महिला दिन २०११ - स्त्रीमुक्तीच्या माझ्या कल्पना (खोखो - १.१)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 10 March, 2011 - 01:28

स्त्रीमुक्तीच्या माझ्या कल्पना (खोखो १)

कृपया स्वतःला खो मिळाल्याशिवाय लिहू नये. तुम्हाला लिहायची इच्छा असल्यास तुम्ही खो मागू शकता. प्रत्येकाने खो शिवाय लिहिले तर संपूर्ण उपक्रम गोंधळाचा होईल. हे या खेळाचे नियम आहेत ते पाळून सहकार्य करावे. खो घेण्याची इच्छा असूनही खो मिळाला नाही तर शेवटच्या दिवशी तुम्हाला आपले मत मांडण्याची संधी नक्कीच मिळेल.

संयोजक खो (१) अरुंधती कुलकर्णी
अरुंधती खो (१)- मानुषी , अरुंधती खो (२)- हिरकु (मुदतवाढ)
मानुषी खो (१) - वर्षू नील मानुषी खो (२) - चिनूक्स
हिरकु खो (१)- मामी, , हिरकु खो (२)- टण्या
टण्या खो (१)- ऋयाम, टण्या खो (२)- पराग
मामी खो (१)- ठमादेवी, मामी खो (२)- अश्विनीमामी
ठमादेवी खो (१) - डॉ. कैलास गायकवाड ठमादेवी खो (२) - मवा
अश्विनीमामी खो (१) - आशूडी अश्विनीमामी खो (२) - पौर्णिमा
आशूडी खो (१) - प्राची आशूडी खो (२) - शैलजा
शैलजा खो (१) - सायो शैलजा खो (२) - मिनोती
पराग खो (१)- anudon, पराग खो (२)- मो
सावली खो (१)- मंजिरी, सावली खो (२) आश्चिग)
सायो खो (१) अनिलभाई, सायो खो (२)- स्वाती_आंबोळे
मिनोती खो (१) सावली, मिनोती खो (२)- लाजो/ बित्तूबंगा

पौर्णिमा खो (१) - अरभाट पौर्णिमा खो (२) - प्राजक्ता_शिरीन / ज्ञाती.
बित्तूबंगा खो (१) - rar बित्तूबंगा खो (2) - नीधप
मंजिरी खो (१) - केपी मंजिरी खो (२) - प्रॅडी
अरभाट खो (१) - मनीष अरभाट खो (२) - बेफिकीर
अस्चिग खो (१) - अरुंधती अस्चिग खो (२) - चंपक
मो खो (१) - विनायक मो खो (२) - प्रिंसेस
बेफिकीर खो (१) - जुई/ सानी बेफिकीर खो (२) - भाऊ नमसकर/ प्रसाद गोडबोले
प्राजक्ता_शिरीन खो (१) - वत्सला प्राजक्ता_शिरीन खो (२) - आस
प्रसाद गोडबोले खो (१) - भुंगा प्रसाद गोडबोले खो (२) - चैतन्य दीक्षित/ जामोप्या
मनीष खो (१) - मयुरेश मनीष खो (२) - असामी
आस खो (१) - अवल/ जागू आस खो (२) - पक्का भटक्या/ जिप्सी
वर्षू नील खो (१) - बागेश्री देशमुख
लाजो खो (१)- स्मिता गद्रे/शुभांगी कुलकर्णी/ Dipti Joshi (डोंबिवली)
लाजो खो (२)- विशाल कुलकर्णी / श्री/ UlhasBhide
सानी खो (१) - आशुचँप सानी खो (२) - मंदार जोशी
UlhasBhide खो (१) - भरत मयेकर
प्रिंसेस खो (१)- सीमा/ लाजो प्रिंसेस खो (२) - चिमण/ मार्को पोलो
श्री खो (१) - प्रीत/ दीपा श्री खो (२) -वळसंगीकर/ मल्लि
प्रीतमोहर खो (१) - ज्योती_कामत
ज्योती_कामत खो (१)- प्रज्ञा९ ज्योती_कामत खो (२) -स्वाती२
प्रज्ञा९ खो (१) - नंदिनी/ बस्के प्रज्ञा९ खो (२) - प्रज्ञा१२३/ भ्रमर
स्मिता गद्रे खो (१)- कविता नवरे
बस्के खो (१)- राजकाशाना बस्के खो (२) - सई केसकर
मंदार जोशी खो (१) - मी_आर्या मंदार जोशी खो (२)- गिरिकंद

खो २ - http://www.maayboli.com/node/24210

खो ३ - http://www.maayboli.com/node/24212

खो ४ - http://www.maayboli.com/node/24211

प्राची | 9 March, 2011 - 11:56
स्त्रीमुक्ती म्हणजे नेमकं काय? स्त्री मुक्तीची चळवळ नक्की 'स्त्री' ला कशापासून 'मुक्ती' मिळवून देण्यासाठी सुरु झाली? पुर्वापार चालत आलेली बंधनं, जोखडं झुगारून देऊन स्त्रीला तिच्या मनाप्रमाणे वागण्याचा, तिच्या इच्छा, स्वप्नं पूर्ण करायचा हक्क मिळावा. त्याही पुढे जाऊन एक माणूस म्हणून तिच्याकडे बघितले जावे, एक माणूस म्हणून तिच्या मर्यादा, तिच्या क्षमता यांकडे बघितले जावे. यासाठी ही चळवळ होती.
ही चळवळ सुरु झाली तेव्हा स्त्रियांची परिस्थिती अत्यंत बिकट होती. चळवळीने हळूहळू जोर पकडला आणि आता काही प्रमाणात ही परिस्थिती बदललेली आहे. माझे काही अनुभव मला हेच सांगून जातात.

मी लहानपणापासून काहीश्या secured वातावरणात वाढले. आईवडलांनी आम्हां दोघी बहीणींना वाढवताना कधीही मुली म्हणून वेगळे नियम्/निकष लावले नाहीत. नातेवाईक वगैरेंकडूनही त्या प्रकारची वागणूक मिळाली नाही. लग्नानंतरही बायकोला एक वेगळे आकाश देणारा नवरा मिळाला, सुनेकडून त्याच त्या जुन्या अवास्तव अपेक्षा न ठेवणारे सासर मिळाले. त्यामुळे, मला कधीच झगडावे लागले नाही. पण हळूहळू आजूबाजूच्या इतर बायकांच्या रोजच्या लढाया बघून मला जाणवले की सगळेच एवढे नशीबवान नसतात. या बायकांसाठी आपण काही करू शकलो तर.... हा विचार मनात यायचा. AWWA (Army Wives Welfare Association)ची सदस्य म्हणून काम करताना मी काही प्रमाणात बायकांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करू शकले/ शकते.

आता माझे काही अनुभव सांगते.

अ)अनुभव जे मला अस्वस्थ करून गेले.
१. युनिटमधल्या जवानांच्या बायकांना 'आर्मीने त्यांना दिलेले हक्क/सुविधा' याविषयी एक भाषण ठेवले होते. नियमानुसार नवर्‍याचा पगार ज्या अकाउंट्मध्ये जमा होतो, ते नवरा-बायकोचे जॉइंट अकाउंट असावे. 'किती जणींचे जॉइंट अकाउंट नाहीये?' या प्रश्नाला ९५% बायकांचा हात वर होता. त्यात अगदी रिटायरमेंटला पोहोचलेल्या जवानांच्या बायकाही होत्या. "क्या करना है अकाउंट? वोही पैसा निकालके लाते है बँकसे." अशी उत्तरे मिळाली. हे अगदी अपेक्षित होतं. पण त्या ९५% मध्ये काही ऑफिसरच्या बायकाही (उच्चशिक्षित) होत्या, हे पाहून मी थक्क झाले.
२. नवरा पगाराचे पैसे दारूत उडवतो, मारहाण करतो. ह्या तक्रारी नेहमीच्या आहेत.

ब) अनुभव जेव्हा मला अत्यंत चीड येते.
१. समान हक्काची भाषा करतानाच जेव्हा काही स्त्रिया आपण स्त्री आहोत म्हणून झुकते माप मिळावे अशी अपेक्षा ठेवतात. केवळ स्त्री आहोत म्हणून रात्रपाळी करणार नाही, जास्त वेळ ऑफिसमध्ये थांबणार नाही, अंगमेहनतीची कामे करणार नाही, खडतर पोस्टींग्ज घेणार नाही अश्या अटी घालणार्‍या बायका पाहते. तेव्हा खूप राग येतो.
२. स्त्रियांवर होणार्‍या अत्याचारांना आळा घालण्यासाठी जे कायदे आहेत त्यांचा गैरवापर करणारे महाभाग पाहिले की संताप येतो.
३. स्त्रीमुक्तीच्या अतिरेकी संकल्पना बाळगणार्‍या स्त्रिया.

क) अनुभव जे मला सुखावून गेले
१. मी एका छोट्या गावात जन्मले, वाढले. अगदी लहानपणापासून ज्यांना काकी/आज्जी/वहिनी म्हणत आले, त्यांच्यांत झालेले काही बदल मला सुखावून जातात. माझ्या लहानपणी बायका घराबाहेर पडून नोकर्‍या करत नव्हत्या. ज्या करत होत्या, त्यांना कोणत्या परिस्थितीतून जावे लागत असे ते आता लिहित बसत नाही. जास्त कशाला माझ्या आईने घरबसल्या शिकवण्या घ्यायला सुरुवात केली तेव्हा 'नवर्‍याचा पगार कमी पडायला लागला काय?' अश्या टिप्पण्या ऐकाव्या लागल्या. स्त्रीमुक्ती हा शब्द केवळ चेष्टेतच घेतला जायचा. ' कामंधामं नसणार्‍या बायकांचे उद्योग' अशी व्याख्या होती.
पण नुकतेच गावी गेले तर माझ्या सगळ्या या वहिन्या (साधारण चाळीशीतल्या असतील सगळ्या) काही ना काही व्यवसाय करत आहेत. कोणी दुकान चालवतेय, कोणी पापड्/लोणची करून विकतेय, कोणी फराळाचे पदार्थ करून विकतेय, कोणी शिकेकाई, आयुर्वेदिक पावडरींचा व्यवसाय करतेय. एक वहिनी तर ज्वारेच्या लाह्या देशपरदेशात विकते. शिवाय या सगळ्या एकत्र येऊन संस्कार वर्ग चालवतात. नेहमीची भिशी आहेच. इतरही समाजकार्य करतात. सगळ्या मिळून एखाद्या ट्रीपला जातात. व्यवसायातून मिळणारा पैसा घरातही हातभार लावतो, शिवाय त्यांचा आत्मविश्वासही खूप वाढला आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांना घरातून पूर्ण सपोर्ट मिळतोय. मुलांचा, नवर्‍याच्या, सासरच्यांचा. हा बदल नक्कीच स्वागतार्ह आहे.

मला वाटते, जेव्हा प्रत्येक स्त्री स्वतःचा एक स्त्री म्हणून विचार करण्याआधी एक माणूस म्हणून विचार करेल तेव्हाच ती खरी मुक्त होईल.

मवा | 9 March, 2011 - 12:47
अरुंधतीने इतकी छान सुरुवात केली आहे उपक्रमाची की पुढील सर्वच पोस्ट्स चांगल्या आणि विचारप्रवर्तक आल्या आहेत. अश्विनीमामींचे पोस्ट खूप आवडले.
सर्वांचे चर्चिलेले मुद्दे पटलेच आहेत, त्यामुळे आता ते वगळून बाकीचे मुद्दे लिहीते.

स्त्री-मुक्ती हा शब्दच फार मोठा आहे. सगळ्यांनी त्याचा चांगला परामर्श घेतला आहे. आणि ते सगळे 'स्त्री ही आधी एक माणूस आहे' हे अधोरेखित करत आहेत, ते सर्वात महत्त्वाचे. त्यामुळे आता तो प्राथमिक विचार मान्य करुन पुढच्या मुद्द्यांकडे वळू.
(माझ्या लिखाणातील मते शहरी स्त्रियांबद्दलच सिमीत आहेत, कारण खेडेगावातील स्त्रियांविषयी मला निश्चित माहीती नाही.)

१. आपल्या स्वतःच्या बाबतीत घडणार्‍या घटना / निर्णय घेणे हे आपण स्वतःसाठी करु शकतो, ही जाणीव प्रत्येक स्त्री ला होईल तेव्हा स्त्री-मुक्ती ची सुरुवात होईल.

२. यापुढे घराचे निर्णय / मुलाबाळांच्या बाबतीतले निर्णय.
यात मला कायम जाणवणारी गोष्ट म्हणजे हे जे निर्णय स्त्री ने जबाबदारी घेऊन घ्यायचे असे आपण म्हणतो त्यात शेवटपर्यंत अंतिम निर्णय तिनेच घ्यायचा व त्याच्या परीणामांची जबाबदारीही एक व्यक्ती म्हणून तिनेच घ्यायची असे झाले तर खरी मुक्ती. पण बहुतांश स्त्रिया ह्या सुरुवातीचे चाचपणे/चौकशी/विचार केल्यावर अंतिम निर्णय घेताना मात्र त्यावर घरातल्या पुरुष सदस्याची मान्यता घेऊन मगच पुढील पाऊल उचलतात. हे एक घर म्हणून योग्यच, परंतू दुसरी बाजू अशी होते की शेवटी आपण स्वतः हे काम केले असा आत्मविश्वास कुठेतरी येता येता राहून जातो.
'नंतर काही प्रॉब्लेम आला तर माझ्यावर नको यायला' किंवा अश्याच काही विचारांनी ते काम तडीस जात नाही. असे जेव्हा होणार नाही, व स्त्रिया पुरुषांच्या मदतीशिवाय काम पूर्ण करुन ते निभावून नेतील तेव्हा स्त्री मुक्त होईल.

३. स्वेच्छेने लग्न न करणार्‍या / मूल होऊ न देणार्‍या स्त्री ला समाजाकडून जी वागणूक मिळते ती निश्चितच तेच करणार्‍या पुरुषांपेक्षा वेगळी असते. तरी न डगमगता तो निर्णय तडीस नेतात त्या मुक्त स्त्रिया. मग घर घ्यायला गेल्यावर तिथल्या लोकांनी दिलेली वागणूक ते घर ताब्यात मिळेपर्यंत केलेला मुस्कटदाबीचा प्रयत्न या कशालाच दाद न देता, एकदाही वडिल/मित्र्/भाऊ अश्या कूठल्याही पुरुषाला बरोबर न नेता, आज स्वतःच्या घरात सन्मानाने राहणारी माझी एक बहीण खरी मुक्त स्त्री. तिला सलाम.

४. मुळात आपल्याला कोण काय वागणूक देतंय यापेक्षा आपण कोणाकडून काय वागणूक घ्यायची हे स्त्री ला स्वतःला ठरवता आले पाहीजे. आपण कोण आहोत , आपल्या मर्यादा काय अन आपल्यातली शक्ती काय हे स्वतःला माहीत असले की इतरांच्या बोलण्या-वागण्याचा त्रास होतच नाही.

५. इतरांपेक्षा आपण चांगले आहोत हे दाखविण्याच्या नादात इतर स्त्रियांचा हक्क न हिरावून घेणे. म्हणजे अमकी-तमकी मुलाला डे-केअर मध्ये सोडते पण मी किती लक्ष देते इ. / ढमकी कसलेच सण्-वार, रिती-भाती पाळत नाही, मी मात्र किती नेटकी इ इ.

आपण स्त्री आहोत म्हणून स्वतःच काही वेगळे न वागणे हे प्रत्येक स्त्री ला करावेसे वाटले पाहीजे.
म्हणजे आत्ता खालील या साध्या सोप्या छोट्या गोष्टी आठवत आहेत.
१. उठसूठ घरी-दारी कोणत्याही कठीण प्रसंगात काही न सुचून रडायला सुरुवात करणे, आणि ते स्त्रीत्वाच्या नावाखाली खपवून नेणे. मी तर ऑफीसमध्येही बॉससमोर निर्लज्जपणे रडणार्‍या मुली पाहील्या आहेत.
२. व्यक्ती म्हणून सर्व हक्क मागताना व्यक्ती म्हणून सर्व कर्तव्येही तितक्याच प्रामाणिकपणे पार पाडणे. उदा. पोलिसाने पकडल्यावर दंड भरणे, त्यावेळी मुलगी म्हणून त्याने सोडून द्यावे ही अपेक्षा नको. किंवा रांगेत स्त्री म्हणून पुढे जायची अपेक्षा करणे.
३. स्त्री म्हणून उगाच इमोशनल असण्याचा अभिमान बाळगणे. खरे तर कुठल्याही प्रसंगात खंबीरपणे उभे राहून आत्मविश्वास दाखवणे हे मुक्त स्त्री चे लक्षण आहे.
४. घरातील बारीक्-सारीक कामे, जसे की वर चढून माळ्यावरुन सामान काढून देणे, घरातील एलेक्ट्रीसिटीची जुजबी कामे, गाड्यांचे पंक्चर काढ्णे/दुरुस्ती, व्यवहाराची बोलणी करणे, ही पुरुषांची कामे आहेत असे समजून ती टाळणे. वास्तविक पाहता ही सर्व कामे घरातील कामे आहेत व मला वेळ असेल तर मी ती नक्कीच करेन असा प्रयत्न झालाच पाहीजे.

स्त्री-मुक्ती म्हणजे 'प्रत्येक स्त्री ने स्वतः मुक्त होणे' इतकेच नसून 'आपल्याप्रमाणेच इतर स्त्रीयांनाही मुक्त होण्याचा अधिकार आहे' ही जाणीव होऊन त्याप्रति आपली जबाबदारी निभावणे, आणि 'स्त्री काय किंवा पुरुष काय कोणालाच कोणापासून मुक्ती मिळवायची/मागायची वेळ येऊ नये, सर्वजण माणूस आहेत हे समजून तसे आपले वर्तन ठेवणे'.

(सध्या इतके लिहीले आहे, मोठे वाटले म्हणून आणखी नाही लिहीले, पण हे जर लोकांचे वाचून झाले तर आणखी लिहीन. )

शैलजा | 9 March, 2011 - 22:11
आशूडी, खो दिल्याबद्दल आभार आणि अंजली, आधी तूही दिलेल्या खोबद्दल धन्यवाद.

बहुतांश जणांनी बरेचसे वेगवेगळे मुद्दे मांडले आहेतच, तेह्वा तेच पुन्हा लिहित नाही. काही स्वानुभव लिहिते.

लहानपणी आईबाबाबरोबर फिरायला गेलं आणि कोणी ओळखीचं वा गोतावळ्यापैकी भेटलं, की हमखास एकच 'मुलगी' का हा प्रश्न कानावर हटकून पडायचा. तेह्वा लहान वयात जाणवलं नाही पण, आता लक्षात येतं की त्या प्रश्नामागे भोचक कुतूहल, आश्चर्य, 'अरेरे...' हा भाव, निव्वळ आगाऊपणा आणि तत्सम बरंच काही असणार. फक्त आई आणि बाबाच नव्हे तर कधी कधी आजी आजोबाही माझ्याबद्दलच्या अशा एकटीच मुलगी वा नात असण्याच्या प्रश्नांना सामोरे जायचे आणि समर्पक उत्तरंही द्यायचे. त्या वयात आपल्याशिवाय अजून दुसर्‍या अपत्याची गरज आई बाबाला वाटत नाही, ही भावनाच फार स्पेशल होती! एकदम भारीच वाटायचं. समज येता येता, एकदा मनाने घेतलं की खरंच ह्यांना मुलगा नाही म्हणून मनातून वाईट वाटत असेल का.. आई बाबाला हे बोलून दाखवल्यावर त्यांनी माझ्या डोक्यातली ही कीड तेह्वाच कायमची काढून टाकली. त्यानंतर मनात हा प्रश्न कधीच डोकावला नाही. आणि खरंच, मला कधीच दुय्यम वा अति स्पेशल वागणूकही कधीही मिळाली नाही, पण माझंही स्वातंत्र्य नेहमीच जपलं गेलं आणि लहान वयात आणि नंतरही मोठं होताना माझ्याही मताला किंमत होती. जबाबदारीच्या जाणीवा करुन देताना हक्कही मिळाले आणि स्वतःची तत्वं आणि रास्त मतं ह्यांना जपण्याचं आणि पाठपुरावा करायचं भानही. अन्यायाला विरोध करण्याचा कणखरपणाही. मुख्य म्हणजे हे सारं अगदी सहज, रोजच्या वागण्यातून, लहान सहान प्रसंगांमधून आपोआप अंगी बाणत गेलं. एक व्यक्ती आणि स्त्री म्हणूनही माझ्यामधे असलेल्या आत्मविश्वासाचं सारं श्रेय ह्या कुटुंबियांना.

एकदा कॉलेजमधून घरी चालत येत होते आणि वाटेत एक बसस्टॉप लागायचा. पदपथावर गर्दी होती म्हणून बसस्टॉपच्या पुढच्या बाजूने जायला, बस येत नाही ना हे बघून, मी पदपथावरुन खाली उतरले. आजूबाजूला उभी असलेल्या व्यक्तींची ओझरती नोंद मनात एक प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून झाली होती. इतक्यात मी चालताना एका वयस्कर इसमाने - ज्यांना पाहून आजोबा उभे दिसतायत बससाठी अशी मनात नोंद झाली होती - मधेच बसला थांबवतात तशा पद्धतीने हात पूर्ण पुढे घातला, तो अशा हिशेबाने की मला त्यांचा स्पर्श झाला असता. झटक्यात हे लक्षात येणं आणि ब्रेक लावल्यासारखं थांबायला होणं, मी पुन्हा मागे वळून बस येते आहे का पाहणं - बस काही नव्हती - आणि उद्देश लक्षात आल्यावर चिडचिडून बाजूने जायला दोन पावलं चालले मात्र, मागून खसखस ऐकू आली. एक टोळकं झालेल्या प्रसंगावर खिदळत होतं हे समजलंच, मला 'आजोबा' वाटलेल्या इसमाच्या चेहर्‍यावर कशी गंम्मत केली टाईप हसू. इतकी चीड आली की पुन्हा परत जाऊन मी त्या इसमाच्या लक्षात येण्याआधी त्याच्या मुस्काटात वाजवली! गर्दी अवाक्! टोळकं अवाक्! इसम हेलपाटलाच असावा. तो हल्ला खूप अनपेक्षित असावा. मीही नंतर दोन मिनिटं गडबडलेच, पण तशी मुस्काटात दिल्यावर तिथेच खूप सुटल्यासारखं - हलकं हलकं वाटलं होतं, हे अजूनही आठवतं. तेह्वा मात्र तिथून शांतपणे निघून आले. ही हिंम्मत माझ्यामधे पैदा केली ती माझ्या घरात मिळालेल्या वातावरणाने. स्वतःचा आत्मसन्मान जपणं इतकंही कठीण नाही आणि तो स्वतःचा स्वतःलाच जपायला लागतो ह्याचंही हे पहिलं प्रॅक्टीकल. नेहमीसाठी लक्षात ठेवलं आहे.

कॉलेजमध्ये शिकताना इंजिनियरींगचे छोटे जॉब, मशीन्स हाताळणी वगैरे आम्हां मुलींना जमतच न्हायी, हे तिथल्या मामांचं एखादीचंही कामातलं कौशल्य न पाहताच, सुरुवातीपासूनच ऐकलेलं मत. सगळेच जॉब आम्ही स्वतः करुन त्यांच्याकडे तपासायला नेल्यावर सुरुवातीला तरी कुरकुरत का होईना, ते पास केलेले. मात्र सुपरिटेंडंट मात्र अतिशय सहृदय होते आणि असा भेदभाव त्यांनी कधीच केला नाही, हेही तेवढंच खरं. काही मुली असल्या कामाचा कंटाळा करुन बाहेरून जॉब करुन आणत, हेही. पुढे आयटी क्षेत्रात नेटवर्कींग मधली नोकरी शोधायला लागल्यावर चांगल्या मोठ्या कंपन्यांमधूनही मी पुरुष नसल्याने नकार ऐकलाय, आणि तुम्ही प्रोग्रॅमिंग का करत नाही, मग नोकरी देऊ असा एका वरिष्ठ एचआरवाल्याचा सल्लाही. त्यावर प्रोग्रॅमिंग आवडत नाही आणि करण्यात रस नाही म्हणून, हे उत्तर देऊन बाहेर पडले. यथावकाश हव्या त्याच क्षेत्रात नोकरीची संधी मिळवून आज हाताखाली टीम आहे. कामाच्या ठिकाणी कधीच स्त्री म्हणून सवलती, फायदे मागितले नाहीत, त्याचवेळी स्त्री आहे म्हणून कोणीही दुय्यम लेखायला पाहत असेल, तर तीही संधी दिलेली नाही. आजही माझ्या कामाच्या फिल्डमधे भारतात तरी कमी स्त्रिया आहेत मात्र.

आता शेवटचा अनुभव सांगते.

माझा बाबा गेला, त्याआधी कधीतरी बोलता बोलता त्याने मला सांगितलेलं, हे बघ, मी गेल्यावर उगाच भाराभार कर्मकांडं करत बसू नकोस. तुझ्या मनाच्या समाधानासाठी आवश्यक असेल, तितकंच कर हवं तर. काही नाही केलंस तरी चालेल. काहीही होत नाही. शरीरातून चैतन्य निघून गेलं की संपलं. पण काही केलस तर तर ते तू करायचंस.

बाबा गेला आणि आम्ही त्याला घेऊन वैकुंठात पोहोचलो. पुण्यातले नेहमीचे गुरुजी आले. मी अंत्य संस्कारांच्या विधींसाठी बसणार म्हणून त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या. पुरुष कोणी नाही का वगैरे विचारणा झाली, पुरुष मुंडण करतात वगैरे ऐकवून झालं. इलेक्ट्रीक फरनेसचा ऑप्शन निवडला म्हणून अधिकच नाराजी. मीच वडिलांच्या इच्छेनुसार त्यांना अग्नि देणार आणि हवंच असेल तर मुंडणही करेन म्हटल्यावर अतिशय नाराजीने त्यांनी आपलं काम सुरु केलं. काही अनावश्यक विधी करायचे नाहीत, म्हटल्यावर त्यांचा राग अनावर झाला असावा. असं असेल, तर तुम्ही तुमच्या आईना इथे बोलावून सती जायला सांगा, तोवर मी पुढे जाणार नाही असं त्यांनी घुश्श्यात सांगितल्यावर मात्र माझा संयम संपला. तुम्ही हे मला लिहून द्या आणि इथे साक्षीदार आहेतच, मी आताच पोलीस कंप्लेट करते, म्हटल्यावर पुढचे संस्कार व्यवस्थित झाले. त्या प्रसंगामधून निभावलो. मी एका पित्याचा मुलगा असो वा मुलगी - त्याची इच्छा पूर्ण करायचा माझा हक्क आणि जबाबदारी मी पार पाडू शकणार नाही, हे मला सांगायचा आणि अशा प्रकारे अडवायचा कोणाला अधिकार आहे? मी त्यांना तो का द्यावा?

ह्या अशा आणि इतरही अनेक भल्या बुर्‍या प्रसंगांमधून मी शिकले आहे आणि शिकतेही आहे, की स्वतःच स्वतःची आधी बूज राखायची, मग इतरेजणही राखू लागतात. समोरच्या व्यक्तीला तिने अनादर व्हावा असं काही न करेतोवर आदर जरुर द्यायचा, पण मिंधं व्हायचं नाही. बरोबर आणि चूक ह्यात गल्लत करायची नाही. एक व्यक्ती म्हणून सगळ्यांशी बरोबरीच्या नात्याने वागायचं आणि इतरही तशीच वागणूक देतात, ह्याबाबतीत सजग रहायचं. आणि काही चूक घडत असेल तर त्यविरुद्ध एकटं पडलं तरी आवाज उठवायचा. निर्भय जगायचं.

आणि, हे असे अनुभव घेऊन मी स्वत: काही चांगलं करते का? तर, नक्कीच प्रयत्न करते, पण मला जमतं तसं थोडंफार, मर्यांदा आहेत आणि त्यांची जाणीवही.

एका एचाअयव्ही बाधित कष्टकरी आईला, तिच्या मुलांच्या भवितव्यासाठी ती काम करुन पैसे जमवते, म्हणून जमतील तशी आणि तिच्या तब्येतीला झेपतील तशी कामं देते, कारण ती स्वाभिमानी माऊली असेच पैसे स्वीकारत नाही.

ऑफिसमधल्या हाउसकीपींग स्टाफपैकी एकीची काही आर्थिक अडचण तिने बोलून दाखवल्यावर तिला माझ्याबरोबर कंपनीनेच दिलेल्या गाडीमध्ये बरोबरच ऑफिसमध्ये घेऊन जाते. मलाही एक मैत्रीण मिळते.

कुठे आजोळी खेड्यातल्या मुलांमुलींसाठी - मुख्यत्वे मुलींसाठी पुस्तकं नेते, आणि असंच इतर छोटं मोठं काहीबाही.

माझ्या मनाचा कौल घेऊन माझे लहानसहान निर्णय मला स्वतःला घेता येणं आणि त्याच्या भल्या बुर्‍या परिणामांना सामोरं जायचीही तयारी असेल, तर मग मी मुक्तच आहे की.

सावली | 9 March, 2011 - 22:56

मिनोती धन्यवाद, मला आता वेळ होता म्हणुन मी घेतला खो.

इथे सगळ्यांचे विचार वाचले. बरेच अंतर्मुख करणारया अनुभवांबरोबरच आणि काही चांगले अनुभव वाचून मनाला बरंही वाटलं. बहुतेक मुद्द्यांवर बोलून झालंय तरीही अर्थातच माझे विचारही मांडते. मला अशा विषयांवर मुद्देसूद वगरे लिहिता येत नाही पण प्रयत्न करते.

-- लिहून झाल्यावर वाचलं तर फार विस्कळीत झालय असं वाटतंय. पण नीट बदल करता येत नाहीये तेव्हा असंच ठेवते. तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा--

मला स्वत:लाही स्त्री मुक्ती पेक्षा स्त्रीपुरुष समानता म्हणायला आवडेल.

पण प्रत्येक समाजागणिक याच्या व्याख्या बदलतील. म्हणजे आरक्षणाला माझाही विरोध आहे पण अशिक्षित समाजात जिथे मुलीना जन्मायचा,पोटभर जेवायचा, शिकायचा,लग्न आणि मुलांबद्दलचे निर्णय घ्यायचा अधिकार नसतो तिथे स्त्रियांना आरक्षण मिळून त्यांच्या आणि घरातल्यांच्या विचारसरणीत थोडाही बदल होणार असेल, स्त्रियांना मुलभूत अधिकार, वैद्यकीय मदत, स्वताचे निर्णय घ्यायची क्षमता मिळणार असेल तर तिथे आरक्षण जरुरी आहेच. पण मी कधी बघितलेले किंवा अनुभवलेले नसल्याने या समाजाविषयी मला खरच फारसं काही लिहिता येणार नाही. पण एक मात्र वाटतं कि इथे स्त्री बाळाचे संगोपन करून त्याला मोठं करते. म्हणजे एका अर्थी आई बाळाला पुरुष आणि स्त्री यामध्ये फरक करायला शिकवते याचं काय कारणं असेल? मग जर स्त्री पुरुष समानता आणायची असेल तर आईलाच आधी ती आपल्या बाळांना शिकवायला हवी. त्यासाठी ही जाणीव प्रत्येक आईत जागवायाला हवी.इथल्या प्रत्येक आईने आपल्या बाळाला ही शिकवण दिली तर नक्कीच पुढच्या पिढीत आरक्षणाची गरज रहाणार नाही.

मात्र ज्या समाजात आधीच काही प्रमाणात या गोष्टी मिळत असतील तर त्यांना आज आरक्षणाची गरज नाही असं मला वाटतं.अशा समाजात सगळ्यांच्या विचारसरणी मध्ये बदल हवाय.

कॉलेज शिक्षणासाठी नवीन शहरात गेले तिथे रोजच्या येण्याजाण्यासाठी दुचाकी वापरणे अगदी कॉमन आहे. माझीही होती.पहिल्यांदा पेट्रोल भरायला गेल्यावर रांगेत उभी राहिले तर मागच्या काकांनी सागितलं "ओ ताई तिकडे फुडे जावा कि. लगेच भेटल पेट्रोल." मला आधी कळेना. मग त्याने सांगितलं कि बायकामुलीना मोठ्या रांगेत उभे रहावे लागत नाही.त्या पुढे जाऊन पेट्रोल घेऊ शकतात. मला खरच त्यावेळी स्त्रीमुक्ती वगरे शब्द माहीत नव्हते पण तरीही हा अन्याय वाटला. जर बायका पुरुषांसारख्याच दुचाकी चालवून शकतात तर रांगेत उभं राहू शकत नाहीत? ही काही स्त्री मुक्ती नाही. समानताही नाही. हे स्त्रीत्वाचे भांडवल करून फायदा काढणे वाटले होते मला तेव्हाही.

त्याही आधी डिप्लोमा कॉलेज मधल्या काही मुली वर्कशॉप मध्ये स्वत:च्या नाजुकपणाच भांडवल करून कुणाकडून तरी जॉब करून घ्यायच्या. तेव्हा प्रचंड राग यायचा. इतके काही कठीण जॉब नसायचे ते. या मुलीना वर्कशॉपच्या नियमांप्रमाणे पूर्ण बंद बूट, एप्रन घालायला , स्वत:च्या ओढण्या नीट बांधून ठेवायला लाज वाटायची. त्यांच्या स्टाईलमध्ये ते बसायचे नाही! आणि या मुली इंजिनियर होउन नक्की काय करणार होत्या?!

एक जुजबी ओळखीची भारतीय मुलगी होती इथे जपानमध्ये. तिचा नवरा फक्त २ डॉलर असा पॉकेटमनी द्यायचा म्हणे तिला. त्यात तिने काय हवं ते घ्यायचं!!! नेहेमीची भाजी बीजी आणायला तो जायचा बरोबर. तो चांगला(??) शिकलेला आणि अगदी चांगल्या जपानी कंपनीमध्ये कामाला होता. तिला एकदा प्रे. टेस्ट करायची होती पण पैसे नव्हते आणि नवऱ्याला मागायला तिला भीती वाटत होती कारण फुकट गेले तर तो खूप चिडेल. तीच्या नवऱ्याचा भयानक राग आला होता तेव्हा

एक ओळखीचा मित्र. व्यवसाय करायचा म्हणून नोकरी सोडून गेले काही महिने घरी आहे आणि त्याची बायको नोकरी करून कमावतेय. मला चांगल वाटलं आधी ऐकायला. पण बायकोला भेटले तेव्हा कळल कि ती नोकरी करून , घरी येऊन सगळा स्वयंपाक करते , दोन मुलांचही बघते.मुलांना दिवसभर बघायला आणि शाळेतून आणायला वगरे एक कामवाली आहे. मग हा नवरा काय करतो? त्याला रोज मिटींग नसतात.बऱ्याच वेळा जेव्हा घरी असतो तेव्हा त्याला घरातली कामं करून ठेवायला कमीपणा वाटतो! सकाळीही बायकोला काही मदत करत नाही.

हे असे अनुभव आठवले/ दिसले कि वाटतं बदल स्त्रिया आणि पुरुष दोन्हीकडे हवेत.

चांगलं शिकून सवरून नंतर फक्त होणारा नवरा नाही म्हणतो म्हणून "मी नै बै नोकरी करत" म्हणणाऱ्या मैत्रिणीही होत्या, आहेत. पण केवळ नवरा , सासू नको म्हणतेय म्हणून मी करणार नाही असाच पवित्रा घ्यायचा होता तर शिक्षणाला काय अर्थ. तुम्ही स्वत:चा निर्णय स्वत: घेत असाल तर ठीक आहे.

त्याच विरुद्ध मुलाला घरी राहून घर सांभाळायची फार आवड आहे. आणि बायको छान कमावतेय पण लोकं काय म्हणतील या प्रेशरखाली तो बिचारा तसाच नोकरीचा गाडाही ओढत रहातो. हा त्याच्यावरही अन्याय नाही का?

म्हणजे काही वेळा मुलीला आवड असूनही नोकरी व्यवसाय करता येत नाही आणि क्वचित मुलाना आवड नसूनही करतच रहावं लागतं हा विरोधाभास आहे. समानता हवी तर याही विषयी हवी.

बाळ झाल्यावर त्याच्या बाबाला काय कळतंय, त्याला कसं येईल आंघोळ घालता? मालीश करता? त्याला कसं येईल भरवता? हे आईलाच कराव लागेल असे मानणारया किती बायका असतील? अरे! आजच्या एकच किंवा दोनच च्या जगात त्यालाही बाळाबद्दल तेवढच प्रेम असेल ना? त्यालाही करू देत कि सगळं. 'त्याने कधी केलं नाही म्हणून येणार नाही' या वाक्याला काय अर्थ आहे? मुलीनी तरी आधी कधी केलं होतं का? मग जसं आईला जमत तसच बाबालाही जमणारच. हा विश्वास आईनेच बाबाला द्यायला हवा. मधेमध्ये सगळी जबाबदारी त्याच्यावर टाकून त्यालाही बाळासोबत वाढण्याचा आनंद घेऊ द्यावा. मुलाला आईचे सांभाळणे आणि बाबाचे सांभाळणे यातला फरक जाणवायालाही नको.

घरात बाबा आईला मदत करतो यापेक्षा आई आणि बाबा दोघेही घरात एकत्र काम करतात हे मुलाला दिसायला हवं.अशा घरात वाढलेली मुलं मोठेपणी नक्कीच अशा गोष्टी स्वत:च आचरणात आणतील.

जपान सारख्या प्रगत देशातही वरकरणी सगळं आलबेल वाटतं. म्हणजे स्त्रियांना लग्न करायचे कि नाही, कधी कोणाशी करायचे, मुलं किती कधी असे निर्णय घेता येतात. बहुतांशी स्त्रिया ते घेताना दिसतात. पण मुळात जी एक परावलंबी वृत्ती आहे, नवरा कमावेल आणि मी आराम करेन असा विचार आहे तो तसाच आहे. तो बदलण्यासाठी फारसा प्रयत्न होत नाही. तो बदलायला हवा याची जाणीवही नाही फारशी. बऱ्याच मुलींचे स्वप्न श्रीमंत अमेरिकन किंवा किमान पक्षी कुठलाही फोरेनर नवरा पटकावून मग तीन चार मुलाना जन्म देऊन मोठे करायचे हेच ऐकलेय. फॉरेनर नवरा मिळवण्याचे कारण म्हणे हे कि जपानी पुरुष फार आर्थोडॉक्स आहेत. त्यांना बायकोशी बोलण्यात, तिचे मत विचारात घेण्यात फारसा वेळ आणि इंटरेस्ट नसतो. तो बहुतेक रोजच उशिरा घरी येतो आणि सकाळी लवकर जातो.

