कोकम (रातांबा) सरबत

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 9 May, 2011 - 14:39
लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कोकम (राताआंबे)
साखर

क्रमवार पाककृती: 

कोकम मधुन कापुन त्याचे दोन भाग करा.

त्यातील बिया काढुन टाका (त्या बिया वेगळ्या भांड्यात ठेउन त्यात पाणी टाकुन गर कुस्करा आणि त्यात साखर टाकुन तात्पुरते सरबत बनवा)

आता कोकमाच्या ज्या वाट्या तयार झाल्या आहेत त्यात पुर्ण साखर भरा.

आता एक काचेची बरणी घ्या. त्यात तळाला थोडी साखर टाका व त्यात साखर भरलेले कोकम एकावर एक रचा.


परत थोडी वरुन साखर पेरा आणि बरणीचे झाकण घट्ट लावुन बरणी २-३ दिवस उन्हात ठेवा. नंतर घरात ७-८ दिवस मुरवुन घ्या.

हा सरबताचा पाक तयार होतो. ४-५ चमचे पाक ग्लासात घेउन त्यात बर्फ व पाणी घालुन गारेगार कोकम सरबत सर्व्ह करा.

वाढणी/प्रमाण: 
पाकावर आहे.
अधिक टिपा: 

एप्रिल महिना सुरुझाला की बाजारात रातांबे म्हणजेच कोकमे दिसु लागतात. पित्ताशामक म्हणुन हे प्रसिद्ध आहेत हे काही सांगायला नको. पुर्वी उन्हाळ्यात घरोघरी अशाप्रकारे कोकम सरबताच्या बरण्या तयार होत. मला आठवते आम्ही लहान असताना शेजार्‍यांकडे पापड लाटायला गेलो की ब्रेक मध्ये कोकम सरबत मिळायचे. खर तर त्याच आकर्षणाने पापड लाटायला जायची हौस वाटायची. तेंव्हा फ्रिज कमी असल्याने बर्फही कुणाच्यातरी घरुन वगैरे आणुन सरबते वाटाली जात. सरबताचा पाक संपला की नुसती कोकमे खायला पण मजा यायची.
खरे तर ही पद्धत आणि कोकमाचे गुण सगळ्यांना माहीतच असतील. पण हल्ली घरात काही वेगळे करायला गेले की कॅमेरा स्वस्थ बसत नाही आणि मग त्यातील फोटो माबोवर येण्यासाठी हट्टाला पेटतात.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठाण्यात राजमाता की काय वडा पावच्या दुकाना शेजारीच खास कोकम सरबत मिळते. कोकम सरबत + सोडा आणि वरुन चाट मसाला. खूपच भारी लागते ते.

लई भारी ! हल्ली उन्हाळ्याचा रोज कोकम सरबताचा मारा करतेय स्वतःवर. पण ते विकतचं, पाणी घालून प्यायचं सरबत आहे. असं घरगुती सरबत आई करायची आम्ही गिरगावात असताना. गच्चीतल्या कडक उन्हात घरोघरच्या बरण्या ठाण मांडून बसलेल्या असायच्या. सोबतीला सुपांमध्ये सांडगे मिरच्या, साड्यांवर पापड, प्लॅस्टिकवर बटाट्याचा किस आणि चिकवड्या पसरलेल्या असायच्या.

ही पाककृती एकदम अस्सल आणि नैसर्गिक वाटतेय. टिकवणारा पदार्थ फक्त साखर!

पाकृ आवडली.

बाजारात मिळणारी सरबते उकळवून आणि टिकवणारे पदार्थ (सायट्रिक अ‍ॅसिड वगैरे) मिसळून केली जात असावीत. त्यामुळे स्वाद तर जातोच शिवाय पोषणमूल्येही कमी होत असावित.

जागू , कोकमं आणि सरबत मस्तच दिसताहेत . आईच्या / आजीच्या रेसिपीची आणि त्यांच्या हातच्या सरबताची आठवण झाली . Happy

पहिल्यांदाच ताजे कोकम कसे दिसतात हे कळले आणि त्याला रातांबा म्हणतात हे पण. मला ते आलु बुखार/बुखारे सारखे दिसताहेत. मी नेहमी स्वयंपाकात वापरतात ते वाळवलेले कोकमच बघीतले आहेत किंवा मग विकतचे कोकम सरबत, आगळ.

