आनंदी जोडपं

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

आटपाट नगरात एक जोडपं राहत होतं आनंद आणि आनंदी. गृहलक्ष्मीच्या नावासारखंच आनंदी. आनंदचे घराणे थोर. आनंदी देखील उच्च कुळातली थोरा घरची लेक. थोरल्याच्या जन्मानंतर नवसाने झालेली, लाडावलेली राजकन्याच. उंच, गोरी, देखणी रूपगर्विता. आनंदाईने लाडक्या लेकासाठी शोधून निवडून आणलेली. आनंद आणि आनंदी- लक्ष्मी नारायणाचा जोडा जणू. लग्न करून दूर देशी आली. भले मोठे घर. महाल जणू. घराला दारं-खिडक्याच सतराशे साठ. मोठे अंगण. परसात भाज्या. फुलं अन फळं. आनंदच्या प्रेमात आनंदी मोहरली. आनंदली.

आनंदीला घरकामाची सवय नव्हती. आवड तर नाहीच नाही. स्वयंपाक करणे म्हणजे तिला शिक्षा वाटे. नोकरी निमित्ये मात्या-पित्यांपासून दूर राहिली तरी हाताशी नोकर-चाकर होतेच. तरी नव्या वातावरणाशी जुळवून घेऊ लागली. आनंद कुशल स्वयंपाकी. त्याला खाण्या-पिण्याची-खिलवण्याची भारी आवड. आनंदीला स्वयंपाकाची आवड नाही तरी काही फरक पडला नाही. आनंद होताच. आनंदीच्या प्रेमात.

आनंदीने म्हणावे, घरकामापायी मला श्रम होतात. आनंदने घरकामासाठी बाई शोधावी.

आनंदीने म्हणावे, मला बाट्या जमेना. आनंदने कणीक मळावी.

आनंदीने म्हणावे, घरात बसून मी कंटाळले. आनंदने तिच्या पुढील शिक्षणाची तजवीज करावी.

आनंदीने म्हणावे, भारतात परत जाऊ तर तुझ्या गावी मला मिळेल का काम ? आनंदने बेंगरोली राहू म्हणावे.

आनंदीने म्हणावे, दूर देशी आलोय. इथले जग पाहू. चार ठिकाणं बघू. मगच मुलाबाळांचे ठरवू. आनंदने अनुमोदन द्यावे.

आम्ही बघ्यांनी त्यांच्या प्रेमाची कौतुकं करावी.

~~~

आनंदाईला हे कौतुक सोहळे सहन होईनात की काय न कळे. आनंदाई अजून पट्टराणी होती, घरचा सगळा कारभार स्वतः चालवत होती. थोरली सून- दोन लेकांची आई- अजून पट्टराणीच्या हुकुमात होती. मग आनंदी अपवाद कशी ? आनंदीकडे कामाला बाई येते, आनंदी उच्च शिक्षण घेते, आनंदी नोकरी करणार म्हणते, इतक्यात मूलबाळ नको म्हणते, आनंदी भारतात परत गेल्यावर परराज्यात स्वतंत्र राहायचं म्हणते ? हे चालणार नाही. आनंदाईने आपली नाराजी लेकाच्या कानी घातली. आनंद बिथरला. आनंदी बिथरली.

आनंद म्हणे, आपण बेंगलोरी नाही राहायचा. आनंदी म्हणे, जमणार नाही.

आनंद म्हणे, तिथे घरी राहून आईची सेवा करायची. आनंदी म्हणे, मुळीच नाही.

आनंद म्हणे, रांधा-वाढायला शिकावे लागेल. आनंदी म्हणे, मला आवडत नाही.

आनंद म्हणे, घरीच तर आहेस काय एवढे श्रम तरी. आनंदी म्हणे, तुझ्या घरची न्हाणीघरं आवरायला मी लग्न करून आले नाही.

आनंद म्हणे, खानदान की रोशनी वाढवायलाच हवी. आनंदी मान फिरवे.

ही अशी कशी थोरा घरची लेक ? उलटी उत्तरं देते. आनंदाई म्हणे हिने माझी माफी मागावी. हिच्या आई-बापाने माझी माफी मागावी. ही अशी बीन-वळणाची कार्टी त्यांनीच तर मोठी केली.

आम्ही बघ्यांनी उभयतांच्या समजुती काढाव्यात.