माझा एक मित्र एक जोक सांगायचा कि जपानी पुरुषाला त्याची मुलं किती मोठी आहेत असं विचारलं तर तो उंची नं सांगता लांबी सांगतो, कारणं तो कायम मुलाना झोपलेल्या वेळीच बघतो. यातला विनोद सोडला तरी काही प्रमाणात तथ्य आहेच.

इथे बायका मोठ्या पोस्टवर असणे इतके कॉमन नाहीये. शिवाय करियर आणि कुटुंब दोन्ही असणे तर अगदिच दुर्मिळ. दोन पैकी एकच गोष्ट असते. म्हणजे मोठ्या पोस्ट वरच्या जपानी बायका लग्न नं झालेल्या, किवा काडीमोड झालेल्या असण्याची शक्यता जास्त असते. बायकांना त्यातही लग्न झालेल्या बायकांना नोकरी मिळणे कठीण आहे. असेल तरी मुलं झाल्यावर सांभाळण्याच्या सोयी पुरेश्या नाहीत म्हणून नोकरी सोडून द्यावी लागते. इथे अगदी डेकेअर मध्ये सुद्धा मुली नाजूक आणि मुलं स्ट्रॉंग असा काहीसा भ्रम करून देतात.जो मुलीना सिंड्रेला सिंड्रोम द्यायला फारच कारणीभूत आहे. मला स्वत:ला लेकीचा हा भ्रम काढून टाकण्यासाठी बरेच प्रयत्न सतत करावे लागतात. शिवाय डेकेअर च्या शिक्षकांशी बोलून त्याचत्या सिंड्रेला सारख्या राजकन्येच्या चित्र, आणि गोष्टी बंद करायला लावण्याबद्दलही मध्येमध्ये बोलावे लागते.

अलीकडे जरा परिस्थिती बदलते आहे असे वाटते. इथे सरकार मुलं सांभाळण्याच्या जास्त सोयी उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करतय. शिवाय कम्पन्याना स्त्रियांच्या कामसू पणाची परफेक्शनची जाणीव झालीये. आणि स्त्रीयांना नोकरया देण्याचे प्रमाण वाढतंय इति टीव्ही.

ओळखीतल्या दोन जपानी कुटुंबात वेगळेच वातावरण आहे, ते ही एक अपवाद म्हणून सांगते.
एकात नवराबायको दोघे एकाच वेळी घरी येतात. नवऱ्याला स्वयंपाक करायला प्रचंड आवडते तर बायकोला अजिबात आवड नाही. त्यामुळे नवरा स्वयंपाक करतो , बायको त्याला मदत करते नाहीतर मुलाशी खेळते. दुसऱ्यात आई रात्री खूप उशिरा येते. तिला करियर मध्ये खूप काही करायचं आहे. बाबा लवकर येऊन डेकेअर मधून मुलांना घेतात.बहुतेक वेळा बाहेरून जेवण आणलेले असते, किवा काही मोजके पदार्थ करतात.

इथे इतर फॉरेनर्स मध्ये आढळणारी एक चांगली गोष्ट म्हणजे कितीतरी पुरुषसुद्धा आपल्या मुलांसाठी करियर मध्ये सेटबॅक घेतात. बायको चांगली नोकरी करतेय म्हणून घरी राहून मुलं सांभाळतात. किंवा आपल्या कंपन्यामधून कमी वेळ काम करण्याचा / घरून काम करण्याचा पर्याय निवडतात. त्यांनाही घर सांभाळायची आवड असू शकते. मोजक्या मल्टीनेशनल कंपन्यामध्ये मुलं लहान असतील, किंवा घरी कोणी आजारी असेल तर स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान अधिकारात घरी रहायची/ नर्सिंग लिव्ह घ्यायची मुभा मिळते.( हे जपानी कंपन्यामध्ये फारसे होत नाही)

आपल्या कडेही अशी विचारसरणी यावी. स्त्रियांना स्वातंत्र्य, सुरक्षितता मिळावी, घराबाहेर पडताना कुणा पुरुषाची भीती वाटू नये. स्त्रियांना रस्त्यात, घरात, जिथे तिथे एक उपभोग्य वस्तू म्हणून बघितले जाते टे बंद व्हावे. पुरुषांनाही स्वत:ची आवड म्हणून घरात बसून घर सांभाळायची मुभा मिळावी. उगाच पुरुष आहे म्हणून फक्त त्याच्या खांद्यावर घराचे ओझेही नसावे.

त्याच बरोबर स्त्री आणि पुरुष दोघांनीही एकमेकाचा एक व्यक्ती म्हणून आदर करता यावा. एका घरात रहाताना थोड्याशा तडजोडी होतीलच पण त्यामुळे कोणावर अन्याय होऊन पिचले जात नाहीये ना याचे भान यावे. अशा दिवसाच्या प्रतीक्षेत आहे.

प्रतिसाद सायो | 9 March, 2011 - 23:19

शैलजाने खो दिलाय म्हणून लिहिते नाहीतर इतक्या जणींच्या/जणांच्या पोस्ट्सपेक्षा माझ्या पोस्टमध्ये काही वेगळे असेल असं नाही.

नताशा-एक फूलच्या पोस्ट नंतर मी म्हटल्याप्रमाणे स्त्री मुक्ती वगैरे बद्दल माझ्या मनात खूप गोंधळ आहे. स्त्री मुक्ती=स्त्री पुरुष समानता म्हणायचं तर मग सगळ्यांच बाबतीत त्यांच्याशी समानता करायला हवी. टण्यानेही उत्तर दिलंय त्याच्या खोमध्ये, पण प्राचीचा मुद्दा जास्त पटला की कामाच्या जबाबदार्‍या घेतानाही दोघांमध्ये समानता हवीच. बर्‍याचदा बायका स्वतःचं सामान वगैरेही स्वतः उचलत नाहीत. (आजारपणामुळे किंवा आणखीन काही कारणामुळे असेल तर गोष्ट वेगळी) त्याकरता ह्यांना पुरुष मंडळीच हवी असतात. फार नाजूक वगैरे समजतात स्वतःला. चीड येते अशा बायकांची भयंकर. तेव्हा कुठे असते स्त्री पुरुष समानता?

आमच्या घरी आम्ही चौघी बहिणी आहोत. मुलगा नाही म्हणून आमच्या आई वडिलांनी कधीही दु:ख व्यक्त केल्याचं वगैरे दाखवलेलं आठवत नाही. किंवा आजूबाजूच्या लोकांनीही तसं काही बोलल्याचं निदान आठवत तरी नाही. आमच्या घरी मुळात आमची आई प्रचंड खंबीर, भरपूर आत्मविश्वास असलेली आहे. काही वर्ष नोकरी केलेली असल्याने बाहेरच्या जगात वावरायचा आत्मविश्वास तिच्यात आलेला आहे. घरात नेहमीच मोकळं वातावर्ण आम्हांला मिळालेलं आहे. आई वडील दोघांनी मिळून सगळे निर्णय घेतले आहेत आजवर. जर वडील तिच्यावर वर्चस्व गाजवणारे असते तर तिने ते सहन न करता त्याविरुद्ध बंड केलं असतं ही गोष्ट वेगळी. या उलट सासरी वातावरण आहे. जे बदलणं माझ्या हातात नाही

सावलीने थोडफार जपानबद्दल लिहिलं आहेच. आडोनेही लिही म्हटलंय. तेव्हा थोडं त्याबद्दल.

जपानची आधीची पिढी भयंकर आर्थोडॉक्स आहे. त्यांच्यापेक्षा भारत बरा म्हणायला हवा. त्या पिढीच्या बर्‍याच बायका नोकरी करणार्‍या नाहीत. चूल, मूलवाल्याच बर्‍याचजणी. नवरा मात्र ऑफिसातून येताना दोन चार बिअर मारुन कुठकुठच्या क्लबात मजा करुन येणार. 'आमचा नवरा आम्हांला कधी चीट करेल सांगता येत नाही. तुमचा नवरा निदान तसा नाही' हे आमच्याच बरोबरीच्या एका जपानी मैत्रिणीने म्हटलेलं आणि बाकीच्यांनी तिला दुजोरा दिलेला.

कामाच्या ठिकाणी नवीनच जॉईन झालेल्या फिमेल एम्प्लॉयीला सगळ्यांच्या आधी लवकर पोचून सगळ्यांची टेबलं पुसणं, बॉसकरता चहा करणं वगैरे करावं लागतं. अर्थात हे फक्त जपानी कंपन्यांमध्ये. अमेरिकन कंपन्यांमध्ये नाही. जरा कलिग्जबरोबर दारु प्यायला गेलं तर ह्या मुलींनी सगळ्या पुरुषांच्या कपात साके ओतायची. त्यांना स्वतःला त्या घेऊ देत नाहीत.

बाकी सगळ्यांच्या बदलाच्या मुद्द्यांवर, आशावादावर सहमत.

मिनोती | 9 March, 2011 - 23:41

शैलजा, खो बद्दल अनेकानेक धन्यवाद.

काही उदाहरणे -

मी विद्यापिठात असताना होस्टेलमधे रहायला होते. सगळ्या मुलींना संध्याकाळी सातच्या आत होस्टेलमधे हजर असणे बंधनकारक होते. बाहेर बाजारपेठेत किंवा आपापल्या गावी जाताना एका रजिस्टरमधे नाव नोंदणी करणे आवश्यक असे. मुलींना गावात एक 'लोकल गार्डीयन' असणे आवश्यक होते. नऊ नंतर टीव्ही पहायचा नाही. बाहेरचा डबा लावायचा नाही, होस्टेलमधल्या मेसमधेच जेवायचे कितीही टुकार जेवण असले तरीही! मुलांच्या होस्टेलमधे यातला कोणताही नियम नव्हता! हे सगळे आम्ही मास्टर्सला असतानाची कथा! आम्ही काही मुलींनी याला विरोध केला पण फायदा झाला नाही. पण आम्ही बाहेर पडलो आणि थोडेफार बदल पुढच्या मुलींना मिळाले. पण मुलांना आहे तशी मोकळीक नाहीच!

गेल्यावर्षी माझी वहिनी गाडी चालवत होती आणि आम्ही दोघी गाडीत होतो. पुढे कॉलेजची तीन मुले तीन मोटरसायकलवर साखळी करून चालली होती. बरेच हॉर्न वाजवले पण मागे पाहून मुलगी आहे म्हणल्यावर मुद्दाम खिदळत अजुनच साखळी लांबलचक केली. एका रिक्षावाल्याला जागा करून दिली गेली पण आम्ही जवळ गेलो की मुद्दाम गाड्या हळू करत चालवणे. माझा संताप आता शिगेला पोचला होता. मी वहिनीला म्हणाले ने अगदी टेकव गाडी त्या बाईकला! बघू कसा जागा देत नाही. तीने आधी थोडा विचार केला आणि मी म्हणाले तसे केले. त्या मुलाने गप्प जागा करून दिली. हे असे फक्त स्त्रिया म्हणून आमच्या वाट्याला का यावे?

माझी एक कलीग मॅटर्नीटी लिव्हवरून परत आल्यावर दुपारी मदर्सरूममधे जात असे. तेव्हाचे आमचे प्रोजेक्ट प्रचंड गुंतागुंतीचे होते. प्रचंड काम असे. तरीही तिला मी तिची वेळ चुकवू द्यायचे नाही. पण २-३ वेळा मी एका मिटींगमधे आडकले असताना स्टॅटससाठी आमच्या स्त्री मॅनेजरने फोन करून स्टॅट्स विचारला. २-३ वेळा आडून आडून तुला असे किती दिवस करावे लागेल हे विचारले. असे झाल्यावर २ महिन्यात तिने ते सगळे बंदच करून टाकले! मी मॅनेजरला काहीवेळा टोकलेदेखील की असे करणे चांगले नाही तिची ती गरज आहे. पण माझी कलीग हे तिला सांगू शकली असती ना? ते तिने का नाही केले?

माझी एक मैत्रिण अगदी हुषार, आई-वडीलांची एकुलती एक मुलगी. मुंबईसारख्या शहरात वढलेली. शिक्षण झाल्यावर नोकरी लागली, लग्न झाले. लग्नानंतर घरचा सगळ्याचा, स्वयंपाक, डबे, घर साफ करणे वगैरे हिनेच करायचे, केले नाही तर फिजिकल अब्युझ केला जाई. हे सहन करत राहिली, आईवडीलांना थांगपत्ताही लागू न देता. शेवटी असह्य झाले तेव्हा त्यांना सांगुन त्या घरातून बाहेर पडली. वेगळ्या शहरात नोकरी धरली. यथावकाश चांगल्या जोडीदाराबरोबर लग्न झाले. पण कधी-मधी साटी-सामाशी जेव्हा हे नवीन सासु सासरे भेटतात किंवा फोनवर बोलतात तेव्हा हिचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाहीत. ही अजुनही दुरुत्तरे न करता ऐकुन घेते. वयाच्या चाळीसाव्या वर्षीदेखील सासुरवासला बळी पडते. ही एवढी 'शिकलेली' मुलगी पण कधी विरोध का नाही करू शकली या सगळ्याला? तिला याची जाणीव झाली/होत नसेल का? की त्रास जाणवत असुनही विरोध पत्करायची तयारी नाही म्हणुन हे सगळे होत असेल?

या आणि अशा अनेक उदाहरणांमुळे माझी समानतेची जाणीव जास्तीत जास्त तीव्र होत गेली. त्यामुळे स्त्री-मुक्ती पेक्षा समानता हा शब्द मला आवडेल. एका स्त्रीला फक्त लिंगभेदामुळे वेगळी वागणूक, मग ती कोणत्याही समाजात-क्षेत्रात असो, दिली जाऊ नये. तिला स्वतःच्या मनाप्रमाणे जगण्याची मुभा असावी असे मला प्रामाणिकपणे वाटते. ही समानतेची जाणीव आहे ना ती अगदी आपल्यामधे स्वतःचीच असायला हवी. अजुन काही कारणामुळे त्या जाणीवेला खत-पाणी मिळेल पण ती जाणीव निर्माण करणे हे त्या व्यक्तीने स्वतः ठरवले तरच शक्य आहे. लोक त्रास देत असतील तर त्यावर आक्षेप घेतला पाहीजे.
मला कोणीतरी येऊन मदत करेन असा सिंडरेला सिंड्रोम जसा नको त्याबरोबर हेही कळकळीने सांगते की एक स्त्री म्हणून जगताना घरचेही करेन, बाहेरचेही करेन आणि मी किती ग्रेट आहे हे सांगण्यासाठी सगळी कामे स्वतःच्या अंगावर घेऊन सुपरवुमन सिंड्रोम दाखवण्याची गरज नाही!

एवढा वेळ मिळूनही मी माझा मुद्दा नीट मांडू शकले नाही याची जाणीव आहे. जसे सुचेल तसे बदल करेन यात.

पराग | 10 March, 2011 - 00:29

संयोजक, हा उत्तम उपक्रम महिला दिनानिमित्त आयोजित केल्याबद्दल धन्यवाद आणि टण्या, खो बद्द्ल धन्यवाद...
------------------------------------------------------------------------------------

ह्या विषयावर लिहायला बसल्यावर स्त्रीमुक्ती, स्त्री-पुरुष समानता वगैरे विषयांबद्दल सर्वप्रथम कधी विचार केला होता हे आठवायचा प्रयत्न करत होतो.
वैयक्तिक पातळीवर बघायला गेलं तर आमच्या घरातल्या सर्वच स्त्रिया फार कर्तबगार आहेत. आज्जीने नाशिक सारख्या ठिकाणी साधारण १९३० च्या आसपास वयाच्या आठ-दहाव्या वर्षी पोहोण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन आणि बक्षिसे मिळवून क्रांती घडवली होती. नंतरही आजोबांच्या आजारपणामुळे एकटीने निर्णय घेऊन, पैशांची सोय करून ७० च्या दशकात पुण्यात जमीन घेतली. घरातले सगळे व्यवहार वगैरे तिच बघत असे. माझी आई आमच्या कुटूंबातली पहिली डबल ग्रॅज्युएट सून म्हणून आज्जीला तिचे फार कौतुक. आईनेही २२ वर्ष नोकरी करून बाबांच्या बरोबरीने किंवा थोडेफार जास्तच सगळे व्यवहार संभाळणे, महत्त्वाचे निर्णय घेणे वगैरे सगळं केलं. पुढे वहीनी आणि माझी बायको ह्या मार्कांनुसार, मिळवलेली बक्षिसे, sincerity वगैरेंनुसार आमच्यापेक्षा जास्त हुषार आहेत असं कौतुक माझी आई करत असते आणि त्या दोघींचाही घरातल्या सगळ्या गोष्टींमध्ये अर्थातच पूर्ण सहभाग असतो. त्यामुळे घरातल्या स्त्रियांकडे बघता त्यांना कधी 'मुक्ती' वगैरेची गरज आहे असं वाटलच नाही (hopefully !) आणि आजुबाजूचं जग बघेपर्यंत ह्याची कधी जाणिवच झाली नाही. घरातल्या स्त्रियांना कधी त्रास झाला नसेल असं नाही (म्हणजे घरी लवकर ये, परिक्षा आहे तर बाहेर नको जाऊ, घरात आजारपण आहे तर दांडी मार वगैरे हे फक्त आईला किंवा आज्जीलाच सांगितलं गेलं, बाबांना नाही) पण त्या स्त्रिया आहे म्हणून तो झाला ह्यापेक्षा हक्काच्या भावनेतून तो झाला असावा असं मला वाटतं.

नंतर खटकलेली अगदी जवळची तीन उदाहरणं आठवली. एकामध्ये सासरच्या अतिधार्मिक वातावरणामुळे मुळात तसा स्वभाव नसतानाही आयुष्यभर करावी लागणारी तडजोड होती. दुसर्‍यामध्ये दोन्ही मुली झाल्या म्हणून आयुष्यभर सासूने टोमणे मारणे, कुजकट बोलणे हे प्रकार होते. तर तिसर्‍यामध्ये सुनेने साडीच नेसली पाहिजे, असच वागलं पाहिजे, तसच केलं पाहिजे वगैरे गोष्टी होत्या. ह्या तीनही उदाहरणांचा विचार करताना वाटलं की मला ह्यांच्या परिस्थितीबद्दल वाईट वाटतय. पण त्यांना तसं वाटतय का ? त्यांना आपल्यावर अन्याय होतो आहे ह्याची जाणीव आहे का? पाहिल्या दोन्ही उदाहरणांमधल्या स्त्रिया ह्या अत्ताच्या काळातल्या, भरपूर शिकलेल्या, उत्तम नोकरी करणार्‍या अश्या आहेत. पण जर सासरी असणार्‍या इतर काही चांगल्या गोष्टींमुळे अन्यायाची जाणीव असूनही त्यांना हा अन्याय दुय्यम वाटत असेल आणि त्यांची तडजोडीची तयारी असेल तर 'मुक्ती' मुळात हवी का?
हा सगळा विचार करायला लागल्यावर स्त्रीमुक्ती म्हणजे नक्की काय ह्याबद्दलच डोक्यात गोंधळ झाला !
स्त्रियांची मुक्ती नक्की कोणापासून करायची ? पुरुषांपासून, इतर स्त्रियांपासून, संपूर्ण समाजापासून की अजून कश्यापासून ? म्हंटलं तर ह्या सगळ्यांपासूनच, म्हंटलं तर कश्यापासूनच नाही.

स्त्रीमुक्ती झाली असं नक्की कधी म्हणायचं ?
- अन्याय होत असेल तर अन्याय होतो आहे ह्याची जाणीव होण्याइतपत जागरुकता समाजातल्या सर्व स्तरातल्या स्त्रियांमध्ये आलेली असेल. जेणेकरून होण्यार्‍या अन्यायाचा तिथल्या तिथे बंदोबस्त केला जाईल आणि कुठलीच जाचक गोष्ट परंपरा म्हणून सुरु होणार नाही.
- नैसर्गिक वेगळेपण वगळता बाकी कोणतीही लेबलं न लावता स्त्रीला सर्वसाधारण माणूस म्हणून वागवलं जाईल. स्त्री आहे म्हणून अन्याय होणार नाही किंवा स्त्री आहे म्हणून वेगळे मानसन्मान मिळणार नाहीत.
तसच ज्या कारणासाठी स्त्री आणि पुरूष ही नैसर्गिक रचना आहे ते कारण वगळता इतर गोष्टीत एखादी व्यक्ती स्त्री आहे की पुरुष ह्यांने फरक पडणार नाही.
- स्त्रियांच्या स्त्रीत्त्वाचा वैयक्तिक स्वार्थासाठी इतरांकडून वापर केला जाणार नाही (शारीरीक/मानसिक त्रास देणे, स्त्री आहे म्हणून संधी नाकारणे, पगार कमी देणे इत्यादी) किंवा स्त्री स्वत:ही तसा वापर करणार नाही ('कॉर्पोरेट' पिक्चरमध्ये बिपाशा बासू जे करते त्यासारखं काही, घरातल्या जबाबदार्‍यांची खोटी कारणे सांगून काम टाळणे, emotional blackmailing सारखे प्रकार इत्यादी ).
- मुलगी झाली म्हणून घरात दु:ख होणार नाही किंवा उलट टोक म्हणजे मुलगी व्हावी म्हणून नवस केले जाणार नाहीत.
- समाजातले पुरुष आणि स्त्रियांमधले प्रमाण निसर्गाद्वारे ठरवले जाईल, त्यात माणसाची ढवळाढवळ असणार नाही.
- संयुक्ता सारखे वेगळे गट स्थापन करायची, स्त्री मुक्ती वर लिखाण करायची, त्यासाठी आंदोलने करायची गरज पडणार नाही.

हे साध्य होणं ही एका दिवसातली गोष्ट नक्कीच नाही. कायदेशीर मार्गाने जे काय करता येईल ते वेगवेगळ्या संस्था करतच आहेत. पण मुळात mentality बदलण्याची गरज आहे आणि ती करण्यासाठी जे शक्य होईल प्रयत्न प्रत्येकाने केले पाहिजे. समाजप्रबोधन आणि घरातले संस्कार ह्या सगळ्यातल्या मोठा आणि महत्त्वाचा घटक आहे आणि थोडेफार सकारात्मक बदल हे येणार्‍या पिढ्यांमध्ये दिसतच आहेत. मुलांच्या समोर "पोरीचं/बायकांचं असच असतं.. त्यांना काही झेपत नाही.. त्यांच्याशी कसही वागलं तरी काय फरक पडतो" वगैरे वाक्य किंवा मुलींना "मुलीच्या जातीला हे असलं शोभत नाही.." वगैरे फंडे देणं लहानपणापासूनच टाळलं पाहिजे आणि समाजातल्या प्रत्येकाचाच व्यक्ती म्हणून आदर करण्याची शिकवण दिली पाहिजे.

वीस वर्षापूर्वी घरातल्या भांडीवाल्या बाईचे जे प्रश्न होते तेच आजही आहेत ! आणि हे बदलणं शिक्षण समाजातल्या तळागाळात पोचलं तरच शक्य होऊ शकेल. वैयक्तिक पातळीवर आपण जे शिकतो, आचरतो ते अगदी प्रत्येकाने, प्रसंगी इतरांचा विरोध पत्करून, थोडाफार धोकाही पत्करून सार्वजनिक जिवनातही आचरणात आणले तर परिस्थितीत नक्कीच लवकर फरक पडेल.

dhanashri | 10 March, 2011 - 11:33

मी मलाच खो घेत आहे.

प्रसंग एक: एक नोकरदार स्त्री... हिचे यजमान नेहमी तिला घरकामात मदत करत असतात.अगदी पाहुणे आल्यावरही, पण, "काय बाई आहे! सगळ्यांच्या समोर नवर्‍याला हुकुम सोडते! आमच्यात
नाही बाई असले लाड चालायचे बायकांचे!!" असे म्हणणारी स्त्रीच असते.

प्रसंग दोन: एक इंजीनीअर मुलगी .लग्न करुन सासरी जाते. हिची सासू नोकरी करते.सासूचे मत असे की इंजीनीअर झालीस तर नोकरी कर मी मुलीला सांभाळते.पण ही म्हणते मला घर कामाचीच आवड आहे.
हिच्याशी बोलले तेव्हा असे लक्षात आले की इंजीनीअर हे तर qualification फक्त लग्नासाठी होते (to be on safer side.ती दिसायला साधारण आहे.so called gori vagaire navatee).

पण कळीचा मुद्दा हा की हीच भेटायला गेल्यावर एकदा तरी ऐकवते मला नाही आवडत नोकरी करणार्‍या बायका. पोराना उपाशी सोडून कशी करवते नोकरी?

मला नेहमीच असे वाटत आलेय की स्त्रियाच स्त्रियांना नेहमी मागे खेचत असतात.

म्हणूनच मला असे सांगायचेय की स्त्रीमुक्त होण्यासाठी आधी ती मुक्त झाली पाहीजे. जाणीव करुन देणे गरजेचे आहे. स्त्री तेव्हाच मुक्त होइल जेव्हा दुसरी 'स्त्रीच' तिच्या पाठीशी खंबीर पणे उभी राहील.

छोटीशीगोष्ट : लग्नानंतर नवीन नाती जपण्याचेच tension एवढे असते की कुणालाच आधीच्या मैत्रिणींशी तेवढे सम्पर्क नाही ठेवता येत. 'netbhetee' होत असल्या तरी मनात असून नसून कधीच उपयोगी नाही पडता येत .हे एक उदाहरण झाले.स्वतःची 'feel good' नाती जपणे हीही 'स्त्री मुक्ती' वाटते मला तरी.

पौर्णिमा | 10 March, 2011 - 13:09

स्त्रीमुक्तीच्या माझ्या कल्पना असं म्हटलं की अनेक विचार आणि अनेक प्रसंग रॅन्डमली माझ्या डोळ्यापुढे येतात. स्त्रीमुक्ती म्हणजे खूप खूप बायकांनी हातात लाटणी धरून काढलेला मोर्चा असं प्रथम दृश्य डोळ्यापुढे येतं. त्यानंतर दीपांजलीने लिहिलंय ते 'मुलगी झाली होऽऽ' हे पथनाट्य दिसतं आणि मग दिसतात त्या जाडेभरडे कपडे घातलेल्या, तोकडे केस ठेवलेल्या, अलंकार-कुंकूविरहीत बायका. ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे, बायकांनी स्वयंपाकातून, सुंदर कपड्यातून, कुंकूटिकलीतून मुक्ती मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे स्त्रीमुक्ती हे माझं स्त्रीमुक्तीचं पहिलंवहिलं नासमज वयातलं interpretation.

मोठे होत गेल्यानंतर, वयाचे, शिक्षणाचे अनेक टप्पे ओलांडल्यानंतर आज जी काही थोडीबहुत समज आली आहे, त्यातून असं वाटतं, की स्त्रीमुक्ती म्हणजे स्त्रीची सर्व प्रकारच्या अपेक्षांमधून झालेली मुक्ती. 'तू मुलगी आहेस, म्हणून असे केले/वागले/बोलले पाहिजेस', 'तू ह्या घरची सून आहेस म्हणून तू हे सण/ ते उपास/ त्या रीतीभाती सांभाळल्याच पाहिजेस' ह्या ढोबळ, प्राथमिक अपेक्षा. ह्या अपेक्षा केवळ ती 'स्त्री' आहे म्हणून तिच्याकडून ठेवल्या जातात. 'बालसंगोपना'त कित्येक महिलांची आहूती गेली असेल कोणास ठाऊक! ह्या सर्व अपेक्षांना पुरं पडण्यात तिचा जीव मेटाकुटीला येतो. तिचं आख्खं जीवनच त्यापायी उगाचच झाकोळलं जातं. ह्या सार्‍या सार्‍या अपेक्षांमधून जेव्हा ती मोकळी करेल स्वतःला, तेव्हा ती खरी मुक्त होईल. हो. इथे तिनेच स्वतःला मोकळं करून घेतलं पाहिजे. 'मला मुक्त करा' असा टाहो फोडला, तर तो दाबला जातो आणि बंधनं अधिकच जाचक होतात, हे सत्य आहे. त्या ऐवजी, खंबीरपणे योग्य त्या गोष्टीला रूकार आणि अयोग्य गोष्टीला नकार देणं हे जेव्हा स्त्री करू शकेल, तेव्हा ती खरी मुक्त होईल.

स्त्रीच ही स्त्रीची शत्रू असते, त्याचंच converse म्हणजे अर्थातच, स्त्री हीच दुसर्‍या स्त्रीची उत्तम मैत्रिण होऊ शकते. तिच्या वेदना, तिचं दु:ख, तिच्या भावना ह्यांच्याशी सह-अनुभूती केवळ दुसरी स्त्रीच देऊ शकते. घरातली आई, बहीण, सासू, नणंद, जाऊ, भावजय ह्या स्त्रीया एकमेकींच्या साहाय्याला धावून आल्या, घरातल्या जाचक प्रथांविरूद्ध पुरुषांविरूद्ध बोलू लागल्या, तर ते घर त्या स्त्रीसाठी नंदनवनापेक्षा कमी नसेल. मात्र, ईगो आणि सन्मानाच्या, नातेसंबंधांच्या विचित्र कल्पना ह्या स्त्रीला मोकळेपणाने व्यक्त होऊ देत नाहीत. ह्या ईगोंमधून स्त्री जेव्हा दुसर्‍या स्त्रीला मनापासून स्वीकारेल, तेव्हा खरी स्त्रीमुक्ती होईल.

आज जगात वावरताना स्त्रीला अनेक ठिकाणी झगडावे लागते. इथे कधीकधी स्त्री म्हणून दुय्यम वागणूक गरज नसताना दिलेली असते. मी माझीच काही उदाहरणं देते.

१) माझ्या आधीच्या कंपनीत, मी धरून दहा स्त्रीया आणि किमान साठ पुरुष असतील. दोन मजले मिळून चार टॉयलेट्स होती (दोन भारतीय आणि दोन पाश्चात्य पद्धतीची). पण चारही सार्वजनिक!! स्त्रीयांसाठी वेगळे टॉयलेटच नाही. मी पहिल्याच दिवशी हादरले होते. एक मुलगी म्हणाली, 'असं काही नाहीये इथे. कोणीही कुठेही जातं'. बापरे. इतकी घाण आणि किळस वाटली. दुसर्‍याच दिवशी जीएमकडे गेले. मी नवीन. त्यातून कामाबद्दल बोलण्याऐवजी हे भलतंच काहीतरी घेऊन गेल्यानंतर ते गांगरलेच. पण ऐकून घेतले आणि 'तुम्हीच ठरवा, चारपैकी एक लेडीज टॉयलेट आणि त्यावर पाटी लावा' असे सांगितले. आम्ही ताबडतोब अंमलबजावणी केली. पुरुषांकडून 'हे काय नवीन?' टाईपचे शेरे आणि हेटाळणीही झाली. नंतरही एक सिनियर पुरुष एम्प्लॉयी मुद्दाम त्रास द्यायला लेडीज टॉयलेटमध्येच जायचे. शेवटी त्यांना 'लिखा हुआ है, दिखता नही है क्या?' असे विचारल्यानंतरच त्यांच्यात सुधारणा झाली. पण त्यासाठि तोंड वाजवावे लागले, ह्याचे वाईट वाटले.

अत्यंत श्रीमंत प्रमोटर ग्रूपच्या ऑफिसची ही कथा. इथे बेसिक हायजिनच्या गोष्टींना प्राधान्य नव्हते हे पाहून अचंबा वाटला. दोन दिवसांनी तीच मुलगी येऊन म्हणाली, 'मॅडम, आता खूप बरं वाटतंय. तुम्ही आलात म्हणून हे झालं.' पण माझा प्रश्न होता, की तुम्ही इतकी वर्ष हे का सहन करत होतात? तर उत्तर- 'सगळे सिनियर. कसं बोलणार ह्या अशा बाबतीत?'

२) ही अगदी महिन्यापूर्वीची कथा. ऑफिसमध्ये नेहेमी दिसणार्‍या एका २३-२४ वर्षाच्या मुलीचं लग्न झालं. लग्न झाल्यापासून ही मुलगी रोज साडीत. बर ही आधी मस्त जीन्स, ट्राऊझर्स घालायची आणि तिला अगदी सूट व्हायचे. असं बरेच दिवस झाल्यानंतर तिला सहजच विचारलं, 'का गं? आता जीन्स घालणारच नाही का?' तर ती म्हणाली, 'अजून डेअरिंगच नाही केलं! तसं सासू ड्रेस घालते, पण अजून तिला विचारलं नाही!!' मी हताश! तरी म्हणलं तिला, की 'मस्त दिसतात तुला जीन्स. विचारायचं काय त्यात? घाल की.' थोडी हसली. पुढच्याच शनिवारी, ती जीन्समध्ये! मलाच आनंद झाला. मला म्हणाली, 'सासूला खूप आवडली जीन्स. माझे सगळे कपडे दाखवले तिला. तिला आवडतात वेस्टर्न कपडे. आता सगळे जुने कपडे घालता येतील. मस्त वाटतंय.' माझा प्रश्न, की सासू नाही म्हणाली असती, तर काय केलं असतंस?? सभ्य आणि योग्य कपडे घालायसाठी इतर कोणाची परवानगी कशाला? आणि परवानगीच घ्यायची तर सासूची??? नवरा कुठाय ह्या पिक्चरमध्ये???

३) एक मनुष्य इथल्या मुलीकडून पाण्याची बाटली मागून घ्यायचा आणि त्याला तोंड लावून पाणी प्यायचा, रोज!! तिला आवडायचं नाही, पण सांगायची लाज, संकोच वाटायचा. शेवटी एकदा मला बोलली. मला आश्चर्य वाटतं, ते असले प्रकार खपवून घेणार्‍यांचं!! तिला आधी झाडलं आणि तिला दुसरी नवीन बाटली आणायला सांगितलं. दुसर्‍या दिवशी तिने नवीन बाटली स्वतःकडे ठेवली आणि जुनी त्या माणसालाच दिली. 'मी माझ्यासाठी नवी आणलीये. तुम्हाला ही आवडलीये, तर तुम्हीच ठेवा' असं म्हणाली. तो काय ते समजला.

पावलापावलावर आज जिथे अस्तित्वाची लढाई आहे, तिथे स्त्रीयाच एकमेकींची साथ देऊ शकतात असं माझं ठाम मत आहे. पुरुष ह्या बाबतीत सपोर्ट करतील, मदत करतील, पाठींबाही देतील. पण त्यांची भूमिका पॅसिव्हच असेल. स्रीमुक्ती ही स्त्रीयांच्या आत्मसन्मानाची ही लढाई आहे. ती मिळवणंही त्यांच्याच हाती आहे. थेंब गोळा होऊ लागले आहेत. त्यांचं तळं लवकरच होईल. Cheers to womanhood.

बित्तुबंगा | 10 March, 2011 - 14:53 नवीन

भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे।

स्त्री-मुक्ती पेक्षा स्त्री-पुरुष समानता हा अधिक व्यापक आणि उपयुक्त विचार वाटतो.
मुक्तीचा विचार हा व्यक्तिपुरताच राहतो, तर समानता समष्टीला सामावून घेते. जिथे प्रतिस्पर्धी आहेत तिथे स्वातंत्र्याची, मुक्तीची आणि आंदोलनांची गरज आहे. जिथे मैत्र आहे तिथे समानता आपसूक येईलच! स्त्री-पुरुषांमधील (मुक्तीची) स्पर्धा लयास जावून जेव्हा त्यांच्यातील मैत्र वाढीस लागेल तेव्हा ख-या अर्थाने समानता निर्माण होईल असे वाटते.

एकूणच हा विषय फार गंभीर, गुंतागुंतीचा आणि अतिशय मोठ्या आवाक्याचा आहे. ह्या द्वंद्वात्मक विश्वात एखाद्या सामाजिक समस्येचे मूळ शोधणे हे एखाद्या ऋषीचे कूळ शोधण्याइतके कठिण वाटते. किंबहुना आपण फक्त अंदाजच बांधू शकतो! आधुनिक बुद्धिप्रामाण्यवादी समाज म्हणतो की मनूने स्त्रीयांवर बंधनं लादली, तर परंपरावाद्यांच्या दृष्टीने स्त्रीमुक्ती (चे फ्याड) हे साम्यवादाचे (अनौरस) बाळ आहे. ज्या समाजात अनेक "अमुकतमूक वादी" आहेत, तिथे अश्या प्रकारच्या मतांची अनेक पर्म्युटेशन-कॉम्बिनेशन्स तयार होतात. कोणाचा/कोणता वाद/प्रतिवाद प्रमाण मानायचा? कोणाचं तरी मत प्रमाण मानण्यासाठी, किंवा आपलं मत अस्तित्वाच्या प्रतलावर उठून दिसण्यासाठी आपणही कोणतातरी ईझम अंगिकारायला(च) हवा का?

मानवनिर्मित धर्म नावाच्या पोटभरू संस्थांनी आपापल्या सोयींनुसार त्या त्या काळाप्रमाणे स्त्रीयांवर बंधनं लादली. पुरुष आणि प्रकृती, शिव आणि शक्ती, पुरुषार्थ आणि स्त्रीत्व हे कसे एकमेकांस पूरक आहेत (किंवा एकच आहेत) असे धर्मग्रंथांनी सोदाहरण स्पष्ट करून दिले असले, तरी काही अपवाद वगळता प्रत्यक्ष व्यवहारात मात्र तसे फारसे कधीच दिसले नाही. स्त्रीला नेहमी गौण स्थान दिल्याचे जाणवते. कालौघात ते गौण स्थान स्त्रीच्या इतके अंगवळणी "पाडले", की गौण असणे हेच एक स्त्रीत्वाचे व्यवच्छेदक लक्षण मानले गेले. आधुनिक काळात स्त्री-पुरुष कितीही शिकले-सवरलेले असले, तरी अजूनही मनाच्या कोप-यात कुठेतरी आपण त्याच पुरुषप्रधान परंपरेचे अंशत: पाईक आहोत याचे प्रत्यंतर येत असते.

स्त्री ही गौण, उपभोग्य वस्तु आहे हा पारंपारीक अपसमज किती पराकोटीला पोहोच(व)ला होता हे तपशिलात सांगणे मुश्किल! स्त्रीमुक्तीदिनाच्या निमित्ताने नरेंद्र लांजेवार या कवीला एका व्यक्तीने विचारले,"स्त्रीयांच्या दु:खाला वाचा फोडणारी कविता सांग!" तेव्हा कवी नरेंद्रने त्या व्यक्तीला गंगेवर आंघोळ करीत बसलेल्या एका म्हातारीची प्रतिकात्मक गोष्ट सांगितली, ती फारच समर्पक आहे...

अंगातून रक्त निघेपर्यंत दगडाने कातडी घासत बसलेल्या
म्हातारीला एका काळ्या डगल्यावाल्याने विचारले,
"ही कोणत्या जन्माची आंघोळ?
की केला होतास गंगेला नवस?"
म्हातारी म्हणाली,
"ही आंघोळही नाही आणि नवसही नाही
फक्त
आयुष्यभर या कातडीला चिकटलेल्या
लोकांच्या नजरा धुते...."

