स्त्री मुक्तीच्या माझ्या कल्पना (खोखो - ४)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 8 March, 2011 - 22:44

कृपया स्वतःला खो मिळाल्याशिवाय लिहू नये. तुम्हाला लिहायची इच्छा असल्यास तुम्ही खो मागू शकता. प्रत्येकाने खो शिवाय लिहिले तर संपूर्ण उपक्रम गोंधळाचा होईल. हे या खेळाचे नियम आहेत ते पाळून सहकार्य करावे. खो घेण्याची इच्छा असूनही खो मिळाला नाही तर शेवटच्या दिवशी तुम्हाला आपले मत मांडण्याची संधी नक्कीच मिळेल.

संयोजक खो (४)- दीपांजली
दीपांजली खो (१)- अंजली, दीपांजली (खो २)- सीमा
अंजली खो (१)- डेलिया, अंजली खो (२)- जागोमोहनप्यारे
सीमा खो (१)- पेशवा, सीमा खो (२)- मृण्मयी
मृण्मयी खो (१) - फचिन मृण्मयी खो (२) - निंबूडा /पन्ना/ मंजूडी
मंजुडी खो (१)-असुदे, मंजूडी खो (२)- योडी
योडी खो (१) -काशी योडी खो (२) -नादखुळा
डेलिया खो (१) - दिनेशदा डेलिया खो (२) - ट्युलीप
नादखुळा खो (१) - मणिकर्णिका नादखुळा खो (२) -पियापेटी
दिनेशदा खो (१) - जागू
जागू खो (१) - साधना

वाचनियतेसाठी ४ धागे केले आहेत. कृपया या गटातील सहभागी होणार्‍यांनी इथे लिहा.

दीपांजली | 8 March, 2011 - 20:17
हा थ्रेड पाहिला तेंव्हा अमेरिकेत रिसेंटली पाहिलेल्या २ गोष्टी पटकन आठवल्या.
दोन्हीही स्त्रियांनी प्रोटेस्ट करणारी उदाहरणं , तसं म्हंटलं तर एकमेकां पासून खूप वेगळी पण थोडी फार एकाच कारणा साठी !

१ ) गेल्या ऑगस्ट मधे इथल्या( लॉस अ‍ॅन्जलेस) सुप्रसिध्द व्हेनिस बिच वर गेलो होतो, तिथे एक मोठा प्रोटेस्ट गृप होता ( स्त्री -पुरुष दोन्ही समान संख्येनी.)
एक मोठं ऑरगजायझेशन आहे स्त्रियां ' गो टॉपलेस्स इक्वालिटी राइट्स' साठी !
त्यांच्या म्हणण्या नुसार " अ‍ॅज लाँग अ‍ॅज मेन आर अलाउड टु गो टॉपलेस इन पब्लिक विमेन शुड हॅव द सेम कॉन्स्टिट्युशनल राइट ऑर एल्स मेन शुड हॅव टु वेअर समथिंग टु कव्हर देअर चेस्ट्स.'
त्यांच्या वेबसाइट वर लिहिलल्या प्रमाणे , अमेरिके सारख्या समान हक्काचा दावा करणार्‍या देशात स्त्रियांना या गोष्टी साठी अरेस्ट/ दंड होणे , अपमानस्पद गोष्टींना सामोरे जावे लागते त्याच गोष्टीसाठी पुरुषांना मान्यता आहे ही गोष्ट त्यांना इक्वल राइट्स वर आणलेली गदा वाटते.

२) काही पाश्चात्त्य देशात ' बुरखा न घालु देणे' ही मुस्लिम स्त्रियांच्या हक्कावर आणलेली गदा असे वाटणार्‍या माझ्या २ मोरक्कन मैत्रीणी, ' इफ आय कान्ट वेअर बुरखा , इट्स नॉट माय रिव्हॉल्युशन' या विचारांना त्या सपोर्ट करायला जातात ( त्या स्वतः बुरखा घालत नाहीत, हिजाब घालतात.) !
पाश्चात्य लोकांनी बुरख्यावर बन्दी घालणे हे त्यांना कट्टरपंथीय मुस्लिम देशांच्या बुरखा कंपलसरी करणे, किंवा इतर कडक कायद्या इतकेच अन्याय झाल्या सारखे वाटते !

या दोन गोष्टीं वरून उगीचच म.वि सोवनींच्या 'आपले मराठी अलंकार' पुस्तकतला 'सौभाग्य अलंकार' चॅप्टर आठवला.
'नथ' जी एक सुंदर दागिना म्हणून , परंपरा म्हणून मोठ्या अभिमानाने मिरवली जाते त्याचं ओरिजिन कोणाला माहित आहे ?
ते जेंव्हा वाचाल तेंव्हा म. वि. सोवनीं सारखाच हा आलंकार 'इष्ट कि अनिष्ट', 'लज्जास्पद कि कि प्रतिष्ठेचा' हा विचार आपल्या मनातही नक्कीच येइल !
नाक टोचणे हेच मुळात हिन्दु धर्माच्या संस्कारात नाही.
हा दागिना मुस्लिम स्वार्‍यां बरोबर आपल्याकडे आला, तिथे त्या दागिन्याला 'बुलाक' (अर्थ : उंटाची वेसण ) म्हणायचे, आपल्याक्डे प्राकृत मधे' ण्त्थ ' म्हणाजे बैलाची वेसण ( ण्त्थ वरून नंतर नथ शब्द आला.) !
मुस्लिम समाजाच्या त्या वेळाच्या विचारसरणी नुसार गुरा ढोरांच्या मालकी हक्क साठी जे सोपस्कार करतात तोच सोपस्कार स्त्रियांना आपली मालमत्ता मानताना केला जायचा, जो विचार दुर्दैवनी त्या वेळी आपल्या समाजानेही सामावून घेतला.
त्या वेळी का नसेल केला स्त्रियांनी विरोध या सोपस्काराला ?
तेंव्हा खरच नव्हत्या का स्त्रियां साठी चळवळी, प्रोटेस्ट करायचय काही पध्दती ??
असो.... थोडक्यात समाजात निरनिराळ्या ठिकाणी, निरनिराळ्या काळी स्त्रियांवर समाजानी अपापल्या परीने बंधनं घातलीयेत आणि जिथे समाज जसा आहे तिथे स्त्रीमुक्ती ची कल्पना पण बदलली आहे, बदलत आहे !

भारतीय समाजाच्या संदर्भात 'स्त्रीमुक्ति' हा शब्द ऐकला कि मला पटकन आठवते ती दूरदर्शन ला लागायची ती सरकारी जाहिरात !
एका लहान बाळाला( मुलीला) पाय बांधून , डोळे बांधून ठेवलय .
त्या नंतर संदेश येतो:
" उघडा तिचे डोळे, सोडा त्या बेड्या'
ज्या क्षणी ते सोडले जाते त्या क्षणी छोट्या परीचे हात पाय झाडून हर्षवायु झालेलं ते मनमुराद प्राइसलेस हसु !

खरच, स्त्रियांचे समान ह्क्क खूप दूरची गोष्ट आहे मुळात मुलीने जन्म घ्यावा कि नाही , मुलगी जन्मलेली जगु द्यायची कि नाही इथपासूनच समाज मुलीला कंट्रोल करायला सुरवात करतो !
वर अरुंधतिनी दिलेल्या ऑफिशिअली जन्म घेतलेल्या पण त्या नंतर कुठलही रेकॉर्ड नसणार्‍या मुलींचं प्रमाण एवढं आहे हे बघून खरच कमालीचं ह्ताश व्हायला होतं !

माझ्या स्त्रीमुक्तीच्या कल्पनां बद्दल बोलायचं झालं तर मुलीच्या जन्मा पासून समाजाचा जो अ‍ॅटिट्युड असतो तो बदलण्या पासून सुरवात झाली पाहिजे !
'मुलगी झाली' म्हणून आजही कित्येक स्त्रियांना ठिकाणी जी वागणुक मिळते ( ही वागणुक देणार्‍यां मधे स्त्री पुरुष दोन्ही आले) तिथ पासून चित्रं बदलायला पाहिजे!
आजही निरनिराळ्या कवितां मधून लेखां मधून ' आई -बहिण-पत्नी-सखी' अशा आपेक्षांनी भरलेल्या टायटल्स मधे 'स्त्रीत्त्व' बंदिस्त करण्यात येते.. ते बदलून मुळात आधी एक 'माणुस' म्हणून समाजानी स्त्री ला रिस्पेक्ट देणं सर्वात महत्वाचं आहे.
पात्रता असताना समाजात समान वागणुक न मिळणे , रुढी परंपरांच्या नावा खाली आपेक्षांची ओझी लादणे , हुंडा , सेक्शुअल हॅरेसमेन्ट, विचार आणि निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य अजिबात नसणे ( मग ते शिक्षण, उच्च शिक्षणाची तिची आवड, करिअर ऑप्शन्स, हॉबीज, लग्न कधी करावं / करु नये, मुलं कधी/किती व्हावीत / कि अजिबात नकोत, इन्व्हेस्टम्नेट्स करणे अशा महत्त्वाच्या गोष्टीं पासून ते अगदी छोटे रोजच्या दिनक्रमातल्या अनेक निर्णय जिथे आजही बर्‍याच शिकलेल्या स्त्रियांकडून सुध्द्दा 'नवर्‍याला विचारून मग सांगते' अशी उत्तरं सर्रास ऐकायला मिळातात.) या गोष्टी आधी बदलल्या पाहिजेत.

लहानपणी 'स्त्रीमुक्ति' हा शब्द पहिल्यांदा ऐकला जेंव्हा कॉलनीत ' मुलगी झाली हो' संगीतिका पाहिली तेंव्हा !
तेंव्हा काही तो गंभीर विषय समजण्या इतकी अक्कलही नव्हती पण त्या नाटकत हायलाइट केलेल्या काही गोष्टी चांगल्याच लक्षात राहिल्या.
हे गाणं तर बहुतेक सगळ्यांनाच लक्षात असेल

" हिला मुलगी होउ दे, हिला मुलगी होउ दे
आणि हिलाही मुलगीssssच होउ दे
आणि तुला ग?
मला मात्र मुलगाsssच हवा
का?
कारण मुलगा म्हणजे वंशाचाssss दिवा ..

अरारारारारा.....मुलगी झाली
अता काय बाई करु
मुलगी झाली, अता हे रागावतील
मुलगी झाली, अता सासु बाई रुसतील
मुलगी झाली, उपास तपास केले तरी
तरीही मुलगीच झाली.."

त्या वेळी काही नीट समजत नसलं तरी ' मुलगी' झालेली काही लोकांना आवडत नाही हे मात्र ऐकून फार म्हणजे फार नवल वाटलं होतं !
अशा अनेक छोट्या गोष्टी ज्या त्या वेळी मुलगी झाली हो मधे सांगितल्या त्या थोड्या फार प्रमाणात आजही तशाच आहेत !
' मुलगी झाली हो' ला २० पेक्षा जास्त वर्षं झाली असतील, पण काय फरक पडलाय समजात .
इथेच आजुबाजुला किती तरी नॉर्थ इंडियन मैत्रीणी आहेत ज्या भयानक टेन्शन मधे असतात प्रेग्नंट असताना, सोनोग्राफी मधून मुलगी आहे हे समजलं तर काय म्हणून( ही कथा उच्च शिक्षित, चांगल्या हुद्द्यावर असणार्‍या, जॉइन्ट फॅमिली मधे न रहाणार्‍या अमेरिकेतल्या भारतीय मुलींची . )
अकोल्याला माझ्या ओळाखीच्या काही बायका प्रेग्नंट असताना 'मुलगा व्हावा' म्हणून कुठल्या तरी टिंपाट सो कॉल्ड डॉक्टर कडून औषध घ्यायला जातत हे पाहून अक्षरशः कानाखाली वाजवावीशी वाटते ( सॉरी फॉर माय हार्श वर्ड्स) ......... मला खरच समजत नाही कि या शिकलेल्या बायकांना एवढही सामान्य ज्ञान नाहीये का औषधं घेऊन मुलगा किंवा मुलगी होणे कंट्रोल करता येते कि नाही आणि स्वतः बायका असून या बायांना मुलगा होण्या साठी चालवलेला खटाटोप पटतो का यांच्या मनाला ????
मुळात वंशाचं नाव चालवणे खरच एवढं महत्त्वाचं आहे का ?
जर खरच महत्वाच वाटत असेल तर का नाही नियम बदलून मुलीला तिचं आडनाव कंटिन्यु करायला सांगत ?
मुलगा म्हतारपणी सांभाळेल या आशेनी मुलगा हवा असेल तर का नाही मुलींनाच लहानपणा पासून संस्कार देत पुढे आई वडिलांना सांभळणे त्यांचेही कर्तव्य आहे याची ?
लग्न झालं कि सासर ही तुझी पहिली प्रॉयॉरिटी अशी शिकवणी का दिली जाते मुलींना आणि का फॉलो करतात आजही अनेक मुली ?
एखादा मुलगा जेंव्हा म्हणतो कि त्याला इतक्यात लग्न करायचं नाही, त्याच्या अँबिशन्स,करिअर, घर, बॅक बॅलन्स या गोष्टीचा विचार करतो तेंव्हा त्याला सहज मान्यता मिळते पण मुलीने हा विचार पुढे केला तर तिला लवकर लग्न- बयोलॉजिकल सायकल-मुल होणे वगैरे गोष्टी समजावल्या लागतात !
पण मुळात त्या मुलीला कुठल्या मार्गाने जायचय हे कोणी विचारात घेत नाही.. एखाद्या मुलीच्या आयुष्यात नसेल मुल होणे, फॅमिली लाइफ लवकर सुरु करण्याला प्राधान्य तर समाजाला त्याचा काय प्रॉब्लेम आहे ?
तिला तिच्या अँबिशन्स नुसार का नाही जगु देत ?
हे आणि असे अनेक प्रश्न पडतात !