रातांब्याची(?) कोवळी पानं मस्त लागतात खायला. किंचित आंबट...त्यामुळे जपून खायची. आमच्या शेजार्‍यांनी लावलं होतं झाड. लहानपणी आम्ही कधीतरी(च) कोवळी पानं आणायचो हळूच, नि धुवून खायचो. ते वैतागायचे. कोवळी पानं खुडली तर झाड धरणार कसं म्हणून... Happy

जागुले... मस्तचं गं Happy ताजे रातांबे बघुन जीव सुखावला Happy

मे महिन्यात कोकणात भरपुर रातांबे नुसतेच किंवा साखर-मिठ घालुन खायचे आणि येताना मुंबईला घेऊन यायचे आणि मग आई त्याचं सरबत करायची... खुप आवडतं असं सरबत Happy एकदम उन्हाने तळावलेल्या जीवाला थंडगार वाटतं Happy

आता इथे फक्त देशातुन येताना आणलेल कोकम सरबत्/आगळ प्यायच Sad ताज्या सरबताची चव, स्वाद नाही त्याला...

जागु, सोप्पी पद्धत सांगितलीस की गं.. Happy
हे तयार झालेलं सिरप वरती ठेवायचं की फ्रिजात? किती दिवस टिकतं? पण पुणे मुंबईत कुठे इतकी सुंदर कोकमं मिळतात? माझी काकू त्या कोकमाच्या बिया असतात ना त्या वाळवून बरणीत ठेवते आणि कधी कधी आमटीत घालते. शिवाय सिरप काढून ह्या कोकमाच्या वाट्या उरतात त्याच्या बारिक फोडी करून्/मिक्सर मधून काढून जॅम... मला नाही आवडला पण तो प्रकार.. जरासा आंबट लागतो.

दक्षिणा अग हे वर्षभरासाठी म्हणुन करुन ठेवतात पण तोपर्य.न्त ठेवत का कोण ? जास्तीत जास्त २-३ महिने राहत. लहान मुल असतील घरात तर २ महिन्यात साफच.

त्या कोकमाच्या बिया.न्पासुन औषध तयार करतात. त्यातील गर तेलकटी असतो. त्याचा गोळा करुन तो तळपाय वगैरे दुखत असतील तर त्यावर चोळतात. कोकणी दुकानामध्ये विकायला असतात हे गोळे

दिनेशदा, सि.न्डरेला, प्रज्ञा, अश्विनी, नरे.न्द्र, रैना, चातक सम्पदा, आश, अखि, यो, रुनि, लाजो आउटडोअर्स धन्यवाद.

मस्त जागू Happy

आजी कोकमाच्या बियांचं हिरवी मिरची बारीक कापून, मीठ, साखर आणि पाणी घालून सरबत करते. ते आंबट, गोड आणि तिखट सरबत एकदम भारी लागतं.

कोकणात हे कोकम सरबताचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी टाक्या बनवलेल्या असतात. एकेक टाकी भरली की त्यावर लेबल लावून ठेवतात आणि विशिष्ट दिवशी उघडतात. तयार झालेला पाक गाळण्याची कृतीही एकदम बघण्यासारखी असते.

ठाण्यात राजमाता की काय वडा पावच्या दुकाना शेजारीच खास कोकम सरबत मिळते. कोकम सरबत + सोडा आणि वरुन चाट मसाला. खूपच भारी लागते ते.

येस्स.. एका अगदीच मिनी ठाणे गटगला मी हे प्यायलेय.. एक ग्लास रिचवल्यावर परत एक घेतला Happy

पहिल्यांदाच ताजे कोकम कसे दिसतात हे कळले आणि त्याला रातांबा म्हणतात हे पण. मला ते आलु बुखार/बुखारे सारखे दिसताहेत

माझ्या आईने मुंबईत पहिल्यांदा आलुबुखारे पाहिले तेव्हा तिला मुंबईची माणसे रातांबे अशी ढिगानी का विकताहेत नी विकत घेताहेत हा प्रश्न पडलेला Proud आमच्या गावी रातांबे रानातनं तोडुन आणतात. कोणीही विकत नाही किंवा विकत घेतही नाही.

साधना मी लहान असताना कोकणात गेले होते ते.न्व्हा कोकम लागलेले झाड पाहिलेले. खुप मज्जा वाटलेली ते.न्व्हा पाहुन.

स्वाती, प्रज्ञा धन्स.

आमच्या गावी रातांबे रानातनं तोडुन आणतात. कोणीही विकत नाही किंवा विकत घेतही नाही. >> इथे देसांईकडे ८० रुपये किलो आहेत Uhoh

वर्षा तु कुठे राहतेस गं??

आणि तसेही आंबोलीला कोकमसरबताची गरज पडण्याइतपत उन्हाळा अजुन पडलाच नाहीय. आंबोलीतले लोक रातांबे कोकमं करण्यासाठी तोडतात, सरबत करण्यासाठी नाही Happy

अगं गावी गेले तरच शक्य होईल.. मुद्दाम इथे मुंबईत कोण पाठवणार रातांबे? पण गेले तर मात्र तुझ्यासाठी नक्कीच घेईन. येताना मला पुण्यातुनच यावे लागते. तुला बोलावेन चांदणी चौकात रातांब्याची डिलिवरी घ्यायला. Happy

Pages