~~~

आनंदी म्हणे, "Trupti, I told myself, either make it or quit it. और अगर इस रिलेशनमे रेहना है तो मुझे खुश रेहना है....इसलिये मैने आनंद को अपने तरीके से मोल्ड कर लिया है..."

आनंद विजयी मुद्रेने म्हणे, "भाभीजी, आनंदी अब बदल गयी है बहोत..."

...आनंदी दोन मुलांची आई आहे, आनंदीने नोकरी सोडली, आनंदीकडे आता बाई येत नाही, आनंदी बाट्यांसाठी कणीक स्वतःच मळते आणि आनंदी सासरी एकत्र कुटुंबात राहायला तयार आहे.

आनंदी जोडपे आटपाट नगरात सुखाने नांदते आहे.

आम्ही बघे !!!

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

शैली आवडली. आनंद फार दुबळा आहे. आधी तो बायकोच्या प्रत्येक इच्छेला 'हो' म्हणतो आणि नंतर आईच्या. त्याला नक्की काय ह्वे होते? लग्नाआधी आनंद आनंदीमधे महत्वाच्या मुद्द्यांवर स्पष्ट चर्चा झाली असती तर चित्र वेगळे असते का?

आवडली म्हणवत नाही पण कळली.

शीर्षकाने अपेक्षा वेगळ्या निर्माण केल्या होत्या>>> नंद्या, आटपाट नगर म्हणजे चुकीचा किनारा वाटला का? Wink

तर चित्र वेगळे असते का? >> शक्यता कमीच असते Happy
सुटसुटीत छान लिहीले आहे.
मला उत्सुकता, कोण बर ही आनंदी ?

हम्म्म.....कटु सत्य !
Life is what we live while making other plans. >> हे सही.
आनंदी जोडपं बदलून >> किरण Lol

आनंदीचं नाव कैकयी किंवा मंथरा असतं तर तिने आनंदाईला नमवलं नसतं का? मग सिंडीची कथा म्हणजे एक STY झालं असतं. Wink

सिंडे, एक तिर्‍हाईत नजरेने ही कथा मांडली आहेस ती मला आवडली. माझा काही गोंधळ वगैरे झाला नाही. 'आहे त्यात आनंद माना' ही परंपरागत रुजवलेली शिकवण मनावर तरंगायला लागली.

बाकी सगळ्या प्रतिक्रियांत स्वाती२ ची प्रतिक्रिया एकदम परफेक्ट. आनंद बुळ्या आहे, तसे बरेचसे भारतीय नवरे असतात. नको तिथे प्रॅक्टिकल आणि नको तिथे इमोशनल होतात हे. आनंद दोघिंच्यात समन्वय साधू शकला असता. पण बर्‍याच भारतीय नवर्‍यांप्रमाणे आपल्याला काय हवंय आणि त्यासाठी आपण काय करायला हवं हेच त्यांना कळत नसतं.
(रॉकेलचा कॅन आहे हा... Wink )

आनंदी म्हणे, "Trupti, I told myself, either make it or quit it. और अगर इस रिलेशनमे रेहना है तो मुझे खुश रेहना है....इसलिये मैने आनंद को अपने तरीके से मोल्ड कर लिया है..."

आनंद विजयी मुद्रेने म्हणे, "भाभीजी, आनंदी अब बदल गयी है बहोत..."<<<<

हे हे आवडले

आवडली.

आवडली..

