अडई

Submitted by मिनी on 13 March, 2011 - 21:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप तांदुळ (उकडा असेल तर उत्तम, पण नसेल तर घरात जो असेल तो चालू शकेल.)
१/२ कप चणा डाळ
१/२ कप तूर डाळ
१ चमचा उडिद डाळ
५ लाल मिरच्या (तुमच्या चवी प्रमाणे कमी जास्त करु शकता)
हिंग
बारिक चिरलेली कोथिंबिर
कढीपत्याची पानं
मीठ चवीप्रमाणे

क्रमवार पाककृती: 

१. तांदूळ आणि बाकीच्या सगळ्या डाळी स्वच्छ धुवुन एका भांड्यात साधारणपणे ४-५ तास भिजत घाला. त्याच भांड्यात मिरच्यापण भिजत घाला.
2. ४-५ तासांनी भिजत घालेल्या डाळी + तांदुळ + लाल मिरच्या ह्यांचं मिश्रण ग्रांईंडर मध्ये वाटुन घ्या. वाटतांना त्यात हिंग, कढीपत्त्याची पानं आणि मिठ घाला. खूप बारीक वाटू नका, थोडसं जाडसर ठेवा.
३. वाटलेल्या पीठात बारिक चिरलेली कोथिंबिर घाला. आणि तव्यावर डोसे घालतो त्यापेक्षा थोडं जाडसर अडई घाला.

हा फोटो:

Adaai.JPG

वाढणी/प्रमाण: 
वर दिलेल्या प्रमाणामध्ये ह्या फोटोतल्या साईज सारखे साधारण ११-२२ होतात.
अधिक टिपा: 

१. तव्यावर मिश्रण टाकल्यावर कडेने थोडं तेल सोडलं की क्रिस्पी होतात अडई.
२. http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/116302.html?1200915323 इथे जुन्या मायबोलीवरच्या रिसिपीज आहेत. पण प्रमाण वेगवेगळं आहे.
३. नारळाच्या चटणी बरोबर एकदम मस्त लागतात.
४. मुळच्या रेसिपीमध्ये मेथीचे दाणे नव्हते, पण मी १ चहाचा चमचा मेथीचे दाणे पण वापरले.
५. ह्यात फरमेंट करायची गरज नाही. भिजवुन वाटुन लगेच करता येतं.
६. अश्याप्रकारच्या आणि अगदी ह्याच प्रमाणातली रेसिपी अंतरजालावर उपलब्ध असेल तर मला माहित नाही, आज सकाळी माझ्या मित्राने मला ही रेसिपी दिली आणि मी लगेच करुन पाहिलं. आवडली म्हणुन इथे शेअर केली.

माहितीचा स्रोत: 
तेलगु मित्र.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इन्टरेस्टिंग... रात्री झोपताना भिजत टाकते...
एकदा मी सगळी कडधान्य भिजत टाकून आणि मग धिरडी निघण्याइतपतच कणीक आणि तांदळाची पिठी घालून धिरडी केलेली.. छान झालेलं ते पण पण ते पीठ फ्रीजमधे पण(भर थंडीत) आंबलं... जाणकारांनी प्रकाश Light 1 टाकावा

मिनी फोटो अगदी तोंपासु आहे. आणि झटपट आहे रेसिपी.

मी घरात असतील त्या सगळ्या डाळी मिक्स करते. प्रमाण २ वाट्या तांदूळ घेतले तर अर्धी वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी चणा, तूर, मसूर, मूग , सालीसकट मूग डाळ असे एकत्र घेते.म्हणजे सगळ्या डाळी मिळून एक वाटी. कधी कधी जी काही कडधान्यं भिजवलेली असतील ती पण घालते वाटताना. पण हे सगळे नेहमीच्या डोश्याच्या पीठाप्रमाणे मिक्सरवर वाटून आंबवायचं रात्रभर अन दुसर्‍या दिवशी जाडसर दोसे घालायचे.

जुन्या मायबोलीवरच्या रेसीपीत पण तांदूळ व डाळीचे प्रमाण पाहिले तर तांदूळाच्या निम्मे इतर डाळीचे आहे. मी केल्या होत्या मागे तशा प्रमाणात.
हे प्रमाण वापरून पाहिले पाहिजे आता.

