गोडा मसाला

Submitted by स्वाती_आंबोळे on 12 April, 2011 - 08:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाव किलो धने
सुके खोबरे १ अर्धुक किंवा १ वाटी सुक्या खोबर्‍याचा कीस
१ वाटी जिरे
१ वाटी पांढरे तीळ
८-१० सुक्या लाल मिरच्या
८-१० लवंगा
८-१० मिरीदाणे
८-१० दालचिनीचे तुकडे
८-१० तमालपत्रे
५० ग्रॅम दगडफूल
१ टीस्पून भरून (heaped) हिंग
अर्धा टीस्पून मेथी
१०-१२ नागकेशर
५-६ चक्रीफुले
१ टीस्पून शहाजिरे
चवीपुरते मीठ

क्रमवार पाककृती: 

खोबरे किसून घ्यावे.
जिरे, किसलेले खोबरे आणि तीळ प्रत्येकी कोरडे भाजून घ्यावे.
कढईत अगदी थोडे तेल घेऊन त्यावर एक एक करून बाकीचे जिन्नस परतून घ्यावेत. धने सर्वांत शेवटी परतावेत.
भाजलेले जिन्नस गार झाले की मिक्सरवर वाटून घ्यावेत.
चवीनुसार मीठ मिसळावे.

अधिक टिपा: 

१. ही पारंपारीक कृती. मी तेल अजिबात वापरत नाही. सगळे जिन्नस कोरडेच भाजून दळते. न्यू जर्सीच्या कोरड्या हवेला फ्रीजबाहेरही महिनोन्महिने उत्तम टिकतो मसाला.

२. सगळे जिन्न्स सगळीकडे मिळतात असे नाही. नाही मिळणार ते (दगडफूल, नागकेशर इ.) ऑप्शनल समजावेत.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुक्या खोबर्‍याचा कीस वापरायचा तर पाऊण वाटी म्हणालीस ना?

आणि क्रमाने म्हणजे वर लिहिलेल्या जिन्नसांच्या क्रमाने का? ज्यात धने सगळ्यात शेवट घालायचे?

स्वाती, गोडा मसाल्याच्या कृतीबद्दल धन्स! Happy मी घरुन आणलेला गोडा मसाला संपून अनेक दिवस झाले, तेंव्हापासून गरम मसाला वापरते आहे. चवीत थोडाफार फरक आहे. पण चालून जातो. ह्या दोन्ही मसाल्यांमध्ये बेसिक फरक काय आहे? कोणी सांगू शकेल का?

गरम मसाल्यात माझ्यामते खोबरं,तीळ नसतात. तसंच दालचिनी,लवंग, मिरी वगैरेचं प्रमाण बरंच असावं. त्यामुळे तो थोडा उग्रही लागतो. गोडा मसाला खोबरं, तीळ ह्यामुळे थोडा सौम्य होत असावा.

धन्स सायो! Happy

मी गोडा मसाला संपल्यापासून गरम मसाल्यातच भरीत बनवते... गोड्या मसाल्यातल्या भरताइतकं ऑथेंटिक लागत नाही ते, पण चव बर्‍यापैकी सारखीच लागते... पण आमटीला मात्र गोडा मसालाच हवा... गरम मसाल्याला त्याची सर नाही... Sad

मी TRS कंपनीचा गरम मसाला वापरते... (इंग्लंडची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे.) छानच आहेत त्यांचेही सगळेच मसाले.

मला नेहमी आईच करुन देते. तिचे प्रमाण सगअळे अंदाजे Sad त्यामुळे म्हटलं तरी मला करता येत नाही. या कृतीबद्दल धन्यवाद. आता करुन पाहीन.

बाकी सानीचा प्रश्न पुन्हा. लाल मिरच्या नसलेला मसाला काळा ना?

