आनंदी जोडपं

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

आटपाट नगरात एक जोडपं राहत होतं आनंद आणि आनंदी. गृहलक्ष्मीच्या नावासारखंच आनंदी. आनंदचे घराणे थोर. आनंदी देखील उच्च कुळातली थोरा घरची लेक. थोरल्याच्या जन्मानंतर नवसाने झालेली, लाडावलेली राजकन्याच. उंच, गोरी, देखणी रूपगर्विता. आनंदाईने लाडक्या लेकासाठी शोधून निवडून आणलेली. आनंद आणि आनंदी- लक्ष्मी नारायणाचा जोडा जणू. लग्न करून दूर देशी आली. भले मोठे घर. महाल जणू. घराला दारं-खिडक्याच सतराशे साठ. मोठे अंगण. परसात भाज्या. फुलं अन फळं. आनंदच्या प्रेमात आनंदी मोहरली. आनंदली.

आनंदीला घरकामाची सवय नव्हती. आवड तर नाहीच नाही. स्वयंपाक करणे म्हणजे तिला शिक्षा वाटे. नोकरी निमित्ये मात्या-पित्यांपासून दूर राहिली तरी हाताशी नोकर-चाकर होतेच. तरी नव्या वातावरणाशी जुळवून घेऊ लागली. आनंद कुशल स्वयंपाकी. त्याला खाण्या-पिण्याची-खिलवण्याची भारी आवड. आनंदीला स्वयंपाकाची आवड नाही तरी काही फरक पडला नाही. आनंद होताच. आनंदीच्या प्रेमात.

आनंदीने म्हणावे, घरकामापायी मला श्रम होतात. आनंदने घरकामासाठी बाई शोधावी.

आनंदीने म्हणावे, मला बाट्या जमेना. आनंदने कणीक मळावी.

आनंदीने म्हणावे, घरात बसून मी कंटाळले. आनंदने तिच्या पुढील शिक्षणाची तजवीज करावी.

आनंदीने म्हणावे, भारतात परत जाऊ तर तुझ्या गावी मला मिळेल का काम ? आनंदने बेंगरोली राहू म्हणावे.

आनंदीने म्हणावे, दूर देशी आलोय. इथले जग पाहू. चार ठिकाणं बघू. मगच मुलाबाळांचे ठरवू. आनंदने अनुमोदन द्यावे.

आम्ही बघ्यांनी त्यांच्या प्रेमाची कौतुकं करावी.

~~~

आनंदाईला हे कौतुक सोहळे सहन होईनात की काय न कळे. आनंदाई अजून पट्टराणी होती, घरचा सगळा कारभार स्वतः चालवत होती. थोरली सून- दोन लेकांची आई- अजून पट्टराणीच्या हुकुमात होती. मग आनंदी अपवाद कशी ? आनंदीकडे कामाला बाई येते, आनंदी उच्च शिक्षण घेते, आनंदी नोकरी करणार म्हणते, इतक्यात मूलबाळ नको म्हणते, आनंदी भारतात परत गेल्यावर परराज्यात स्वतंत्र राहायचं म्हणते ? हे चालणार नाही. आनंदाईने आपली नाराजी लेकाच्या कानी घातली. आनंद बिथरला. आनंदी बिथरली.

आनंद म्हणे, आपण बेंगलोरी नाही राहायचा. आनंदी म्हणे, जमणार नाही.

आनंद म्हणे, तिथे घरी राहून आईची सेवा करायची. आनंदी म्हणे, मुळीच नाही.

आनंद म्हणे, रांधा-वाढायला शिकावे लागेल. आनंदी म्हणे, मला आवडत नाही.

आनंद म्हणे, घरीच तर आहेस काय एवढे श्रम तरी. आनंदी म्हणे, तुझ्या घरची न्हाणीघरं आवरायला मी लग्न करून आले नाही.

आनंद म्हणे, खानदान की रोशनी वाढवायलाच हवी. आनंदी मान फिरवे.

ही अशी कशी थोरा घरची लेक ? उलटी उत्तरं देते. आनंदाई म्हणे हिने माझी माफी मागावी. हिच्या आई-बापाने माझी माफी मागावी. ही अशी बीन-वळणाची कार्टी त्यांनीच तर मोठी केली.

आम्ही बघ्यांनी उभयतांच्या समजुती काढाव्यात.

~~~

आनंदी म्हणे, "Trupti, I told myself, either make it or quit it. और अगर इस रिलेशनमे रेहना है तो मुझे खुश रेहना है....इसलिये मैने आनंद को अपने तरीके से मोल्ड कर लिया है..."

आनंद विजयी मुद्रेने म्हणे, "भाभीजी, आनंदी अब बदल गयी है बहोत..."

...आनंदी दोन मुलांची आई आहे, आनंदीने नोकरी सोडली, आनंदीकडे आता बाई येत नाही, आनंदी बाट्यांसाठी कणीक स्वतःच मळते आणि आनंदी सासरी एकत्र कुटुंबात राहायला तयार आहे.

आनंदी जोडपे आटपाट नगरात सुखाने नांदते आहे.

आम्ही बघे !!!

