिंग खडा आणि जायफळ वेगवेगळे कुटून त्यांचे बारीक तुकडे करुन वेगवेगळे ठेवा.

मोठ्या कढईत किंवा टोपात मिरच्या भाजुन घ्या. जास्त भाजु नका नाहीतर रंग काळा पडेल. तापतील इथपत ठिक आहे. (काही जणं मिरच्या भाजत नाहीत त्या गिरणीत भाजल्या जातात असे त्यांचे मत आहे) हे जरा सहनशिलतेचे काम आहे. कारण मिरच्यांचा तिखट ठसका लागत राहतो मिरची भाजताना. तोंडाला फडके बांधुन भाजलेत तर ठसक्याचे प्रमाण कमी होईल.

मोकळ्या जागी खाली पेपर रचुन ठेवा. त्यावर भाजलेल्या मिरच्या गार करण्यासाठी ठेवा.

मिरच्या भाजून झाल्यावर राई सोडून मसाल्यासाठी लागणारे सगळे साहित्य एक एक करुन भाजा, करपवु नका. जिर, शहाजिर एकत्र भाजलत तरी चालेल, मिरी, तिरफला, नाकेश्वर असे जे एकाच आकाराचे पदार्थ आहेत ते एकत्र भाजलेत तरी चालतील. मिरचिच्या बियाही भाजुन घ्या. बाकीचे सगळे जिन्नस भाजुन झाले की मिरच्यांवर टाकुन गार करण्यासाठी ठेउन द्या.

आता राई करपेपर्यंत भाजा. करपली कि थंड करुन ती मिक्सरमध्ये वाटून एका डब्यात भरुन ठेवा. राई दळायला गिरणवाले घेत नाहीत कारण ती गिरणीला चिकटते. म्हणुन घरीच मिक्सरमध्ये काढून सोबत घेउन जायची.

आता मिश्रण गार झाले की ते स्वच्छ जाड पिशवीत भरा आणि दळायला घेउन जा. सोबर दळलेली राई न्यायला विसरू नका. मसाल्या दळणाच्या वेळा ठरलेल्या असतात. एक दिवस आधीच विचारुन या गिरणवाल्याला की मसाला कधी आणु ? (अपॉइंटमेंट घ्यावी लागते दळणासाठी )

आता गिरण वाल्याकडे मिश्रण आणि राईची पुड सोपवा आणि लक्ष ठेवा तो आपलेच दळण आपल्याला देतो का ? (हे ऑप्शनल आहे, विश्वासावर अवलंबुन आहे :हाहा:) आपली मिरची दळली की गिरणवाल्याकडे हल्ली चाळण्यासाठी बायका असतातच. मग ह्या बायका मसाला चाळतात आणि त्यात राई मिक्स करुन देतात. पुर्वी आपल्यालाच बायका मॅनेज कराव्या लागत. किंवा मग घरातलच कोणितरी चाळावी लागे. आता जर तुम्ही डबा नेला असेल तर डब्यात किंवा पिशवीत मसाला भरुन आणा.

(स्टिलच्या डब्याचा फ्लॅश मसाल्यावर पडलाय म्हणुन फोटो तिखट मानुन घ्या.)

मसाला थंड झाला की एखाद्या घट्ट झाकणाच्या डब्यात भरुन वरुन १-२ हिंगाचे खडे ठेवा म्हणजे तो लवकर उतरत नाही. तसेच त्याच्या तुम्ही पाव किलो अर्था कोलो च्या पिशव्या भरुन मेणबत्तीने पॅक करुन ठेवलात की डब्याच्या उघडझाकीमुळे मसाल्याला हवा लागणार नाही.

इति मसाला पुराण संपुर्णम.