(...नरेंद्र लांजेवार)

समाजसुधारकांनी स्त्रीयांना शिक्षाणाचा अधिकार मिळवून दिल्यापासून चित्र बरेचसे बदलले आहे. गेल्या शंभर वर्षात स्त्रीयांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून खूप मोठी मजल मारली आहे. तसेच, पुरुषांची सरंजामी वृत्तीही पूर्वी इतकी जहाल राहिली नाही. स्त्री-पुरुष आता जवळजवळ समान पातळीवर आले आहेत. पूर्वीच्या आजी-आजोबांचे फोटो आठवतात का? करारी चेह-याचे, मिश्यांना पीळ दिलेले "मालक" काळ्याभोर लाकडाच्या खुर्चीवर आसनस्थ झाले आहेत. मालकांच्या मागे त्यांची "वस्तु (?)" वामांगी खुर्चीवर हात ठेवून उभी आहे. "वस्तु" पैठण्या-दागिन्यांनी मढलेली असूनही चेह-यावरचे आश्रिताचे भाव लपलेले नसायचे. कारण वस्तुने मालकांच्या मागे व्यवस्थित डोईवर पदर घेऊन नाममात्र उभे राहायचे असते, हे पढवलेले गौणत्व म्हणजेच एक प्रकारचे शालीन, कुलीन स्त्रीत्व समजायचे ना तेव्हा? आत्ताच्या मधु-मालतींचे फोटो पहा! छानपैकी एकमेकांच्या बाजूला उभे राहून हसतमुख फोटो!

पूर्वी सारखी "खानेसुमारी"ही राहिली नाही आता. छान छोटे-छोटे समद्वीभुजत्रिकोण आहेत आता घरोघरी! आता आवश्यकता आहे ती आपापसांतील सामंजस्य, मोकळेपणा वाढवून समानता वृद्धिंगत करण्याची!

भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे।

मंजिरी | 10 March, 2011 - 05:05

खो बद्दल धन्यवाद सावली!

बर्‍याच जणांनी वेगवेगळे मुद्दे नेमकेपणानी मांडले आहेत. मी माझा मुद्दा नीट मांडु शकेन की नाही, माहीत नाही. पण ह्या निमित्तानी माझा स्वानुभव लिहिते.

लग्नानंतर माझ्या सासूबाईंमुळे आलेला स्त्रीमुक्तीचा किंवा स्त्री समानतेचा आलेला पहिला अनुभव मला इथे शेअर करावासा वाटतो.
माझ्या सासूबाई तुलनेनी लहान गावातल्या, बरीचशी व्रतवैकल्य, उपास-तापास करणार्‍या, काही अंशी पारंपारीक रितीभाती जपणार्‍या. त्यामुळे लग्नानंतर मलाही ह्या न पटणार्‍या गोष्टींसाठी झगडावं लागतय की काय, अशी मला धडली भरली होती. पण सासूबाई करत असलेल्या ह्या गोष्टीं माझ्या कामाच्या वेळांमुळे मला शक्य नाहीत आणि महत्वाचं म्हणजे त्यामधे मला रस नाही, हे माझ्या लग्नानंतर लगेचच त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी लगेच मला सांगितलं, "केवळ सासू करत्ये, सासरचे रितीरिवाज आहेत, म्हणुन तुझा विश्वास नसताना तु हे करु नकोस. माझा मुलगा त्याला हे पटत नाही म्हणुन नाकारतोय, तर तुलाही तुझा विश्वास नाही, म्हणुन हे नाकारण्याचा पुर्ण अधिकार आहे. केवळ माझ्या मुलाला सूट आणि तु सून आहेस म्हणुन तुला जबरदस्ती, असं होणार नाही".

इथे पूनम नी लिहिलय तसं आपल्या ईगोंमधून स्त्री जेव्हा दुसर्‍या स्त्रीला मनापासून स्वीकारेल, तेव्हा खरी स्त्रीमुक्ती होईल.

तसंच सासूबाईना समाजकार्याची आवड आहे. अंगात भरपूर धडाडी आहे. गावातल्या आजूबाजूच्या स्त्रियांना त्यांच्या परिनी मदत करतात. पण ही मदत वैयक्तिक पातळीवर करताना एखादीच्या कजाग सासूला, नवर्‍याला आपण पुरुन उरु शकत नाही, तसंच बर्‍याच स्त्रिया घाबरल्यामुळे कायद्याचा आधार घेऊ शकत नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी बर्‍याच पोलिस अधिकार्‍यांशी चर्चा करुन "महिला पोलिस मैत्री संघटना" स्थापन केली. पोलिसांकडे जायला घाबरणार्‍या स्त्रिया आधी ह्या संघटनेकडे जातात आणि त्यांच्या मार्फत पोलिसांकडे जाऊ शकतात.

ह्या बाबतीतही पुन्हा एकदा पूनमनीच लिहिलेला मुद्दा मांडते की "स्त्रीच ही स्त्रीची शत्रू असते, तसंच स्त्री हीच दुसर्‍या स्त्रीची उत्तम मैत्रिण/मार्गदर्शकही होऊ शकते."

प्रत्येक घरातुन मुलांवर प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष रित्या असे समानतेचे संस्कार झाले तर "पुरषासारखा पुरुष असून...." आणि "बाई असुन ही......" ही वाक्य नक्की बंद होतील.

*मुलगा असावा, पर्यायानी वंशाला दिवा असावा ही भावना बर्‍याच समाजात दिसुन येते. पण जपान मधे एक इंटरेस्टिंग गोष्ट बघितली. मुलगा नाही म्हणुन जर जावयाला परंपरागत इस्टेट/व्यवसाय मिळणार असेल, तर त्याला"घरजावई" होऊन बायकोचं आडनाव लावावं लागतं. माझ्या ओळखीत असे तीन जपानी आहेत.

अरभाट | 10 March, 2011

व्यसनमुक्तीबाबत असे म्हणतात की व्यसनमुक्तीचे पहिले पाऊल म्हणजे आपण व्यसनी आहोत हे स्वीकारणे. त्या धर्तीवर स्त्रीमुक्तीचे पहिले पाऊल म्हणजे स्त्री ही मुक्तच असते हे स्वीकारणे. समाज तिला मुक्त करत नसतो, समाज फार तर हे सत्य स्वीकारू/नाकारू शकतो. कुठलाही माणूस हा जन्मतःच मुक्त असतो हे सत्य स्वीकारताना आपल्याला मुक्त म्हणजे नक्की काय हा प्रश्न विचारावाच लागेल. ही मुक्ती सर्व तर्‍हेच्या शोषणापासून आहे. त्यामुळे स्त्रीमुक्ती म्हणजे पुरूषापासून स्वातंत्र्य, पुरूषांची मदत न घेणे इ. इ. असा पुरूषकेंद्रित (परत!) विचार करणे ही घोडचूक ठरेल. आपल्याला शोषणमुक्त समाज पाहिजे आहे, तेव्हा स्त्री, जी समाजाचा एक भाग आहे, तीसुद्धा शोषणमुक्तच पाहिजे. स्त्रीमुक्तीचा विचार स्वयंभू आहे, तो पुरूषाला प्रतिक्रिया म्हणून येऊ नये.

शहरी मध्यमवर्गात बर्‍याचवेळा मला आढळून आले आहे की स्त्रीमुक्तीचा अर्थ केवळ आर्थिक स्वावलंबन एवढाच घेतला जातो किंवा आर्थिक स्वावलंबन हा मुद्दा स्त्रीमुक्तीचा फार मोठा भाग व्यापतो. आर्थिक स्वावलंबन हा स्त्रीमुक्तीचा केवळ एक भाग आहे हे समजणे महत्त्वाचे. याउलट, स्त्री ही ज्या समाजाचा, कुटुंबाचा भाग आहे तिथे तिला पुरूषाइतकेच निर्णयस्वातंत्र्य असणे सर्वात आवश्यक. मला नेहमीच प्रश्न पडतो, जर एखादी स्त्री आर्थिकदृष्ट्या नवर्‍यावर अवलंबून असेल, परंतु त्या कुटुंबाच्या निर्णयप्रक्रियेत नवराबायको यांना समसमान स्थान असेल तर तिला मुक्त स्त्री म्हणायचे की नाही? पूर्णवेळ घरकाम करणार्‍या स्त्रिया 'कमी मुक्त' व पैसे कमावणार्‍या स्त्रिया 'अधिक मुक्त' हे ठोकताळे मला पूर्ण पटत नाहीत. पैसे कमावले म्हणजेच समाजाला/कुटुंबाला सहभाग दिला असेही मला वाटत नाही. एखादी व्यक्ती (स्त्री/पुरूष) पूर्णवेळ घरी थांबून कुटुंबव्यवस्थापन करत असेल तर तेही तितकेच 'उत्पादक काम' असते. पण हे आपण समजून घेत नाही असे वाटते. त्यास अनुत्पादक समजणे याला कारण केवळ पुरूषवर्चस्ववाद नाही, तर भांडवलशाही विचारसरणीदेखिल कारणीभूत आहे. घरकाम कनिष्ठ दर्जाचे ठरवणे हे पुरूषी मनोवृत्तीला सोयिस्करच होते. पण त्याच वेळी स्त्री ही एक ग्राहक होऊ शकते हे लक्षात आल्यावर स्त्रीने कमावणे हे भांडवलशाही विचारसरणीला अत्यावश्यक झाले. त्यामुळे सामदामदंडभेद वापरून सर्व समाजाचेच ब्रेनवॉशिंग केले गेले; परिणामतः पूर्णवेळ गृहिणी असणे या कामाला अनुत्पादक समजले जाऊन ते कमी प्रतिष्ठेचे मानले जाऊ लागले व 'कमावती स्त्री' ही 'मुक्त स्त्री'ची पहिली पायरी झाली. आता 'घरकाम = बद्धता' इतके ठोकळेबाज समीकरण आपल्या डोक्यात तयार झाले आहे. ('अमुकतमुक हाउसवाइफ आहे' हे ऐकल्यावर आपल्याला मनात खरे काय वाटते ते तपासून पाहिले की कळते!) स्त्रीवादाचे इतके सामान्यीकरण (ट्रिव्हियलायझेशन) पाहिले की स्त्रीवादाच्या वैचारिक मुलाम्याखाली स्त्रीला शेवटी एक 'कमोडिटी'च तर केले गेले नाही ना? असा भयकारक प्रश्न मला पडतो.

याच संदर्भात स्त्रीच्या गर्भधारणक्षमतेचा विचार मांडावासा वाटतो. माझ्या मते मूल होऊ द्यावे की नाही इथपासून ते केव्हा होऊ द्यावे हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी स्त्रीचा असतो. स्त्रीची गर्भधारणा हा पुरूषाचा हक्क अथवा अधिकार होऊ शकत नाही, तो सर्वस्वी स्त्रीचाच असेल. अर्थात, एखाद्या स्त्रीने विचारणा केली तर नकार देण्याचा हक्क पुरूषाला आहे, कारण गर्भधारणा हा स्त्रीचा मूलभूत हक्क नाही. आता कौटुंबिक सहजीवनात हा निर्णय दोघे घेतात हे खरे. पण तेव्हा स्त्री स्वतःहून या अधिकारात पुरूषाला सहभागी करून घेते म्हणून ते शक्य होते. याची जाणीव पुरूषांनी ठेवणे आवश्यक आहे असे मला वाटते. आता जर हा सर्वस्वी तिचा हक्क आहे हे मान्य केले तर ही क्षमता 'कमोडिटाइज' करण्याचा अथवा न करण्याचा अधिकारही सर्वस्वी तिचाच असायला पाहिजे असे सध्यातरी मला वाटते. अर्थात, यावर अधिक विचारमंथन अपेक्षित आहे.

टण्याने योनीशुचितेच्या जोखडाचा उल्लेख केला आहे. त्याचा आता आपण गांभीर्याने कळत नकळत विचार करत आहोत. आपल्या आजूबाजूला 'व्याभिचार, स्वैराचार' इ. म्हणून ज्या घटनांची आपण निंदा करतो, त्या घटना आता सर्रास घडतात. त्या घटनांना अनेक पैलू आहेत हे मान्यच आहे, पण त्या घटनांची वारंवारता पाहता एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे योनीशुचितेच्या जुलमी जोखडातून स्त्री हळूहळू मुक्त होऊ पाहत आहे. हे मला एक चांगले लक्षण वाटते.

अवलंबित्व व शोषण हे दोन्ही एकच नसतात. आपण समाजाचा भाग आहोत, कुटुंबाचा भाग आहोत. हे 'सहजीवन' आहे. साहजिकच, त्यात परस्परावलंबन येणारच. त्यामुळे आपल्याला अवलंबित्व व शोषण हे वेगळे करता येणे आवश्यक ठरते. हा मुद्दा ठसला तर नवराबायकोची खाती एकच/वेगळी असणे, लग्नानंतर नाव बदलणे/न बदलणे इ. इ. गोष्टींकडे 'त्यांची वैयक्तिक बाब' किंवा 'काही व्यवहार्य मार्ग' एवढ्याच अर्थाने बघता येते, या गोष्टींचा संबंध स्त्रीमुक्तीशी लावणे अनावश्यक ठरते. स्त्रीने पुरूषावर अवलंबून न राहता सर्व साध्य केले पाहिजे, अश्या तर्‍हेचा सूर स्त्रीमुक्तीच्या संदर्भात निघतो. हे स्त्रीवर्चस्ववादाचे रूप वाटते. म्हणजे पुरूषाने स्त्रीची मदत घेतली तर तो 'कमकुवत' ठरतो, हे जसे पुरूषवर्चस्ववादाचे लक्षण आहे तसेच. हे दोन्ही विचार मला आततायी वाटतात. हे दोघे समाजाचे समान घटक आहेत. शांततामय सहजीवनासाठी (मग ते कौटुंबिक असो अथवा सामाजिक) समानता हा मूलाधार आहे. तेव्हा स्त्रियांचे सबलीकरण याचा अर्थ त्यांच्यावरील अन्याय दूर करण्याचे बल प्राप्त करणे असा मी घेतो. हे बळ केवळ त्या स्त्रियांमध्येच नव्हे, तर एक समाजघटक म्हणून माझ्यातही येणे आवश्यक आहे. त्यासाठी मला इतर घटकांना सह घेऊनच वाटचाल करावी लागेल. तेव्हा स्त्रीसबलीकरण म्हणजे सरसकट पुरूषविरोध असा अर्थ घेऊ नये, किंवा स्त्री सबलीकरण म्हणजे पुरुषांशी लढा एवढा संकुचित घेऊन चालणार नाही. तसेच स्त्रीसबलीकरण म्हणजे केवळ स्त्रियांनाच बळ द्यायचे आहे आणि ते इतर स्त्रियांनीच द्यायचे आहे असाही संकुचित अर्थ नव्हे. स्त्रीसबलीकरण हे स्त्रीपुरूष दोघांसाठीही आवश्यक आहे, कारण अन्यायाशी लढा देणे हे आपले सर्वांचेच काम आहे. खासकरून ज्या समाजात पुरूषच बहुतेकवेळा स्त्रीवरील अन्यायास कारणीभूत असतात, तिथे तर पुरुषांना स्त्रीसबलीकरणाचे धडे देणे अधिक आवश्यक आहे. हे जर समाजाच्या सर्व स्तरात घडवायचे असेल तर 'कुटुंब' व 'शाळा' या दोन समाजसंस्थांनी अगदी मुळारंभापासून प्रयत्न करणे आवश्यक आहे. म्हणजे 'स्त्री मुळातच मुक्त आहे, कारण ती एक मानव आहे' इथपासूनच बाळकडू पाजावे लागेल. थोडक्यात, समोरच्या व्यक्तीला प्रथमतः माणूस म्हणून ओळखणे व सर्व प्रकारच्या पिळवणुकीशी लढा देणे हे संस्कार आम्हाला आमच्यावर व पुढच्या पिढीवर करायचे आहेत.

७-८ वर्षांपूर्वीची बदली झाल्यामुळे माझ्या आईला काही काळ नांदेडला रहावे लागले होते. तिथे तिला तिच्या बालपणीच्या एक शिक्षिका भेटल्या व ती त्यांच्याकडेच पेइंग गेस्ट म्हणून रहायची. बाई साहित्यिक पिंडाच्या व महत्त्वाकांक्षी. लग्नानंतर जिद्दीने मराठीमध्ये डॉक्टरेट मिळवली. नवरा बडा आयएएस अधिकारी. त्याची अंदमानला बदली झाली तेव्हा तिकडे गेल्या आणि केंद्र सरकारच्या शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. यथावकाश नवर्‍याची परत बदली झाली. बाईंनी लगेच नोकरी सोडली असती तर सरकारी नोकरीच्या अनेक फायद्यांना मुकल्या असत्या. पण आणखी ५-६ वर्षे करून सोडली तर निवृत्तीनंतरचे फायदे मिळतील असे दिसून आले. तेव्हा त्या एकट्या ५-६ वर्षे अंदमानात नोकरीसाठी राहिल्या. (नवर्‍याचा या निर्णयाला पूर्ण पाठिंबा). तेव्हा लोकांनी अर्थातच वेड्यात काढले - 'असे नवर्‍याला सोडून राहतात का, किती वर्षे, शिवाय कुठे हिची शिक्षिकेची नोकरी कुठे ते आयएएसचे अधिकारपद......' वगैरे वगैरे. पण बाई खंबीर राहिल्या. तेवढा कार्यकाल पूर्ण करुनच तिथून परतल्या. (ही घटना चाळीसेक वर्षांपूर्वीची). साधारण तीसेक वर्षांपूर्वी नवरा निर्वतला. अजूनपर्यंत बाई तेच मंगळसूत्र व भलामोठा कु़ंकवाचा टिळा लावून असतात. याउप्पर, दरवर्षी साग्रसंगीत वटसावित्री साजरी करतात. त्यावरही अर्थातच टीकाटिप्पणी झालीच. आई तिथे असताना वटसावित्रीचा सण आला. बाईंनी सांगितले, "चला, वडाला प्रदक्षिणा घालायला जायचे आहे." माझी आई तेव्हा पन्नाशीच्या वर. माझ्या मोठ्या बहिणीनेसुद्धा तिला कधी वटसावित्री साजरी करताना पाहिले नाहीये. अशी माझी आई तिथे असेपर्यंत दरवर्षी त्यांच्याबरोबर वटसावित्रीला वडाला प्रदक्षिणा घालायला जायची. सहवास वाढल्यावर संबंधात मोकळेपणा येतो, सौहार्द येते. तिने एकदा हळूच बाईंना विचारले की तुम्ही अजूनही हे मंगळसूत्र घालता, वटसावित्रीला जाता ते का? तेव्हा बाईंनी ठणकावून सांगितले, "नवरा गेलाय कुठे? तो तर माझ्याजवळच आहे, माझ्या विचारांत आहेच." नवर्‍याचे अस्तित्व व स्वतःचे अस्तित्व यांत कुठलीच गल्लत न करणार्‍या त्या बाई आणि सर्व कर्मकांडे तिच्या तत्त्वांविरुद्ध असताना शाळेतल्या बाईंच्या इच्छेला मान देऊन आनंदाने वडाला प्रदक्षिणा घालणारी आई...... असे वाटते, त्यांनी जे काही केले त्याचे प्रयोजन त्यांना अगदी स्वच्छपणे माहिती होते, प्रयोजनाची व परिणामाची स्वच्छ जाण ठेवून त्या कृती करत गेल्या. मुक्त म्हणजे तरी वेगळे काय असते?

aschig | 10 March, 2011

बऱ्याच अंशी मुक्ती ही मानण्यावर असते, वागण्यावर असते (उदा. शैलजाने लिहिले त्याप्रमाणे). अनेकदा काही स्त्रीया परिस्थीतीमुळे (कधी इतरांना पटु न शकणाऱ्या) तसे मुक्तपणाने वागु शकत नाहीत. त्यांना मार्ग दाखविल्या जाण्याची आवश्यकता असते.

Those who know what they know are simple people, befriend them.
Those who know not what they know not are foolish people, beware of them.
Those who know not what they know, are sleeping people, awaken them.
Those who know what they know not, are wise people, learn from them.

बऱ्याचशा स्त्रीया वर उल्लेखलेल्या sleeping mode मध्ये असतात. त्यांच्या मनाला ती स्थीती जाणवुन देण्याची आवश्यकता असते. मनाची मुक्ती सर्वात महत्वाची आहे. मनानी मुक्त होणे हे आवश्यक आहे पण पुरेसे नाही. तोपर्यंत तुम्ही denial मध्ये असता - आपण योग्यप्रकारे केलेल्या गोष्टी पुरेशा वाटतात (उदा. मी हुंडा दिला/घेतला नाही). तुमच्या बाबतची असमानता तुम्हाला दिसत नाही. साजिराचे गाण्याचे उदाहरण, अजुन कुणाचे बांगड्यांचे, अश्विनीमामींचा धार्मीक गोष्टींचा उल्लेख वगैरे.

मनाच्या मुक्तीनंतर वाट किती खरतड आहे हे उमगु लागते. अरुंधतीने लिहिलेले आकडे बोलके आहेत पण ते कुणाला दाखवु नका. कारण त्यावरुन हेच दिसते की सगळे तेच (त्याच गोष्टी) करतात. आणि जेंव्हा एखादी गोष्ट सगळे करतात तेंव्हा ती समाजमान्य/लोकमान्य आणि म्हणुनच बरोबर/खरी/योग्य ठरते.

बाकीचे हुंडा घेतात तर मीच का नाही घ्यायचा? बाकीच्या बायका चुपचाप घरी राबतात तर मीच का हे (किंवा ते) करायचे. खरेतर असा explicit विचारही होत नाही - कारण आजुबाजुला तसेच होत असते आणि बहुतांश बायका देखील (वीचार न करताच) त्यास हातभार लावत असतात. पुरुषांचा दोष नाही? अर्थातच आहे, पण ते केवळ फायदा उठवतात. त्यांना विरोध केल्या गेल्यास काय करतील ते? पण पुन्हा तेच प्रश्न येतात - कुटुंबाकरता पडते घ्यायचे (केवळ बाईनेच?), समाज काय म्हणेल, माझ्या आईवडीलांना सासरचे काय म्हणतील?

वाचकांपैकी काहींच्या लग्नात हुंडा दिल्या/घेतल्या गेला असल्यास तो ते परत करु शकतील? करतील? Charity begins at home. केलात परत (किंवा तत्सम काहीही केलेत तर त्याचा जाजावाजा जरुर करा - निदान काही लोकांना त्यामुळे तशी पावले उचलायला मदत होऊ शकेल). तुमच्या डॉक्टर मित्रमैत्रीणींना ते गर्भार बायकांची सोनोग्राफी करत तर नाहीत ना असे विचारणार? (आणि करत असल्यास थांबवायला उद्युक्त करणार?)

Each one, teach one प्रमाणे प्रत्येकाने (स्त्री व पुरुष) स्वत: मुक्त होऊन (निदान) अजुन एका व्यक्तीला मुक्ती मिळावुन द्यायचा वसा घ्यायला हवा. स्त्रीयांनी याबाद्दल आपल्या मुलाशी, नवऱ्याशी, आईच्या नवऱ्याशी, सासुच्या नवऱ्याशी, घरी काम करणाऱ्या बाईच्या नवऱ्याशी, अशक्य नसल्यास शेजारणीच्या नवऱ्याशी या विषयावर बोलायला हवे. पुरुषांनी मुलीशी, बायकोशी, आईशी, सासुशी ...

बोलणे पुरेसे नाही, पण ती सुरुवात ठरु शकेल. कोणते मुद्दे ते अनेकांनी सुंदररीत्या मांडले आहेच. खऱ्या स्वर्गाची आवश्यकता पृथ्वीवरच आहे. आणि तो सर्वांकरता असणे आवश्यक आहे. तो सर्वांचा अधिकारच आहे मुळी.

जानेवारी महीना केरळात अनेक मास्टर्स लेव्हल क्लासेसना शिकवण्यात घालवला. केरळात स्त्रीभृण हत्येचे प्रमाण नगण्य. नैसर्गीकरित्या मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त असते. तिथे ते त्याही पेक्षा जास्त आहे. मास्टर्सच्या वर्गांमध्ये ८० टक्के मुली. मुले गल्फमध्ये जातात किंवा ईंजीनीअरींग वगैरे. पण म्हणुन या मुली बुद्दु नसतात. त्या ही हुशार असतात. अनेक ठिकाणी निवडल्या जातात आणि मग पालकांचा न ना चा पाढा सुरु होतो. शिक्षकांचा निरुपाय होतो, देश व मानवता चांगल्या तज्ञांना मुकते. या शिक्षकांना एक सल्ला दिला - या मुलींना आई-वडीलांचे ऐकु नका असे सांगणे तुम्हाला कठीण जाईल, मुलींनाही तसे करायला. पण तुम्ही त्यांना हे नक्कीच सांगु शकता की तुम्हाला जेंव्हा मुली होतील तेंव्हा त्यांच्यावर ही परिस्थीती नका येऊ देऊ. पाहु किती ऐकतात ते.

तुमच्यापैकी शिक्षणक्षेत्राशी संबंधीत लोक स्त्रीमुक्ती बद्दल सर्वाधीक करु शकतात. नोकरी-धंद्यात तुमच्या हाताखाली असलेल्यांपर्यंत तुम्ही या बद्दलचे विचार नेऊ शकता. नंतर मात्र तो थोडाफार ज्याचा-त्याचा प्रश्न बनतो. लिबियाला कोणीतरी ट्युनिशीया/ईजिप्त बनायची वाट पहावी लागते.


मो | 10 March, 2011 - 17:33

पराग खो बद्दल धन्यवाद.

सगळ्यांनीच एवढं भरभरुन आणि चांगलं लिहिलय, की माझ्याकरता फार असं वेगळं लिहिण्यासारखं काही नाही आहे. सगळ्यांचीच स्त्रीमुक्तीबद्दलची मतं ही कुठेतरी माझ्या मनातल्या स्त्रीमुक्तीच्या व्याख्येत दडलेली आहेत. सगळ्यांनी लिहिलेली जी बरी वाईट उदाहरणं आहेत, ती मी सुद्धा माझ्या आसपास पाहिलेली आहेत. मग असं काही वेगळं आहे का की जे स्त्रीमुक्ती म्हटलं की माझ्या मनात येतं?

लहानपणी मुलगी म्हणून कधी वेगळी वागणूक मिळाली नाही त्यामुळे ह्या गोष्टीचा कधी विचारच केला गेला नव्हता. नंतर जेंव्हा मोठे झाल्यावर पाहण्यात, कानावर किंवा वाचनात एकएक गोष्टी यायला लागल्या तेंव्हा जाणवलं की एखादी व्यक्ती केवळ स्त्री आहे म्हणून तिला आयुष्य किती वेगळ्या प्रकारे जगावं लागू शकतं!

स्त्रीमुक्तीबद्दल विचार करताना मला जाणवलं की मी तिला तीन पातळ्यांवर पाहते.
फार खोलात न जाता, अगदी अगदी मुलभूत पातळीवर माझ्याकरता स्त्रीमुक्तीची पहिली पातळी आहे * आपण स्त्री असल्यामुळे आपल्याला वेगळी/अन्यायपूर्णक वागणूक मिळतेय का हे पडताळून पाहण्याची स्त्रीमध्ये जाणीव निर्माण होणं/करुन देणं. स्वतःला सक्षम बनवण्याकरता तिने प्रयत्न करणं. * दुसरी पातळी "स्व" पेक्षा समाजाच्या स्त्रीकडे बघण्याच्या दृष्टीकोनाकडे भर देते * समाजाने स्त्रियांकरता वेगळे निकष न लावता एक माणूस म्हणून स्त्रीला वागणूक देणं * निसर्गाने स्त्री आणि पुरुष हे दोन वेगवेगळे जीव निर्माण केले आहेत, काही बाबतीत पुरुषाला चढतं माप दिलं आहे तर काही बाबतीत स्त्रीला. माझ्या मते वरील दोन पातळ्या ओलांडल्यावरच * शक्य आणि योग्य तिथे स्त्री पुरुष समानता * ह्या तिसर्‍या पातळी पर्यंत आपण पोहोचू शकतो.

स्त्रीमुक्तीच्या बाबतीत, मी, माझा समाज आणि भोवतालचे जग कुठे आहे ह्याबद्दल मला काय वाटतं हे जाणून घेण्याकरता मी स्वतःला वेगवेगळे प्रश्न विचारुन पाहिले. मनात असंख्य प्रश्न आले, पण त्यापैकी अगदी थोडे मी खाली लिहिले आहेत.

१. वैयक्तीक-
१) मला मोठं होताना कधी मुलगी म्हणून कोणत्याही प्रकारे घरी वेगळी वागणूक मिळाल्याचे जाणवले का?
२) मला दुसर्‍या गावी/देशी उच्च शिक्षणाची संधी मिळाल्यावर मुलगी म्हणून कधी काही निर्बंध आले?
३) मला माझा जोडीदार निवडताना मुलगी म्हणून काही तडजोड करावी लागली?
४) लग्न झाल्यावर शिक्षण, नोकरी, मुल कधी होऊ देणे इ. गोष्टींसाठी कधी काही दबाव आला का?
५) घरातल्या कुठल्याही छोट्या/मोठ्या निर्णयामध्ये माझ्या मताला किती किंमत असते?
६) मला नोकरीच्या ठिकाणी स्त्री असल्यामुळे कधी कोणत्या अन्यायाला तोंड द्यावे लागले का?
७) मला स्वतःला स्त्री असल्याबद्दल कुठे काही कमीपणा वाटतो का? का अभिमान वाटतो? (का काही फरक पडत नाही?)

वरील प्रश्नांची मी माझ्याकरता उत्तरे देता वैयक्तीक पातळीवर मला स्वत:ला स्त्री म्हणून मुक्त वाटते. आजकाल बर्‍याच मोठ्या शहरांमध्ये कमीअधिक प्रमाणात सुसंस्कृत, सुशिक्षीत घरांमधल्या मुलींचेही हेच मत असेल. पण तेच आपण शहरांकडून गावांकडे आणि गावांकडून खेड्यांकडे, मुक्त विचारांच्या कुटुंबांकडून कंझर्व्हेटिव्ह विचारसरणींच्या कुटुंबांकडे, काही लोअर इन्कम कुटुंबांकडे (ह्या सगळ्यांमध्ये अपवादही असतात हे ही लक्षात घ्यावे) जायला लागल्यावर चित्र बर्‍याच प्रमाणात पालटत असल्याचे दिसून येते. स्त्रीचा आयुष्यात लग्न करणे, मुले निर्माण करणे, त्यांचे संगोपन करणे, घर सांभाळणे, मोठ्याची सेवा कारणे ह्याच गोष्टी असतात ही भावना असते, किंबहुना त्याशिवाय त्यांचे काही विश्व असू शकते ही जाणिवही नसते. मी आणि माझ्या सारख्या इतर मैत्रीणी वैयक्तीक पातळीवर जरी स्वतःला मुक्त समजत असलो तरी आमच्या इतर असंख्य भागिनींना असे काही असते ह्याची कल्पनाही नसते. तो बदल घडवून आणण्याकरता, आत्मविश्वास वाढवण्याकरता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मुलींचे शिक्षण आणि त्यांना स्वावलंबी होण्यास मदत करणे. शिक्षाणाने किती नवनवीन दालने उघडू शकतात ह्याची त्यांना जाणीव करुन देणे.

२. सामाजिक (मी भारतीय समाजाचे उदाहरण घेतले आहे)
१) आपल्या समाजात हुंडाबळी होतात का?
२) आपल्या समाजात स्त्रीभृण ह्त्या होते का?
३) मुलींना मुलांएवढी शिक्षणाची संधी मिळते का?
४) मुलींना आपला जोडीदार निवडण्याचा हक्क आहे का?
५) स्त्रिया निर्भयतेने अपरात्री बाहेर पडू शकतात का?
६) स्त्रियांना नोकरीमध्ये पुरुषांएवढ्या संधी मिळतात का?
७) घराची/मुलांची जबाबदारी पुरुष स्त्रियांच्या बरोबरीने पार पाडतात का?

शिकलेल्या सुसंस्कृत समाजामध्ये आणि इतर सामजिक घटकांमध्ये ह्यातल्या काही प्रश्नांचीची वेगवेगळी उत्तरे आहेत. पण जे मी वाचते, ऐकते, पाहते त्यावरुन सामजिक पातळीवर ह्यातल्या जवलपास सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मला फार निराशाजनक वाटली. सकृतदर्शनी मोठ्या शहरांमध्ये परिस्थिती जरी बदलत असली अश्या उदाहरणांचे प्रमाण अगदी नगण्य प्रमाणात आहे. ह्याकरता समाजाचा दृष्टीकोनच बदलायची गरज आहे आणि दुर्दैवाने ही एक संथ प्रक्रिया आहे.

३. वैश्विक
१) जगामध्ये विविध देशा/खंडांमध्ये स्त्रियांकरता कशा प्रकारचे वातावरण आहे
मध्यपुर्वेतल्या किंवा अफ्रिकेतल्या स्त्रिया पाहता भारतातल्या सर्व स्त्रिया खूप मुक्तपणाने जीवन जगतात असे म्हणण्याची वेळ येईल. थोड्या दिवसांपूर्वी मध्यपूर्वेतल्या तरुणांबद्दल एक पुस्तक वाचले. लेखक मध्यपुर्वेतल्या काही देशात (इराण, सिरिया, लेबनॉन, इराक) जाऊन तिथल्या तरुणांना भेटून, त्यांच्याशी त्यांच्या देशाबद्दल, त्यांच्या आशा-आपेक्षांबद्दल बोलून आला. त्यात त्याने बर्‍याचश्या तरुणींच्या ही मुलाखती घेतल्या. इराणमधल्या स्त्रियांचे सद्य आयुष्य, त्यांची स्वप्नं, सरकारबद्दलचा राग, आणि बंधनकारी आयुष्याबद्दल खदखदणारा संताप हे वाचून शहारुन आले. इराण, अफगाणीस्तान सारखे देश, स्त्रीमुक्तीच्या बाबतीत उलटा प्रवास करत आहेत. तोच प्रकार बर्‍याच अफ्रिकेतल्या देशांमध्येही आहे. ह्या देशातल्या स्त्रियांना माणूस म्हणून जगणे सुद्धा अवघड होतेय, मुक्ती दूरची गोष्ट.

पण सगळीच परिस्थिती निराशाजनक नाही आहे. आपल्या आणि जगातल्या इतर काही समाजांमध्ये गेल्या २००० वर्षात स्त्रियांना जेवढे स्वातंत्र मिळाले नाही त्यापेक्षा किती तरी जास्त गेल्या १०० वर्षात मिळाले आहे. जगातल्या बर्‍याच भागात कमी अधिक प्रमाणात ही स्थिती हळू हळू येत आहे. आपले जीवन वेगळेही असू शकते की कल्पनाच पूर्वी नव्हती, पण गेल्या ५० वर्षात फोन, टेलीव्हिजन, इंटरनेट इ. मुळे जग खूप जवळ आले आहे, आणि आपण वेगळ्या प्रकारे, अधिक स्वतंत्रपणाने ही जगू शकतो, ही कल्पना स्त्रियांच्या मनात रुजत आहे. सामाजिक बंधनंही आधी पेक्षा जास्त शिथील होत चालली आहेत. शास्त्रज्ञ, अंतराळवीर, निर्मात्या, कंपन्यांमध्ये मोठमोठ्या हुद्यांवर, व्यवसाय चालवणार्‍या, लेखिका, नाटका-चित्रपटांमध्ये अभिनेत्या ... अश्या किती तरी, एकेकाळी अशक्या वाटले असते, अशा ठिकाणी स्त्रिया दिसून येत आहेत.

पाश्चात्य देशात तर स्त्रिया सध्या बर्‍याच प्रमाणात ह्या स्त्रीमुक्तीच्या खूप जवळ जाणारे जिवन जगत आहेत.
स्त्रीमुक्तीपासून आपण जरी खूप दूर असलो तरी त्या दिशेने आपली वाटचाल सुरु आहे, हा ही एक किती मोठा आशेचा किरण आहे!

बेफिकीर | 10 March, 2011 - 23:40

१. गर्भधारणा, नवीन जीवास जन्माला घालणे व काही प्रमाणात 'बाळाचे संगोपन' (जसे फीडिंग व स्पर्शाची / मायेची उब देणे) या व्यतिरिक्त बहुधा असे एकही काम स्त्री करत नसावी (दुरुस्त केल्यास स्वागत आहे) जे पुरुष करू शकत नाही. (देहातील जेनेटिक लॉक्समुळे दोन भिन्न लिंगी शरीरांचे मीलन ही गर्भधारणेसाठी आवश्यक बनलेली बाब आहे, निसर्गाने तसे लॉक काढून टाकले तर एकच माणूस, म्हणजे एकच स्त्री किंवा एकच पुरुष प्रजनन करू शकेल, हा भाग वेगळा व ते शक्यही आहे.)

२. पुरुष करू शकत असलेल्या कामांमधील ( स्त्रीस गर्भ राहावा यासाठी असलेल्या सहभागाव्यतिरिक्त) अनेक कामे अशी आहेत जी स्त्रिया एकतर 'करत नाहीत किंवा करू शकत नाहीत किंवा करू इच्छीत नाहीत'. 'करत नाहीत' मध्ये (आपल्या संस्कृतीच्या संदर्भात) समाजाभिमुखतेत वाढ करणे (यात शहरी स्त्री व्यतिरिक्तच्या स्त्रिया अधिक), 'करू शकत नाहीत' मध्ये अनेक श्रमाची किंवा शारिरीक ताकदीची कामे व 'करू इच्छीत नाहीत' मध्ये अनेक प्रकारची कामे आली.

३. वरील दोन बाबींमुळे (पुन्हा आपल्याच संस्कृतीत प्रामुख्याने) स्त्रीकडे पाहण्याचा पुरुषांचा, समाजाचा व खुद्द स्त्रियांचा दृष्टिकोन 'ही तर एक स्त्रीच आहे' असा बनतो. यात लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्व आले. हा दृष्टिकोन शतकानुशतके चालत आलेला आहे. 'ही एक स्त्रीच आहे' या दृष्टिकोनाचा सर्वसाधारण अर्थ 'ही काय करणार / ही काय करू शकणार / ही काय करू इच्छिणार' असा असावा. हा दृष्टिकोन बाळकडू पाजल्याप्रमाणे स्त्रीलाही पाजला जात असावा. यातूनच स्त्रीदाक्षिण्य, स्त्रीकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहणे व स्त्री ही कुटुंबाची अब्रू समजली जाणे हे कॉम्पोनन्ट्स येणार! सार्वजनिक ठिकाणी स्त्रीला पुरुषांच्या तुलनेत दिल्या जाणार्‍या 'दयाळू' सुविधा (जसे बसमध्ये खास महिलांसाठी राखीव सीट्स वगैरे) हे स्त्री दाक्षिण्य! रस्त्यावरून १५ ते ५५ या वयाची स्त्री चालत जात असताना तिच्या हालचाली निरखण्यापासून ते कामाला असलेल्या स्त्रीचे शोषण करणे हे स्त्रीकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहणे! छेडछाड, विनयभंग, शोषण, बलात्कार या स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये आरोपीपेक्षाही स्त्रीच्या कुटुंबियांनाच मानहानी झाल्यासारखे वाटणे म्हणजे 'स्त्री ही कुटुंबाची अब्रू आहे' असे मानणे!