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

तडजोड करावी लागतेच. पण ती केवळ एका बाजूने नसावी. >> हे असं असेल तर ठीक आहे, पण बर्‍याचदा असं असेलच असं नसतं. मूळात बायकांचा स्वभाव मनात असेल ते दुसर्‍याजवळ बोलुन दाखवण्याचा आहे, त्यामुळे तडजोड तरी केली तरी ती आजुबाजुच्या लोकांना कळते. ह्या उलट जनरली मुलांचा/ पुरुषांचा स्वभाव मनातल्या गोष्टी मनात ठेवायाच्या असा असतो आणि म्हणुन त्यांनी कुठे तडजोड केली तरी ती पटकन लक्षात येत नाही.
शिवाय तडजोड ही व्यक्ती सापेक्ष गोष्ट आहे. माझी एखादी गोष्ट समोरच्या व्यक्तीला तडजोड वाटु शकते आणि मला तीच गोष्ट सहज, नॅचरल वाटु शकते.

घरकाम हे अतिशय बेक्कार काम आहे आणि मला स्वतःला सुद्धा त्याचा फार कंटाळा आहे. >> हे अजिबात नाही पटलं. स्वःताचं घर स्वच्छ करण्यात कसली लाज आणि कसला कंटाळा? माझं घर जितक्या मनापासुन मी स्वच्छ ठेवेन, तेवढी एखादी कामवाली बाई कितीही पैसे दिले तरी नाही करणार.
काही कारणास्तव बाई ठेवावी लागली तर ती गोष्ट वेगळी आहे. पण घरकाम करणं बेक्कार काम आहे, म्हणुन मी पैसे मोजुन कोणादुसरी कडुन करुन घेते हा अ‍ॅटिट्युट नाही पटला.

ह्यात लिहिलंय त्याप्रमाणे खरोखर आनंदीने तडजोड केलीही असेल. पण त्याचवेळी आनंदनेही तडजोड केली नसेल हे कश्यावरुन? हीच गोष्ट दोघांच्या पॉईंट ऑफ व्ह्यु ने विचार करुन लिहिली असती तर जास्त आवडली असते. शेवटी टाळी एका हाताने वाजत नाही, त्याच प्रमाणे फक्त एकानेच तडजोड करुन संसार होत नाही हेही तितकंच खरं.

हे अजिबात नाही पटलं. स्वःताचं घर स्वच्छ करण्यात कसली लाज आणि कसला कंटाळा? माझं घर जितक्या मनापासुन मी स्वच्छ ठेवेन, तेवढी एखादी कामवाली बाई कितीही पैसे दिले तरी नाही करणार.<<<
लाज असं काही वरती सिंडी म्हणाली नाहीये.
कंटाळा असू शकतो. आणि मोलाने शक्य होत असेल तर कंटाळा असलेल्या व्यक्तीने जरूर करून घ्यावं.
आपल्यासारखं बाई करणार नाही म्हणून आपणच करायचं तर मग आपल्यासारखं धान्य पिकवता येणार नाही मोलाने करणार्‍याला, ते दळता येणार नाही गिरणीवाल्याला... असं बरंच पुढपर्यंत जाईल प्रकरण. आपण कुठपर्यंत मोलाने करून घ्यायची कामं आणि कुठे नाही हे ज्या त्या बाईने/ घराने ठरवायचं. आणि त्यावर मत मांडायचा अधिकार पण फक्त त्या त्या घरात रहाणार्‍या व्यक्तीचाच. बाहेरच्याचा नाही.

भाग १: सगळंच छान छान
भाग २.: आनंदाईचा हस्तक्षेप व अपे़क्षा
भाग ३: तडजोड

ज्या कथेत भाग २ नसतो तिथेही भाग ३ असतोच.

भाग १ : तिने म्हणावे, त्याने तात्काळ मानावे हे रिलेशनशिपमधे खूपच एकतर्फी वाटते व रिलेशनशिप बळकट होण्याला बाधा आणणारं [ जेवण करण्याचा कंटाळा/ नावड समजण्यासारखं पण नवर्‍याच्या साथीने त्यात थोडा सहभाग घेण्यात आनंद वाटणं हें रिलेशनशिपमधे महत्वाचं; तसं झालेलं नाही जाणवत ]; म्हणूनच, नंतरची तडजोड जबरदस्तीने लादलेली, अन्यायकारक व असह्य वाटते, असं मला तरी जाणवलं.
मांडणी व शैली अप्रतिम.

आपल्यासारखं बाई करणार नाही म्हणून आपणच करायचं तर मग आपल्यासारखं धान्य पिकवता येणार नाही मोलाने करणार्‍याला, ते दळता येणार नाही गिरणीवाल्याला... असं बरंच पुढपर्यंत जाईल प्रकरण. >>> कै च्या कै , घरकाम कुठं आणि शेती करणे कुठं, काय अर्थ तरी आहे का ह्या लॉजिक मध्ये ?

घरकाम हे अतिशय बेक्कार काम आहे आणि मला स्वतःला सुद्धा त्याचा फार कंटाळा आहे. >>> ह्याला कंटाळा नाही आळशीपणा म्हणतात.

एकूणात काय.... ह्या गोष्टीतलं आनंदचं पात्र फारच दुबळं आहे.... त्याला स्वतःचे विचार, मते नसल्यासारखे वाटतेय. किंवा जर ती मते असतील तरी तो सोयीनुसार गप्प राहिलाय अथवा वेळेनुरूप ''त्याचे'' (?) मत त्याने जाहीर केलेय.

त्यांना एकमेकांचे स्वभाव माहित होते, आवड नावड माहित होती तरी ही परिस्थिती.... विचार करा, ज्यांना हेही नीट ठाऊक नसते त्यांचे काय? आणि नवर्‍याने अचानक अशी आधीच्या मतांपासून / वागण्यापासून 'कल्टी' मारली तर बायकोने काय करायचे? तो जसा फिरेल तसे फिरायचे का? हीच गोष्ट बायकोच्या बाबतीतही होऊ शकते.