लहानपणी लक्षात राहिलेला अजुन एक किस्सा !
आमच्या कॉलनीत स्त्रीमुक्तीवर एक परिसंवाद ठेवला होता.
अनेक स्त्रिया , पुरुष खूप छान विचार मांडत होते, अचानक ऑर्गजायझर बाईच्या काय अंगात आलं कळलं नाही पण हिची टर्न आली तेंव्हा ती उठून तावातावाने पुढे आली म्हणे
" स्त्री ही स्वतंत्र आहेच .. घराघरात कुठली' भाजी- चटणी' करायची हे फक्त स्त्री च ठरवते' , इतर गोष्टी त्यापुढे काहे महत्त्वाच्या नाहीत!
त्यावर अर्थात अनेक प्रतिवाद , भांडणं, तिचं मत हाणून पाडणे आणि अगदी हशा सुध्दा पिकला !
पण खरच, फक्त चटणी भाकरी मर्जीप्रमाणे करण्यात धन्यता मानणार्‍या अनेक स्त्रिया आहेत हे भयानक डिप्रेसिंग आहे.
हे चित्रं बदलण्या साठी सर्व प्रथम स्त्रियांनी स्वतः खंबीर, कणखर अ‍ॅटिट्यड आणणं, ज्या गोष्टी पटत नाहीत , बंधनकारक वाटतत त्यांना विरोध करायची निदान हिंमत करणं, हुंडा पध्दतीने लग्न करायला स्वतः स्त्रियांनी विरोध करणं, मुलींने स्वतःहून आई वडिलांचा म्हातरपणचा आधार बनणं, स्त्रियां कडे बघण्याचा समाजाचा आणि काही विकृत पुरुष मनोवृत्तींना आळा घालण्या साठी लहानपणा पासून शालेय शिक्षणा बरोबरच सभ्यतेनी कसं वागावं याचं रितसर शिक्षण-धडे मुलांना देणे प्रचंड गरजेचं आहे !
महिला दिना निमित्त फक्त एक दिवस ही सगळी चर्चा करून पुन्हा उरलेले दिवस समाजाच्या अन्यायापुढे गुडघे टेकणे, बचावात्मक पवित्रा घेणे जेंव्हा बन्द होईल तेंव्हा स्त्री ने स्त्रीमुक्तीच्या दृष्टीने एक पाउल पुढे टाकले असे म्हणायला हरकत नाही.

अंजली | 8 March, 2011 - 21:23
डिजे आणि संयोजक धन्यवाद.
सर्वांच्या पोस्ट सुरेख. अनेक मुद्यांचा विचार झाला आहे.
आमच्या ऑफिसमधे आज 'महिला दिन' आहे हे कुणाला - अगदी बायकांनाही - माहित नाही. या सगळ्या अमेरिकेसारख्या स्वतंत्र देशात जन्मलेल्या, वाढलेल्या, सुशिक्षीत स्त्रिया. गंमत म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरूवात इथेच अमेरीकेत घडलेल्या एका घटनेची आठवण म्हणून पाळण्यास सुरूवात झाली. मग इथे स्त्री 'मुक्त' आहे म्हणून या बायकांना 'आंतरराष्ट्रीय महिला दिना' विषयी काही माहिती नाही का? माझ्या मॅनेजरशी बोलताना - जी स्त्री आहे - जाणवलं--- she does not care. 'That is not my problem' हे तिचे शब्द होते. हे प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येणार नाही पण तरीही पुरेसं बोलकं आहे.
मुळात 'स्त्रीमुक्ती' म्हणजे काय? घरात? बाहेर? ऑफिसमधे? कुठे आणि कशापासून अपेक्षित आहे स्त्रीमुक्ती? कामापासून, अन्यायापासून किंवा अजून कशापासून? अरूंधतीनं दिलेली धक्कादायक आकडेवारी पाहून या टक्क्यांमधे असणार्‍या स्त्रियांनी 'स्त्रीमुक्ती' हा शब्द ऐकला तरी असेल का हा प्रश्न पडला. महिला दिन, मातृदिन निमीत्ताने 'स्त्रीत्व', 'स्त्रीत्वाचा सन्मान' अशा अर्थाचे बरेच काही लिहीलं गेलंलं काही प्रमाणात मायबोलीवर आणि मायबोलीबाहेर वाचलं. पण हे 'स्त्रीत्व' म्हणजे काय? निसर्गादत्त शारीरीक वेगळेपण? त्याचं वेगळंपण एवढं अधोरेखित का करावं? स्त्रीला स्त्री म्हणून वेगळी वागणूक देणं समाजाकडून आणि खुद्द स्त्रीकडूनही अपेक्षित का केलं जातं? स्त्री आधी 'माणूस' आहे हे कसं विसरतो आपण? तिला 'माणूस' म्हणून वागणूक मिळाल्यानंतर पुढची पायरी 'स्त्री' म्हणून मिळणार्‍या 'सन्मानाची' येते. त्या पायरीवर स्त्रीयांनाही 'स्त्रीत्वा'ची जाणिव होते आणि मग अस्मितेचा, स्वत्वाचा, स्वतंत्रतेचा विचार होतो. स्त्रियांचा संघर्ष हा पुरूषांच्या बरोबरीनं स्थान मिळावं म्हणून खचितच नसावा. तिला माणूस असण्याचा हक्क मिळावा म्हणून असावा. अमेरीकेसारख्या पुढारलेल्या देशातही स्त्रियांना माणूस म्हणून जगण्याचे अधिकार नाकारले गेले. अजूनही इथल्या स्त्रिया 'स्त्रीदाक्षिण्याची' अपेक्षा करतात. का? 'मला स्त्री म्हणून वेगळी वागणूक देण्या आधी माणूस म्हणून समान वागणूक द्या' असं यांना कधी वाटत नाही का? इथे मूल जन्मल्याबरोबर त्यांच्या कपड्यांचे, खोल्यांचे रंग ठरवण्यापासून स्त्री आणि पुरूष असणं अधोरेखित केलं जातं. खेळ आणि खेळाडूंना या देशात भरपूर ग्लॅमर आहे पण स्त्रियांच्या खेळांना पुरूषांच्या खेळाएवढी लोकप्रियता नाही. स्त्रियांनी पँट सूटस घालण्यावरून केले गेलेले विनोद ऐकले आणि त्या विनोदावर अगदी स्त्रियाही पोट धरून हसलेल्या पाहिल्या. इथे अमेरीकेतही 'स्त्री दाक्षिण्य' वगैरे गोष्टींची बायका अपेक्षा करतात, आणि इथले पुरूष त्याप्रमाणे त्यांना वागवतात. मला पूर्वीच्या जॉबमधे आलेला अनुभव मी मागे लिहीला होता. माझा अमेरीकेत आल्या नंतरचा पहिला जॉब. अगदी लहान कंपनी होती. ३-४ जणंच असू. माझा बॉस म्हणजे कंपनीचा मालक- वय ७० च्या आसपास. कुठे क्लायंटकडे जायचं असलं की स्वतः ड्राईव्ह करत यायचा. खरं तर त्यानं येण्याची गरज नसायची, पण बायकांनी ड्रायव्हिंग करणे यावर त्याचा विश्वास नव्हता. तस तो बोलून दाखवायचा, तसे विनोद करायचा. त्याची बायको त्याला हसून दाद द्यायची. तिला त्यात काही गैर, कमीपणा, अपमान कसा वाटलं नाही? गाडीत बसताना अथवा उतरताना बायकांसाठी गाडीचं दार उघडायचा किंवा बंद करायचा. त्याच्या बायकोचीही तशीच अपेक्षा असायची. का? अपंग माणसांना अशी मदत करणे मी समजू शकते, पण 'स्त्री दाक्षिण्याच्या' नावाखाली अशी वागणूक मला मान्य नसल्याचं मी पोलाईटली त्याला सांगितलं तर त्यावरही त्याने बरेच टोमणे मारले. त्याची बायको त्याला हसून अनुमोदन देत होती. एक माणूस म्हणून किंवा अगदी स्त्री म्हणूनही तिला यात काही गैर वाटलं नाही? तो पुरूषांना अशी वागणूक देत नव्हता तर केवळ एक स्त्री म्हणून मला वेगळी वागणूक का द्यावी त्यानं? माणूस म्हणून का वागवू नये? स्त्रीदाक्षिण्याच्या नावाखाली एक प्रकारे असमानताच अधोरेखित होत नाही का?
वर टण्यानं आणि डिजेनं लिहीलेले मुद्दे वाचून परत एकदा स्त्रीचं माणूस असणं अधोरेखित करावसं वाटलं. दीपांजली म्हणते तसं नथीला स्त्रीनं का विरोध केला नाही? कारण तिला 'आपण माणूस आहोत, जनावर नाही' याची जाणिवच नव्हती. दुर्दैवानं आज इतक्या वर्षा नंतरही ही जाणिव आहे असं मला म्हणवत नाही. लहान असताना एका अतिशय प्रख्यात, लोकप्रिय लेखकांनी त्यांच्या एका पुस्तकात 'उगाच नाही स्त्रियांना आणि शूद्रांना गायत्रीमंत्र म्हणायला मनाई केली' अशा अर्थाचं वाक्य वाचलेलं आणि खूप वाईट वाटलेलं आठवतय.
मुलगी जन्माला आल्यावर ते मूल आधी 'माणूस' आहे असा विचार केला गेला तर स्त्रीभ्रूण हत्या कमी होतील का? आमच्या ओळखीचं एक कुटुंब. सुशिक्षीत, घरात कमालीची श्रीमंती. कर्ती बाई/सासू समाज सेविका. त्या घरातली सून. तिला दोन मुली आहेत. पण मुलगा होण्यासाठी तिचा आटापिटा पाहिला आहे. नवस-सायास, गर्भलिंग चाचण्या आणि तब्बल चार गर्भपात झाल्यावर एकदाचा मुलगा झाला तेव्हा तिच्या चेहर्‍यावरचा कृतार्थपणा मला हताश करून गेला. तिची मोठी मुलगी तेव्हा १७ वर्षांची होती. आई म्हणून मुलीला काय शिकवण दिली तिनं? काय उदाहरण समोर ठेवलं?
याचा अर्थ असा नाही की मला माझ्या 'स्त्री' असण्याचा अभिमान नाही. निसर्गदत्त वेगळेपण नक्कीच जपावं, त्याचा अभिमानही बाळगावा. पण ही पुढची पायरी झाली. त्याआधी स्त्रीनं आणि समाजानं तिचं माणूसपण समजून, जाणून घेतलं आणि मान्य केलं तर स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी, असमानता हे सगळं बदलेल असा विश्वास वाटतो. स्त्री म्हणून 'सन्मान' देण्याआधी माणूस म्हणून वागणूक द्या.

सीमा | 9 March, 2011 - 10:56
मला खो दिल्याबद्दल दिपांजलीचे आभार.
स्त्री जेव्हा "स्त्रीत्व" बाजुला ठेवुन स्वतःच्या जबाबदारीवर अभी राहिल आणि तिला जेव्हा स्वताच्या सामर्थ्याची जाणिव होइल, तीच खर्‍याअर्थाने स्त्रीमुक्ती असं मला वाटत.

...................................................................

मला लिहिता येत नाही. वैचारिक तर मुळीच नाही. त्यामुळ ही एका सबल स्त्रीची "गोष्ट" वाचा.

स्त्रीमुक्ती

गिरकी घेता घेता तिने एक क्षणभर स्वतःला आरशात निरखले. कपाळावरचे केस मागे सारले. कानातल्या डुलना एकदा जोरात हलविले. फ्रॉक उगाचच नीटनेटका केला.
"आई मी कशी दिसते?" तिने कदाचीत चौथ्यांदातरी विचारल. तिच्या आईबाबांचा तिला बघुन अभिमान ओसंडुन वहात होता.
बाबांचे ते उंच मित्र आजही आले होते. म्हणजे ते तसे नेहमीच येतात चॉकोलेट घेवुन. आज त्यांच्या हातात तिला काहीतरी रंगिबेरंगी कागदात गुंडाळलेल दिसल. उंच उंच उड्या मारीत मग ती आतल्या खोलीत त्यांच्याबरोबर गेलीच. आई बाबांचा ,टिव्हीचा आवाज आता अगदीच विरत गेला होता.
काकांनी आणलेल प्रेझेंट घेण्यासाठी तिने घाईने हात पुढ केला. त्यांनी तो घट्ट पकडला आणि.........

तिला आता कधीच मोठ व्हायच नव्हत.
पण ते इतर अनेक गोष्टींप्रमाने तिच्या हातात नव्हतचं.

"आपल्यालाच का?" याच उत्तर बरेच दिवसानी तिला मिळाल. मुलगी असण्याची खंत वाटली तिला.सात्वीक संतापाने मन भरुन गेल. पण तरीही पुढे चालत रहाण्याचा मनाचा अगदी निग्रह झाला. स्त्रीत्वाची ती ही एक देणंच आहे नाही का?

