निसर्गाच्या गप्पा - २

Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21

निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया.... Happy

आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी, या उन्हात पिंपळाला चेव येतो. कडक उन्हाळ्यात हि कोवळी पालवी आणि सळसळ, नजरेला सुखावते.
आता रोजच तिथे थांबणार ना ?

मामी मी ऑफिसला येते त्या परीसरात पण ही पिंपळाची झाड अशीच गुलाबी गुलाबी झाली आहेत. तसेच कॉलनी तर पितमोहराने पिवळी झाली आहे. इलायची लाल चिंचा झाडावर टुक टुक करत आहेत. ह्या सगळ्यांचा फोटो घेता येत नाही म्हणुन माझी खुप चलबिचल होतेय.

ही लिंक काही झाडांची.
http://www.maayboli.com/node/24920

मी नेहमी आठवण काढतो, त्या नापणे धबधब्याचे फोटो देतोय. हा धबधबा बारमाही आहे. हे फोटो एप्रिल मधे काढले होते. पावसाळ्यात याला नक्कीच जास्त पाणी असणार.

कोल्हापूरहून गगनबावडा वैभववाडी तरळे मार्गाने कोकणात जाताना, वैभववाडीचे रेल्वे फाटक लागते, तिथून जवळच हा धबधबा आहे. शेवटपर्यंत गाडीरस्ता आहे. त्य फाटकाजवळ उतरल्यास रिक्षा मिळू शकते, तिथे रहायची आणि जेवायची व्यवस्था होऊ शकते. कुठेही चढण वगैरे नाही.

वरुन हा धबधबा असा दिसतो.. पावसाळ्यात त्या मधल्या भागातून पाणी वहात असेल.

एक छोटिशी उतरण उतरल्यावर आपण त्या धबधब्याच्या अगदी समोर येतो.

एप्रिलमधे त्या धबधब्याच्या जवळही जाता येते.

कुणी त्या भागात जाणार असेल तर अवश्य भेट द्या.

दिनेशदा,धबधब्याचे फोटो फारच छान आले आहेत. पण मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती ही; की तुम्ही आत्ता जरी भारताबाहेर रहात असलात तरी तुमची पाळं-मुळं इथल्या मातीतच घट्ट रुजलेली आहेत.कारण इथल्या लोकांचेही लक्ष गेले नसेल (९०% लोकांचे जातच नसेल) अशा गोष्टी तुम्ही सहज फोटोंच्या माध्यमाने,लिखाणाच्या माध्यमाने दाखवून जाता.किंवा राणीच्या बागेत कुठे वळल्यावर कितवे झाड कोणते आहे हे तुम्हाला माहित आहे.(तुमच्या ध्यानी-मनी-स्वप्नी ही झाडे येत असावीत कदाचित!) (मला इथे स्मित हास्य करणारी स्माइली टाकायची आहे, पण कशी टाकायची ते माहित नाही.)ती तुमची रुजवण मनाला जास्त भावते.

हो हो बरोबर,निसर्गाच्या गप्पांमधेच मी ते कुठेतरी वाचले होते -'झाडबाबा'.तुम्ही (डॉ) म्हटल्यावर ते आठवले.

शांकली आपली माणसं ती आपली माणसं. अगदी लहानपणापासून रोज आईच्या हातचे जेवत आलोय, तरी तिच्या हातच्या वरणभाताची गोडी कळते ते तिच्यापासून दूर गेल्यावरच.
हि झाडे, हा निसर्ग माझ्या मनात घट्ट रुजला आहे. प्रत्येक बहरात त्यांना बघू बघू असे वाटते. मग जिप्स्याकडून ती मनोकामना पूर्ण करुन घेतो.
भारताबाहेर निसर्ग नाही, तो जपला जात नाही असे अजिबात नाही, पण आपले ते आपलेच.
डॉक्टरांच्या बरोबर नेरुळ फिरावेसे वाटते, जागू च्या उरणला जावेसे वाटते आणि मामी बरोबर त्या पिंपळाखाली गप्पा माराव्याश्या वाटतात.
हजारो ख्वाइशे ऐसी...