आनंदीनेही शेवटी ''सोय''च पाहिली. रोज रोजच्या कटकटीपेक्षा किंवा रिलेशनशिपमधून बाजूला होण्यापेक्षा तिने हा मार्ग पत्करलाय. (त्यामागची कारणे हा पुन्हा वेगळाच मुद्दा !) त्यात तिला मिळणारा ''आनंद'' हा खरोखरीचा आहे, की तिने स्वतःची आनंदी असण्याची समजूत घातली आहे, हे मात्र तिचे तीच जाणे!

जर घडणारे बदल तिच्या मनाविरूध्द असतील तर कोठेना कोठे त्याचे पडसाद उमटतीलच.... मनाविरूध्द तडजोडी करायला लागल्या की मानसिक किंवा शारीरिक व्याधीही फार काळ दूर राहत नाहीत. त्यांची कदाचित तिला व पर्यायाने आनंदलाही किंमत मोजायला लागेल. ''एक हाथ से लो, तो दूसरे हाथ से दो''.... हो, आणि आनंदच्या संभाव्य गैरसोयीमुळे आनंदीच्या सासूलाही अप्रत्यक्षपणे आपल्या वागण्याची किंमत मोजायला लागेल का?.... जर, तर च्या गोष्टी आहेत ह्या... पण ह्या सर्व गोष्टींमधून ते काही बोध घेतील का? ती शक्यता मात्र धूसर दिसते.

नानबाने वर म्हटलंय त्याप्रमाणे ''थिंग्ज कॅन बी वर्कड आऊट.. अ‍ॅज लाँग अ‍ॅज वी नो हाऊ टू अ‍ॅक्सेप्ट द डिफरन्सेस ऑर आर रेडी टू लर्न'' हे असे जर आनंदीच्या बाबतीत घडले असेल तर मग प्रश्नच नाही!

एखादी गोष्ट करण्याचा मनापासून कंटाळा असेल्/आवड नसेल आणि आर्थिक दृष्ट्या शक्य असेल तर ते काम करायला पगारी माणूस ठेवणे यात मला तरी काही गैर वाटत नाही. माझ्या धाकट्या मामीला पोळ्या करायची फारशी आवड नाही. ती पूर्णवेळ गृहिणी. पण तिच्याकडे पोळ्यांना बाई होती/ आहे. आमच्याकडे या गोष्टीचा माझी आई, आजी,मोठी मामी वगैरे कुणीच इश्यु केला नाही. 'तिला आवड नाही आणि त्याला परवडतयं म्हणून पोळ्यांना बाई' हे 'तिला कारल्याची भाजी आवडत नाही म्हणून जोडीला बटाट्याच्या काचर्‍या केल्या' एवढ्या सहजतेने स्विकारलेले. इतर लोकांनी सुरुवातीला कुरापती काढुन बघितल्या पण आमच्या घरी सगळे खमके! :).

पण तडजोड कुणी करायची हे आनंदच्या आईने का ठरवायचे ? आनंदीच्या आई-बाबांनी माफी का मागायची ? हे सगळ्यात महत्वाचं.
हाच तर मेन लोचा! आणि हे असे होते कारण तुम्ही तुमच्या संसारात इतरांना हस्तक्षेप करु देता. आनंदने का नाही सांगितले त्याच्या आईला की आम्ही दोघांनी मिळून हा असा निर्णय घेतलाय. तुम्ही आमच्या निर्णयाचा आदर केलात तर आम्हाला आनंद होईल पण नाही केलात तरी आमचा निर्णय बदलणार नाहिये. तो बायकोच्या बाजूने ठाम ऊभा रहाता तर आनंदीवर ही वेळ आली नसती.

आपण कुठपर्यंत मोलाने करून घ्यायची कामं आणि कुठे नाही हे ज्या त्या बाईने/ घराने ठरवायचं. आणि त्यावर मत मांडायचा अधिकार पण फक्त त्या त्या घरात रहाणार्‍या व्यक्तीचाच. बाहेरच्याचा नाही.<<<

इथेच तर मोठा प्रॉब्लेम येतो. हा अधिकार मुळात आधी मानला तर पाहिजे ना?

इतर लोकांनी सुरुवातीला कुरापती काढुन बघितल्या पण आमच्या घरी सगळे खमके!<<<<<<

दुर्दैवाने अशी घरं खूप कमी असतात. नवीन सून घरात आली की तिच्या बाकी गुणांचा विचार होण्याआधीच तिला घरकाम किती आणि कसं येतं हाच भाग काही घरांमधे बारकाईनं बघितल्या जातो.

माझ्या मोठ्या जाऊबाई या बाबतीत फार गोड आहेत. मी सासरी आल्यावर मला काय येत नाही हे न बघता काय येतं याचंच त्यांनी नेहमी कौतुक केलं.

उदा. मी ऑफिसला जायच्या आधी सकाळी मला फक्त पोळ्या करायला वेळ मिळायचा. यावर लोकांच्या टीकेला त्यांनी ' अहो, मुख्य कामच तर ती करून जाते माझं. कुकरला असा किती वेळ लागतो मला? उलट ती आल्यापासून माझं काम फार हलकं झालंय' हे उत्तर दिलं.