स्वताच्यातले गुण तिला आता अधिक ठळकपणे नजरेस येवू लागले.स्त्रीच शरिर फक्त वेगळं.
किंबहुना ,व्यवहारी पण भावनांची झालर असणारी , भविष्यकाळाला उमेदीने सामोरी जाणारी पण भुतकाळाच्या पाउलखुणा जपणारी , "आई" पणाचा जगावेगळा सिक्थ सेन्स असणारी , आतला आवाज समजणारी, जिद्दी, राखेतुन नंदनवन फुलवणारी अशी स्त्रीच्या रुपाची नवी ओळख तिला झाली .
स्वतःच्या नकळतच तिने खर्‍या अर्थाने दुबळ्या स्त्रीत्वापासून फारकत घेतली.
स्त्रीत्वाने तिला तिच्या सामर्थ्याची जाणीव करुन दिली होती.

जगात तिने आज स्वतःच मानाच स्थान निर्माण केल होत. एक स्त्री म्हणुन नव्हे तर एक व्यक्ती म्हणुन सार जग आज तिला नावाजत होत.
गिरक्या घेणार तिच मन आता थोड विसावल होत. तिच्यासारखेच अंगार झेलणार्‍या मुलींसाठी तीने आज सुरेख शाळा उभी केली होती.
तिन हात पुढ केला होता आणि तिला खात्री होती, "बंधन" तोडणारी अशीच साखळी क्षितीजापर्यंत बनत जाईल.
आज ती खर्‍या अर्थाने मुक्त झाली होती.

.............................
मृण्मयी | 10 March, 2011 - 00:55
अजूनही लख्खपणे आठवतो तो प्रसंग!! आईबरोबर नात्यातलं नुकतंच जन्मलेलं बाळ बघायला सुतिकागृहात गेले होते. माझ्या आठवणीतलं इतकं तान्हं बाळ बघण्याचा तो पहीलाच प्रसंग! त्यामुळे बराच उत्साह होता. खोलीत गेल्यावर बघते तर लक्षात राहण्यासारखं दृष्य! पलंगावर डोक्याला फडकं गुंडाळून बसलेली बाळाची आई हमसाहमशी रडतेय, बाळाला कुशीत घेऊन आजी अश्रू ढाळतेय, बाळाचे बाबा आणि आजोबा सुतकी चेहेरे करून पलंगाशी उभे. माझ्या आईला बघताक्षणी हुंदक्यांची संख्या आणि आवाज वाढून, "बघ नं मामी, दुसरी पण मुलगीच झालीऽ" हे कानी पडलं. आणि डोक्यात काही क्षण खळबळ उडाली. 'मी पण माझ्या आईवडीलांची दुसरी मुलगी. माझ्या जन्मानंतर पण अशीच रडारडी झाली असणार का?त्यात येवढं रडण्यासारखं नेमकं काय झालं?' असे बरेच प्रश्न कित्त्येक दिवस डोक्यात होते. त्यानंतरचं त्या खोलीतलं बाकी काही नीटसं आठवत नाही, पण हा प्रसंग कायमचा डोक्यत शिरून अगदी घट्ट बसला.

'रडण्यासारखं नेमकं काय झालं?' डोक्यात टोचे देणार्‍या या एका प्रश्नानं स्त्री मुक्ती म्हणजे काय, ती असणं नसणं म्हणजे काय, या आणि यासारख्या अनेक विचारांची बिजं रोवल्या गेल्याचं जाणवलं. एका मराठी मध्यमवर्गीय समाजात वाढताना सर्वसाधारणपणे जे काय दिसतं, जाणवतं, बोचतं तितपत सगळं अनुभवलं. बायकोच्या, भांडी-धुणी करून कमावलेल्या कष्टाच्या पैशाची दारू पिऊन, नशेत तिलाच बडवून काढणारा हीरालाल बघितला आणि अशाच प्रसंगात आधी मार खाऊन, नंतर डोळे पुसून त्याच काठीनं, ढोसून आडव्या झालेल्या नवर्‍याला काळंनिळं करणारी जनाबाई पण बघितली. नवरा बघायला जाण्याची परवानगी देत नाही म्हणून, स्वत: लिहिलेल्या नाटकांचे प्रयोग रंगमंचावर सुरू असताना, घरी डोळ्यांतून टिपं गाळंत लसूण सोलत बसलेली स्त्री बघितली, तशीच नवर्‍याला दुसर्‍या बाईबरोबर रंगेहाथ पकडल्यावर सव्वा वर्षाच्या मुलाला घेऊन घराबाहेर पडणारी आणि एकट्यानं निभावून नेणारी कणखर सुमामावशी बघितली. 'मुलीच्या जातीला..' या शब्दांपासून सुरू होणारी विधानं ऐकली आणि 'कोण मुलगा तुला घाणेरडं बोलला? एक लाथ हाणून ये त्याच्या XXवर' असं सांगणारा पितापण अनुभवला. एकूणच वाढताना 'स्त्री मुक्ती'च्या अत्यंत व्यापक विषयाबद्दल मेंदूत विचारांचा नुस्ता गुंता करून टाकणार्‍या परिस्थितीशिवाय काही वेगळं दिसलं नाही.

पुढे पुढे बुरख्याआडच्या बायका बघितल्या, पण असे बाप्ये न दिसल्याचं आश्चर्य वाटलं नाही. भडक रंगीबेरंगी कपड्यातल्या, तोंडाला रंगरंगोटी करून संध्याकाळी रस्त्याच्या कडेला उभ्या बायका बघून आणखी एक अंतःर्मुख करणारी जाणिव झाली. प्रश्न गरगरतच होते. उत्तरं मिळाली नाहीत, किंवा प्रामाणिकपणे सांगायचं तर मिळवण्याचा प्रयत्नच झाला नाही. पण व्यक्तीला स्त्री म्हणून काहीतरी वेगळ्या, भयानक आणि कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागतंय, तिच्यात काही वेळा अशा परिस्थितीला तोंड द्यायची शक्ती, इच्छा आणि याहून काही वेगळं चांगलं आयुष्यात मिळू शकतं याची कल्पनाही नाही हे प्रकर्षानं जाणवलं.

स्त्रीला जन्माला येऊ द्यायचं की नाही हे ठरवणारा समाज, या जगात आलीच तर तिच्या आयुष्याचा क्षणन् क्षण आखून देणारा समाज आणि आखीव प्लॅनापासून दूर जायचा प्रयत्न करणार्‍या स्त्रीला कडक सजा देणारा समाज हळूहळू कळायला लागला. आणि शेवटी समाज समाज म्हणजे काय? आपण स्वतः देखिल त्याचाच घटक आहोत आणि आहे ते बोचतंय याची हाकबोंब न मारता, बोचतंय ते बदलायला मदत न करता नुस्तीच तोंड पाटिलकी करणार्‍या फोलपणाची फार जास्त जाणीव व्हायला लागली.

स्त्रीभृण म्हणून आईच्या उदरातच खुडल्या जाण्यापासून तर स्त्रीला समागमातला आनंद मिळता कामा नये असं ठरवून जेनायटल म्युटीलेशनच्या अघोरी प्रकाराने तिला छळणार्‍या आणि हे करताना कुठलाही खेद खंत नसणार्‍या अमानुष जनसमुदायाबद्दल ऐकलं. ही आणि अशी शारिरीक, मानसिक, भावनिक, सामाजिक बंधनं आहेत, याच महाभयंकर जाचातून सुटका होण्याची तिला नितांत गरज आहे हे आता जास्तच स्पष्टपणे जाणवायला लागलं. 'माणूस म्हणून जगता येतं' ही केवळ भावनाच येण्यासाठी सुध्दा तिला आधी या पाशांतून मुक्त होण्याची संधी मिळणं गरजेचं आहे असं वाटायला लागलं. स्त्री मुक्तीचे इतके पैलू, इतके कंगोरे आणि चेहरे आहेत, की मला तरी 'स्त्रीमुक्ती म्हणजे नेमकं काय' या प्रश्नाचा आवाका इथे चार ओळीत मांडता न येण्यासारखा वाटतो.

स्त्रीच्या आयुष्याचं, तिच्या अस्त्तित्त्वाचं दृष्य थोडंफार बदललं असलं, तरी इथे 'पेला अर्धा भरलाय' म्हणून समाधान मानता येत नाही. खूप काही व्हायचं आहे. एकूणच वैश्विक समाजाची मानसिकता बदलण्याची, या दिशेनं सुसंस्कार घडवलेली पिढी तयार होण्याची नितांत गरज आहे. याला खूप खूप वेळ लागणार आहे हे कळतंय. मी माझ्या मुलापासून सुरुवात करतेय.

मंजूडी | 10 March, 2011 -

मी अगदी लहान म्हणजे साधारण पहिलीत असतानाची ही घटना आहे. माझ्या बहिणीची मल्लखांब ह्या खेळासाठी फ्रान्स-जर्मनीच्या दौर्‍यावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली होती. ते साल होतं १९८५... वयाच्या केवळ दहाव्या वर्षी परदेश प्रवासाची संधी मिळणं हे त्याकाळी अप्रूपाईचंच होतं. साहजिकच सर्व स्तरावर तिचं कौतूक, सत्कार समारंभ वगैरे झाले. तिच्याबरोबरच आई-बाबांचेही सत्कार झाले. केवळ आपल्या मुलीमुळे आपण इतक्या सगळ्यांच्या कौतुकाचे धनी झालो ह्या भावनेत असणार्‍या आई-बाबांना जेव्हा अगदी जवळच्या नातेवाईकाकडून पाठीवर शाबासकीची थाप घेताना 'मुलगा असता तर निदान तुमचं नाव तरी पुढे नेलं असतं' हेही ऐकवण्यात आलं तेव्हा ते थक्क झाले. प्रसंगाचं गांभीर्य राखून नातेवाईकाचा अपमान न करता बाबांनी शांत पण ठाम स्वरात सगळ्यांसमोर त्याला सांगितलं 'उद्या ती कोणाचीही बायको, सून, काकू, मामी इत्यादी झाली तरी ती 'आमचीच' मुलगी म्हणून ओळखली जाणार आहे, मग तिचं नाव काही का असेना...' आम्ही दोघीही बहिणीच, आम्हाला वाढवताना, मोठं करताना हीच भावना मूळाशी होती त्यामुळे आम्ही 'मुलीच' म्हणून कोणतीही वेगळी वागणूक दिली नाही. आजूबाजूच्या मैत्रिणींचे 'बाबा नाही म्हणतात', 'आजी म्हणते मुलींनी असं करायचं नसतं' वगैरे संवाद ऐकल्यावर 'बरंय बुवा, आपल्या घरी आपल्याला असं कोणी काही सांगत नाही' असेच सुखी विचार यायचे.

दुसरी घटना मी मोठी झाल्यावर नोकरीला लागल्यावरची : एका प्रख्यात कंपनीच्या ऑडीट टीममधे असल्याने भारतातल्या त्यांच्या शाखांचे ऑडीट करण्याचे काम होते. एकदा कलकत्ता शाखेचं ऑडीट ठरवताना केवळ चारच जणांची टीम जाऊ शकेल असं लक्षात आलं. त्या चारही मुलीच... आम्ही जायची तयारी दाखवली आणि आमच्या साहेबांनी आणि कंपनीच्या एम.डी. नीही त्याला पाठिंबा दर्शवला. तेहत्तीस तासांचा प्रवास, गाडी लेट झाल्याने तो चाळीस तासांवर पोचला आणि आम्ही कलकत्ता शहरात दाखल झालो. 'सो.... यू ऑल हॅव कम ऑन अ पिकनिक हां?' ह्या संवादाने कलकत्ता शाखाप्रमुखांनी आमचे स्वागत केले. आमच्यासारख्या तरूण, त्यादेखिल मुलीच, त्यांच्या कामाचे ऑडीट करणार हे त्यांच्या पचनी पडण्यासारखे नव्हतेच. काम चालू असताना देखिल 'तुम्ही काय करणार?', 'आमच्या शाखेत काही चूक आढळणारच नाही', 'so young, how can they work?' वगैरे हिणकस शेरेबाजी येताजाता चालू असायची. अतिशय सामान्य दर्जाच्या हॉटेलमधे आमची व्यवस्था केलेली होती. हे सर्व नजरेआड करून आम्ही आमचे काम चालूच ठेवले होते. कामात बर्‍याच आणि गंभीर स्वरूपाच्या चूका आढळल्या. त्यांचं रीपोर्टींग मुंबईतल्या मुख्य ऑफिसला केलेलं होतंच. त्यामुळे शाखाप्रमुख बर्‍यापैकी खवळलेले होते. तशातच आम्ही गोडाऊनमधल्या मालाची तपासणी (Physical Stock Taking) करण्याची तयारी दाखवली. एरवी ऑडीट होत असताना हे प्रत्येक वेळी व्हायचेच. पण ह्यावेळी मुलीच येताहेत, त्या काय गोडाऊनमधे उभ्या राहणार? अशा विचाराने शाखाप्रमुखांनी त्याची तयारी केलेली नव्हती. पण एकाचवेळी दोन गोडाऊनमधे दोघी-दोघींची टीम बनवून पूर्ण दिवस उभं राहून पूर्ण मालाची तपासणी केली आणि त्यातही गंभीर स्वरूपाच्या अक्षम्य चुका आढळून आल्या. ह्या दौर्‍याची सांगता करण्यासाठी आमचे साहेब कलकत्त्याला आले आणि जाता जाता शाखाप्रमुखांना सुनावून गेले की त्या केवळ मुली आहेत म्हणून त्यांना कमी लेखू नका, गोत्यात याल.