आनंद बुळ्या आहे, तसे बरेचसे भारतीय नवरे असतात.>>> हे तुमच्या नवर्‍याच वर्णन का ? ( ह्याला काडी म्हणतात) Wink

सिंडे हे नेहमीच "बायकी" दळण आहे, वेगळ्या शैलीत Happy
प्रतिक्रिया मस्त, भडका कधी उडतो आणि पोळी कधी भाजता येते ह्याच्या प्रतिक्षेत आहेत, असे वाटते Lol

ज्यांना कळली नाही त्यांनी मामींची प्रतिक्रिया वाचावी. मामींनी दोन ओळीत मला काय म्हणायचय ते लिहिलय.

काश सगळ्या कथा याच वळणाने गेल्या असत्या. >>> दिनेशदा तुम्हाला सुद्धा कळलेली दिसत नाहीये कथा.

असो, धन्यवाद सर्वांना.

नंद्या Lol

सिंडरेला, अगदी खरं लिहीलं आहेस ग...तडजोडीवरच उभे आहेत आज अनेक संसार. कधी नवरा तडजोड करतो, तर कधी बायको. बायकांचे प्रमाण जास्त खरं आणि तडजोडीची अपेक्षाही जास्त केली जाते ती बायकांकडूनच Sad

सिंडे,मामींची प्रतिकिया वाचली. तुला तसे म्हणायचे होते का? मला तरी ही कथा दोन शिकलेल्या पण भावी आयुष्याविषयी फारसा विचार न करता लग्न केलेल्या जोडप्याची कथा वाटली. आनंदची आई इथे स्ट्राँग आहे. ती आनंदला आणि पर्यायाने आनंदीला तिच्या इच्छेनुसार वागायला भाग पाडते. पण हे शक्य होते कारण आनंदला स्वतःचे ठाम मत नाहिये. लग्न ठरवण्याआधी स्पष्ट चर्चा झाल्यास समोरच्या व्यक्तीची मते,अपेक्षा कळतात. ती आपल्या अपेक्षांशी जुळतात की नाही ते पडताळून बघता येते. कुठल्या मुद्द्यावर तडजोड शक्य आहे आणि कुठल्या मुद्द्यावर नाही हे लग्नाआधी स्वतःलाच स्पष्ट असणे खूप महत्वाचे. हे जमणार नसेल तर शिक्षणाचा काय उपयोग?
हे आपले माझे मत!

स्वाती२, मध्यंतरी एका विवाह समुपदेशकांशी अनौपचारिक गप्पा चालल्या होत्या तेव्हा त्यांनी सांगितले : आजकाल आम्ही लग्नेच्छुक मुलामुलींना त्यांच्या आवडीनिवडी, जीवनशैली, जात/ समाज / धर्म/ श्रध्दा इत्यादींविषयीची मते - निर्णय, कर्ज गुंतवणुकी व खर्च तसेच आर्थिक व्यवहारांसबंधी मते, करीयर - नोकरी - व्यवसाय इ. विषयी मते, मित्रमैत्रिणींचा किंवा घरच्यांचा प्रभाव ह्या सर्व गोष्टी विचारांत घेऊन, जर त्या जुळत असतील तरच लग्नासाठी पुढे जायचा सल्ला देतो. कारण लग्नाआधी विचारात न घेतलेल्या ह्या बाबी अनेकदा लग्नानंतर समस्येत परिवर्तित होतात व परिणिती सेपरेशन / घटस्फोट किंवा जोडप्यापैकी कोणी एकाने केलेल्या अवास्तव तडजोडीत होते.

अरुंधती,
कधी कधी इतक्या टेक्निकॅलिटीज (म्हणजे अनुरुप घटक तपासूनही) मध्ये सुद्धा things going sour चे प्रमाणही लक्षणीयच असणार का गं. मला तरी विवाहसंस्थेवर कोणाला फारसा तोडगा सापडलाय असे वाटत नाही.
सगळे फारच अनुरुप असले की boredom हमखास गाठणार. तो संसार भयानक असतो. त्यापेक्षा संघर्ष परवडला. (वै. मत)

पूर्णपणे आदर्श, कोणीही एवढीशी तडजोड न करता 'लग्ने' अस्तित्वात असतात? कोण्या एकाने असे मी म्हणत नाहीये. एकाने करुच नये, दोघांनी काळानुरुप, प्रसंगानुरुप करावी. कोणी किती केली त्याचा स्कोर ठेवणे अवघड आहे.