अंजलीने दिलेल्या माहितीनुसार वर मी दिलेल्या प्रमाणात लाल मिरच्या घातल्या तर तो गोडा मसाला. जर जवळपास धन्यांइतक्याच मिरच्या घातल्या तर तो काळा मसाला.

पाव किलो धने म्हणजे वाटीने मोजायचे झाल्यास साधारण किती? काही अंदाज?
>>
मी काल केला हा प्रयोग घरी . पाव किलो म्हणजे १/३ कप च्या मापाने चार वेळा घालावे लागले धणे / बडिशेप .

हे विकिपिडिया वरून साभार. इथल्या मेझरिंग कपावर साधारणपणे २४० मिलि लिहिलेलं असतं.

एक टी स्पून म्हणजे ५ मिलि
एक टेबलस्पून म्हणजे १५ मिलि

1 U.S. customary cup = 1⁄16 U.S. customary gallon
= 1⁄4 U.S. customary quart
= 1⁄2 U.S. customary pint
= 8 U.S. customary fluid ounces
= 16 U.S. customary tablespoons[nb 2]
= 236.5882365 millilitres[nb 3]

पण ते वाटीच्या आकारावर अवलंबून आहे ना! की भारतातून स्टँडर्ड साईझच्या स्टिलच्या वाट्या नेल्यात तुम्ही? तसे असेल तर धन्य आहात!!! (माझ्यासारख्याच) Proud

माझ्याकडे आहे ते मला तरी साइझ अन शेप मधे लवंग ऑन स्टेरॉइड असं वाटतं . पण वास मात्र अतिशय माइल्ड असतो.

स्वाती, दगडफुल नक्की ५० ग्रॅमच आहे ना? कारण माझ्या पाव किलो धणे आणि ५० ग्रॅम दगदफुलाचे आकारमान समान वाटतेय मला.

हो दगडफूल ५० ग्रॅमच आहे. धने मात्र मोजायला मला वेळ झाला नाहीये. मी वाटीचं प्रमाण सांगितलं ते चुकीचं असावं कारण धने हलके असतात. ते मी नेमकं वजन करून लिहिते लवकर.

स्वाती, रेसिपी बद्दल धन्यवाद. सध्या गरज नाही पण लवकरच करावा लागेल.

इथे दगडफूलाची फार मोठी पॅकेट्स मिळतात. कोणाला हवे असेल तर आपण १/२-१/४ असे वाटून घेऊ शकतो.

व्हईत लिहून ठेवलं मसाल्याचं प्रमाण. मला इकडे करणं अवघडच आहे. हे मिळत नाही , ते मिळत नाही असं करत बर्‍याच जिनसा ऑप्शन मधे जाणार.

मी स्केल घेवून येणार आहे या w/e ला. तंतोतंत माप इथल्या पाउंड आणि OZ च्या प्रमाणात लिहिता येतील मग.
सावनी , आमच्या इथे जवळजवळ सगळे जिन्नस मिळतील यातले. पाठवु का? सांग. उद्या आणुन ठेवीन.

सीमा शाब्बास.
वाटीच्या मापाने हे किती ते किती अश्या भानगडी करण्यापेक्षा वजन करायला एक स्केल आणा आयकियातून, ८-१० डॉलरला मिळेल. स्केल असेल तर मग नंतर केक करायला पण खूप सोपे जाते. Happy

वीकेन्डला मोजले धने. एक आमटीची वाटी शिगोशीग भरून घेतली तर ५० ग्रॅम धने भरतात. म्हणजे पाव किलो धने म्हणजे पाच वाट्या शिगोशीग भरून. बाकीचं प्रमाण वाट्या-चमच्यांतच आहे.

एरवी दुसर्‍या कोणत्या ब्रँडचा गरम मसाला खाववत नाही पण MDH चा रजवाडी गरम मसाला खूप चांगला आहे. >>> मला बाबा कोणात्याच ब्रँडचा मसाला खायला आवडात नाहि. हा आता भाजीतून थोडासा चालेल.

Pages