आनंदी जोडपं

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

आटपाट नगरात एक जोडपं राहत होतं आनंद आणि आनंदी. गृहलक्ष्मीच्या नावासारखंच आनंदी. आनंदचे घराणे थोर. आनंदी देखील उच्च कुळातली थोरा घरची लेक. थोरल्याच्या जन्मानंतर नवसाने झालेली, लाडावलेली राजकन्याच. उंच, गोरी, देखणी रूपगर्विता. आनंदाईने लाडक्या लेकासाठी शोधून निवडून आणलेली. आनंद आणि आनंदी- लक्ष्मी नारायणाचा जोडा जणू. लग्न करून दूर देशी आली. भले मोठे घर. महाल जणू. घराला दारं-खिडक्याच सतराशे साठ. मोठे अंगण. परसात भाज्या. फुलं अन फळं. आनंदच्या प्रेमात आनंदी मोहरली. आनंदली.

आनंदीला घरकामाची सवय नव्हती. आवड तर नाहीच नाही. स्वयंपाक करणे म्हणजे तिला शिक्षा वाटे. नोकरी निमित्ये मात्या-पित्यांपासून दूर राहिली तरी हाताशी नोकर-चाकर होतेच. तरी नव्या वातावरणाशी जुळवून घेऊ लागली. आनंद कुशल स्वयंपाकी. त्याला खाण्या-पिण्याची-खिलवण्याची भारी आवड. आनंदीला स्वयंपाकाची आवड नाही तरी काही फरक पडला नाही. आनंद होताच. आनंदीच्या प्रेमात.

आनंदीने म्हणावे, घरकामापायी मला श्रम होतात. आनंदने घरकामासाठी बाई शोधावी.

आनंदीने म्हणावे, मला बाट्या जमेना. आनंदने कणीक मळावी.

आनंदीने म्हणावे, घरात बसून मी कंटाळले. आनंदने तिच्या पुढील शिक्षणाची तजवीज करावी.

आनंदीने म्हणावे, भारतात परत जाऊ तर तुझ्या गावी मला मिळेल का काम ? आनंदने बेंगरोली राहू म्हणावे.

आनंदीने म्हणावे, दूर देशी आलोय. इथले जग पाहू. चार ठिकाणं बघू. मगच मुलाबाळांचे ठरवू. आनंदने अनुमोदन द्यावे.

आम्ही बघ्यांनी त्यांच्या प्रेमाची कौतुकं करावी.

~~~

आनंदाईला हे कौतुक सोहळे सहन होईनात की काय न कळे. आनंदाई अजून पट्टराणी होती, घरचा सगळा कारभार स्वतः चालवत होती. थोरली सून- दोन लेकांची आई- अजून पट्टराणीच्या हुकुमात होती. मग आनंदी अपवाद कशी ? आनंदीकडे कामाला बाई येते, आनंदी उच्च शिक्षण घेते, आनंदी नोकरी करणार म्हणते, इतक्यात मूलबाळ नको म्हणते, आनंदी भारतात परत गेल्यावर परराज्यात स्वतंत्र राहायचं म्हणते ? हे चालणार नाही. आनंदाईने आपली नाराजी लेकाच्या कानी घातली. आनंद बिथरला. आनंदी बिथरली.

आनंद म्हणे, आपण बेंगलोरी नाही राहायचा. आनंदी म्हणे, जमणार नाही.

आनंद म्हणे, तिथे घरी राहून आईची सेवा करायची. आनंदी म्हणे, मुळीच नाही.

आनंद म्हणे, रांधा-वाढायला शिकावे लागेल. आनंदी म्हणे, मला आवडत नाही.

आनंद म्हणे, घरीच तर आहेस काय एवढे श्रम तरी. आनंदी म्हणे, तुझ्या घरची न्हाणीघरं आवरायला मी लग्न करून आले नाही.

आनंद म्हणे, खानदान की रोशनी वाढवायलाच हवी. आनंदी मान फिरवे.

ही अशी कशी थोरा घरची लेक ? उलटी उत्तरं देते. आनंदाई म्हणे हिने माझी माफी मागावी. हिच्या आई-बापाने माझी माफी मागावी. ही अशी बीन-वळणाची कार्टी त्यांनीच तर मोठी केली.

आम्ही बघ्यांनी उभयतांच्या समजुती काढाव्यात.

~~~

आनंदी म्हणे, "Trupti, I told myself, either make it or quit it. और अगर इस रिलेशनमे रेहना है तो मुझे खुश रेहना है....इसलिये मैने आनंद को अपने तरीके से मोल्ड कर लिया है..."

आनंद विजयी मुद्रेने म्हणे, "भाभीजी, आनंदी अब बदल गयी है बहोत..."

