'संयुक्ता' आणि 'सुपंथ' तर्फे मदतीचे आवाहन (महिला दिन २०११)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 6 April, 2011 - 23:47

नमस्कार मायबोलीकर,

८ मार्च ला 'जागतिक महिला दिन' साजरा केला गेला.

मागील वर्षी ह्याच निमित्ताने काही संस्थांना 'सुपंथ' च्या मदतीने आपण देणगी गोळा करुन दिली होती. ह्या वर्षी पुन्हा तोच कार्यक्रम करत आहोत.

'सुपंथ' च्या सदस्यांनी पुन्हा मदत करायची तयारी दर्शवली आहे. (त्या बद्दल त्यांचे मनापासुन आभार).

३० एप्रिल २०११ पर्यंत देणगी गोळा करुन ती २ संस्थांना देण्याची योजना आहे. ही देणगी रोख रक्कम किंवा संस्थेला उपयुक्त अशा भेटवस्तुच्या स्वरुपात देण्याचा विचार आहे. संयुक्ताच्या काही सदस्यांनी काही संस्थांना भेटी दिल्या व त्यानुसार सध्या निवडलेल्या २ संस्था.

१) पुण्यातील कोथरुड येथील अंध मुलींची शाळा - ह्या मुलींना काही अतिआवश्यक गोष्टींची सतत गरज पडत असते त्यामुळे ह्याही वर्षी त्यांना मदत देण्याचे ठरवत आहोत.

अंधशाळेची थोडक्यात माहिती :

पूना स्कूल अ‍ॅन्ड होम फॉर ब्लाईन्ड गर्ल्स, कोथरूड, पुणे (पुणे येथील मुलींची अंधशाळा व वसतिगृह) ह्या संस्थेत सध्या ५ ते ३५ वयाच्या एकूण १६० मुली / स्त्रिया दाखल आहेत. ह्या दृष्टीहीन मुलींना अंधशाळेतून शिक्षणाबरोबरच स्वावलंबनाचे धडे मिळतात. त्यांना ब्रेल लिपीचे शिक्षण दिले जाते. १८ व त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलींना बांबूकाम, मेणबत्त्या तयार करणे, विणकाम, शिवणकाम, पुस्तक बांधणी इत्यादी उपयुक्त व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येते, जेणेकरून मुलींना उत्पन्नाचा मार्ग खुला होतो व समाजात त्या आत्मसन्मानाने जगू शकतात. या मुलींच्या शिक्षणाचा व अन्य खर्चाचा भार पेलण्यासाठी अंधशाळा कायमच लोकांकडून मिळालेल्या मदतीचे स्वागत करते.

२) सावली सेवा ट्रस्ट - ही पण संस्था पुण्यात आहे. त्यांची संस्था वेश्या वस्तीतील मुलांसाठी मुख्यत्वे काम करते. त्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मदत गोळा करणे, विशेष प्रयत्न घेणे इत्यादी.
ही सावली कडुन मिळाले माहिती थोडक्यात,

''तळागाळातील मुलामुलींच्या आयुष्यात सुधारणा घडवून आणणे व त्यांना शिक्षणाची सुसंधी उपलब्ध करून देणे ह्यासाठी सावली सेवा ट्रस्ट काम करतो. २०१० ते २०११ दरम्यान ट्रस्टने पुण्याच्या बुधवार पेठेतील वेश्यावस्तीतील १०० मुलांची शैक्षणिक जबाबदारी उचलली असून त्यात त्यांना वेगवेगळ्या शाळा व वसतिगृहांत दाखल करण्याचा अंतर्भाव आहे. लोकांकडून ह्या मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी मदतीची अपेक्षा आहे. त्यात या मुलांचे गणवेष, शालेय साहित्य, शैक्षणिक शुल्क, वसतिगृह व खानावळ खर्च, वैद्यकीय खर्च अशा तर्‍हेच्या सर्व खर्चांचा समावेश आहे. अशा मुलांचे पालकत्व पत्करून आमची संस्था त्या मुलांना चांगले व जबाबदार नागरिक बनण्यासाठी मदत करते. जर त्यांना तसेच वार्‍यावर सोडले तर समाजातील कुप्रवृत्तींना बळी पडून ही मुलेही वाईट मार्गाला लागतात आणि परिणामी समाजालाही घातक ठरतात.

सध्या ट्रस्ट विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आहे व ह्या मुलांसाठी तूर्तास अशा प्रकारची मदत उभारत आहे. ट्रस्टची स्वतःची शाळा, वसतिगृह उभी राहिल्यावर अधिक चांगल्या प्रकारे ह्या मुलांना मदत करता येईल.

Ours is a regular registered Trust (No. E-5079 Pune) with permanent 80-G.

५००० रूपयांमध्ये एका मुलाचा शैक्षणिक साहित्य खर्च + स्कूल फीज असे वार्षिक खर्च भागवता येतात.''

त्यांच्याकडे सध्या इयत्ता १० वीला जाणारी १६ मुले आहेत, इयत्ता ८ वीला जाणारी १३ मुले आहेत.
आपल्या इच्छेप्रमाणे आपण या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करू शकतो.