मला खूप छान पुरणपोळ्या नाही जमत. त्यावर कोणी काही म्हटलं की 'अहो, तिला किती नवेनवे पदार्थ येतात इतर. पावभाजी, चाट हे सगळं बाहेर खावंच लागत नाही आम्हाला आता.' असं उत्तर देत.

त्यापण सासरच्याच. मग त्यांना जे जमू शकतं ते इतरांनाही जमायला काय हरकत आहे? पण मी घरात मोठी, माझं स्थान मोठं, मी सांगेन ते व्हायलाच हवं असा इगो आला की सारंच फिसकटतं, मनं दुखावतात.

लग्न ठरवण्याआधी स्पष्ट चर्चा झाल्यास समोरच्या व्यक्तीची मते,अपेक्षा कळतात. ती आपल्या अपेक्षांशी जुळतात की नाही ते पडताळून बघता येते. कुठल्या मुद्द्यावर तडजोड शक्य आहे आणि कुठल्या मुद्द्यावर नाही हे लग्नाआधी स्वतःलाच स्पष्ट असणे खूप महत्वाचे. हे जमणार नसेल तर शिक्षणाचा काय उपयोग?

>>
हे मात्र फारच होतंय हं.... ती का टेन्डर फायनलायझेशनची चर्चा आहे? तेव्हा स्थिती अशी असते 'हुरळली मेन्ढी अन लागली लांडग्याच्या पाठी 'अशी गत असते. अशीच एक उच्च्शिक्षीत हुरळलेली मेंढी माझ्या अत्यन्त म्हणजे अत्यन्त जवळच्या नातेवाईकाच्या मागे लागली म्हणण्यापेक्षा प्रेमलग्नाच्या फन्दात पडली. आमचा रुपया किती खोटा आहे हे आम्हाला माहीत असल्याने अगोदर कॉमन व्यक्तींच्या माध्यमातून तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला तर तिने त्यांच्याशी ऑफिसम्ध्ये जाऊन भांडणे करायला सुरुवात केली. शेवटी मीच तिला भेटून आमचे 'पात्र' कसे नालायक आहे त्याची तब्येत ,व्यसने, स्वभाव, फिरतीची नोकरी याची स्पष्ट कल्पना देऊन यातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला. पण तिने वाद केला. मी त्याला समजावून सांगेन , परावृत्त करीन , मी नोकरी सोडायला तयार आहे, कुठेही जायला तयार आहे.,मूल झाल्यास नोकरी सोडायची तयारी आहे इ.शेवटी लग्न केले. दोन मुले आहेत दोन्हीही पाळणाघरात असतात. व्य्सने जोरात चालू आहेत . स्वास्थ्य नाही. रोजची भांडणे रडारड चालूच आहे. मला मधून मधून फोन येतात तुम्ही काहीतरी करा. समजावून सांगा. वगैरे. बघ मी म्हणत होतो तसेच झाले की नाही . भो.आ.आ.क.फ. असा दृष्टीकोन मुळीच नाही. पन कुठल्याही दारुड्याची दारू ही समजावून सुटत नसते. मी बाहेरून काहीच करू शकत नाही. अगदी सुइसाईड पर्यन्त वेळ येते कधी कधी.
त्यामुळे या चर्चा बिर्चा फजूल बाबी आहेत असे माझे मत आहे. आनन्दीबाईंची स्थिती वेगळी असेल असे वाटत नाही.

@बाळू जोशी
मला नाही वाटत मी काही अवास्तव अपेक्षा ठेवतेय. आता तुम्ही म्हणताय तशी हुरळलेली मेंढी लांडग्याच्या पाठी लागल्यास विनाश ठरलेलाच पण सामान्यतः परीचयोत्तर किंवा ठरवून झालेल्या लग्नाच्या बाबतीत नीट विचार करुन निर्णय घ्यायला काहीच अडचण नसावी.
लग्नानंतर एकत्र कुटुंब की विभक्त, दोघांच्या आईवडिलांची जबाबदारी, मुले किती आणि कधी, वेळ आल्यास परप्रांतात्/परदेशात राहायची तयारी, नोकरी करणार्/नाही करणार/स्वतंत्र व्यवसाय, कामाचे तास, पुढे शिकायची इच्छा, इतर आवडी निवडी, छंद आणि त्यावर खर्च होणारा वेळ/पैसा, समाजकार्याची आवड, स्वयंपाक आणि इतर घरकामाची वाटणी, पोलिटिकल व्युज याबद्दल एकमेकांची मते समजून घ्यायला काय हरकत आहे. १००% एकमत होणे अशक्य. पण साधारण कल्पना तर येते. आपल्याला काय महत्वाचे आहे आणि कुठल्या मुद्द्यावर तडजोड करु शकू त्याचा विचार केला गेला तर ते चांगले नाही का?

अशा प्रकारच्या चर्चेचे व चर्चेनन्तर निर्णयाचे स्वातंत्र्य हे (दुर्दैवाने असे असू नये पण तसे आहे..) आर्थिक स्वातंत्र्य /रूपसम्पदा असलेल्या असलेल्या मुलीनाच उपभोगता येते. अजूनही ९० टक्के मुली ज्या उच्चशिक्षीत असल्या तरी कोठून तरी एकदाचे लग्न जमले की नि;श्वास टाकणार्‍या संवर्गातच आहेत. त्यामुळे तड्जोड करणे हे त्यानी गृहीतच धरलेले असते. अर्थार्जन करणारा जोडीदार असण्याच्या दृस्टीने अत्यन्त हिशेबीपणाने जवळीक वाढविली जात नाही काय ? अन एम्प्लॉईड मुलीना लग्नाच्या बाजारात किती 'उठाव' असतो? त्याना अशा चर्चा आणि व्ह्यूज ची संधी कोण देतो? त्याचा व्यत्यास तर अधिकच चमत्कारिक आहे. अत्यन्त गुणी असलेल्या सर्वप्रकारची स्वातंत्र्ये मुलीला देणारा पण अर्थार्जन न करणार्‍या मुलाशी करणारे का कोणी लग्न? अनिल अवचटांसारखे एखादे कुटुम्ब विरळे...