डेलिया | 10 March, 2011 - 02:02
या आणि इतर धाग्यावरचे सर्वांचे विचार वाचले. सगळ्यांनीच खूप छान लिहिले आहे. बहुतेक सर्व पॉईंट कव्हर केले आहेत. तरीही खो मागून घेतलाय तेव्हा हे थोडेसे माझ्या मनातले

हे काही प्रसंग ज्यांनी मला प्रत्यक्षात जाणीव करून दिली की सामाजात / कुटुंबात स्त्रीचे स्थान कसे दुय्यम आहे आणि मला मिळालेले हे काही धडे

मी १लीत असताना घडलेली एक मजेशीर घटना आठवली. आम्हाला शाळेत काहीतरी फॉर्म भराय्चे होते आणि त्यावर पुर्ण नाव लिहायचे होते. माझ्या मैत्रिणीच्या वडीलांचे नाव 'बाळासाहेब' असे होते. तिला ते नाव लिहायची लाज वाटत होती. तिने मला विचारले की माझ्या वडीलांचे नाव 'बाळासाहेब' असे आहे , ते कसे काय लिहु ? मलाही वाटले , ई काय नाव आहे , हे कसे लिहायचे. मग मी तिला विचारले तुझ्या आईचे नाव काय आहे ? ती म्हणाली 'वैजयंती' . मी म्हटले , हे पण जरा काहीतरीच आहे, पण 'बाळासाहेब' पेक्षा खुप बरेय. मग तु वडीलांच्या एवेजी आईचेच नाव लिही. तिलाही ते पटले. आणि तिने मधल्या नावाच्या रकान्यात आईचे नाव टाकले.नन्तर बाईंनी जेव्हा ते बघितले , तेव्हा तिला बोलावुन घेउन त्यानी तिच्या वडीलांचे नाव तिथे लिहिले.
अता आठवुन खरेच मजा वाटते, वडीलांचेच फक्त नाव का लिहायचे , आईचे का चालणार नाही हे तेव्हा खरेच कळत नव्हते. आई - वडील सारखेच वाटायचे. त्यामुळे वडीलांचे नसेल लिहायचे तर आईचे लिही असा सल्ला अगदी सहजपणे मी तेव्हा असलेल्या तर्क बुद्धीनुसार तिला दिला होता. आणि मला त्यात काहीही चुकीचे वाटत नव्हते.

१. देवस्वरूप आई ई. आईच्या नावाने कीतीही उदोउदो चालला असला, एखाद्याने बापाला जन्मात पाहिले नसले तरी मुलांच्या सामाजिक आयुष्यात आईला नावापुरते सुद्धा स्थान नाही.

माझ्या एका अत्त्याला 'तांबी' बसवल्यामुळे बराच त्रास झाला होता. अगदी जीवावरच बेतायची वेळ आली होती. तेव्हा साधारण मी कॉलेज मधे होते. आणि नुकताच एका मासिकात स्त्री गर्भनिरोधके आणि त्याचे स्त्रियांवर होणारे संभाव्य दुष्परीणाम यावर मोठा लेख वाचला होता. त्याच वेळी पुरुष गर्भ निरोधके वापरावयास कीती सोप्पी आहेत आणि कोणतेही वाईट परीणामही नाहीत हेही दाखवून दिले होते. तसेच स्त्रियांच्या कुटुंब नियोजनाच्या ऑपरेशान पेक्षा पुरुषांचे ऑपरेशन किती सहज सोप्पे आहे हे देखिल. हे सर्व ज्ञान घेऊन मी अगदी हिरहीरीने अत्त्या आणि ई. घरातील बायकांना ही जबाबदारी तुमच्या नवर्‍यावर सोपवा हे सांगायला गेले. तेव्हा 'पुरुष' हे असले काही करणार नाहीत अशा प्रकारचे उत्तर मला लगेच मिळाले.
आजही जेव्हा मी माझ्या वयाच्या अतिशय सुखवस्तू आणि आधुनिक मै.ना गोळ्या घेताना किन्वा ऑपरेशन करून घेताना पहाते , तेव्हा मला सखेद आश्चर्य वाटते.

२. कुटुम्ब वाढविण्याची जवाबदारी स्त्रीकडे आहेच , त्या शारीरीक त्रासातून ती आनंदाने जात असतेच. पण कुटुम्ब नियोजनाची जवाबदारी पुरुष आजही सहज शक्य असूनही फारच कमी प्रमाणात उचलताना दिसतात.

माझ्या आईची चुलतबहीण. लहानपणापासून आजारी. तरी डॉ. च्या सल्ल्याविरुद्ध २०व्या वर्षीच लग्न आणि २१ ला मूल होऊ दिले. बाळंतपण तिच्या कमजोर शरीराला झेपले नाही. मुल झाल्यावर गंभीर आजारी होती आणि ६ महिन्यातच गेली. अजुनही तिचे लग्न लवकर करून आपण चूक केली हे तिच्या आईलासुद्धा मान्य नाही. 'मुलीचे लग्न वेळेतच झाले पाहिजे , तिने कुठे काही केले तर' हे त्या सुशिक्षित , नोकरी करणार्‍या आईचे मत. नवर्‍याला तिचा आजार लग्नाआधीपासून माहित होता. मूल होऊ देणे धोक्याचे आहे याची पुर्ण कल्पना लग्नाची बोलणी करतानाच दिली होती. तेव्हा ते मान्य करूनही लग्नानंतर त्याच्या आईने मुलासाठी मागे लागण्यात आणि त्याने 'मूल' होऊ देण्यात काही चूक केलीये असे त्यांना वाटत नाही. ती गेली तरी तिला 'मुलगा' झाला आणि ४ च महिन्यात त्याचे २ रे लग्नसुद्धा झाले त्यामुळे सर्वच आनंदी आहेत.

३. शारिरीक, मानसिक , आर्थिक क्षमता असो वा नसो मुलीच्या जातीला लग्न आणि मूल या अटळ गोष्टी आहेत. बाईच्या जीवापेक्षा मूल होणे महत्वाचे ही केवळ सिनेमात घडत नसून समाजातच घडते.

योडी | 10 March, 2011 - 21:05

मंजुडी, 'खो' दिल्याबद्दल धन्यवार.

जवळपास सर्वांनी मुद्दे मांडलेतच, पण माझा थोडासा खारीचा वाटा.

अभिमान आहे मला एक स्त्री असल्याचा. पुरुषांपेक्षा एक वेगळी गोष्ट आपल्याकडे आहे, ती म्हणजे, आपल्यासारखाच एक जीव जन्माला घालण्याची. स्त्रियांनो, कमीपणा वाटुन घेऊ नका कधीही. स्त्री मुक्ती म्हणजे असलेली नाती तोडुन मुक्त होणं असा अर्थ नाहीय, तर असलेली नाती जपतच आपलं आयुष्य घालवणं हे माझं स्त्री मुक्ती विषयीचं मत.

लहानपणापासुन 'तु मुलगी' हे कधी आई बाबांनी जाणवु दिलंच नाही. स्वतःला हव्या असलेल्या क्षेत्रात करियर करायची संधी मिळाली. जॉब चेंज करावासा वाटला तेव्हा भरपुर ठिकाणी रेझ्युम्स टाकुन ठेवले. बाबांच्या एका मित्राला सांगुन ठेवलं. ८ दिवसांनी त्या मित्राला कॉल केला तर समोरुन उत्तर आलं, "अगं त्या कंपनीत टेलिकॉम सेक्टरला सगळी मुलंच आहेत, तु कशी काय काम करणार तिथे? ती कंपनी शक्यतो मुलींना घेत नाही टेलिकॉम मध्ये." अजुनही हे असे प्रकार कॉर्पोरेट सेक्टरमध्ये होत असावेत ह्यावर विश्वास बसेना. हवं असलेलं ज्ञान, काम करायची क्षमता असुनही तिथे सिलेक्ट होता येणार नाही, का तर फक्त आपण मुलगी आहोत. हे असं असुनही 'महिला दिन' साजरा होतोय इथे.

लग्नाच्या वेळेस किती मुली स्वतःपेक्षा कमी शिकलेला, कमी कमवणारा नवरा करायला तयार असतात? आपण स्त्रियाच प्रत्येक वेळी आपल्याकडे कमीपणा ओढवुन घेतो. आपल्याला प्रत्येकवेळी कुणीतरी सांभाळायला हवा असतो. लहानपणी बाप, मोठेपणी नवरा आणि म्हातारपणी मुलगा अशा कुबड्या घेऊन चालत असतो आपण. का झुगारुन देऊ शकत नाही आपण हे सगळं? का कोण लागत प्रत्येक वेळी आपल्याला? आणि स्त्री मुक्ती म्हणजे नेमकं काय? खरं तर आजच्या काळात स्त्री मुक्ती आवश्यक नसून स्त्री सबलीकरण आवश्यक आहे. बनु द्या तिला सबळ, करु द्या तिला सगळ्याचा सामना एकटीने. मुळुमुळु रडत बसण्यातच स्त्री मुक्ती आहे का? आज कितीतरी स्त्रिया पुरुषांच्या वासनेला बळी जातायत, त्यांना स्वतःचं संरक्षण स्वःताला करायला शिकलं पाहीजे. होणार्‍या अन्यायाला समोरुन वाचा फोडली पाहीजे.

माझ्या आत्याला जवळपास १६ वर्षं मुल नव्हतं. शेवटी बाळ दत्तक घ्यायचं ठरलं. मुलगीत हवी ह्या हट्टापायी मुलगी घेतली दत्तक. हे जेव्हा नातेवाईकांत कळलं तेव्हा, 'अरे घेऊन घेतली मुलगीच', 'लग्न कसं होणार आता हिचं?', हे शेरे ऐकायला मिळाले. अजुनही मुलगी म्हणजे पराया धन असाच विचार करतोय समाज. मुलं घराचं नाव रोशन करतात ह्या भावनेने झपाटलेला आपला समाज एका अनाथ मुलाला हक्काचं घर मिळतंय हे सोयीनी विसरुन जातात.

जे काही वाटलं, लिहिता आलं ते लिहिलंय. वेळेअभावी जास्त आलं नाही लिहिता.

दिनेशदा | 11 March, 2011 - 08:44

खरं तर या विषयावर लिहिण्याइतका अनुभव मला नाही.
पण तरीही एकदोन मुद्दे :- सध्या जे सकारात्मक बदल होताहेत, त्याच्याकडे थोडे बघायलाच हवे.

१) गेल्या १५/२० वर्षात. घरकामात पुरुषांनी थोडाफार हातभार लावायला सुरवात केली आहे. माझ्या आईच्या पिढीतही बायका तुरळक नोकरी करतच होत्या. पण घरच्या कुठल्याच कामातून त्यांची सुटका नव्हती. सकाळी जायच्या आधी सर्व घरकाम करुनच जावे लागत असे. त्यावेली चपात्या करायला बाई ठेवणे, वा नाक्यानाक्यावर पोळीभाजी केंद्र असणे या गोष्टी ऐकण्यातही नव्हत्या. आमच्या शाळेतल्या शिक्षिका, शाळा सूटल्यावर बाजारहाट करूनच घरी जात असत. इतकंच काय, मराठी नाटकातल्या अभिनेत्रीही प्रयोग संपल्यावर भाजीपाला खरेदी करताना दिसत असत. आमच्या ह्यांना चहा सुद्धा करता येत नाही, हे बायका कौतूकाने सांगत असत त्या काळी.

आता मात्र तसे चित्र दिसत नाही. नोकरी करणार्‍या स्त्रीला घरी यायला उशीर होतो. नवरा आणि ती, घरी यायची वेळ एकच असते, कधीकधी. त्यानंतर दोघांनी मिळून घरची कामे उरकणे हे सहज होतेय.

२) मूलांना वाढवण्यातही बाबांचा सहभाग वाढतोय. पूर्वी शाळेत पोचवणारे बाबा, हे दुर्मिळ चित्र होते. आता तसे नाहिये. तसेच वात्सल्य ही भावना, पुर्वी नव्हती असे नाही. पण त्याचा अविष्कार करायला, बाबांना संकोच वाटत असे. तो आता राहिलेला नाही.

मला हे दोन्ही मुद्दे महत्वाचे वाटतात, कारण आफ्रिकेत या बाबतीत अजूनही तिच परिस्थिती आहे. इथे मुलाचे वडिल कुठलीच जबाबदारी घेत नाहीत.

जागू | 11 March, 2011 - 03:10

आमच लग्न झाल तेंव्हा आम्हा दोघांनाही मुलगी व्हावी हिच इच्छा होती. आणि आमची इच्छा पुर्णही झाली. कारण मुलीचे कौतुक खुप करता येतात. त्यांच शहाणपण, त्यांना नटवण, त्यांचा भातुकलीचा खेळ हे माझ्या डोळ्यासमोर यायच. तर माझे मिस्टर म्हणायचे की मुली समजुतदार असतात शिवाय मुलांपेक्षा आईवडीलांना त्याच जास्त आधार देतात अगदी सासरी गेल्या तरी.

माझ्या पाहण्यातल्या घरातील दोन पिठ्या :

आई वडील - आई रिटायर्ड शिक्षिका आहे. वडील कुर्ल्याला प्रिमियरमध्ये होते त्यांनीही व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली. ते नेहमी नाईट शिफ्ट करायचे. केवळ घर पाहता याव, घरचा सहवास लाभावा म्हणुन. पण रात्रभार जागरण केल तरी आईवर कामाचा लोड नव्हता. आई सकाळी डबे करुन जायची मग वडील दुपारी येउन बाजारहाट करुन जेवण बनवायचे. आई कधी कधी नका करु सांगायची. घरात आजी पण होती. पण दोघिंनाही करु देत नव्हते केवळ आवड होती म्हणून. हो पण मच्छीच जेवण बनवायचे. नाहीतर इतरवेळी आजी आमटी वगैरे घालायची. मग आई दुपारी आली की सगळे जेउन दुपारी आराम करुन वडील शेताच बघायचे तर आई त्यांना शेतावर हातभार लाउन घरची काम उरकायची. शिवाय तिच शाळेच टाचण वगैरे रात्री लिहायची.