शांकली आपली माणसं ती आपली माणसं. अगदी लहानपणापासून रोज आईच्या हातचे जेवत आलोय, तरी तिच्या हातच्या वरणभाताची गोडी कळते ते तिच्यापासून दूर गेल्यावरच.>>>>> अगदी, अगदी Sad

डॉक्टरांच्या बरोबर नेरुळ फिरावेसे वाटते, जागू च्या उरणला जावेसे वाटते आणि मामी बरोबर त्या पिंपळाखाली गप्पा माराव्याश्या वाटतात.>>>>>:"मला पण न्या" असा हट्ट करणारा बाहुला: Happy

घरचा मोगरा बहरायला लागला :-). भरपूर कळ्या आल्यात Happy

जिप्सी,दिनेशदा......... एक निसर्ग गटग नव्या मुंबईत करु या.

पारसिक हिल्,टीएसचाणक्य जवळील ग्रीन झोन्, नेरुळ टेकडी..,खारघर, खारघर जवळील फणसवाडी उर्फ वाघाचे मंदिर्,हेदोरावाडी,चाफेवाडी हे सर्व फिरायला २/३ दिवसही अपुरे पडतील. शिवाय आमच्या घरी सगळी जणं मासे प्रेमी आहेत... Happy

एक बेत करु याच. Happy

जिप्सी,दिनेशदा......... एक निसर्ग गटग नव्या मुंबईत करु या.>>>>>चलेगा Happy मी तय्यार :-), दिनेशदा, पुन्हा कधी येताय भारतभेटीला?

अरे लवकरच करा. मासे कम निसर्ग गटग.
दिनेशदा तुम्ही आता परत याल तेंव्हा चांगली सुट्टी काढून या. एक दिवस नवी मुंबई आणि १ दिवस उरण. उरणला पण एक दिवस नाही पुरणार. भरपुर जागा आहेत ज्या निसर्गाने समृद्ध आहेत.
आमचा उरणचा बिच, साधनाने पाहीला आहे.

द्रोणागिरी डोंगर. ह्या डोंगराची अख्यायीका आहे. हनुमान जेंव्हा संजिवनीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून नेत होता तेंव्हा त्यातील एक तुकडा खाली पडला तोच हा द्रोणागिरी. त्यावर औषधी वनस्पती आहेत. लहानपणी ह्या डोंगरावर नेहमी जायचे. तेथे एक हौद पण आहे. ह्याच डोंगराच्या एका भागाला देवीचे देऊळ आहे. तिथुन सुंदर सागरी किनारा दिसतो.

मोरा बंदर, बोटीने १५ मिनीटांत एलिफंटा

विमला तलाव आहे.

शिवाय राहण्याच्या सोयीसाठी आता निसर्गमय रेसॉर्टही आहेत.

आमचे जे.एन्.पी.टी. बंदरही पुर्णत: हिरवे आहे.

जागू, मी यायच्या आधी पण एक गटग करा की.
साधना, मी वाट बघत होतो, कधी परत येतेस त्याची.
आपण कावळेसादच्या कड्यावर फूटभर लांबीच्या तूर्‍यावर पांढरी फूले बघितली होती. पंकजने त्याचे बरेच फोटो काढले होते. त्यातला एखादा फोटो आहे का ? ती सफेद मुसळी होती, असे वाटतेय मला.

सफेद मुसळी म्हणजे तीच ती "शक्तीवर्धक" औषधात वापरतात ती. ती दुकानात अर्थातच महाग मिळते, पण तिकडे तर मुबलक होती.

शिवाय तिथे आता अंजन फूलला असेल ना, त्याचे फोटो काढले का ? जिप्स्यानी काढलेले फोटो दुसर्‍या एका झाडाच्या फूलांचे होते असे पण वाटतेय मला. दोन फोटोंची तूलना करायची होती.

फूलाशिवाय ओळखता येणे कठीण आहे. (झाडावरच आहेत म्हणजे खाण्याजोग्या नसाव्यात ) पाने वाकेरीसारखी दिसताहेत पण वाकेरीला खुप काटे असतात.