वाढणी/प्रमाण: 
५ किलो चा मसाला हा आमच्या दोन घरांच्या कुटुंबासाठी म्हणजे १० माणसांसाठी वर्षभरासाठी आहे आता त्यावरुन तुम्ही तुमचा अंदाज बांधा.
अधिक टिपा: 

मी जेंव्हापासुन माबोवर रेसिपिज टाकते तेंव्हापासुन मला काही माबोकर मैत्रीणी मी वापरत असलेल्या मसाल्याची रेसिपी विचारतात. त्यांना मी रोज आईला विचारुन सांगते , तिच मसाला करते अस सांगत सांगत जवळ जवळ दिड दोन वर्ष झाली. त्यासाठी पहिला मी त्या सर्व मैत्रीणिंची माफी मागते.

ह्यावर्षी मी स्वतः घरी मसाला केलाय त्यामुळे ही फोटो सकट रेसिपी मला इथे टाकता आली. अर्थात सामानाची यादी आईकडूनच घेतली.
आता काही महत्वाच्या टिप्स.

राई ही स्वाद व रंगासाठी घालतात. ती चांगली करपवुन घ्या कच्ची ठेवु नका.

तुम्हाला मसाला जर जास्त तिखट हवा असेल तर खसखस आणि धण्यांचे प्रमाण कमी करु शकता.

काही जणं ह्या मसाल्यात रश्याला दाटपणा येण्यासाठी चणाडाळही घालतात.

मसाला भाजल्यावर व दळुन आणतानाही थोडी आग होते ती सहन करायची तयारी ठेवायची.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान जागू.

आई करते अजुन पण. ८ किलोच करुन ठेवते वर्षभरासाठी. मसाल्याचे प्रमाण वेगळे असते खर तिचे.
तिला कामवाल्या बाईने पण ढवळाढवळ केलेली चालत नाही तिच्या तिखट प्रोग्रॅममध्ये. मला तर या जन्मात हात लावू देणार नाही. Happy डंकातुन आणुन चाळण्यापासूनच सगळ काम ती एकटी करते.

जागू प्रचंड उरक आहे तुला. मसाल्याचे फोटो एकदम भारी. सहज म्हणून विचारते. ह्या मसाल्याला काय म्हणतात? जसे गोडा मसाला, गरम मसाला तसे ह्याचे काही विशिष्ट नाव आहे का?

जागू, हे एकटीने केलेस? मिरची भाजण्यापासून?

हि सगळी खटपट आमच्या मातोश्रीच करतात एकट्याने.

प्रमाण वेगळे असते जिन्नसाचं.
मिरची घरी भाजताना मी स्व. घरात जायचे/येवु देत नाही. खोकून आई मात्र बेजार व लाललाल चेहरा आईचा.
आईचा हा सगळा कार्यक्रम सकाळी ७- दुपारी ३ पर्यंत चालतो डिंकावरून मसाला कुटून आणून बरणीत भरेपर्यंत.
तोवर मी व बाबा हाटलातूनच (पोषणमुल्ये कमी असलेला का असेना) बाहेरचा ब्रेका व जेवण बाहेरच जेवून येणार व येताना आईला पार्सल आणणार .. अगदी दर वर्षीचा प्रोग्रॅम... Happy

आपल्याला उभ्या आयुष्यात असा मसाला जमणार नाही ह्याची खात्री आहे एकदम. ते पेशन्स नाहीत जराही. Happy

मंजु Lol मिरच्या सोडून आता सगळे प्राणीच शोधतायत चादरीतले.
बर आता मला कॅमेर्‍यात पहावा लागेल काश्मिरी मिरच्यांचा फोटो. नाहीतर एकत्र वाळत घालेला तो पाहुन समाधान माना.

मैत्रेयी, मेधा, शांकली धन्स.

लालू कधी येतेयस ?

मसाला एकदम झणझणीत!
आताही आई घरीच मसाला करते. ह्या मसाल्यामूळे, लहाणपणीच्या अनेक आठवनी ताज्या झाल्या.
ह्या सर्व जिन्न्स आणन्यासाठी आई सारखी मागे लागायची. दुकानात हे नाही ते नाही करत करत सर्व जिन्न्स गोळा करायचे. तरी बरं कांड्प यंत्र घराच्या बाजुलाच होतं.