रैनाचे पटले...

अकु, तसही या सगळ्या गोष्टींवरची मते वयाप्रमाणे बदलत राहतातच की.. २४-२५व्या वर्षी लग्न करताना जे वाटतंय तेच २८-३०व्या वर्षी वाटणे अवघड आहे. थोडक्यात गुणमेलन करतात तसं आवडीनिवडी मॅच करुन केलेली लग्ने यशस्वी (???) ठरतीलच असे नाही.

३५-४० वर्षांच्या सहजीवनानंतरही जर एका जोडीदाराला सततच्या भवनिक उपासमार, तडजोडीमुळे दुसर्‍याबद्दल कडवटपणा असेल तर त्याला यशस्वी लग्न म्हणावे का?

कोणी किती केली त्याचा स्कोर ठेवणे अवघड आहे.

>> पण प्रत्येक वेळेला मन मारून कोणा एकाच व्यक्तीला तडजोड करायला लागत असेल तर त्याबद्दलचा उद्रेक कधीतरी बाहेर येणारच असं वाटतं .. दुर्दैवाने आपल्या समाजात more often than not अशी तडजोड स्त्री ने करावी असं शिकवलं जातं किंवा गृहित धरलं जातं .. आता इकडे विषय भरकटेल तेव्हा बास! Happy

येस्स, रैना, चिंगी.... आमची पुढे ह्याही विषयावरून चर्चा झाली.... ''अनुरूप'' म्हणजे नक्की काय? ह्या बेसिकमध्येच अनेक मुलामुलींचा गोंधळ असतो असे त्यांचे मत. (नेहमीचे ठोकताळे : रंग, रूप, शिक्षण, पगार, उंची, घराणे, पैसा, जात, पत्रिका, चष्मा, मंगळ इ. पुढे अनेकदा गाडे जातच नाही, कारण तितका विचार केलेला नसतो.) स्वतःला काय आवडते, स्वतःचे आयुष्यातील महत्त्वाच्या वाटणार्‍या गोष्टींबद्दल काय विचार आहेत हेच कधी थांबून पाहिलेले नसते. आवडीनिवडी, मते इत्यादी बदलत जातात हे मान्य. पण तुम्ही तुमचे आयुष्य कोणत्या तत्त्वांनी / प्रकारे जगता/ जगू इच्छिता ह्याची थोडीफार कल्पना असेल.... त्या दृष्टीने विचार केला असेल, आणि अ‍ॅरेंज मॅरेजमधील इतर अनेक घटकांना तुमच्या लेखी कितपत महत्त्व आहे हे लक्षात घेतले असतील तर त्यातल्या त्यात ते लग्न टिकण्याचे चान्सेस जास्त, असे त्यांच्या पाहण्यात आले.

रच्याकने, आमचे तडजोडीविषयीही झाले बरेच बोलून. त्यांनी तर सरळ सांगितले की, आम्ही मुलामुलींना विचारतो, लग्नानंतर तडजोडीची तयारी आहे का? कारण लग्नात तडजोड ही करावीच लागते. (कसलीच तडजोड न करता टिकलेली लग्ने विरळीच!) कोणत्या ना कोणत्या स्वरूपात, कोणकोणत्या प्रकारे तडजोड करावी लागेल ह्याची दोघांनाही कल्पना असलेली बरी असते. तसेच तुम्ही जशी तडजोड करणार आहात तशी तुमच्या घरातील (नव्या) इतर माणसेही ह्या नव्या नात्याशी जुळवून घेणार आहेत. त्यांनाही वेळ द्या. तेही तडजोडच करणार आहेत, हेही समुपदेशक सांगतात.