माझ्या बागेत सध्या पेरू, नारळ आणि पपया आहेत. पपया तर फारच मस्त आहेत. लांबोळक्या आणि मोठ्या. नारळ आहेत पण सध्या पडत नाहीयेत.
गच्चीच्या एका कॅनॉपीवरच्या सिमेंटच्या आयताकृती कुंडीत निळ्या फुलांची रोपे आहेत. सध्या भरपूर फुलं आहेत. तिथे एक बुलबुलांची जोडी रोज यायची, मला कळत नव्हतं की हे इथे काय करतात. म्हणून एके दिवशी लक्ष ठेवलं तर ...दोघे येतात. आणि या रोपांच्या काड्या चोचीत धरून अगदी व्यवस्थित पिर्गाळून घेऊन जातात. ही निळ्या फुलांची रोपटी अगदी रानटी दिसतात. त्यांचे स्टेम अगदी कडक आहे. हे बुलबुल बहुतेक अंगणातल्या कडुलिंबावर घरटं करताहेत.
कडुलिंबावर सध्या कोकिळ आहेत. सकाळी मस्त कुहू कुहू चालते. आणि चांगला पोसलेला भारद्वाजही दिसतो या कडुलिंबावर. बाकी चिमण्या कावळे आणि काळी पाखरंही दिसतात. यांच्यासाठी गच्चीच्या कठड्यावर एक मडकं ठेवलं आहे पाण्याने भरून, पण उष्णतेने त्यातलं पाणी बाष्पीभवन होऊनच लवकर संपते.
खालच्या बागेत एका वाफ्यात फ्लाइंग स्पॅरो आहेत. मध्यंतरी खूप वाढल्याने सगळंच कट केलं होतं आता परत पानं धरली आहेत आणि मस्त फुलं ...की शेंगा म्हणायच्या ...आली आहेत. आता बघता बघता वाफा भरून जाईल. पूर्ण हिरवा गार वाफा आणि त्यात डोकावणार्‍या लाल चुटुक स्पॅरोज!
आणि साधना, खतकाम व्यवस्थित चालू आहे.

वरच्या पोष्टी वाचून एक आठवलं सध्या आमच्या अंगणात पक्षी विलायती चिंचा टाकताहेत. जवळच कुठेतरी झाड असणारे. बाकी बदाम तर नेहेमीच अगणित पडलेले असतात. पण बदामाचं फक्त वरचा लाल गर खाल्लेला असतो आतलं बदामबी तसंच असतं.
आमच्या अंगणातल्या कडुलिंबामुळे खूप पक्षी येऊन जाऊन असतात.

मी आले की... येताना खुप फोटोही आणलेत पण घरचे युएस्बी बिघडलेय त्यामुळे अपलोड करता येत नाहियेत Sad

मोबाईलवरुन मी तिथेही इथला माग ठेवत होते पण देवनागरी फाँट नसल्याने लिहिता येत नव्हते. Sad

योग्याचा अंजन मला तरी खुप वेगळा वाटतोय्.आंबोलीतल्या अंजनाचा बहर आता ओसरलाय आणि त्याची जागा फळांनी घेतलीय. पण तिथल्या अंजनाची फुले झाडावर शोधावी लागतात. ती अगदी मॉस चिकटतो झाडाला तशी चिकटलेली असतात. अशी वेगळी फोटो ६,८ मध्ये दिसताहेत तशी अजिबात नसतातच.

वानगीदाखल हे पहा.. फोटो पिकासावरुन टाकता येत नाहीयेत त्यामुळे आकार लहान आहे, नंतर मुळ फोटो टाकते

anjan.jpg

यात गळुन गेलेला बहर दिसतोय आणि नुकतीच धरू लागलेली फळे दिसताहेत. पण फुले फांदीच्या किती जवळ आहेत आणि त्यांचा देठही किती जाड आहे. मुंबईच्या अंजनामध्ये थोडी वेगळी रचना वाटतेय. त्याची पानेही वेगळी वाटतात. आंबोलीच्या अंजनाची पाने लहान आहेत, फायकसच्या पानासारखी दिसतात. मला फायकसची पाने फुटण्याची पद्धत ओळखीची आहे त्यामुळे हे झाड फायकस नाही हे मी ओळखू शकते. नाहीतर झाडावर फुले नसताना मी अंजनाला खुशाल फायकस म्हणेन.