स्वाती २ यांचे विचार आदर्श आहेत पण अजूनही तशी समाजरचना आपल्याकडे नाही.

>>>अशा प्रकारच्या चर्चेचे व चर्चेनन्तर निर्णयाचे स्वातंत्र्य हे (दुर्दैवाने असे असू नये पण तसे आहे..) आर्थिक स्वातंत्र्य /रूपसम्पदा असलेल्या असलेल्या मुलीनाच उपभोगता येते. <<<<
रूपसंपदा या मुद्द्याला आक्षेप. आर्थिक स्वातंत्र्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत मान्य आणि म्हणूनच मुलींनी स्वतःच्या पायावर उभं रहाणे आणि नुसतंच कमवणे नाही तर स्वत:च्या कमाईच्या नियोजनाचे अधिकार स्वतःच्याच हातात ठेवणे हे गरजेचे आहे.
>>>अजूनही ९० टक्के मुली ज्या उच्चशिक्षीत असल्या तरी कोठून तरी एकदाचे लग्न जमले की नि;श्वास टाकणार्‍या संवर्गातच आहेत. त्यामुळे तड्जोड करणे हे त्यानी गृहीतच धरलेले असते.<<<
हे दुर्दैव आहे. आणि असा नि:श्वास टाकायला भाग पाडणारा आणि तडजोड गृहित धरणारा समाज मग रोगट समाजच म्हणायला काही हरकत नाही.
>>अन एम्प्लॉईड मुलीना लग्नाच्या बाजारात किती 'उठाव' असतो? त्याना अशा चर्चा आणि व्ह्यूज ची संधी कोण देतो? <<<
मुलींना अश्या चर्चा आणि व्ह्यूजची संधी मिळत नसेल तर झगडून मिळवावी लागेल. त्यासाठी स्वतःची कपॅसिटी वाढवावीच लागेल. अर्थात सगळ्याच बाजूने छाटून टाकणारे आईबाप नशिबाला असतील तर ते त्या मुलीचं दुर्दैव आहेच आणि त्यातून बाहेर पडता न येण्यातला दुबळेपणाही आहे.

>>>अत्यन्त गुणी असलेल्या सर्वप्रकारची स्वातंत्र्ये मुलीला देणारा पण अर्थार्जन न करणार्‍या मुलाशी करणारे का कोणी लग्न? अनिल अवचटांसारखे एखादे कुटुम्ब विरळे...<<<
कोण कुणाला स्वातंत्र्य का देते? हा मुद्दाच चुकीचा आहे. स्वातंत्र्य देण्याचा काय संबंध? एक व्यक्ती स्त्री असो वा पुरूष स्वतंत्र असते. स्वातंत्र्य मिळालेली व्यक्ती मुळात स्वातंत्र्य 'देणार्‍याची' गुलाम बिलाम नसते.
जेव्हा अ‍ॅरेंज मॅरेजचा मुद्दा येतो तिथे अर्थार्जन न करणारा मुलगा खपणार नाही. पण अश्या प्रकारचा मुलगा लग्नाच्या बाजारात उभा राहिल हेच अशक्य. पण मी लग्न करणार नाही हे म्हणायला मुलाला थोडा तरी वाव असतो. मुलींच्या बाबतीत ते तितके सोपे नसते.
बाकी आमच्या फिल्डमधल्या अर्थार्जन न करणार्‍या(करीअर स्ट्रगल किंवा तत्सम) मुलाशी लग्न केलेल्या आणि अनेक वर्ष स्वतःच्या कमाईवर संसार चालवणार्‍या अनेक मुली मला माहितीयेत. कुणाचंही लग्न ठरवून झालेलं नाही आणि कुणीही मुलींनी अंगावर पडलं म्हणून केलेलं नाही.

स्वाती २ यांचे विचार आदर्श आहेत पण अजूनही तशी समाजरचना आपल्याकडे नाही. <<< नाहीचं कौतुक कशाला? निदान स्वतःच्या आयुष्यात/ आजूबाजूला तरी बदल घडवण्यात काय हरकत आहे? ते केल्याशिवाय समाजरचना बदलणारे का? Be the change you want to be! असं काहीतरी एक वाक्य आहे ना..

नाहीचं कौतुक कशाला?

>> या कुठे कौतुक आहे? जे काही आहे हा सगळा विषाद योगच आहे...
पण मी लग्न करणार नाही हे म्हणायला मुलाला थोडा तरी वाव असतो. मुलींच्या बाबतीत ते तितके सोपे नसते.

>>
हा मुद्दा अगदी १००० टक्के बरोबर आहे आणि या एका मुद्द्यावरूनच सगळे प्रॉब्लेम निर्माण होत आहेत...