अकुच्या समुपदेशनाच्या पोस्ट बद्दल
>> दोघही मॅच्युअर असतील तर थिंग्ज कॅन बी वर्कड आऊट.. अ‍ॅज लाँग अ‍ॅज वी नो हाऊ टू अ‍ॅक्सेप्ट द डिफरन्सेस ऑर आर रेडी टू लर्न - लग्न कटकट वाटत नाही... इटस फन टू इवॉल्व/ग्रो टूगेदर..
आणि दोन सख्खी भावंड सारखी नसतात - तर दोन वेगळ्या घरातून आलेली माणसं कशी असतील! आपल्याला खरच काय हवय कळलं आणि दुसर्‍याला वेगळं काही हवं असू शकतं ह्याचा आदर आपण आणि समोरच्यानही ठेवला तर असले प्रॉब्लेम्स कमी येतील..
अर्थात जेव्हा समोरचा सांमजस्य दाखवत नसेल तर जो एक दाखवतोय त्याच्यावर ताण येईल - आणि ह्या चाचपणीकरता हे समुपदेशन उपयोगी पडेल..

कथा वाचून वपुं चे एक वाक्य आठवले,

"संसार म्हणजे काय हो शेवटी ? एक क्षण भाळण्याचा,....... बाकी सांभाळण्याचे !!"

ज्यांना ते सांभाळण्याचे क्षण निभावून नेता आले अन तो भाळण्याचा क्षण ज्यांनी आपल्या आयुष्यात जपून ठेवला हरवू दिला नाही ते खरे भाग्यवान.

http://vimeo.com/22309808 हा व्हीडीओ ही पहा.

तडजोड करावी लागतेच. पण ती केवळ एका बाजूने नसावी. आनंद-आनंदी लहान बाळं नाहीत. बायकोला स्वयंपाक आवडत नाही तर तिच्यावर जबरदस्ती करु नये एवढं भान आनंदला होतं. तसं ते आनंदीलाही होतं. आल्या दिवसापासून ती काही हाताला मेंदी लावून बसली नवह्ती. खायला लाज वाटत नाही तर करायला का असं माझं स्वतःचं मत आहे. पण लोकांना आग्रह करुन बोलवायचं आणि खायला-प्यायला घालायचं तिला नाही आवडत. आनंदला आवडतं. त्याला स्वतःला काही प्रॉब्लेम नव्हता. तो स्वयंपाक इतका जबरी भारी करतो की बास.

आणि सुस्थितीतल्या जोडप्याने क्लिनिंग सर्विस लावली तर त्यात विषेश काय ? घरकाम हे अतिशय बेक्कार काम आहे आणि मला स्वतःला सुद्धा त्याचा फार कंटाळा आहे. पण म्हणून बाई नव्हती तेव्हा घाणेरड्यातेव्हाते दोघे रहात होते असं अजिबात नाही. पण तिकडे मोठ्या सुनेची सुद्धा हिम्मत (?????) नाही बाई लावायची तर ही कोण लावणार हे कुठलं लॉजिक ?

त्या दोघांनाही आपापले स्वभाव अगदी व्यवस्थित माहिती होते. हा गेला आणि लग्न करुन आला अशी परिथिती नव्हती.

पण तडजोड कुणी करायची हे आनंदच्या आईने का ठरवायचे ? आनंदीच्या आई-बाबांनी माफी का मागायची ? हे सगळ्यात महत्वाचं. तेच मला जास्त खटकतं. आणि आता सगळी तडजोड आनंदीने केलीये असं दिसतय जे डोक्यातुन जातच नाहीये काही केलं तरी.

>>>आम्ही बघे !!!

हे काही पटल नाही बघ. गेल्यासरशी आनंदरावांना भाभीजींच्या दोन चार चाबकांचा प्रसाद देऊनच यायच Happy

Pages