गोडा मसाला

Submitted by स्वाती_आंबोळे on 12 April, 2011 - 08:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाव किलो धने
सुके खोबरे १ अर्धुक किंवा १ वाटी सुक्या खोबर्‍याचा कीस
१ वाटी जिरे
१ वाटी पांढरे तीळ
८-१० सुक्या लाल मिरच्या
८-१० लवंगा
८-१० मिरीदाणे
८-१० दालचिनीचे तुकडे
८-१० तमालपत्रे
५० ग्रॅम दगडफूल
१ टीस्पून भरून (heaped) हिंग
अर्धा टीस्पून मेथी
१०-१२ नागकेशर
५-६ चक्रीफुले
१ टीस्पून शहाजिरे
चवीपुरते मीठ

क्रमवार पाककृती: 

खोबरे किसून घ्यावे.
जिरे, किसलेले खोबरे आणि तीळ प्रत्येकी कोरडे भाजून घ्यावे.
कढईत अगदी थोडे तेल घेऊन त्यावर एक एक करून बाकीचे जिन्नस परतून घ्यावेत. धने सर्वांत शेवटी परतावेत.
भाजलेले जिन्नस गार झाले की मिक्सरवर वाटून घ्यावेत.
चवीनुसार मीठ मिसळावे.

अधिक टिपा: 

१. ही पारंपारीक कृती. मी तेल अजिबात वापरत नाही. सगळे जिन्नस कोरडेच भाजून दळते. न्यू जर्सीच्या कोरड्या हवेला फ्रीजबाहेरही महिनोन्महिने उत्तम टिकतो मसाला.

२. सगळे जिन्न्स सगळीकडे मिळतात असे नाही. नाही मिळणार ते (दगडफूल, नागकेशर इ.) ऑप्शनल समजावेत.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या कृतीने काल मसाला केला. एकदम सुरेख झाला. सगळीकडे दरवळ पसरला होता.
पाव किलो धने बरोब्बर पाच आमटीच्या वाट्या भरले. सुकं खोबरं थोडं कमी होतं, मी अधिकचं किसून घ्यायचा कंटाळा केला. नागकेशर, चक्रिफूल नव्हते. या पाव किलो धन्यांच्या मापात बरोब्बर 450 gm मसाला झाला. पुरेसं सु.खो. घातलं अर्धा किलो होईल.

कुणाला माहिती असेल तर नाग्केशर्/चक्रीफूल आणि दगडफूल याला कानडीत काय म्हणतात ते सांगाल का? बाकीचे सर्व साहित्य बिग बझारमधे मिळालय. पण या तीन वस्तू तिथे नव्हत्या. आणि मसाल्याच्या दुकानात विचारलं तर हे सामान नक्की कसं दिसतं हे मला माहित नाही. आणि इंग्रजी त्याला समजेना Sad

चक्रीफूल ला इंग्रजीत स्टार अनिस म्हणतात. कोंकणी मधे बायदान / बाद्यान म्हणतात .
नागकेशर हे मोठाल्या लवंगासारखे दिसते . गूगल केलंस तर तिन्हीचे फोटो दिसतील.

नंदिनी, मी इथुन बंगलोर मधुन जेंव्हा हे पदार्थ घेतले तेंव्हा त्यांच्या पाकिटावरती असे लिहिले होते - नागकेशरच्या पाकिटावर - 'maratha moggu' आणि दगड फुलाच्या - 'stone mass'. दगडफुलाला kallu huvu म्हणतात कन्नडा मध्ये - असे गुगल वर सापडले.

धन्यवाद.

चक्रीफूल्,दगडफूल मिळाले. नागकेशर काही मिळाले नाही, त्यामुले ते ऑप्शनला टाकून मग आज हा मसाला करेन.

काल हा मसाला बनवला. मस्तच झालाय. नवरा म्हणे, खूप दिवसानी आमटी खावीशी वाटतेय. रोज रोज सांभार मसाला किंवा गरम मसाला वापरून वैतागला होता.

रेसिपीसाठी धन्यवाद. Happy

याच कृतीने करते फक्त तीळ मात्र भाजताना तडतड सर्वत्र उडतात यावर काही उपाय आहे का?
सगळीकडे तीळ भाजून घ्या लिहिलेले असते आणी तीळ भाजायला घेतले की त्यातले निम्मे उडून ओटा आणी गॅसवर पडतात ते वाया जातात

छान पाकृ!
पुढल्या दीर्घ वीकांताला करुन पाहतो.