...आनंदी दोन मुलांची आई आहे, आनंदीने नोकरी सोडली, आनंदीकडे आता बाई येत नाही, आनंदी बाट्यांसाठी कणीक स्वतःच मळते आणि आनंदी सासरी एकत्र कुटुंबात राहायला तयार आहे.

आनंदी जोडपे आटपाट नगरात सुखाने नांदते आहे.

आम्ही बघे !!!

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

आवडली Happy

इसलिये मैने आनंद को अपने तरीके से मोल्ड कर लिया है..>>>>> इथला आनंद म्हणजे "हॅपीनेस" ह्या अर्थानी आहे का? थोडक्यात कशात आनंद वाटतो किंवा वाटून घ्यायचा त्याच्या व्याख्या बदलल्या असं का?

दोन्ही. थोडक्यात ती स्वतःचीच समजूत घालते आहे. आनंद (इथे तिचा नवरा) बदलला आहे असं वाटत तरी नाही.

I told myself, either make it or quit it. और अगर इस रिलेशनमे रेहना है तो मुझे खुश रेहना है....इसलिये मैने आनंद को अपने तरीके से मोल्ड कर लिया है..." >> ह्या वाक्यातच आलंय सगळं. समजूत आणि तडजोड. दुसरं काय?

>>>इस रिलेशनमे रेहना है तो मुझे खुश रेहना है....इसलिये मैने आनंद को अपने तरीके से मोल्ड कर लिया है..."
आनंद विजयी मुद्रेने म्हणे, "भाभीजी, आनंदी अब बदल गयी है बहोत..."

यातंच सगळं आलं. कठीण आहे!

नहणीघर की न्हाणीघर >>> नहाणे असा शब्द आहे (आहे ना ? :अओ:) म्हणून मला वाटलं नहाणी घर बरोबर असेल. शब्दार्थ वर विचारते.

.इसलिये मैने आनंद को अपने तरीके से मोल्ड कर लिया है...">>>
माझा गोंधळ झालाय. "आनंद" जर दोन्ही अर्थाने वापरल असेल तर (१. हॅपीनेस,२. नवर्‍याचे नाव) "नवर्‍याने" बदलणे इथे अभिप्रेत आहे ना? तिच्या इच्छेनुसार तो बदलला असेल तरच ती "अपने तरिकेसे मोल्ड" अस म्हणणार ना?

सीमा, तू बरोबर लिहीलंस .. मला त्यामुळेच ते त्रोटक वाटलं किंवा काहितरी अपूर्ण वाटलं किंवा माबुदोस म्हणजे नीट कळलं नाही असं वाटलं ..

सीमा, तिने तडजोड केली आहे मात्र तिने माझी (आणि स्वतःची) अशी समजूत घातली आहे की तो बदललाय.

न्हाणीघर असा शब्द आहे...

>> हो, मराठीत 'न्हाणे' असा आहे बहुतेक शब्द .. (हिंदीत नहाना)

येस्स. "न्हाणीघर" इज राईट. Happy
मला आधी समजलीच नव्हती कथा. Sad
प्रतिक्रिया वाचून थोडी कळली. पण कंफूजन पुरतं गेलं नाही.

माझं पण सीमा सारखंच confusion झालं..

मला आधी समजलीच नव्हती कथा.
प्रतिक्रिया वाचून थोडी कळली. पण कंफूजन पुरतं गेलं नाही. >>>>> हो माझं पण असंच झालं...:)

कथा वाचून अपेक्षाभंग झाला. शीर्षकाने अपेक्षा वेगळ्या निर्माण केल्या होत्या. Proud
वाचल्यावर आनंदी आनं दगडे ! Proud

Life is what we live while making other plans, असं कुणीसं म्हटलंच आहे.

थेट पोहोचली. सगळ्या आनंदी जोडप्यांची हीच कथा नसते हे नशिब. पण हे चित्रच जास्त करून समाजात (अजूनही) दिसतं हे खरं. कुटुंबाला आनंदी ठेवण्याचा सारा ठेका स्त्रीकडेच दिला आहे जणू. स्वत:चं स्वत्व गमवून मन मारा आणि मग कुटुंबाच्या आनंदातच आनंद माना अशीच अपेक्षा दिसते. Sad

जिथे कुठे आनंदाच्या आया त्याच्या संसारात मधे मधे करतात तिथे आनंदीला मन मारून तडजोड करावी लागते.
स्वतःच्या लेकाचा सुखी संसारसुद्धा बघवत नाही अशा आयांना...आणि त्यांना आई म्हणा!!
धन्य तो लेक आणि धन्य ती त्याची आई.

Pages