तिथले स्थानिक लोक अंजन म्हटले की तोंडाकडे पाहतात. आंजनी म्हटले की त्यांच्या डोक्यात प्रकाश पडतो.. Happy आणि तिथे त्यातला ' ज' जहाजातला आहे, इथल्या अंजनासारखा 'ज' जगातला नाही Happy

मी काकाला माबोवरचे अंजनप्रतिसाद वाचुन दाखवले. इथल्या लोकांनी झाडे हवीत म्हटल्यावर तो हसायला लागला, मुंबईच्या लोकांना काय आवडेल सांगता येत नाही म्हणत. दुस-याच दिवशी मी अंगणातले दोन अंजन उपटुन फेकले. ही जंगली झाडे कोण ठेवेल आपल्या अंगणात??? Proud

दुसरी महत्वाची गोष्ट ही की मी फ्लॉवरॉफैंडिआवरचा सोनघंटेचा फोटो गावात दाखवल्यावर ब-याच जणांनी हे फुल पाहिल्याचे ओळखले. गावातल्या घराशेजारच्या एकाने तर त्याच्या अंगणातले झाडही दाखवले. दु:ख याचे की याला ४ दिवसांपुर्वी फुले आलेली. Sad पण मी गावात असुनही घरी गेले नाही त्यामुळे पाहिली नाहीत. पण जरी तिथल्या सगळ्यांनी फोटो पाहुन हीच फुले येतात ह्या झाडाला असे छातीठोकपणे सांगितले तरी मला मात्र हे झाड सोनघंटेचे आहे असे अजिबात वाटत नाही. वेबसाईटवरच्या झाडाला हृदयाकृती पाने आहेत (आपल्या खायच्या पानासारखी) आणि माहितीतही तसे नमुद केलेय पण ह्या झाडाला मात्र अडुश्यासारखी पाने आहेत. मी दिपकला फोटो दाखवला तेव्हा त्याने फुले अशीच दिसतात पण रंग गुलाबी असतो असे सांगितलेय. आता मी प्रत्यक्ष फुल पाहिल्याशिवाय काय खरे नाही.

दु:खात दु:ख म्हणजे निघायच्या आदल्या रात्री माझी त्या झाडवाल्या शेजा-याशी भेट झाली. दिवसा भेटला असता तर निदान फोटो तरी चांग्ला आला असता.

son_0.jpg

गणेशकोंडीवर भेटलेला हा एक तुरा. पंकजचे फोटो आहेत घरी. शोधायला हवेत.

tura.jpg

गणेश्कोंडीच्या पाण्यात हे लोक दिसले तरंगताना....

manduk.jpg

आधी मला वाटले की कोणी पाण्यात काळे प्लेस्टिक टाकले, मग त्या प्लॅस्टिकला हातपाय वळवळताना बघितल्यावर घाबरुन गेले. हे 'कच्चेमांडूक म्हणजे बेडकांची अजुन कसलेच अवयव न फुटलेली पिल्ले आहेत, यांना काही दिवसात हातपाय फुटतील आणि मग ते वेगळे होतील' अशी माहिती मावशीने दिली. असले भरपुर गुच्छ गणेशकोंडीत फिरत होते. मी तिथे पोहायला जाणार होते तिथे, पण हा प्रकार पाहिल्यावर धीरच झाला नाही. मी पोहतेय आणि ही मंडळी सोबत करताहेत याची कल्पना करुनच ढवळायला लागले. यांचा विडिओही आहे, अपलोड करेन. ज्यांना उलटीची भावना होतेय पण उलटी होत नाहीय त्यानी अवश्य पहा. Happy

मी इतके दिवस गावी राहिले पण कितीतरी गोष्टी पाहायच्या राहिल्या तिथल्या. कावळेसादवर महिमंडणगडावर ज्या आकाराची नेरली (आंबोलीच्या भाषेत नेरडा) मिळालेली सेम तशीच पिकलेली नेरडा होती, पण मी तिकडे गेलेच नाही... Sad माझ्या नविन घराच्या वरच्या बाजुला असलेल्या जंगलात ढवसा येताहेत आता, नेरडा पण आलीत पण त्यांचा आकार कावळेसादपेक्षा मोठा, आपल्या करंगळीएवढा.. पण मी तिकडे गेले नाही. वाटेत तोरणांची झाडे दिसली, त्यांना अजुन कळेच आलेले आहेत. त्यांचा मात्र फोटो घेता आला. आंबोलीला जांभळांना इतका बहर आलाय कि पाने दिसतच नाहीयेत, फक्त्स पांढरी फुलेच फुले दिसताहेत सगळीकडे. मोठ्या अंजीराच्या आकाराचे उंबर पिकलेत अगदी.. हवा ह्या सगळ्या वासांनी अशी कुंद झालीय की काहीच न पिता माणसाला चढावी.... मी एकात एक घुसलेल्या अंजन्-जांभुळ-उंबराच्या झाडाखाली फोटो काढत उभी होते तर पाच मिनिटात डोके गरगरायला लागले. वाटले अजुन पाच मिनिटे इथे थांबले तर पुर्ण नशा चढून झोक जायला लागेल....
बकुळीचा बहर ओसरलाय आणि झाडे अगदी बारीक फळांनी भरलीत. ती पिकतील तेव्हा त्यांचा आस्वाद घ्यायला मी परत तिथे असावी ही प्रभुचरणी विनंती/प्रार्थना जे काय असेल ते.....