सासु-सासरे -माझ्या सासर्‍यांनाही मच्छी - मटण बनवण्याची हौस होती. घरातल बहुतेक मच्छी मटणाच जेवण तेच बनवायचे. मग सासुबाई इतर काम करायच्या तर त्यांची मुलही त्यांना हातभार लावायची.

दिर जाउ - माझी जाऊ आधी एका प्रायव्हेट स्कुलमध्ये शिक्षीका होती. मग तिने नोकरी सोडून गृहीणीपद स्विकारल. पण माझ्या दिरांनाही घरातील सजावट, किचनची आवड आहे. ते दर रविवारी नॉनव्हेज जेवण बनवतात.

मी आणि माझा नवरा - त्यांना किचनच एवढ आकर्षण नाही. आणि किचन आणि माझा किती घनिष्ट संबंध आहे हे तुम्हाला सांगायलाच नको. त्यामुळे माझ्या किचनमध्ये कोणाला वाव नसतो. पण घरात असताना ते बारीक सारीक मदत करतात. मी माहेरपणासाठी गेले होते तेंव्हा त्यांना जाण्यापुर्वी शिरा शिकवला होता तो अजुन येतो त्यांना. पण माझ्या मुलीची मात्र जबाबदारी अगदी आनंदाने सांभाळतात. कधी मी लवकर ऑफिसला गेले तर अगदी अंघोळीपासुन, नट्टाफट्टा पण करतात. मग त्यात मॅचिंग बांगड्या, क्लिप पासुन असत. रिक्षामधे कशी मुल कोंबतात हे दृष्य डोळ्यासमोर आहे म्हणुन ते स्वतः तिला शाळेत, ट्युशनला ने आण करतात. नशिबाने त्यांच ऑफिस आणि कोर्ट जवळ आहे. खुप जण सांगतात की एवढी धावपळ करण्यापेक्षा रिक्षा लावा पण त्यांना काळजी वाटते म्हणून तेच करतात सगळ.

हे झाल मी जवळून पाहिलेल पण काही दृष्य जवळून घराबाहेर पाहीली आहेत त्याचा मला खुप राग येतो. नवराच नाही तर बायकाही अहंकारी वृत्तीने वागतात व घराच घरपण हरवुन बसतात.

चु.भु.द्या.घ्या.

नादखुळा | 11 March, 2011 - 08:28

सर्वांनी इथे खरोखर खूप सुरेख लिहिलं आहे अन ते सर्वांना एकत्रितपणे वाचायला मिळतं आहे याबद्दल खरोखर आभार संयोजकांचे अन मायबोली.कॉम चे.मुळात हा उपक्रम अन त्यातून सुचलेली हि 'खो-खो' ची कल्पनाच सुंदर आहे.

'स्त्री' विषयीचा आदर हा सबंध पुरूष जातीमधून व्हायला तर हवाच पण तितकाच आदर हा स्त्री जातीतूनही समान किंवा त्यापेक्षा जास्त व्हायला हवा तेव्हा तीला जाचातून मुक्त होता येईल असे मला वाटते. आता तुम्ही म्हणाल पिडीत महिलेला जाचमुक्त करण्यासाठी आहेत कि महिला मंडळं , महिला बचत गट त्या करतात कि मदत. पण आपल्याच माणसांकडून होणार्‍या जाचाची कथा सांगतात किंवा ती जगासमोर मांडताना तीला किती अवघड वाटतं हे एकदा ग्रामिण खेड्यातल्या पिडीत महिलेला विचारा. शहरात तरी चुकिच्या पद्धतीने असे जाच स्वतःहून संपवले जाता आत्महत्या करून. पण खेड्यातल्या महिलेला तेवढंही स्वातंत्र्य नाही. याचा अर्थ तीने कंटाळून जीव द्यावा असेही नाही हा. अशी किती तरी उदाहरणे आहेत अशी जी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहे.

* अश्याच एका प्रसिद्ध शहरात मी माझ्या कॉलेजच्या काळात राहत असताना घडलेला प्रसंग आठवतो. हॉस्टेलमधे नियम कडक असल्याने बाहेर पार्टटाईम काम करता येत नव्हते अन ते केल्याशिवाय मनासारखे शिक्षणही घेता आले नसते. म्हणूनच एका घरात पेईंग गेस्ट म्हणून राहत होतो. तिथे ताई अन त्यांचा तो दारूडा नवरा अन दोन लेकरं असा परीवार. देवाच्या अन पुर्वजांच्या कृपेने मिळालेली संपत्ती कशी संपवायची हाच त्या नराधमाचा व्यवसाय. अखेर काय झाल? सगळे पैसे संपायला लागले तेव्हा स्वतःसाठी ५ खोल्या असणारं टुमदार घर अन घरातली माणसं १ खोलीत दाटी वाटीनं राहू लागली. बाकीच्या चार खोल्या अश्याच आमच्या सारख्या मुलांना भाड्याने दिल्या. रोजची भांडणं , बायकोला मारणं , पोरांवर हात उचलणं हे चालूच होतं. कधी कोणी आवाज उठवला तर त्या ताईच जाऊद्यात म्हणायच्या. पण शेवटी काय असह्य झालं तेव्हा पर्याय नाही म्हणून सरळ राहत्या घरात पेटवून घेतलं स्वत:ला अन ते हि भर दिवसा. :अओ. अन ज्वालेचा दाह अजिबातच सहन होईना म्हणून तसंच पेटत्या शरीराने रस्त्यावर उतरून जिव वाचवण्यासाठी आकंत करू लागली. आम्ही सगळ्यांनी शक्य असेल तितका प्रयत्न करून वाचवण्याचा प्रयत्न केला पण वेळ गेलेली होती. ७२ % भाजल्यामुळे तीचा जीव गेला अन तीच्या मुलांचा आश्रय. आता मला सांगा ह्याला जबादार कोण? समाजात हे रोज घडतयं .. बिघडतयं .. दिसतयं. ..तरीही गप्प बसणारे अपराधी कि तीचा तो नराधम नवरा? कि मुक्तीच्या नावाखाली पळ काढणारी , आत्महत्या करणारी ती हतबल स्त्री ?

- इथे कुठे हवीये नेमकी स्त्री मुक्ती? कशी हवीये? काय करता आलं असतं ? काय करायला हवं होतं? अन कोणी कोणी? याची उत्तरं शोधा अन त्याच्यासाठी अश्याच एका उपक्रमाद्वारे काही करता आलं तर जरूर करा. मला आवडेल तुमच्या सहभागी होऊन काम करायला.

* माझी आत्तेबहीण दिसायला सुंदर नाहीये, गरीब घरातली जिथे घरही स्वतःचं नव्हतं अश्या कुटुंबातून सासरी गेली. नशिबानं सासरकडे गडगंजपेक्षाही जास्त श्रिमंती होती. पण कधी श्रीमंतीचा मोह तीने कधी केला नाही. २ वर्षांनी एक मुलगी झाली. मुलगी झाल्यावर ६ महीन्यातच सासरे गेले अन ४ महिन्यात नवरा. दु:ख तीला एकामागून एक अश्या घटना घडल्याचं खूप होतं पण त्या घटनेनतर काही दिवसातच तीचा जो एकत्रित कुटुंबातल्या लोकांनी केला तो अक्षरशः अमानवीय होता. म्हणजे स्वतःच्याच दिराने काही मित्र बोलवून केलेला अतिप्रसंग, सासूने जागोजागी तीला करंटी, कमनशिबी , पांढर्‍या पायाची म्हणून हिणवलेले ते बोल. एवढंच काय पण तिथे माहेराकडून काय मागावं तर माहेरातल्या आईने सोडलं तर कोणीच तीला मदत केली नाही किंवा करताही आली नाही. कसंबसं स्वतःहून उभं राहण्याची जिद्द अन लेकीचं आयुष्य उभं करण्याची हिम्मत तीने गोळा केली अन खडतर प्रवासाला एकटीनेच सुरुवात केली. जिद्द कायम होती म्हणून कोर्टाची पायरी चढली. महिला मंडळांची मदत घेतली पण शेवटी काय? पैसा कमी पडला ना? ज्याच्या हाती दाम तोच बदाम. सगळी केस उलटी फिरवली , लेकीच्या भविष्यासाठी जो काही ताबा मिळणार होता तो हि गमावला. अन सगळ्यात वाईट कृत्य म्हणजे तीलाच फसवणूकीच्या गुन्ह्यामधे पोलिसांनी अटक केली. तरीही तीने जिद्द सोडली नाही. कारण तीला लेकीचं आयुष्य महत्वाचं वाटलं अन ते तिने फुलवलं सुद्धा. आज माझी आत्तेबहीण एका स्थानिक पातळीवर चालणार्‍या महीला संस्थेची अध्यक्षा आहे अन तीची मुलगी प्रवरा कॉलेज ( संगमनेर ) इथे वैद्यकिय शिक्षणाचा अभ्यास पुर्ण करते आहे.

- आता मला सांगा इथे सुद्धा मुळ जबाबदार कोण? कोणाच्या जिवावर जास्त उड्या मारल्या गेल्या? ताकदीच्या कि पैश्याच्या? इथे कशी झाली स्त्री मुक्ती? काय केलं नेमकं तिने? हे असं , आपण मदत केलं तर घडवून आणता येईल? किती आई अन किती लेकी आपण वाचवू शकतो ? समाजाला काही शिकवता येईल का आपल्याला? बघुया जमतय का ते?

* परीस्थिती म्हणून वेश्याव्यवसाय , देहविक्री करणार्‍यांची आपण किळस करतो. समाजातलं त्यांच स्थान हे आपण ठरवून दिलेलच आहे ना? पण मी जेव्हा पुण्यात होता तेव्हा असाच एकदा गणपती बघायला म्हणून गेला गणेशउत्सवाच्या काळात तेव्हा एक माझा मित्र बुधवार पेठेतल्या कुटंणखाण्याजवळ गणपतीच्या मंडळासाठी असणारी इलेक्ट्रिकलची कामे करताना त्याला दिसला. तेव्हा मी त्याला विचारलं , "काय रे प्रत्या , तु इथे काम करतोस"? तो सहज म्हणाला, "हो, मग. काय झालं? काही नाही पण इतरांना कळलं तर काय होईल? तुला कळलं ना मग काय झालं? हा प्रश्न संपतो ना संपतो तोच तो मला आत एका खोलीत घेऊन गेला जिथे बाहेर कमालीची सजावट, पडदे वगेरे असले तरी आत घाणेरड्या अवस्थेत लाळ सुद्धा न पुसता येणारा एक १० वर्षाचा मुलगा लोळत पडला होता. मी विचारलं हा कोण? तेव्हा तो म्हणाला आत्ता ती गेली ना तीचा मुलगा. फक्त ह्याच्यासाठी अन स्वत:वरचा होणारा अन्याय सहन झाला नाही म्हणून आत्महत्या करण्याचा विचार तीच्या मनात आला होता पण आत्महत्या करणे हा गुन्हा आहेच पण एखाद्याचा खून करणे हा सुद्धा गुन्हाच आहे अन तोही असा अवस्थेत असताना त्याला मारून टाकायचं अन मग आपण खुशाल मरायचं म्हणजे संपलं का ? असा विचार तिच्या मनात आला अन तेव्हा तीने ठरवलं कि दोघेही जगतोय मग ठिक आहे आहे. बस.

परत फिरताना उंबर्‍यातून पाऊल बाहेर पडलं करं पण पाठीमागे वळलेली मान पुन्हा सरळ दिशेत वळवताना असंख्य विचाराने आकंठ बुडताना मी स्वत:ला पाहिले ते आजही आठवले कि अंगावर काटा येतो.

- इथे काय झाल? इथे कोणाचा निर्णच चुकिचा? तीचं बरोबर आहे हे म्हणता येईल का? कि परीस्थितीचा दोष म्हणावा तर आता काय बदल करता येईल परीस्थितीमधे? सरकारकडून खास अशी हमी म्हणून केंद्र सरकारचं नियंत्रण असलेलं एखादी विशेष समिती पुर्णवेळ कार्यरत करता येईल का? त्यासाठी पोलिसांची तय्यारी असेल का? जिथे जिथे अन्याय होतो त्या अन्यायाची वाचा किती लवकर अन कशी फोडता येईल? आजच्या या नेटीझन्स क्रांतीच्या युगात अश्या गोष्टींना कितपत न्याय अन सन्मान देता येईल? प्रत्येक वार्डाला पुरूष नगरसेवक असतील तर स्त्रीया उपनगरसेवक असाव्यात काय? कि स्थानिक पातळीवर स्थायीसमितीसारखी एक स्त्रीकल्याण समिती असावी काय? अन त्याचा त्रैमासिक अहवाल सादर करून योग्य त्या उपाययोजना आमलात आणता येतील काय? बेघर अन असाह्य स्त्रियांसाठी आपल्या या उपक्रमाद्वारे निदान एखादी भेट तरी घेता येईल? त्यांच्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून रोजगार तरी मिळवून देता येईल काय? तेही खात्रीशीर? त्यांचा मुलांसाठी एखादी आश्रम शाळा बांधून त्यांना रोजागाराभिमुख शिक्षण देता येईल काय? स्वत:च्या खर्चाने करणं अशक्य किंवा बुद्धीला न पटणारं असेल खरं पण सरकार फुकट्ची अनुदानं घोषित करतंय ना? मग ती मिळवण्याचा तरी निदान कसोशिने प्रयत्न करावा असे मला वाटते?