'अरुंधती कुलकर्णी' ह्यांचे मनापासुन आभार. त्यांच्यामुळेच 'सावली' बद्दल माहिती मिळू शकली.

ही योजना सर्वांकरता खुली केली तर जास्त रक्कम जमा होईल या हेतूने सर्व मायबोलीकरांना मदतीचे आवाहन करत आहोत. ३० एप्रिल २०११ पर्यंत तुम्ही देणगीची रक्कम पाठवू शकता.

पैसे पाठवण्याबाबत माहिती-

रुपयांत रक्कम कृपया सुपंथ च्या बँक खात्याला पाठवा. त्यावर मेमो मधे 'महिला दिन' असे लिहावे. खाते क्रमांक वगैरे बद्दलची माहिती खाली आहे.

Account holder name : Kedar Joshi
Bank : ICICI
Branch : Shivajinagar, Pune
Account number : 003901032042

जर डॉलर्स मधे रक्कम पाठवणार असाल तर कृपया केदार जोशी (मायबोली नाव 'केदार') ह्यांना ईमेल करावे व त्यांच्याकडुन त्यांचा घरचा पत्ता घेऊन तिथे डॉलर्स मधे चेक पाठवावा. केदार ते पैसे सुपंथ च्या खात्यावर जमा करतील. त्यावर पण 'महिला दिन' असे लिहावे.

गेल्या वर्षी संयुक्ताने या उपक्रमांतर्गत जवळपास ५४००० रूपयांचा निधी जमा केला. याचा विनीयोग कोथरूडमधील मुलींची अंधशाळा व सुमती बालवन यांना रोख देणगी देण्यासाठी तसेच आवश्यक वस्तू देण्यासाठी करण्यात आला. गेल्यावर्षीच्या या उपक्रमाबद्दल इथे वाचायला मिळेल.

'सुपंथ' बद्दलची ही लिंक पहावी -

कृपया नोंद घ्या :

१. ज्यांना सुपंथच्या खात्यात पैसे जमा करून देणगी द्यायची आहे ते तशी देऊ शकतात. मात्र सुपंथ अद्याप नोंदणीकृत नसल्याने त्यांना टॅक्स सवलतीसाठी पावतीचा लाभ घेता येणार नाही.

२. देणगीदार थेट त्या संस्थेला चेक पाठवू शकतात व त्या चेकची पोच मायबोली सुपंथ २०११ च्या धाग्यावर देऊ शकतात. पावतीची जबाबदारी ही अशा परिस्थितीत पूर्णत्वे त्या संस्थेची असेल. संयुक्ता/ मायबोली किंवा सुपंथ त्यासाठी जबाबदार राहणार नाही.

३. टॅक्समध्ये सवलत ही भारतातील लोकांना रूपये ५००० व त्यावरील देणगीसाठी मिळते.

दोन्ही संस्थांचे पत्ते :

पूना स्कूल अ‍ॅन्ड होम फॉर ब्लाईन्ड गर्ल्स
गांधी भवन शेजारी, कमिन्स इंडिया लिमिटेडची पिछाडी,
कोथरूड, पुणे ४११०३८.
फोन : ०२० २५३८४५८९.
अंधशाळा रजिस्ट्रेशन क्रमांक : F18695.

सावली सेवा ट्रस्ट
रजिस्ट्रेशन क्रमांक : E-5079 (पुणे)
मृणालिनी भाटवडेकर.
पत्ता : ई १००४, ट्रेझर पार्क, संतनगर, पर्वती, पुणे - ४११००९.
संपर्क क्रमांक : ९८२३२७०३१०

अधिक माहितीसाठी इथे प्रश्न विचारले तरी चालतील. सर्वांना ह्या उपक्रमात सहभागी होण्याचे पुन्हा एकवार आवाहन!

धन्यवाद!!!
-संयुक्ता.
(अधिक माहितीसाठी - सुनिधी किंवा अरुंधती कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा किंवा इथे आपले प्रश्न लिहावे.)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदार तू नंतर लिहिलेल्या पोस्टमध्ये मी ट्रान्सफर केलेल्या पैश्यांची नोंद दिसतेय (D Y GOKH). धन्यवाद पोच दिल्याबद्दल.

02/05/2011 NEFT-CITIN11117318891-ANIRUDDH CR INR 2,500.00 >>> धन्यवाद केदार, आम्ही ट्रान्सफर केलेले पैसे जमा झाल्याची पोच दिल्याबद्दल. Happy

रैना पैसे मिळाले.

वरील तक्त्यात फक्त एक बदल गेल्या दोन दिवसात झाला आहे तो म्हणजे रैनाचे ट्रॅन्झॅक्शन.

धन्यवाद केदार.
केदार- एक फायनल तक्ता टाकशील का प्लीज (चेक्स आणि अकाऊंट ट्रान्सफर मिळून

तसेच येतील सर्व अकाऊंट डिटेल्स उडवायचे का आता ?

हा ऊपक्रम यशस्वीरित्या पार पडला. ज्या सर्वांनी ह्यात मदत केली त्या सर्वांचे मनापासुन आभार.