जागु खुपच छान !
कांदा लसुण मसाल्याच्या प्रतिक्षेत Happy
आमच्याकडे जे तिखट करतात त्याला आम्ही "काळे तिखट" म्हणतो, त्यामधे पण कांदा,लसुण तळुन घालतात, तोच कांदा-लसुण मसाला काय?

बाप रे केव्हढी खटपट आणि केव्हढा त्रास असेल त्या मिरच्या भाजायचं प्रकरण म्हणजे ..

धन्य! धन्य!

फोटो मस्तच .. पण ह्या वाटेला जायची भिती वाटते! Happy

जागू, तू ग्रेट आहेस खरंच Happy
मसाल्याला रंग मस्त आलाय. चव तर त्याहून अप्रतिम असणार ह्यात शंकाच नाही Happy

सकाळी नुसते फोटो पाहिले नी स्वाती आंबोळेला रेसिपी आल्याचा निरोप ठेवला. Happy
आत्ता वाचली. काय तो खटाटोप रे बाबा. रंग अप्रतिमच आलाय. चवही छानच असेल ह्यात वाद नाही.

>>>१-२ दिवस तापली की जरा कुरकुरीत होते मग ती मोडायला सोपी पडते. मिरचीची देठे काढून (काही जणं नाही काढत देठे तसेही चालते, हल्ली बाजारात देठे काढलेली मिरची पण मिळते) एका मिरचीचे दोन ते तिन तुकडे करा. मिरचीचे तुकडे केल्यावर त्यातील जे बी पडते ते वेगळे ठेवायचे.>>> हे म्हणजे सॉलिडच झालं. किती वेळ लागेल ह्या तीनही टाईपच्या मिरच्यांची देठं काढून मोडत बसायला !!! Uhoh

'आधी जिवाला ठसके तेव्हा मिळते तिखट' अशी नवीन ओवी काढायला हरकत नाही. Wink

जागु गं. साक्षात मसालेश्वरी, नॉन्-व्हेज अन्नपूर्णा आहेस ग. मसाल्याची ती कृती वाचूनच गहिवरून आलय. कारण इतका खटाटोप करण्याची हिंमतच नाही. ___/\___

एक शंका (मी शंकेश्वरी) : हा मसाला रोजच्या वापरात असतो का? मग रोज तीच चव येत असेल ना स्वैपाकाला. ही शंका येण्याचं कारण मी अनेकानेक प्रकारच्या रेडीमेड मसाल्यांनी माझा फ्रीझर सजवलेला आहे. रोजच्या जेवणात त्या त्या दिवशी ज्या मसाल्याचं भाग्य उजळलं असेल तो वापरते. तोच माझा 'फ्लेवर ऑफ द डे'. त्यामुळे ही शंका.

मामी पुर्वी लोकांना वेगवेगळ्या मसाल्याची सवय नव्हती. हाच मसाला उसळीत, भाजीत, आमटीत, माश्याच्या आमटीत वगैरे. आणि त्यावेळी तयार पॅकबंद मसाले कुठे होते ? चवीत बदल म्हणून कधीतरी ओल्या मिरचीचे पदार्थ करायचे. (ओल्या मिरच्याही सहज मिळत नसत.) या मसाल्याच्या जोडीला ओले खोबरे, कोथिंबीर. काही पदार्थात तळलेला कांदा लसुणही वापरत.

जेव्हा हे पदार्थ बाहेर खाल्ले जाऊ लागले (चना मसाला, पावभाजी, दाबेली वगैरे ) त्यावेळी त्या मसाल्यांची मागणी वाढली आणि ते बाहेर मिळूही लागले. आमच्या घरी पण असेच झाले. आता एक बेसिक मसाला असतो आणि बाकीची पाकिटे असतात. मला स्वतःला प्रत्येक पदार्थासाठी ताजा केलेला मसाला आवडतो.