वा साधना, मस्त रिपोर्ट. त्या सोनघंटेचा फोटो मिळाला, तर माझी अनेक वर्षाची अपूर्ण इच्छा पूर्ण होईल.
त्या बेडूकमाश्यांचा थवा (!) बघून मला, फिल्म्स डिव्हीजनची स्विम्मी हा चित्रपट आठवला. ते जर असे समूहात राहिले नाहीत, तर जगायची शक्यता फारच कमी. या एकीला, किंगफिशरपण घाबरत असेल.
जांभळाच्या फूलांचा घमघमाट मी पण तिथेच अनुभवलाय. इतरत्र नाही आढळला कुठे. या अश्या धुंद करणार्‍या वासामूळेच, अस्वले येत असणार तिथे.

त्या जिप्स्याच्या फोटोमधल्या फूलांचे नाव लिहितो रात्री. माझ्याकडे अंबोलीचेच अंजनाचे फोटो आहेत ते टाकतो.

मानुषी, बदामाच्या बिया फोडणे फारच जिकिरीचे. पक्ष्यांना तर ते शक्यच नाही. उंदरासारखा, अगुती नावाचा एक प्राणी, ते करु शकेल, पण तो प्राणी आपल्याकडे नाही बहुतेक. या कठीण आवरणातल्या बिया, पावसात मात्र नीट उकलून रुजतात.

हं........दिनेशदा एक गंमत आठवली. माझ्या माहेरीसुद्धा खूप मोठी बाग आहे घराभोवताली. तर तिथेही बदाम पडायचे. एकदा लहानपणी भातुकली करायचं ठरलं तर बाकी सर्व घरातल्या मोठ्यांच्या मदतीने मस्तपैकी चूल वगैरे मांडून केलंच. पण यासाठी १५ दिवस आम्ही सगळी मुलं बागेतले बदाम वेचत होतो. मग आदल्या दिवशी ते फोडले ...बाप रे किती व्याप! आणि भातुकलीच्या दिवशी मस्तपैकी खीर केली होती या बदामांची! बदाम जर छान फुटला तर एक लांबडी पांढरी गर असलेली बी मिळते.

हिंदी महासागरातल्या मालदीव देशात (आपली रुणुझुणू असते तिथे ) हे बदाम चक्क सुका मेवा म्हणून विकायला असतात. बाकिच्या देशांत बदाम पिस्ते असतात तर तिथल्या एअरपोर्ट वर हे बदाम. पण ते सुबकरितीने फोडलेले असतात. आमच्या मुंबईच्या घरी यांची पिवळी जात आहे. (पण हे लाल बदाम ओठावर घासून ओठ रंगवता येतात, तसे त्यांनी होत नाही.)

हि पाने शिवून, शिंपी पक्षी पण घरटे करतो. तूमच्याकडे पण असणार नक्कीच.

शिंप्याला मोठे पान शिवून घरटे बांधायचे असते. बदामाचे एखादे पान खाली वाकवून वळवलेले असेल. ते चक्क दोर्‍याने शिवलेले असते.
पण या पक्षाचा आडाखा एवढा पक्का असतो, कि निवडलेले पान, त्याची पिल्ले मोठी होईपर्यंत पिकून गळत नाही.
आणि कुणी समोर असेल, तर तो पक्षी अजिबात घरट्यात जाणार नाही. माणसांवर त्यांचा अजिबात विश्वास नसतो.

Pages