छान लिहिलंय.. Happy
त्या आनंद च्या आईला...... न आनंदला समजावुन सांगा कोणितरी...... आनंदी घरची सुन अन आनंद ची बायको आहे.....घरातली मोलकरिण नाही......एक स्वतंत्र व्यक्ती म्हणुन स्वतःच्या आवडी निवडी जपण्याचा अधिकार आहे तिला......तिला आवड असेल तर खुश्शाल काम करावे तिने.........पण तिच्या आई-वडिलांनी तिला शिकवुन मोठे केले ते काय नोकरि सोडुन सासरची धुणी-भांडी करायला नाही......

आनंद बुळा आहे..... निर्णयक्षमता नाही त्याच्याकडे......पण आनंदी ने हे सगळे का सहन करायचे???? तिला स्वतःच्या अस्तित्वाची, शिक्षणाची काहिच कदर नाही का????

चर्चा typical वळणावर जाउन पोहचली आहे (म्हणजे ह्याच प्रकारचे स्त्री-पुरुष स्वातंत्र्य/समानता गटातले वाद इथे आधी खुप वाचलेत), पण तरी देखील माझा एक angle add करायला आवडेल. नवरा आणि सासरची मंडळी ह्यानी आपल्याला हवे तसे वागण्यासाठी/किंवा आपण तडजोद न करण्यासाठी थोडे राजकारण करावे लागते (दुर्देवाने राज्कारन-राजकारणी म्हनजे वाइतच असा समज असतो,ते तसे काही नसते),त्यात साम दाम दंड भेद सगळेच आले.
किंबहुना जे संसार नीट चालले आहेत त्यात बायका हे थोड्या फार प्रमाणात करतच असतात.त्यात कोणाचे विशेष नुकसान नसते.
रूपसम्पदा असलेल्या असलेल्या मुलीनाच उपभोगता येते> थोड्या फार प्रमाणात अनुमोदन.ठरवुन लग्न करताना रुपसंपदा हा आजच्या काळातच नाही तर पुर्वी सुध्दा फार मोठा मुद्दा होता .
सगळ्याच वाहीन्यांवर सतत फक्त सुंदरच मुली दिसत असण्याचा परीणाम असेच त्याचे कारण आहे हा claim नाही, शारीर आकर्षण हा लग्न ठरवितानाचा खुप मोठा factor असतो.मुलानासुध्दा टक्कल असेल तर नकार घ्यावे लागतात. त्यामुळे सुंदर मुलींकडे choice जास्त असतो , so they can dare to negotiate.

सुना आणि सासवांचा एक चर्चासत्र ठेवा, मुळमुद्दा सगळीकडे बायकांमधील वादाचाच असतो. सानु-सुनेच्या वादात आनंदकडे निर्णयक्षमता नाही हे कसे काय योग्य? आणि हे मत पण सगळ्या बायकांनीच मांडल आहे. दोन बायका त्यांच्या मधील वाद हे एका पुरूषाच्या मध्यस्ती शिवाय सोडवू शकत नाहीत? समाज बदलण्यची गरज फार नाही आधी बायकांनी त्यांची विचार क्षमता वाढवण्याची गरज आहे. इथे मुद्दा फक्त सासू-सुनांच्या भांडणाचा आहे, समाजाला कशाला ओढताय मध्ये?

तडजोड सगळीकडेच गरजेची आहे, त्याशिवाय तुम्ही घरातुन पाउलही बाहेर ठेऊ शकत नाही. सासरी गेल्यावर तडजोडीचा उहापोह कशाला. आई-वडीलांनी घातलेल्या नियमांशी तुम्ही तडजोड करत नाही का? सासूने सांगितल की तडजोड, आईने सांगितल की सल्ला?

आत्ता ज्या सुनेच्या बाजुनी बोलता आहेत त्याचे उद्या सासू झाल्यावर त्यांचे सुनेशी वाद हे नक्की. ह्याच बायका १५-२० उन्हाळे पावसाळे बघितले की, संसार कसा करावा याचे धडे नविन नविन सुनेला देतिल. आणि तिच्या घरच्यांनी कसे तिच्यावर योग्य संसार केले नाहीत याचे पाढे गातिल.

arc : नवरा आणि सासरची मंडळी ह्यानी आपल्याला हवे तसे वागण्यासाठी/किंवा आपण तडजोद न करण्यासाठी थोडे राजकारण करावे लागते (दुर्देवाने राज्कारन-राजकारणी म्हनजे वाइतच असा समज असतो,ते तसे काही नसते),त्यात साम दाम दंड भेद सगळेच आले. किंबहुना जे संसार नीट चालले आहेत त्यात बायका हे थोड्या फार प्रमाणात करतच असतात.त्यात कोणाचे विशेष नुकसान नसते.
>> परफेक्ट.

दोन व्यक्तीनी एकत्र रहायच म्हंटला की तडजोड आलीच. मग संसार, रुममेट, मित्र, ऑफिस असु दे सगळी कडे तडजोडही आहेच. त्यात पुरुष आणि स्त्रीला वेगळे नियम नाहीत.
एकदा विचार करा, की तुम्ही सासरी न जाता तुमचा नवरा तुमच्या घरजावई झाला आहे (८०% स्त्रीयांना हा विचारच पटणार नाही), त्याच्या सवई तुमच्या घरातल्या वातावरणात imagine करा. तुमचे आईवडील, जावई म्हणुन ४ दिवस लाड करतिल आणि मग कुरबुर चालु करतील. ह्याच्या सवई ह्याच, त्याच्या सवई त्याच, मग तुम्हीच सांगाल नवर्‍याला असे करु नको आणि तसे करु नको. तडजोड आलीच की.