मी आई म्हणून हाक मारतो तेव्हा प्रेमाची , जिव्हाळ्याची आजही जाणिव होते, ताई म्हणून हाक मारतो तेव्हा कर्तव्याची अन संरक्षणाची जाणिव होते... बायको किंवा प्रेयसी म्हणतो तेव्हा समतोल राखल्या जाणार्‍या आयुष्याची जाणिव होते अन लेकीला , चिऊ म्हणतो तेव्हा पुन्हा एकदा आईपासून बायको पर्यंतचे स्त्रीरूपी ब्रम्ह आठवते.

पियापेटी | 12 March, 2011 -

धन्स नादखुळा.... सगळ्यांच्या पोस्टीतले मुद्दे उत्तम!!!!!!! सर्वानां छान...

ईथे खुप जणांनी स्वतः चे मत मांडले/वाचले.. त्यातले किती जण खरचं आपआपल्या घरी असेच विचार आपल्या आई वडीलां,भाउ-बहीणी बरोबर share करतात..त्यांची मत जाणुन घेतात्,,त्या त्या गोष्टी साठी 'का?' असे विचारतात्,त्यांची किती ऊत्तरे त्यांना मिळतात? माझ्या बद्दल झाले तर आम्ही तिघी बहीणी तिघींची लग्न झालेय. मोठी -नोकरी करते -२ वर्षाचा मुलगा[ती माबो वर नाही] -जुळी -[माबो : प्रिती भुषण] - नोकरी करते: माझ्याच ओफिस मध्ये आहे- २ महीन्याची मुलगी

प्रसंग १: जेव्हा आमचा [जुळ्यांचा]जन्म झाला तेव्हा माझ्या [बाबांची आई]आजीचे बोल : मुलीच झाल्यात ना मग कशाला बघायला जायचे?एक मुलगा असता तर गेले असते...तीच परत माझ्या मोठ्या मावशीला [आई आणी मोठी मावशी -बहीणी जावा] म्हणते तुला त्यातली एक ठेवुन घे..त्याच आजी ला १ मुलगी-आणी ५ मुलगे. मुलगी लहानपणीच आजारपणात दगावली [नो आत्या] १ मुलीची पण तीला नीट काळजी घेता येऊ नये का? परीस्थीची कारणे प्रत्येक वेळेस देउन आपण किती बिचारे -गरीब - कोणीच मदत करत नाही.

प्रसंग २ :बाबांच्या चुलत भावाने त्यांच्या मुलीचा १०वी नंतर बि.कॉमअड्मीशन साठी चा फॉम फाड्ला होता लगेच २ वर्षानी नुसते घर पाहुन-मुलगा दुकानात हेल्पर कामाला, तीचे लग्न पण लावुन दिले..याच माझ्या बहीणीने पुण्यात शाळेत साफाई कामगार म्हणुन नोकरी करुन टीचींचा कोर्स केला आता ती एका चांगल्या शाळेत शिकवतेही...

आमच्या शिक्षणांसाठी माझ्या आई बाबांनी कोणत्याही गोष्टीत कधीच हस्तक्षेत केला नाही. आम्हा १०वी नंतर कोणते ब्रान्च,कोलज,अड्मीशन साठी पुर्ण निर्णय आमच्या वर सोपवला होता..तसे आम्ही शिकलोही उलट शेजारी-ईतर नातेवाईक्,कशाला शिकवायचे?मुलीच तर आहेत दुसर्यांच्या घरी जाणार,त्यांचा पगार मुलीच्या सासर कडच्यांनाच मिळणार.. काय करयाचे आहे ह्याचे त्यांना मला अजुन समजले नाही.. मुलीना नेहमी कोणीतरी सोबत का असयला पाहीजे? ,ओफिस वरुन उशीर झाला तर..अंधार जास्त पड्ल्यावर्..अनोळखी ठिकाणी खरेदी ,interview ,गावाला एकटे जायचे नाही?

स्त्री मुक्ती साठी कल्पना अशा वेगळ्या नाही सगळ्यांसारख्याच ...पण प्रश्न्न भरपुर आहेत....त्याची उत्तरे मी तर अजुन शोधतेच आहे..

मणिकर्णिका | 12 March, 2011 -

सर्वात प्रथम मी स्त्री असल्याचा आणि त्या अनुषंगाने मी जे जे काही आहे त्याचा मला खूप खूप अभिमान आहे. "मी पुरुष असते तर?" असं विशफ़ुल थिंकींग वगैरे करावंसं मला आजतागायत वाटलेलं नाही आणि ना ती वेळ माझ्या घरच्यांनी माझ्यावर येऊन दिली. पण मी स्वत: या ’मी स्त्री आहे-’ आणि पुढे या वाक्याच्या अवतीभोवती गुप्तपणे वावरत असलेल्या ’म्हणून.....’ च्या फ़ंदात न पडता एक ’व्यक्ती’ म्हणून जगायची धडपड करते. माझं ’स्त्री’ असणं हे माझ्या ’व्यक्ती’ म्हणून जगण्याच्या आड येऊ नये आणि ते आड आलंच तर मला ’मी स्त्री आहे’ याचं भांडवल करावं लागू नये यालाच मी ’मुक्त’ असणं म्हणते.
’कशापासून’तरी मुक्त असणं नव्हे तर आपण आपल्यातच मुक्त असणं. ’काय करावं’ किंवा ’काय करु नये’ हे ’स्वत:च्या’ आणि ’स्वत:शी संबंधित गोष्टींबद्दल’ ठरवण्याची मुभा असणं, हे माझं मलाच ठरवता यावं म्हणजेच 'स्वातंत्र्य' आणि तस्मात 'मुक्ती'.
--

मला हव्या त्या गोष्टी करण्याची मुभा मला लहानपणापासूनच होती. कथ्थक, पेंटींग, नाटकं, स्ट्रीट-शोज मी काही करायचं सोडलं नाही पण त्याहीवेळेस अभ्यास करणं ही माझी जबाबदारी आहे हा विचार सुटला नाही. रात्री-अपरात्री तालमींहून, स्पर्धेहून परतताना मी पुरुष कलीग्ज ची सोबत मागितली नाही. मी कराटे ब्लॅकबेल्ट सुद्धा आहे पण स्वसंरक्षण करायची खरीखुरी वेळ आली मला कळलं जेव्हा फ़िजिकल मारामारीची, प्रतिकाराची वेळ येते तेव्हा बाई ही पुरुषापेक्षा कमीच पडते. आणि मग अशा वेळी स्त्रीला कायद्याची म्हणा किंवा स्वसंरक्षणासाठी वेपनची म्हणा-गरज लागतेच लागते. पर्याय नाही. मी माझ्याजवळ एक फ्रेंच नाईफ नेहमी ठेवते. जस्ट इन केस... पण यासाठी स्त्रियांनी रात्री-अपरात्री येणं-जाणं कमी करा म्हणाल तर का म्हणून? केवळ पुरुषांचं टेस्टॉस्टेरॉन त्यांच्या ताब्यात नाही म्हणून? तर सॉरी बॉस. हा पुरुषांचा प्रांत आहे त्यात त्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. स्वत:ला कळून घेऊन स्वत:त बदल करणे यानेच समाज सुधारतो. आणि हे स्त्री-पुरुष दोघांना लागू आहे.
--

स्वातंत्र्य हवं असेल तर जबाबदारी येते.
"मला दारू प्यावीशी वाटते, मी दारु पिते" तर खुशाल प्या पण त्यातल्या परिणामांची जबाबदारी, या कृतीचे दुसरयांवरचे परिणामसुद्धा स्वत: मान्य करा, त्याबद्दल दुसरयाला बोल लावू नका, किंवा त्यातल्या परिणामांना दुसरयाला जबाबदार धरु नका. तुम्हाला वाटतंय म्हणून केलंत ना? मग त्याबद्दल स्वत: जबाबदार रहा. प्रत्येक कृतीतून तेवढ्या जबाबदारीने आपण वागायला तयार असू तर मला नाही वाटत आपल्याला मुक्त असण्यापासुन कोणी रोखू शकतं.

या स्वातंत्र्याने आपण आपलं आयुष्य जाणीवपूर्वक निवडतो तेव्हा मनात आपण अमुक ठमुक गोष्टींच्या प्राप्तीच्या बदल्यात अमुक गोष्टींना मुकणार आहोत याचे आडाखे बांधलेले असतातच. सर्वच्या सर्व गोष्टी आपल्याला मिळाल्या पाहिजेतच असा अटटाहास धरणं हे अपरिपक्वतेचं लक्षण आहे आणि असं होणं शक्य नाही हे आपणही जाणतोच. आणि हे फ़क्त स्त्रीमुक्ती किंवा स्त्री-पुरुष समानता या विषयालाच नाही तर प्रत्येक गोष्टीला लागू आहे. आपल्या कृतीच्या जबाबदारीची समज असली तरी पुरे! पूर्ण विचाराअंती घेतलेल्या निर्णयाच्या यशापयशाचीही जबाबदारी घेता आली पाहिजे. ते खापर दुसरया कोणावर तरी फ़ोडून चालणार नाही किंवा पराभवाच्या वेळे स्त्री असल्याचे भांडवल करणे म्हणजे तद्दन दांभिकपणा असेल.
--

स्त्रीला मुक्ती हवीये? कोणापासून? कशापासून?
आजतर अशी स्थिती आहे की प्रत्येक क्षेत्रात स्त्री आहे, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते आहे, अत्युच्च पदं सांभाळते आहे. मग? तर तिला मुक्ती हवीये ती शतकानुशतके चालत आलेल्या रुढींपासून, तिचे मानसिक खच्चीकरण करणारया परंपरांपासून,सतत होणारया दुजाभावापासून.
वर मांडलेली सर्व मतं अभ्यासपूर्ण आहेत यात शंकाच नाही आणि वरील मतं मांडणारया सर्व मंडळींच्या तुलनेत मी लहान आहे, माझ्या अनुभवांचा आवाका खूपच कमी आहे, व्याप्ती कमी आहे हे मी आधीच मान्य करते. बरयाच लोकांचा कुंकू, बांगड्या, पारंपारिक वेषभूषा याचा त्याग करणं, बॉयकट करणं यावर रोष दिसला. पुन्हा एकदा प्रत्येकाच्या मुक्तीच्या कल्पना वेगळ्या!
वर्षानुवर्षे चालत आलेली एखादी पद्धत म्हणजे स्त्रीने हे असं-असंच घालावं, ल्यावं, असं असंच वागावं वगैरे- आपण,मोडीत काढतो तेव्हा ती परंपरा, पद्धत मुळात का आहे? कशाबद्दल आहे? तिचा अंगिकार करण्यामागे ठाम अशा , स्त्रीला फ़ायद्याची ठरणार्या काही गोष्टी आहेत का? असल्या तर त्यात तथ्य आहे का? हे समजून घेणं गरजेचं आहे. जर एखादीला नाही वाटत तथ्य, खुशाल मोडावी तिने ती पद्धत आणि खंबीर असावं. परंपरा, पद्धत मोडताना आपण ती का मोडतो आहे याचं भान हवं. एखाद्या रुढीला-परंपरेला विरोधासाठी म्हणून विरोध नको,. कुठल्याही कॄतीला ज्ञानाचा पाया हवा तो असा.
--

तरीही काही प्रश्न आहेत ते असे-
नीती-अनीतीच्या कल्पना , नैतिकतेचे निकष पुरुषासाठी एक आणि स्त्रीसाठी वेगळे-का म्हणून लावले जावेत? या प्रश्नात समानतेचा प्रश्न येतो. स्त्रियांबाबतच्या नीती-अनीतीच्या कल्पना-त्यांचा संबंध योनिशुचितेशीच का? तसं नसायला हवं. आणि असलंच तर त्याचे निकष स्त्री-आणि पुरुष यांना समान लागू व्हावेत.

आपल्या मुलीला आई सांगते, "बाई गं घरकाम, स्वयंपाकपाणी शिकून घे, आता हुंदडणं बस्स करा." पण मुलाला मात्र यातलं काहीच सांगत नाही. आपण ’पुरुषप्रधान संस्कृती’, ’पुरुषप्रधान संस्कृती’ अशी ओरड करतो खरी पण स्त्रीला गौण, दुय्यम स्थान कोण बहाल करत असतं? हे एक बाईच बाईला बहाल करत असते. हुंडयाच्या बहुतेक तक्रारीत मुलीची सासूच कल्प्रिट असते. असं का व्हावं मग? स्त्रीमध्ये जन्मजात असलेली संवेदनशीलता कुठे पेंड खाते मग?
---

स्त्रीने काम करणं, जबाबादारीची पदं समर्थपणे सांभाळणं म्हणजे ती अधिक सक्षम, खंबीर, मुक्त असं नव्हे. लग्नाआधी जबाबदारीची पदं सांभाळणारया स्त्रिया स्वखुषीने गृहिणी झालेल्या दिसतात. नवरयाला खायला करुन घालणं, संसार सांभाळणं ही सुद्धा आपल्यातच एक मोठी जबाबदारी आहे. गृहिणी असणं यात कमीपण काहीच नाही फ़क्त...
गृहीणी असणं किंवा नोकरी करणं हा तिचा स्वत:चा चॉइस असला पाहिजे.
अमुक एखादी गोष्ट करावी की करु नये हे तिचं तिला ठरवता आलं पाहिजे.
त्या चौकटीतला सुरक्षितपणा तिला भावत असेल तर त्यापायी अमुक एका प्रकारचे स्वातंत्र्य मिळणार/मिळ्णार नाही याची मनाची पूर्वतयारी आणि ती किंमत मोजायला मी तयार आहे की नाही याचा निर्णय तिचा तिला घेता आला की झालंच. एखादी चौकट केवळ नवरा म्हणतो म्हणून किंवा चारचौघं करतात/ बोलतात म्हणून तिच्यावर जी लादून घेत नाही, अशा स्त्रीला मी ’मुक्त’ म्हणते.
--

अर्थात ज्यांच्या किमान गरजा पूर्ण झाल्यात , पोटाचा प्रश्न सुटलेला आहे तीच माणसं ’मला हे हवं, हे नको’ अशी चूझी राहू शकतात, त्यांना संवेदनशील असण्याचा हक्क मिळतो, पण ज्यांना दोनवेळच्या जेवणाची भ्रांत आहे त्यांनी काय करावं?