वरील मुद्दे हे स्त्री मुक्त नाही असे दर्शवणारे मुद्दे आहेत असे माझे मत आहे. या व्यतिरिक्तही कदाचित स्त्री पारतंत्र्यात असल्याचे अनेक प्रकार / उदाहरणे असतीलही, वरील मुद्दे हे फक्त वैयक्तीक मत आहे.

माझ्या मते उपायः

१. स्त्रीची शारिरीक ताकद कमी असण्यामुळे व लैंगीक शोषण होण्याची शक्यता असल्यामुळे सार्वजनिक व कौटुंबिक पातळीवर तिला 'दाक्षिण्य' दाखवणे व तसे नियम असणे हे योग्यच आहे.

२. मात्र स्त्रीने चक्क जवळ एक हत्यार बाळगावे. ज्या अब्रूला घाबरून स्त्री राहते त्या अब्रूसही तिने तिचे हत्यार बनवावे. मध्यंतरी एक चौदा वर्षाचा मुलगा त्याच्या समवयीन मित्राला रस्त्यावरची एक प्रौढा दाखवून निर्लज्जपणे हासत होता. त्या स्त्रीने वळून चारचौघांसमोर कानाखाली ओढली किंवा आवाज जरी चढवला तरी इतपत चांगुलपणा समाजात (नक्की) असावा की लोक धावत येऊन तिला त्या परिस्थितीतून वाचवतील व त्या आरोपींना सज्जड दम देतील किंवा शिक्षा देतील. अगदी चांगुलपणा म्हणून नसले तरी 'तथाकथित पुरुषार्थ' म्हणून तरी येतील. स्त्रीने स्वसंरक्षणार्थ एखादे हत्यार जवळ ठेवावे असे मला वाटते.

३. शिक्षण, नोकरी, संशोधन व इतर कित्येक अत्युच्च व्यावसायिक पातळ्यांवर स्त्री पोचलेली आहेच. आमच्या ओळखीत एन गृहस्थ होते (नाव मुद्दाम देत नाही) ज्यांच्यावर कमिन्स इन्डियामध्ये अफरातफरीचा आरोप झाला व त्यांनी नोकरी सोडली. पुढची वीस वर्षे त्यांच्या पत्नीने नोकरी केली व नवरा व दोन मुले यांचे घर स्वसामर्थ्यावर सांभाळले. तो आरोप खोटा होता हे पुढे सिद्ध झाले. मात्र ते गृहस्थ कायम नम्रपणेच वागायचे. ते म्हणायचे, मी घरातील सगळे काम करतो, त्यात काय लाजायचंय, ही नोकरी करते म्हणजे मलाच घर आणि मुले बघायला हवीत. हा स्वभाव प्रत्येक पुरुषाचा नसणारच! पण नोकरी करणार्‍या स्त्रियांनी अत्यंत धीर धरून आणि 'इन्स्टन्ट' यशाची कोणतीही अपेक्षा न बाळगता प्रयत्न चालू ठेवले तर २०४० पर्यंत तरी निश्चीतच अशी परिस्थिती येईल जेव्हा स्त्रीला कर्ती स्त्री असेच समजले जाईल.

माझ्यामते संगणक, परदेशातील नोकर्‍या, वेगवान युग, संचारध्वनी फोन्स, आंतरजाल या सर्व घटकांमुळे तौलनिकदृष्ट्या १९६०, १९८० व १९९० पेक्षा आजची स्त्री अधिक मुक्त आहेच. बहुतेक हे असेच चालू राहिले तर स्त्री पूर्णपणे स्वतंत्र, मुक्त व पुरुषांवर आर्थिक / सामाजिक स्थानासाठी / प्रेम व मैत्री यासाठी अजिबात अवलंबून नसण्याची पातळी येणे हा फक्त काळाचाच प्रश्न राहील. जसजसा वेळ जाईल तसतशी ती मुक्त होत जाईल. शहरी स्त्रीचे जीवन झिरपत झिरपत सर्व थरांपर्यंत पोचू शकेल.

हा जो मुद्दा आहे तो विनोदाचा भाग नाही, मात्र 'स्त्री मुक्ती' काही स्त्रियांच्या बाबतीत इतकी पराकोटीला पोचलेली असते की अशा वेळेस खरच पुरुषांना काहीतरी खास स्थान दिले जावे की काय असे वाटावे. स्त्री ही फक्त कायम भोग भोगणारी, दास्यत्व स्वीकारणारी, खाली मान घालणारी अशीच असते असे मुळीच वाटत नाही. (अशीच असावी असे म्हणायचेच नाही आहे, तेव्हा त्यावर कृपया चर्चा होऊ नये.) पण मी जे काही स्त्री मुक्ती या क्षेत्रातील कार्य पाहिले त्यात तरी अशा स्त्रिया प्रामुख्याने सहभागी होत्या ज्या मुळातच मुक्त होत्या. त्यांनी काही स्त्रियांना खरच मुक्त केले असले तर चांगलेच, पण तसे वाटत नव्हते.

हे लिहिण्याचे कारण इतकेच की : आज स्त्री मुक्ती या विषयावर आपण ज्या पातळीवर विचार मांडत आहोत (मायबोलीचे व्यासपीठ) ती पातळी प्रत्यक्षात पारतंत्र्यात असलेल्या ग्रामीण भागातील स्त्रियांपासून दुर्दैवाने खूपच दूर आहे. तेथे जाऊन काही कार्य करण्याचे ठरवता येईल काय?

प्राजक्ता_शिरीन | 11 March, 2011

प्रसंग १- अगदी मागच्या आठवड्यातला प्रसंग. मी नवीन दुचाकी शिकून घराच्या जवळपास चालवत होते, तर हवा कमी असं एकाने सांगितलं म्हणून जवळच्या दुकानात गेले, तिथे एक डोक्यावरून पदर घेतलेली बाई पुढे आली - पंक्चर आहे ना विचारत, माझ्या मनात लगेच विचार - हिला काय कळत असेल ??
नंतर खरचं टायरचं पंक्चर तिने ज्या सफाईने काढलं, मी थक्क झाले , पदर डोक्यावर घेउन ती इतकी पटापट सगळी कामं करत होती, दुसर्या एकाच्या टायरची ट्युब बदलायला लागणार होती, तिला वाचता येत नाही म्हणून तिने मला विचारलं की जरा बघा, त्या वेळी वाचता येत नाही ही खंत तिच्या डोळ्यात दिसत होती. स्त्री-मुक्ती वगैरे भानगडी तिला माहीत नसतील भले, पण आज नवर्याच्या सोबतीने काम करून ती घर चालवत्ये हे विशेष.

माझ्या मते स्त्री-मुक्ती म्हणजे मुलीला शिक्षण / नोकरी / लग्न / मूल ह्याबद्दल निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य. अगदी गावा-गावात हे विचार रूजतील, तेव्हाचं फुले - कर्वे ह्यांनी सुरू केलेलं कार्य सफल होईल

-आजही घराघरात रात्री ८-९ नंतर मुलगा बाहेर पडला तर नाही विचारणार कुठे जातोय, पण मुलीला नक्की विचारतील (माझा कोणताही भाउ कुठे बाहेर जातोय हे सांगत नाही , घरचे विचारायचे कष्ट घेत नाहीत)
- कोणी मुलगा आर्ट्सला आहे हे ऐकून किती जणं चमकणार नाहीत ? जणू ते फक्त मुलींचं क्षेत्र आहे.

हे जे स्टीरीओटाईप्स आहेत त्यातून समाज बाहेर पडायला हवा.

प्रतिसाद प्रसादपंत | 11 March, 2011

बेफीकीर खो बद्दल धन्यवाद !!
=================================================
नशीबाने / सुदैवाने बर्‍यापैकी पुढारलेल्या समाजात शहरी वातावरणात वाढल्याने " स्त्री मुक्ती चळवळ" म्हणजे नक्की काय हे मला माहीत नाही . पण पाश्चात्यांचे अंधानुकरण करणे ...अर्धनग्न कपडे घालुन "शीला की जवानी " मुन्नी बदनाम हुई " असले अंगविक्षेप करणे .....स्त्रीयांवर होणार्‍या अन्यायाला फक्त आणि फक्त पुरुषी मनोवृत्ती कारणीभुत आहे असे आरोप करणे ......भारतीय लग्न संस्थेत नेहमीच स्त्रीयांवरच अन्याय होतो असे काही तरी बरळुन लग्नसंस्थेला धक्का लावणे ...वगैरे वगैरे ....हे सारे स्त्री मुक्तीत अपेक्षित नसावे ......हा अंदाज आहे .....(चुकीचा असल्यास विपुतुन कळवावे )
================================================
मागे झालेल्या एका चर्चेच्या संदर्भाने ... स्त्रीने कोणते कपडे घालावेत अन कोणते घालु नयेत हे ठरवण्याचा अधिकार फक्त त्या स्त्रीलाच आहे हे मान्य ! ण मुंबईत मिनी कपड्यात वावरणारी मुलगी तसेच कपडे करुन ग्रामिण भागात वावरत असेल तर तो "आ बैल मार मुझे " अशातला प्रकार झाला ....असे वाटते .... अर्थात ग्रामीण भागात जावुन " मिनी कपडे घालणे कसे योग्य आहे " हे पटवुन देणे हा स्त्री मुक्ती चळवळीचा एक भाग असल्यास .....तिथे स्त्रीमुक्ती चळवळ कंमी पडत आहे असे म्हणावे लागेल .
================================================
"काही स्त्रीया स्त्री विशयक कायद्यांचा दुरुपयोग करतात" हे मान्य न करणे, मान्य केलेच तर " अशा स्त्रीयांना सहानभुतीने वागवावे " असे म्हणणे हाही स्त्री मुक्ती चळवळीचा एक भाग आहे की काय असा प्रस्न पडतो बर्‍याचदा..... ================================================ (अवांतरः बाकी मी जितक्या स्त्रीया पाहिल्या त्या नक्कीच किमान माझ्या इतक्या ...कदाचित थोड्या जास्तच "मुक्त" आहेत !)

" दादा , तु गेलास तशीच मी उच्च शिक्षणासाठी बाहेर गावी जाणार आणि मला तुझा सपोर्ट पाहिजे " असे सांगुन घरच्यांचा विरोध न जुमानता बहीण बाहेर गावी गेली ...अन हेच उद्या मी म्हणालो की "पीएच डी ला ५ वर्ष बाहेरच्या देशात जातो" तर आईच्या डोळ्यात पाणी येईल ...

बायकोला कधी माहेरी जाण्या पासुन अडवले नाही अन परवा मी म्हणालो की " १-२ महिने एकटा ट्रेकिंग साठी उत्तरांचल /हिमालयात जावे म्हणतो " तर रडारड ...

माझ्या ऑफीसातील कलीग मस्तपैकी स्लीव्हलेस , मिनी स्कर्ट,सॅन्डल घालुन येत अन आम्हाला भर उन्हाळ्यातही फुल स्लीव्ह चा शर्ट ..वरुन टाय ... अन मीटींग असेल तर ब्लेझर घालावा लागतो ...( स्लीवलेस टी शर्त अन बर्मुडा घालुन गेलो तर हाकलुन देतील )

प्रीतमोहर | 11 March, 2011 - 01:05

वर अश्चिग नी म्हंटल्याप्रमाणे मुक्ती ही मानण्यावर असते. आम्ही मुलींनी मानसिक/ वैचारिक रित्या स्वतःला मुक्त मानण्याची गरज आहे. याबाबतीत मी स्वतःला खूप भाग्यवान मानते की माझ्या घरात माझ्यावर व माझ्या बहिणींवर कसलीच बंधने घातली गेली नाहीत. स्वतःचे निर्णय आम्ही स्वतःच घेतले. पण हे करताना आई बाबा नेहमीच सोबत आहेत हा विचार आत्मविश्वास वाढवत असे. तसेच आई-बाबांनी मोट्ठा विश्वास टाकलाय आपल्यावर त्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जाउ नयेत ही जाणीव ही सतत असायची.

माझ्या व्यवसायामुळे मला कित्येकदा उशीरा घरी परताव लागत . पण म्हणुन त्याबद्दल मला एक शब्दानेही विचारल जात नाही. आणि माझ्या होणार्‍या सासरचे लोकही त्याबाबतीत 'कूल' आहेत . काळजी घे एवढच सांगतात. पण सगळ्याच मुलींना आजुबाजुला अशी चांगली माणस लाभत नाहीत. तेव्हा आपल काही चुकत नसेल तर आपले मुद्दे ठणकाउन मांडले पाहिजेत . किंबहुना ते दुसर्‍याला पटवले पाहिजेत. तरच ही ज्योत प्रत्येक घरात पेटेल.

इथे शहरातही कित्येक लोक मुलींवर बंधन घालतात . माझी मैत्रिण आयुर्वेदीक डॉक्टर आहे. ति कॉलेज अट्टेण्ड करुन, प्रॅक्टीससाठी एका डॉक्टरांकडे जाते. तिथुन गायन क्लास करते व मग घरी येते. घरी येईपर्यंत काही काही वेळेस ८-९ वाजतात. तर मग बोलणी खावी लागतात .घरी येउन आराम तर नाहीच , घरची कामही आटपावी लागतात. मुळात तिच्या आईवडिलांना ती आयुर्वेदिक डोक्टरकी करतेय हेही ठाउक नाहीये. त्यांच्या मते ती एका दुरवरच्या कला महाविद्यालयात शिकतेय. मैत्रिण आईवडिलांना न सांगता गेली साडे पाच वर्षे तिथे शिकतेय . स्वतःच्या फीज, बस्भाडे ह्यांची तजवीज व्हावी म्हणुन फावल्या वेळात ती गाण्याचे कार्यक्रम करते.अर्थात आईवडिलांच्या नकळत!!!! काय बोलाव तेच कळत नाही अश्या आईवडिलांना!!!

अरुंधती कुलकर्णी | 11 March, 2011 - 01:59

व्यवहारातील स्त्रीमुक्ती/ समानता यांचा विचार करताना काही आठवलेल्या/ जाणवलेल्या गोष्टी :

साधारण वयाची चाळीशी उलटलेल्या व स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणार्‍या माझ्या परिचयातील स्त्रियांना स्वतःच्या स्वास्थ्याकडे, आरोग्याकडे लक्ष द्यायला, त्याला प्राधान्यक्रम द्यायला मी आवर्जून सांगते, त्यांना हवी ती माहिती मिळवून देते, गरज पडली तर त्यांच्या घरच्या इतरांनाही त्याबद्दल ठणकावून सांगते. खरंतर स्वतःच्या आरोग्याला प्राधान्यक्रम हे प्रत्येक बाईच्या बाबतीत होणे आवश्यक आहे. पण बहुतेकदा स्त्रिया मुलं, संसार, नोकरी किंवा इतर कारणे सांगून स्वतःच्या तब्येतीची चक्क आबाळ करवून घेतात हे पाहिलंय. आर्थिक दृष्ट्या परावलंबी असतील तर मग झालेच! अनेकजणी स्वतःला आरोग्याची काही समस्या आहे हेच मान्य करत नाहीत, दुखणे अंगावर काढणे - औषधोपचारासाठी किंवा डॉक्टरकडे जाण्यासाठी चालढकल हे तर सर्रास दिसते. जर काही दुखणे असेल तर ते मान्य करण्यातही कमीपणा वाटतो. कॅल्शियम, व्हिटॅमिनच्या गोळ्या घेणे, रेग्युलर चेक-अप करून घेणे हेही कमीपणाचे वाटते. अशावेळी त्यांना त्या गोष्टीचे महत्त्व व्यवस्थित पटवून देणे आवश्यक असते.

फॅमिली प्लॅनिंगच्या बाबतीतही अनेक शहरी, सुशिक्षित घरांमध्ये आजही स्त्रीलाच प्लॅनिंगची सर्व जबाबदारी घ्यायला लागते. पुरुष नसबंदीचे ऑपरेशन करायला राजी होत नाहीत. अनेक वर्षे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह्ज वापरल्यामुळे तब्येतीच्या अनेक तक्रारी उद्भवलेल्या स्त्रिया मी आजही बघते. इथे नवर्‍याला पटवून द्यायला ती बाई कोठेतरी कमी पडली, तिने स्वतःच्या तब्येतीशी तडजोड केली हेच वाटत राहते. तिने नवर्‍याला तयार करायला हवे. त्यासाठी हवी ती मदत घ्यावी.

माझ्या कॉलेजमधील प्राध्यापिका बाईंनी एकदा त्यांच्या तासाला आमच्या वर्गातील सर्व मुलांना शपथ घ्यायला लावली होती की ते हुंडा घेणार नाहीत म्हणून. वर्गात भारताच्या अनेक प्रांतांमधील, विविध प्रकारच्या समाजांतून आलेली मुलं. खास करून केरळ, तमिळनाडू, आंध्र मधील मुलांची संख्या जास्त. ही मुलं परराज्यात शिक्षणासाठी भरपूर पैसा खर्च करून येणारी आणि मग तो पैसा हुंड्याच्या रूपात सासर्‍याकडून वसूल करणारी. आमच्या प्राध्यापिका बाईंनी आधी खूप इमोशनल स्पीच दिले, वर्गातील सर्वांना पार हेलावून सोडले, मग सर्वांकडून शपथा घेतल्या, हुंडा घेणार नाही आणि हुंडा देणारही नाही. काही महिन्यांपूर्वी आमच्या क्लासची रि-युनियन झाली तेव्हा त्या प्राध्यापिका बाई आल्या होत्या. बर्‍याच पोरांनी त्यांना सांगितले, ''मॅडम, आम्ही शपथ घेतल्याप्रमाणे वागलो.'' काहींनी तरीही हुंडा घेतलाच/ दिलाच हेही वास्तव आहे. पण त्या शपथेचा परिणाम कोठेतरी झालाच. हुंडा-मानपान जिथे होणार असेल त्या लग्नांना मी वैयक्तिक रीत्या जात नाही, मग भले ते कितीही महत्त्वाच्या वा नजीकच्या माणसांचे असो.

आर्थिक गुंतवणुकी, नियोजन, आर्थिक विश्वात घडणार्‍या घडामोडी इत्यादींची माहिती अनेक स्त्रियांना नसते व त्यात अरुची असते कारण त्याविषयीचे असलेले मूलभूत अज्ञान. हा प्रश्न त्यांच्याशी त्यांना समजेल अशा भाषेत, समजतील तशी रोजच्या व्यवहारातील उदाहरणे देऊन त्यांना त्याविषयी गप्पांच्या ओघात माहिती देण्याने सुटू शकतो. मुद्दाम 'थांब हं, मी तुला शेअर बाजारातील घडामोडी सांगते किंवा म्युच्युअल फंड्स विषयी माहिती देते' अशा प्रकारे न सांगता रंजक प्रकारे त्यांना माहिती दिली तर त्याही उत्साह दाखवतात. बँक व्यवहार, पैशाच्या व्यवहाराचा त्यांच्या मनातला बागुलबुवा दूर केला तर त्याही ते व्यवहार करू शकतात. तसेच त्यांच्या आर्थिक बाबी त्यांच्या त्या हाताळू लागल्यावर आत्मविश्वास वाढतोच!

काही महिन्यांपूर्वी आमच्या विभागातील कॉर्पोरेटरला भेटायला आमच्या इमारतीतील व आजूबाजूच्या इमारतीतील स्त्रियांचा ग्रुप गेला होता. मला त्या दिवशी त्यांच्याबरोबर जायला काही जमले नाही. पण त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी आमच्या भागात महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह हवे आहे अशी मागणी कॉर्पोरेटरकडे ठणकावून केली. आता त्यांनाच लावले आहे कामाला. दोघी-तिघी बचत गटाच्या सदस्या आहेत. सह्यांचा उपक्रम, मागणीचा अर्ज, भिशीत इतर बायकांनाही त्याबद्दल सांगणे वगैरे करत आहेत.

फक्त महिलाच नव्हे तर ज्यांना महिलांना समाजात व घरात समान स्थान मिळालेले आवडेल अशा पुरुषांनीही ह्या कामात भाग घ्यायला पाहिजे. एकेकट्याने वाटचाल करणे थोडे अवघड असते, पण समूहाने काम करण्याने तीच वाटचाल सुकर होते. एकमेकांना बळ देता येते.

खेड्यांमध्ये आजही स्त्री अशिक्षित, अतिशय कष्टाचे व दुय्यम दर्जाचे आयुष्य काढताना दिसते. तिथे काम करणार्‍या तरुण-तरुणींच्या मेळाव्यात मी माझ्या काही मूलभूत शंका त्यांना विचारल्या. उत्तरे अस्वस्थ करणारी होती. बिकट आर्थिक परिस्थिती - शिक्षणाचा अभाव - अन्न/ वस्त्र/निवारा/पाण्याच्या समस्या - हुंड्यासारख्या प्रथा - पुरुषांची व्यसनाधीनता अशा दुष्टचक्रात अडकलेली तेथील स्त्री खरोखरीच स्वतः होऊन ठरवेल, की आता बास्! तेव्हाच त्या दुष्टचक्राचा भेद होईल. बाहेरच्या संस्था जाऊन तिथे मदत करतात, पण त्या मदतीचा प्रत्यक्ष फायदा त्या स्त्रीला कितपत होतो हे पाहायला गेले तर अनेकदा खिन्नता येते. कारण ह्या संस्था त्या स्त्रीला ''तू सबला आहेस, तू तुला हवं ते साध्य करू शकतेस'' हा आत्मविश्वास द्यायला अनेकदा कमी पडतात. पण तोच आत्मविश्वास एकदा जागृत झाला की ती स्त्री फक्त स्वतःच्याच घरात नव्हे तर समाजात फरक घडवून आणू शकते. आणि दुसरं आहे संघटन. महिला एकत्र आल्या तर त्यांची जी शक्ती असते ती अफाट असते. त्यातून त्या स्वतःत, कुटुंबात व समाजातही विधायक बदल घडवून आणू शकतात.

एक उदाहरण देते : कर्नाटकातील एका प्रकल्पातील गावाला काही वर्षांपूर्वी मी भेट दिली तेव्हा त्या गावातील स्त्रियांची ही मला समजलेली गोष्ट. त्या गावात एके काळी वेश्या व्यवसाय फोफावला होता. कारण, पुरुषांनी हाती होती नव्हती ती जमीन विकून ताडी - दारूत डुबविली, आणि निवांत बसले. आजूबाजूला मोलमजुरीची कामेही नव्हती. ते गाव ट्रक यायचे-जायचे त्या रस्त्याच्या जवळ. मग उत्पन्नाचा हा नवा मार्ग गावातील पुरुषांना सुचला. ज्या संस्थेने त्या गावात मदतीचे कार्य सुरु केले तिच्या लोकांना गावकर्‍यांनी खूप त्रास देऊन पाहिला. पण संस्थेचे लोक चिवट होते. ते जातच राहिले. आधी त्यांनी गावातील मुलांसाठी खाऊशाळा सुरु केली. मुलांमार्फत घरातील मोठ्या मंडळींना साक्षरता वर्गासाठी पटविले. साक्षरता वर्गासाठी जास्त करून बायकाच यायच्या. त्यांना इतर व्यवसायाची तयारी नव्हती. वेश्या व्यवसायात पैसाही बरा मिळत होता. पण त्यातील एक जरा धाडसी मुलगी होती ती वेगळा विचार करायला तयार झाली. तिला वाहन चालवायला शिकविले. ती रिक्षा चालवू लागली. रिक्षेसाठी तिला परवाना मिळवून देणे, कर्ज व्यवस्था करणे इ. ची व्यवस्था त्या संस्थेने केली. व्यवस्थित पैसे मिळू लागले. इतर स्त्रियांनीही वाहन चालवायची तयारी दर्शविली. दोघी - तिघी टेंपो चालवायला लागल्या. त्यांची ऐट गावातल्या पुरुषांना खुपायला लागली. कारस्थानं सुरु झाली. पण ह्या गावातल्या स्त्रिया आता ऐकणार्‍या नव्हत्या. एकतर त्यांचं आपापसात चांगलं संघटन होतं. वेश्या व्यवसाय सोडूनही आपण चांगले उत्पन्न मिळवू शकतो हा आत्मविश्वास आता त्यांना आला होता. पुढे संस्थेने त्यांच्यासाठी शिवणकाम वर्ग, टायपिंग इत्यादी सुरु केले. अजून तिथे बरीच प्रगती बाकी आहे. पण मुख्य म्हणजे तेथील महिलांना आता आत्मविश्वास आलाय. एकमेकींना साथ द्यायची प्रवृत्ती आहे. आता त्या महिलांची पुढची पिढी तयार होत आहे.

मनीष | 11 March, 2011

अरभाटा खो बद्दल परत धन्यवाद. सांगितल्याप्रमाणं काल लिहू नाही शकलो. खरंतर बहुतेक सगळे मुद्दे आधी मांडलेलेच आहेत. त्यात मी काही फारशी भर घालू नाही शकणार.

चार बहिणींनतर माझा जन्म झाला. साहजिकच माझ्या आई-वडिलांना मुलगा पाहिजे होता. पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी कधी बहिणींना कमी लेखले. सर्व बहिणींना व्यवस्थित शिकवलं/वाढवलं. बहुतेक त्यामुळेच मला स्त्रियांना सन्मानाने/बरोबरीने वागवायचे बाळकडू मिळालं असेल. माझ्या लग्नानंतरही सगळ्यात पहिली गोष्ट माझ्या बहिणींनी आणि आईनं कुठली सांगितली असेल तर बायकोला अजिबात त्रास द्यायचा नाही. त्रास दिलास तर आमच्याशी गाठ आहे. माझ्या मते लहानपणापासूनच जर हे मनावर बिंबवले गेले तर जास्त परिणामकारक ठरते.

अरभाटानं म्हणल्याप्रमाणं स्त्रीमुक्ती म्हणजे फक्त आर्थिक स्वावलंबन नव्हे किंवा फक्त समाजातल्या परंपरा (जाचक वा चांगल्या) मोडून वागणं नव्हे. स्त्री मुक्तीला असं कुठल्या व्याख्येत बंद करू शकणार नाही कारण प्रत्येकीच्या दृष्टीनं मुक्तीचा अर्थ वेगळा असू शकतो. काहींच्या बाबतीत सासरी होणार्‍या जाचापासून मुक्ती असेल, काहींच्या बाबतीत आइ-वडिल देत असलेल्या वेगळ्या वागणूकीपासून मुक्ती असेल तर काहींच्या बाबतीत कामाच्या ठिकाणच्या वेगळ्या वागणूकीतून मुक्ती असेल. ढोबळ व्याख्या करायचीच झाली तर स्त्रीनं मुळात खंबीर होणं, आपल्या न्याय्य हक्कांची जाणीव करून घेणं, अन्याय होत असेल तर त्याला विरोध करणं आणि समाजाला स्त्रीला एक माणूस म्हणून वागवायला शिकवणं याला मी स्त्री मुक्ती म्हणेन.

आस | 11 March, 2011 - 07:08

प्राजक्ता, खोसाठी धन्यवाद. खरे तर १० वीच्या निबंधानंतर मी काही लिहिलेले मला आठवत नाही आहे. पण आता खो मिळाला आहे तर प्रयत्न करेन. अर्थात इतक्या जणांपेक्षा फार काही वेगळे मी मांडु शकणार नाही.

मुळात स्त्री-मुक्ती या शब्दाबद्द्लच थोडा गोंधळ आहे. 'स्त्री-मुक्ती' म्हटले की प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी असते , काहींची उपहासाची, काहींची भुवया ऊंचावणारी, काहींची आनंदाची . मला स्वतःला स्त्री-मुक्ती म्हटले की 'दोन धृवावर दोघे आपण' असे वाटते पण तेच स्त्री-पुरुष समानता म्हटले की मैत्र, सहजीवन डोळ्यासमोर येते. त्यामुळे माझ्यासाठी तरी याचा अर्थ एक व्यक्ती म्हणुन, स्त्रीपुरुष भेदभाव न होता जगण्याची संधी मिळणे.

माझ्यामते तरी स्त्री-शिक्षण, बालविवाह, सतीप्रथा याविरुद्धची खरी लढाई तर आधीच लढुन झालेली आहे. आता उरलेय ते मिळालेल्या शिक्षणाचा, आर्थिक स्वावलंबनाचा वापर करुन आपल्यालाच साध्य करायचेय. आपल्या मुलांवर योग्य संस्कार करुन त्यांना स्त्री-पुरुष समानतेचे धडे देणे आणि जमेल तसे आपल्या संपर्कात येणार्‍या लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करुन देणे. अर्थात जर कोणी केवळ 'स्त्री आहोत' याचे भांडवल करुन दुसर्‍यावर अन्याय करत असेल तर त्या स्त्रीलाही ती जाणीव करुन देणे. उदा. बसमधील स्त्रियांसाठी राखीव जागेवर एखादे म्हातारे माणूस बसले असताना केवळ ती जागा राखीव आहे म्हणुन कॉलेजला जाणार्‍या आणी फारसे सामानही नसलेल्या मुलींनी उठवणे.

वर्षू नील | 11 March, 2011
मानुषी, खो दिल्याबद्दल आभार
सर्वांची मते,अनुभव वाचले.. मला ही या विषयात आलेले काही अनुभव नमूद करत आहे.
१) चीन मधील,लहान मुलींचे पाय बांधण्याची १००० वर्ष जुनी, अति दुष्ट प्रथा ,२१ व्या शतकाच्या सुरुवातीला कम्युनिस्ट पार्टीच्या प्रयत्नांनी एकदाची संपुष्टात आली. आताची चीनी स्त्री आर्थिक,सामाजिक,वैयक्तिक दृष्ट्या अतिशय स्वतंत्र झालीये. अगदी खेडोपाड्यांपासून शहरापर्यन्त, घरकाम करणार्‍या स्त्रियांपासून इतरत्र नोकर्‍या करणार्‍या, स्वता:च्या हिमतीवर कारखाने,दुकाने काढणार्‍या आणी ते सफलतेने चालवणार्‍या , खाजगी कंपनीत उच्च पदावर कार्यरत असणार्‍या, आगगाड्या,बसेस चालवणार्‍या स्त्रियांपर्यन्त ,सगळ्याच स्त्रिया आत्मविश्वासाने भरलेल्या दिसून येतात. यामागे इथे राबवलेला १००% साक्षरतेचा उपक्रम हा एक महत्वाचा घटक आहेच.त्यांना आपल्या स्त्री शक्ती चा साक्षात्कार झालेला स्पष्टपणे दिसून येतो.

२) दक्षिण अमेरिकेत तर फार पूर्वीपासून मुलाच्या बर्थ सर्टिफिकेट वर फक्त मातेचे नांव असते.

नवर्‍यांच्या बिझिनेस मुळे परदेशात स्थायिक झालेल्या स्त्रियांबद्दल चीड येणारे काही अनुभव..

१) परदेशात स्थायिक झालेल्या या तिशीतल्या स्त्रिया, सर्व प्रकारचे स्वातंत्र्य त्यांना मिळालेले पाहिले , पण त्यांनी आपल्या स्त्रीत्वाचा फायदा उठवलेलाही लक्षात आला. सुपर मार्केटिंग, मुलांबरोबर जाऊन त्यांच्यासाठी कपडे,खेळणी ,पुस्तकं यांची खरेदी,बँकेची कामे ,विविध बिलं भरणे इ. कामं , घरी गाडी,ड्रायवर असला चोवीस तास दिमतीला तरी, conveniently नवर्‍याच्या माथी मारून मोकळ्या झालेल्या आहेत. अश्या बायकांना मी सुरुवातीला डोस दिले पण भलतीकडे समाज प्रबोधनाला जाऊ नये ही गोष्ट स्वानुभावाने अक्षरशः पटली. त्यांना मी स्वतः गाडी चालवून ही सर्व कामे करते म्हणून माझीच कीव आली..

२) इकडे स्त्रियांचा एक ग्रुप दरवर्षी होळीच्या निमित्ताने सर्व भारतीय स्त्रियांकरता लंच अरेंज करतात. या इवेंट साठी ,आयोजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व स्त्रिया मोठ्या संख्येने तिकिटे विकत घेऊन हजर राहतात. एक स्त्री..चांगली पन्नाशीतली दरवर्षी एकच बहाणा करते न येण्याचा तो म्हंजे नवरा घरी असतो शनिवार चा . तिच्या घरी चोवीस तासाची बाई आणी भारतीय कुक आहे म्हंजे त्या एका दिवशी तिच्या नवर्‍याला काही उपास पडत नाही.( यानवर्‍याचा तिला आग्रह असून ही) या निमित्ताने आयोजक स्त्रियांनी केलेल्या कष्टाचे कौतुकही म्हणून तरी तिला यावेसे वाटत नाही, आता याला काय म्हणावे!! तिनेच स्वतःवर घातलेल्या बंधनातून, तिला कोण बरं सोडवेल??

३) इकडच्या इंटरनॅशनल शाळेत शिक्षिका असलेली,भरपूर पगार असलेली ही तिसरी स्त्री. तिची मोठी मुलगी चांगली ११ वर्षाची तर धाकटी ८ वर्षाची आहे मागच्या महिन्यात दमलेली,भागलेली जाताना पाहिली,चेहर्‍याची रया गेलेली.. मग कळलं घरी सासू,सासर्‍यांच्या आग्रहाला बळी पडून गेले कित्येक महिने ती मुलगा होण्याची ट्रीटमेंट घेत होती..आणी आता परत प्रेगनंट आहे. सासू सासरे खुशीत दिसले,नवर्‍याचे काही चालत नाही त्यांच्यापुढे. एकुलता असल्याने त्याला ही इमोशनल ब्लॅक मेल केले गेले.. या पोरीचे मात्र भयंकर हाल होतायेत, चिडचिड करू लागलीये आताशी..
अजूनही भारतीय स्त्रियांना वैचारिक,सामाजिक पातळीवर स्वातंत्र्य मिळवायचे आहे. ' दूसरोंकी जय से पहले खुदको जय करें' या ओळींत दडलेला खोल अर्थ समजून घ्यायचा आहे.
लहानपणापासून आपल्या एम ए(अर्थशास्त्र) बी एड झालेल्या आईला नोकरी,घर अगदी व्यवस्थित सांभाळतांना पाहिलंय. सकाळी नऊ आणी रात्री सात या जेवणाच्या वेळा कधीही चुकलेल्या पाहिल्या नाहीत. याशिवाय सणांच्या दिवसांत आमचे नवीन डिझाईन्स चे फ्रॉक्स ,रात्र रात्र मशिनीवर बसून ती स्वतःच शिवायची. सगळ्या काकू, आत्यांच्या मंगळागौरी ,इतर सण साजरे करतांना ,तिच्या हातच्या पदार्थांची फर्माईश व्हायची. याशिवाय तिची नित्यनवे पदार्थ शिकण्याची हौस ,अगदी शेवटपर्यन्त टिकून होती. नाती बरोबर फॅन्सी केक बेकिन्ग, मेक्सीकन कुकिंग क्लास्,कंप्यूटर क्लास जॉईन करणारी ही एकच आज्जी मी आत्तापर्यन्त पाहिलेली. इतकं पुरे झालं नाही म्हणून कि काय तिने साठाव्या वर्षी इन्ग्लिश मधे एम ए करून आपली इतक्या वर्षात पूर्ण न करू शकलेली इच्छा पूर्ण केली ,ती ही प्रथम वर्गात.
अशी चार चौघीत उठून दिसणारी आई ,स्वभावाने अत्यंत मृदू, हिमालया एव्हढे कामाचे डोंगर सहज उपसणारी ,अतिशय विनम्र, कधीच थकलेली किंवा चिडलेली तिला पाहिली नाही.
अश्या आईचा आदर्श आज माझ्यापुढे आहे. आणी मी पण तिच्यासारखाच महिला दिवस ,माझ्यापुरता तरी रोजच साजरा करते. दुसर्‍यांनी आपला आदर करावा असं वाटत असेल तर आधी आपण आपल्या स्वतःचा आदर करायला शिकलं पाहिजे.


लाजो | 11 March, 2011 - 08:18

ह्या उपक्रमात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल बद्दल संयुक्ता संयोजकांचे आभार आणि मिनोती ने खो दिल्याबद्दल तिचेही धन्यवाद. इथे सगळ्यांच्याच खुप सुंदर सुंदर पोस्ट्स आहेत. अश्विनीमामी, शैलजा, गजानन, अस्चिग, बित्तुबंगा, आरभट यांच्या पोस्टी खुप आवडल्या. (अजुन सर्वांच्या पोस्ट्स वाचुन झाल्या नाहियेत) स्त्रीमुक्ती म्हणजे काय, कशाला आणि कशी यावरचे सर्वांचे विचार, आचार आणि केलेले प्रयत्न आणि घेतलेले कष्ट देखिल कौतुकास्पद आहेत आणि प्रेरणादायक देखिल.

मलाही स्त्रीमुक्ती हा शब्दच खरतर पटत नाही... त्यापेक्षा स्त्रीउन्नती किंवा स्त्रीसबलीकरण असे शब्द जास्त चपखल वाटतात आणि सामाजिक समानता, इक्वल राईट्स किंवा नो डिस्क्रिमिनेशन असे शब्द जास्त भावतात.

मी मला भाग्यवान समजते कारण मला अत्तापर्यंत कधीच एक स्त्री म्हणुन दुजी वागणुक किंवा अपमान सहन करावा लागला नाहिये. आम्ही बहिणी, आम्हाला भाऊ नाही म्हणुन आई-वडिलांनी नक्कीच टक्के टोणपे खल्ले असतिल. पण त्यांनी आम्हा बहिणींचे कधीही काहिही कमी केले नाही. आमची शिक्षणं, हौस्-मौज सगळं पुरवलं. घरातल्या प्रत्येक मोठ्या निर्णयात आम्हाला त्या त्या वेळेस योग्यप्रकारे सहभागी करुन घेतलेले आहे. आमच्या मतांचा, विचारांचा आदर केलाय, कुठे चुकलो/अडलो तर योग्य सपोर्ट मिळालाय आणि गरज पडेल तिथे समज देखिल. आता सासरी तर मी एकुलती एक सून. त्यामुळे सूनेपेक्षा मुलीसारखीच वागणूक जास्त मिळते. नवरा देखिल मला सहचारिणी मानतो. घरातले निर्णय एकत्र घेतले जातात. मुलीला सांभाळण्याची जबाबदारी दोघं इक्वली घेतो. शाळा-कॉलेजात समान विचारांचेच मित्र-मैत्रिणी भेटले. ऑफिसात देखिल मोकळे वातावरण. त्यामुळे असा कधी विचारही मनाला शिवला नाही की मी जोखडात आहे किंवा माझ्यावर मी एक स्त्री म्हणुन अन्याय होतोय.