जाउ दे, निरर्थक विचार करण्यापेक्षा तडजोड न करता जगायच असेल तर काय करता येईल हा मुळ मुद्दा.

मध्ये वृत्तपत्रात मोठी चर्चा वाचह्ली होती की, बायकोने आणि नवर्‍याला वेगवेगळे बेडरुम्स हवेत, स्त्रीला प्रायव्हसी हवी . कितीतरी समर्थक होते, सगळे मुद्दे लॉजिकली योग्य होते. नवरा बायको एका बेडरुम मध्ये झोपले तरी किती त्रास होतो, हे तोवर मला माहीत नव्हते, आणि तसा विचारही मी केला नव्हता. बायकोशी ह्या लेखावर विचार विनमय करावा असा मानस होता, पण "कोणाला त्रास होतोय नक्की ?" हा प्रश्न बायकोने विचारला तर पळता बेडरुम्स थोडी व्हायची, म्हणुन गप्प बसलो. Happy

तसे वर्तमानपत्रात अनेक मुद्दे येत असतात, सगळ्यांची कात्रण करुन घरी चिटकवायची गरज नाही, काही नित्यनियमाने रद्दीत गेलीली बरी.

असो पण "तडजोड"नको, मग वेगळे बेडरुम्स हवेच.
तर मग दोन वेगळी घर का नसावित? तडजोडीचा प्रश्नच नाही. पोरांच काय करावं, असा मला प्रश्न आहे. पण हॉस्टेल हा पर्याय योग्य होऊ शकतो.

I got the Solution, ह्या तडजोडी बद्दल तुमची काय मतं?

सासु-सुना हा वेगळा थ्रेड आहेच:)

४ मे पर्यंत बहुधा येथे पुरेशी चर्चा व्हावी असा आपला एक अंदाज! (दिवा)

कथा सामान्य वाटली. अणि चर्चाही!

-'बेफिकीर'!

मूळात बायकांचा स्वभाव मनात असेल ते दुसर्‍याजवळ बोलुन दाखवण्याचा आहे, त्यामुळे तडजोड तरी केली तरी ती आजुबाजुच्या लोकांना कळते. ह्या उलट जनरली मुलांचा/ पुरुषांचा स्वभाव मनातल्या गोष्टी मनात ठेवायाच्या असा असतो आणि म्हणुन त्यांनी कुठे तडजोड केली तरी ती पटकन लक्षात येत नाही. >>>>>> मिनी, मी आनंद आणि आनंदी दोघांची पण एक एक वाक्य लिहिलीत ह्यावरुन तू आनंदने मनातलं सगळं सांगितलं नसावं असं कसं म्हणतेस ?

स्वःताचं घर स्वच्छ करण्यात कसली लाज आणि कसला कंटाळा? >>>> लाज वाटते असं मी कुठे ही लिहिलेलं नाही. आवड नसणे आणि लाज वाटणे ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. खरं सांगायचं तर बाई आली नाही म्हणून दणादणा घर आवरुन मग मी ती पोस्ट लिहिली होती. तरी ही बया आली असती तर एक छोटं पुस्तक हातावेगळं झालं असतं किंवा लेकाला घेऊन मुव्ही नाही तर पार्कात गेले असते असं मला वाटत होतं. मी वर एका प्रतिसादात लिहिलय की बाई नव्हती तेव्हा ते दोघं घाणेरड्या घरात रहात नव्हते. आनंदी करतच होती सगळं. पण तिला कंटाळा आला तेच तेच करुन. नोकरी सोडून घरकाम करणं प्रत्येकीला आवडेलच असं नाही. ह्या उपर, तिने बाई का नाही लावायची ह्याचं लॉजिक तू वाचलस का मिनी ? तुला किंवा कुणाला चालेल असा रिमोट कंट्रोल कारभार ?

जेवण करण्याचा कंटाळा/ नावड समजण्यासारखं पण नवर्‍याच्या साथीने त्यात थोडा सहभाग घेण्यात आनंद वाटणं हें रिलेशनशिपमधे महत्वाचं; तसं झालेलं नाही जाणवत >>>>> भाऊ, रोजचा स्वयंपाक करायला तिची ना नव्हती. पण त्यात सुद्धा आनंद स्वतःच्या आवडीने काही करत होता तर त्याच्या घरच्यांनी हरकत का घ्यावी ?

एकूण वर मी दिलेल्या गोष्टींमध्ये काय असं चुकीचं आहे की आनंदीच्या आईने आनंदच्या आईची माफी मागावी ? किंवा असं काय जगावेगळं आनंदी करत होती की सगळ्या सासरच्या लोकांनी तिच्या विरुद्ध आनंदकडे तक्रारी कराव्यात. आनंदीला नोकरी करायची होती, H1 करुन घेतला, तिच्या तोपर्यंतच्या अनुभवास पूरक होइल असे शिकत होती, परवडत होतं म्हणून घरकामास बाई लावली, लोकं जेवा-बिवायला असली की आनंद तिच्याबरोबरीने स्वयंपाकघरात उभा असे (पुन्हा एकदा, त्याला आवड आहे म्हणून) तर ह्यात चुकलं काय ? आणि आता हे सगळं सोडून द्यावं लागलच आहे.

पण त्याचवेळी आनंदनेही तडजोड केली नसेल हे कश्यावरुन? >>>> तू हे गृहित का धरते आहेस की माझं आनंदशी काहीच बोलणं झालेलं नाही ?