गोडा मसाला. व्वा! आम्ही मध्यंतरी आमची खास रेसिपी असलेल्या गोड्या मसाल्याचा घरगुती व्यवसाय सुरु केला होता. पण चव, दर्जा सगळं उत्तम असून फार ग्राहक मिळाले नाहीत. आम्ही सर्वच उत्कॄष्ट दर्जाचे मसाले व कच्ची घाणीचं शेंगदाणा तेल वापरत होतो. तसेच बाजारातल्या इतर मसाल्यांपेक्षा चार स्टेप ह्यात जास्त, व एकूण २१ घटकपदार्थ असल्याने सगळाच खर्च वाढतो. त्यामुळे किंमत जास्त होती. बाजारातल्या इतर मसाल्यांपेक्षा जास्त किंमत द्यायला जास्त पब्लिक तयार झालं नाही. म्हणून हा गृहौद्योग थांबलाय, असो. पुढे कधी फंडींग आलं तर मोठ्या प्रमाणावर करता येईल... कारण बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याच मसाल्याला आमच्या मसाल्याची सर येत नाही असा फीडबॅक आहे.

कारण बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याच मसाल्याला आमच्या मसाल्याची सर येत नाही असा फीडबॅक आहे >>> तरी ही ग्राहक दोन पैसे जास्त मोजायला तयार नाहीत ?.

ग्राहकांना नाव हवं असतं बहुधा. नाहीतर कसलीतरी क्रेझ, ट्रेन्ड. मधे एकदा इथे शोनू ने नाशिक च्या दगडू तेली मसाल्याबद्दल लिहिले आणि तो वापरून केलेल्या चिकन ची फोटो सहीत रेसिपी पण टाकली. त्या नंतर दतेम म्हणजे हॉट कमॉडिटी झाला होता इथे माबोवर Happy बुवा नाशकाला गेले तेव्हा किलोंनी दतेम च्या ऑर्डरी होत्या त्यांना इथून !! तेव्हा नानाकळा, तुम्हाला परत बिन्नेस चालू करायचा असेल तेव्हा माबोवर रेस्प्या, फोटो टाकायला विसरू नका Happy

https://www.maayboli.com/node/8952 इथे रेसिपी आहे. इथे फोटो दिसत नाहीयेत पण . बाकी सगळी चर्चा , फोटो हे वाहत्या धाग्यांवर , गट्ग फोटोज मधे अशी झाली असावी.

नानाकळा! पॅकेज सॅपल साइझ ठेवुन बघा, एक्दा चव आवडली की लोक जास्त प्रमाणात नक्कि घेतिल.

मै! मला आठवतीये ती चर्चा! दगडु तेली हे आद्य आहेत नाशकात , म्हणजे मसाल्यातल सामान दगडु तेलयाकडे मिळाल नाही अस आजवर कधिही झाल नाही,

दगडू तेली म्हणजे मसाल्याचे नंदनवन आहे. आम्ही सर्व घटकपदार्थ तिथून घेतो. उत्तम प्रतीचा गावठी मध तिथे मिळतो. तिथे मिळणार नाही असे काहीच नाही.

ओके, परत एकदा प्रयत्न करुन बघूया. येत्या मोसमात सॅम्पलसाठी एक्स्ट्रा बनवून घेतो.
कोणाला सॅम्पल हवं असेल त्यांनी कळवण्यासाठी तेव्हा धागा काढेन. .

दालचिनी किती gm घ्यावी? माझ्याकडे हाताच्या बोटाइतके लांब व गोल वळलेले तुकडे आहेत. तसे 8-10 म्हणजे जास्त होतील असं वाटतंय.
तसंच तीळ/जिरे अंदाजे किती gm ?

आज यू ट्युब वर वाटाण्याच्या उसळीची पाकृ पाहिली.
त्यात तिने एक चमचा गरम मसाला आणि दोन चमचे गोडा मसाला टाकायला सांगितले. तेव्हा हा धागा आठवला.

सर्व साधारणपणे गोडा मसाला कुठल्या प्रकारच्या भाज्या / उसळीत वापरावा व गरम मसाला कुठल्या प्रकारच्या, असा काही थंब रुल वगैरे आहे का?
तसेच ऑनलाईन मागवायला कुठला गोडा मसाला मागवावा कुणी सांगू शकेल का? एकदा वापरून बघून मग मोठ्या सुट्टीत घरी करावा असा विचार आहे.

मानव, आमच्याकडे चिंच-गुळाची आमटी, मटकी ची कांदा लसूण न घालता जीरे खोबरे वाटणाची उसळ, वालपापडीची भाजी, गवारीची भाजी, वांगी बटाटा रस्सा,फ्लॉवर बटाटा रस्सा, तोंडलीची रस्सेदार भाजी हा मसाला घालून करतात. मसालेभातातही थोडासा घालतात.

तसेच ऑनलाईन मागवायला कुठला गोडा मसाला मागवावा कुणी सांगू शकेल का? ----?kepra their website. They take delivery charges. I have good experience of product and service.
उसळ, आमटी, भरली वांगी, वांग्याची भाजी, कांदा- बटाटा रस्स, मुगाची खिचडी, घेवडा, गवार, रस भाज्यात सहसा असतो.

Pages