आज माझे विचार मला मोकळेपणाने मांडता येतात, माझ्या इच्छा मला माझ्या मनासारख्या पूर्ण करता येतात...माझे निर्णय मला घेता येतात.... माझ्या घरच्यांचा माझ्या ऑफिसात माझ्या बॉस आणि कलिग्जचा माझ्यावर विश्वास आहे, माझ्या निर्णयांचा आदर आहे... माझ्याकडे एक व्यक्ती म्हणुन, एक सहकारी म्हणुन बघितले जाते.. माझ्यात एक सेल्फ कॉन्फीडन्स आहे, सेल्फ रिस्पेक्ट डेव्हलप झाला आहे तसाच सेल्फ रिस्पेक्ट आणि सेल्फ कॉन्फीडन्स माझ्या मुलीतही यावा यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील आहे.

पण जेव्हा उठुन कुणी मौलवी स्त्रीला "मांसाचा गोळा - मांजरं त्यावर तुटुन पडणारच" म्हणतो तेव्हा तळपायाची आग मस्तकात जाते. स्त्रीने काय करावे, काय करु नये.. कपडे कोणते घालावेत, डोक्यावर पदर घ्यावा/बुरखा घालावा ही बंधन जेव्हा लादलेली दिसतात तेव्हा चिडचिड होते...मुलगी होणार म्हणुन झालेली भृणहत्या ऐकुन डोके सुन्न होते... का बरं हे असं? का नाही स्त्रीला एक समान व्यक्ती म्हणुन वागणूक मिळत? का नाही सगळेच 'जगा आणि जगु द्या' हे तत्व आचरणात आणत? का आपला अधिकार दुसर्‍यावर दाखवतात?

इथलीही काही उदाहरणे वाचुन आश्चर्य वाटले, राग आला आणि दु:खही झाले. असही वाटलं की कधीकधी स्त्री हीच स्वत: स्वतःची गुन्हेगार असते. आपल्यावर लादलेली सामाजिक, कौटुंबिक, वैचारिक बंधनं ती चोंबाळुन ठेवते... दुबळ्याला दाबुन ठेवा, त्याचा गैरफायदा घ्या ही कॉमन सामाजिक प्रवृत्तीच आहे. "हे असचं असतं", "बाईची जात, काय करणार?" "मुलगी आहे, शिकुन काय करणार?" असे विचार करुन स्त्रीच जर आपल्या दुबळेपणाचे समर्थन करत असेल तर अश्या मनोप्रवृत्तीला बदलणे गरजेचे आहे.

आजच्या आणि ५० वर्षांपुर्वीच्या समाजाच्या विचारसरणीत जरुर फरक पडला आहे, पडतो आहे... इथे आलेल्या प्रतिसांदांवरुन हे निश्चितच सुचित होत्येय की आपल्या पिढीतल्या आपल्या आई-वडिलांच्या पिढीतल्या पुरुषांना देखिल आपली आई, बायको, मुलगी यांच्या बद्दल आदर आहे, त्यांच्या मतांची कदर आहे. त्यांचे स्वास्थ्य्, भवितव्य याची काळजी आहे. मुलांच्या संगोपनात, घरकामात हातभार लावतात. महिला देखिल आपल्या पायावर उभ्या आहेत, आपल्या बळावर अनेक निर्णय घेतात, बर्‍याचश्या सुशिक्षित मधमवर्गीय घरात मुलगा आणि मुलगी यांना समान वागणूक मिळते. समाजात होणारा हा बदल नक्कीच स्वागतार्ह आहे पण हे मोस्ट्ली शहरात, सुशिक्षीत समाजात आढळुन येते. सामाजिक समानता हवी तर ती समजाच्या सर्व थरात, देशाच्या काना- कोपर्‍यात असायला हवी.

आज या व्यासपिठावर सर्वांनी खुप उत्तम विचार मांडले आहेत आणि मोस्टली सगळेच विचार मनाला पटले आहेत (काही अपवाद वगळता), त्यामुळे त्या सर्वांनाच अनुमोदन. मी काही या विषयातली अनुभवी नाही पण हे मात्र नक्कीच म्हणेन की जर कुणला, मग ती स्त्री असो अथवा पुरुष, मोकळा श्वास घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीलाच मनातुन प्रबळ इच्छा असली पाहिजे की तिला अश्या बंधनातुन मोकळीक हविये. ती व्यक्ती स्वतःच खंबीर असायला पाहिजे...कुणाच्या पुढे मिंधे होऊन जगण्यात अर्थ नाही... आपल्याला देवाने जन्म दिलय तो जगण्यासाठी.. आणि या आयुष्यात काय कराव हे माझं मला ठरवता आलं पाहिजे...आपले निर्णय आपण घ्यायची क्षमता, कुवत आणि स्वातंत्र असलं पाहिजे. उद्धरेत आत्मनः आत्मानं.. मलाच स्वतःचा उद्धार करायचाय.. माझ्यासाठी आणि माझ्या भवितव्यासाठी. लहानपणापासुनच पालकांनी मुलीला, मुलाला शिकवले पाहिजे की तुम्ही दोघे सारखेच आहात, दिसायला वेगळे असलात तरी एक व्यक्तीच आहात.. ब्रेन वॉशिंग हे खुप इफेक्टिव्ह अस्त्र आहे... हे आपण अनुभवुन आहोत, त्याचा उपयोग समाज सुधारणेसाठी होतं असेल तर नक्कीच करावा.

मी मागची १३ वर्ष ऑस्ट्रेलियात रहाते. इथली काही ओब्झर्वेशन्स लिहीते. इथल्या स्त्रिया भारतातील किंवा इतर बर्‍याच देशांच्या तुलनेने खुपच सुधारीत मुक्त आणि सबल म्हणता येतिल. ऑस्ट्रेलियाच्या सध्याच्या पंतप्रधान श्रिमती ज्युलिया गिलार्ड आहेत. एक स्त्री देशाचे प्रतिनिधीत्व करते ही ऑस्ट्रेलियन महिलांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. देशाच्या भवितव्याचे निर्णय एका स्त्रीच्या हाती आहेत त्यामुळे सर्वांच्याच त्यांच्याकडुन खुप अपेक्षा आहेत (अर्थात स्त्रीचे पाय खेचणारे अपोझिशन मेल लिडर्स देखिल आहेतच). इथे अनेक मोठ्या कंपन्यांमधे, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स मधे महिला उच्च पदावर आहेत. फायर फायटर्स, टॅक्सी ड्रायव्हर, बस/ट्रक ड्रायव्हर, कन्स्ट्रक्शन साईट्स अगदिच काय रस्ते बनवण्याच्या कामावर सुद्धा स्त्रीया आहेत. वॉर फ्रंटवर देखिल स्त्रिया गेलेल्या आहेत. एक स्त्री आणि त्यातुन देशी इमिग्रंट म्हणुन मला इथे दुजा भाव मिळालेला नाही किंवा कोणी टवाळी केलेली नाही. एक इंडिविज्युअल म्हणुन नेहमीच नॉर्मल वागणूक मिळालेली आहे. (अपवाद फक्त आपले देशी बांधव स्त्रीकडे एक उपभोग्य वस्तु म्हणुन बघण्याची मनोवृत्ती अजुनही इथल्या देशी लोकांत पहायला मिळते...बाहेरुन आम्ही किती सुधारलेले आणि घरात वेगळाच अवतार.. चीड येते ).

ऑस्ट्रेलियातली सामाजिक समानता देखिल बर्‍यापैकी संतुलित आहे. स्त्री आणि पुरुष यांना त्यांच्या शैक्षणीक पातळी आणि अनुभवावरुनच नोकरी दिली जाते. एकाच लेव्हलवर काम करणार्‍या स्त्री आणि पुरुषाला सारखा पगार मिळतो (काही प्रायव्हेट कंपन्यांचा अपवाद). इथेल बहुसंख्य पुरुष घरची कामं करतात, मुलांना सांभाळतात, स्त्रियांच्या मॅटर्नीटी लिव्ह बरोबरच इथे पुरुषांना देखिल पेरेंटल लीव्ह/बाँडिंग लिव्ह मिळते. प्रीनेट्ल क्लासेसला भावी आई आणि वडिल दोघेही हजर असतात. अशीही उदाहरणं बघितली आहेत की स्त्रीला जास्त जबाबदारीची आणि जास्त पगाराची नोकरी आहे त्यामुळे पुरुष घरी राहुन मुलं सांभाळणे, घर सांभाळणे, स्वयंपाक सर्व आनंदाने करतो. स्त्रीपेक्षा लहान वयाचा नवरा किंवा कमी पगार असणारा किंवा इव्हन कमी उंचीचा नवरा असणे हे देखिल खुप कॉमन आहे...याचा बाऊ मानलेला मी तरी पाहिला नाही. हॉस्पिटल्स मधे, रेस्टॉरंट्स, दुकानात स्त्री म्हणुन किंवा इमिग्रंट म्हणुन कधी वेगळी सर्विस मिळालेली नाही.

याचा अर्थ असा नाही की इथे ऑल इज वेल आहे. इथेही जेंडर डिस्रिमिनेशन, डोमेस्टिक व्हायोलन्स, अ‍ॅबॉरिजिनल स्त्रियांवर होणारे अत्याचार अशी उदाहरणं ऐकायला/पहायला मिळतात. पण प्रमाण अर्थातच कमी आहे. इक्वल ऑपॉर्च्युनिटी, सेक्श्युअल डिस्क्रिमिनेश यावर कडक कायदे आहेत आणि ते पालन केले जातात. इथे मी कधी कुठल्या ऑफिसात वुनन्स डे चं स्पेशल सेलेब्रेशन केलेलं पाहिलं नाही...त्यापेक्षा कायमच स्त्रीयांच्या हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर वर जास्त भर दिला जातो.

इथे माझा भारतातिल परिस्थिती आणि परदेशातिल परिस्थिती यांचे कंपॅरिझन करण्याचा अजिब्बात उद्देश नाही.. ही जनरल ऑब्झर्वेशन्स आहेत आणि ही माझ्या कॅनबरातल्या वास्तव्यात (ऑस्ट्रेलियाची राजधानी) स्टुडंट डेज पासुन ते सिटीझन या प्रवासातली आहेत (माझी ऑब्झर्वेशन्स कदाचित इतर ऑस्ट्रेलियन मायबोलीकरांच्या अनुभवापेक्षा वेगळी असु शकतिल. त्यांनी ती जरुर लिहावीत). इथे परदेशात होणारी प्रत्येक गोष्ट बरोबर आणि तिकडे चुक हा मुद्दा नव्हे. परंतु इथे जी सामाजिक समानता आढळते, ज्या उमेदीने, सेल्फ रिस्पेक्टने, सेल्फ कॉन्फिडन्स ने स्त्रिया वावरतात ती आपल्या देशात यायला पाहिजे असं तळतळीने वाटतं. म्हणुन लिहीले.

भारतात सध्या प्रगतीचे जोरदार वारे वहात आहेत. या प्रगतीला सामाजिक असंतुलनामुळे ब्रेक लागु नये असे कळकळीने वाटते. संयुक्ताने केलेला हा उपक्रम खरच खुपच स्तुत्य आहे. आणि इथे सहभाग घेतलेल्या सर्वाचेच विचार फार प्रगल्भ आहेत. हे विचार, इथली चर्चा वाचुन जर कुणाला आपल्या हक्कांची जाणीव झाली, त्याचा फायदा झाला तर या उपक्रमाचे खरोखर सार्थक झाले म्हणेन.

सानी | 11 March, 2011 - 09:13

पौर्णिमा यांच्या पोस्टचे माझ्या दृष्टीकोनातून लिहिलेले विस्तारित रुप म्हणजेच माझे ह्या विषयावरचे मत.
स्त्रीमुक्ती आणि स्त्री-पुरुष-समानता हे आपण(स्त्रीया) आपल्या वागण्यातून घडवून आणू शकतो आणि पुरुषांची साथ मिळाली तर मग काय? दुधात साखरच... आता परिस्थिती बर्‍यापैकी बदलली असली, तरीही बर्‍याच ठिकाणी अजूनही भरपूर बदलाची गरज आहे. ह्याबद्दल मला स्वानुभव लिहायला आवडतील. अन्याय सहन करत राहणार्‍यांवर तो होत रहातो, मग तो पुरुष असो की स्त्री. स्वतःच्या हक्कासाठी जे लढतात, त्यांना सन्मानाने वागवले जाते, बाकीचे लोक अन्याय, दुष्ट वागणूक यांच्या ओझ्याखाली दबतच राहतात...हे तर आपण जाणतोच...

आमच्या घरी स्त्री पुरुष समानतेची बीजं लहानपणापासूनच आमच्याही नकळत आमच्या मनात रुजवण्यात माझ्या वडिलांचा फार मोठा वाटा आहे. आईला 'अगं आई' तर बाबांना 'आहो बाबा' असं का? असं म्हणून आम्हाला 'अरे बाबा' म्हणायचे संस्कार आमच्या बाबांनी आमच्यावर केले. आजूबाजूच्या लहान मुलांना ते फार मजेशीर वाटे आणि ते घरी जाऊन आपल्या बाबांना 'अरे बाबा' म्हणाले, की त्यांना ओरडा बसत असे! वडिलांनाच हा असा खास मान का द्यावा? हा विचार लोक अजूनही करत नाहीत... इथपासूनच खरी स्त्री आणि पुरुषांना वेगळी वागणूक देण्याची शिकवण मुलांना नकळत मिळत असते. आमच्या घरी आई-बाबा दोघंही नोकरी करणारे. वडिल नेहमी घरात स्वयंपाक वगैरे करतांना पाहून पाहणारे पुरुष नाही, तर स्त्रीयाच नाकं मुरडत.... त्यांना बहुतेक माझ्या आईच्या भाग्याचाच हेवा वाटत असावा...आणि तसे त्या बोलूनही दाखवत... 'तुम्हाला काय बाई, सगळी मदत मिळते, आम्हाला एकट्यानेच करावं लागतं', असं म्हणायच्या... तर काही म्हणत, आमचे 'हे' घरी मदत करतात, पण कोणासमोर असे उघडपणे नाही...

आमच्या जुन्या घरी ३ मजले उतरून पिण्याचे पाणी भरावे लागे. सगळ्या स्त्रीया ते करत. एका काकूंना तर संधीवाताचा त्रास असूनसुद्धा त्याच हे सगळं करायच्या. पण माझे बाबा आणि आई हे पाणी भरायचे काम अर्धे अर्धे वाटून घेत. २ मजल्यांपर्यंत आई थांबायची आणि बाबा पाणी भरुन आणत...ते आई घरापर्यंत न्यायची आणि दुसरी रिकामी कळशी बाबांना पुढच्या पाण्याच्या राऊंडसाठी द्यायची. आम्हीही नंतर नंतर जरा मोठे झाल्यावर ही कामं ह्याच पद्धतीने करायला लागलो. इमारतीतल्या लोकांना माझे बाबा पाणी भरतांना पाहून काहीतरीच वाटायचे. नंतर नंतर आमच्या इमारतीतले सगळे पुरुष पाणी भरायला लागले. माझ्या बाबांनी अवाक्षरही न काढता स्वत:च्या कृतीतून घडवून आणलेली ही स्त्रीमुक्तीच, नाही का?

आमच्या शेजारच्या काकू घरातली सगळी कामं स्वतःच करायच्या. काका (त्यांचे पती) मात्र नुसतेच ऑर्डर सोडायचे. जेवण बनवल्यावर हीच भाजी का? मला दुसरी हवी म्हणून चिडचिड करायचे. त्या काकू सुगरण असूनही त्यांच्या स्वयंपाकाचे काका कधी कौतुक करतील तर शप्पथ!!!! मी एकदा त्यांना विचारले, 'असे का करता हो काका?' तर ते म्हणाले, 'जास्त कौतुक केले तर बायको डोक्यावर चढून बसते'!!!!!!! काय पण भन्नाट तत्वज्ञान!!!! मी सुन्नच झाले. मी लहान होते, तरीही एक दिवस काकूंसाठी त्या काकांशी भांड भांड भांडले होते... त्या काकांना माझ्याविषयी प्रचंड कौतुक असल्याने त्यांनी माझे बोलणे हसण्यावारी नेले. नाहीतर ते भयंकर शीघ्रकोपी होते. असलं काही कोणी बोललेलं खपवून घ्यायचे नाहीत. पण नंतर नंतर त्या काकांच्या वागण्यातही बदल जाणवायला लागला आम्हाला. ते बर्‍यापैकी शांत झाले...नक्कीच अंतर्मूख झाले असणार ते!

त्यांच्याच घरात त्यांच्या मुलाला आणि मुलीला वेगळी वागणूक मिळायची. मुलगा बाहेरून घरी आला की काकू मुलीला, 'जा गं, दादासाठी पाणी घेऊन ये' असं म्हणायच्या. मुलगी मात्र अशीच उन्हातान्हातून थकून भागून आली तरी तिने स्वत:च पाणी घ्यायचे. तेंव्हा दादा काही उठून पाणी आणून द्यायचा नाही. मी आणि त्यांचा दादा एकाच वयाचे. मला हा प्रकार सहन व्हायचा नाही. मी त्याला म्हणायचे, 'काय रे, तू नाही का बहिणीला पाणी आणून देणार?' काकूंना म्हणायचे, 'तुम्ही सांगा ना त्याला आता, बहिणीसाठी पाणी आणायला' , तर काकू म्हणायच्या, 'आमच्या घरातला एकुलता एक मुलगा आहे तो... त्याला नाही सांगणार मी हे असलं काम...' तेंव्हा संताप संताप व्हायचा... वाटायचं काका जे काकूंना वागवतात, तेच काकू डिझर्व करतात. त्यांच्यासाठी मी उगाचच भांडते... ही काही फार जुनी गोष्ट नाहीये... फक्त ७-८ वर्षांपूर्वीची... आजही हिच परिस्थिती भारतात आहे, याचे वाईट वाटते.

ही झाली भारतातली उदाहरणे, पण प्रगत देशांमध्येही काही फार वेगळी परिस्थिती आहे, असे वाटत नाही. जर्मनीमध्ये मी जे निरिक्षण केलेय, त्यावरुन तरी इथेही स्त्रीयाच स्वयंपाकघरात खपतांना दिसतात. जर दोघांनाही घरकामात रस नसेल, तर फार तर इथे फार सोप्प्या रेसिपीज असलेले तयार अन्न- भरपूर आणि वैविध्यपूर्ण असे मिळते, पण घरचे जेवायचे असेल, स्वच्छ नीटनेटके घर हवे असेल, मुलांना शाळेतून नेणे आणणे करायचे असेल किंवा त्यांच्यात निरनिराळे छंद जोपासायचे असतील, तर स्त्रीयाच हे सगळे करतांना दिसतात. इकडे 'फ्राउवेन ताऊश' नावाचा एक कार्यक्रम लागतो. त्यात दोन कुटुंबांमधल्या स्त्रीया आठवडाभर आपल्या घरांची आदलाबदली करुन रहातात आणि त्या दुसर्‍या स्त्रीचे कुटुंब कसे सांभाळतात, हे एका चॅनेलवर दाखवले जाते. ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक जर्मन घरे आणि त्यांची संस्कृती जवळून अभ्यासायला मिळाली. त्या कार्यक्रमात भाग घेणार्‍या स्त्रीया अगदी भारतीयांसारख्याच भांडतांना आढळल्या आणि फार गंमत वाटली. ह्या दोन्ही स्त्रीया एकमेकींना आपल्या घरी काय काय करायचे याचे सल्ले देतात आणि तो नीट पाळला गेलाय की नाही हे शेवटच्या भागात तपासून पहातात. त्यांचे कामाचे स्वरुप, दैनंदिनी पहाता, घरातली ए टू झेड कामे इथेही स्त्रीयाच करतायत, हे वास्तव समोर आले. त्यातले गंमतीचे दोन प्रसंग सांगते.

प्रसंग-१
एक स्त्री, स्त्री-पुरुष-समानतावादी विचारसरणीची... दुसरीच्या घरातला नवरा इकडची काडी तिकडे न करणारा... ही स्त्री त्याला वळण लावण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. घरातले टॉयलेट एक दिवस मी स्वच्छ करेन तर एक दिवस तू असे डील त्याच्याबरोबर करायचा प्रयत्न करत होती. पण त्या माणसाने तिचे नाही म्हणजे नाहीच ऐकले शेवटपर्यंत...

प्रसंग-२
एका भागात एक भारतीय स्त्री आणि एक जर्मन स्त्री अशी अदलाबदली झाली होती. इथेही ती जर्मन स्त्री स्त्री-पुरुष-समानतावादी... तर भारतीय स्त्री जर्मनीत वर्षानुवर्षे रहाणारी पण आपली पारंपारिक विचारासरणी जपणारी गृहिणी होती. तिने जर्मन घरात सगळे काम केले. कोणाकडूनही काहीही अपेक्षा बाळगल्या नाहीत. पण जर्मन स्त्रीने त्या भारतीय स्त्रीच्या नवर्‍याला घरात बरेचसे काम करायला भाग पाडले. जेंव्हा शेवटी भारतीय स्त्रीने हा व्हिडिओ पाहिला, तेंव्हा तिला इतका राग आला, की ती माझ्या नवर्‍याला तू काम करुच कसे दिलेस, यावरुन तिच्याशी ती प्रचंड भांडली!!!!!!!!!!!

असो, तात्पर्य हेच- स्त्री पुरुष समानता घरात रुजवायची असेल, तर स्त्रीनेच त्यादृष्टीने ठामपणे पाऊले उचलायला हवीत. प्रत्येकवेळी पुरुष समंजस धोरण घेईलच, असं नाही. तेंव्हा आई वडिलांनी मुलांना घरात तसे वळण लावले, तर किमान पुढच्या पिढीत ते संस्कार सहजपणे पोहोचतील. शिवाय स्त्रीया आणि पुरुष दोघांनी डोळसपणे घरात समानतेची मूल्ये जोपासली, तरच त्यांच्या पुढच्या पिढीत ते विचार नकळतपणे रुजतील... असे मला वाटते. शिवाय स्त्रीयांना स्वतःविषयी आधी सन्मान, आदर असला, तर त्या बाकीच्या स्त्रीयांविषयी तसा विचार करु शकतील. मी अन्याय सहन केलाय, तर तिलाही भोगू देत, ह्या विचाराच्या स्त्रीया जोवर समाजात आहेत, तोवर १००% क्रांती जरा अवघडच आहे. स्त्रीया स्वतः दुसर्‍या स्त्रीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या, तर पुरुषही नक्की साथ देतील.

UlhasBhide | 11 March, 2011

लाजो ...... ’खो’ दिल्याबद्दल धन्यवाद. खरं तर ’खो’ देणं/घेणं हा प्रकार मला आजच थोडासा समजलाय. फार लिहिण्याइतकं माझं वाचन नाही. त्यामुळे फक्त माझी मतं थोडक्यात व्यक्त करतो.

स्त्री-मुक्तीसाठी आजच्या काळातही चळवळ उभारावी लागते ही बाब पुरुषवर्गाला नामुष्कीची आणि लांच्छ्नास्पद वाटली पाहिजे. पुरुषांनी आत्मपरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. स्त्री-पुरुष समानता, ही स्वत:पासून आणि स्वत:च्या घरापासून सुरू झाली पाहिजे. विविध मार्गांनी समाजप्रबोधन करून माणसाने जुन्या काळात निर्माण केलेला हा अनैसर्गिक भेद नाहीसा होऊन अशा प्रकारच्या चळवळींची गरज कमीत कमी काळात संपुष्टात आली पाहिजे. स्त्री-पुरुष समानता निर्माण करणे ही प्रामुख्याने पुरुषांची जबाबदारी आहे. कारण प्राचीन काळापासून आजतागायत ही तफावत निर्माण करण्यास पुरुषवर्गच अधिकांशाने जबाबदार आहे.

ग्रामिण मुम्बईकर | 11 March, 2011

नीधप यांनी दिलेल्या खो च्या प्रतिसादार्थ लिहीतोय. या विषयावर या निमित्ताने झाला तसा विचार अन्यथा कदाचित झाला नसता. तेव्हा त्यांचे धन्यवाद.

या विचाराला एक बैठक लाभावी या हेतूने (जमेल तितका) हा धागा वाचून काढला. तेव्हा विषयाची विस्तृत पोच तर कळलीच शिवाय असंही लक्षात आलं की इथे लिहीले गेलेले माबोकरांचे विचार/अनुभव, हे त्यांचं वर्तुळ, कार्यक्षेत्र, देश यांपुरते सिमीत आणि स्पेसिफिक होते. मग स्त्रीमागे कोण, कुठली, गोरी/काळी, तरूण/म्हातारी, कुठल्या जातीधर्माची, सांपत्तिक स्थितीची वजनं न लावता, एक पुरूष म्हणून विचार करून पहातो. तरी विषय माझ्या अकलेला पुरावा म्हणून भारतीय समाजापुरतंच प्रामुख्याने बोलेन.
स्त्री आणि पुरूष यांमधला निसर्गदत्त मूलभूत फरक सोडल्यास स्त्री आणि पुरूष यांच्या पारड्यात समान वजन पडावं ही स्त्रीमुक्तीवादामागची कल्पना आहे. आता यासाठी मूळ आणि अवघड अडथळा हा फक्त आणि फक्त विचारसरणीचाच आहे. माझ्या कल्पनेप्रमाणे स्त्रीमुक्ती/स्त्री-पुरूष समानता साधायची असेल तर पुरूषाप्रमाणेच स्त्रीची ओळखही तिचं कर्तुत्व, सामजिक स्थान, विचारसरणी यावरून ठरायला हवं. हे असं होत असतानाही एका कर्तुत्ववान स्त्रीच्या स्तुतीत जेव्हा "बाई असूनही इतकं सगळं करून दाखवलं" अशा प्रकारची वाक्य येतात तेव्हा ही स्तुती करणार्‍याची किव करावीशी वाटते. जेव्हा बाईपेक्षा (किंवा पुरूषापेक्षाही) तिचं कर्तुत्व मोठं होतं तेव्हा पुन्हा ती बाई आहे म्हणून तिला झुकत्या मापाची/जास्त स्तुतीची/सवलतीची अपेक्षा नसते हे ध्यानात घ्यायला हवं. वरील वाक्यात मा. राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील किंवा इंदिरा गांधी किंवा दक्षिण ध्रुवावर पॅरेशूट जंप घेणारी शितल महाजन अशी काही जमीनतोड (ग्राउंडब्रेकिंग!) उदाहरणे अपेक्षित आहेत.

मर्यादा स्त्री आणि पुरूष दोघांनाही आहेतच. ह्या मर्यादाच स्त्री पुरूषांचं एकमेकांना पूरक असणं सिद्ध करतात. तेव्हा त्या मूलभूत मर्यादांपलिकडे न पहाता त्या मर्यादांसह एक मानुष समाज म्हणून एकमेकांना समसमान पूरक ठरणं हे जास्त गरजेचं आहे. उदाहरणार्थ, "बाईनेच का बरं जन्म द्यावा? मी ही बाळ जन्माला घालेन!" असं एखाद्या पुरूषाने म्हणणं जेवढं विनोदी ठरेल तितकंच वाईट पाळीच्या दिवसात/गर्भधारणेसह एखाद्या स्त्रीने निव्वळ पुरूष कलीग करतो म्हणून अट्टहासाने एखादं काम करत बसणं, विनोदी म्हणता येणार नाही पण चुकीचं (की करुण?) ठरेल. हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या मनुष्यप्राण्याने स्त्री-पुरूष असे भेद (डिस्क्रिमिनेट अशा अर्थाने) न करता, एकमेकांना मर्यांदासह स्विकारून समाज म्हणून वीण घट्ट करणं हे जास्त महत्वाचं मला वाटतं.

अर्थात्‌, मी हे सगळं जनरली बोललोय तेव्हा ग्रासरूट लेव्हलला खरोखर काम करताना नक्की उपयोगी ठरेल का याबाबत मीच शंकित आहे. कुठेतरी मी फारच उदात्त वगैरे लिहून गेलोय का असंही मला आता वाटू लागलंय. तेव्हा आता आवरतं घेतो.

प्रिंसेस | 11 March, 2011 - 10:35
स्त्री मुक्ती... खरेतर आता सगळ्यांच्या पोस्ट्स वाचुन नवीन काय लिहावे हा प्रश्नच आहे. तरीही मला स्त्रीमुक्ती बद्दल जे वाटते ते थोडक्यात लिहिते.

स्त्री मुक्ती म्हटली की मला आठवते, माझ्या एका मित्राशी कॉलेजात असतांना झालेला माझा (सं)वाद. त्याचे म्हणणे होते की एका बाजुला सधवा स्त्रिया आम्हाला मंगळसुत्र नको म्हणत लढताय दुसर्‍या बाजुला विधवा आम्हाला मंगळसुत्र , टिकली हवी म्हणताय. स्त्रीला नक्की काय हवय याबद्दल तीच गोंधळली आहे , असे त्याचे मत. त्यावर आम्ही मैत्रिणींनी त्याला सांगितले होते की स्त्रीला (सधवा/ विधवा/ कुमारी/ नवर्‍याने सोडलेली) जसे राहायचे आहे तसे राहु द्या, तिच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीत समाजाने ढवळाढवळ करु नये एवढीच किमान अपेक्षा आहे. मला वाटायचे की स्त्रीमुक्ती ही अशिक्षित स्त्रियांसाठी आवश्यक आहे. सुशिक्षित स्त्री तिच्या मुक्ततेबद्दल पुरेशी जागरुक आहे. पण माझा हा भ्रम मात्र स्वतःच्याच उदाहरणावरुन गळुन पडला. मुक्त वातावरणात वाढलेली मुलगी ऑर्थोडॉक्स घरात जाऊन पडली तर स्त्रीमुक्ती या शब्दाचे महत्व तिच्यापेक्षा अधिक कुणी सांगु शकणार नाही. माझी आई खेड्यातल्या अशिक्षित पण मुक्त वातावरणाच्या सासरी जाऊन मिळाली तर मी मुंब्ईसारख्या शहरातल्या पण विचाराने अतिमागास घरात जाऊन धडपडले. तेव्हा कळले की शहर खेडे असे काहीही लेबल स्त्रीमुक्तीला लावता येणार नाही. मध्यंतरी एकदा काही कथांवर आलेले अभिप्राय वाचलेत की अशा "टिपीकल" बायका आजच्या काळात असतात का??? खरे सांगायचे तर असतात... माझ्याच ओळखीत आजही अशा कित्येक सुना आहेत की ज्या शिकल्या सवरल्या असुनही ससरच्यांचा/ नवर्‍याचा छळ सहन करताय.

पण स्त्री मुक्ती म्हणजे सगळेच झुगारुन देणे नव्हे असे मला मनापासुन वाटते. स्त्री मुक्ती= स्वैर स्त्री असे समीकरण तयार होऊ नये हीच एक अपेक्षा.समानता नक्कीच हवी पण निसर्गाने घालुन दिलेल्या मर्यादा ओलांडुन नको. कुणी समानता देतांना स्त्रियांना समान काम , समान पगार आणि मॅटर्निटी लीव्ह नको म्हणाले तर ते कसे चालणार.माझ्यासाठी कुणी पुरुषाने उतरुन कारचा दरवाजा उघडुन देणे मला पटणार नाही पण नवव्या महिन्यात बसमध्ये प्रवास करणार्‍या स्त्रीला कुणी पुरुषाने जागा करुन द्यावी ही अपेक्षा नक्कीच बाळगणार. स्त्रियांनी देखील मुक्ती न मागता समानता मागावी. स्त्री पुरुष दोन्ही एकमेकांना पुरक आहे एकमेकांपासुन मुक्ती घेतली तर जग कसे चालणार?

श्री | 11 March, 2011 -

लाजो , उल्हासजी , मला खो दिल्याबद्दल धन्यवाद .

वर सगळ्यांनी खुप चांगली मतं मांडली आहेत , वर म्हंटल्याप्रमाणे मलाही प्रश्न पडतो तो खरच मुक्तीची गरज आहे की स्त्री- पुरुष समानतेची गरज आहे, आणि स्त्री ला नेहमीच कमी पणाची वागणुक का मिळते ? एका स्पर्म मुळे जीव तयार होतो पण त्या जीवाला ९ महिने उदरात वाढवणे आपल्याला शक्य नसतं ते फक्त स्त्रीलाच शक्य असतं.विचार करा स्त्री जी आपल्या उदरात ९ महिने वाढवुन एक जीव जन्माला घालते , किती कठीण आहे पण ती सर्व सहन करते , आपण सगळे एका स्त्रीच्या उदरातुन जन्माला आलो आहोत हे का सोयीस्करपणे विसरतो . स्त्रीया जे जे सहन करतात ते आपल्याला शक्य आहे का ? मग तरीही आपण तिलाच का कमी लेखतो ? आपण आपल्या आईला कमी लेखु शकतो का ? मग इतर स्त्रीयांना का कमी लेखतो. ( आता काही जण म्हणतील आम्ही कुठे कमी लेखतोय , अरे कमी लेखत नसते तर मगं हा विषयच चर्चेला आला नसता.).

स्त्री- पुरुष एकमेकाला पुरक आहेत , जे निसर्गाने बनवलं आहे त्याला तसचं राहु द्या त्यात ढवळाढवळ करु नका, कोणीही मास्टर नाही कोणीही गुलाम नाही. प्रत्येकाला माणुस म्हणुन जगण्याचा अधिकार आहे. तो हिरावुन घेण्याचा प्रयत्न करु नका. स्त्री-पुरुष समानता बघितली तर फक्त काही मेट्रो आणि परदेशातच अस्तिवात आहे, इथे मायबोलीवर लिहुन किंवा वादविवाद करुन कितपत फरक पडणार आहे ? ही स्त्री-पुरुष समानता , तालुक्यात ,खेड्यात , वाडी वस्तीवर नेण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत ? संयुक्ताला हा उपक्रम राबवण्यासाठी खुपखुप धन्यवाद , पण एवढं करुन थांबु नका तर हे विचार - कृती गावपातळीवर नेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

ज्योति_कामत | 13 March, 2011

स्त्री-मुक्तीबद्दल बर्‍याच जणांचे विचार वाचले. खूप अंगांनी विचार करून सगळ्यांनी लिहिलंय. मुक्ती कोणापासून? आपल्याला कोणापासून मुक्ती नकोय तर विचारांपासून, त्यांच्यामुळे आलेल्या बंधनांपासून मुक्ती पाहिजे. मी जर मनात मुक्त असेन, तर बाह्य बंधनं कशी दूर करावी याचा विचार मी करीनच. पण जर मी मनातून मुक्त नसेन, तर पुरुषांच्या, जुन्या रुढींच्या नावाने खडी फोडत राहीन आणी कोणीतरी येऊन मला मुक्त करील, म्हणून वाट बघत राहीन. अशा परिस्थितीत खरी मुक्ती कधीच शक्य नाही. जास्त चर्वितचर्वण नको म्हणून माझ्या बघण्यातली काही उदाहरणं इथे लिहिते.

अगदी साध्या साध्या गोष्टी असतात. माझं लग्न झालं तेव्हा माझे सासू-सासरे माझ्या कुंकवाच्या आकाराबद्दल, घरात साडी न नेसण्याबद्दल भरपूर टीका करत असत. पण मी त्यांचं कधीही ऐकलं नाही. नवरा म्हणायचा, थोडंसं त्यांचं ऐकलं तर काय झालं? पण मी असल्या गोष्टीत अजिबात तडजोड केली नाही. माझं दिसणं, कपड्यांची निवड या साध्या गोष्टीत मी दुसर्‍याचा निर्णय का मान्य करावा? हा माझा सवाल होता. मजा म्हणजे, माझ्या घरात साडी न नेसण्याबद्दल टीका करणार्‍या सासूबाई, नणंदेचं लग्न झालं तेव्हा मात्र तिला "घरात गाऊन घालू देणार्‍या" तिच्या (नणदेच्या) सासूचं तोंड भरून कौतुक करत होत्या. हे कसं काय? आपल्या सुनेला एक न्याय आणि मुलीला एक न्याय असं करताना आपण आपण एका स्त्रीवर अन्याय करतोय हे त्यांच्या लक्षात कधीच आलं नाही.

माझ्या सासूबाई जुन्या पिढीतल्या. सासू-सासरे म्हणजे देव. ते सांगतील ते ब्रह्मवाक्य असं समजणार्‍या. पण आता आणखी एक गोष्ट सांगते. नात्यातल्या एका मुलीचं लग्न झालं. तिचं नाव चांगलं 'अपर्णा' होतं. पण तिच्या सासरचे लोक वैष्णव. 'अपर्णा' म्हटलं शंकराच्या बायकोचं नाव तोंडात आलं. अबब! म्हणून लग्नात तिचं नाव बदलून नवर्‍याला मॅचिंग 'अमरजा' केलं. या एम. कॉम. झालेल्या मुलीला असं सांगता आलं नाही की माझ्या आईबाबांनी माझं नाव काही विचाराने ठेवलंय, ते का बदलता? आणि आजच्या काळात शैव्/वैष्णव वगैरे मानायचं म्हणजे... जाऊ दे, तो आणखी एका लेखाचा विषय होईल.

या अपर्णाच्या लग्नानंतर काही वर्षांनी आम्ही तिच्या माहेरची ८/१० लोकं तिच्याकडे जेवायला गेलो होतो. तिचा नवरा पहिल्या पंक्तीला आम्हाला जेवायला बसा म्हणाला, आमच्याबरोबर तोही बसला. जेवायच्या आधीच मी म्हटलं, "अग, हे काय? आपण सगळ्यानी एकदम जेवायला बसू ना! आम्ही सगळे तुझ्या घरचेच तर आहोत!" यावर ती म्हणाली, "अग, नाही. आमच्याकडे अशीच पद्धत आहे!" घरात नोकर किंवा इतर कोणी नव्हतं. धाकटा १ वर्षाचा मुलगा मधे मधे रडत होता. आणि ही अपर्णा आम्हाला गॅसवर एकीकडे छोले, आमटी परत परत गरम करून देत होती, आणि एकीकडे पोळ्याकरत होती. जेवताना आम्हाला कानकोंडं झालं. तिच्याकडून बाहेर पडले ती परत कधी तिच्याकडे जेवायला न जाण्याचा निश्चय करून!