माझ्या आईच्या कॅंटीनमधली एक बाई दिवसभर काम करुन रात्री नवरयाचा मार खायची. कालं-निळं पडलेलं मुस्काट घेऊन दुसरया दिवशी कामाला हजर. असं एकदा नाही, दोनदा नाही, दररोज. माझ्या आईने तिच्या नवरयाला समज द्यायचा प्रयत्न केला तेव्हा तिने मांजरीसारखी फ़िस्कारुन ’तुम्ही यात पडू नका बाई’ असं माझ्याच आईला वर सुनावलं होतं. वटसावित्रीचं व्रत वगैरे सुममध्ये करते ती. 'पुरुष बायांना मारतातच' हा तिचा समज आहे. तिच्या आईला-तिला बाप मारायचा, तिच्या आजीला-तिचे आजोबा मारायचे. ही साखळी पार मागपर्यंत गेली होती. आता बोला, स्त्री-मुक्ती प्रत्येक स्तरावर जाऊन पोहोचली आहे हे कोणत्या आधारावर बोलणार? सांगायचा मुद्दा असा की पोटाचे खळगी भरली कीच मुक्ती-समानता असल्या टर्म्स आठवतात.

पण याचा अर्थ त्यांचे हाल उघडया डोळ्यांनी बघत राहावेत असं नाही पण त्यासाठी काहीतरी लिहीत बसण्यापेक्षा (जे त्यांच्यापर्यंत कधी पोहोचत नाही) कृती करणं जास्त फायद्याचं ठरेल.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद संयोजक ऑरगनाइझ केल्या बद्दल :).
एडिट अ‍ॅड करायचं असेल तर काय करता येइल पोस्ट मधे?

अंजली,
खो मधले सगळे मुद्दे पटले.

अंजली, अतिशय योग्य पोस्ट! माझे अमेरिकेतल्या माझ्या २ मैत्रिणींचे अनुभव :

१. नवरा त्याच्या आई-वडिलांना नियमीत काही पैसे पाठवतो. ह्या माझ्या मैत्रिणीच्या पहिल्या बाळंतपणाला तिचे आई-वडिल आले ते स्वतःची तिकीटे स्वतः काढून, का तर ही स्वतः कमवत नाही! आणि काही कारणाने तिच्या वडीलांना त्यांचे ticket prepone करून देशात लवकर परतावे लागले. ते मैत्रिणीने $७० भरून prepone केले, तर her सासू made sure that her father is returning that money back. माझा मुलगा एकटा कमावतोय, त्याच्यावर फार भार येतो, हे कारण! मजा म्हणजे, सासू-सासरे स्वतःचं पहिलं नातवंडं बघायला म्हणून तिच्या delivery च्या वेळी ४-५ महिने आलेलेच होते, पण तरीही मैत्रिणीच्या आई-वडिलांनी यायचच, कारण पहिलं बाळंतपण हे मुलीच्या आई-वडिलांनी करायचं असतं...
तू काही कमवत नाहीस (मैत्रिणी h4 visa वर आहे त्यामुळे काम करू शकत नाहीये), माझा मुलगा एकटाच एवढे कष्ट करतोय, हे सासू तिला ऐकवत असते....हे सारं ही माझी मैत्रिण ऐकून घेते...
कुठे आहे स्त्री-मुक्ती??

२. दुसर्‍या ऊदाहरणात - माझी दुसरी एक मैत्रिण, सिंधी आहे...ती तर नोकरी करते, स्वतः पैसे कमवते. एका summer मध्ये तिचे सासू-सासरे US फिरायला आले. पुढल्या summer ला मी सहज विचारलं, यंदा तुझे आई-वडील येणार आहेत का? तर सरळ म्हणाली, "उनके लिये ये (म्हणजे तिचा नवरा) थोडीही ना पैसे देंगे? और आनेकी कुछ वजह भी तो नही हैं!"
वजह म्हणजे हिचं बाळंतपण्...म्हणजे हिच्या आई-वडिलांनी फक्त हिचं बाळंतपण करायला यायचं, नी नवरा ठरवणार त्यांची tickets काढावी की नाही ते! हिचा ह्या प्रकारावर काही आक्षेप नाही.....काय उपयोग आहे स्वतः कमवून? कुठे आहे स्त्री-मुक्ती???

मला खो दिल्याबद्दल दिपांजलीचे आभार.
स्त्री जेव्हा "स्त्रीत्व" बाजुला ठेवुन स्वतःच्या जबाबदारीवर अभी राहिल आणि तिला जेव्हा स्वताच्या सामर्थ्याची जाणिव होइल, तीच खर्‍याअर्थाने स्त्रीमुक्ती असं मला वाटत.

...................................................................

मला लिहिता येत नाही. वैचारिक तर मुळीच नाही. त्यामुळ ही एका सबल स्त्रीची "गोष्ट" वाचा. Happy

स्त्रीमुक्ती

गिरकी घेता घेता तिने एक क्षणभर स्वतःला आरशात निरखले. कपाळावरचे केस मागे सारले. कानातल्या डुलना एकदा जोरात हलविले. फ्रॉक उगाचच नीटनेटका केला.
"आई मी कशी दिसते?" तिने कदाचीत चौथ्यांदातरी विचारल. तिच्या आईबाबांचा तिला बघुन अभिमान ओसंडुन वहात होता.
बाबांचे ते उंच मित्र आजही आले होते. म्हणजे ते तसे नेहमीच येतात चॉकोलेट घेवुन. आज त्यांच्या हातात तिला काहीतरी रंगिबेरंगी कागदात गुंडाळलेल दिसल. उंच उंच उड्या मारीत मग ती आतल्या खोलीत त्यांच्याबरोबर गेलीच. आई बाबांचा ,टिव्हीचा आवाज आता अगदीच विरत गेला होता.
काकांनी आणलेल प्रेझेंट घेण्यासाठी तिने घाईने हात पुढ केला. त्यांनी तो घट्ट पकडला आणि.........

तिला आता कधीच मोठ व्हायच नव्हत.
पण ते इतर अनेक गोष्टींप्रमाने तिच्या हातात नव्हतचं.

"आपल्यालाच का?" याच उत्तर बरेच दिवसानी तिला मिळाल. मुलगी असण्याची खंत वाटली तिला.सात्वीक संतापाने मन भरुन गेल. पण तरीही पुढे चालत रहाण्याचा मनाचा अगदी निग्रह झाला. स्त्रीत्वाची ती ही एक देणंच आहे नाही का?

स्वताच्यातले गुण तिला आता अधिक ठळकपणे नजरेस येवू लागले.स्त्रीच शरिर फक्त वेगळं.
किंबहुना ,व्यवहारी पण भावनांची झालर असणारी , भविष्यकाळाला उमेदीने सामोरी जाणारी पण भुतकाळाच्या पाउलखुणा जपणारी , "आई" पणाचा जगावेगळा सिक्थ सेन्स असणारी , आतला आवाज समजणारी, जिद्दी, राखेतुन नंदनवन फुलवणारी अशी स्त्रीच्या रुपाची नवी ओळख तिला झाली .
स्वतःच्या नकळतच तिने खर्‍या अर्थाने दुबळ्या स्त्रीत्वापासून फारकत घेतली.
स्त्रीत्वाने तिला तिच्या सामर्थ्याची जाणीव करुन दिली होती.

जगात तिने आज स्वतःच मानाच स्थान निर्माण केल होत. एक स्त्री म्हणुन नव्हे तर एक व्यक्ती म्हणुन सार जग आज तिला नावाजत होत.
गिरक्या घेणार तिच मन आता थोड विसावल होत. तिच्यासारखेच अंगार झेलणार्‍या मुलींसाठी तीने आज सुरेख शाळा उभी केली होती.
तिन हात पुढ केला होता आणि तिला खात्री होती, "बंधन" तोडणारी अशीच साखळी क्षितीजापर्यंत बनत जाईल.
आज ती खर्‍या अर्थाने मुक्त झाली होती.

.............................

पराग ,मृण्मयी / पेशवा , साशल तुम्ही लिहिणार का पुढे?.

रैना,
तरी मी पोस्ट मधे मी पाहिलेले चीड आणणारे अनुभव, संवाद लिहिले नाहीयेत पोस्ट मोठी झाल्याने !
विचार केला तरी चिडचिड होते !

दीपांजली, आधीच्या खो च्या धाग्यावर तुझं पोस्ट आवडल्याची प्रतिक्रिया दिली आहे, पण अजून वाचायला आवडेल.

रायगड, अशी उदाहरणे मीही बघत असते आजूबाजूला.

सीमा, गोष्ट अस्वस्थ करणारी.

बायाना कोनत्याही गोष्टीत 'खो घालायची' सवय असतेच, मंग आनी ह्यो नवीन खेळ कशाला? ( ही पोस्टदेखील 'खो घालण्याचा' प्रयत्न आहे, असे बायाना वाटु शकेल.) दारुचा हँग ओवर दुसर्‍या दिवशी उतरतो. महिला दिनाचा कवा उतरणार?

जागोमोहनप्यारे, तुम्ही इथे लिहिल्यानुसार तुम्हाला अंजलीने 'खो' दिलेला आहे, तेव्हा तुमचे विचार मांडावेत ही विनंती, जेणेकरून धागा पुढे जाईल. ह्या 'खो' मधे तुम्हाला सहभागी व्हायचे नसल्यास कृपया तसे लिहा, म्हणजे संयोजक दुसर्‍या आयडीला खो देण्याची व्यवस्था करतील.

सीमा, खोबद्दल धन्यवाद!

उद्यापर्यंत लिहिण्याचा प्रयत्न करते. शक्य होईलच असं सांगू शकत नाही. तोवर (अद्याप लिहिलं नसल्यास) 'फचिन' आणि 'प्राची' यांनी लिहावं अशी विनंती.

सर्वच पोस्ट्स विचार करायला लावणार्‍या आणि बोलक्या आहेत. शैलजा म्हणते तसं अधिक काही भाष्याची आवश्यकताच नाही.

जामोप्या ह्यांना खो दिल्यानंतर, त्यांनी पुढे खो न दिल्याने खोची साखळी तुटली आहे, तेह्वा निंबूडा आणि पन्ना दोघींना लिहायची विनंती. Happy

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.
डिजे, रायगड तुम्ही म्हणता तसं हे अनुभव अतिशय चीड आणणारे असतात. पण त्या बरोबरच मला असहायता जाणवते. 'या प्रॉब्लेमवर आपण काही करू शकत नाही' ही भावनाच चीडचीड करायला लावणारी आहे. सहजासहजी दुर्लक्ष करू शकत नाही.

निंबुडा आणि मोदक लिहु शकतील का ?

जिथे दोन्ही नवरा बायको माबोकर आहेत त्यांची मतं वाचायला आवडेल.

सीमा, मला खो दिल्याबद्दल धन्यवाद .. अजून valid आहे का? (खो चे एकदम बरेच धागे झाल्यामुळे फॉलो करणं कठिण जातंय ..) मी PST उद्या रात्रीपर्यंत लिहीलं तर चालेल का?

अजूनही लख्खपणे आठवतो तो प्रसंग!! आईबरोबर नात्यातलं नुकतंच जन्मलेलं बाळ बघायला सुतिकागृहात गेले होते. माझ्या आठवणीतलं इतकं तान्हं बाळ बघण्याचा तो पहीलाच प्रसंग! त्यामुळे बराच उत्साह होता. खोलीत गेल्यावर बघते तर लक्षात राहण्यासारखं दृष्य! पलंगावर डोक्याला फडकं गुंडाळून बसलेली बाळाची आई हमसाहमशी रडतेय, बाळाला कुशीत घेऊन आजी अश्रू ढाळतेय, बाळाचे बाबा आणि आजोबा सुतकी चेहेरे करून पलंगाशी उभे. माझ्या आईला बघताक्षणी हुंदक्यांची संख्या आणि आवाज वाढून, "बघ नं मामी, दुसरी पण मुलगीच झालीऽ" हे कानी पडलं. आणि डोक्यात काही क्षण खळबळ उडाली. 'मी पण माझ्या आईवडीलांची दुसरी मुलगी. माझ्या जन्मानंतर पण अशीच रडारडी झाली असणार का?त्यात येवढं रडण्यासारखं नेमकं काय झालं?' असे बरेच प्रश्न कित्त्येक दिवस डोक्यात होते. त्यानंतरचं त्या खोलीतलं बाकी काही नीटसं आठवत नाही, पण हा प्रसंग कायमचा डोक्यत शिरून अगदी घट्ट बसला.