जिथे कोरडी हवा असते तिथल्या हवेत कांदा लसूण घातलेला मसालाही सहज टिकतो (पण तो कोकणात टिकणार नाही, मुंबईतही तो खराब होतो.) कोल्हापूरात कांदा, लसूण, खोबरे, कोथिंबीर असे सगळेच घटक घातलेले असतात. त्या मसाल्यासोबत खोबरे, कोथिंबीर वापरावी लागत नाही. कांदा लसुण मसाला, हे अलिकडे प्रचारात आलेले नाव, कोल्हापुरात त्याला चटणीच म्हणतात. तिथे भाजी आमटीत हाच मसाला असतो, तरी प्रत्येक भाजीची चव वेगळी लागते. आमटी मात्र रोज त्याच चवीची असली, तरी तिचा कंटाळा येत नाही.
पण तरिही आता बाजारात मालवणी मसाला मिळतो किंवा त्याचे पदार्थ मिळतात, ती अस्सल चव नाही. मालवणात एवढे तिखट कुणी खात नाही. कोल्हापूरला देखील जी तयार चटणी मिळते, ती घराघरात केल्या जाणार्‍या चटणीपेक्षा, खुपच सपक असते.

अंजली, अंजु, सीमा, वत्सला, टिल्लु, सिंडरेला, पिहु, सशल, अगो, राखी, मिनोती धन्स.
स्वातीताई तुम्ही रेसिपी मागुन १ वर्ष झाल असेल मला आठवतय.
सायो धन्स तुम्ही स्वातीताईंना कळवल्याबद्दल.

मीरा मी मिरच्या ऑफिसला जायच्या आधी वाळत घालायचे. मग संध्याकाळी घरातले काढुन आणायचे. आणि अर्धी मिरचीमोडायला घरातली मदत झाली. बाकीचे सगळे मिच केले. मसाला दळायला नवर्‍याने नेला.

मी हा भाजण्याचा प्रकार जेवण केल्यानंतर केला. आधी पटापट जेवण करुन घेतले मग जेउन आहोंनी १०.३० ला मसाला दळायला नेला आणि ११ वाजता लगेच घेउन पण आले.

प्रेडी आम्ही ह्याला मसालाच बोलतो. कारण आमच्याकडे हाच मसाला सगळ्या मच्छीच्या प्रकारात आणि आमट्यांमध्ये वापरतात.

सायो जास्त वेळ नाही लागत पटापट होतात पण हे मोडल्यानंतर मिरची मात्र थोडावेळ झोंबते.

मामी उर्फ शंकेश्वरी असे काही नाही प्रत्येक पदार्थाची चव त्यात्या भाज्या आणि मास्यांना वेगवेगळी असते.

दिनेशदा छान माहीती.

आज मी आईला सांगतोच फोन करुन... एक जागुतै भेटलीय म्हणुन...तुझ्या सारखी! Happy
पण तिला संगणक हाताळता येत नाही. Sad

प्राचि डिप्रेशन कशासाठी ?>>> कसल्या भारी भारी पाकृ असतात तुझ्या! शिवाय चांगल्याच कामाला लावणार्‍या असतात. मला रोजचा स्वैंपाक करेतोवरच हाश्शहुश्श होतं. Proud
तुझा उरका जबरी आहे बाई. Happy

जबरी. धन्यवाद जागू _/\_
एकदा कमी प्रमाणात करुन पाहीन म्हणते.

ते नागकेशर मिर्‍यांसारखेच दिसते आहे गं. तसेच दिसते का?
मुंबईत कुठे मिळेल कोणी सांगू शकेल का?
बाद्यान म्हणजे काय? आणि डंका म्हणजे काय?

(सॉरी. यानंतर प्रश्न विचारणार नाही. आय प्रॉमिस. Happy )

डंका म्हणजे काय>>> डंक ग. जिथे असे मसाले, मिरच्या, हळद कूटून मिळते.
बाद्यान म्हणजे चक्रीफूल
तुला नागकेशर, चक्रीफूल हे मसाल्याच्या दुकानात मिळतील. नाहीतर नेहमीच्या किराणा दुकानातही मिळून जाईल. Happy

Pages