विचित्र प्रकार म्हणजे ड्रायव्हिंग करणारी, कराटे शिकणारी, नवर्‍याला "अरे तुरे" करणारी ही मुलगी आम्हाला असा संदेश देत होती की, "माझं लग्न झालंय. बघा मी नवर्‍याशी किती समरस झालेय ती! आता तुम्ही मला परके आहात!" आणि या सगळ्यात तिला काहीच वैषम्य किंवा वावगं वाटत नव्हतं, अजूनही वाटत नाही! तिच्या संसारात ती अत्यंत खूष आहे! नवर्‍याशी, त्याच्या कुटुंबाशी समरस होणं ही एक गोष्ट झाली, पण त्या घरात जर काही चुकीच्या पद्धती चालू असतील तर बदलायला आपणच पुढाकार घेतला पाहिजे. वयाच्या २२/२३ व्या वर्षापर्यंत आपलं जे व्यक्तिमत्त्व घडलं, ते कोणीही असं बदलू कसं शकतो, ही मला अजिबात न कळलेली गोष्ट आहे.

आम्ही दोघीही एकाच घरातल्या. पण आमचे रस्ते इतके वेगळे कसे झाले, याचं मला आश्चर्य वाटतं. असं वाटतं, हिनं नुसतीच पदवी मिळवली, शिक्षण तिच्या मनाच्या गाभ्यापर्यंत पोचलंच नाही. तिच्यापेक्षा आमच्या ऑफिसातली शिपाईण दुर्गा खर्‍या अर्थानं मुक्त आहे, कारण तिने नवर्‍याच्या घरच्या अशिक्षित लोकांशी जमवून घेण्याचा प्रयत्न केला, पण ते जमत नाही हे लक्षात आल्यावर ती सरळ वेगळी झाली. नवर्‍याला सांगितलं, तुला माझ्याबरोबर यायचं तर ये, पण मी त्या नरकात राहू शकत नाही. नवर्‍याने तिला साथ दिली नाही. पण ती आज आपल्या पायावर उभी आहे!

तात्पर्य काय, मला असं वाटतं, की मुक्त व्हायचं की नाही, हा प्रत्येकीचा निर्णय आहे. आपण ठाम राहिलं तर सगळं जग बदलता येतं. प्रत्येक वेळेला 'घराबाहेर' मधल्या 'नीरा'सारखं घर सोडून जायची गरज नसतेच. पण स्वतःचं व्यक्तिमत्व बदलायचीही गरज नसते. बरेचदा प्रेमानेच काम होऊन जातं! ज्या घरातली स्त्री मुक्त असेल, ते घर जास्त सुखी राहील. प्रत्येकाने आपल्या मुलीला हेच शिकवा!

प्रज्ञा९ | 13 March, 2011

खरंतर स्त्रीमुक्तीसंदर्भात माझ्या मनात थोडा संभ्रम होता. यासाठी, की मुलगी म्हणून मोठं होताना मला वेगळी वागणूक मिळाल्याचं नाही आठवत. आम्ही तिघी बहिणीच. पण भाऊ नाही म्हणून आम्हाला कधी वाईट नाही वाटलं. आई-बाबा किंवा आजीलाही नाही वाटलं. खरं म्हणजे "वंशाचा दिवा" वगैरे प्रकरण आजीच्या काळी होतं थोडं. बाबा म्हणजे एकुलता एक मुलगा, बाकी दोन्ही मुलीच माझ्या आजीला, त्यामुळे तिने मुलगा हवा अशी अपेक्षा आईकडून केली असती तर नवल नव्हतं. पण आजी तशी मॉडर्न होती हे आता जाणवतं! स्वतःला इच्छा असूनहे चौथीच्या पुढे न शिकता आलेल्या तिने स्वतःच्या बहिणी, मग मुली आणि मग नाती आवडेल ते शिकतील यासाठी लागेल ती मदत केली. आईने पूर्ण ३९ वर्षं नोकरी केली ती आजीच्या घरातल्या पाठिंब्यामुळेच!

वरच्या खोंमधून दिसलेली उदाहरणं मीही बघितली आहेत. अनेकांचे अनुभव खूप काही सांगून जाणारे आहेत. आणि माझा अनुभवांचा आवाका खूप मोठा नाही.

पण मला इथे काही वेगळी, पॉझिटिव्ह उदाहरणं द्यायची आहेत.

१. माझ्या मैत्रिणीच्या मोठ्या बहिणीचं लग्न जमायला वेळ होत होता. कारण ती खूप चांगलं शिक्षण घेऊन एका कॉलेजमधे प्रोफेसर होती. आणि लग्न झालं तरी नोकरी करणारच ही अट होती तिची. तिच्या मागे अजून २ बहिणी, आणि एक भाऊ होता, पण तिचे आई-वडील तिच्यामागे ठामपणे उभे राहिले. तिच्या मनासारखं स्थळ मिळेपर्यंत त्यांनी घाई केली नाही. आता ती संसारात आणि नोकरीतही समाधानी आहे. केवळ मुलगी म्हणून तिच्या मनाविरुद्ध जाऊन/ मागच्या बहिणींची लग्नं आहेत वगैरे भावनिक तिढ्यात तिला न अडकवता तिला मनाप्रमाणे वागू दिलं गेलं.

२. मी पुण्यात ज्या मेसमधे जेवायला जात असे, त्या काका-काकूंना ३ मुलीच. (मी चौथी- मानसकन्या झाले त्यांची )तिघीही लग्न होऊन पुण्यातच. मोठ्या ताईला एक मुलगी होती. त्या दोघांना एकच मूल हवं म्हणून त्यांनी पुढे चान्स न घेण्याचं जेव्हा ठरवलं, तेव्हा या मेसच्या काकांनी, स्वतःच्या मुलीचं कौतूक वाटून, निव्वळ अ‍ॅप्रिसिएशन म्हणून तिला त्याकाळी (२०-२२ वर्षांपूर्वी) ५००० रुपये दिले होते!! आज ते संपूर्ण कुटुंब समाधानी आहे.

३. इंजि. कॉलजला असताना नोट्स, क्लासेस ची चौकशी करताना एका ज्युनिअर मुलाने, सकाळचा एखादा क्लास आहे का, जो कॉलेजला जायच्या आधी करता येइल, असं विचारलं. मला असा क्लास माहिती नव्हता. पण सहज सकाळचाच क्लास का असं विचारलं, त्यावर मिळालेलं उत्तर-
"बाबांना आठवड्यातून २ वेळा सेकंड शिफ्ट असते, कधी नाईटसुद्धा. आई शहरापासून लांब गावातल्या शाळेत नोकरी करते, ती संध्याकाळी ६:३०-७:००ला येते, बहीण आणि मी आलटून-पालटून कूकर लावणे, भाजी-कोशिंबीर वगैरे चिरून ठेवणे, दुसर्‍या दिवशीची डब्याची भाजी आणणे किंवा इतर तयारी ही कामं करतो. त्यामुळे संध्याकाळी मी माझा १ तास घरी देतो. सकाळी बाबा घरात मदत करतात, त्यामुळे सकाळी जमेल."

हे उत्तर ऐकून मी थक्क झाले!

मुद्दाम पॉझिटिव्ह उदाहरणं दिली, कारण हळूहळू का होईना, बदल होतायत. स्त्री ही प्रथम एक माणूस आहे, तिला स्वतंत्र मतं, भावना आहेत, त्याचा आदर व्हायला हवा, तिची स्पेस तिला जपता यायला हवी ही जाणीव या वरच्या उदाहरणांत दिसते. माझ्या सुदैवाने मला सासरही अशाच मोकळ्या विचारांचं मिळालंय. मला जे आवडेल ते काम करायला, छंद जपायला सासुबाईंचा आणि सासर्‍यांचा कायम पाठिंबा आहे. "मला लग्नानंतर का होईना, मास्टर्स करायचंय" असं पहिल्या भेटीत मी सांगितल्यावर, " अर्रे!! काही प्रॉब्लेम नाही...मला आनंदच होइल. मी करेन की मदत!" असं म्हणणारा नवरा मिळालाय.

अशी उदाहरणं बघून खात्री पटते की, निदान काही वर्षांत तरी का असेना, चित्र बदलेल. स्वतःला प्रेम मिळालं की प्रेम देता येतं, तसं स्वतःला मोकळीक मिळाली, की आपसूकच ती दुसर्‍यालाही देता येतेच!

स्मितागद्रे | 13 March, 2011

खो बद्दल धन्यवाद लाजो आणि उल्हास भिडे. सर्वांच्याच पोस्ट वाचनीय आणि विचार करायला लावणार्‍या, सगळे मुद्दे त्यात आले आहेचेत, माझ्या ही चार ओळी मांडण्याचा प्रयत्न.

स्त्री मुक्ती म्हणजे नक्की काय ?मला ही लाजो प्रमाणे , मुक्ती ह्या शब्दाला आक्षेप आहे. स्त्री मुक्त व्हायला कोणाची गुलाम आहे का ? महिला दिन साजरा करण हेच मुळात पटत नाही.त्यातून काय साध्य होत हाही एक प्रश्णच आहे.

मला लहानपणापासुन अत्ता पर्यंत सुदैवाने कधी ही ही मुलगी आहे म्हणून किंव स्त्री आहे म्हणून तडजोड करावी लागली नाही. घरी आम्हा दोघांना, भावाला आणि मला व्यक्ती स्वातंत्र्य, शिक्षण स्वातंत्र्य, निर्णय स्वातंत्र्य समान होत. अत्ता पर्यंतच्या नोकरीत ही कधी स्त्री म्हणून कधी डावलल गेल नाही की कुठली तडजोड करावी लागली नाही.

पण ,मला वाटत स्त्री ला स्त्री पासूनच , स्वतः च्या विचारांपासून मुक्ती मिळणे गरजेच आहे. आज २१ व्या शतकात ही ती रुढी परंपरेने चालत आलेल्या विचारांपासून मुक्त नाही. मुलींच प्रमाण मुलांच्या तुलनेत कमी आहे अरुंधतीने दिलेली आकडेवारी हे ह्याच बोलक उदाहरण नाही का ?ह्याला मुख्य कारण कोण ? मला वाटत प्रामुख्याने स्त्रीया. आजही सासु ला गरज असते वंशाच्या दिव्याची, मग ती नव्या पिढीतली असो की जुन्या पिढीतली. मुलगी झाली म्हंटल्यावर नाक मुरडणार्‍या अनेक सासवा बघीतल्यात.तसच घरच्यांच्या दबावाखाली येऊन ३ मुलींनतरही मुलगा व्हवा म्हणून परत 'चान्स' घेणार्‍या स्त्रीया बघीतलयात् अगदी सुशिक्षीत स्त्रीया देखील. स्त्रीया दबावाखाली का येतात? सासु च्या, घरच्यांच्या म्हणणाल्या बळी का पडतात ? मुल होऊ देण्या बाबतीतचा निर्णय स्वतः का घेऊ शकत नाहीत ? आज शहरांच्या तुलनेत खेडेगावातून हे प्रमाण जास्त आहे. बदली निमित्त अनेक छोट्या गावात रहायला लागल्या मुळे ह्या सगळ्या गोष्टी खुप जवळून बघीतल्या. कितीही काहीही समजावल तरीही ह्या सगळ्या मानसिकते तून स्त्रीया बाहेरच येत नाहीत, स्वतः च्या हक्कांची जाणीवच त्यांना होत नाही. ही हताश करणारी परिस्थीती आहे. ही स्त्री ह्या असल्या बुरसटलेल्या विचारांपासून कधी मुक्त होणार ? खेडेगावात उघडपणे छळ होतो तर शहरातून सुशिक्षीत, सोफेस्टीकेटेड छळ होतो. दोन्हीकडे मानसिकता सारखीच. छळ करणार्‍या बहुतांशी स्त्रीयाच.घरातल्या ,समाजातल्या.

मुलगी आहे, काय सासरीच जाणार, किंवा मुलगी आहे म्हणून स्वयंपाक पाणी यायलच पाहिजे हे विचार कधी बदलणार ? पुरुषांनी घरकामात मदत केली तर , त्याला सगळ येत त्याच कौतुक होत, ते कौतुक करणारी ही स्त्रीच असते किंवा बायकोला मदत केली तर बायकोच्या ताटाखालच मांजर आहे अस म्हणणारी ही स्त्रीच असते.नवरा घरात मदत करतो म्हणून त्याचे गोडवे गाणारी ही बायकोच असते.
पण बायकोही नोकरी करूनही घर सांभाळते हीजाणिव किती जणांना असते? अरे नवर्‍याचही ते कामच आहे घर, संसार ,मुल त्याची ही आहेत, ही जाणिव त्याला करुन देण आणि स्वतःलाही असण गरजेच आहे,थोडीफार मदत करतो म्हणून कौतुक करण नाही. त्याला ही घरकाम येण, स्वयंपाक पाणी येण हे गरजेचच आहे हे त्याच्या वर लहान पणापासून कोणीच बिंबवत नाही. मुलांना ही ह्या सगळ्या गोष्टी येण आवश्यकच आहे हे कधी पटणार ? हे सगळे विचार घरातल्याच स्त्रीयांचे, आईचे, आजीचे, सासुचे असतात. किती आया मुलींप्रमाणे मुलांना ही घरकाम शिकवतात ? करायला लावतात ? मला वाटत ह्या सगळ्या विचारातून स्त्री ने मुक्त होण गरजेच आहे. आज ही स्री रुढी ,परंपरा, चालीरितींची गुलाम आहे आणि ती बनण्यात स्त्रीचा स्वतःचाच वाटा जास्त आहे. समाज काय म्हणेल ? ही भिती तिच्या मनातून कधी नष्ट होइल ?जेव्हा समाजातल्या स्त्रीयांचाच तिला सबळ पाठिंबा मिळेल. ओळखीतल्या एका बाई ने नवरा गेल्यानंतर ,स्वतः देवक ठेऊन मुलीच लग्न लावल तेव्हा तिला नाव ठेवणार्‍या, बोलणार्‍या स्त्रीया होत्या आणी बर्‍याचशा तिच्याच कुटुंबातल्या होत्या अगदी विरोध करणार्‍यात आई , सासु आणि मुलगी देखील. का तर सासरची लोक ही तिला नाव ठेवतील. तिला जन्मभर तिथे नांदायचय(?) अस सगळ्यांच मत. काय हरकते तिने स्वतः स्वतःच्याच मुलीच लग्न लावल तर ? अस म्हणणार तिला कोणीही भेटल नाही.

जेव्हा स्त्रीया,लग्नानंतर मुलगी आईवडीलांना मानसिक तर देतातच पण आर्थिक आधारही देतील ही खात्री बाळगतील, जेव्हा वंशासाठी दिव्याची गरज भासणार नाही,कार्यालयात वा इतर ठिकाणी होणार्‍या लैंगीक अत्याचारा विरुध्द समाजाची भिती, संकोच न बाळगता पेटून उठतील, माणसाच्या मुलभूत गरजांइतकीच स्वावलंबी होण, शिक्षण घेण,स्वतःच्या पायावर उभ रहाण, हे गरजेच आहे हा विचार करतील, जेवढे हक्क माणूस म्हणून जगण्याचे पुरषांना आहेत तेवढेच स्त्रीयांना पण आहेत, ह्याची जाणिव होइल,समाजाला विचार करायला भाग पाडतील, आपले हक्क, मिळवण्यासाठी ,ती जाणिव समाजाला करुन देण्यासाठी कुठलाही दिवस साजरा करायची गरज नाही हे जेव्हा पटेल,त्या वेळेला स्त्री खर्‍या अर्थाने मुक्त होइल अस वाटत आणि तेव्हाच ८ मार्च ही मुक्त होइल महिला दिनातून.

माझे काही विचार जमतील तशा शब्दात मांडायचा प्रयत्न केलाय. खेडेगावतल्या स्त्रीयांच जिवनही खुप जवळून बघीतल्या मुळे त्या अनुषंगाने हे विचार मांडलेत.

असुदे | 13 March, 2011

सर्वात आधी खो साठी मंजुडीचे आभार. वेळेअभावी सर्वांचे लेख वाचता आले नाहीयेत, त्यामुळे एखाद्याचा मुद्दा लिखाणात रीपीट झाला तर राग मानू नका. हा लेख असण्यापेक्षा मुक्त चिंतन जास्त असल्याने, विचारात सुस्पष्टपणा नसेल तर आगाउ माफी....

हा विषय कुठेही निघाला की मला एक जूनी गोष्ट आठवते.

शिकारीसाठी जंगलात गेलेला राजकुमार जंगलालगतच्या स्त्रीराज्याकडून बंदी बनवला गेला. बंदी बनवणार्‍यांनी त्याला सोडूनही दिला पण एका कूटप्रश्नासह. महीन्याच्या आत उत्तर द्या नाहीतर हार मान्य करा.

अपमानित होउन आलेला राजपुत्र जास्त व्यथित होता ते प्रश्नाच उत्तर मिळत नसल्याने. प्रश्न होता "स्त्री ला आयुष्यात नेमकं काय हवं असतं ?" स्वराज्यातील सगळ्या विद्वानांची चर्चा घडवून आणल्यावरही उत्तरावर एकमत होत नव्हतं. आणि प्रश्न सुटल्याचं समाधान मिळेल असं उत्तरही कुणाकडे नव्हतं.

सगळे उपाय थकल्यावर, मुदत संपायच्या काही दिवस आधी राज्यात दवंडी पिटवली गेली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या प्रश्नाच उत्तर माहिती आहे म्हणून एक स्त्रीच पुढे आली. पण तीची अट मात्र आणखीन विचित्र होती. अगदी अचूक उत्तर देते पण राजपुत्राशी किंवा राजघराण्याशि संबंधित पुरुषाशी लग्न व्हाव आशी साधी आणि सोप्पी अट होती उत्तरदात्रीची. ही वेळ वेगळीच होती म्हणून ह्या मागणीवर विचार तरी झाला. पण परिस्थितीची गुंतागुंत पुरेशी नव्हती अस वाटण्याजोगी अवस्था होती. उत्तर देणारी स्त्री ही एक कुरुप, वृद्ध चेटकीण होती.

राजपुत्राचं अश्या स्त्रीशी लग्न व्हाव असं कुणालाच वाटत नव्हतं आणि हार मानण्याची नामुष्की पत्करायला राजपुत्र तयार नव्हता.

हा पेच सोडवला प्रधानपुत्राने, राजकुमाराचा लहानपणापासूनचा मित्र आणि प्रत्येक बाबतीत त्याच्या बरोबरीचा असलेला प्रधानपुत्र राजकुमाराला म्हणाला, "मित्र म्हणून आजवर तुमच्याकडे काहीच नाही मागितलं. राज्याकरता एव्हढ करण्याची परवानगी मला द्या." अतिशय जड अंतःकरणाने ही परवानगी देताना राजपुत्राला प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायची उत्सुकताही होतीच.

लग्नाच्या आदल्या दिवशी त्या स्त्रीने प्रश्नाचं उत्तर दिलं "आयुष्यभर स्त्रीसाठी पुरुषच निर्णय घेत असतो. लहानपणी बाप म्हणून, नंतर खेळगडी, प्रियकर, नवरा वृद्धपनी मुलगा, जावई ह्या ना त्या रुपात स्त्रीच्या आयुष्याशी संबंधित निर्णय घेतले जातात ते पुरुषांकडूनच. स्त्रीला आयुष्यभर हवं असतं ते 'स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचं स्वातंत्र्य' "

उत्तर इतक समर्पक आणि चोख होतं की नगरवासीयांप्रमाणेच ह्यापुढल्या गोष्टीविषयीची आपली सर्वांचीही उत्सुकता संपून गेली असेल.

लग्नाच्या पहिल्या रात्री सजवलेल्या शयनगृहात शिरलेल्या प्रधानपुत्राला, शेजेवर बसलेली सुस्वरुप तरुणी बघून आश्चर्याचा धक्का बसला. तो काही बोलणार तोच ती तरुणी म्हणाली, "मी तीच आहे. माझ्या एका चुकीमुळे मला हा कुरुपतेचा आणि वृद्धत्वाचा शाप मिळाला होता. उ:शापानुसार लग्नानंतर मी रोज १२ तासांकरता मूळ रुपात वावरु शकेन. पण उर्वरीत १२ तासांकरता मला कुरुप वृद्धेच्याच रुपात रहावे लागेल. मी काय करावे ? रात्रीपुरते मूळ रुपात येउन आपल्यासवे खाजगी आयुष्य घालवावे की दिवसा मूळ रुपात राहून आपल्यासमवेत जनांत वावरावे ? ह्याचा निर्णय आजच घ्यावा लागेल. त्वरीत सांगा."

स्मित करुन प्रधानपुत्र म्हणाला, "प्रिये, तुझ्या ह्या प्रशाचे उत्तर, हे तू कूटप्रश्नाला दिलेल्या उत्तरातच दडलेले आहे. हा तुझ्या आयुष्यांसंदर्भातला निर्णय असून हा घ्यायचे स्वातंत्र्य तुझेच आहे."

मला वाटते ह्या अचूक उत्तरामुळे ही गोष्टही इतर सार्‍या गोष्टींप्रमाणेच "अखेर ते दोघे सुखाने भांडू लागले" वर संपायला हरकत नसावी. पण आपल्या सर्वांची आयुष्य अशी नसतात नाही ?

माझं लहानपण एकत्र कुटुंबात गेलं, घरातला वीस पंचवीस माणसांचा रगाडा उपसताना आजी, आत्या, आई, काक्या कधी खंतावलेल्या दिसल्या नाहीत. ह्याचे श्रेय घरातल्या श्रमविभागणीला की त्या बायकांच्या सहनशक्तीला, हे समजण्याचं वय नव्हतं. पण स्वयंपाकघरात काम करत असलेले आजोबा, काका आणि बाबा दिसायचेच. ह्यात कुठलही काम पुरुषांना वर्ज्य आहे असं दिसलं नव्हतं. उलट पीठ मळणे (कणिक तिंबणे) ह्यासारखी कामं ही पुरुषांचीच होती. समज आली की स्वतःचे कपडे स्वतः धुणं, स्वतःची ताट वाटी स्वतः धुवून ठेवणं ही घराची पद्धत होती. पुरुष असणं हे जेवण न बनवता येण्याचं लायसन्स नव्हतं. ह्याला साधा चहाही बनवता येत नाही अशी टवाळी पुरुषांचीही व्हायची. घरातले निर्णय हे मुख्य पुरुषच घ्यायचा, पण सर्वांच्या विचारानेच.

अगदीच पर्सनल उदाहरण होईल पण एका काकांचा घटस्फोट झाल्यावरही त्या काकीला अजूनही आमच्या घराची सोबत वाटते. आणि हे तीने तिसर्‍या माणसाला सांगितलेल मी जेव्हा ऐकलं, तेव्हा आपल्या घराण्याविषयी आपली जबाबदारी म्हणजे काय ते मला समजलं (विषयांतराबद्दल क्षमस्व)

कदाचित लहानपणापासून हे समोर बघत असल्यामुळे असेल, किंवा काही समजायच्याही आत वेड लागल्यागत केलेल्या वाचनामुळे असेल. स्त्रीच्या समाजातील स्थानाबद्दलच्या माझ्या कल्पना मागासलेल्या राहिलेल्या नाहीत (हे मा वै म. परंपरेनुसार बायकोचं मत हे नेमक उलटं आहे ते सोडा)

पण आजूबाजूला डोळे उघडून बघताना मात्र काही गोष्टी मनावर चरे उमटवत गेल्या. मागे कुठेतरी लिहिल्याप्रमाणे "नकुसी" हे नाव. वरच्या बर्‍याचश्या पोस्टस् मध्ये मांडलेले प्रसंग, वर्तमानपत्रातल्या बातम्या. कुठेतरी अस्वस्थ करुन जातात आणि मनात एक प्रश्न उभा राहतो ? हे एकविसाव्या शतकात घडतय ? आपल्या सो कॉल्ड शिकल्या सवरलेल्या जगात ? कधी पुरुष, कधी स्त्रियाच तर कधी समाज (ज्यात तुम्ही आम्हीही मोडतो). आपण असं वागतो ? असं वागू, विचार करु शकतो ?

मग स्त्री मुक्ती म्हणजे नक्की काय ? झालीये का स्त्री मुक्त ?

माझ्या पिढीचा पिंड घडत होता, तेव्हा स्त्रीने नोकरी करणं, जातीबाहेरील लग्न, प्रेमविवाह ह्याविषयी टॅबू उरला नव्हता. पण माझ्या आठवणीप्रमाणे मद्यप्राशन करणार्‍याकडे बोटं रोखलेली असायची. "मी दारु पीतो" असं अभिमानाने सांगणारा कोणीही पुरुष त्याकाळी मी बघितलेला नव्हता. आज मात्र ह्या गोष्टीला समाजमान्यता मिळालेली दिसते. एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्याचा मान राखायला आपण शिकतो आहोत. अजूनही स्त्रीने धूम्रपान / मद्यपान करणं ह्याविषयी (पाठीमागून) कुजबूज ऐकू येतेच. पण हळूहळु शहरी समाज हे स्वीकारतोय हे नक्की. विधवा, घटस्फोटीता, फसवल्या गेलेल्या स्त्रीया ह्याम्च्या आयुष्याचे निर्णय समाजानेअच घेउन टाकलेले असायचे तसं आता दिसून येत नाही. पण ही स्त्री मुक्ती नसून हे समाजाची विचार करायची पद्धत बदलत्येय ह्याचं लक्षण आहे. स्त्री मुक्ती हा ह्याचाच भाग आहे असं तुम्हाला वाटतं का ?

मला विचाराल तर, नाही. मुळात आधी जेव्हा चळवळ सुरु झाली तेव्हा ती स्त्री पुरुष समानतेची चळवळ होती. ह्याविषयी वाचलेल्या एकाच वाक्याने माझा ह्याविषयाकडे पहायचा दृष्टीकोनच बदलून टाकला होता. "स्त्री जर पुऋषाशी बरोबरी करु ईच्छित असेल तर ती तीच्या लायकीपेक्षा खूपच कमी ध्येय ठेवते आहे" ह्या आशयाचं काहीस वाक्य होतं ते. मला मनापासून पटलं. पण आज ह्या गोष्टींकडे बघताना एक वेगळा अर्थ ध्यानी येतो. एकूणातच स्त्रीचं समाजमानसात पिढ्यानपिढ्या असलेल दुय्यम स्थान, तीच्या अपेक्षा खालावून टाकण्यास कारणीभूत ठरलं आहे. त्यामूळेच स्त्री मूक्तीचा खरा अर्थ म्हणजेच, स्त्रीच्याच मनात असलेल्या स्वतःविषयीच्या मर्यादांपासूनची मुक्ती होय.

एक स्त्री म्हणून स्वतःवर लादून घेतलेल्या अपेक्षाच उद्या स्त्रीच्या पायातल्या बेड्या ठरु शकतात. सुपरवुमन बनण्याचा अट्टाहास, कामावरून दमून आल्यावरही स्वयंपाक घरात शिरून साग्रसंगीत जेवण न बनवता आल्याने स्वतःला वाटणारं अपराधीपण, मुलांच्या अभ्यासाची एकटीने ओढवून घेतलेली जबाबदारी, पाळणाघरात मूलाला ठेवायला लागल्याने वाटणारं कानकोंडलेपण ही ह्यातली रोजच्या आयुष्यातली उदाहरणं. आपली शक्ती, आपली मर्यादा न ओळखता भलत्या जबाबदार्‍या ओढवून घेणार्‍या कोणाचही काय होतं हे आपण सारे जाणतोच. पण ह्या सगळ्या जबाबदार्‍या स्वतःहून ओढवून घेण्यामुळे आजची स्त्री ही जगण्यातला आनंद गमावत्येय त्याचं काय ? अगदी स्वतःचे (काही अंशी कुटूंबातलेही) निर्णय स्वतः घेण्याचं स्वातंत्र्य असलेल्या आजच्या चौकोनी कुटूंबातल्या कर्त्या स्त्रीचही हेच दुखणं असेल. मग कसली स्त्री मुक्ती ? मुक्तता हि आनंदाशी निगडीत असते ना ? आज स्त्रीला खरी गरज आहे ती स्वतःविषयीच्या गंडांपासून मुक्त होण्याची. कोणत्याही गोष्टीत जास्त प्रमाणात गुंतून पडण्याची स्त्रीची जी मानसिकता आहे, ती बदलण्याची. एकदा तुम्हाला ह्या मुक्तीचा खरा अर्थ कळला की बाह्य जगातल्या समस्यांना तोंड देण्यासाठी आवश्यक ते बळ सहज मिळवता येईल.

फॉर दॅट मॅटर हे फक्त स्त्रीलाच लागू न पडता, आपल्या वेगवान आयुष्याबरोबर विचार न करता फरफटत चाललेल्या प्रत्येकालाच माझं हे सांगणं आहे.

स्वाती२ | 14 March, 2011

स्त्री मुक्ती/ समानता वगैरे शब्द कळायचे सोडाच पण 'र' वाले शब्द बोबडे बोलायची तेव्हाही आपले घर जरा वेगळे आहे हे जाणवले. स्वतःच्या मर्जीने अविवाहित रहायचा निर्णय घेतलेल्या दोन आत्या. मुंबईत स्वतंत्र रहाणार्‍या. त्यातली एक खादीच्या कपड्यात - बालवाडी चालवणारी तर दुसरी कॉलेजात प्रोफेसर बॉटनीची. दुसरी मुलगी झाली तेव्हा बर्फी वाटणारे बाबा. दोनच अपत्याच्या निर्णयावर ठाम असलेले आई-बाबा. बाबा बँकेत तर आई गृहिणी. दोघेही कॉलेज ग्रॅज्युएट. आईच्या माहेरी वरवर पहाता पारंपारिक वळण पण शिक्षणाच्या बाबतीत समानता. १९५६ साली लहान खेड्यातुन मुलीला पुण्याला फर्ग्युसनला होस्टेलला राहून शिकायची संधी देणारे आजोबा. ते ही माझी आजी अंथरुणाला खिळलेली, पाठीवर भावंडे या परिस्थितीत. पण मोठा मुलगा मुंबईला शिकतोयना मग हिलाच मुलगी म्हणुन घरच्या अडचणी पुढे करुन शिक्षण का नाकारायचे हा विचार. आईचे गृहिणी असण्याचे कारण पूर्णपणे भावनिक. बाबांची आई लवकर गेल्याने आईचे प्रेम फारसे नाही, आईला तिची आई अंथरुणाला खिळल्याने १२ व्या वर्षीच 'मोठे' व्हावे लागलेले. घरात मोठे माणुस कुणी नाही. कामाच्या बाईवर मुलं सोपवून नोकरी करायची. तेव्हा आपल्या वाट्याला आले नाही ते आईचे प्रेम मुलींना तरी मिळावे एवढाच विचार. अशा घरात मुलगी म्हणुन कुठली गोष्ट नाकारली जाण्याचा प्रश्नच नव्हता उलट सगळं माहित हवे म्हणून छपरावर चढून फुटलेले कौल बदलणे, बँकेचे व्यवहार, फ्युज बदलणे वगैरे गोष्टीही वरण-भाताचा कुकर लावणे या बरोबर शिकवल्या गेल्या. नवराही अतिशय सहृदयी, समजुदार. त्यामुळे माझ्या रोजच्या आयुष्यात, माझ्या कुटुंबापुरती समानताही खरे तर टेकन फॉर ग्रांटेड गोष्ट. त्यासाठी मला माझ्या घरात झगडावे लागले नाही आणि बाहेरच्या जगात जरी झगडावे लागले तरी त्यासाठीचे बळ संस्कारातुनच आलेले. त्यामुळे माझ्या अबला नसण्यात मी ज्या कुटुंबात जन्माला आले त्या कुटुंबाचा वाटा हा १००%. मी या कुटुंबात जन्माला आले नसते तर... हा विचार वारंवार भेडसावतो आणि माझ्या परीने सबलीकरणास हातभार लावायला भाग पाडतो.

काहीवेळा हा हातभार मुलाच्या मित्राच्या नोकरी करणार्‍या आईला 'काळजी करु नको. मी आणेन तुझ्या लेकाला प्रॅक्टिस संपल्यावर घरी' इतका शुल्लक दिलासा देणारा असतो तर कधी परक्या देशात डिवोर्सच्या केसला तोंड देणार्‍या मित्राच्या बायकोला जमेल ती मदत करणे असते. काही वेळा मैत्रिणीला नीट वागव म्हणुन मुलाला दटावणे असते. काही वेळा स्त्री कर्मचार्‍याची बाजू घेऊन भांडणार्‍या नवर्‍याला, 'भांड तू बिंदास' असा पाठिंबा देणे असते. काही वेळा सासूच्या आजारपणात रजा घेऊ न शकणार्‍या सुनेला 'जज करायचे नाही' अशी स्वतःलाच मला तंबीही द्यावी लागते. चुकत माकत माझा प्रवास चालू आहे.
मुलीसाठी पुरेसा वेळ देता येत नाही म्हणून अपराधी वाटुन घेणार्‍या डॉक्टर शेजारणीची समजूत काढणारे माझे आई-बाबा, प्रसंगी तिची सपोर्ट सिस्टिम आहेत. डेकेअर आणि तिच्या नवर्‍याची घरी येण्याची वेळ यातील रात्री ८ ते ९:३० ही गॅप माझे आईबाबा चिमुरडीला सांभाळून भरुन काढतात. मी लहान असताना आसपासच्या सासुरवाशीणींना आमचे घर हा मोठा आधार असायचा.

माझा नवरा फाउंड्री इंडस्ट्रीत आहे. त्यांच्याकडे शिफ्टमधे काम. मिल्क पंप करण्यासाठी सवलत वगैरे काही नाही. पण एखाद्या आईला असे करायचे असेल तर त्या काळात हुद्दा बाजूला ठेऊन लाईनवर तो स्वतः उभा राहिलाय/ राहिल. बर्‍याच स्त्री कर्मचारी आपल्या रिटायरमेंट प्लॅनिंग बद्दल उदासिन असतात त्यांना तो ४०१ केत पैसे गुंतवणे कसे सोपे आहे ते पटवून देतो. प्रीटॅक्स कापलेले पैसे आणि टॅक्स जाऊन हातात येणारा पगार याचे गणित समजावून सांगितले की बरेच कर्मचारी जागरुकतेने पैसे गुंतवतात. पुरुषी अहंकार बाजूला ठेऊन सहृदयतेने वागणार्‍या नवर्‍याचा मला अभिमान वाटतो.

प्रतिसाद बस्के | 14 March, 2011

इथे सर्वांनीच अतिशय संयत व मुद्देसुद लिहीले आहे. त्यामानाने माझ्याकडे काहीच नवीन मुद्दे नाहीत.
फक्त एखाद-दोन उदाहरणे द्याविशी वाटत आहेत.

माझ्या मैत्रिणीची आई. लग्न १८व्या वर्षी झाले. लगेचच काकांच्या सहकार्याने बीएस्सी ला अ‍ॅडमिशन घेतली. प्रेग्नंट असताना, ९व्या महिन्यात प्रॅक्टीकल्स केली.. बीएस्सी नंतर एमेस्सी केले. व १०एक वर्षं कॉलेजमध्ये प्राध्यापकी केली. वेल अशी उदाहरणे आपण पाहतोच. पण इथे गंमत पुढे आहे. काकूंनी चक्क माझी मैत्रिण ११वीत असताना परत एकदा काकांच्या आग्रहाने अमेरिकेमध्ये मास्टर्स करायचे ठरवले व त्या इथे आल्याही. १२वी झाल्यावर मैत्रिणही युएसमध्ये शिकण्यासाठी यायचे प्रयत्न करू लागली , पण तिला दुर्दैवाने २-३ वर्षं व्हिसाच नाही मिळाला. मग मिळाल्यावर तीही त्याच युनिव्हर्सिटीमध्ये बीएस करायला आली. नंतर काकूंनी मास्टर्स झाल्यावर पीएचडीही केली. यासर्व काळात काकांचा अमर्याद सपोर्ट! त्यांना मुलगीही एकच. त्यामुळे बायको व मुलगी अमेरिकेला गेल्यावर त्यांनी एकट्यानी भारतात स्वतःचा बिझनेस सांभाळून अमरिकेत १०-१२ वेळा फेर्‍या मारून त्यांच्याबरोबर वेळ व्यतित केला. परंतू एकदाही काकूंना अथवा मैत्रिणीला बोलून दाखवले नाही. लोकं बोलत असतीलही, किंवा असा विचारही करत असतील, की काय ही अमेरिकेची क्रेझ अथवा इतकं काय आत्ता पडलंय शिकण्याचे, घरदाराकडे दुर्लक्ष करून इत्यादी. पण यासर्वांकडे दुर्लक्ष करून त्या फॅमिलीने जे काही एकत्रितपणे निर्णय घेतलेत, पार पाडलेत ते अविश्वसनिय आहेत. माझ्यासाठी काकू आय्डॉल आहेतच पण काकाही तितकेच आहेत.
इंजिनिअरिंग मी मुलींच्या कॉलेजमधून केले. आमच्या कॅम्पसमध्ये सर्व कॉलेजेस एकत्र. त्यामुळे इकडून तिकडे बातम्या कळायच्याच. जेव्हा आम्ही मुलींनी दहीहंडी करायची ठरवली तेव्हा कोएड मधली कित्येक मुलं जमा झाली होती तेही नाउमेद करण्यासाठी. की मुलींना काय जमणारे मनोरे करायला.. खरं म्हणजे आम्हा मुलींना ते नीटसं जमलंही नाही. सारखे मनोरे कोसळायचे. इकडे मुलांची कुत्सित खीखी वाढत चालली होती. शेवटी आमच्या बॅचच्या एका धाडसी मुलीनी निर्णय घेतला. तशी ती अ‍ॅथलेटीक इत्यादी होतीच. परंतू शिक्षकांना समजावून ती दहीहंडीचे दोर बांधले होते त्या ४ मजल्यावर गेली.. तिकडून सरळ काही सेकंदाच्या आत सरसर रोप क्लाईंबिंग करून हंडी फोडली व दुसर्‍या टोकावर गेली.. आम्हाला हसणार्‍या मुलांची बोलती बंद होऊन ते सगळे आ वासून बघत राहीले..

मुलगी असली तरी मनात आणलं तर काहीही करता येऊ शकते अशी ही काही उदाहरणे.. अशी बरीच उदाहरणे सापडतील , पण आत्ता ही आठवली प्रकर्षाने..

मुळात लोक काय म्हणतील याचा बाऊ अती केल्याने सगळे प्रॉब्लेम्स होतात. आपल्या जवळच्या लोकांचा , मनाचा थोडा विचार करणे समजू शकते, पण ते प्रगतीच्या आड येत असेल तर मात्र इतरांचा विचार करत बसू नये.