'रडण्यासारखं नेमकं काय झालं?' डोक्यात टोचे देणार्‍या या एका प्रश्नानं स्त्री मुक्ती म्हणजे काय, ती असणं नसणं म्हणजे काय, या आणि यासारख्या अनेक विचारांची बिजं रोवल्या गेल्याचं जाणवलं. एका मराठी मध्यमवर्गीय समाजात वाढताना सर्वसाधारणपणे जे काय दिसतं, जाणवतं, बोचतं तितपत सगळं अनुभवलं. बायकोच्या, भांडी-धुणी करून कमावलेल्या कष्टाच्या पैशाची दारू पिऊन, नशेत तिलाच बडवून काढणारा हीरालाल बघितला आणि अशाच प्रसंगात आधी मार खाऊन, नंतर डोळे पुसून त्याच काठीनं, ढोसून आडव्या झालेल्या नवर्‍याला काळंनिळं करणारी जनाबाई पण बघितली. नवरा बघायला जाण्याची परवानगी देत नाही म्हणून, स्वत: लिहिलेल्या नाटकांचे प्रयोग रंगमंचावर सुरू असताना, घरी डोळ्यांतून टिपं गाळंत लसूण सोलत बसलेली स्त्री बघितली, तशीच नवर्‍याला दुसर्‍या बाईबरोबर रंगेहाथ पकडल्यावर सव्वा वर्षाच्या मुलाला घेऊन घराबाहेर पडणारी आणि एकट्यानं निभावून नेणारी कणखर सुमामावशी बघितली. 'मुलीच्या जातीला..' या शब्दांपासून सुरू होणारी विधानं ऐकली आणि 'कोण मुलगा तुला घाणेरडं बोलला? एक लाथ हाणून ये त्याच्या XXवर' असं सांगणारा पितापण अनुभवला. एकूणच वाढताना 'स्त्री मुक्ती'च्या अत्यंत व्यापक विषयाबद्दल मेंदूत विचारांचा नुस्ता गुंता करून टाकणार्‍या परिस्थितीशिवाय काही वेगळं दिसलं नाही.

पुढे पुढे बुरख्याआडच्या बायका बघितल्या, पण असे बाप्ये न दिसल्याचं आश्चर्य वाटलं नाही. भडक रंगीबेरंगी कपड्यातल्या, तोंडाला रंगरंगोटी करून संध्याकाळी रस्त्याच्या कडेला उभ्या बायका बघून आणखी एक अंतःर्मुख करणारी जाणिव झाली. प्रश्न गरगरतच होते. उत्तरं मिळाली नाहीत, किंवा प्रामाणिकपणे सांगायचं तर मिळवण्याचा प्रयत्नच झाला नाही. पण व्यक्तीला स्त्री म्हणून काहीतरी वेगळ्या, भयानक आणि कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागतंय, तिच्यात काही वेळा अशा परिस्थितीला तोंड द्यायची शक्ती, इच्छा आणि याहून काही वेगळं चांगलं आयुष्यात मिळू शकतं याची कल्पनाही नाही हे प्रकर्षानं जाणवलं.

स्त्रीला जन्माला येऊ द्यायचं की नाही हे ठरवणारा समाज, या जगात आलीच तर तिच्या आयुष्याचा क्षणन् क्षण आखून देणारा समाज आणि आखीव प्लॅनापासून दूर जायचा प्रयत्न करणार्‍या स्त्रीला कडक सजा देणारा समाज हळूहळू कळायला लागला. आणि शेवटी समाज समाज म्हणजे काय? आपण स्वतः देखिल त्याचाच घटक आहोत आणि आहे ते बोचतंय याची हाकबोंब न मारता, बोचतंय ते बदलायला मदत न करता नुस्तीच तोंड पाटिलकी करणार्‍या फोलपणाची फार जास्त जाणीव व्हायला लागली.

स्त्रीभृण म्हणून आईच्या उदरातच खुडल्या जाण्यापासून तर स्त्रीला समागमातला आनंद मिळता कामा नये असं ठरवून जेनायटल म्युटीलेशनच्या अघोरी प्रकाराने तिला छळणार्‍या आणि हे करताना कुठलाही खेद खंत नसणार्‍या अमानुष जनसमुदायाबद्दल ऐकलं. ही आणि अशी शारिरीक, मानसिक, भावनिक, सामाजिक बंधनं आहेत, याच महाभयंकर जाचातून सुटका होण्याची तिला नितांत गरज आहे हे आता जास्तच स्पष्टपणे जाणवायला लागलं. 'माणूस म्हणून जगता येतं' ही केवळ भावनाच येण्यासाठी सुध्दा तिला आधी या पाशांतून मुक्त होण्याची संधी मिळणं गरजेचं आहे असं वाटायला लागलं. स्त्री मुक्तीचे इतके पैलू, इतके कंगोरे आणि चेहरे आहेत, की मला तरी 'स्त्रीमुक्ती म्हणजे नेमकं काय' या प्रश्नाचा आवाका इथे चार ओळीत मांडता न येण्यासारखा वाटतो.

स्त्रीच्या आयुष्याचं, तिच्या अस्त्तित्त्वाचं दृष्य थोडंफार बदललं असलं, तरी इथे 'पेला अर्धा भरलाय' म्हणून समाधान मानता येत नाही. खूप काही व्हायचं आहे. एकूणच वैश्विक समाजाची मानसिकता बदलण्याची, या दिशेनं सुसंस्कार घडवलेली पिढी तयार होण्याची नितांत गरज आहे. याला खूप खूप वेळ लागणार आहे हे कळतंय. मी माझ्या मुलापासून सुरुवात करतेय.

मृ, मुलगी झाली म्हणून शिकलेली(?) लोकं सुद्धा रडतात? किव आली त्या लोकांची Sad

मी एकटीच मुलगी पण माझे बाबा इतके आनंदले की सर्वांना मिठाई वाटत होते. ते म्हणाले की आता आणखी कोण नको कारण पुढे आणखी दुसरे बाळाचा विचार केला तर आईला धोक्याचे होते.
पण मिठाई घेताना बाकीच्या लोकांची (जी स्वतःला खूप उच्च, श्रींमत व शिकलेली गटातली समजत होती) तोंडं बघण्यासारखी होती, ह्या माणसाला इतके काय ते अप्रूप मुलगी झाल्यावर? काळ काही जुना न्हवता हो ८०-८२ च्या आसपास.

त्यावेळी माझ्या आईच्या बाजूच्या रूममध्ये असलेली बाईला तिसरी मुलगी झाली म्हणून ती उदास कारण सासूने धमकी दिलेली की मुलगी झाली तर घेणार नाही घरी परत. सासूला पहिल्या दोन मुलीच होत्या तरीही. तेव्हा बर्‍याच वेळा बाई हिच एका बाईची दुष्मन असते असेच आढळलेय. हे जेव्हा बंद होइल तेव्हा स्त्रीशक्ती वाढेल. स्त्रीया एक होवून अश्या व इतर गोष्टींना घाबरण्याचे बंद करतील तीच स्त्रीमुक्ती.

या आणि इतर धाग्यावरचे सर्वांचे विचार वाचले. सगळ्यांनीच खूप छान लिहिले आहे. बहुतेक सर्व पॉईंट कव्हर केले आहेत. तरीही खो मागून घेतलाय तेव्हा हे थोडेसे माझ्या मनातले

हे काही प्रसंग ज्यांनी मला प्रत्यक्षात जाणीव करून दिली की सामाजात / कुटुंबात स्त्रीचे स्थान कसे दुय्यम आहे आणि मला मिळालेले हे काही धडे

मी १लीत असताना घडलेली एक मजेशीर घटना आठवली. आम्हाला शाळेत काहीतरी फॉर्म भराय्चे होते आणि त्यावर पुर्ण नाव लिहायचे होते. माझ्या मैत्रिणीच्या वडीलांचे नाव 'बाळासाहेब' असे होते. तिला ते नाव लिहायची लाज वाटत होती. तिने मला विचारले की माझ्या वडीलांचे नाव 'बाळासाहेब' असे आहे , ते कसे काय लिहु ? मलाही वाटले , ई काय नाव आहे , हे कसे लिहायचे. मग मी तिला विचारले तुझ्या आईचे नाव काय आहे ? ती म्हणाली 'वैजयंती' . मी म्हटले , हे पण जरा काहीतरीच आहे, पण 'बाळासाहेब' पेक्षा खुप बरेय. मग तु वडीलांच्या एवेजी आईचेच नाव लिही. तिलाही ते पटले. आणि तिने मधल्या नावाच्या रकान्यात आईचे नाव टाकले.नन्तर बाईंनी जेव्हा ते बघितले , तेव्हा तिला बोलावुन घेउन त्यानी तिच्या वडीलांचे नाव तिथे लिहिले.
अता आठवुन खरेच मजा वाटते, वडीलांचेच फक्त नाव का लिहायचे , आईचे का चालणार नाही हे तेव्हा खरेच कळत नव्हते. आई - वडील सारखेच वाटायचे. त्यामुळे वडीलांचे नसेल लिहायचे तर आईचे लिही असा सल्ला अगदी सहजपणे मी तेव्हा असलेल्या तर्क बुद्धीनुसार तिला दिला होता. आणि मला त्यात काहीही चुकीचे वाटत नव्हते.

१. देवस्वरूप आई ई. आईच्या नावाने कीतीही उदोउदो चालला असला, एखाद्याने बापाला जन्मात पाहिले नसले तरी मुलांच्या सामाजिक आयुष्यात आईला नावापुरते सुद्धा स्थान नाही.

माझ्या एका अत्त्याला 'तांबी' बसवल्यामुळे बराच त्रास झाला होता. अगदी जीवावरच बेतायची वेळ आली होती. तेव्हा साधारण मी कॉलेज मधे होते. आणि नुकताच एका मासिकात स्त्री गर्भनिरोधके आणि त्याचे स्त्रियांवर होणारे संभाव्य दुष्परीणाम यावर मोठा लेख वाचला होता. त्याच वेळी पुरुष गर्भ निरोधके वापरावयास कीती सोप्पी आहेत आणि कोणतेही वाईट परीणामही नाहीत हेही दाखवून दिले होते. तसेच स्त्रियांच्या कुटुंब नियोजनाच्या ऑपरेशान पेक्षा पुरुषांचे ऑपरेशन किती सहज सोप्पे आहे हे देखिल. हे सर्व ज्ञान घेऊन मी अगदी हिरहीरीने अत्त्या आणि ई. घरातील बायकांना ही जबाबदारी तुमच्या नवर्‍यावर सोपवा हे सांगायला गेले. तेव्हा 'पुरुष' हे असले काही करणार नाहीत अशा प्रकारचे उत्तर मला लगेच मिळाले.
आजही जेव्हा मी माझ्या वयाच्या अतिशय सुखवस्तू आणि आधुनिक मै.ना गोळ्या घेताना किन्वा ऑपरेशन करून घेताना पहाते , तेव्हा मला सखेद आश्चर्य वाटते.

२. कुटुम्ब वाढविण्याची जवाबदारी स्त्रीकडे आहेच , त्या शारीरीक त्रासातून ती आनंदाने जात असतेच. पण कुटुम्ब नियोजनाची जवाबदारी पुरुष आजही सहज शक्य असूनही फारच कमी प्रमाणात उचलताना दिसतात.

माझ्या आईची चुलतबहीण. लहानपणापासून आजारी. तरी डॉ. च्या सल्ल्याविरुद्ध २०व्या वर्षीच लग्न आणि २१ ला मूल होऊ दिले. बाळंतपण तिच्या कमजोर शरीराला झेपले नाही. मुल झाल्यावर गंभीर आजारी होती आणि ६ महिन्यातच गेली. अजुनही तिचे लग्न लवकर करून आपण चूक केली हे तिच्या आईलासुद्धा मान्य नाही. 'मुलीचे लग्न वेळेतच झाले पाहिजे , तिने कुठे काही केले तर' हे त्या सुशिक्षित , नोकरी करणार्‍या आईचे मत. नवर्‍याला तिचा आजार लग्नाआधीपासून माहित होता. मूल होऊ देणे धोक्याचे आहे याची पुर्ण कल्पना लग्नाची बोलणी करतानाच दिली होती. तेव्हा ते मान्य करूनही लग्नानंतर त्याच्या आईने मुलासाठी मागे लागण्यात आणि त्याने 'मूल' होऊ देण्यात काही चूक केलीये असे त्यांना वाटत नाही. ती गेली तरी तिला 'मुलगा' झाला आणि ४ च महिन्यात त्याचे २ रे लग्नसुद्धा झाले त्यामुळे सर्वच आनंदी आहेत.

३. शारिरीक, मानसिक , आर्थिक क्षमता असो वा नसो मुलीच्या जातीला लग्न आणि मूल या अटळ गोष्टी आहेत. बाईच्या जीवापेक्षा मूल होणे महत्वाचे ही केवळ सिनेमात घडत नसून समाजातच घडते.

मृण, मस्त पोस्ट. Happy

डेलिया,
>> आई - वडील सारखेच वाटायचे. त्यामुळे वडीलांचे नसेल लिहायचे तर आईचे लिही असा सल्ला अगदी सहजपणे मी तेव्हा असलेल्या तर्क बुद्धीनुसार तिला दिला होता. आणि मला त्यात काहीही चुकीचे वाटत नव्हते.
Happy

Pages