अंतीम हिशोब असा आहे.
एकुण रक्कम जमा झाली >> रुपये ५६८१०.

१. अंधशाळेला ज्या वस्तु देण्यात आल्या त्यांची किंमत आहे >> रुपये ३६०००
२. वस्तु अंधशाळेला पोचवण्यासाठी आलेला खर्च आहे >> रुपये ८१०.
३. सावली ट्रस्टला दिलेली रक्कम आहे >> रुपये २००००. ह्यामुळे ह्या वर्षी ४ मुलांच्या शिक्षणाचा व इतर सर्व खर्च ह्यातुन निघु शकेल व त्यांच्या प्रगतीचा आलेख पण कळु शकेल.

तर असे ५६,८१० रुपये ह्या उपक्रमाअंतर्गत जमा झाले व त्यातुन २ संस्थेला मदत करता आली.

संयुक्ता तर्फे आपणा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद!!!

ही मदत अंधशाळेला व सावली सेवा ट्र्स्ट पर्यंत पोचण्याकरता बर्‍याच जणींनी लष्करच्या भाकर्‍या न समजता , घरचे कार्य समजून कष्ट केले. त्या सगळ्यांचे कौतुक. अतिशय अभिनंदनीय कामगिरी

हातभार लावलेल्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन. तिथे प्रत्यक्ष काम केलेल्या लोकांनी नेटाने कार्य सिद्धीस नेले त्यांचे विशेष आभार.

Initiative/जमाखर्च- सुनिधी
Due Diligence आणि पर्याय शोधणे- अरुंधती कुलकर्णी आणि सुनिधी
विशेष मदत- केदार
देशोदेशीच्या 'संयुक्त' देणगीदारांची नावे- वर आलीच आहेत
धावपळ आणि माल योग्यरित्या सुपुर्द करणे- सुजा, केश्विनी, अरुंधती कुलकर्णी, अरुंधतीचे कुटुंबिय, सायली
देणगीदारांना पावत्या पोचविणे- अरुंधती कुलकर्णी
विशेष आभार- 'मायबोली', 'संयुक्ता' आणि 'सुपंथ'
_________________
सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि कौतुक. एक उपक्रम चालवायला किती जणांचे हात लागतात खरेच.

सावली सेवा ट्रस्टने मायबोली.कॉम च्या संयुक्ता सुपंथ परिवाराला दिलेले हे आभारपत्र :

पान क्र. १

viewer (1).png

पान क्र. २

viewer (2).png

तसेच अंधशाळेच्या अ‍ॅडमिन बाईंनीही शाळेला मिळालेल्या वस्तूरूप देणगी बद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. संयुक्ता सुपंथ परिवाराने शाळेच्या वसतिगृहात राहणार्‍या १२० मुलींना वर्षभर पुरतील इतक्या वैयक्तिक स्वच्छता - आरोग्यासाठीच्या वस्तू पोचविल्या. त्यांबद्दल आभार व्यक्त करताना अ‍ॅडमिन बाई म्हणाल्या :

''जितकं अन्नाचं डोनेशन महत्त्वाचं आहे तितकंच तुम्ही ज्या वस्तू देताय त्यांचं डोनेशन महत्त्वाचं आहे आमच्या मुलींसाठी!! आम्ही तुमच्या या डोनेशनबद्दल लोकांना सांगणार आहोत उदाहरण देऊन.... अनेक डोनर्सना अशा प्रकारचे डोनेशन देण्याची, स्पेशली व्यक्तिगत स्वच्छतेविषयीच्या ह्या नाजूक वस्तू डोनेशनमध्ये द्यायची कल्पनाच रुचत नाही. पण अंधशाळेतील मुलींसाठी ह्या वस्तू फार मोलाच्या आहेत.''

येत्या आठवड्यात अंधशाळेकडूनही मायबोली.कॉम संयुक्ता सुपंथ परिवाराने केलेल्या मदतीबद्दलचे आभारपत्र मिळेल.

काल कोथरुड, पुणे येथील अंधशाळेकडून मायबोलीच्या संयुक्ता सुपंथ परिवारासाठी आपण त्यांना दिलेल्या देणगीबद्दल हे आभारपत्र मिळाले. तेथील अ‍ॅडमिन बाई, प्राचार्या, सेक्रेटरी यांनी आपल्या ह्या उपक्रमाचे कौतुक केले असून मनःपूर्वक सर्व देणगीदारांचे, मायबोलीकरांचे व मायबोलीचे आभार मानले आहेत! Happy

अंधशाळेच्या एका माजी प्राचार्यांचे उद्गार : ''आम्हाला अन्नासाठी डोनेशन्स कायमच येत असतात. परंतु मुलींच्या आरोग्यासाठी, त्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेसाठी आवश्यक वस्तू घेऊन देणारे डोनर्स आम्हाला क्वचितच भेटतात. तुमच्या उपक्रमामुळे आमच्या मुलींची किती सोय झाली आहे ह्याची तुम्हाला कल्पनाच नाही! खूप खूप चांगलं करताय तुम्ही....''

Pages