अजुनही मी पाहते, घरात बाईला बरं नाही हे दिसत असलं तरी ती बाईच बर्‍याचदा ते दुर्लक्षित करून घराकडे पाहते , मात्र त्याच वेळेस घरातील पुरूषाला सर्दी पडसं जरी झाले तरी लहान मुलासारखे त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागते. घरच्या बाईकडे मुळातच मदर इन्स्टिंक्ट असल्याने ती लक्ष आनंदाने देतेही. पण हे लक्षात घेतले पाहीजे की असे लक्ष पुरवलेले त्या बाईलाही आवडेल की आपली कोणीतरी काळजी घेते आहे.. अशी छोटीमोठी उदाहरणे असतात. पण ठिके, सुधारणा होतीय.. अजुनही काही वर्षात बदल होतील..

जाताजाता, सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टीव्ह पीपल या पुस्तकातील फेमस पॅराडाईम शिफ्टचे हे उदाहरण. एका ग्रुपला तरूण मुलीचे चित्र दिले व एका गृपला म्हातार्‍या बाईचे. व त्याकडे १० सेकंद पाहण्यास सांगितले. जेव्हा त्यांना खालील चित्र दाखवले गेले, (चित्र बस्केच्या पोस्टमध्ये आहे, ते पहावे) तेव्हा त्यांना १० सेकंद पाहिलेल्या चित्रातीलच व्यक्ती दिसली. म्हणजे ज्यांना तरूण स्त्रीचे चित्र आले होते त्यांना तरूण स्त्री दिसली व दुसर्‍या ग्रुपला म्हातारी. एव्हढेच नाही तर एक ग्रुप दुसर्‍या ग्रुप विरूद्ध भांडू लागला की काहीतरी काय किती सुंदर आहे ही मुलगी.. २०शी बाविशीचीच असेल, तर दुसरा ग्रुप म्हणे ह्या, ७०-८० ची निश्चित! मुळात दोघांचेही तसे चूक नाहीच..

फक्त १० सेकंद पाहिलेले चित्र इतके कंडिशनिंग करू शकते, तर वर्षानुवर्षे चालत आलेल्या रूढी, परंपरा किती कंडिशनिंग करत असतील?? त्यामुळे एक लक्षात ठेवले पाहीजे आपण ज्या दृष्टीने जग पाहतो ते बरोबर असेलच असे नाही. दुसर्‍याचेही मत विचारात घेऊन जर ते पटले तर तो पॅराडाईम शिफ्ट करता आला पाहिजे. हेच मला स्त्रियांच्या 'मुक्ती'बद्दल वाटते. फारपूर्वी सती जाणे वगैरे लोकांना फार धार्मिक व बरोबर वाटायचे, राजा राममोहन रायांमुळे नंतर बंद झाले.. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या आधी स्त्रीशिक्षण अगदीच दुर्लक्षित होते. त्यांच्या कष्टांनी तो समाजाचा पर्स्पेक्टीव्ह बदलला. व आज आपण इतकी सुधारणा पाहतोय. त्याचप्रमाणे इतरही ज्या बाबी आपल्याला खटकतात तिथे विरोध केलाच पाहीजे. स्वतः सुखी व समाधानी असलो म्हणून आपल्याला काय करायचेय, हे चुकीचे आहे. आपण सर्वजणी असा विचार करत राहिलो तर निश्चितच अजुन सुधारणा होतील.

व सगळे म्हणतात तसे नुस्ते इथे टायपून काय उपयोग ? असे न वाटता याचाही उपयोग जिथे बायका जास्त शोषित व पीडित आहेत त्या तळागाळापर्यंतही होईल..व आज ना उद्या ते बदलाचे वारे नक्कीच जातील. मी आशावादी आहे!

शुभांगी कुलकर्णी | 14 March, 2011

लाजो खो साठी धन्यवाद. इथे सगळच लिहुन झालय. तरीही समुद्राच्या पाण्यात माझ्याही थेंबाची भर.

स्त्रीमुक्तीच्या व्याख्या व्यक्तिपरत्वे आणि प्रसंगानुरुप बदलतात असे माझे मत. अंगावर १५ किलोचे दागिने घातलेल्या स्त्रीला त्या जोखडापासुन मुक्ती हवी असते तर बरोबरीने कमावल्यावर, शिकल्यावर, आचार विचारात कुठेही कमतरता नसताना केवळ एक स्त्री म्हणुन दुर्लक्षित करण्यापासुन मुक्ती हवी असते.
सफरचंद आणि संत्र्याची जशी तुलना होऊ शकत नाही तशी स्त्री आणि पुरुषाचीही तुलना होऊ शकत नाही. प्रत्येकाला स्वत:ची बलस्थाने आहेत तर काही उणिवा, फक्त त्यांचा आदर करणं जमल पाहिजे किंबहुना केलाच पाहिजे प्रत्येकाने.

१) माझ्या सुदैवाने म्हणा किंवा परिस्थितीने मला कधीच या रुढी, परंपरावादी विचारांना सामोरे जावे लागले नाही किंवा कधी मी मुलगी असल्याने दुजाभाव स्विकारावा लागला नाही. अगदी मोठ्या बहिणीच्या पाठीवर मी १० वर्षांनी झाल्यावर आईच्या डोळ्यातली चमक गावभर साखर वाटुन वडीलांनी साजरी केली. १० वर्षानंतर गर्भनिदान चाचणीला ठामपणे विरोध करणारी माझी आई मुक्तच होती. वर्षानुवर्षे सरकारी नोकरीच्या निमित्ताने बाहेर राहणार्‍या वडिलांच्या मागे समर्थपणे संसाराचा गाडा हाकणारी माझी आई, आमच्या फीया भरायला प्रसंगी स्वतःचे दागिने मोडणारी, भावांच्या मुंजी रद्द करुन बहिणीला पोस्ट ग्रॅज्युएशनला अ‍ॅडमिशन घेणारी, आम्हा बहिणींना स्री-पुरूष समानतेचे बाळकडु पाजणारी ती माऊली मुक्तच होती. अर्थात या सगळ्यात तिला साथ लाभली ती माझ्या वडिलांची. त्यांनी सगळ्यांचा विरोध पत्करुन, प्रसंगी घरातुन बाहेर पडुन तिला मॅट्रीकची (जुनी ११वी) परिक्षा द्यायला प्रोत्साहन दिले. आज वडील नाहीत पण ती तितक्याच स्वातंत्र्यात आहे. घराच काय करायच, मिळालेल्या पैश्याच काय करायच हे सगळ तिच्या विचाराने किंबहुना निर्णयाने केल गेल.

२) माझ्या पाहण्यातली दुसरी स्री म्हणजे माझ्या आजे सासुबाई (नवर्‍याच्या आईच्या आई). जेव्हा काडीमोड या शब्दाचाही लोक धसका घ्यायचे त्या काळात (१९४९) घटस्पोट घेतलेली स्त्री. लहान वयात लग्न झाल्यावर नवर्‍याकडे शिक्षणाचा हट्ट धरल्याने सासुने माहेरी हाकललेली, माझी काहीही चुक नसताना मी का माहेरी राहु अस सासुला ठामपणे विचारणारी, अजाणत्या वयात मातृत्वाला विरोध करणारी, वंशाला दिवा देऊ शकत नाही म्हणुन झोपेत जाळणार्‍या नवरा, सासुला चंडीकेप्रमाणे ढकलुन देणारी, मी तुमच्या बरोबर नाही तर तुम्हीच माझ्याबरोबर राहण्याच्या लायकीचे नाहीत म्हणुन रात्रीत घर सोडणारी एक कर्तुत्ववान स्री. पुण्यात सेवासदनमधे राहुन स्वतःच्या पायावर त्या उभ्या राहिल्या त्यानी रीतसर नर्सिंगचे शिक्षण घेतले व गावोगावी जाऊन इतर अशिक्षित स्त्रीयांना कुटुंबनियोजनाचे धडे दिले. स्वतःच्या प्रकृती स्वास्थ्याची काळजी घ्यायला शिकवले. त्यांनी स्वतःच्या मुलीवरचा वडिलांचा हक्कही नाकारला. मुलीच्या (माझ्या सासुबाई) नावापुढे स्वतःचे नाव लावले. कुठेही जा, काहीही करा पण पहिल्यांदा आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या स्वावलंबी व्हा हा कानमंत्र त्यानी स्वतःच्या मुलीलाच नाही तर आम्हा सगळ्यांनाच दिला. आज त्या नाहीत पण त्यांचे विचार आणि निर्णयक्षमता आम्हाला कठीण प्रसंगातुन बाहेर काढते.

सामाजिक पातळीवर एक स्त्री म्हणुन कितीतरी वेळा दुय्यम वागणुक मिळाल्याचे प्रसंग आले पण मी ते निभाऊन नेले. आपण समर्थ असु तर पुढचा काहीच करु शकत नाही हे मनात पक्क केल्यावर जास्त त्रास होत नाही अश्या गोष्टींचा. आप्ण दुसर्‍याला सन्मानाने वागवल्यावर पुढचा तेवढ्याच सन्मानाने वागवतो आणि वागवत नसेल तर त्याला तस प्रवृत्त करायला आल पाहिजे.

मंदार_जोशी | 14 March, 2011

सानी यांनी खो दिल्यामुळे इथे माझे विचार लिहीत आहे.

मी इथे काहीच लिहीणार नव्हतो, कारण (१) स्त्री "मुक्ती" हा शब्द मला मान्य नाही (२) इथे भारंभार पोष्टी टाकून तथाकथित स्त्रीमुक्ती होईल असं मला आणि घरातल्या कुणालाही वाटत नाही.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
तरी सानी यांच्या खो मुळे जरा मन मोकळं करायची संधी मी घेतो आहे इतकंच. इथे मी काय बघितलं किम्वा आणखी एक म्हणजे जगात काय चाल्लंय यापेक्षा मी एक पुरुष म्हणून किंबहुना एक नवरा म्हणून मी काय करतो ते मांडणार आहे. ह्या पोष्टीमधे फार खोल विचार वगैरे नसतील तर एक प्रकारचं Free Association स्वरूपातील बोलणं असेल. हां, माझ्या स्त्रीमुक्तीच्या कल्पना मात्र कपडे, दागिने, आणि अहो बाबा-ए आई यापेक्षा फार पुढच्या आहेत.

माझा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. आई 'होममेकर' आणि वडील नोकरी करणारे. त्यामुळे तेच चित्र अनेक वर्ष मनात घर करून होतं. घरात आई-वडील आणि आम्ही दोघं भाऊ - म्हणजे आई वगळता स्त्री नाही. एकीकडे 'एवढी मोठी मुलगी असती तर घरातली माझी चार कामं केली असतीन' असं म्हणणारी आई मात्र कामवाली बाईने दांडी मारल्यास माझ्या भांडी घासण्याला विरोध करायची - आणि अजूनही करते. (गंमत म्हणजे घरातली अनेक कामं केली तरी चालणारी बायको मी भांडी घासायची म्हटलं की विरोध करते - पुरुषांनी भांडी नाही घासायची म्हणे!! अर्थात मी हे ऐकत नाही ते सोडा!!!)
मी शाळेत असल्यापासून "मला स्वयंपाक शिकव" या माझ्या मागणीकडे कायम दुर्लक्ष झालं. स्वयंपाकघरात डोकावून "मी काय मदत करू?" या प्रश्नाला नेहमी "तू काही करू नकोस हीच मदत कर" हे उत्तर. घरातल्या अनेक कामांबाबतही हाच प्रकार. मुलांना सवयी लागणार कशा? घरातली स्त्रीच मुलांना (पक्षी: पुरुषांना) आयतोबा बनवायला कशी जबाबदार असते आणि स्त्रीमुक्तीच्या मार्गातील मोठा अडथळा कसा निर्माण करुन ठेवते हे लक्षात यायला वेळ लागणार नाही. हा माझा अनुभव असला तरी अनेक घरात हेच दिसून येतं.

लग्न झालं आणि मी पुण्यात आलो हे वाक्य ऐकून अजूनही अनेक लोक हसतात. लग्न ठरलं आणि बायकोला मुंबई आवडत नसल्याने मी पुण्यात स्थाईक होण्याचा निर्णय घेतला. हे एकच कारण नव्हतं. पुण्यात तोपर्यंत जवळ जवळ ७ हून अधिक वर्ष शिक्षणाच्या निमित्ताने राहत असलेली माझी सुविद्य पत्नी एल्.एल्.एम. मधे पुणे विद्यापीठाची सुवर्णपदक विजेती आणि एका चांगल्या विधी महाविद्यालयात व्याख्याता/प्राध्यापक म्हणून नोकरी करत होती. माझं शिक्षण आणि नोकरीचे स्वरूप (तेव्हा बी.पी.ओ. बॅक ऑफिस) लक्षात घेता तिने तिथली नोकरी सोडून मुंबईत येऊन बस्तान बसवण्यापेक्षा मीच पुण्यात स्थायिक होण्यात शहाणपणा आहे असा मी विचार केला. मला हा निर्णय घेण्यात एका पुरुषानेच (माझा तेव्हाचा बॉस) मदत केली हे मुद्दामून सांगावेसे वाटते. मुंबईत आयुष्याची पहिली २९ वर्ष काढलेल्या कुणीही अचानक पुण्यात (यातला ण हा खास पुणेरी सानुनासिक पद्धतीने मनातल्या मनात म्हणून बघावा) स्थायिक होणे म्हणजे काय भयाण प्रकार असतो ते वेगळे सांगणे न लगे.

अशी अनेक वर्ष घरात आयतोबा बनून राहील्यानंतर अचानक आपलं नवरा नामक प्राण्यात रूपांतर झालंय हे लक्षात आलं आणि मग सुरवातीची २५-२८ वर्ष लागलेल्या अनेक वाईट सवयी आणि न लागलेल्या असंख्य सवयी नडायला लागल्या. तसं मी काहीच काम करत नसे असं नाही, बाहेरची अनेक कामे मी करतच असे, पण घरातली खूपच कमी. आज लग्न होऊन चार वर्षांनी सुद्धा झगडतोच आहे. इतक्या वर्षांचा आळस त्रास देणारच! पण बायकोच्या प्रौढ शिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत आज बर्‍यापैकी तयार झालोय. स्वयंपाक आजही येत नसला तरी घरातली आणि बाहेरची इतर सगळी कामं मी करतो.

बायकोचं ऑफिस माझ्या खूप आधी. त्यामुळे पहाटे उठणे आवश्यक. पण आज तिच्याही आधी मी उठतो. ती उठेपर्यंत दूध/चहा तयार असतो. ती आदल्या दिवशी फार दमली नसेल तर स्वयंपाक करते. तिचं उरकेपर्यंत मी पोरांच्या बॅगा भरणे (पाळणाघरात जातात - एक मुलगी वय ३ वर्ष, दुसरा मुलगा वय ८ महीने), वॉशिंग मशीन मधून कपडे काढून वाळत घालणे वगैरे कामे उरकतो. आमच्या सोसायटीतील गाड्यांची गर्दी लक्षात घेता बायको घेऊन जाते ती गाडी उलट वळवून इमारतीच्या दाराशी लाऊन ठेवतो आणि बायकोचा लॅपटॉप आणि पुस्तके किंवा तत्सम काही सामान गाडीत ठेवतो. वेळ असल्यास तिचं काही टायपिंगचं काम करतो. बायको ऑफिसात गेल्यावर जमल्यास (लहानगा झोपलेला असल्यास) स्वतःची आंघोळ आणि पूजा उरकून घेतो. मग पोरांची आंघोळ आणि इतर गोष्टी. जाता जाता पोरांना पाळणाघरात सोडतो. येताना दूध, आवश्यक किराणा सामान, वगैरे खरेदी करून येतो. वीज बील, टेलीफोन बील, इतर बीले भरतो. घरातली जी दिसतील ती कामे करतो. आणि हे सगळं इतरांपासून न लपवता.

वर उल्लेख केल्याप्रमाणे माझं शिक्षण आणि नोकरीच्या संधी याचा विचार करता बायकोला नेहमीच प्रोत्साहन देत आलो आहे. तिने पी.एच्.डी. करावी म्हणून घरातली मदत मला कशी वाढवता येईल याचा विचार सद्ध्या चालू आहे. लहानग्याचा जन्म जुलै २०१० चा. त्यामुळे घरात दोन लहान मुले असल्याने काही लागल्यास लवकर घरी येता यावं म्हणून मी माझी नोकरी बदलली. आता नवीन नोकरी घराच्या जवळ आहे. मला १०-१५ मिनिटात घरी पोहोचता येतं. आम्ही घरातले निर्णय दोघेही मिळून घेतो. काही निर्णय काहीही न ठरता आपोआप वाटून घेतलेले आहेत. ते आम्ही परस्पर घेतो पण एकमेकांना विचारून/सांगून. त्यामुळेच मी इथे लिहीण्यास उत्सुक नव्हतो, कारण आमच्या घरी कुठलंही "बंधन" आणि "मुक्ती" नसल्याने यावर फारसा विचार करण्याची वेळ आली नव्हती. घर चालवायचं आहे मग दोघांनीही काम केलंच पाहीजे हा सरळ साधा विचार आम्ही करतो.

विशाल कुलकर्णी | 14 March, 2011

लाजो, खोबद्दल मन:पूर्वक आभार !

मुळात मुक्ती या शब्दाचा अर्थ काय? इथुन सुरूवात करायला हवी. माझ्या मते कुठल्याही व्यक्तीला स्वत्वाचे (आत्म) भान येणे आणि ते इतरांनी मान्य करणे हे झाले मुक्तीचे सर्वसाधारण गमक.

स्त्री-मुक्तीच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास हि गोष्ट खुप महत्त्वाची ठरते. कारण मुळात स्त्रीला स्वतःच्या अस्तित्वाची, सामर्थ्याची ओळख होणे महत्वाचे. विशेषतः एकदा स्वतःला ओळखल्यानंतर तीला त्यापद्धतीने स्वतःला व्यक्त करण्याची, वागण्याची मुभा मिळणे हे खुप आवश्यक. अर्थात मुभा देणारे आपण कोण? तो तिचा किंवा कुठल्याही व्यक्तीचा मुलभूत हक्कच असतो. फरक फक्त एवढाच आहे की आपल्या कडे तथाकथीत पुरुषप्रधान (?) संस्कृती असल्याने पुरुषांना तो आपोआप मिळतो, स्त्रीयांना मिळवावा लागतो. तो अधिकार स्त्रीयांनाही जन्मतःच उपलब्ध असणे हे माझ्यामते स्त्रीमुक्तीचे खरे लक्षण ठरावे. आता स्त्रीमुक्ती या शब्दाचा अर्थ व्यक्तीसापेक्ष असू शकतो. प्रत्येक व्यक्तीचा मग स्त्री असो वा पुरूष या मुद्द्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असु शकतो.

सात वर्षांपूर्वी जेव्हा या कंपनीत जॉइन झालो तेव्हा सॅलरी अकाऊंट उघडताना मी माझ्याबरोबर पत्नीचेही डिटेल्स दिले आणि जॉइंट अकाऊंटची विनंती केली तेव्हा आमच्या अकाऊंटंटच्या भुवया उंचावल्या. "विशाल, धिस इज सॅलरी अकाऊंट बडी!" त्याने मिश्किलपणे विचारले. मला थोडंसं खटकलं ते..., मी म्हणालो... " Infact That is why I need it to be a joint account. माझे काम फिरतीचे असते. जगभर फिरत असतो. पत्नीचे दुसरे खाते आहे, पण या खात्यावरून त्या खात्यात रक्कम ट्रान्सफर करण्यापेक्षा थेट या खात्यालाच तिला अ‍ॅक्सेस असणे योग्य नाही का?" त्याने फक्त खांदे उडवले आणि कामाला लागला.

एक विनोद म्हणूनही ही गोष्ट मला पटत नाही. पण खांद्याला खांदा लावुन चालणे हा शब्दप्रयोग जेव्हा आपण वापरतो तेव्हा मग स्त्रीयांसाठी वेगळ्या आरक्षणाचा मुद्दा मला गैरलागु वाटतो. असो, तो एक वेगळाच विषय आहे, त्यावर इथे भाष्य नको. वाईट या गोष्टीचे वाटते की बर्‍याच स्त्रीया देखील याविषयी उदासिन असतात. (संयुक्त बँक खात्याबद्दल) . अर्थात आर्थिक स्वावलंबन हा एकच निकष या गंभीर विषयाला लावला जावू नये.

जेव्हा स्त्री मुक्ती हा शब्द वापरला जातो तेव्हा तो नक्की कुठल्या अर्थाने वापरला जातो? स्त्री-मुक्ती म्हणजे नक्की कशापासून मुक्ती? पुरुषांपासून, पुरुषप्रधान अरेरावीपासून, स्त्रीत्वाच्या नावाखाली लादल्या गेलेल्या बंधनांपासून की अपेक्षित जबाबदार्‍यांपासुन ! मला वाटते कुठलीही स्त्री आपल्या जबाबदारीपासून कधीच पळ काढत नाही (जे पुरूष सोयिस्करपणे करतात, माझी बायकोदेखील बर्‍याचदा माझ्याबद्दल अशी तक्रार करते ) पण त्या सर्व जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी तिला आवश्यक ते स्वातंत्र्य, अधिकारांसहीत मिळणे ही स्त्री स्वातंत्र्याची साधी सुलभ व्याख्या ठरावी.

हे झाले तिच्या जबाबदार्‍या, कर्तव्याबाबत. पण याही पलिकडे जावून तिचा एक माणुस म्हणून विचार होणे जास्त गरजेचे. केवळ कर्तव्याचा विचार न करता तिच्या इच्छा-अपेक्षा, तिच्या गरजा यांचाही विचार होणे अत्यावश्यक ठरते. एक माणुस म्हणुन आपल्याला हवे ते मिळवण्याचा, त्यानुसार वागण्याचा तिचा मुलभूत अधिकार न नाकारता तिच्याकडून काही अपेक्षा बाळगणे समजण्यासारखे आहे. पण आपल्याकडे हे खुप कमी घरातून घडते. हे जेव्हा प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत घडू लागेल तेव्हा ती खर्‍या अर्थाने स्वतंत्र झाली असे मी मानेन. मग काय बोलायचे, कसे वागायचे, कसे राहायचे या गोष्टी खुप म्हणजे खुपच दुय्यम ठरतात.

भरत मयेकर | 14 March, 2011

खो दिल्याबद्दल उल्हास भिडे यांचे आभार.

शाळेत मराठीच्या पाठ्यपुस्तकात इरावती कर्वे यांचा ’परिपूर्ती’ हा लेख अभ्यासाला होता. एका समारंभाला वक्त्या म्हणून गेलेल्या इरावतीबाईंचा परिचय करून दिला गेला..`क’ची मुलगी, `ख’ची पत्नी , `ग’ची सून. तो परिचय अपूर्ण आहे असे त्यांना वाटत राहिले. काही दिवसांनी कुठे जाताना रस्त्याकडेला उभ्या असलेल्या त्यांच्या ‘मुलाच्या’ मित्रांपैकी एकाने दुसर्‍याला ’अरे ही बघ आपल्या वर्गातल्या `क्ष’ची आई, असे म्हटलेले त्यांच्या कानावर पडले तेव्हा त्यांना आपला परिचय पूर्ण झाल्यासारखे वाटले. म्हणजे इरावती कर्व्यांसारख्या स्त्रीला सुद्धा आपल्या आयुष्यातल्या पुरुषांमुळेच आपली ओळख सांगितली गेली यात काही गैर वाटले नाही. तेव्हा तो लेख मातृत्वाची महती सांगण्यासाठी वाचला/शिकला, पण आज मात्र मला तो या वेगळ्याच संदर्भात आठवत राहतो. एखाद्या पुरुषाच्या बाबत असे होऊ शकेल का? आणि झाले तर त्याचा `अभिमान(अमिताभ-जया)’ होईल ना? तेव्हा स्त्रीची एक माणूस, एक व्यक्ती म्हणून प्रथम ओळख आणि विचार हाच इथे अनेकांनी मांडलेला विचार पुन्हा अधोरेखित करावासा वाटतो.
----------------------
हे माझ्याविषयी आणि आमच्या घराविषयी : मला लहानपणापासून स्वैपाकघरात आईला मदत करायची हौस. नारळ खवणे, ताक घुसळणे, भाज्या चिरणे, पुर्‍या लाटणे कातणे, इ.(अर्थात हे नोकरी लागेपर्यंत) . तरीही एकट्याने सगळे करता येत नसे. आईनेही त्यापेक्षा जास्त शिकवले नाही. पण २००९ च्या डिसेंबरमध्ये आईला फ़्रॆक्चर झाल्याने सहा आठवड्यांची सक्तीची बेडरेस्ट सांगितली गेली. आणि मी तिचे किचन खालसा केले. माझ्या स्वेच्छानिवृत्तीमुळे (आणि तिच्या सक्तीच्या!) हे सहज जमलेही. आता आई सगळी कामे करु शकते तरी ताबा माझ्याचकडे आहे. (मंदार, माझी आई मला भांडी घासू देते बरं का )
पण हे माझ्याबद्दल नाही. तेव्हा लक्षात आलेल्या गोष्टी आईबद्दलच्या. माझ्या लहानपणापासून आई आजारी म्हणुन झोपली असल्याचे प्रसंग फ़ार तर २-३ आठवतात. ताप वगैरे असतानाही तिनेच सगळे सांभाळलेले.आताही रोज कॅल्शियमची एक गोळी ती मनापासून घेत नाही, मला द्यावी लागते. आता जेवण करताना कामात माझा वाटा मोठा असला तरी जर वाढणे तिच्या हाती दिले, तर कधी काही चपात्या कुठे करपल्या असतील तर त्या स्वत:लाच घ्यायच्या, मला आणि बाबांना द्यायच्या नाहीत, भाजी/आमटी कमी असेल तर स्वत:ला कमी घ्यायची. हे ती करते. उरलेले/शिळे अन्नही ती स्वत: एकटीच खाणार. म्हणजे एवढी वर्षे हे ती असेच करत आली होती. आता मी तिला तसे करू देत नाही, आणि तिघांनाही एकसारखेच मिळेल असे पाहतो, हे काही तिला पटत नाही. (याचा अर्थ तिला स्वतंत्र विचार करता येत नाही, असे नाही. स्वत:च्या नवर्‍यालाच काय सासर्‍यालाही तिने न पटलेल्या गोष्टी स्पष्टपण सांगितलेल्या आहेत. आणि स्वत:च्या मनाविरुद्ध कधी वागलेली नाही.)
सगळ्याच आया असेच वागत नसतील का?
-----------------------------------
माझी एक कलीग-मैत्रीण. लग्न झाल्यापासून सासरचा आणि नवर्‍याचा छळ सहन करत आलेली. आम्ही एकत्र काम करीत असेपर्यंत तिने हे कधी कळू दिले नाही. पण काही वर्षांनी आमच्या ट्रान्स्फ़र्स होऊन लांब गेल्यावर तिने थोडीफ़ार कल्पना दिली. तिनेही स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर पुन्हा संपर्क वाढला तेव्हा तिची सगळी कथा समजली. शारीरिक मारहाण सहन करीत तिने संसार रेटला. तिच्या कलीग्जचे, माहेरच्यांचे फ़ोन आलेलेही तिच्या नवर्‍याला खपत नसत. आधी भावंडांत मोठी, पुन्हा माहेरी परतले तर मागच्या भावंडांच्या लग्नात अडथळा येईल म्हणून, आणि मग स्वत:च्या मुलींसाठी ती सगळे सोसत राहिली. आईवडिलांनी इतक्या वर्षांत परत ये असे सांगितले नाही. ऑफ़िसकडून गृहकर्ज घेऊन गुंतवणूक म्हणून तिने एक घर घेउन ठेवलेले. एकदाची मुलींना घेऊन बाहेर पडली. वर्षभराने नवरा तिच्या या घरी खेपा घालू लागला. पाय धरणे, रडणे, क्षमा मागणे, स्वत:ची तब्बेत बिघडल्याचे दाखवणे या प्रकारानंतर हृदयाला पाझर आणि पुन्हा नवर्‍याकडे. आणि अर्थातच काही महिन्यांनी ये रे माझ्या मागल्या. मग तिनेही पोलिसांच्या महिला अत्याचाराविरोधी सेल मध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांचे बोलवणे ज्यादिवशी नवर्‍याच्या हातात पडायचे त्याच दिवशी त्याला अर्धांगाचा झटका आला. आणि पुढले सहा महिने त्याची सग्गळी शुश्रुषा तिनेच केली. (त्याच्या पाच बहिणी फ़क्त बघून जात). लंगडत का होईना चालू फ़िरू लागल्यावर त्याने पुन्हा तिच्यावर हात उगारला. यावेळी ती पुन्हा पोलिसात गेली. दोघांना बोलवून त्याला समज दिली गेली. तेव्हापासून शारीरिक हिंसाचार थांबला. पण मानसिक, भावनिक हिंसाचार चालूच आहे. पुन्हा तिला मुलींसाठी हवी असलेली कागदपत्रे जसे, जात प्रमाणपत्र, डोमिसाइल यासाठी नव‍र्‍याकडून येणारे पुरावेच ग्राह्य असल्याचे सांगितले गेल्याने ती नवर्‍याच्या नावाचे कागद घेऊन सरकारी हापिसांत फ़ेर्‍या मारते आहे. नवर्‍याला सोडून गेले तर मुलींची लग्ने होणार नाहीत म्हणून ती अजून तिथेच राहते असे मला वाटतेय. तिचे म्हणणे..एवढे सहन केले...आता जे काही राहिले असेल तेही करीन. वय फ़क्त ४३.
---------------------------
स्त्रीची अब्रू(?) ही फ़क्त तिची एकटीचीच नाही, तर तिच्या कुटुंबाची मानली जाते, कधी तिच्या जातीची(कास्ट) . आंतरजातीय विवाहांत मुलीच्या नातलगांकडून मुलाचा व त्याच्या घरच्यांचा खून होण्याच्या बातम्या वाचायला मिळतात. आमच्या मालकीची वस्तू पळवून नेतातच कशी? स्त्री ही सतत कुणाच्या ना कुणाच्या मालकीची वस्तू असते. आणि तिची मालकी कुणाला हस्तांतरित करायची हा निर्णय तिचा नसतो. आणि हे प्रसंग आपल्या जवळच घडत असतात.
------------------
दिसलेल्या काही चांगल्या गोष्टी .
----------------------------
माझ्या ४ कलीग्जपैकी तिघींना प्रत्येकी एक मुलगी , चौथी(वर वर्णन केलेली)ला २ मुली. पण कुणालाही मुलगा हवा असे वाटले नाही. आणि त्यांच्या घरूनही हे तितक्याच सहजपणे स्वीकारले गेले आहे.
-----------------------
व्हायोलिन वादक विदुषी एन राजम यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितले, की त्या चार भावात एक बहीण, आणि आणि त्यांच्या काळात मुली लहानपणापासून घरकाम करीत. मात्र त्यांचे वडील (ज्यांनी एन राजमना त्यांच्या वयाच्या तिसर्‍या वर्षापासून व्हायोलिन वाजवायला शिकवले) त्यांना बजावत राहायचे की धुणी भांडी करू नकोस. त्याने हात कडक होतील. आणि वडिलांचा हा आदेश त्या अजून पाळतात.
---------------------------
मध्यंतरी आकाशवाणीवर ज्यांनी स्वत: स्वेच्छानिवृत्ती घेऊन संपूर्ण घर सांभाळलेय आणि पत्नी मात्र अर्थातच नोकरी करते आहे अशा नवर्‍यांच्या मुलाखती ऐकायला मिळाल्या.
----------------------------
कोणते बदल व्हायला हवेत असे वाटते ?:(इतरांनी लिहिले आहेतच ,त्याशिवाय)
आता अन्य मुद्दे, ज्यांना अजून कोणी हात घातला नसावा. (खो १ चा धागा संपूर्ण वाचला, बाकी सलग वाचलेले नाहीत, त्यामुळे पुनरावृत्ती होत असल्यास क्षमस्व).

अरुंधतींनी दिलेल्या आकडेवारीत बलात्काराचा उल्लेख आहे. बलात्कारित स्त्रीचे आयुष्य उद्ध्वस्त होते. ती सगळ्या पुरुषांना लग्नासाठी ‘त्याज्य’(!!) ठरतेच पण आयुष्यातल्या इतर क्षेत्रांतल्या वाटाही बंद होतात. याचे कारण बलात्कार त्या स्त्रीचे चारित्र्यहरण मानले जाते. मध्यंतरी एका पीडितेला तिच्यावर अत्याचार करणार्‍याशीच लग्न करायची परवानगी(की सल्ला?) कोर्टाने दिल्याचे वाचले होते. भंवरीदेवी आणि मुख्तरन माईसारख्या घटना जी मानसिकता दर्शवतात ती अपवादात्मक नसावी.
मला वाटतं बलात्कार हा अन्य एखाद्या शारीरिक जखमेसारखीच गोष्ट आहे, जन्मभर बाळगायची तप्तमुद्रा नाही ,असे मानले गेले पाहिजे. याचा अर्थ बलात्कार्‍याला होणारी शिक्षा अन्य गुन्ह्यांच्या पातळीत कमी गेली जावी असे मुळीच नाही. पण पीडित स्त्रीला झालेगेले विसरुन स्वत:चे आयुष्य पुढे चालता यावे अशी समाजाची मनोधारणा व्हायला हवी. अरभाट यांच्या `योनीशुचितेच्या जुलमी जोखडातून स्त्री हळूहळू मुक्त होऊ पाहत आहे. हे मला एक चांगले लक्षण वाटते. ’ या विधानाची ही पुढची पायरी असायला हवी .
-----------
शेवटी स्त्रीमुक्ती ही नुसतीच स्त्रियांसाठी नाही तर पुरुषांसाठीही मुक्तीच आहे. जशी स्त्रियांकडून विशिष्ट वर्तनाची अपेक्षा केली जाते तशीच पुरुषांकडूनही. पुरुषाने कर्तव्यकठोरच असायला हवे, विशिष्ट भावना प्रदर्शित करु नयेत, म्हणजे रडू नये, अर्थार्जन ही त्याची प्राथमिक जबाबदारी आहे अशा अनेक जोखडांतून त्यालाही मुक्ती मिळेल. सावली यांनी अगदी माझ्या मनातलेच लिहिले आहे.
’म्हणजे काही वेळा मुलीला आवड असूनही नोकरी व्यवसाय करता येत नाही आणि क्वचित मुलाना आवड नसूनही करतच रहावं लागतं हा विरोधाभास आहे. समानता हवी तर याही विषयी हवी.
पुरुषांनाही स्वत:ची आवड म्हणून घरात बसून घर सांभाळायची मुभा मिळावी. उगाच पुरुष आहे म्हणून फक्त त्याच्या खांद्यावर घराचे ओझेही नसावे. ’

भारतात सध्या एकट्या स्त्रीने मूल दत्तक घेणे हे एकट्या पुरुषाने मूल दत्तक घेण्यापेक्षा सोपे आहे.
संसारात आणि समाजात व्यक्तीचे स्थान आणि कर्तव्ये स्त्रीपुरुष या एकाच व्हेरिएबलनुसार नाही तर व्यक्तीपरत्वे बदलाव्यात.
या सगळ्याची सुरुवात आपल्या घरातूनच करता येईल : आपल्या मुलांना खेळणी आणताना मुलाला कार आणि मुलीला डॉल नको, दोघांना दोन्ही प्रकारची खेळणी आणा. पुढल्या पायर्‍या लिहायला हव्यात का?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिनोती, पराग, मंजिरी, पूनम, अरभाट, बित्तु सगळ्यांचेच पोस्ट चांगले, विचार करायला लावणारे लिहीले आहे. अरभाट जिऽऽओ, तुझ्या प्रत्येक वाक्याला अगदी अगदी मला हेच म्हणायचय असे वाटत होते. बित्तु कविता एकदम बोलकी.

सावलीला "खो" बद्दल धन्यवाद. संयोजकांचे उपक्रमाबद्दल अभिनंदन
----------------------------------------------------------
बऱ्याच अंशी मुक्ती ही मानण्यावर असते, वागण्यावर असते (उदा. शैलजाने लिहिले त्याप्रमाणे). अनेकदा काही स्त्रीया परिस्थीतीमुळे (कधी इतरांना पटु न शकणाऱ्या) तसे मुक्तपणाने वागु शकत नाहीत. त्यांना मार्ग दाखविल्या जाण्याची आवश्यकता असते.

Those who know what they know are simple people, befriend them.
Those who know not what they know not are foolish people, beware of them.
Those who know not what they know, are sleeping people, awaken them.
Those who know what they know not, are wise people, learn from them.

बऱ्याचशा स्त्रीया वर उल्लेखलेल्या sleeping mode मध्ये असतात. त्यांच्या मनाला ती स्थीती जाणवुन देण्याची आवश्यकता असते. मनाची मुक्ती सर्वात महत्वाची आहे. मनानी मुक्त होणे हे आवश्यक आहे पण पुरेसे नाही. तोपर्यंत तुम्ही denial मध्ये असता - आपण योग्यप्रकारे केलेल्या गोष्टी पुरेशा वाटतात (उदा. मी हुंडा दिला/घेतला नाही). तुमच्या बाबतची असमानता तुम्हाला दिसत नाही. साजिराचे गाण्याचे उदाहरण, अजुन कुणाचे बांगड्यांचे, अश्विनीमामींचा धार्मीक गोष्टींचा उल्लेख वगैरे.

मनाच्या मुक्तीनंतर वाट किती खरतड आहे हे उमगु लागते. अरुंधतीने लिहिलेले आकडे बोलके आहेत पण ते कुणाला दाखवु नका. कारण त्यावरुन हेच दिसते की सगळे तेच (त्याच गोष्टी) करतात. आणि जेंव्हा एखादी गोष्ट सगळे करतात तेंव्हा ती समाजमान्य/लोकमान्य आणि म्हणुनच बरोबर/खरी/योग्य ठरते.

बाकीचे हुंडा घेतात तर मीच का नाही घ्यायचा? बाकीच्या बायका चुपचाप घरी राबतात तर मीच का हे (किंवा ते) करायचे. खरेतर असा explicit विचारही होत नाही - कारण आजुबाजुला तसेच होत असते आणि बहुतांश बायका देखील (वीचार न करताच) त्यास हातभार लावत असतात. पुरुषांचा दोष नाही? अर्थातच आहे, पण ते केवळ फायदा उठवतात. त्यांना विरोध केल्या गेल्यास काय करतील ते? पण पुन्हा तेच प्रश्न येतात - कुटुंबाकरता पडते घ्यायचे (केवळ बाईनेच?), समाज काय म्हणेल, माझ्या आईवडीलांना सासरचे काय म्हणतील?