अशाच कथा थोड्या फार फरकाने अनेक घरांमधून दिसतात. कधी जवळच्यांशी मन मोकळेपणे बोलता येतं काही जणींना, काहींना तर तेवढी देखील मोकळीक मिळत नाही Sad

आनंदीला पुढे शिकायचंच होतं तर लग्न का केलं? घरकामाचा कंटाळा आहे तर त्यावर बाई लावणे हा उपाय आहेच. पण आनंदी नोकरी करत नसेल तर मग दिवसभर टीव्हीवरच्या मालिका पाहणार का?
असो. घरोघरीच्या मातीच्या चुलींना पुन्हा पुन्हा शाब्दिक रंगरंगोटी करायचा प्रयत्न आवडला नाही.
असले रडके सूर लावत बसण्यापेक्षा आनंदीने स्वतःच्या जीवावर आनंदी राहायला शिकावे. तीच सर्वार्थाने मुक्ती.
स्वतःला काय हवंय ते कळणे म्हणजेच सगळं नाही, ते मिळवण्याची धमकही असावी लागते. ती नसते म्हणूनच आनंद मोल्ड करून घ्यावा लागतो.

आनंदीच्या घरी बाईने का काम करावे ? ती देखील स्त्रीच आहे .. तिच्याही व्यक्तिस्वातंत्र्याचा आनंदीने विचार करायला हवा.

@नगरीनिरंजन, लग्नाचा आणि पुढे शिक्षण घेण्याचा काय संबंध? लग्ना नंतर पुढे शिक्षण घेणारे बरेच पती-पत्नी माझ्या तरी नात्यात, ओळखीत आहेत. आणि मुद्दा त्या शिक्षण घेण्याला सासूने विरोध करणे हा आहे. अशी सासू जी त्यांच्या बरोबर रहातही नाही. आनंदी नोकरी करत नाही ती देखील सासरच्या विरोधामुळेच. आता एकदा नोकरी करु नको असे सांगितल्यावर तिला दिवसभरात जो रिकामा वेळ मिळतो त्याचे ती काहीही करेल. ते ठरवायचा अधिकार इतरांना नाही.

स्वतःला काय हवंय ते कळणे म्हणजेच सगळं नाही, ते मिळवण्याची धमकही असावी लागते.
१००% मान्य!

@किरण्यके आनंदीच्या घरी बाई कामाला येते ती नोकरी म्हणुन, गुलाम म्हणून नव्हे. काम करायला येणारी व्यक्ती स्त्री की पुरुष हा मुद्दा गौण!

अजून एक गोष्ट म्हणजे घरकामाबद्दल. भारतात जसे धुणं-भांडी,लादी-पोछा करायला रोज कामाला कोणीतरी येते तसे अमेरिकेत नसते. इथे रोजची कामे सगळे स्वतःच करतात. पण आर्थिक दृष्ट्या शक्य असेल तर आणि मिळत असेल तर आठवड्यातून/ पंधरा दिवसातून एकदा सगळे घर स्वच्छ करायला कुणीतरी पगारी माणूस ठेवतात. साधारण २५०० स्के. फुटाचे घर त्यात २ १/२ बाथरुम्स, साधारण २० खिडक्या. हे घर अगदी चकचकीत करायला ही पगारी व्यक्ती येते. कार्पेट वाल्या खोल्या वॅक्युम करणे, टाईल्स वाल्या खोल्या चकचकीत पुसणे. टब बाथ/शॉवर स्टॉल्स वगैरे स्वच्छता, सगळी अप्लायन्सेस पुसणे, फर्निचरला पॉलिश, खिडक्या पुसुन ब्लाईंड्स/पडद्यांची स्वच्छता वगैरे बर्‍याच गोष्टीचा यात समावेश होतो. तसे तर इथे घराभोवतालचे आवार नीट ठेवणे हे ही काम असतेच. मशिनने लॉन कापायचे तरी अगदी लहान १/३ एकराचे लॉन कापून इतर भाज्याचे, फुलांचे वाफे नीट ठेवणे वगैरे कामांसाठी बराच वेळ जातो. अंगमेहनतही खूप पडते.

दुस-याच्या घरी कामे केली तर ती नोकरी आणि स्वतःच्या घरी केली तर गुलामी कशी ?

दुस-याच्या घरची कामं ( जी त्या घरच्यांनाच हीन वाटतात ) आपल्या बायकोने करावी असा तिच्या नव-याचा दृष्टीकोण बरोबर आहे का ?

दुस-याच्या घरी कामे केली तर ती नोकरी आणि स्वतःच्या घरी केली तर गुलामी कशी ? >>>> दुसर्‍याच्या घरी काम केले तर नोकरी कारण त्यांनी स्वतःहुन (त्या कामाचा मोबदला मिळतो म्हणून) स्वीकारलेला पेशा आहे तो.

स्वतःच्या घरी केली तर गुलामी >>>> हे असं कुठेही कुणीही लिहिलेलं नाही.

कामं हीन वाटणे आणि परवडतय म्हणून मोलाने बाई/माणूस ठेवणे ह्यात फरक आहे. आनंदीकडे बाई यायची म्हणून बाई लिहिलेय. पण इथे अनेकांकडे घरकामास माणूस येतो.

उद्या तुम्ही म्हणाल नारायण मुर्तींना कोडिंग करणे हीन वाटत होते म्हणून त्यांनी डेव्हलपर्स हायर केले.

Pages