हाय मिनू ,
मस्त रेसिपी आहे तुझी..मि काल केलेली अडई, तुझ्या रेसिपीने.
एकदम झकास झाली. थँक्स रेसिपी शेयर केल्या बद्द्ल.( फोटो टाकते नंतर)
सिंड्रेला, फोटो मस्त आहे . (डाळीचा वास आला नाही Happy )

मिनी, आज शेवटी अडई घडली. मस्तच लागली चवीला. आणि सोप्पीही आहे खूप. आंबवणं वगैरे खटाटोप नाही. वरचेवर केली जाईल असां आत्त्तातरी वाटतंय.

बायदवे, सिंडी, तूरडाळीचा जळल्याचा वास वगैरे नाही आला. तांदूळ भरड वाटल्याने मस्त रवाळ लागली.

>>तांदूळ भरड वाटल्याने
सायो, हे इंटेंशनली भरड का? माझ्या मिक्सरमधून तर उकड्या तांदूळ बारीक झालाच नाही. त्यामुळे हे आढे जरा खडबडीत झाले.

मिनी तु ही कृती लिहील्यापासून आठवड्यात एकदातरी करतेय.
वरचे दोन्ही फोटो सुरेख!! सिंडे सालीसकट डाळीची आयडिआ मस्त आहे, पुढल्या वेळेस तसे करुन पाहीन.

मी हा प्रकार दक्षिणी मैत्रिणीच्या सौजन्याने खुप खाल्लाय पण केला नाही कधी. इतक्याजंणींचे अभिप्राय वाचुन हुक्की आलीच व शेवटी आज भिजवत टाकल्यात डाळी. सिं., पुणेकर - तुमच्या फोटोंनी हे काम मोठ्या प्रमाणात केले Happy ...
माझा मोठा प्रॉब्लेम म्हणजे माझ्या मिक्सर मधे चटण्या गंधासारख्या होतच नाहीत. खलबत्त्यामधुन कुटून करावी का विचार करत आहे म्हणजे भरड राहिली तरी चव असते. सिं, तुझ्या हिरव्या चटणीत कायकाय घातले आहेस?

अरे खरच - दुसरी चट्णी का कट्ली कोण जाणे ....
मस्त झाला प्रकार्.... ब्राउन राईस आणी साली सकट डाळ घातल्या मुळे - पौश्टीक....

माझ्या तमिळी मैत्रिणीने दिलेल्या प्रमाणानुसार एक कप तांदूळ, पाऊण कप तूरडाळ, तुर डाळीच्या अर्धी चणा डाळ आणि मूठभर उडद डाळ घालून करते मी नेहमी. आता बाकीच्या डाळी घालूनपण बघेन. Happy

मिनी, वीकेंड ला अडई केले (केल्या?) (काय नक्की?)

छान झाले .. झटपट, सोपा पदार्थ आहे नक्कीच .. मीही तूर आणि मुग डाळच वापरली ..

वर कोणीतरी लिहीलं आहे त्याप्रमाणे थोडे ड्राय वाटले पण तांदळाच्या प्रमाणात डाळींचे प्रमाण थोडं जास्ती असल्यामुळे आणि/किंवा उडीद डाळ कमी असल्यामुळे असेल .. पुढच्यावेळी मी हिरवी मिरची आणि आलं घालून करून बघेन ..

उकडा तांदूळ नसल्यामुळे की काय पण घरी वाटलं ब्लेंडर वर की तांदूळ खरखरीत राहतो (स्मूथ वाटला जात नाही) असा माझा अनुभव आहे ..

नाही गं, मला डोसा कुरकुरीत आवडतो पण घरी नेहेमीचा तांदूळ वापरून केलं की खरखरीत लागतं ते नाही आवडत मला .. विकतचं आणलं की मस्त गुळगुळीत असतं तसं घरी होतंच नाही ..

सिं, Happy

मी पण केले हं. छान लागले.
दमले होते म्हणुन कुटाकुटी करायचा कंटाळा आला होता. तरीही काहीतरी करायचे म्हणुन मिक्सर मधे एवढीशीच जाडीभरडी खोबर्‍याची चटणी केली आणि नेमकी ती मस्त झाली त्यामुळी घरातील बालगोपाळ (१) व वडिलधारे (१) पुन्हापुन्हा ती मागु लागल्यावर पंचाईत झाली Happy .. मग आदल्या दिवशी केलेली रंगीत ढबु मिरचीची च. पण छान झाली होती तीच दिली.... पुराण समाप्त. Happy

मिनी धन्यवाद.

मीही केल्या अडई. मस्त झाल्या. मला वाटलेल्या तशा कोरड्या अजिबात झाल्या नाहीत. लाल मिरचीमुळे रंगही मस्त लाल आला. परत परत करण्याजोगा पदार्थ.

Pages