वाचकांपैकी काहींच्या लग्नात हुंडा दिल्या/घेतल्या गेला असल्यास तो ते परत करु शकतील? करतील? Charity begins at home. केलात परत (किंवा तत्सम काहीही केलेत तर त्याचा जाजावाजा जरुर करा - निदान काही लोकांना त्यामुळे तशी पावले उचलायला मदत होऊ शकेल). तुमच्या डॉक्टर मित्रमैत्रीणींना ते गर्भार बायकांची सोनोग्राफी करत तर नाहीत ना असे विचारणार? (आणि करत असल्यास थांबवायला उद्युक्त करणार?)

Each one, teach one प्रमाणे प्रत्येकाने (स्त्री व पुरुष) स्वत: मुक्त होऊन (निदान) अजुन एका व्यक्तीला मुक्ती मिळावुन द्यायचा वसा घ्यायला हवा. स्त्रीयांनी याबाद्दल आपल्या मुलाशी, नवऱ्याशी, आईच्या नवऱ्याशी, सासुच्या नवऱ्याशी, घरी काम करणाऱ्या बाईच्या नवऱ्याशी, अशक्य नसल्यास शेजारणीच्या नवऱ्याशी या विषयावर बोलायला हवे. पुरुषांनी मुलीशी, बायकोशी, आईशी, सासुशी ...

बोलणे पुरेसे नाही, पण ती सुरुवात ठरु शकेल. कोणते मुद्दे ते अनेकांनी सुंदररीत्या मांडले आहेच. खऱ्या स्वर्गाची आवश्यकता पृथ्वीवरच आहे. आणि तो सर्वांकरता असणे आवश्यक आहे. तो सर्वांचा अधिकारच आहे मुळी.

जानेवारी महीना केरळात अनेक मास्टर्स लेव्हल क्लासेसना शिकवण्यात घालवला. केरळात स्त्रीभृण हत्येचे प्रमाण नगण्य. नैसर्गीकरित्या मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त असते. तिथे ते त्याही पेक्षा जास्त आहे. मास्टर्सच्या वर्गांमध्ये ८० टक्के मुली. मुले गल्फमध्ये जातात किंवा ईंजीनीअरींग वगैरे. पण म्हणुन या मुली बुद्दु नसतात. त्या ही हुशार असतात. अनेक ठिकाणी निवडल्या जातात आणि मग पालकांचा न ना चा पाढा सुरु होतो. शिक्षकांचा निरुपाय होतो, देश व मानवता चांगल्या तज्ञांना मुकते. या शिक्षकांना एक सल्ला दिला - या मुलींना आई-वडीलांचे ऐकु नका असे सांगणे तुम्हाला कठीण जाईल, मुलींनाही तसे करायला. पण तुम्ही त्यांना हे नक्कीच सांगु शकता की तुम्हाला जेंव्हा मुली होतील तेंव्हा त्यांच्यावर ही परिस्थीती नका येऊ देऊ. पाहु किती ऐकतात ते.

तुमच्यापैकी शिक्षणक्षेत्राशी संबंधीत लोक स्त्रीमुक्ती बद्दल सर्वाधीक करु शकतात. नोकरी-धंद्यात तुमच्या हाताखाली असलेल्यांपर्यंत तुम्ही या बद्दलचे विचार नेऊ शकता. नंतर मात्र तो थोडाफार ज्याचा-त्याचा प्रश्न बनतो. लिबियाला कोणीतरी ट्युनिशीया/ईजिप्त बनायची वाट पहावी लागते.
---------------------------------------
माझा "खो" अरुंधतीला (इतके सगळे वाचुन तिला पुन्हा नक्कीच काही लिहावेसे वाटत असणार)
व चंपकला.

पराग, धन्यवाद. मी शुक्रवार रात्री पर्यन्त कामानिमित्त बाहेरगावी आहे. Sad त्यामुळेच इथलं सगळं वाचणं पण
झालेले नाही. संयोजकांना चालणार असेल तर मी शनिवार रात्री ( PST) पोस्ट करु शकेन ..

मला तर इतक्या सगळ्यांनी ह्या विषयावर लिहीलेलं पाहुन भरुनच आलंय.

सगळ्या पोस्टस अजून वाचायच्या आहेत... पण पौर्णिमा यांची पोस्ट वाचली... अतिशय आवडली...

मलाही स्त्रीमुक्ती म्हटले की आधी त्या पुरुषांसारख्या दिसण्याच्या प्रयत्नात असलेल्या, बॉबकट केलेल्या स्त्रीया आठवायच्या आणि ह्या विषयाचा तिटकारा यायचा... पण नंतर नंतर स्त्रीमुक्तीचा व्यापक अर्थ समजत गेला...

पौर्णिमा, तुम्ही ज्या प्रकारे तुमच्या कामाच्या ठिकाणी बदल घडवून आणलात तो आणि मुलीला पाण्याची बाटली बदलण्याविषयीचा सल्ला दिलात तो प्रसंग प्रचंड आवडला... तुमच्या क्रांतीकारक विचारांना आणि त्यादृष्टीने पाऊले टाकण्याच्या वृत्तीला सलाम!!!ह्याबद्दल मला स्वानुभव लिहायला आवडतील. मी आत्ताच लिहून ठेवलेले आहे. मला कोणीतरी खो द्यायचीच वाट पहातेय. मिळाला की कॉपीपेस्ट करेन Happy

मला आत्ता सानी यांच्याकडून समजले की मला मत मांडायचे आहे.

११.०३.२०११ पर्यंत वेळ मिळाला तर सांगू शकेन.

अरभाट यांना धन्यवाद!

-'बेफिकीर'!

बित्तुबंगा, खो बद्दल धन्यवाद !
थोडा वेळ मिळाला संयोजकांकडून तर माझे विचार लिहायला नक्की आवडेल Happy
अजून यातलं फारसं काहीच वाचायला वेळ झाला नाहीये, पण या निमित्ताने इतक्या लोकांनी विचार मांडलेत हे पाहूनच चांगलं वाटतंय.
पण एकूणच दरवर्षी येणारा महिला दिन, आणि त्या निमित्तानी होणारी चर्चा वाचून... मला दरवर्षी नव्यानी माझ्याच जुन्या लेखाची आठवण येते... परत एकदा मनाचे बंद झालेले/केलेले कप्पे उघडतात...आणि दरवर्षी आपण कुठे आहोत या बाबतीत हा प्रश्ण पडतो...

http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/103626.html?1138814673

या विषयावर खो-ला उत्तर लिहिपर्यंत सध्या इतकंच !

माझा खो... अनिशा, सुप्रिया (झारा), समीर (अ‍ॅडमिन), विनय देसाई, राहूल, संदिप चित्रे, आरती यासगळ्यांना किंवा या पैकी ज्यांना लिहिणे शक्य आहे (इथे विचार हा रेट लिमिटींग फॅक्टर नसून वेळ हा आहे हे मला माहित आहे Happy त्या कोणालाही Happy

मला खो दिल्याबद्दल धन्यवाद बित्तुबंगा. हा खो मी राखून ठेवते. शनिवारी संध्याकाळी लिहीन. तोवर खूपच जास्त धावाधाव आहे.
मी माझा खो देते जेणेकरून धागा अडकणार नाही.
माझा खो
१. प्रीतमोहोर
२. ग्रामिण मुंबईकर

सानी यांना मी दिलेला खो कॅन्सल त्यांच्या
>>>माझे नाव कोणाच्याही खो मध्ये घालू नये ही विनंती<<<
या विनंतीवरून.

सॉरी मी आता वर मला मिळालेला खो पाहिला, आता लिहीले तर चालणार आहे का?

चारही धाग्यांवरच्या सर्वांच्या पोस्ट सुरेख आहेत. Happy

नीधप, धन्स... पण मी विनंती वगैरे काही केली नव्हती कोणाला... हां अपेक्षा मात्र नक्की होती कोणीतरी स्वतःहून खो देईल अशी...(त्यातच तर खरी गंमत आहे!)आणि कोणी सांगावे, ती पूर्णही झाली असती...
असो, मला खो आला नसता तरीही मी उद्या लिहिणार असे ठरवलेच होते... असो, ठरवलेय त्याप्रमाणे उद्याच लिहिन. माझे नाव कोणाच्याही खो मध्ये घालू नये ही विनंती Happy

आं ? वरती हे तुम्हीच लिहिलंय ना

मला कोणीतरी खो द्यायचीच वाट पहातेय. मिळाला की कॉपीपेस्ट करेन >> ते उगीच होतं का ?

मिनोती <<माझी एक कलीग मॅटर्नीटी लिव्हवरून परत आल्यावर दुपारी मदर्सरूममधे जात असे. तेव्हाचे आमचे प्रोजेक्ट प्रचंड गुंतागुंतीचे होते. प्रचंड काम असे. तरीही तिला मी तिची वेळ चुकवू द्यायचे नाही. पण २-३ वेळा मी एका मिटींगमधे आडकले असताना स्टॅटससाठी आमच्या स्त्री मॅनेजरने फोन करून स्टॅट्स विचारला. २-३ वेळा आडून आडून तुला असे किती दिवस करावे लागेल हे विचारले. असे झाल्यावर २ महिन्यात तिने ते सगळे बंदच करून टाकले! मी मॅनेजरला काहीवेळा टोकलेदेखील की असे करणे चांगले नाही तिची ती गरज आहे. पण माझी कलीग हे तिला सांगू शकली असती ना? ते तिने का नाही केले?
>>
आग लहान बाळ घरी, रात्री झोप कमी, त्यात ओफीस....कन्टळ्ली असेल तूझ्ही कलीग, दुध ही कमी झअल असेल, बाळाच top-feeding वाढल असेल, हे काय ती सग्ळ्याना सन्ग्णार का? I can relate to her. मी ९ महीन्यानी breast feeding give-up केल. तेव्हा मला इतर कलीगनीच विचारल "Oh why so soon? I went on for full year/2years/16 months blah blah blah" अरे ही काय competition आहे का? आणि काम सोडून lactation room मधे जा, ३० मिन * ३वेळा = १.५ तास इथेच गेला, मा थोडा extra थाबून काम complete करा, instead, एक वेळ कमी pump कराव आणि बाळा कडे लौकर घरी जाव, अस मला तरी वाटायच.

पराग खो बद्दल धन्यवाद.

सगळ्यांनीच एवढं भरभरुन आणि चांगलं लिहिलय, की माझ्याकरता फार असं वेगळं लिहिण्यासारखं काही नाही आहे. सगळ्यांचीच स्त्रीमुक्तीबद्दलची मतं ही कुठेतरी माझ्या मनातल्या स्त्रीमुक्तीच्या व्याख्येत दडलेली आहेत. सगळ्यांनी लिहिलेली जी बरी वाईट उदाहरणं आहेत, ती मी सुद्धा माझ्या आसपास पाहिलेली आहेत. मग असं काही वेगळं आहे का की जे स्त्रीमुक्ती म्हटलं की माझ्या मनात येतं?

लहानपणी मुलगी म्हणून कधी वेगळी वागणूक मिळाली नाही त्यामुळे ह्या गोष्टीचा कधी विचारच केला गेला नव्हता. नंतर जेंव्हा मोठे झाल्यावर पाहण्यात, कानावर किंवा वाचनात एकएक गोष्टी यायला लागल्या तेंव्हा जाणवलं की एखादी व्यक्ती केवळ स्त्री आहे म्हणून तिला आयुष्य किती वेगळ्या प्रकारे जगावं लागू शकतं!

स्त्रीमुक्तीबद्दल विचार करताना मला जाणवलं की मी तिला तीन पातळ्यांवर पाहते.
फार खोलात न जाता, अगदी अगदी मुलभूत पातळीवर माझ्याकरता स्त्रीमुक्तीची पहिली पातळी आहे * आपण स्त्री असल्यामुळे आपल्याला वेगळी/अन्यायपूर्णक वागणूक मिळतेय का हे पडताळून पाहण्याची स्त्रीमध्ये जाणीव निर्माण होणं/करुन देणं. स्वतःला सक्षम बनवण्याकरता तिने प्रयत्न करणं. * दुसरी पातळी "स्व" पेक्षा समाजाच्या स्त्रीकडे बघण्याच्या दृष्टीकोनाकडे भर देते * समाजाने स्त्रियांकरता वेगळे निकष न लावता एक माणूस म्हणून स्त्रीला वागणूक देणं * निसर्गाने स्त्री आणि पुरुष हे दोन वेगवेगळे जीव निर्माण केले आहेत, काही बाबतीत पुरुषाला चढतं माप दिलं आहे तर काही बाबतीत स्त्रीला. माझ्या मते वरील दोन पातळ्या ओलांडल्यावरच * शक्य आणि योग्य तिथे स्त्री पुरुष समानता * ह्या तिसर्‍या पातळी पर्यंत आपण पोहोचू शकतो.

स्त्रीमुक्तीच्या बाबतीत, मी, माझा समाज आणि भोवतालचे जग कुठे आहे ह्याबद्दल मला काय वाटतं हे जाणून घेण्याकरता मी स्वतःला वेगवेगळे प्रश्न विचारुन पाहिले. मनात असंख्य प्रश्न आले, पण त्यापैकी अगदी थोडे मी खाली लिहिले आहेत.

१. वैयक्तीक-
१) मला मोठं होताना कधी मुलगी म्हणून कोणत्याही प्रकारे घरी वेगळी वागणूक मिळाल्याचे जाणवले का?
२) मला दुसर्‍या गावी/देशी उच्च शिक्षणाची संधी मिळाल्यावर मुलगी म्हणून कधी काही निर्बंध आले?
३) मला माझा जोडीदार निवडताना मुलगी म्हणून काही तडजोड करावी लागली?
४) लग्न झाल्यावर शिक्षण, नोकरी, मुल कधी होऊ देणे इ. गोष्टींसाठी कधी काही दबाव आला का?
५) घरातल्या कुठल्याही छोट्या/मोठ्या निर्णयामध्ये माझ्या मताला किती किंमत असते?
६) मला नोकरीच्या ठिकाणी स्त्री असल्यामुळे कधी कोणत्या अन्यायाला तोंड द्यावे लागले का?
७) मला स्वतःला स्त्री असल्याबद्दल कुठे काही कमीपणा वाटतो का? का अभिमान वाटतो? (का काही फरक पडत नाही?)

वरील प्रश्नांची मी माझ्याकरता उत्तरे देता वैयक्तीक पातळीवर मला स्वत:ला स्त्री म्हणून मुक्त वाटते. आजकाल बर्‍याच मोठ्या शहरांमध्ये कमीअधिक प्रमाणात सुसंस्कृत, सुशिक्षीत घरांमधल्या मुलींचेही हेच मत असेल. पण तेच आपण शहरांकडून गावांकडे आणि गावांकडून खेड्यांकडे, मुक्त विचारांच्या कुटुंबांकडून कंझर्व्हेटिव्ह विचारसरणींच्या कुटुंबांकडे, काही लोअर इन्कम कुटुंबांकडे (ह्या सगळ्यांमध्ये अपवादही असतात हे ही लक्षात घ्यावे) जायला लागल्यावर चित्र बर्‍याच प्रमाणात पालटत असल्याचे दिसून येते. स्त्रीचा आयुष्यात लग्न करणे, मुले निर्माण करणे, त्यांचे संगोपन करणे, घर सांभाळणे, मोठ्याची सेवा कारणे ह्याच गोष्टी असतात ही भावना असते, किंबहुना त्याशिवाय त्यांचे काही विश्व असू शकते ही जाणिवही नसते. मी आणि माझ्या सारख्या इतर मैत्रीणी वैयक्तीक पातळीवर जरी स्वतःला मुक्त समजत असलो तरी आमच्या इतर असंख्य भागिनींना असे काही असते ह्याची कल्पनाही नसते. तो बदल घडवून आणण्याकरता, आत्मविश्वास वाढवण्याकरता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मुलींचे शिक्षण आणि त्यांना स्वावलंबी होण्यास मदत करणे. शिक्षाणाने किती नवनवीन दालने उघडू शकतात ह्याची त्यांना जाणीव करुन देणे.

२. सामाजिक (मी भारतीय समाजाचे उदाहरण घेतले आहे)
१) आपल्या समाजात हुंडाबळी होतात का?
२) आपल्या समाजात स्त्रीभृण ह्त्या होते का?
३) मुलींना मुलांएवढी शिक्षणाची संधी मिळते का?
४) मुलींना आपला जोडीदार निवडण्याचा हक्क आहे का?
५) स्त्रिया निर्भयतेने अपरात्री बाहेर पडू शकतात का?
६) स्त्रियांना नोकरीमध्ये पुरुषांएवढ्या संधी मिळतात का?
७) घराची/मुलांची जबाबदारी पुरुष स्त्रियांच्या बरोबरीने पार पाडतात का?

शिकलेल्या सुसंस्कृत समाजामध्ये आणि इतर सामजिक घटकांमध्ये ह्यातल्या काही प्रश्नांचीची वेगवेगळी उत्तरे आहेत. पण जे मी वाचते, ऐकते, पाहते त्यावरुन सामजिक पातळीवर ह्यातल्या जवलपास सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मला फार निराशाजनक वाटली. सकृतदर्शनी मोठ्या शहरांमध्ये परिस्थिती जरी बदलत असली अश्या उदाहरणांचे प्रमाण अगदी नगण्य प्रमाणात आहे. ह्याकरता समाजाचा दृष्टीकोनच बदलायची गरज आहे आणि दुर्दैवाने ही एक संथ प्रक्रिया आहे.

३. वैश्विक
१) जगामध्ये विविध देशा/खंडांमध्ये स्त्रियांकरता कशा प्रकारचे वातावरण आहे
मध्यपुर्वेतल्या किंवा अफ्रिकेतल्या स्त्रिया पाहता भारतातल्या सर्व स्त्रिया खूप मुक्तपणाने जीवन जगतात असे म्हणण्याची वेळ येईल. थोड्या दिवसांपूर्वी मध्यपूर्वेतल्या तरुणांबद्दल एक पुस्तक वाचले. लेखक मध्यपुर्वेतल्या काही देशात (इराण, सिरिया, लेबनॉन, इराक) जाऊन तिथल्या तरुणांना भेटून, त्यांच्याशी त्यांच्या देशाबद्दल, त्यांच्या आशा-आपेक्षांबद्दल बोलून आला. त्यात त्याने बर्‍याचश्या तरुणींच्या ही मुलाखती घेतल्या. इराणमधल्या स्त्रियांचे सद्य आयुष्य, त्यांची स्वप्नं, सरकारबद्दलचा राग, आणि बंधनकारी आयुष्याबद्दल खदखदणारा संताप हे वाचून शहारुन आले. इराण, अफगाणीस्तान सारखे देश, स्त्रीमुक्तीच्या बाबतीत उलटा प्रवास करत आहेत. तोच प्रकार बर्‍याच अफ्रिकेतल्या देशांमध्येही आहे. ह्या देशातल्या स्त्रियांना माणूस म्हणून जगणे सुद्धा अवघड होतेय, मुक्ती दूरची गोष्ट.

पण सगळीच परिस्थिती निराशाजनक नाही आहे. आपल्या आणि जगातल्या इतर काही समाजांमध्ये गेल्या २००० वर्षात स्त्रियांना जेवढे स्वातंत्र मिळाले नाही त्यापेक्षा किती तरी जास्त गेल्या १०० वर्षात मिळाले आहे. जगातल्या बर्‍याच भागात कमी अधिक प्रमाणात ही स्थिती हळू हळू येत आहे. आपले जीवन वेगळेही असू शकते की कल्पनाच पूर्वी नव्हती, पण गेल्या ५० वर्षात फोन, टेलीव्हिजन, इंटरनेट इ. मुळे जग खूप जवळ आले आहे, आणि आपण वेगळ्या प्रकारे, अधिक स्वतंत्रपणाने ही जगू शकतो, ही कल्पना स्त्रियांच्या मनात रुजत आहे. सामाजिक बंधनंही आधी पेक्षा जास्त शिथील होत चालली आहेत. शास्त्रज्ञ, अंतराळवीर, निर्मात्या, कंपन्यांमध्ये मोठमोठ्या हुद्यांवर, व्यवसाय चालवणार्‍या, लेखिका, नाटका-चित्रपटांमध्ये अभिनेत्या ... अश्या किती तरी, एकेकाळी अशक्या वाटले असते, अशा ठिकाणी स्त्रिया दिसून येत आहेत.

पाश्चात्य देशात तर स्त्रिया सध्या बर्‍याच प्रमाणात ह्या स्त्रीमुक्तीच्या खूप जवळ जाणारे जिवन जगत आहेत.
स्त्रीमुक्तीपासून आपण जरी खूप दूर असलो तरी त्या दिशेने आपली वाटचाल सुरु आहे, हा ही एक किती मोठा आशेचा किरण आहे!

माझा खो
विनायक
प्रिंसेस

अरभाट, खरोखर मस्त पोस्ट. एखाद्या गोष्टीचा त्रयस्थपणे विचार करुन ती मांडायची तुझी जी पध्दत आहे त्याचा मला फार हेवा वाटतो. Happy

घरकाम हे अनुत्पादक नाही हे मान्य आहे. पण दोन गोष्टींमुळे अर्थार्जन थोडे जास्त महत्वाचे वाटते. एक म्हणजे दुर्दैवाने घरातल्या कमावत्या व्यक्तीचे काही बरेवाईट झाले तर कुटुंबावर अचानक आर्थिक परावलंबित्व/संकट येत नाही. आणि दुसरे म्हणजे एखादी व्यक्ती जर घर सोडून इतर कुठे काम करत असेल तर त्या व्यक्तीपुरते तिचे एक वेगळे सर्कल निर्माण होते आणि 'तोचतोचपणा'मधून जरा सुटका होते. म्हणजे भावनिकदृष्ट्यासुद्धा काही विशिष्ट व्यक्तींवरच अवलंबून रहावे लागत नाही. त्यामुळे एखाद्या बाजूने कमीजास्त झाले तरी दुसर्‍या बाजूचा आधार राहतो.

मला खरंच प्रामाणिकपणे स्त्रीमुक्ती म्हणजे काय अपेक्षित आहे हेच कळत नाही. विचार केला तर असं वाटतं आत्ता जो बदल होतोय तो नक्कीच स्वागतार्ह आहे. पण आपण भरल्या पोटी ढेकर दिला तर त्यात काय इतकं विशेष? म्हणजे परिस्थिती अनुकूल असताना आपण बंड केले तर फार मोठी गोष्ट नाही, ती परिस्थिती आपल्याला अनुकूल नसताना जी बाई अन्यायाविरुद्ध आवाज उठवेल त्याचं मह्त्त्व केव्हाही जास्त असेल.

धन्यवाद आश्चिग खो बद्दल. लिहिते थोड्या वेळाने. Happy

मो, आश्चिगच्या पोस्ट्स व रारने दिलेल्या लिंकमधील तिचे मनोगत आवडले.

१. मला खो दिल्याबद्दल अरभाट यांचे आभार

२. हा धागा स्त्रीला मुक्त करण्यात प्रत्यक्ष हातभार लावण्यात यशस्वी ठरेल किंवा नाही याबाबत ठामपणे काही म्हणता येत नसले तरी कित्येकांची त्याबाबतची मते, ती मते 'रोमातल्या' अनेकांनी व समाजात काही महत्वाचे घटक म्हणून काम करणार्‍या लेखक / वाचक यांनी वाचणे हे खूपच फायदेशीर ठरू शकेल. अवेअरनेस वाढू शकेल.

३. मी माझी मते देत आहे. तीच मते वर कुणी दिलेली असल्यास (पूर्णपणे / पार्टली), मी त्या व्यक्तीशी 'त्याच प्रमाणात' सहमत आहे असे गृहीत धरून दोन पैकी मूळ प्रकाशित मत मूळ धाग्यावर ठेवण्यात मला अडचण नाही.

=================================================

१. गर्भधारणा, नवीन जीवास जन्माला घालणे व काही प्रमाणात 'बाळाचे संगोपन' (जसे फीडिंग व स्पर्शाची / मायेची उब देणे) या व्यतिरिक्त बहुधा असे एकही काम स्त्री करत नसावी (दुरुस्त केल्यास स्वागत आहे) जे पुरुष करू शकत नाही. (देहातील जेनेटिक लॉक्समुळे दोन भिन्न लिंगी शरीरांचे मीलन ही गर्भधारणेसाठी आवश्यक बनलेली बाब आहे, निसर्गाने तसे लॉक काढून टाकले तर एकच माणूस, म्हणजे एकच स्त्री किंवा एकच पुरुष प्रजनन करू शकेल, हा भाग वेगळा व ते शक्यही आहे.)

२. पुरुष करू शकत असलेल्या कामांमधील ( स्त्रीस गर्भ राहावा यासाठी असलेल्या सहभागाव्यतिरिक्त) अनेक कामे अशी आहेत जी स्त्रिया एकतर 'करत नाहीत किंवा करू शकत नाहीत किंवा करू इच्छीत नाहीत'. 'करत नाहीत' मध्ये (आपल्या संस्कृतीच्या संदर्भात) समाजाभिमुखतेत वाढ करणे (यात शहरी स्त्री व्यतिरिक्तच्या स्त्रिया अधिक), 'करू शकत नाहीत' मध्ये अनेक श्रमाची किंवा शारिरीक ताकदीची कामे व 'करू इच्छीत नाहीत' मध्ये अनेक प्रकारची कामे आली.

३. वरील दोन बाबींमुळे (पुन्हा आपल्याच संस्कृतीत प्रामुख्याने) स्त्रीकडे पाहण्याचा पुरुषांचा, समाजाचा व खुद्द स्त्रियांचा दृष्टिकोन 'ही तर एक स्त्रीच आहे' असा बनतो. यात लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्व आले. हा दृष्टिकोन शतकानुशतके चालत आलेला आहे. 'ही एक स्त्रीच आहे' या दृष्टिकोनाचा सर्वसाधारण अर्थ 'ही काय करणार / ही काय करू शकणार / ही काय करू इच्छिणार' असा असावा. हा दृष्टिकोन बाळकडू पाजल्याप्रमाणे स्त्रीलाही पाजला जात असावा. यातूनच स्त्रीदाक्षिण्य, स्त्रीकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहणे व स्त्री ही कुटुंबाची अब्रू समजली जाणे हे कॉम्पोनन्ट्स येणार! सार्वजनिक ठिकाणी स्त्रीला पुरुषांच्या तुलनेत दिल्या जाणार्‍या 'दयाळू' सुविधा (जसे बसमध्ये खास महिलांसाठी राखीव सीट्स वगैरे) हे स्त्री दाक्षिण्य! रस्त्यावरून १५ ते ५५ या वयाची स्त्री चालत जात असताना तिच्या हालचाली निरखण्यापासून ते कामाला असलेल्या स्त्रीचे शोषण करणे हे स्त्रीकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहणे! छेडछाड, विनयभंग, शोषण, बलात्कार या स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये आरोपीपेक्षाही स्त्रीच्या कुटुंबियांनाच मानहानी झाल्यासारखे वाटणे म्हणजे 'स्त्री ही कुटुंबाची अब्रू आहे' असे मानणे!

वरील मुद्दे हे स्त्री मुक्त नाही असे दर्शवणारे मुद्दे आहेत असे माझे मत आहे. या व्यतिरिक्तही कदाचित स्त्री पारतंत्र्यात असल्याचे अनेक प्रकार / उदाहरणे असतीलही, वरील मुद्दे हे फक्त वैयक्तीक मत आहे.

========================================

माझ्यामते उपायः

१. स्त्रीची शारिरीक ताकद कमी असण्यामुळे व लैंगीक शोषण होण्याची शक्यता असल्यामुळे सार्वजनिक व कौटुंबिक पातळीवर तिला 'दाक्षिण्य' दाखवणे व तसे नियम असणे हे योग्यच आहे.

२. मात्र स्त्रीने चक्क जवळ एक हत्यार बाळगावे. ज्या अब्रूला घाबरून स्त्री राहते त्या अब्रूसही तिने तिचे हत्यार बनवावे. मध्यंतरी एक चौदा वर्षाचा मुलगा त्याच्या समवयीन मित्राला रस्त्यावरची एक प्रौढा दाखवून निर्लज्जपणे हासत होता. त्या स्त्रीने वळून चारचौघांसमोर कानाखाली ओढली किंवा आवाज जरी चढवला तरी इतपत चांगुलपणा समाजात (नक्की) असावा की लोक धावत येऊन तिला त्या परिस्थितीतून वाचवतील व त्या आरोपींना सज्जड दम देतील किंवा शिक्षा देतील. अगदी चांगुलपणा म्हणून नसले तरी 'तथाकथित पुरुषार्थ' म्हणून तरी येतील. स्त्रीने स्वसंरक्षणार्थ एखादे हत्यार जवळ ठेवावे असे मला वाटते.

३. शिक्षण, नोकरी, संशोधन व इतर कित्येक अत्युच्च व्यावसायिक पातळ्यांवर स्त्री पोचलेली आहेच. आमच्या ओळखीत एन गृहस्थ होते (नाव मुद्दाम देत नाही) ज्यांच्यावर कमिन्स इन्डियामध्ये अफरातफरीचा आरोप झाला व त्यांनी नोकरी सोडली. पुढची वीस वर्षे त्यांच्या पत्नीने नोकरी केली व नवरा व दोन मुले यांचे घर स्वसामर्थ्यावर सांभाळले. तो आरोप खोटा होता हे पुढे सिद्ध झाले. मात्र ते गृहस्थ कायम नम्रपणेच वागायचे. ते म्हणायचे, मी घरातील सगळे काम करतो, त्यात काय लाजायचंय, ही नोकरी करते म्हणजे मलाच घर आणि मुले बघायला हवीत. हा स्वभाव प्रत्येक पुरुषाचा नसणारच! पण नोकरी करणार्‍या स्त्रियांनी अत्यंत धीर धरून आणि 'इन्स्टन्ट' यशाची कोणतीही अपेक्षा न बाळगता प्रयत्न चालू ठेवले तर २०४० पर्यंत तरी निश्चीतच अशी परिस्थिती येईल जेव्हा स्त्रीला कर्ती स्त्री असेच समजले जाईल.

============================================

माझ्यामते संगणक, परदेशातील नोकर्‍या, वेगवान युग, संचारध्वनी फोन्स, आंतरजाल या सर्व घटकांमुळे तौलनिकदृष्ट्या १९६०, १९८० व १९९० पेक्षा आजची स्त्री अधिक मुक्त आहेच. बहुतेक हे असेच चालू राहिले तर स्त्री पूर्णपणे स्वतंत्र, मुक्त व पुरुषांवर आर्थिक / सामाजिक स्थानासाठी / प्रेम व मैत्री यासाठी अजिबात अवलंबून नसण्याची पातळी येणे हा फक्त काळाचाच प्रश्न राहील. जसजसा वेळ जाईल तसतशी ती मुक्त होत जाईल. शहरी स्त्रीचे जीवन झिरपत झिरपत सर्व थरांपर्यंत पोचू शकेल.

===========================================

हा जो मुद्दा आहे तो विनोदाचा भाग नाही, मात्र 'स्त्री मुक्ती' काही स्त्रियांच्या बाबतीत इतकी पराकोटीला पोचलेली असते की अशा वेळेस खरच पुरुषांना काहीतरी खास स्थान दिले जावे की काय असे वाटावे. स्त्री ही फक्त कायम भोग भोगणारी, दास्यत्व स्वीकारणारी, खाली मान घालणारी अशीच असते असे मुळीच वाटत नाही. (अशीच असावी असे म्हणायचेच नाही आहे, तेव्हा त्यावर कृपया चर्चा होऊ नये.) पण मी जे काही स्त्री मुक्ती या क्षेत्रातील कार्य पाहिले त्यात तरी अशा स्त्रिया प्रामुख्याने सहभागी होत्या ज्या मुळातच मुक्त होत्या. त्यांनी काही स्त्रियांना खरच मुक्त केले असले तर चांगलेच, पण तसे वाटत नव्हते.

हे लिहिण्याचे कारण इतकेच की :

आज स्त्री मुक्ती या विषयावर आपण ज्या पातळीवर विचार मांडत आहोत (मायबोलीचे व्यासपीठ) ती पातळी प्रत्यक्षात पारतंत्र्यात असलेल्या ग्रामीण भागातील स्त्रियांपासून दुर्दैवाने खूपच दूर आहे. तेथे जाऊन काही कार्य करण्याचे ठरवता येईल काय?

=========================================

मला कुणाला 'खो' द्यायचा अधिकार आहे की नाही माहीत नाही. असल्यास माझे चॉईस!

(अर्थात, जर आधीच कुणी दिलेले नसतील तर)

साजिरा

जुयी

==========================================

चूभूद्याघ्या

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

=================================

दुसरे नांव,

भाऊ नमस्कर

किंवा

प्रसाद गोडबोले (पंत)

धन्यवाद!

(दोघांना खो दिला आहे असे मानू नयेत, काही वेळा काही जण लिहीत नाहीत म्हणून दोन नावे दिली इतकेच!)

माझा पर्यायी खो मयुरेशला किंवा मिनुआज्जीला.
[उशीरा उत्तर दिल्याबद्दल क्षमा करा. अजूनही खूप वाचायचे राहिलेच आहे]

>>>आज स्त्री मुक्ती या विषयावर आपण ज्या पातळीवर विचार मांडत आहोत (मायबोलीचे व्यासपीठ) ती पातळी प्रत्यक्षात पारतंत्र्यात असलेल्या ग्रामीण भागातील स्त्रियांपासून दुर्दैवाने खूपच दूर आहे. तेथे जाऊन काही कार्य करण्याचे ठरवता येईल का?>>><<

मलाही हाच प्रश्ण पडलाय की, खरोखर ह्या लिखाणाचा सर्वात फायदा व संदेश त्या स्त्रीयांना मिळू शकतो का ज्यांना खरेच गरज आहे आपल्या जाणीवा(स्त्री म्हणून) भक्कम करायची? किंवा तो(संदेश) कसा पोचू शकतो ह्या विचारांवर जाणकारांकडून वाचायला आवडेल व तीच एक छोटीसी पायरी असेल असे वाटून गेले.

मला स्वतःला खूप कमीच झगडावे लागलेय किंबुहना नाहीच लागले तसे(मूळात अन्यायाला वा स्त्री म्हणून कसल्याही बोचक गोष्टीला खूप कमीच सामोरे जावे लागले.) बाहेरचे काही वात्रट लोक जे बोलले त्यांना आठवणीत रहातील असे डोस देवून तर कधी दुर्लक्ष करून. Proud

ऑफीसात व इतर बायांमध्ये कधी कधी स्त्री समानता सारखी व्यक्त केलेली मतांमुळे खूपच 'शहाणी' समजते असा खुद्द बायकांकडूनच शेरा मात्र एकायला मिळालाय. Wink एकच उदाहरण द्यायचे तर , एकदा म्हटलेले एकीला की, नवरा बघेल ना तुझ्या मुलांना , चल एक दिवस ट्रेक करून येवुया असे काहि वगैरे बोलल्याने किंवा तुला काय एकटीच असल्याने नाही समजायचे असे शेरे एकलेत.

तर मुद्दा हाच की मी तरी प्रत्यक्ष कधीच हातभार लावला नाहीये तळातल्या अश्या स्त्रीयांना जाणीव करून द्यायला वा काम केलेले (संधी सुद्धा तशा कमीच मिळाल्यात कारण अश्या काही स्त्रीया संपर्कात आल्या तरी कठिण काम होते कधी कधी त्यांना विशद करणं व पटवणं सुद्धा कारण खरेच ते एकटीचे काम नाही. कारण मूळातच इतक्या खोलवर काही सामाजिक मतं असतात, त्याला वेळ लागतो असेच वाटले म्हणून मग आपण बरे की आपले काम बरे असं झालेय, उगाच खोटं कशाला बोला की मी अशी स्त्री मुक्ती केली तशी वगैरे... Happy
नाहीतर आपले विचार फक्त, 'हमे देखना है.. असे एका नेत्यासारखेच राहतील असे वाटले म्हणून हा प्रपंच. Wink

आत्ताच पाहिले की मला मो आणि योडीने खो दिला आहे. आज लिहिणे खूप कठीण दिसते. आता कामासाठी बाहेर जाते आहे. माझ्या रात्रीपर्यंत लिहिले तर चालेल का?

प्रतिक्रियेला काहीच बंधन नाहीये. तू प्रतिक्रिया लिहू शकतेस की. चांगली होती तुझी प्रतिक्रिया. उगाच काढलीस. बाकी तुला खो हवा असेल तर तसंही सांगू शकतेस.

वर अश्चिग नी म्हंटल्याप्रमाणे मुक्ती ही मानण्यावर असते. आम्ही मुलींनी मानसिक/ वैचारिक रित्या स्वतःला मुक्त मानण्याची गरज आहे. याबाबतीत मी स्वतःला खूप भाग्यवान मानते की माझ्या घरात माझ्यावर व माझ्या बहिणींवर कसलीच बंधने घातली गेली नाहीत. स्वतःचे निर्णय आम्ही स्वतःच घेतले. पण हे करताना आई बाबा नेहमीच सोबत आहेत हा विचार आत्मविश्वास वाढवत असे. तसेच आई-बाबांनी मोट्ठा विश्वास टाकलाय आपल्यावर त्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जाउ नयेत ही जाणीव ही सतत असायची.

माझ्या व्यवसायामुळे मला कित्येकदा उशीरा घरी परताव लागत . पण म्हणुन त्याबद्दल मला एक शब्दानेही विचारल जात नाही. आणि माझ्या होणार्‍या सासरचे लोकही त्याबाबतीत 'कूल' आहेत . काळजी घे एवढच सांगतात.

पण सगळ्याच मुलींना आजुबाजुला अशी चांगली माणस लाभत नाहीत. तेव्हा आपल काही चुकत नसेल तर आपले मुद्दे ठणकाउन मांडले पाहिजेत . किंबहुना ते दुसर्‍याला पटवले पाहिजेत. तरच ही ज्योत प्रत्येक घरात पेटेल.

इथे शहरातही कित्येक लोक मुलींवर बंधन घालतात . माझी मैत्रिण आयुर्वेदीक डॉक्टर आहे. ति कॉलेज अट्टेण्ड करुन, प्रॅक्टीससाठी एका डॉक्टरांकडे जाते. तिथुन गायन क्लास करते व मग घरी येते. घरी येईपर्यंत काही काही वेळेस ८-९ वाजतात. तर मग बोलणी खावी लागतात .घरी येउन आराम तर नाहीच , घरची कामही आटपावी लागतात. मुळात तिच्या आईवडिलांना ती आयुर्वेदिक डोक्टरकी करतेय हेही ठाउक नाहीये. त्यांच्या मते ती एका दुरवरच्या कला महाविद्यालयात शिकतेय.

मैत्रिण आईवडिलांना न सांगता गेली साडे पाच वर्षे तिथे शिकतेय . स्वतःच्या फीज, बस्भाडे ह्यांची तजवीज व्हावी म्हणुन फावल्या वेळात ती गाण्याचे कार्यक्रम करते.अर्थात आईवडिलांच्या नकळत!!!!

काय बोलाव तेच कळत नाही अश्या आईवडिलांना!!!

Pages